कधी कधी एखादा माणुस किंवा समाज किंवा देश समजायला काही दिवस लागतात तर कधी काही वर्ष सुद्धा कमी पडतात. जपान आणि जपानी हे असच एक समजायला अतिशय अवघड प्रकरण. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांची भाषा आणि नंतर मग त्यांच्या चालीरीती, स्वभावविशेष, आचार-विचार ... सगळच अवघड. त्यामुळे त्याबद्दल काही लिहीणेही अवघड. पण साधारण वर्षभर इथे राहुन चांगले, वाईट असे जे काही अनुभव आले ते शब्दबद्ध करण्याचा हा एक प्रयत्न.
----
वेळ : रात्री अकरा-साडेअकराचा सुमार
स्थळ : टोक्योमधील एक मध्यवर्ती रेलवे स्टेशन
मध्यवर्ती असल्याने नेहेमीप्रमाणे झगमगाट होताच. दैनंदिन व्यवहाराचा दिवस असुनही रात्री उशिरापर्यंत बरेच 'इझाकाया' आणि भोजनालये भरलेली होती. इझाकाया म्हणजे मित्र मैत्रिणी किंवा सह-कर्मचारी यांच्याबरोबर दारू पित गप्पा मारण्याची जागा. मुख्य काम गप्पा मारणे, दारू वगैरे साईड डिश. जसजशी शेवटच्या ट्रेनची वेळ जवळ येते तसतसे सगळे जण आपली पार्टी संपवुन स्टेशनकडे धाव घेतात. त्यामुळे शेवटच्या ट्रेनसाठी सुद्धा तेवढीच गर्दी असते. दिवसभर मरमर राबतील पण संध्याकाळी मात्र मजा करतील. बहुतेक सगळे कर्मचारी सूट-बूट वाले आणि मग हिप्पी-स्टाईलची केशभूषा करुन कुठे-कुठे टोचुन घेतलेले आणि जमेल तेवढी विचित्र वेशभूषा केलेले महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी. पण सगळीकडे उत्साही - आनंदी वातावरण.
मी आजच्या दिवसाचे काम संपवून घरी चाललो होतो. खूप थकलो होतो त्यामुळे कधी एकदा घरी पोचतोय असे झाले होते. अर्ध्या तासाचा रेलवेचा प्रवास, त्यातून गर्दी .. पण शिस्तबद्ध, पण उलट शिस्तबद्धतेचाच अधिक त्रास होतो. सगळे जण आपल्याच नादात. तुडूंब भरलेली ट्रेन असते, पण त्या ट्रेनचा तथाकथित धडक-धडक आवाज सोडला तर बाकी कुठलाही आवाज नाही. सगळीकडे एकदम चिडीचूप. सगळेजण कर्णयंत्र घालून गाणी ऐकत असतात, गेम्स खेळत असतात, टिव्ही बघत असतात किंवा मोबाईल-ईंटरनेटवर भ्रमण चालू असते. कंपनीपासुन चालत फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर हे स्टेशन. पण तरी आज खूप वेळ लागतोय असे वाटत होते.
स्टेशनवर पोचलो आणि क्षणभर अवाक झालो. जागोजागी पुठ्ठ्यांच्या पथारी टाकून अनेक जण झोपले होते. अक्षरश: चालायला सुद्धा पुरेशी जागा नव्हती. काहींनी पुठ्ठ्यांचे आडोसे केले होते .. कदाचित स्वत:चे समाजातील स्थान झाकण्यासाठी असेल, काही जणांकडे आपण परदेशी प्रवासाला जाताना घेतो तसली मोठी बॅग होती ... त्यामधे बहुतेक हे सगळे झोपण्याचे सामान ठेवत असावेत, काही नुसतेच सिगारेट, बिअरचे कॅन घेऊन बसले होते ... बाकी काहीच नव्हते त्यांच्याकडे, काही तर एकदम अपटूडेट सूट, टाय वाले लोक सूट डोक्याखाली उशी म्हणुन घेऊन झोपले होते. अनेक संमिश्र भावनांचे तरंग उठले ते बघितल्यावर. वाईट वाटले, पण तेवढीच त्यांची कीवही आली. हेवाही वाटला, चिडचिडही झाली.
हे सगळे बेघर लोक. काम नाही म्हणुन पैसा नाही, आणि म्हणुन बाकी काहीच नाही. घरदार सगळे सुटलेले. काम नाही म्हणजे एकतर काम करण्याची इच्छा नाही, किंवा व्यवसायामधे खोट आल्याने दिवाळं निघुन पुढे काहीच मार्ग उरला नाही, किंवा प्रचंड कामाच्या ओझ्यामुळे ताण असह्य होऊन वेडेपणा आलेला .... अनेक कारणे. खरं बघायला गेलं तर जपानमधे इतकी निरर्थक कामे करत असतात अनेक जण. त्यामुळे मग आश्चर्य वाटते की या बेघर लोकांनाच का कुठे काम मिळत नाही ? अमेरीका, जपानसारख्या देशात भिकारी वगैरे नसतात हे लहानपणापासुन ऐकत आलो होतो आणि इतके वेळा जपानला येऊन गेलो तरी भिकारी कुठेच आढळला नव्हता. पण आता मात्र सार्वजनिक ठिकाणी बसल्यावर अनेक वेळा हे बेघर लोक येऊन भिका मागत असतात. त्यांना काही खायला दिले की त्यांच्या चेहर्यावर समाधान दिसुन येते. (अर्थात यातही परत 'जेवण नको, पैसे द्या' म्हणणारे सुद्धा असतातच.)
अशा वेळेला ईंटरनेटवर भिरभिरणार्या व बर्याच प्रसिद्ध असलेल्या एका कवितेच्या शेवटच्या ओळीची आठवण येते. " ... समृद्धीच्या देशातील लोक सुद्धा समाधानच शोधत असतात."
---------
वेळ : दिवसातली कुठलीही .. पण एक छान फ्रेश दिवस.
स्थळ : टोक्यो शहरातील कुठल्याही रुग्णालयाच्या आसपासचा परीसर
जगात कुठेही कुठल्याही प्रकारचे रुग्णालय म्हटले की साधारण आपण एक चित्र मनाशी ठरवतो. सगळ्या औषधांचा किंवा स्वच्छतेसाठी वापरल्या जाणार्या रसायनांचा एक ठराविक मिश्र वास, एक विचित्र शांतता, मुख्य दरवाजाच्या आजुबाजुला रुग्णवाहिका त्यातुन उतरणारे (किंवा उतरवले जाणारे) रुग्ण, रुग्ण-सेवकांची आणि रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ वगैरे वगैरे. साधारण असेच चित्र जपानमधे सुद्धा दिसते. पण कधी कधी मात्र एक वेगळीच फ्रेम चित्रित होते. थंडी चांगली जाणवत होती, पण बरेच दिवसात सुर्यदर्शन काही होत नव्हते. एका शनिवारी मस्त हवा होती, सुर्यानेसुद्धा ढगांचा पडदा सारुन दर्शन दिले होते म्हणुन जरा भटकायला बाहेर पडलो. एका रुग्णालयाच्या जवळुन जाताना खाली रस्त्यावर काही रुग्ण मस्त पै़की व्हिलचेअरवर सलाईन लावुन सिगारेट ओढत बसले होते. हे चित्र नक्कीच मनाशी योजलेले नसते. एकतर रुग्णांना धुम्रपान करायची परवानगी आहे हे बघुनच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण धुम्रपान सोडले तरी ४-५ रुग्ण असे मस्तपैकी रस्त्याच्या कडेला उन खात कोंडाळे करुन गप्पा मारताहेत हे बघुनही आश्चर्य होते. काहींच्या हातात त्यांच्या सलाईनच्या बाटल्या, काही आपले हात किंवा पाय प्लास्टरमधे घालुन आलेले, काहींना शरीरावर कुठेतरी बँडेज बांधलेले.
अर्थात हे दृष्य आश्चर्यकारक असले तरी जरा विचार केल्यावर त्यामागची मानसिकता समजल्यावर वाईट वाटते. कुठल्याही मोठ्या शहराप्रमाणे टोक्योमधे सुद्धा विभक्त कुटूंबपद्धती आली आहे. त्यामुळे साधारण विशीच्या आसपासची मुले-मुली 'हितोरीगुराशी' - कुटूंबापासुन विभक्त होऊन एकट्याने जगणे पसंत करतात. त्यामुळे काही कारणामुळे आई-वडीलांना रुग्णालयात जावे लागले तरी पोरं दिवसातुन कधी तरी भेटून जातात. अर्थात स्वत:चे काम सोडून दिवस दिवस बसणे अवघड आहे पण सुट्टीचे दिवस सुद्धा 'एडजस्ट' करतात. आज तू थांब उद्या मी थांबतो .... वगैरे वगैरे. कधी कधी तर आक्खा दिवस कुणी येत नाही. त्यामुळे मग रुग्णांच्या स्थितीची कल्पना करता येईल. अशा परिस्थितीत त्यांनी तरी मग दुसरे काय करावे ?
----
वेळ : सहसा दुपार किंवा रात्रीच्या जेवणाची
स्थळ : काही ठराविक भोजनालये
सहसा जपानी लोक बाहेर जेवण करणे पसंत करतात. कामाच्या दिवशी तर कंपनीची खाणावळ नसेल तर सगळे जण बाहेरच जेवण करतात. त्यामुळे एकुणच डबा घेऊन जाणे किंवा घरी बनवून खाण्याचा सोस कमीच. त्यामुळे मग आमचे पण दुपारचे जेवण बाहेरच. त्यातच जपान्यांमधे धुम्रपानाचे प्रमाणही पराकोटीचे. त्यामुळे मग काही भोजनालयांमधे (रेस्टोरेंटमधे) धुम्रपानासाठी वेगळी जागा निर्धारीत केलेली असते. आता वेगळी जागा म्हटल्यावर एक चित्र उभे राहते की धुम्रपान न करणार्यांना त्या धुराचा त्रास होणार नाही, अशा तर्हेने मधे एखादी भिंत वगैरे घालून आडोसा वगैरे केला असेल. पण काही रेस्टोरेंटमधे फक्त एक फलक तुम्हाला तुमची जागा दाखवतो. त्या फलकाच्या अलिकडे सिगारेट ओढणार्यांची जागा आणि पलिकडे न ओढणार्यांसाठी.
खरच अशा वेळेला जपान्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते. हसायला तर येतेच की यातून त्यांना काय साध्य करायचे आहे ? म्हणजे केवळ नियम आहेत, म्हणुन पाळायचे याला सुद्धा अंधविश्वास नाही म्हणायचे तर काय म्हणायचे ? जपान्यांच्या ह्या अश्या आंधळेपणाने नियम पाळण्याबद्दल तर कदाचित एखादे पुस्तक लिहीता येईल. काही बॉलिवूड चित्रपटात सुद्धा त्यांची खिल्ली उडवलेली दिसते. 'हम जापानसे आया हूं' म्हणत १०० वेळा वाकवाकुन अभिवादन करणारे एक पात्र म्हणुनच हसवून जाते.
----
वेळ : शक्यतो शुक्रवार रात्रीची
स्थळ : एखादे जरा कमी गर्दी असलेले टोक्योमधले रेलवेस्टेशन
शुक्रवार अशासाठी की दुसर्या दिवशी सुट्टी असल्याने बरेचदा शुक्रवारी 'नोमिकाई' असतात. आणि दारुकाम म्हटले की एकदम टाईट. अक्षरश: काही जपानी दारू पिऊन पुर्ण टल्ली झालेले असतात. मला प्रश्न पडतो हे घरी तरी जातील का नीट ? आणि मग यातुनच काही विचित्र प्रसंग घडतात. बरेचदा अनुभवायला मिळणारा प्रकार म्हणजे ट्रेनमधे बसल्यावर झोप लागून स्वत:चे स्टेशन येऊन गेले तरी जाग न येणे आणि पुढच्या किंवा शेवटच्या स्टेशनला उतरायला लागणे. त्यातून शेवटची ट्रेन असेल तर काही खरं नाही.
... पण पिऊन टल्ली होऊन पडण्याची भयंकर अवस्था म्हणजे प्लॅटफॉर्मवर पडणे. अशा वेळेला पोलिस लोकांची सहनशक्ती पराकोटीला पोचते. ही लोकं अजिबत कुणाला जुमानत नाहीत. एक माणुस असाच प्लॅटफॉर्मवर अगदी कडेला झोपला. त्याला पोलिसांनी आधी ऊठवुन बाजुला बसायला सांगितले .... ते ऐकले नाही तर ते स्वत: त्या माणसाला उचलुन बाजुला न्यायला लागले तर एकदम शिव्यागाळ सुरु करुन हा हिरो त्यांनाच मारायला लागला. बूट काढुन फेकुन दिले. शेवटी जरा पोलिसी हिसका दाखवल्यावर साहेब थोडे नरम झाले आणि मुकाट्याने त्या पोलिसांबरोबर निघुन गेले. एवढ्या सगळ्या नाट्याकडे बाकीचे जपानी ढुंकूनसुद्ध बघत नव्हते. माझ्यासारखे परदेशी लोकच उत्सुकतेने बघत होते.
... आणि या सगळ्यावर कडी म्हणजे, एक अतिशय किळसवाणा प्रकार अनुभवला. भरपूर गर्दी असते ट्रेनला ... सगळेचजण बहुदा दारूपार्टी करुन आलेले असतात त्यामुळे सगळा मिश्र वास भरुन राहीलेला असतो. त्यातुन दारे खिडक्या बंद असल्यामुळे तो बाहेर जायला काहीच मार्ग नसतो. बर्याच जणांची अवस्था अवघड झालेली असते. आणि कुणाचीतरी सहनशक्ती संपते आणि त्या गर्दीमधेच भळाभळा सगळी दारू आणि बरेच काही बहेर पडते. त्यातुनही मग ट्रेन खराब होऊ नये, इतरांना त्रास होऊ नये म्हणुन काही महाभाग आपल्या बॅगेमधे तो प्रकार सोडुन देतात. एवढाच काय तो प्लस पॉईंट !!!
----
अर्थात हे सगळे मला आलेले अनुभव. हे काही प्रातिनिधीक नक्कीच नव्हेत. भारत असो, जपान असो, अमेरीका असो ... शेवटी माणुस म्हटले की चांगले आणि वाईट हे जोडीजोडीनेच येतात. हे सगळे तसे बघायला गेले तर वाईट अनुभव. पण चांगले अनुभव सुद्धा भरपूर आहेत. त्यामुळे या अनुभवावरुनच कुणी जपान किंवा जपान्यांबद्दल काही मतं बनवावीत अशीही अपेक्षा नाही. किंबहुना कुणाच्या सांगण्यावरुन एखाद्याने एखाद्याबद्दल चांगले / वाईट मत बनवावे यात काही अर्थ नाही. मग प्रश्न पडतो हे सगळे लिहीण्याचा खटाटोप तरी कशासाठी ? याला माझ्याकडे काही उत्तर नाही. आपल्याला(ही) लिहीता येते, आणि लिहीणे म्हणजे केवळ आपले अनुभव शब्दबद्ध करणे या (गैर)समजातुन एक पुर्ण केलेली हौस या शिवाय तरी या लिखाणात दुसरे काही नाही.
छान लिहिले
छान लिहिले आहेस. इथून तिथून सगळे थोड्या फार फरकने एकाच माळेचे मणी!
छान लिहिले
छान लिहिले आहे. प्रसंग डोळ्यासमोर उभे रहतात. शेवटी लिहिलेले तज्ञान पण एकदम सही...... पटलं.
'अर्थात हे सगळे मला आलेले अनुभव. हे काही प्रातिनिधीक नक्कीच नव्हेत. भारत असो, जपान असो, अमेरीका असो ... शेवटी माणुस म्हटले की चांगले आणि वाईट हे जोडीजोडीनेच येतात. हे सगळे तसे बघायला गेले तर वाईट अनुभव. पण चांगले अनुभव सुद्धा भरपूर आहेत. त्यामुळे या अनुभवावरुनच कुणी जपान किंवा जपान्यांबद्दल काही मतं बनवावीत अशीही अपेक्षा नाही. किंबहुना कुणाच्या सांगण्यावरुन एखाद्याने एखाद्याबद्दल चांगले / वाईट मत बनवावे यात काही अर्थ नाही'
वर्षा
छान लिहिलं
छान लिहिलं आहेस मिहिर. जपानचे अजून काही अनुभव लिही ना!
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/
मस्त
मस्त लिहिलंस रे..

परदेशी लोक इथे आल्यावर नाही का, झोपड्या-आदिवासी-हत्ती-साप-साधूलोक यांचे फोटो काढून तिथं दाखवतात. मग तिथले लोक आपल्याबद्दल एक विशिष्ट मत बनवतात- धिस इज इंडिया- म्हणून.
पण आपण त्यांच्यासारखी अक्कल कुठे गहाण ठेवलीये? तुझ्या लेखाकडे 'अनुभव' म्हणूनच बघतील रे सारे. वाचून 'मत बनवावे' म्हणून नाही..
--
भेटण्याआधीच ठरलेली असते वेळ जेव्हा जायची-
शहाण्या मुलासारखी खेळणी आवरून घ्यायची..!!
मिहिर, अरे
मिहिर, अरे संकोच न बाळगता हे असचं लिहित जा. छान वाटतं अस काही वेगळं अनुभवातून लिहिलेलं. नक्कीच हे सर्व प्रसंग नि तुझे अनुभव प्रातिनिधिक नाही. पण त्यातूनही प्रत्येकाचा निराळा दृष्टीकोण कळतो परदेशात जीवन जगण्याचा. मी 'बहुसांस्कृतिक देवाण घेवाण' हा एक बा. फ. उघडला तो याच कारणासाठी.
मग हिप्पी-स्टाईलची केशभूषा करुन कुठे-कुठे टोचुन घेतलेले आणि जमेल तेवढी विचित्र वेशभूषा केलेले महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी>> हे चित्र इथेही दिसते.
ट्रेनमधील शांतता खरचं खायला उठते कधीकधी. आणि कानाला यंत्र लावून गाणी ऐकणारी मुलमुली हा विचार नाही करत की इतरांनाही त्यांच्या गाण्यांचा आवाज ऐकू येतो. इथे अनेक जन खूप सेंट लावतात शरीराला, त्याचा वासही नकोसा होतो कधीकधी.
मिहीर मस्त
मिहीर मस्त रे ... बरेच दिवसानी...
चांगलं
चांगलं लिहिलं आहेस. मला वाटलं शुक्रवारची ट्रेनमधली ओकाबोकी विसरलास की काय!!!! कॅप्सूल हॉटेल्सबद्दल का नाही लिहिलंस काहीतरी. विशेषतः शेवटची ट्रेन चुकली की बरीच लोकं तिकडेच वळतात.
वा मिहीर
वा मिहीर मस्तच ....
तु आपला दर शुक्रवारी typing च करत जा.
मिहीर, अरे
मिहीर,
अरे मस्तच लिहिलं आहेस... आणि या लेखाचा शेवट तर एकदम छान.
अजुन लिही.
-----------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
सगळ्यात
सगळ्यात आधी प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक आभार.
गौरी, जपानचे अनुभव बरेच आहेत ग .... पण सगळे लिहीत बसलो तर वेळच पुरणार नाही ... आणि वाचणार्याला पण कंटाळा येईल. आत्ता एवढेच लिहायला सुद्धा जवळजवळ महिना लागला. बघू .... जमेल तसे लिहीन नक्की. पण तुला मा.बो. वर बघून छान वाटले.
साजिरा, खरं सांगायचे तर ह्या लेखाचे मूळ ह्याच 'धिस ईज ईंडीया' टाईप विचारसरणीला आहे ... कुठलाही देश perfect नसतो, तरी पण भारताबद्दल बाहेर मात्र असेच चित्र आहे ... झोपडपट्टी, भिकारी, दारिद्र्य !! आजही जपानमधे कितीतरी लोक विचारतात की तुम्ही अजुन हत्तीवरुन फिरता का ? आणि सगळ्यात वाईट याचे वाटते की भारतात हयात घालवलेली अनेक मंडळी अमेरिकेत जाऊन 'Dirty India' म्हणुन या अपप्रचाराला हातभार लावतात. anyway .. this is an unending topic.
सायो, शुक्रवारची 'ओकीबोकी' ट्रेन विसरणं शक्य आहे का ? पण कॅप्सुल हॉटेल बद्दल फारशी माहिती नसल्याने काही लिहीले नाही ... अजुन तरी तो 'अनुभव' नाहीये.
तुला माहीत असेल तर तूच सांग. तुझ्याकडे तर अनुभवांचा प्रचंड खजिना असेल.
आरती, अग हे एका शुक्रवारचे नाहीये .... गेले अनेक शुक्रवार, शनिवार, रविवार थोडे थोडे करत पुर्ण केलय. खूप वेळ लागतो लिहायला. मराठी वर्डस रीमेंबरच होत नाहीत टायमाच्या वेळेला. अजुन सवय नाहीये ना. आता होईल हळू हळू.
=== I m not miles away ... but just a mail away ===
का रे
का रे 'अनुभव' का लिहिलंस? नाही, मलाही नाहीये कॅप्सूल हॉटेल्सचा अनुभव. टि.व्हीवर वगैरे पाहिलंय तेवढंच. इंटरेस्टिंग वाटतात मात्र.
सायो, कारण
सायो, कारण कॅप्सुल हॉटेल बद्दल काहीच माहीती नाही. आणि इथे बाकीचे सगळे अनुभव असल्याने अधोरेखित केले. बाकी काही नाही.
=== I m not miles away ... but just a mail away ===
मिहिर, तू
मिहिर, तू ईंग्रजी माध्यामातून शिकलेला आहेस का?
मराठी वर्डस रीमेंबरच होत नाहीत टायमाच्या वेळेला>> वाचून हसायला आलं. माझ्या मते अनुभव जर जिवंत असेल तर तो लिहून काढायला फार वेळ लागत नाही. आठवून आठवून लिहितं बसलं तर बर्याचदा लिखाण वाचनिय होत नाही. एकटाकी लिखाणाची चव न्यारी असते मिहिरा.
मिहिर,
मिहिर, अनुभव आणि त्यातून काय म्हणायचे आहे ते पोहोचले. छान लिहिले आहेस, नियमित लिहित जा वेळ होईल तसा..
मस्तं
मस्तं लिहिलंय.
>>आणि या सगळ्यावर कडी म्हणजे, एक अतिशय किळसवाणा प्रकार अनुभवला. भरपूर गर्दी असते ट्रेनला ... सगळेचजण बहुदा दारूपार्टी करुन आलेले असतात त्यामुळे सगळा मिश्र वास भरुन राहीलेला असतो. त्यातुन दारे खिडक्या बंद असल्यामुळे तो बाहेर जायला काहीच मार्ग नसतो.
--हो हो अगदी! आणि सकाळी?!!! बहुतेक जपानी सकाळी आंघोळ करत नाहीत. आणि सर्वच जण दात घासतात असंही नाही. मग काय बंद ट्रेनमध्ये आनंदी आनंद!
सायुरी,
सायुरी, त्याचं कारण काळी कॉफी,मांस, दारु नी सिगारेट हेही आहे.त्यामुळे बर्याच जॅपनीज लोकांचे दात खराब असतात नी घाण श्वास.
हो गं! हेही
हो गं! हेही कारण आहेच
मराठी
मराठी वर्डस रीमेंबरच होत नाहीत टायमाच्या वेळेला>>.
हात्तीच्या,त्याची कशाला काळजी करताय,ते तर इथे राहुनही आम्हाला आठवत नाहीत.:-)
तुमची शैली आवडली,बरीचशी अनिल अवचटांसारखी.
पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.....
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल