भाग १ आणि २ साठी इथे क्लिक करा http://www.maayboli.com/node/9197
सात-आठ दिवस झाले, मी ’झाबुल’ (ईराणचे मधे दक्षिण-पूर्वेला असलेले एक शहर) मधे माझ्या एका मित्राकडे वास्तव्याला होतो. काहिही कल्पना न देता मी त्याच्याकडे सहकुटंब गेलो होतो. मला त्याच्याकडे जाण्याची फारशी ईच्छा नव्हती, पण माझ्याकडे दुसरा पर्याय तरी काय होता? अचानक मला त्याच्या घरी पाहून, तेही सहकुटुंब त्याच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली..! मी गेल्यासरशी काय सगळी कहाणी सांगणार म्हणून बेगमच्या तब्येतीचं कारण पुढं केलं. त्यानी छान पाहूणचार केला.. पहिल्याच दिवशी रात्री मी त्याला इतिव्रुत्तांत दिला. माझं पलायन ऐकुन तो तर बिचारा बिथरुनच गेला...
"या खुदा..अलजान (माझे बरेचसे मित्र या नावानिच मला संबोधायचे), कितना खतरा उठा लिया तुमने, अगर पकडे जाते तो खुदा ना खास्ता, तुम्हारी गर्दन उडा देते तालिब"
"क्या करु अहमद्जान, मेरे बिबि-बच्चोंकि फिक्र ना होती, तो दो-चार को मारकर, अल्लामिया के दरबार मे दस्तक देता! बस उनकी पर्वा है, जो तेरे पनाह मैं आया हू!"
अहमदनी मला खुप मानसिक आधार दिला. त्याच्या धंद्यामधे मी त्याला केलेली मदत तो विसरला नव्हता. त्याशिवाय अहमद खुप पापभिरु होता. ईस्लाम मधे तुमच्याकडे जर कोणि जीवाच्या भीतिने आसर्र्यासाठी कुणी आलं तर त्याला सहारा देणं, सुरक्षितता देणं हा एक मोठा सवाब आहे. तो त्याचं कर्तव्य आस्थेनी करत होता. बायका-पोरांसाठी त्याने काही कपडेसुध्दा मागवले बाजरातून.. मला खरंच खुप अपराधी वाटू लागलं होतं. वाटलं होतं दोन-चार दिवस शांत डोक्यानी जर विचार केला तर काही मार्ग निश्चित निघेल, पण आता जवळ जवळ आठ दिवस झाले, आणि मी अजुनही शुन्यात अडकलेला.
आयुष्यभर मी स्वत:च्या धंद्यात होतो. माझ्या नोकरांना हुकुम करणारा मी, दुसर्र्याचा हुकुम कसा मानेन? नोकरी हा एकमेव पर्याय पुढे दिसत होता, पण दिल माननेको राजी नही था! बरं, नोकरी करायची म्हणली तरी कोण आणि कसली नोकरी देणार मला? शिक्षणाची आपली गाठ्भेट फक्त अक्षरन्यानापूर्तीच, बाकी कुठलीही कला अंगात नाही. काय करावे या विचारानी मी पुरता ग्रासलो होतो. त्या दिवशी रात्रीच्या जेवणानंतर अहमद बरोबर चर्चा केली. त्याने काही दिवस इथे रहा, मग बघू म्हणून विषय टाळण्याचा प्रयत्न केला खरा, पण मनोमन आम्ही दोघेही जाणुन होतो कि आता शांततेची वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता. तालिबानी सत्ता इतक्या लवकर संपुष्टात येईल याची कुठलिही चिन्ह दिसत नव्हती. मी परिस्तिथीपुढे गुडघे टेकले आणि नोकरीचा पर्याय स्वीकारला. झाबुल हे तसं छोटंसं शहर, तिथे काय नोकरी मिळणार? मी तेहरानला जायचे ठरवंलं. माझी गाडी फार काळ ईराणमधे ठेवणं धोकादायक होतं. अहमदनी सल्ला दिला आणि मी गाडीची नंबरप्लेट काढुन ती काळ्या बाजारात विकली. अगदि कवडिमोलाचा भाव मिळाला, पण त्यावेळी ते पैसेही माझ्यासाठी खुप महत्वाचे होते. गाडी विकली तेव्हा खुप वाईट वाटलं. ति गाडि मी फार कष्टातून घेतली होती, तिच्या बद्दल माझ्या मनात फार प्रेम वगैरे होतं असं नाही, पण गाडी विकली तेव्हा मला स्वतःला खुप सामान्य वाटायला लागलं. गाडि विकुन घरि चालत येत असतांना, सामान्य चाकरमान्यांना, मजदुरांना मी अवति-भवती पाहत होतो, आणि मी ही आता वेगळा कुणी नाही या विचारांनी मनातल्या मनात आक्रंदत होतो.
बेगम आणि पोरांना घेउन मी तेहरानला आलो. इथे कुणाच्या घरी राहण्यापेक्षा आम्ही ७-८ दिवस होटेलमधे राहण्याचा निर्णय घेतला. ’गुलबहार’ हे माझ्या ओळखीचं होटेल. कामानिमित्त मी जेव्हा जेव्हा ईराणला यायचो तेव्हा इथे उतरायचो. तिथला मैनेजर माझा मित्रच झाला होता. छान रुम मिळाली. मी विश्रांती न घेता कामाला लागलो. पहिल्यांदी माझ्या ओळखिच्या सगळ्यांना फोन लावून मी गाठीभेटीची वेळ ठरवली. यादी खुप मोठी होती, दोन दिवसांचा कार्यक्रम तयार झाला. सगळ्यांना भेटलो, सगळ्यांनी माझी कहाणी ऐकली, पण काम देण्यास कुणिही तयार नव्हतं. नाही म्हणायला सहानभूती प्रत्येकालाच होती, पण सहानभूतीनं पोट थोडिच भरणार होतं... अल-हजिरा ही तिथली खुप मोठी कार्पेट ट्रेडिंग कंपनी. जगभरात त्यांची कार्पेट, शाली, हैंडिक्राफ्ट जात असत. माझा बहुतेक माल मी या कंपनीतर्फेच पाठवत असे. तिथला मालक माझ्या चांगला परिचयाचा होता. त्याने आशेचा एक किरण दिला. कार्पेट आणि शालिंच्या गुणवत्ता तपासण्याचं काम होतं. त्याला माहित होतं, की या कामासाठी माझ्यासारखा अनुभवी बंदा त्याला मिळणार नाही. पण ही खुप मोठी कंपनी आणि त्यामुळे त्याला कायद्याच्या आड राहून काही करायचं नव्हतं. हे काम मिळण्यासाठी मला काम करण्याची सरकारी परवानगी (वर्क परमिट) आवश्यक होतं. त्यानेच सल्ला दिला, एका माणसाचा पत्ताही दिला आणि आश्वासन दिलं, की हा माणूस मला वर्क परमिट बनवून देईल. मला या सगळ्या सरकारी किचकट औपचारिकतेचा खरंतर राग यायचा. या सगळ्या कामासाठी खुप वेळ आणि पैसा लागतो ही माझी समजुत. मी एक दोन दिवस त्या माणसाला संपर्क न करता, अजुन कुठे काय काम मिळेल का याची चाचपणी केली. पण वाट्याला निराशाच आली. एक-दोन जणांनी उसने पैसे देण्याची तयारी दर्शवली, पण मला कर्ज घ्यायंचं नव्हतं, कर्जात बेजार झालेल्या कित्येकांना मी पाहिलं होतं, आणि त्यांच्यापैकी कित्येकांच्या वाताहतीला मी केलेलं शोषण मला आठवत होतं, मला माझाच धाक वाटत होताम म्हणुन मला कर्ज घ्यायचं नव्हतं. त्या रात्री बेगमबरोबर बोललो, तिनेही सल्ला दिला वर्क परमिट करण्याचा. तिने लपवून काही दागिने बरोबर आणले होते. वेळ पडलीच तर ते विकण्याचि तयारी दाखवली. मला खुप वाईट वाटलं, पण झोपलेल्या मुलांकडे बघितलं आणि मी ही तयार झालो. दुसर्र्या दिवशी मी त्या माणसाकडे गेलो. आमिन दुर्राणी त्याचं नाव. तो तसा पेशाने वकील, पण श्रीमंताची सरकारी कामे करण्यात पटाईत. त्याची सरकार दरबारी पोहोचही खुप मोठी होती. त्यानी माझी सगळी कथा ऐकली, सिगरेटीचे झुरके ओढत त्याने तालिबानच्या नावाने दोन-चार शिव्याही हासडल्या...
"अल्ला रजामंद है तुझपर, तुझे किस बात की पर्वा? फिक्र मत कर, अब तुम यहा आये हो सब ठीक होगा! मुझे तुम्हारा पासपोर्ट और व्हिसा दिखाना.."
त्यानी माझे कागदपत्र, चश्म्याच्या कोपर्र्यातू अगदि बारकाईने न्याहाळली, ते काम करत असतानाच, टेबलाखालची बेल दाबून त्याने हरकाम्याला बोलावले. चहाचा सेट बदलायला सांगितले आणि काहि बिस्किट आणायला सांगितले..."
"साहेब ये तकल्लुफ कि कोई जरुरत नही" मी आर्जवानी म्हणालो..
"अरे भाई ले लो, तुम किस दौरसे गुजर रहे हो ये मै अच्छीतरह से समझ रहा हू!" एव्हढं बोलण्यापुरंतं डोकं वर काढून पुन्हा त्यानी डोकं कागदपत्रात खुपसलं.
जवळ जवळ दहा मिनिटांनि, त्याच्या केबिन मधल्या थंडगार शांततेचा भंग करीत त्यानं बोलायला सुरुवात केली.
"देखो भाई अल्लबक्ष, पहली बात तो ये है की तुम सिंगल एन्ट्री व्हिसा पर, अपनी बेगम कि तबियत का बहाना करके आये हो! तुम्हारा व्हिसा और २० दिनमें खतम हो रहा है. ये व्हिसापे तुम्हे कोई सरकारी अफ़सर वर्क परमिट नही दे सकता. दुसरी बात, अगर तुम अपनी कहानी यु. एन. के किसी दफ्तरमे जाके बोलते हो, तो तुम्हे यहा रहेने का थोडा खर्चा, कोई ठीकाना तो मिल सकता है, लेकीन वो काम नही मिलेगा जिसकी तुम्हे तलाश है, या जो तुम्हे मिल सकता है. मुहजिरोंके लिये अलगसे काम है जिसके दामभी कम है और इज्जतभी."
मला काय बोलावं काही सुचेना.
"इसका मतलब, क्या कोई चारा नही है? मेरे दो बच्चे है प्यारे प्यारे..."
"मेरी बात अभी खतम नही हुई".. मला मध्येच अडवत अमिन पुन्हा बोलु लागला...
"एक तरकिब है, जिससे बात बन सकती है! लेकिन इसमे खर्चाभी है, और खतराभी... हम तुम्हारे ईराणी होने के सबुत बना सकते है. किसि तरहसे अगर हम तुम ईराणके हो ये साबित करेंगे तो तुम जो चाहो व कर सकते हो यहा!
"कितना खर्चा होगा?"....मी
थोडावेळ कसलासा हिशेब मनामधे करुन त्यानी मला खर्च सांगितला... म्हणाला, "लगभग दो-ढाई हजार डॊलर लग सकता है!"... मला दरदरुन घामच फुटला... काय बोलावे काही सुचेना.. पण समोर असलेल्या परिस्तिथीपुढे मी आधिच शरण गेलो होतो आणि अमिनने मांडलेल्या पर्यायांनी मी हतबलच झालो. तसे दोन-अडिच हजार डॊलर म्हणजे फार मोठी किंमत नव्हती पण अफगाणिस्तानातून निघताना या सगळ्या खर्चाचा विचार करायला वेळ कुठे होता? नकळतच माझे हात, उजव्या खिश्यातल्या बायकोच्या दागिन्यांकडे गेले. मला ते खरतर विकायचे नव्हते पण समोर कुठला रस्ताही दिसत नव्हता...
"कुछ कम नही हो सकता?" मी आर्जव केला..
"भाई अल्लाबक्ष, मै तुम्हारी कैफ़ियत समजता हु, चलो मेरे हिस्से के ३०० डॊलर छोड दो लेकिन बाकि लोगोंको तो मुझे कुछ देना होगा ना...!"
"और आप कुछ खतरे की बात कर रहे थे..!"
"हंsssss....!" त्यानं एक उसासा टाकत पुन्हा बोलायला सुरुवात केली.
"जबतक ये काम खतम नही होता, किसिको पता नही चलना चाहीये की तुम ऐसा कुछ कर रहे हो, अगर पता चला तो हम सब लोग बहुत बडी मुश्किलमें फ़ंस सकते है!"
मला काय कराव काही सुचत नव्हतं. मी विचार करुन सांगतो असं म्हणालो आणि तिथुन काढता पाय घेतला.
त्या दिवशी संध्याकाळी मी बेगमशी सविस्तर बोललो. तीला खतर्र्याची कल्पना दिली. मी कायद्याच्या विरोधात काही करा अशी तिची ईच्छा नव्हती. मलाही मनातून ते पटत नव्हतं, पण पुढे काय हा पर्यायसुद्धा दिसत नव्हता.
-*-*-*-
ईराणमधे येऊन मला तीन महिने झाले होते. सरतेशेवटी मी ईराणियन नागरिकत्वाची कागद्पत्रे मिळवली. बायकोचे दागिने विकले आणि १८०० डॊलर्सचा खर्च केला. सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला जवळ जवळ एक महिना लागला होता. नाईलाजाने एका मित्राच्या ऒफ़िसमागे त्याचे एक छोटेसे घर होते, तिथे राहण्याची व्यवस्था केली. ती नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मला धड जेवण जात नसे, खुप भीती वाटत होती, पण काम बिनादिक्कत पूर्ण झालं. मी अल-हजिरा मधे नोकरीही सुरु केली. तिथला मालक तसा माझा मित्रच, त्याने अमिनचा सल्ला घेतला आणि मला कागद्पत्र मिळण्याआधिच कामावर ठेवले. ३०० डोलर्स पगार ठरला. (३०० डोलर्स म्हणजे साधारण २८ लाख ईराणियन रियाल). खरंतर मी अफ़गाणिस्तानमधे असताना जवळ जवळ ४०० डोलर्स पगार माझ्या नोकरांना देत होतो, पण ईथे माझा नाईलाज होता. मी हुं की चू न करता तो पगार स्वीकारला. कितीतरी गोष्टी नाईलाजापरत्वे स्वीकारणे भाग होते. घर छोटे होते, मुलांना पहिल्यांदी खुप कष्ट झाले, घरात अगदी कमी सामान, जुजबिचेच... एकदा झाकिया सहज जेवताना म्हणाली, "अब्बुजान, हम क्या अब गरीब हो गये है? क्या अब हमारा बडा घर, हमारी मोटर नही होगी?" बेगम आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. "बेटा, हम गरिब नही हुए है, बस हमे कुछ दिन ऐसे छुपकेसे रेहना होगा, ता की वापस पुलिस ना..." मी पुढे काही बोलण्या आधीच बेगमनी मला टोकलं, ती नं मुलांना त्यांना समजेल अशा शब्दात, त्यांचे न संपणार्र्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांना परिस्थितीची कल्पना दिलि. त्यांना कसलिही झुटी स्वप्न तिला द्यायची नव्हती. आश्चर्य म्हणजे मुलांनीही सगळं समजुन घेतलं आणि पुढे कधिही गरिबिचा उच्चार केला नाही. एव्हढच काय फ़जलनी माझ्याकडे टॊफ़िसाठी हट्ट करायचेही सोडून दिले... खुप वाईट वाटायचं मनातून!
अल-हजिरा मधे आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी येणार्र्या शाली आणि कार्पेट्सची गुणवत्ता तपासून, त्यांची क्याटेगरी करणे, त्यांचे भाव ठरवणे, ईत्यादी काम माझ्याकडे होते. माझ्या कामाबद्दल कुणालाही कसलीही तक्रार नव्हती. तिथल्या सगळ्याच कर्मचार्र्यांशीही माझि छान मैत्री झाली होती. मी आता तो पहिला श्रीमंतीचा गर्व करणारा अल्लाबक्ष नव्हतो. लोकांना समजवून घेणं, दुसर्र्यांचा आदर करणं हे मला परिस्तिथीनं शिकवलं.
त्या दिवशी कामाचा व्याप खुपच जास्तं होता. जर्मनीमधे एक जागतिक हैंडिक्राफ्ट फ़ेअर होती. आमचा तिथे खुप मोठा स्टौल होता. त्यासाठी खास माल बाजुला काढून ठेवायचा होता. प्रत्येक कार्पेट पूर्ण अलगडून चारही बाजुनी न्याहळून, वापरलेल्या धाग्याची तपासणि करणं असं माझं काम चालू होतं. कामात मी खुपच व्यग्र झालो होतो. कार्पेट्चं काम उरकुन, मी शालींचा स्टौक बाहेर काढायला सांगितला. पहिल्याच स्टौकवर माझी नजर खिळुन राहिली... त्या माझ्याच कंपनीच्या शाली होत्या. एक एक शाल माझ्या लक्षात होती, शिवाय माझ्या कंपनीचा टैग तर होताच. मी लगेचच त्या स्टोकची पेमेंट व्हाउचर्स आणि डेलिव्हरी चलान मागवली. ते कागद पाहिले आणि माझ्या तळपायाची आग मस्तकापर्य़ंत गेली. ज्या माझ्या मित्रानी मला टी. व्ही. चोरून पाहण्याचा मार्ग दाखवला होता त्याच्याच नावाने सगळी पेमेंट्स झाली होती. त्याने खुप कपटी योजना बनवली होती आणी त्यात त्याला यशही मीळाले होते. माझी सगळि संपत्ती त्याने फार चलाखीने हडप केली होती. मला एका रात्रीची मुभा का मिळाली ह्याचं उत्तरही मला त्या दिवशी मिळालं. काय करु आणि काय नाही काही सुचत नव्हतं, घरी आलो आणि खुप रडलो त्या दिवशी. जर अफ़गाणिस्तानात असतो तर आज नक्किच एक खुन माझ्या हातून झाला असता...!
त्यानंतर ५-६ दिवस माझे कामात फार लक्ष लागत नव्हतं. मी कष्टानं कमावलेल्या धंद्याची दुर्दशा माझ्या समोर दिवस-रात्र नाचत होती. एक एक शाल पाहून मला ज्या ज्या कामगारांनी ती बनवली त्यांची आठवण येत होती. मी त्यांच केलेल शोषण आठवत होतं. शालींची गुणवत्ता खोटी ठरवून मी त्याना कमी दाम देत असे, हे आठवलं... मला लक्षात येत होतं की माझ्या या परिस्तिथीला मीच कुठेना कुठे कारणीभूत होतो.
त्या दिवशी पगाराचा दिवस होता. मी पगार घेऊन, संध्याकाळी नमाज साठी मशिदित गेलो. थोडा उशिर झाला होता म्हणुन मी जरा घाईतच होतो. पगाराचा दिवस म्हणुन मुलांसाठी काही बेकरीची बिस्किट विकत घेतली. रस्त्यावर फ़ार गर्दी होती. ईदीचे दिवस होते. लोकांची खरेदी चालू होती. मलाही दुकानात ठेवलेल्या सगळया सुंदर वस्तु आकर्षित करत होत्या. एव्ह्ड्यात मला एक हिसका जाणवला... एका क्षणात माझ्या लक्षात आलं की माझी बैग कुणितरी हिसकावली होती. मागे वळून पाहिलं आणि एक तरूण माझी बैग घेऊन पळत जाताना दिसलां. काहीही विचार न करता मी त्याचा पाठलाग सुरु केला. मी जोरानी ओरडत होतो, चोर चोर... माझ्याबरोबर आणखी काही लोक त्याचा पाठलाग करु लागले. काहिच वेळात एक ऐक्शन सीन तिथे तयार झाला... तो रस्ता क्रोस करून जात असतानाच, त्याच्या मागे लागलेली गर्दी पाहून रस्त्या पलिकडल्या लोकांनी त्याची गचांडी पकडून त्याला पकडल. मी ही पटकन तिथे पोहोचलो, त्याला ज्याने पकडलं त्यानेच माझी बैग मला दिली आणि चेक करायला सांगितली. मी बैग पाहीली मुद्देमाल ठीक होता, लोकांनी त्याला ठोकायला तोपर्यंत सुरुवात केली होती. ईतक्यात पोलिस आले. पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी आम्हाला चौकित नेलं.
तिथल्या अधिकार्र्यानी माझं नाव विचारलं, "अल्लाबक्ष बबराकजाई" मुहाजिर हो? अफ़गाणिस्तानसे हो?... आणि मी पुन्हा एकदा घोडचूक केली.. नकळतच मी हो म्हणून बसलो. लगेचंच त्या अधिकार्र्यानी माझ्याकडे माझे मुहाजिर असल्याचे नोंदणिपत्रक मागितले. अर्थातच ते माझ्याकडे नव्हते. माझे नोंदणीपत्रक कुठेतरि गहाळ झाल्याची मी थाप मारली. त्याने माझा पुर्ण पत्ता आणि कामाचा पत्ता विचारला... काय सांगू आणि काय नको या माझ्या धांदलीमधे त्या अधिकार्र्याचा संशय बळावला. त्यानं त्या चोराला दुसर्र्यां अधिकार्र्याच्या हवाली करून मला त्याच्या केबिनमधे यायला सांगितलं.
प्रथम त्यानी पाण्याचा ग्लास पुढे केला.. "बोलो अल्लाबक्ष, असल बात क्या है! अभी मोका है, सच बोलोगे तो शायद बचोगे, और झुट बोलोगे तो अंजाम मुझे तुम्हे समझाने कि जरुरत नही!" मी पुरता हवालदिल झालो होतो.. मीच माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. घरी फार उशीर झाला होता. बेगम आणि मुले खुप चिंतेत असणार...! मनात विचार येत होते, "या अल्ला तेरे दरबार मैं रहेम है सुना था, लेकिन मै तो एक मुसिबत से निकल कर दुसरी मै फंस रहा हू! क्या तेरे दरबार मैं मेरे लिये कोई रहेम नही?" एका पलायना नंतर काही थोडे सुखाचे दिवस दिसु लागले होते... आता कुठे पळून जाउ..?..
"आल्लाबक्ष," त्या अधिकार्र्याचा आवाज आणखीच धारधार झाला.
"बस, आता ईथे हात टेकण्याखेरिज माझ्याकडे काही मार्ग नव्हता.. माझ्या डोळ्यात पाणी आणि तोंडावर माझी सारी सच्ची कहाणि होती... मी बोलत होतो आणि तो अधिकारी ऐकत होता..."
क्रमश:



तुमची लेखनशैली छानच आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
मात्र हे सगळ कुणाच्यातरी आयुष्यात खरच घडल आहे हा विचार फार अस्वस्थ करतो.
माणसाच्या वाट्याला काय येउ शकतं हे ही मध्य-आशियातील अथवा आफ्रिकेतील माणसेच जाणोत..
हे भौतिक जिवन म्हणजे दु:खालयम अश्वाश्वतमच आहे. मध्य-आशिया, आफ्रिका, भारत काय किंवा अमेरिका काय सगळिकळे सारखेच. तुमच्या लेखनशैलीचा प्रश्नच नाहि अगदिच अप्रतिम आहे.
ह्या जगातिल सत्य परिस्थिती बद्दल बरेच कळत आहे तुमच्या कथेमुळे, धन्यवाद.
सही... सरतेशेवटी एका फिल्मची कथा तयार होइल.
सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....
बाप रे... थरारक कहाणी आहे ही...
पुढचा भाग पटकन् लिहा...
खरंच भयानक. पुढचे भाग पटापट येऊ द्या. म्हणजे वाचनात लिंक राहील.
बाप रे, किती भयानक संकटं! लवकर लिहा पुढे आशिष.
हा भाग पण मनाला भिडला.
अल्लबक्शला ज्या संकट मालिकेला तोंड द्यावे लागले ते थक्क करनारे आहे.
खरच देव कधी-कधी फार कठोर परिक्षा घेतो. पु.ले.शु.
बाप रे! पुढे??
~~~
श्रावनमाशी हर्श माणशी !
फारच अप्रतिम ओघवते आहे लेखन. राहुन राहुन Not Without my daughter ची आठवण होत आहे.
हे भगवान! रेहेम करे!!! विलक्षण मालिका आहे ही.. पुढचा भाग, नव्हे पुढची सगळीच कथा वाचायची उत्सुकता आहे..
पुढे काय झालं??
--------------
नंदिनी
--------------
काय भयानक अनुभव आहेत हे.. आशिष,पुढचा भाग लवकर टाका...
बापरे! पुढे ...?
सगळेच भाग खिळवुन टाकणारे आहेत
--------------------------------------------
गेला क्षण हा काल असे, उद्या न वेड्या येत असे
नव्या उषेचे गाणे गात, आज आजची करुया बात
पुढे काय झालं मग... ? लवकर लिहा.. काळजी वाटतेय आम्हाला सर्वांनाच. त्याची बायका मुलं ठीकेत ना?
इराक , अफगाणिस्तान , मधुन बरेच लोक स्थलातंरीत झाले , जे गेले ते वाचले पण जे राहीले त्याचे खुपच हाल झाले , माझा एक इराकी मित्र त्याचे व त्याच्या आजुबाजुंच्याचे किस्से सांगायचा. आठ्वण झाली त्याची.
अप्रतिम, पुढचा भाग पटकन लिहा !!!
बाप रे ! थरारक........पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत !
________________________________________
प्रकाश
आशिष; खूप प्रभावी जमलंय. असाच लिहिता रहा
बापरे !!! थरारक,तुमची लेखन शैली फारच छान आहे
आशिष दामले,
पलायन भाग -४ ची आम्हि सारे वाट पाहत आहे. क्रुपया लवकर प्रकाशित करावा, हि विनंती...
धन्यवाद !!!
कित्ती कित्ती शोधलं तेव्हा हा दुवा सापडला...
पटापट पोस्टा म्हणजे दुवे हरवणार नाहीत्...विस्मरणात जाणार नाहीत आणि फार शोधावे लागणार नाहीत...
admin धन्यवाद, शोध मदत पेटी ठेवल्याबद्दल!!!
थरारक आणि मन सुन्न करणारे