पलायन भाग १ आणि २

जवळ जवळ १ वर्षांपूर्वी मी माझे अफ़गाणिस्तानातील अनुभव लिहायला सुरुवात केली. ’अफिम’ हा माझा पहिला लेख. ’अफ़िम’ला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि प्रोत्साहन मिळाले. ’पलायन’ हा माझा दुसरा लेख. पलायन ही खरंतर एक सत्यकथा. अल्लाबक्षची ही कथा मी लिहायला घेतली आणि प्रथम भाग लिहिल्यानंतर कामाच्या भाउगर्दित पुढचा भाग पुर्ण करण्यासाठी वेळच मिळाला नाही. तशी हस्तलिखिते माझ्यापाशी होतीच, पण त्यांचे संगणकिकरण करण्यासाठीही खुप वेळ लागला...
ईथे मी वाचकांच्या सोयीसाठी दोन्ही भाग प्रकाशित करत आहे...
धन्यवाद!

पलायन… भाग १
२७ डिसेंबर २००७, ’हेरात’, अफगाणिस्तान!
३० वर्षांच्या कालावधीत अनेक लोकांची आयुष्यं उध्वस्त झाली होती. अनेकांनी बाहेरच्या देशात पलायन केलं होतं. शाररिक जखमा भरल्या तरी मनावरचे घाव अजुनही ताजे होते. कितितरी लोकांचे आत्मे न्यायासाठी आक्रोशत होते. या लोकांची गाह्राणी ऐकणं, त्यांना नव्या अफगाणिस्तानची उम्मिद देणं, त्यांना न्याय मिळवून देणं, आवश्यक तिथे तर त्यांच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सरकारकडे शिफारस करणं असं कामही Human Rights Commission करतं आहे. त्यासाठी Transitional Justice नावाचा खास विभाग तयार केला आहे. या विभागान्तर्गत काम करणारे कर्मचारी विशेषतः फिल्ड मॊनिटर्स गावागावात जाऊन अशा व्यथित लोकांची माहिती गोळा करीत होते. फिल्ड मोनिटर्स बरोबरच Researchers, Statistitians, Supervisors, IT professionals अशा विविध तज़्नानी सुसज्ज असा हा विभाग होता. या विभागाचे कार्यक्षेत्रातील कामाचे मुल्यमापन करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि म्हणून मी गेले ७ दिवस हेरात मधे मुक्काम ठोकुन होतो.

’हेरात’ हे अफगाणिस्तानच्या पश्चिमेला असलेलं ऐतिहासिक शहर. काबुलपेक्षा हेरात अतिशय देखणं आहे. स्वच्छ रस्ते, टुमदार घरं, आखिव-रेखिव शहर! इथला सुलतान म्हणे स्वच्छतेचा प्रचंड भोक्ता; इतका की आपल्या बागेतील पायदंडीवर त्याने शुभ्र संगमरवर लावला होता. बागेतील धूळ या संगमरवरावर पडताक्षणिच जर पुसली गेली नाही तर त्या सफाई कर्मचार्याची भरपूर पिटाई होत असे… असो, ही दंतकथा म्हणा किंवा वस्तुस्थिती; तिचा परिणाम खरंच ’स्वच्छ’ होता. हेरात म्हणे हिरवेगार शहर, झाडांची दाटीवाटी मी रस्त्याच्या दूतर्फा पाहात होतो खरी, पण या जिवघेण्या हिवाळ्यात एकही हिरवंगार पान त्यांवर नव्हतं. सगळंच सफ़ेद बर्फाच्छादित! यावर्षी हिमपाताने हेरातमधे गेल्या पन्नास वर्षाचं रेकॊर्ड मोडित काढलं होतं. अजुन जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, सरायचे होते आणि आताच चार फुट बर्फ साचला होता.

होटेल सहीत सगळ्या शहराचे पाणी बर्फ झाले होते. नळ थिजलेले, विजेची टंचाई, गेल्या सात दिवसात जेमतेम दोन दिवस मी कशी बशी अंघोळ केली. पाणी गरम तरी कसं करावं? अंगणात पडलेल्या बर्फाचे तुकडे पातेल्यात भरुन ते गैसवर ठेऊन वितळवायचं आणि ऊकळी येईपर्यंत एक तास वाट पहायची. बरं एवढं गरम पाणी स्वयंपाकघरातून बाथरूमपर्यंतच्या प्रवासात पुन्हा कोमट, अंगावरचे कपड्यांचे थर काढून पाण्यात हात घालताक्षणिच ते गार असल्याची जाणीव…मी अंघोळ करणंच सोडून दिलं. त्या दिवशीचं तापमान होतं -३०…अगदी सियाचिनमधे असल्यासारखं वाटत होतं…नाही अंटार्टिकेत असल्यासारखं.. हेरातला काबुलसारखी पर्वतराशी नाही. एक बर्फाच्छादित मैदान आणि दूरवर काही पर्वतांच्या रांगा…
सकाळचे साडेआठ वाजले होते, गुरुवार होता. इथे हा आठवड्याचा शेवटचा कामाचा दिवस, आपल्या शनिवारसारखा. आज खरंतर मला सुटी होती, पण फिल्डवर्कर्ससाठी हा Half Day म्हणून मलाही थोडं काम करावं लागणार होतं. वर्तमानपत्र वाचण्याची सवय कधीच गेली होती. काबुलला एखादा इंग्रजी पेपर मिळतो पण हेरातला सगळंच फारसी. तरीही माझ्या रूममधे एक पेपर दरवाज्याखालून सरकावून देण्याची औपचारिकता विश्रामग्रुहाच्या पोरानं पूर्ण केली होती. मी जमिनीवर पडलेला पेपर उचलला…काही एक अक्षर कळतय का या उत्सुकतेनं पहिलं. तसं कधितरी उर्दु शिकण्याचा प्रयत्न केलेला… अलिफ, बे, पे, ते, से… काही दिसतय का ते शोधण्याचा अर्थहीन प्रयत्न तीन-चार मिनिटं केला आणि पेपर बाजुला ठेऊन दिला.

’जुबाई’ इथला विश्रामग्रुहाचा कर्मचारी नुकताच एक थर्मास देऊन गेला. मी चहा करून जरा बाल्कनीत आलो. माझी तिसर्र्या मजल्यावरची खोली समोरच्या बंगल्यांपेक्षा जरा उंचच वाटत होती. काही बायका त्यांच्या छतावर साचलेला बर्फ फावड्याने खाली रस्त्यावर ढकलत होत्या. एखाद-दुसरी गाडी भुर्रर्रर्रर्र…आवाज करत त्या सकाळच्या शांततेचा भंग करीत जात होती. आकाशात सुर्याचा पत्ताच नव्हता. तसा तो गेल्या तीन-चार दिवसांपासून बेपत्ताच होता. आज काय करावं?... मुल्यमापनाच्या रिपोर्टची रचना काय असावी? असा विचार मनात चालू होता. इतक्यात पुन्हा बर्फ पडायला सुरुवात झाली. या बर्फामुळे मी वैतागलो होतो. एअरपोर्ट बंद झाल्यामुळे अगदी अडकून पडलो होतो. मुल्यमापनाची आवश्यक ती सर्वं कामंही पूर्ण झाली होती. एखादी फिल्ड-व्हिजिट झाली असती तर छान झालं असतं; पण या बर्फामुळे बरेचसे रस्ते बंद झाले होते, त्यामुळे फिल्ड-व्हिजिट होइल असं वाटत नव्हतं. ’काय करावं?’ हा मोठा प्रश्न होता… सोफ्यावर बसून एक केस फाइल ऊगाचच चाळत बसलो. गेल्या तीन महिन्यातील फिल्डवर्कर्सनी घेतलेल्या मुलाखतींचा लेखा-जोखा त्या फाइलीत होता. एक-एक केस मी वर वर बघत होतो…
कुणाचं घर स्फोटात ऊध्वस्त झाल्याची कथा, तर कुणाचे आप्त हरवल्याची तक्रार, कुणाच्या अपंगत्वाची कहाणी, तर कुणाची आत्महत्त्या… सगळंच भयानक, रक्तरंजित! सर्व केसपेपर्सच्या शेवटी ज्या फिल्डवर्कर्सनी या मुलाखती घेतल्या होत्या त्यांची थोडक्यात ओळख दिली होती. मी जरा चकितच झालो. हा कागद मी वाचलाच नव्हता. कामाच्या गडबडित खरंतर दुर्लक्षच केलं होतं. वेळ होता म्हणून वाचायला सुरुवात केली आणि पहिल्याच फिल्ड मोनिटरपाशी अडकलो… खिळून गेलो… त्याच्या भल्यामोठ्या दाढीधारी फोटोशेजारी एवढंच लिहिलं होतं…
नाव: अल्लाबक्ष बबराकजाई
वय: ४०
अनुभव: तालिबान काळात चोरुन टि.व्ही. पाहिल्याची शिक्षा झालेली, पण शिक्षा भगण्या आधिच फरार होऊन इराणमधे गेला. अनेक दिवस शरणार्थींच्या शिबिरात राहिला आणि रेड-क्रौसकडून नर्सिंगचा कोर्स केला. हेरातच्या आणि आसपासच्या अनेक शरणार्थींची ओळख आहे आणि थोडंफार इंग्रजी बोलू शकतो.
व्यावसायिक अंगानी पाहिलं तर या ओळखीमधे फारसं तथ्य नव्हतं, पण माझं मन खिळलं होतं ते पहिल्याच ओळीवर. ’टि.व्ही. चोरुन पाहिल्याची शिक्षा’? ठरलं! आज अल्लाबक्षला भेटायचं! आज त्याची पूर्ण ओळख करुन घ्यायची. ’टि. व्ही. चोरुन बघायची शिक्षा’! हा काय प्रकार आहे; हे माहित करुन घ्यायचं होतं. मी लगेच कॊलबेल दाबली आणि जुबाइला माझ्या ड्रायव्हरला बोलवायला सांगितलं. मी बुट घालुन तयार होईपर्यंत उस्मान (माझा ड्रायव्हर) आला. त्याला माझा कार्यक्रम सांगितला. उस्मान म्हणाला, ’साब…बहुत खतरा…मैं वायरलेस बोलता… आज जाना नही’… त्याच्या मोडक्या-तोडक्या उर्दुतुन मला एवढच कळलं की आज गाडी घेऊन कुठेही जाणं शक्य नव्हतं. मी पुन्हा बुट काढुन, केस फाईल हातात घेऊन विचार करु लागलो. तेवढ्यात माझा मोबाइल खणखणला… “हैलोssss!... बल्लै..साब अल्लाबक्ष… अपने फर्माया मुझे?”
“हां अल्लाबक्ष हमे आपसे मुख्तलिफ होना है!”
“क्यूं साब? कोई गुस्ताखी हुई क्या?”
“नही.. नही बेख्वौफ हो! मुझे कुछ जानना है! क्या तुम मेरे ठिकाने आ सकते हो?”
“जी साब हम एक घंटे में हाजिर होंगे!”
“जी खुब!”
मी फोन ठेवला. याचा अर्थ उस्मानने वायरलेसवरुन अल्लाबक्षसाठी संदेश पाठवला होता. मिटिंग ठरल्यामुळे मीही तयारीला लागलो. माझा डिजिटल रेकोर्डर काढला, बैटरी चेक केली, आधिचं रेकोर्डिंग कम्प्युटरवर अपलोड केलं, काय विचारायचं यावर काही नोंदी करत असतानाच दरवाज्यावर ठकठक झाली.
दरवाजा उघडला, समोर अल्लाबक्ष आणि आणखी कुणितरी समवयस्क होता…
“साब, ये नजिब, मेरा अज़िज! इसके साथ था तो लेके आया, अगर आप फर्माये तो इसे छोड आऊ”!
“नही नही उसकी जरुरत नही, दोनो आजाओ”!
अल्लाबक्ष म्हणजे सहा फुट उंचीचा, गोरापान, छातीपर्यंत रुळणारी भारदस्त दाढी असलेला, अफगाणी वेशातला, अफगाण टोपी घालणारा एक तगडा माणुस होता. आत यायला सांगुन मी टी बैग्जचा ट्रे आणि थर्मास पुढे केला. बसल्याबरोबर लगेचच अल्लाबक्षने तिघांसाठीही चहा केला.
“नही में वो केस फाईल देख रहा था, जिसमे आखिर में तुम्हारी पहेचान लिखी है! उसमे लिखा है की चोरी छुपे टि. व्ही. देखने की सजा होने के बाद तुम फरार हुए, ये माज़रा कुछ समज़ नही आया, बस यही जानना था.”… मी सरळ मुद्द्यालाच हात घातला.
तालिबान काळात टि.व्ही., रेडिओ, नाच, संगित यावर बंदी होती, हे मी वाचलं होतं, पण तेव्हाही लोक चोरुन टि.व्ही. बघत हे पहिल्यांदाच ऐकत होतो.
अल्लाबक्षने सुरुवात केली. सुरुवातीला एक casual वाटणारी आमची चर्चा एका अशा वळणावर आली की मी हा अनुभव लिहू की नको अशा संभ्रमात पडलो. लिहिणे म्हणजे पुन्हा एकदा त्याची कथा अनुभवणे… त्याची कथा ऐकण्यापेक्षा लिहिणे अवघड होते. मी जे ऐकलं, मी जे पाहिलं ते अंगावर शहारे आणणारं होतं…
अल्लाबक्षची ही कहाणी होती १९९५ची… भारतात जेव्हा एक नविन अर्थव्यवस्था उदयास येत होती, शहरांचा-गावांचा कायापालट होत होता… आपल्यापैकी कितितरीजण आपल्या मर्जीचं जीवन जगत होतो, काम करत होतो, सिनेमा बघत होतो, आपल्या मुलांना बागेत खेळायला घेउन जात होतो, भांडत होतो, झगडत होतो, पुन्हा त्याच भांडणाच्या चर्चा टि.व्ही.वर पाहात होतो, क्रिकेट खेळत होतो, शाळेत जात होतो, मस्ती करत होतो, आपल्याकडे जेव्हा एक वैभवशाली पहाट होत होती, तेव्हा इथे अफगाणिस्तानमधे एक आवसरात्र काहूर उठवत होती… हजारो-लाखो लोक या भयानक अंधारापासून सुटका करून घेण्यासाठी जिवाचं रान करत होते… ते पलायन करत होते…
“साब वैसे हम लोग हेरातके नज़दिक एक छोटे कसबे के…” अल्लाबक्षनं सुरुवात केली. त्याची कथा त्याच्याच भाषेत लिहायला गेलो तर फारसी मिश्रित उर्दुमधे लिहावं लागेल. तो जे काही बोलला ते इतकं जिवंत होतं की एखादा चित्रपट आपल्या डोळ्यांसमोरुन सरकत जावा. तेच जिवंतपण कायम ठेवण्यासाठी त्याचे शब्द इथे अनुवादित करत आहे.
आमच्या वडिलांचा शाल बनवण्याचा व्यवसाय होता. घरची शेती होती, माझे चाचा शेतीकडे लक्ष देत असत. घर मोठं होतं. माझे पाच चाचा, त्यांची मुलं, बायका मुलं असं मिळुन ५६ जणांचं आमचं कुणबं होतं. खाणारे अनेक तसे कमावणारेही अनेक होते. शिक्षणासाठी म्हणुन आम्ही भावंड इथे हेरातला आलो. घरातल्याच एका नात्यातल्या मुलिशी माझं लग्न झालं होतं. तेव्हा मुलिंच्या शिक्षणाला तशी कायद्याने बंदी नव्हती पण कुणी त्यांच्या शिक्षणाला महत्वही देत नव्हतं. हेरातला पुढच्या शिक्षणासाठी मी आलो खरा पण शिक्षणात मला रस नव्हता. घरची सुबत्ता होतिच आणि धंदाही होता तेव्हा शिकुन तरी काय करायचं असं वाटायचं. मी हेरातलाच हळू हळू माझा धंदा सुरु केला. हेराती शाल जगप्रसिध्द! या शालींची निर्यात करण्याचा माझा मानस होता. त्याचबरोबर पैसे व्याजावर उधारीने देण्याचाही व्यवसाय सुरु केला. हळू हळू दोन्ही धंद्यात माझा चांगलाच जम बसला. सगळे व्यापारी आणि छोटे-मोठे उद्योगकर्ते मला ओळखू लागले. तेव्हा माझी शरिरयष्टी बघुनच लोक घाबरायचे. पैसे परत न करणार्र्या लोकांवर माझा प्रचंड धाक होता. माझ्याचबरोबर इतर सावकारांच्या वसुलीचे कामही मी कमिशनवर करत असे. कितितरी अशा गरीब लोकांनी माझ्या हातचा बेदम मार खाल्ला आहे. कितितरी लोकांच्या घरातील किमती वस्तु मी वसुलीसाठी जबरदस्तीने जप्त केल्या होत्या. मी एक यशस्वी व्यावसायिक होतो… फक्त नफा कमावणारा एक ताकदवान व्यावसायिक…!
माझ्या छोट्या भावाला आणि बायकोला घेऊन मी हेरातमधेच स्थायीक झालो. एक मोठं घर घेतलं, गाडी घेतली. मी माझ्या पैशावर, श्रीमंतीवर, ताकदीवर खुप खुश होतो. पण इस्लाममधे व्याज घेणं हराम आहे, निष्पाप लोकांना मारणं हराम आहे, आपल्या श्रीमंतीचा स्वतःसाठी उपभोग करणं हराम आहे… या गोष्टींचा मला विसर पडला होता. कधी कधी माझी बायको मला हे सांगायची. जकात (इस्लाममधे असलेला एक कर. प्रत्येक श्रीमंत मुसलमान व्यक्तीला त्याच्या आमदनीतील पाचवा भाग गरीबांसाठी वापरणे बंधनकारक आहे. या हिश्श्याला जकात म्हणतात.) द्यायला भाग पाडायची. म्हणूनच थंडीमधे आम्ही विस्तवांचं इंधन आणि काही रग गरिबांमधे वाटायचो. आज वाटतं की आल्लाची माझ्या बायकोवर असलेल्या मेहरनजर मुळेच मी जिवंत आहे. आम्हाला दोन मुलं झाली… झाकीया आणि फज़ल!
झाकीया तेव्हा ७-८ वर्षांची असेल आणि फजल ६ बर्षांचा. आपल्या धंद्याशी बांधिलकी असणारे आम्ही सत्ता, सरकार, मुजाहिदिन, रशियन या सियासतकारांच्या भानगडित कधी पडायचो नाही. आपलं एकच तत्व होतं, ’स्वतः जगा आणि दुसर्र्यांना जगु द्या’. मोठ्या लोकांच्या भानगडी काबुलपर्यंत किंवा मोठ्या शहरांच्या जहागिरदारांपर्यंतच मर्यादित असायच्या. पण ९५ साली तालिबानची सत्ता आली आणि सगळंच बदललं. प्रथम मोठ्या शहरांत आणि नंतर गावागावात त्यांची सियासत पोहोचली…खरं सांगायचं तर ते प्रत्येकाच्या घरात घुसले होते… रस्त्यांवर, बाजारांमधे, मशिदींमधे प्रत्येकानी काय करावं आणि काय करु नये याच्या घोषणा केल्या जात होत्या. पोस्टर्स लागली जात होती.
झाकियाची शाळा बंद झाली. तालिबानने मुलिंच्या शिक्षणावर, काम करण्यावर बंदी घातली. तो एक मोठा गुन्हा होता. केवळ झाकीयाची शाळाच नाही तर घरातल्या कुठल्याही स्त्रीला घरातल्या पुरुषाच्या परवानगी शिवाय आणि त्याच्या सोबतीशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी होती. बरं एवढं करुन बाहेर पडावं तर संपूर्ण हिजाब (बुरखा) बंधनकारक होता. स्त्रीचा चेहरा जर दिसला तर तीला दंड होताच पण तिच्या नवर्र्यालाही १०० चाबकाच्या फटक्यांची शिक्षा होती. स्त्रीयांना दागिने आणि सौंदर्यप्रसाधांच्या वापरावरही बंदी होती. सुरुवातीला मलाही यात वावंगं वाटायचं नाही. मी ही विचार करायचो की स्त्रीचं काम चुल आणि मुलं इतपतच असलेलं बरं..पुरुषांच्या लालसेमागेही स्त्रीचाच दोष असतो. पण तालीबानची बंधंनं ही केवळ स्त्रीयांपुरती मर्यादित नव्हती. पुरुषांसाठीही दाढी ठेवणं बंधनकारक होतं. बिनदाढीच्या पुरुषाला भर रस्त्यात बदडुन त्याच्या तोंडाला काळं फासलं जाई. एवढंच नाही तर पोशाखावरही बंधंनं होती. जिन्स, पैंट, शर्ट हे सगळं बंद होतं, केवळ हा पठाणी पोशाखच वापरणं सक्तिचं होतं. रोज पाचवेळा नमाज बंधंनकारक होता. जिथे तुम्ही असाल तिथे नमाजच्या वेळेत तुम्ही नमाज अदा करताना दिसला नाहीत तर तुमची गय केली जात नसे. केवळ कामाच्याच ठिकाणी नाही तर हायवे वर गाड्या थांबवून लोकांकडुन नमाज पढवून घेतला जात असे. टि.व्ही. रेडिओ, नाच, संगित सगळं बंद केलं गेलं. सगळी कडे फक्त एकच सांगितिक सूर आसमंत भरून राहिला होता. “अल्ला हो अकबर! अल्ला हो अकबर”
तेव्हा तालिब पोलिस प्रत्येकाच्या घरात घुसुन टि.व्ही., रेडिओ, म्युझिक सिस्टिम आदी घेऊन जात आणि शहराच्या मधोमध असलेल्या चौकामधे सर्वांसमोर त्याची विल्हेवाट लावत. आमच्या घरीही तालिब आले. त्यांनी चौकशी केली. दरवाजातून आत येण्या अगोदर त्यांनी मला, घरातल्या बायकांना पर्दा करण्यास सांगितलं. मी माझ्या बायकोला मुलांना घेऊन आतल्या खोलित जायला सांगितलं. दिवाणखान्यात आल्यावर त्यांनी काहीही न बोलता माझा टि.व्ही.संच, रेडिओ सेट, आणि म्युझिक सिस्टिम उचलली आणि बाहेर नेऊन त्यांच्या ट्रकमधे अक्षरशः फेकुन दिली. खळकन माझा टि.व्ही. फुटला. ट्रकमधे अजुनही ८-१० संचं होते असेच सगळे फुटलेले. तेव्हा मला खुप राग आला. पण मी राग दाखवू शकत नव्हतो. त्यांच्या हातात भरभक्कम बंदुका होत्या. मी नुकतिच दाढी राखायला सुरुवात केलेली. दाढी विरळच होती. त्यांच्यातल्या एकानी माझा गाल स्वतःकडे खेचुन क्षणभर न्याहाळलं आणि मला दटावलं… या पुढं दाढी कापून चालणार नाही. कुठलही काम इस्लामच्या खिलाफ केलं तर शिक्षा भोगावी लागेल, लक्षात ठेव. अजुन टि.व्ही. रेडिओ तर नाही ना घरात? मी माझ्या पूर्ण आयुष्यात तेव्हा पहिल्यांदा घाबरलो होतो. मी म्हटलं नाही; एवढंच आहे. ते निघुन गेले.
ते गेल्याबरोबर मी घराच्या छतावर धावलो. माझ्याकडे एक छोटी डिश ऐंटिना होती. मी इराणवरुन आणली होती. मी पट्कन ती ऐंटिना ऊचकटली आणि घरात नेऊन ठेवली… माझ्या बायकोच्या खोलित डोकावलं. माझी बायको दोन्ही मुलांना कुशीत घेऊन ओक्साबोक्शी रडत होती.
तालिबान येण्याअगोदर इथे हेरातमधे इस्माईल खानची सत्ता होती. ९२ साली रशियनांना धुळ चारून त्यानं हेरात काबिज केलं होतं. तेव्हा आम्ही तरूण मुलं त्याच्या शौर्याच्या कथांनी हरखुन गेलो होतो. इस्माईल खान हा कडवा मुजाहिद नेता होता. हेरात काबिज केल्यानंतर त्यान शुराची स्थापना केली. (शुरा म्हणजे आपलं मंत्रीमंडळ असतं तसं) पण परकियांपासून मुक्त होण्याचा आनंद फार काळ टिकला नाही. इस्माईल खाननं थोड्याच काळात शोषण सुरु केलं. प्रचंड कर लादला गेला. आमच्या सारख्या नव-व्यावसायिकांचा रोष त्याच्यावर होताच, पण त्याची सेनाही त्याच्यावर नाराज होती. तालिबाननी याच गोष्टीचा फायदा उठवला. ९५ साली त्यांनी दोन आक्रमणं केली. जरी पहिल्या आक्रमणात तालिबान अपयशी ठरले तरी दुसर्र्या आक्रमणात त्यांनी इस्माईल खानला इराणमधे पलायन करायला भाग पाडलं. इस्माईल खानच्या कमकुवत सेनेचा आणि त्याने ओढावलेल्या रोषाचा फायदा तालिबानला मिळाला.
आज माझ्या बायकोला रडताना पाहून वाटलं, कसा का असेना, कितिही भ्रष्टाचारी का असेना, तो इस्माईल खान परवडला. किमान त्याचं शोषण आम्हा व्यापार्र्यांपर्यंत आणि सत्ताधार्र्यांपर्यंत मर्यादित होतं. पण आज घरच्या आगितून जीव वाचवून जंगलातल्या वणव्यात आम्ही अडकलो होतो….
(क्रमशः…)

पलायन… भाग २
८ दिवस झाले, घरात टि.व्ही. बंद होता. कुठलही संगित नाही, कुठलाही आवाज नाही. माझी मुलगी तर अगदी कोमेजुन गेली होती. तिची शाळाही बंद झाली, घराबाहेर जाणं नाही… सगळंच कसं अवेळी भरून आलेल्या आभाळासारखं. प्रत्येकाच्या डोक्यात हाच विचार होता की हे सावट कधी एकदा दूर होईल…
तो शुक्रवारचा दिवस होता. मी सकाळची नमाज अदा करून नुकताच घरी आलो होतो, आणि चहा पित होतो. इतक्यात दारावर ठकठक झाली. पटकन माझी बायको मुलांना घेऊन आतल्या खोलीत गेली. मी दरवाजा उघडला. बाहेर पाच-सहा तालिब पोलिस उभे होते. माझं मन कातरलं…
“सलामवालेकुम”
“वालेकुम अस्सल्लाम”
“आज शहेर के मैदान में ’जबा’ है. तुम्हे आना पडेगा, दोपहर तीन बजे. याद रखना ये अल्लाकी इबादत है. ना आनेका अंजाम तुम जानते ही हो.”
ठक ठक ठक बुटांचा आवाज करत ते निघुन गेले.
थोड्याच वेळात जवळच्या मशिदितुन दुपारच्या कार्यक्रमाचा ऐलान केला जात होता. ’जबा’ म्हणजे म्रुत्युदंड! एक भयानक म्रुत्युदंड! अपराध्याचा सर्वांसमक्ष गळा कापण्याची एक भयानक शिक्षा! रोज मटन खाणारे आम्ही, बकरयाची मान आमच्यासमोर हलाल झालेली आम्हाला बघवत नाही आणि इथे तर एका जीवंत माणसाची अशा प्रकारे केलेली हत्या? पण तालिबान काळात शासन, न्याय, तालिम आणि शिक्षा सगळं काही कुराण-ए-पाक, हदिस आणि शरियाप्रमाणेच होतं. अशी अघोरी शिक्षाही त्याचाच भाग. गेलो नाही तर पुन्हा एक अपराध.
सारा दिवस काय करावं काही सुचत नव्हतं. हे सगळं सोडून कुठेतरी लांब पळून जावसं वाटत होतं. पण कुठे जाणार? काय करणार? माझं तर शिक्षणही इतकं नाही की इराण किंवा पाकिस्तानमधे जाऊन काही चांगल्या पगाराची नोकरी मिळावी. मी माझ्याच विचारात असताना, फज़ल बाहेर जाण्याचा हट्ट करू लागला. मी सुट्टीच्या दिवशी त्याला पार्कमधे खेळायला घेऊन जात असे, त्याला बिचार्र्याला काय माहित हे सियासती खेळ? माझं रक्त खवळलं आणि रागाच्या भरात मी चपराक लावून दिली, काकुळतीला येऊन माझा मुलगा त्या दिवशी खुप रडला. राग खरंतर त्याच्यावर नव्हता पण त्याची काहीही चूक नसताना माझ्या रागाला तो बळी पडला. मी आतल्या खोलीत गेलो आणि डोक्यावर हात ठेवून सुन्न बसुन राहीलो…
एक अपराधीपणाच्या भावनेनं नकळत डोळ्यातून पाणि आलं. माझ्या बायकोनं मला धीर दिला. “अल्लाताला बडा महैरबान है. वो हिफाजत करेगा. आप अपना दिल छोटा मत करना. कुछ ना कुछ रास्ता जरूर निकलेगा. त्यादिवशी जेवणातही रुची लागत नव्हती.
३ वाजता मी शहरातल्या प्रसिध्द फुटबोल ग्राऊंडपाशी आलो. कमितकमी तीन-चार हजार लोक जमले होते. काही मित्र भेटले. थोडं बरं वाटलं…
आम्ही मैदानाच्या बाल्कनीत गेलो. मैदानात काही तालिब पोलिस दिसले. एक जागा जरा स्वच्छ केलेली आणि जवळच एक मोठा दगड असल्यासारखं दिसत होतं. आम्ही इतके दूर होतो की ठीकसं दिसत नव्हतं.
एवढ्यात स्पिकरवर घोषणा झाली. “बिस्मिल्ला रेहमान ए रहीम…” एका २६ वर्षाच्या मुलानी कुणाचातरी खुन केला होता. त्या मुलाला मैदानात आणलं गेलं. त्याचे हात मागे करून दोरीन बांधले होते. ६-७ तालिब पोलिस त्याच्या आजुबाजुला होते. तीन साक्षिदारांना आणि म्रुतकाच्या कुटुंबातील व्यक्तिंना बोलावलं गेलं. साक्षिदारांनी सर्वांसमक्ष मुल्लाला साक्ष दिली. आता अपराध्याला माफ करायचं की नाही याचा अधिकार केवळ म्रुतकाच्या कुटुंबियानाच होता. म्रुतकाच्या चाचाला विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, “याला म्रुत्युदंड दिल्यानंतरच माझ्या भतिज्याला जन्नत नसिब होईल.” झालं म्रुत्युदंड पक्का झाला. म्रुत्युदंड हा म्रुतकाच्या कुटुंबियांपैकिच कुणितरी द्यायचा असतो. म्रुतकाच्या चाचानीच पुढाकार घेतला. अपराध्याचे हात जरा सोडण्यात आले. त्या स्वच्छ केलेल्या जागेत लाल रंगाचे कारपेट घातले. अपराध्यानी आपली शेवटची नमाज अदा केली.
मी विचार करत होतो, कि काय चालू असेल त्याच्या मनात त्यावेळी? दहा मिनिटात त्याने नमाज अदा केल्यानंतर पुन्हा त्याचे हात बांधले गेले. त्याच्या मागच्या बाजुनी ढुशी देऊन त्याला जमिनीवर आडवं केलं. म्रुतकाच्या चाचाच्या हातात एक धारधार तळपता सुरा दिला. “अल्ला हो अकबर, अल्ला हो अकबर” चा जयघोष सुरु झाला.
मागच्या बाजुनी तो म्रुतकाचा काका, अपराध्याच्या शरिरावर बसला, त्याने अपराध्याचे केस धरुन मान स्वत:कडे ओढली आणि सरसर करित तो सुरा त्याच्या मानेवर फिरवला. घरघर आवाज, रक्ताच्या चिळकांड्या आणि क्षणार्धात सगळं शांत. अर्ध्या मिनिटाच्या आत अपराध्याचे डोकं धडावेगळं झालं होतं. मला चक्कर आली आणि मी मट्कन खाली बसलो. एकेकाळचा कर्दनकाळ असलेला मी पुरता खचून गेलो. सगळीकडे नुसता एकच जागर होता. “अल्ला हो अकबर, अल्ला हो अकबर.” स्पिकरवर पुन्हा एक घोषणा दणदणली… “जो कोणी अशा प्रकारचा गुन्हा करेल, त्याचा हाच परिणाम होईल.”
घरी येतानाच मी निश्चय केला. आता कुटुंबाला इथे ठेवण्यात काही अर्थ नव्हता. काही दिवसतरी गावाकडे पाठवायचं ठरवलं. दुसर्र्याच दिवशी जुजबीचं सामान गाडीत पैक करुन मी आमच्या कुटुंबाची रवानगी गावाकडे केली. गावातही अवस्था फारशी वेगळी नव्हती, पण घरात एव्हढ्या सगळ्या लोकांबरोबर राहताना दिवस छान निघून जाई. घराबाहेर एक वेगळं जग होतं. परंपरेनुसार माझ्या बायकोला २४ तास पडद्यात रहावं लागे, पण तरीही मनातली भीति कुठे ना कुठे कमी झाली होती. ७-८ दिवस गावी राहून मी हेरातला परतलो.
कुठलाहि बदल हळू हळू अंगवळणी पडतो. तसंच माझंही झालं. हळू हळू मी पुन्हा धंद्याकडे वळलो. ५ वेळचा नमाज आणि धंदा एव्हढंच माझं आयुष्य होतं. मित्रांकडे जाणं, कधी-काही पार्टी करणं हे सगळं जवळपास बंदच होतं. एकदा सहजच माझ्या मित्राशी बोलताना विषय निघाला… तो ईराणमधल्या काही बातम्या देत होता, नविन हिंदी सिनेमाबद्द्ल सांगत होता. मला जरा आश्चर्य वाटलं! घरात टि. व्ही. नाही, वर्तमानपत्रात तर या बातम्या येत नाहीत मग याला ही माहीती मिळते कुठुन? मी जरा खोलात जाऊन विचारल्यावर तो म्हणाला, कुणाला सांगु नकोस पण मी चोरुन टि.व्ही. बघतो.
“काय म्हणतोस?” मला जरा धक्काच बसला. त्यानं त्या दिवशी रात्री मला निमंत्रण दिलं. मी त्याच्या घरी गेलो. रात्री जेवण झाल्यानंतर त्याच्या आतल्या खोलीत त्यानं यायला सांगितलं. ही खोली तळघरात होती. खोलीला तशी खिडकी नव्हती पण हवा खेळती रहावी म्हणून दोन व्हेंटिलेटर्स होते. सगळीकडे धान्यानी भरलेली पोती ठेवली होती. आम्ही खोलीत गेल्या बरोबर त्यानी व्हेंटिलेटर्सवरचे काळे पडदे ओढले. धान्यांच्या पोत्यांच्या मधोमध दोन तीन माणसाना बसण्यासाठी खुर्च्या होत्या. त्यानं मला बसायला सांगितलं आणि समोरच्या पोत्याआड लपवलेला टि.व्ही दाखवला. माझ्या कानाला एक हेडफोन लावला आणि त्याने टि.व्ही. चालू केला. खरोखरच आम्ही टि.व्ही. बघत होतो. ईराणि चैनेलवर एक निरस चर्चा चालू होती, पण तरीही बघायला मजा येत होती. मी विचारलं टि.व्ही.ची ऐंटिना कुठे आहे. त्याने मला पुन्हा त्यच्या बरोबर यायला सांगितलं. त्याच्या घराच्या मागच्या बाजुला छोटं अंगण होतं. तिथे एक खड्डा करुन त्यानं ऐंटिना लपवली होती. दिवसा त्यावर झाकण टाकून त्यावर एक दोन गमले ठेवत असे. कुणाला कसलाही संशय येण्याची श्यकताच नव्हती. इतकं सुंदर प्लैनिंग त्यानं केलं होतं.
पुढचे एक-दोन महिने असेच गेले. मी कधी कधी त्याच्याकडे जात असे. हळूहळू मलाही कळत गेलं की बर्र्याच जणांनी अशी छुपी व्यवस्था केली होती. काहीजणांनी तालिब पोलिसांना काही पैसे देऊन त्यांच्याशी संगनमत केल्याचंही मला कळलं होतं. मग मीही धाडस करायचं ठरवलं. घराच्या तळघरात प्रचंड अडगळ होती. नोकर-चाकरांना सुटी देऊन मीच ते तळघर साफ़ केलं. एक-दोन झरोके होते, ते काळे पडदे लावून, त्यावर लाकडाच्या फळ्या लावून बंद केले. एक-दोन खुर्च्या, आणि टि. व्ही. ठेवण्यासाठी एक टेबल आणून सगळी तयारी केली. आता फक्त कमी होती ती टि. व्ही. सेटची. कामानिमित्त ईराणला माझे जाणे-य़ेणे होत असे. तसा प्रत्येक वेळी मी विमानानेच जात असे, पण या वेळी मी माझ्या कारने जाण्याचा निश्चय केला. कामानिमित्त होणार्र्या प्रवासामुळे मला इराणच्या बोर्डरची चांगली माहिती होती. त्यावेळी ईस्लाम किला बोर्डर तशी खुली होती. बोर्डरवर चेकिंग होत असे, पण काही पैसे देउन कामही होत असे. मी माझा प्लान पक्का केला आणि इराणला गेलो. येताना चार भल्यामोठे खोके घेतले. त्यात शाली विणण्यासाठी लागणारी काही मशिन आणि इतर सामग्री ठेवली आणि सगळ्यात खालच्या खोक्यामधे मी एक छोटा टि.व्ही. पैक केला. अल्ला को याद किया और वापसी के सफर पर चल पडा. बोर्डर वर पोहोचे पर्यंत दुपारचे २ वाजले होते. २.३० वाजता शिफ्ट संपते हे मला महित होतं. त्या दिवशी दुपारच्या नमाजची वेळही २.३० वाजता होती. शिफ्ट संपताना बोर्डर अर्ध्यातासाठी बंद होते. म्हणजे सगळे मिळून प्रचंड ट्राफिक आणि गर्दी. मला याच स्तिथीचा फायदा करून घ्यायचा होता. मी गाडी दोन मोठ्या ट्रक च्या मधोमध लावली आणि नमाज साठी बोर्डर वरच्या पोलिसांमधे मिसळून गेलो. इतक्या दिवसांमधे माझी दाढीही छान वाढली होती. माझी वर्तवणूक मी अशी ठेवली होती कि मीही एक तलिबच आहे. नमाज नंतर मी काही अधिकार्र्यांशी उगाचच काही-बाही बोललो. तालिबान मुळे इस्लामचे खरे रुप कसे दुनिया समोर आले आहे याची मी व्यथा प्रशंसा केली. बर्र्याच वेळानंतर माझा नंबर आला मी शांत होतो. गाडीतून उतरलो. मागे कैरिअर स्पेसमधे मी खोकी ठेवली होति. त्या अधिकर्र्याने काही बोलण्या अगोदरच मी वरचे खोके खाली उतरवले आणि उघडले. काय सामान आहे त्याची कागदपत्रे तर माझ्या बरोबर होतिच. दुसरे खोके खाली उतरवण्या अगोदरच तो अधिकारी म्हणाला, जा जा, इंपोर्ट ड्युटी भर आणि सामान घेउन जा... मी तातडिने त्या ओफिसपाशी गेलो आणि पैसे भरले. परत आलो पावती दाखवली आणि गाडिचा ताबा घेतला. इस्लाम किला ते हेरात हे जवळ जवळ ५०० किलोमिटरचे अंतर मि एकही ब्रेक न घेता पार केले. घरी आलो आणि सगळ्यात पहिल्यांदी तो टि. व्ही. असलेला खोका खोलला. टि. व्ही तळघरात नेउन ठेवला. टि. व्ही बघण्याची इतकी उत्सुकता होति कि, मी जेवायचे ही विसरून गेलो. माझ्या कडे असलेली डिश एंटेना मी एका पाण्याच्या रिकाम्या टाकीत लपवली होती. मी लगेचच कनेक्शन जोडले आणि रिमोट्चे बटन दाबले. ईराणचा कुठलातरी चैनेल जरा ठीक दिसत होता... कुठल्यातरी विषयावर राजकीय चर्चा चालू होती. बराचवेळ उगाचच टि.व्ही. पाहील्यानंतर जेव्हा जीव कासावीस झाला तेव्हा उठलो आणि ब्रेडचे तुकडे चघळत बसलो. आता कुटुंबाला बोलवायला हरकत नव्हती...

-*-*-*-

दिवसां मागे दिवस जात होते. ते थंडीचे दिवस होते. दिवसाचा उजेड अगदी कमी. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अंधार व्हायचा. धंद्यामधेही फारसा उत्साह नव्हता. ईदही नुकतीच होऊन गेली होती. त्यामुळे बाजारात फारसे कुणी फिरकायचे नाही. मीही दुकान लवकर बंद करून घरी जायचो. संध्याकाळच्या नमाज नंतर कुटुंबासोबत टि.व्ही. बघण्याचा कार्यक्रम असे. तुलसीजी का ड्रामा घरात अगदि फ़ेमस होता.
त्या दिवशीही रात्री उशिरा पर्यंत आम्ही टि.व्ही. बघत होतो. तेव्हढ्यात दारावर ठकठक झाली. मला कळेना की एव्हढ्या रात्री माझ्याकडे कोण आले? मी पटकन टि.व्ही. बंद केला, त्यावर बाकी शालींची खोकी ठेवली आणि दरवाजा उघडण्यासाठी वरती गेलो... दरवाजा उघडला आणि ५-६ पोलिस मला काही न विचारता घरात घुसले. मी काही विचारण्याआधिच त्या अधिकार्र्यानी मला धमकावले...
"दरवाजा खोलने को इतना वक्त क्यू लगा? क्या कर रहा था?"
"वो.. वो.. में सो रहा था साहेब?"
"खाना ना खाके ही सब लोग सो गये?" त्याने डाईनिंग रूम मधिल टेबलावर परोसलेल्या खाण्याकडे कटाक्ष टाकून पुन्हा मला दटावले.
मी जरा चरकलो... "नही साहेब, बस खाना अभी खानेवाला ही था, वो जरा तबियत ठीक नही थी"... माझे हे संभाषण चालू असतानाच बाकी लोक घराची झडती घेउ लागले...
मी पुरता हादरून गेलो होतो.. यांना संशय तरी कसा आला हे कळत नव्हतं.
"साहब मेरे पास कुछ नही है, आपको किस बात कि नाराजगी है?"..मी जरा धैर्य दाखवून विचारलं... "जो चाहिये वो हमारे लोग ढूंढ रहे है, नही मिला तो तुम्हारी जिन्दगी सलामत है, और अगर मिला तो कसम खुदा कि, तुम मौत कि भिक मांगोगे..." माझी बेगम आणि मुलेही पुरति हादरून गेली होति, त्यांच्या चेहर्र्यावरचे ते भाव मी आजही विसरू शकत नाहि... काय करू आणि काय नाहि हा विचार करत असतानाच एक शिपाई उचकटलेली डिश ऐंटेना घेऊन आला... "साब इसके पास जरूर टि.व्ही. है.... ये देखिऐ क्या है"
आता शरणागती पत्करल्याशिवाय काही उपाय नव्हता. मी सरळ त्या अधिकार्र्याच्या पायाशी लोटांगण घेतलं. माफिचे गाह्राणे घातले... बाकी दोन शिपायांनी टि.व्ही. तळघरातून आणण्याची उरली-सुरली कारवाईही पूर्ण केली होती. दयेची खरंतर काही अपेक्षा नव्हतीच. अधिकार्र्याने काहिही न बोलता, माझ्या पोटात एक जोरदार लाथ घातली. ती वेदना मस्तकापर्यंत पोहोचली. मी कळवळलो, माझी बेगम आणि मुले व्याकूळली आणी आक्रोश करत खाली आली. पाठीवर एकामागोमाग एक गुद्दे पडत होते. वाटत होतं की कपाटातली माझी बंदुक घ्यावी आणि मारून टाकावं सगळ्यांना... पण मुलांकडे पाहिलं आणि लक्षात आलं की माझ्याकडे जिवंत राहण्यासाठी हे सगळे सहन करण्या व्यतिरिक्त काही उपाय नाहि.
माझ्या बेगमनी हात पसरले, दयेची भीक मागितलि... अवचित काय झाले कुणास ठाऊक, त्या अधिकार्र्याने शिपायांना टि.व्ही. घेऊन गाडित जायला सांगितले. ते लोक गेल्याबरोबर त्यानी मला उठवले आणि सौम्य शब्दात, हलक्या आवाजात सांगितले, "मै सिर्फ़ ये रात तुमको दे सकता हू, बस! अब बचने के लिये ये वक्त में तुम्हे जो करना है वो तुम करलो..." एव्हढे बोलून तो ताड ताड बुटांचा आवाज करत निघुन गेला.
मी अजुनही त्या वेदनेतून सारावलो नव्हतो... काय करावं काही सुचत नव्हतं... बेगम माझ्याजवळ आली..म्हणाली.. ये रात मे. मेरे बच्चोंकि जिंदगी बचाने के लिये आप क्या कर सकते है? "हम सिर्फ भाग सकते है!"...मी अगदी सहज आणि नकळतच म्हणालो... बेगम पटकन, रसोईखान्यात गेली आणि पाच मिनिटात परतली..तिच्या हातात काही सुकामेवा होता... कपडे बदलण्याईतकाही वेळ नव्हता. ती तशी अशिक्षित होती, पण तिनं काळाची गरज ओळखली होती. मी गाडी काढली, मागच्या डिकीत, जनरेटरसाठी आणलेला डिझेलचा एक गैलन घेतला, पोरांना गाडीत भरलं आणि सुसाट वेगानं गाडी झरांचच्या दिशेनं सोडली. मला हा देश सोडण्याखेरिज काही उपाय नव्हता. दुसर्र्यादिवशी पहाटेच्या नमाजच्या आधिच माझी धरपकड करण्या साठी पोलीस घरी येणार याची मला खात्री होती. मला फरार पाहून, त्यांचा पहीला अंदाज हा मी ईस्लाम किल्ल्याच्या बोर्डर वरून पळ काढण्याचा असणार याचीही मला खात्री होती... त्यांचा हाच अंदाच मला चुकीचा ठरवायचा होता. हेरात ते ईस्लाम किला हे अंतर २०० किलोमीटरचे होते, साधारणपणे ५ तासांचे ड्रायव्हिंग होते. मी घरातून निघेपर्यंत रात्रीचे ११.३० वाजले होते. सकाळची नमाज ४.३० वाजता होती. म्हणजे, सकाळी ३.३० ते ४.०० वाजताच्या दरम्यान माझ्या पलायनाची बातमी सगळ्या पोलिसठाण्यांना कळणार होती. मी जर ईस्लाम किलाच्या रस्त्याने गेलो असतो तर, बोर्डर चेक पोईंटवरच माझ्या अटकेची शक्यता होती, आणि मला कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. म्हणूनच मी झरांचचा रस्ता धरला.

हेरात ते झरांच हे ६०० किलोमिटरचे अंतर! निमरोझ प्रांतातले हे छोटेसे शहर. बोर्डरवरच्या वर्दळीमुळे आणि व्यापारामुळे खरंतर नावारुपाला आलेले एक मोठे गाव. अफगाणिस्तानच्या दक्षिणेला आणि तालिबानचा म्हणाल तर बालेकिल्लाच. म्हणुनच या भागातून मी पलायन करेन याची फारसी शक्यता हेरातचे तालिबानी पोलिस करतील असं मला वाटत नव्हतं. रस्ता तसां मोकळाच होता. अधे मधे पोलिस चेक पोईंट्स होते. पोलिसांनी गाडी थांबवलीच तर माझ्या गावी कुणितरी खुप आजारी असल्याची थाप मारून मी पुन्हा गाडी वेगाने हाणत होतो...!

सकाळचे ४.३० वाजले होते, खुप दुरून पहाटेची अजान ऐकू येत होती. मी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. जवळच एक बोअर वेल होती, कुणाची तरी द्राक्षाची बाग होती. मी हात पाय धुतले, आणि तिथेच बाजुला जाईनमाजी हंथरून नमाज अदा केली. बेगमनेही गाडीमधेच नमाज अदा केली. मुले झोपली होती, त्यांना मी उठवले नाही. थोडासा सुकामेवा तोंडात भरला आणि पुन्हा गाडी चालवायला घेतली. मनात विचारांचं काहूर उठलं होतं. धंद्याची चिन्ता होती, ईराणमधे जाऊन तरी काय करायचं हा मोठा प्रश्न होताच, माझ्या नातेवाईकांना तर काहि त्रास होणार नाही ना ही चिन्ताही सतावत होती, मुलांचे काय? त्यांना काय समजावे?. बराच वेळ आम्ही काहीच बोलत नव्हतो. बहुतेक हे सारे प्रश्न बेगमच्या मनातही वादळ उठवत असावेत...

थोड्या वेळानी मुलेही ऊठली. बेचारी भुकेजली होती, पण त्यावेळी, त्यांनी दाखवलेला समजुतदारपणा मी कधिही विसरू शकणार नाही. काहीही तक्रार न करता त्यांनी सुका मेवा खाल्ला आणी पाणि प्याले. झकियानी मला हलक्या आवाजात विचारलं, ’अब्बु हम कहा जायेंगे?’, "ईराण" बेटा..! फजल आणि झाकियाच्या गप्पांनी वातावरण थोडंसं निवळू लागलं. फजलनी विचारलं, "दोख्तरजान, ये इराण कहा है?," झकिया म्हणाली, ’बहुत दूर’,
"क्या वहापे, पोलिस नहि होते?"
"नही, वहाके पोलिस अच्छे होते है, मारते नहि"
"क्या वहा हम टि.व्ही. देख सकते है?"
"बिल्कुल, और वहा के टि. व्ही. भि अच्छे होते है"
"फिर तो हम बहुत मजा करेंगे"....

मुलांच्या या गप्पांनी माझा सगळा थकवा दूर झाला... सकाळचे १०.३० वाजले होते. मी झरांचच्या बोर्डरवर चेक पोईंट पासून २ किलोमिटरवर होतो. मनामधे सतत प्रार्थना करत होतो... आधि ठरवल्या प्रमाणे, बेगमनी तब्येत बिघडल्याचे जिवघेणे नाटक सुरु केले. मुलांना या नाटकाची काही कल्पना नव्हती आणि त्यांचे चेहरेही रडवेले झाले होते. चेकपोईंटवर आल्याबरोबर मी खाली उतरलो, आमचे पासपोर्ट दाखवले आणि बेगमच्या तब्येतीचे कार्ण दिले. तिथला अधिकारी खरंच चांगला होता, माझे नशिबही बलवत्तर निघाले, त्याने फारशी चौकशी न करता मला बोर्डर क्रोस करण्याची परवानागी दिली. मीही वेळ न घालवता बोर्डर क्रोस करून, इराणच्या पोलिस चेक पोईंट्वर आलो. तिथली औपचरिकता मला चांगलीच माहीती होती. तिथेही फारसा वेळ गेला नाही... तिथुन ईराणची एंट्री परमिट घेऊन मी गाडी सरळ एका छानश्या होटेल कडे वळवली. दुपारचे २ वाजुन गेले होते... खुप भुक लागली होती. माझ्या कुटंबाचा जिव वाचवल्याचे समाधान होते, इतके कि पुढ्च्या लढाईची इवलिशिही चिन्ता माझ्या गावी नव्हती. बेगमच्या डोळ्यातही मी तोच आत्मविश्वास बघत होतो... तालिबानी जिवघेण्या अत्याचारातून मी मुक्त झालो होतो...
होटेलमधे पोहोचल्यानंतर, सगळ्यात पहिल्यांदि मी प्रार्थनास्थळी गेलो... नमाज अदा केली.. अल्लाकी मेहरबानी थी! शुक्रिया अदा केला... त्या अधिकार्र्यानी ज्याने मला एका रात्रीची सवलियत दिली, त्याच्यासाठी आणी त्याच्या कुटंबासाठी प्रार्थना केली, रस्त्यामधे ज्या ज्या लोकांनी मदत केली, सहानुभुती दाखवली त्या सगळ्यांची मी आठवण काढली आणि सगळ्यांसाठी दुवा मागितली...
आता पुढच्या लढाई साठी मी तयार होतो... हातातली पुंजी फ़ार दिवस टिकणार नव्हती, काम-धंदा शोधायचा होता, कुटंबाच्या राहण्याची व्यवस्था करायची होती...पण मला आत्मविश्वास होता...

फ़जलला कडेवर घेऊन मी गोंजारलं, "बेटा अब सब ठीक होगा, सब ठीक होगा"... बेगमचे डोळेही पाणावले होते!........

Submit to kanokani.com

बापरे. काय अनुभव !
छान लिहीतोयस आशिष.

मस्त लिहिलंय! त्या छोट्या निरागस मुलांचं वाईट वाटतं!

आशिष, पलायनचा दुसरा भाग लिहिल्याबद्दल खुप धन्यवाद. हे तुम्ही लिहिता आहात ते कुणी विसरु नाही शकणार. अफिम आणि पलायनाचा पहिला भाग अजुनही अस्वस्थ करतो....

काय जबरदस्त आहे! अफलातून! आणखी काही अनुभव असतील तर जरूर लिही.

----------------------
'रिसेशन - एक काथ्याकूट'

मागच्या वर्षीपासून तुम्ही दुसरा भाग कधी लिहिणार ह्याची वाट बघत होतो. सुरेख लिहिले आहे.

खूप सुंदर लिहिले आहे, पहिला भाग वाचल्यावर वाट पाहत होतो कधी पुढचा भाग येईल. दडपशाही आणि झुंडशाही च्या जोरावर सामान्य माणूस अगदी पिचून गेला. पण अल्ला च्या दरबारात पण कधी न कधी उजेड पडतो. मुलांबद्दल वाचल्यावर वाटते कि त्यांची या सगळ्यामध्ये काय चूक?

फार फार सुरेख! ह्या ललिताचा शेवट त्यातल्यात्यात सुखाचा वाटला तरी प्रचंड अस्वस्थ करणारं!

शेवट सुखाचा होता म्हणुन नाहीतर... बाप रे! जगाच्या एका कोनात एव्हढ भयंकर काहीतरी घडतं हे वाचणं देखील अस्वस्थ करतं... मग त्याच्या कडून प्रत्यक्ष ऐकताना आशिश तुम्हाला काय वाटल असेल हे कल्पना केलेलच बरं!
तुमचं लिखाण, शैली अगदी पारदर्शक आहे. धन्यवाद!

जबरदस्त अनुभव आहे.. लिहिलंय पण सुरेख!

अंगावर काटा आला वाचताना.
सुंदर लिखाण. धन्यवाद.

खूप महिन्यांपासुन पलायनच्या दुसर्‍या भागाची वाट बघत होते. कल्पनेपलिकडच्या कठीण परिस्थीतीतुन मार्ग काढणारे लोक बघीतले, ते पण आत्ताच्या काही वर्षापुर्वीच्या काळात की प्रचंड अस्वस्थ व्हायला होते, आपण अगदी सुखात सुरक्षित आयुष्य जगत असतांना जगाच्या दुसर्‍या कोपर्‍यात लोकांना काय काय सहन करावे लागते हे कळले की अंगावर काटा येतो.
त्या कुटुंबाचे पुढे काय झाले ते पण लिहा.

बापरे, काय अमानुष आहे हे सगळं. शेवट वाचून खूप बरं वाटलं पण सगळेच इतके नशिबवान नसणार याची जाणिवपण झाली. तुमचं लिखाण अतिशय सहज, आणि ओघवतं आहे. लिहीत राहा.

बाप रे... भयंकर अनुभव. खूप छान लिहिले आहे, पुढे काय झाले ते पण लिहा.

शेवटी दुसरा भाग आला तर.
लिखानच एव्हढे सशक्त आहे की पहिला भाग परत वाचण्याची गरजच नाही पडली. पु.ले.शू.

सुरेख लिहिलय!

वाचताना अस्वस्थ व्हायला झालं. प्रत्ययकारी लिहिलंय.

काय अनुभव आहे !!
आशिष अजून लिहीत रहा.

वाचतानाही भिती वाटत होती.. त्या निरागस मुलांचं वाईट वाटतं. कित्येकांना जीव वाचवण्याची संधी सुध्दा मिळाली नसणार.. अरेरे वेळ मिळेल तसं अजून लिहा..

आशिश, पुढे काय, याची उत्सुकता लागून राहिलीय.

फारच छान. पुढे लिहा.
आपण फारच सुखी आहोत.

मन सुन्न झालं वाचून...
आपण आपल्या देशात किती छोट्या छोट्या गोष्टींविरुध्द तक्रारी करत असतो...
अजून असे अनुभव लिहा.

~~~
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

आपल्या उत्स्फुर्त प्रतिसादांबद्दल शतशः धन्यवाद!
अल्लाबक्षचे ईराण मधील संघर्षमय वास्तव्य हे त्याचे जीवनाकडे पाहण्याचा द्रुष्टिकोन बदलवणारे होते. तिथे त्याने पहिल्यांदी गरीबी पाहिली, शोषण अनुभवले. 'मुहाजिर' (शरणार्थी) म्हणून मिळणार्र्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीच्या विरुध्द त्याने आवाजही उठवला... हे सगळे अनुभव पुढच्या भागात संकलित केले आहेत... लवकरात लवकर पुढचा भाग प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो...

पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खुप खुप धन्यवाद!

आशिष दामले
कार्यक्रम प्रबंधक, दक्षिण आणि मध्य एशिया
सेव्ह द चिल्ड्रन, स्वीडन

वाचताना काटा आला अंगावर अरेरे ज्यांच्यावर हा प्रसंग गुदरला त्यांची तर काय अवस्था झाली असेल. अजून असे अनुभव लिहा.

बापरे! भयंकर! यापेक्षाही भयानक किती तरी अनुभव असणार याची कल्पना करु शकतो यावरुन.
आपण किती सुखी आहोत याची पुन्हा एकदा आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

वाचून काय प्रतिक्रीया द्यावी तेच कळत नाही. सुन्न झालेय.

आशीष
तुमचे खूप काही शीकविणारे अनुभव शेअर केल्या बद्दल तुमचे आभार ...
मी पलायन भाग १ वाचलेला नाही त्याची लींक मला मीळेल का प्लीज

सास
अगं पलायन १ वरच्या लेखातच आधी आहे आणि त्यानंतर त्याच्या खालीच पलायन २ लिहीलाय.

आशिष सुंदर जमलंय. अजून खूप लिही.

आषिश,
खुपच छान ..
पुढे काय? .. आणखी लिहा.

रुनी आभार ... मी पण ना स्मित