आनिपीनी - जत पूर्व भागातली दिवाळसण प्रथा

Submitted by ब्लू कोलंबसे on 1 April, 2024 - 04:57

मला नेहमीच जगण्याच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांचे आकर्षण राहिले आहे. कधी ते एखाद‌या प्रथेचे किंवा सणाचे तर कधी एखाद्या नृत्यप्रकाराचे! त्या प्रादेशिक, भौगोलिक भागांनी त्या विशिष्ट कृतीने खुमासदार रंगत आणलेली असते तिथल्या लोकांच्या जगण्याला!

असाच एकदा २०१५ च्या दिवाळीत मित्राकडे गेलो होतो. त्याचं गाव सांगली जिल्हयाच्या पार पूर्व-दक्षिण टोकाला ! विजापूरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर ! आसंगी म्हणून ! त्यात पुन्हा तो महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रांत! त्यामुळे भाषेबरोबरच रोटी बेटीचा व्यवहार नित्याचा!

मित्राच घर दोन गावांच्या मध्ये ! आसंगी(तुर्क) आणि मोटेवाडी या दोन गावांमधल्या एका मोठ्या तळ्याशेजारी १ एकर रानाजवळ बांधीव सिमेंटचं घर! ३ भावांची कच्ची बच्ची, गुरं, गोठा, कोंबडीचा खुराडा, शेळ्या, म्हशी आणि निसर्गातले इतर प्राणी, कीटक,पक्षी तिथे एकत्र वसलेले !

दिवाळीचे इतर दिवस नेहमीच्या पुराणातील प्रथेसारखे ! मात्र एके दिवशी रात्री आम्ही गप्पा मारत बसलेलो, तर दुरुन एक 'दिवा' पळत घराकडे येताना दिसला. एक छोटा मुलगा तो दिवा घेऊन येत होता. तो माझ्या मित्राचा चुलतभाऊ ! ७ वीत शिकणारा ! बरोबर बारकी(छोटी) बहीणही ! 'आनिपीनी साठी तेल द्या,' अस म्हणत दारातनंच काकींना गोडेतेल मागू लागला. मी आपला उत्सुकतेने 'काय करतोय हा!', म्हणून बघू लागलो.

त्याच्या हातात पानसर (पाणथळ) वनस्पतीच्या वेलांना वळवून तयार केलेला फणा (दुहेरी) आणि त्याच वेलींचा खोलगट कप्पा करुन त्यात पणती ठेवलेली! काकीनी तेल दिलं. त्या दिव्याची ज्योत मोठी झाली. तो लगबगीने गाईच्या गोळ्याजवळ गेला आणि काहीतरी मराठी - कन्नडमिश्रित मंत्र आपल्या 'इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे'च्या चालीवर म्हणू लागला. गाईला त्या वेल-पणतीने ओवाळू लागला.

मी लगेच Camera काढून ते shoot केले.(शुटींगची युट्युब लिंक इथे) शूट करतानाच त्याला या गोष्टीबदद्ल विचारले, तर ते गावचं पोर बुजलं, काही सांगना! मग माझ्या मित्राला मी तेव्हाच याबदद्ल विचारलं आणि या अनोख्या प्रथेबद्दल कळलं.

हा भाग येतो दक्षिण-पूर्व जत तालुक्यात! बहुतेक गावं कन्नड सफाईने बोलणारी, पण महाराष्ट्रात पूर्वापार वसलेली! यातूनच कृषी- संस्कृतीतल्या जनावरांचे उपकार मानणाऱ्या प्रथेत ही 'आनिपीनी' रुजली. 'आनिपीनी' या कन्नड शब्दांचा अर्थ 'इडापिडा'च! मग यात काय वेगळं! तर ती साजरी करण्याची पद्धत !

पूर्वी (आणि आत्ताही) एका गावातली ४-६ पोरं रानात गुरं चरायला न्यायची! साहजिकच त्यातून त्यांचं प्राण्यांविषयी प्रेम वाढायचं. ते व्यक्त करण्यासाठी दिवाळसणाच्या पाचही दिवशी असा (Videoत दिसतो त्याप्रमाणे) फणाधारी पणतीचा साज पाणसरीने करायचा ! पूर्वी मोठी माणसं, आणि आता छोटे उत्साही बालगोपाल ही पणती आपल्या गावातल्या मित्रांच्या घरच्या जनावरांना ओवाळायचे, म्हणायचे की, 'तुम्ही आम्हाला मदत करुन आमच्या, साऱ्या जगाचं पोशिंदी बनता. तुम्हाला काही न होवो ! तुम्ही उत्तम आयुष्य जगो!' अशा अर्थाचा मंत्र प्रत्येक गोठ्यातून कन्नड-मराठी मिश्र भाषेत म्हणायचा, पणती विझू नये म्हणून दर उंबरठ्याला त्या घर-मालकीणीकडे तेल मागायचे. असं ५ दिवस, प्रत्येक दिवशी, पणतीवर असणारा एक फणा वाढणार!

आनिपिनी प्रथेचा Youtube लिंक(दुवा) - https://www.youtube.com/watch?v=5TqZA6myqcM&pp=ygUPQU5JUElOSSBZT1VUVUJF

फणा हे नागाचं प्रतीक, शेतकऱ्याचा मित्र; म्हणून तो पणतीवर! माझा मित्र त्याच्या लहानपणीच्या' आनिपीनी'साठी गावात फिरतानाच्या किश्शात हरवून गेला आणि मला जगण्याच्या, कृषी संस्कृतीच्या सुंदर प्रथेचा ठेवा गवसला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users