आमचे धोत्रे गुरुजी (भाग ७)

Submitted by मिरिंडा on 28 February, 2024 - 06:26

      अजूनही हवी तशी पक्की माहिती मिळत नव्हती.आम्ही हॉटेल वर परत आलो. विचार करता करता लक्षात आलं की त्या दिवशी मला दम देणारी माणसं शंकरभैया ऊर्फ शंकर पाटलाची होती. दोनतीन दिवसात फार काही साधेल असं वाटत नव्हतं. मलाही माझी नोकरी होती.बॉससुद्धा फार दिवस जमवून घेईल असं वाटत नाही.असो..... आता शंकर पाटलाचा वाडा शोधला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे झाल्यावर देखणे आणि पवार यांना न सांगता मी स्वतःच भटकायला निघालो. तसं आता बदलेलं गाव मी फारसं पाहिलं नव्हतं. भिडे आळीतून जाता जाता बरीच आरसीसी कन्स्ट्रक्शन दिसली. आमच्या वेळी जिथे जंगल होतं तिथे घरं दिसली. घरं बघत बघत मी गावाबाहेर मी कधी आलो मला कळलं नाही. समोरुन खाडीवरचा थंड वारा वाहत होता. एका खडकावर बसत मी आजूबाजूला पाहिलं. निर्मनुष्य खाडीकिनाऱ्यावर मी एकटाच होतो. समोरच एक पडका किल्लावजा गढी होती. इकडे मी पूर्वी सुद्धा कधी आलो नाही. तेवढ्यात एक माणूस " ओ साहेब,ओ साहेब...ऽ.ऽ ..."असं ओरडत माझ्या मागे आला. " इकडं कुनीकडं ? नवीन दिसता जनू. म्हनून तर पाटलांनी बलीवलय बघा. " असं म्हणून तो मला किल्ल्यामागच्या एका प्रचंड वाड्याकडे घेऊन गेला......  पडलेल्या दगडांच्या राशीतून मार्ग काढीत मी त्याच्यामागून जात होतो.जाता जाता मी त्याला थांबवून विचारलं," समजा मी नाही आलो तर काय होईल? " त्यावर तो म्हणाला," साहेब आमच्या पाटील साहेबांना न्हाई म्हननारा अजून जल्माला यायचाय. बघा ना, तुमीपन निघालात ना ? " मी चुपचाप निघालो. मला सहजासहजी शोधायचं असेल आणि गुरुजींना न्याय मिळवून द्यायचा असेल तर या  लोकांच्या इच्छेनुसार वागावंच लागेल. ....... अचानक डावीकडे वळल्यावर अर्धवट भिंतीत उभी असलेली दरवाज्याची चौकट ,जी कधी नक्षीदार असावी. तीतून आत शिरल्यावर,म्हणजे दुसऱ्या बाजूला भिंत नव्हतीच त्यामुळे तिकडूनही जाता आलं असतंच. बरोबर असलेला माणूस अचानक दगडी जिन्याने खाली उतरु लागला. अर्धवट तुटक्या पायऱ्यांवरून जपूनच उतरावं लागत होतं. दहा बारा पायऱ्या उतरल्यानंतर, पूर्वीची तळघराची जागा असावी, किंवा वाडा जमिनीत खचला असावा.दोन कंदीलांच्या अंधुक प्रकाशात पांढऱ्या केसांचा एक माणूस एका टेबलापलीकडे बसलेला दिसला.त्याने बऱ्याच दिवसात अंघोळ केली नसावी. आणि त्याचे डोळे नशा केल्या सारखे लाल होते. कदाचित ते जळत असावेत. त्याच्याभोवती दोन तीन धष्टपुष्ट माणसं उभी होती.माझ्यापुढे जाणाऱ्या माणसाने ," रामराम पाटील,असे म्हणत, माझ्या कडे बोट केलं आणि म्हणाला," याला आनला बगा" असं म्हंटल्यावर सगळ्यांच्याच नजरा माझ्या कडे वळल्या.त्यातल्या एका माणसाला मी ओळखला. तो त्या बाईच्या घरी आला होता. तो माझ्या अंगावर धावून येत म्हणाला," हाच तो.गुर्जींचा तपास करतोय. असं म्हणून त्याने माझी कॉलर धरली. मी त्याला हिसडा दिला. ते पाहून पाटील ओरडला," पक्या जरा दमानं घे. ". मला न्याहाळत त्याने विचारले," का रं. ? आमच्या मागं लागतोस,होय रे भाड्या " मी काहीच बोलत नाही असं बघून जोरात ओरडला, " म्या काय इचारलं ? दातखीळ बसली का ? " मग तो  उठून तोल सांभाळत माझ्याकडे आला आणि मला जोरात कानफटीत मारत म्हणाला," हाच हाय न्हव ? " त्यावर पक्याने मान डोलावली. मला अतिशय राग आला. तो वळला तसा मी त्याच्यावर धावून गेलो. मग दुसरे दोघे फाटके होते तरी मला धरण्यासाठी धावले. गांजा चरस ओढून पोखरले गेले असले तरी त्यांच्यात बराच जोर होता. मग मात्र पाटलाने मला एका अडगळीच्या कोंदट खोलीतील खुर्चीला बांधून ठेवायला सांगितले. पक्याही धावला.तिघांनी मिळून खुर्चीत मला घट्ट बांधून ठेवलं.....
               मी ती खोली न्याहाळत होतो. सबंध खोलीभर,कसले तरी लहान आकाराचे खोके पडले होते. अधूनमधून ते आत येऊन दोनदोन चारचार खोके घेऊन ते बाहेर जात होते. लवकरच दहाबारा खोकी तिथेच टाकून,ते सगळेच निघाले.जाताजाता पक्या माझ्या जवळ येऊन म्हणाला," मर आता हितंच,तुझी सुटका नाही." बाहेर कुठे तरी काय सुरू केल्याचा आवाज आला. आणि मग ते सगळेच निघून गेले.......वरच्या अर्धवट तुटक्या छतामधून आता उन्हाची तिरीम आत येत होती. लवकरच ती असह्य होणार होती. मला बांधलेली खोली "एल" आकाराची होती. एलच्या आडव्या भागात जास्त चिरे पडले होते.खालची जमीनही दगडी ओबडधोबड होती. त्यांच्या वरुन माझी खुर्ची हालवणं कठीण होतं. मी माझ्या सुटकेचा प्रयत्न करु लागलो. हाताच्या दोऱ्या प्लास्टिकच्या होत्या. खास जाड नसल्या तरी पटकन सुटण्यासारख्या नव्हत्या.माझे हात प्रयत्नांमुळे कातू लागले. बराच दम लागल्याने मी थांबण्याचं ठरवलं. मी आजूबाजूला पाहिलं.  मला दोऱ्या कापण्यासाठी कोणतीही वस्तू दिसेना. पिक्चरमध्ये काही ना काही सापडलेलं दाखवतात. पण हा पिक्चर नव्हता. सुदैवाने माझे पाय बांधलेले नव्हते , म्हणजे मला बांधून ठेवण्यात यांना फार रस नसावा असं वाटलं. यांचा अर्थ त्यांचं लक्ष्य अमली पदार्थांचा व्यापार एवढंच असावं. किंवा ते अतिशय घाईत असावेत......
                                                         अजून तरी इथे कोणाचीही चाहूल लागत नव्हती.अशा वैराण जागी येणार तरी कोण ?.... फारतर मच्छीमार लोक येत असतील. पण तसं वाटत नव्हतं. मला वाटतं आता किमान नऊ साडेनऊ झाले असावेत. ऊन तापू लागलं. हळूहळू मला घाम येऊ लागला. धडपडीमुळे मला तहान लागली होती. पण पाणी देणार कोण? निदान मी मोबाईल तरी बरोबर आणायला हवा होता. देखणे आणि पवार काय करीत असतील? ते नक्कीच मला शोधायचा प्रयत्न करीत असतील. पण इथे यावं असं त्यांच्या डोक्यात कसं येणार ? एवढा प्रयत्न करुनही माझी खुर्ची तसूभरही पुढे सरकली नव्हती. ... तरीही मला सुटायला हवं होतं. आता मी ओरडून बाहेर कोणी आहे का विचारलं. उत्तरादाखल फक्त लाटांचा आवाज आला. " इथे मी दिवसभर राहून त्या लोकांची वाट पाहणार नाही." मी स्वतःशी म्हंटलं. ऐकायला कोणीही नव्हतं. एलच्या उभ्या भागात काय होतं, तेही मला पाहायचं होतं. पुन्हा धडपड करता करता माझी खुर्ची खाली पडली. आता माझ्या हातात एखादा दगड तरी लागत होता. थोडं बळ लावून मी हात वाकडा केला . हातात कळ आली पण एक मध्यम आकाराचा दगड हातात आला. दगड दोऱ्यांवर मारण्यापेक्षा मी तो खुर्चीच्या हातावर मारु लागलो. तो  तुटला तर निदान मी माझा एक हात तरी सोडवून घेऊन शकलो असतो. ......

       तितक्यात कोणाची तरी सावली बाजूच्या भिंतीवर पडली. मी जोरात आवाज दिला. "कोण आहे तिकडे... ? मला सोडवा इथून. " त्या बरोबर एक मुलगा आणि मुलगी माझ्यासमोर आले. हे इथे काय करायला आले ,असं माझ्या मनात येऊन त्यांना काही विचारणार,तेवढ्यात घाबरून ते धावत सुटले. मी पुन्हा ओरडलो, " अरे थांबा ए,मला सोडवा की ".... पण पळत सुटले. निदान,मी इथे आहे ,हे कोणाला तरी कळलं होतं. आता ते काही लोकांना घेऊन येऊ शकतात.मी आशेवर बसलो. मी पुन्हा पुन्हा
प्रयत्न करीत राहिलो. परिणामी मी आडव्या   भागाच्या दुसऱ्या टोकाशी आलो. माझी नजर तिथल्या गोष्टींवर पडली. तिथे माझ्यासारखंच कोणाला तरी एका खुर्चीवर बांधून ठेवलेलं दिसलं. मला जरा बरं वाटलं. म्हणजे मी इथे एकटा नाही. मी समोरच्या खुर्चीतल्या व्यक्तीला ओरडून विचारलं. " कोण आहात तुम्ही ? तुम्हाला इथे का आणलंय ? " पण प्रतिसाद आला नाही. आता मला स्वतःला सोडवून घेण्याची जास्त गरज भासू लागली. समोरच्या व्यक्तीची मान पुढे वाकून छातीवर स्थिरावली होती. तिला ऐकू तरी येत नसावं किंवा तिला झोप तरी लागली असावी. असं मला वाटलं. मी माझ्या बाजूचा एक लहान दगड कष्टाने उचलून तिच्यावर भिरकावला. पण तो तिच्या पायाला लागून खाली पडला. असे मी पाचसहा दगड मारले. एक दगड मात्र तिच्या छातीवर लागला. पण तिने हूं की चूं केलं नाही. किंवा कोणतीही हालचाल अथवा तोंडावाटे साधा सुस्काराही सोडला नाही. मी आता जास्त प्रयत्न करुन खुर्चीचा हात अर्धवट का होईना तोडू शकलो. हळूहळू मी माझे कोपर ओढू लागलो. जवळजवळ अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर मी माझा हात रक्ताळलेल्या अवस्थेत बाहेर काढला. मग मी असह्य कळा सोसून दुसराही हात बाहेर काढण्यात यशस्वी झालो. धडपडत का होईना मी मोठ्या मुश्किलीने उभा राहिलो. परंतू पुढच्याच क्षणी चक्कर येऊन खाली कोसळलो. त्या अवस्थेत किती वेळ होतो माहित नाही. आता दिवस माथ्यावरून सरकत होता. अंगाची नुसती काहिली झाली होती. पण मी नेट लावून तसाच उठलो. धडपडत चिऱ्यांतून वाट काढीत त्या माणसापर्यंत पोहोचलो. त्या व्यक्तीचं तोंड मी वर उचलले. आणि स्तंभित झालो. कारण ती व्यक्ती होती " लीलाबाई सुर्वे " जिच्या घरातून मला पक्याने हाकलून दिलं होतं आणि जिने बसमधे माझ्या हातात चिठ्ठी कोंबली होती.
         मी तसाच लीलाकडे पाहात उभा होतो. तिला मारण्याचं कारण कळेना. काय पद्धतीने तिला मारली, ते कळत नव्हतं. कदाचित गळा दाबून असेल. हे माझे तर्क होते. खरंतर माझा मृत व्यक्तीला हात लावण्याचा पहिलाच अनुभव होता. मी थोडा शहारलो.आता मला भीती वाटू लागली. म्हणजे इतके तास मी मृत व्यक्तीच्या सान्निध्यात होतो तर. लवकरात लवकर मला इथून जावंसं वाटू लागलं. पुढचं काही ठरवणार एवढ्यात बाहेर कार थांबल्याचा आणि माणसांच्या बोलण्याचा आवाज आला. मी पटकन लपण्यासाठी जागा पाहून लागलो. पण असल्या पडक्या वास्तूत कुठे लपणार ? ....
  नंतर एक दोन माणसं थोडे मोठाले खोके घेऊन पायऱ्या उतरताना दिसले. आतमध्ये एक मोडकळीस आलेलं आणि कुजलेल्या कपाटामागे वाकून बसलो. दोघांनी आणलेले खोके घेऊन ते आता मला बांधलं होतं तिथे जाऊन टाकणार, म्हणजे मी तिथे नाही, हे त्यांना सहज कळणार होतं.मला लवकरच काहीतरी करणं भाग होतं. मी पाय न वाजवता तीनचार पायऱ्या चढून वर आलो. रणरणत्या उन्हात कारजवळ आणखी तिघे उभे असलेले दिसले. त्यांचं बोलणं ऐकत बसलो तर मला इथून जाता येणार नाही. म्हणून तिथेच एक मळकट कळकट फडकं पडलं होतं ते घेऊन माझा चेहरा दिसणार नाही अशा रितीने डोक्यावर गुंडाळला, आणि खाली मान घालून त्यांच्या समोरुन कारच्या डावीकडे जाऊन लागलो. तशी पक्या ओरडला, " शांताराम,खोकी पडतील अशी ठेवू नका रे. " मी काहीच. बोलत नाही,असं पाहून तो पुन्हा ओरडला, " कायरे, बहिरा आहेस का? काहीच बोलत नाहीस ? " त्याला उत्तर देण्या ऐवजी मी खाडीकडे पळत सुटलो. त्या बरोबर पाटील ओरडला," नुसता ओरडून नकोस, गोळी घाल साल्याला. "अर्थातच त्यातले दोघे माझ्या मागे धावू लागले. जीव घेऊनपळणं म्हणजे काय ते मला त्या दिवशी कळलं. रणरणत्या उन्हात, घामाने डबडबलेल्या मी कशीतरी भिडे आळी गाठली. अजूनही माझा पाठलाग चालू होता मी एका डेरेदार वृक्षामागे लपलओ. ते धापा टाकत तिथपर्यंत आले. मी न दिसल्याने त्यांनी खिशातली पिस्तुलं काढली. पण मी न दिसल्याने गोळी झाडली नाही. दहा ते पंधरा मिनिटं मी वृक्षामागे लपलो  होतो. माझ्या श्वासाचे या शिट्ट्या वाजत होत्या. त्या कशातरी मी थांबवल्या. कंटाळून ते दोघे मागे पाहात निघाले. अजूनही मी बाहेर पडलो नव्हतो. मग, त्यांनी नाद सोडला आणि ते आल्या वाटेने परत गेले. मला प्रचंड तहान लागली होती. सगळ्याच घरांचे दरवाजे बंद होते. बहुतेक लोक जेवत असावेत किंवा जेवून विश्रांती घेत असावेत. मी कसातरी मुख्य रस्त्यावर आलो. तिथे टपरीवजा एक हॉटेल होतं. तिकडे पाणी मागितलं. ते घटाघटा पिताना पाहून टपरीवजा म्हणाला, "काय राव इतक्या जोरात पळत आलात ? कुनी मागं लागलं व्हतं काय ? " मी आणखी एक पेला पाणी प्यायलो. मग चाय पायजे का ? विचारलं. मी नाही म्हटलं. माझ्याजवळ पैसेही नव्हते आणि वेळही. कारण कोणी ना कोणी माझ्या मागावर आलंच असतं.कसंतरी हॉटेल वर पोहोचायला हवं होतं. आता मी जरा शांतपणे निघालो.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्षमस्व,
तब्बेतीचे चढ उतार चालूच आहेत. आपल्या गैरसोयीबद्दलदिलगीर आहे.