साद

Submitted by रेव्यु on 27 January, 2024 - 12:26

साद........ !
आम्ही आमची पाचवी अमेरिकेची ट्रीप संपवून परत निघालो होतो.आमच्या विमानाने सॅन फ्रान्सिस्कोच्या विमानतळावरून उड्डाण केलं आणि मी सीटच्या पाठीवर मान टाकून डोळे मिटून घेतले.क्षणभर प्रचंड एकटेपणाने मन झाकोळल्यासारखं झालं. इतका वेळ विमानात चढण्याच्या,
सामान ठेवण्याच्या गडबडीतही; सेक्युरिटीतून पुढे जाईपर्यंत तासभर तिष्ठत असणार्‍या तेजूचे-माझ्या थोरल्या कन्येचा चेहरा, अश्रूंनी भरलेले डोळे सतावत होते. दहादा दूरवर उभ्या असलेल्या तिला बाय बाय करत होतो. शेवटी नजरेआड झाली.
मी माझ्या मोबाईलकडे पाहिलं अन त्यात तेजूचा संदेश आणखीच माझ्या मनाला सैरभैर करून गेला.

“Have a safe flight aai and pa! It's so hard seeing you on your way back home... These past 5 months just flew by, leaving behind beautiful memories. you will both be missed terribly! We will miss your reassuring presence, the morning coffees, the late night card sessions, the karaokes, the gathering regularly at the dinner table. Our numerous demands and your relentless efforts to adjust to our style of living, I am so glad the kids got to spend as much as time as possible with you this time! I look forward to the next visit”

आता विमानतळावरून परत आपल्या घरी निघालेल्या मुलीचं,जावयाचं अस्तित्व मनाला जाणवत होतं. आपण इथे आत असलो तरी बाहेर आपली प्रेमाची माणसं आहेत ही जाणीव मनाला दिलासा देत होती.पण विमान आकाशात झेपावलं आणि पोटात एकदम खड्डा पडला.मुली दूर राहिल्या..नातवंडं बघताबघता लांब गेली..आता आपण एकटेच या कल्पनेने काळजात तुटल्या सारखं झालं.खरं तर मी काही अगदीच एकटा नव्हते.माझी जन्माची जोडीदार माझ्याबरोबर होतीच की.तरी देखील एका विचित्र अशा एकटेपणाच्या भावनेने मनाला घेरून टाकलं. काहीवेळ मी तसाच डोळे मिटून पडून राहिलो.डोळ्यांच्या कडातून अलगद अश्रू ओघळत होते.मनात आठवणींची गर्दी झाली होती...गेल्या सहा महिन्यांत मुली.जावई नातवंडं यांच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण मनात ताजा होता.

अमेरिकेतल्या मुक्कामात मुली भोवताली पिंगा घालत होत्या. अत्यंत प्रेक्षणीय स्थळांची सहल करवत होत्या. उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रमांस, ब्रॉडवेला नेत होत्या. नातवंडांनी लळा लावला होता. नातू तर अनेकदा आमच्याबरोबर झोपायचा हट्ट करायचा. बालपणी कधी काळी अप्रूप म्हणून बनवलेले हैग्रीव या सारखे कानडी पदार्थ आईकडून आवर्जून बनवून खायच्या. माझी सत्तरावा वाढदिवस मोठ्या प्रेमाने घरी गुरुजी बोलवून साजरा केला होता. त्यांची ती धडपड अन जिव्हाळा पाहून आम्हाल दोघांना भरून येत होते. मुली व त्यांच्या पतींनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे व कष्टाने प्राप्त केलेले व्यावसायिक यश आणि त्या सोबत आलेली आर्थिक सुबत्ता पाहून आमचा ऊर भरून आला होता. सर्व काही तसे पाहू गेले तर आनंददायक असून ही “ आहे मनोहर तरीही” ही भावना मनातून जात नव्हती. सायंकाळी वॉकनंतर तेथील मोनार्क पार मध्ये अनेक वृध्द भारतीय जोडपी भेटत होती. काही तिथेच स्थिरावली होती. पण त्यांच्या चेहर्यावरील विषण्णता लपत नव्हती.

याच दरम्यान ईस्ट बे महाराष्ट्र मंडळ येथे गणपतीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची लगबग सुरू झाली होती. ते सुरेश भटांचे “ लाभले आम्हास भाग्य” बसवत होतो. तालमी पाहण्यासाठी मोठ्या आपुलकीने त्यांनी मला तिथे बोलावले होते. तिथेच मला बरेच वय झालेले कुलकर्णी काका एका व्हीलचेअर वर भेटले. एकमेकांची विचारपूस झाली. मोठ्या आपुलकीने ते भारतातील हालहवाल विचारत होते. ते तिथेच मुलाकडे ग्रीन कार्डवर स्थायिक झाले होते. त्यांच्या बोलण्यातील “ आता भारत अन पुणे म्हणजे नुसत्या आठवणीच” या उल्लेखाने मला खूप विचलित केले. तिथे त्यांची उत्तम काळजी घेतली जात होती हे स्पष्ट होते. परंतु अंतरीची ती कळ विदारक होती.

आम्हालाही अमेरिकेत सुबत्ता,सुखसोयी मुलाबाळांचा सहवास, हे सारं असलं तरी आता शेवटीशेवटी आम्हाला आपल्या देशाची खूप आठवण यायला लागली होती...
आमचं घर,माझं कॉलेज ,मित्रमंडळी, नातेवाईक..एवढेच नाही तर आमच्याच्याकडे काम करणारी लक्ष्मी,दूधवाला मुलगा, भाजीवाला पोरगा..सगळ्यांना भेटावंसं वाटत होतं.

अमेरिकेत मुली आणि जावई दिवसभर कामात.नातवंडांमधे छान वेळ जायचा मात्र अधूनमधून
रस्त्याने सुळकन् जाणा-या गाड्या सोडल्या, तर दिवसभरात एखादं चिटपाखरूही दिसायचं नाही.
सगळीकडे निसर्गाची मुक्त उधळण..शरीरात भिनणारा हिमगारवा..! कुठे धुळीचा कण नाही की घाणीचं नाव नाही.पण या सगळ्याबरोबरच आसमंतात भरून राहिलेली एक नीरव शांतता...! रस्त्याने माणसं सोडा पण कुत्री देखील कधी भुंकत जाताना दिसली नाहीत.

संध्याकाळी मुलीबरोबर गाडीतनं बाहेर पडायचो तेव्हा मजा वाटायची.पण रोज रोज जाणार तरी कुठे आणि कोणाकडे?मग उगीचच मोठमोठ्या malls मधे जायचं, फिरायचं. वाटेत कोणी भेटतंय आणि गप्पा ठोकत उभे राहातोय हे दृष्य नाही. बोलायला, प्रश्न विचारायला sales girls पण नाहीत.आपल्याला हव्या त्या वस्तू उचलायच्या..अगदी दूध ,ब्रेड भाजी.. पासून ते कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत सगळं..
आणि काऊंटरवर आणून बिल करायचं...इथल्यासारखं दोन रुपयांचा मसाला घेतानाही,' घाल रे थोड्या मिरच्या..कोथिंबीर देतोयस की गवत...?आल्याचा तुकडा घातलास ना... ? ' असले निरर्थक प्रश्न नाहीत की उत्तरं नाहीत.मात्र समोर दिसलेली व्यक्ती हसून 'हाय' म्हणणारच.ते ऐकून छान वाटायचं.
!
मात्र याक्षणी मला सारखं वाटत होतं की आपण भारतात चाललोय ते नक्की कसल्या ओढीने ...?कोणती शक्ती आपल्याला तिथे खेचून नेतेय? तिथे तर आपल्यासाठी वाट बघणारं असं आता कोणीच नाही.
बोटावर मोजण्याइतके नातेवाईक आहेत पण तेही काळाच्या ओघात नकळत दुरावलेले..त्यांना आमची कधीमधी आठवण येत असेल पण आमच्याशिवाय ज्यांचं अडणार आहे असे कुणीही नाहीत...मित्र मैत्रिणींचा group आहे.
त्यांना मी आल्याचा आनंदही होईल.पण तेही माझ्या वयाचे .... शेवटी आपल्या संसारात नि गोतावळ्यात शारिरिक दुखण्यात बुडालेले..त्यांना असा काय फरक पडणार आहे, माझ्या असण्याने किंवा नसण्याने?मग मी कशासाठी परत निघालोय..? शेवटी 'माझा देश' म्हणजे तरी नक्की काय?...मग पुढेमागे यायचं का अमेरिकेतच ?
कायम मुलींकडे राहायला... ? मात्र या प्रश्नाचं उत्तरही होकारार्थी येत नव्हतं.... !

इतक्यात ' Excuse me! ' हे गोड शब्द माझ्या कानांवर आले आणि मी डोळे उघडले.समोर
'हवाई सुंदरी ' उभी होती. माझ्याकडे सुहास्य वदनाने पाहात होती.खरंच ,हास्य ही एक संसर्गजन्य गोष्टआहे.तिचा हसरा चेहरा पाहून मी ही हसलो. मनावरचं मळभ नकळत दूर झालं आणि मग तिने समोर ठेवलेल्या नाश्त्याचा आस्वाद घेताना , इतका वेळ भूक लागली होती याची जाणिव झाली

झुरिक चा तीन तासांचा हॉल्ट बघता बघता संपला आणि विमानाने पुन्हा उड्डाण केलं.
क्षणाक्षणाला आम्ही आपल्या देशाच्या जवळ येत होतो.आता कधी एकदा मुंबई येतेय असं झालं होतं.प्रवासाचा कंटाळाही आला होता आणि ' आपलं नाशिक'बघण्यासाठी डोळेही आसुसले होते.
अखेर एकदाचे आम्ही मुंबईच्यास विमानतळावर उतरलो.ग्रीन चॅनेल वर कस्टमवाल्यांनी बॅगा चढण्याउतरवण्यासाठी खूप मदत केली. मधून बाहेर येताच लोकांची ही s गर्दी दिसली.येणा-या प्रत्येकाच्या स्वागतासाठी कोणी ना कोणी हजर होतं.आम्ही मात्र दोघेच... !
सामानाची ट्राॅली ढकलत आम्ही बाहेर आलो. नाशिकचा ड्रायव्हर आला होता. त्यांनी काका काकू म्हणत आमच्या जड बॅगा चढवण्यात मदत केली.
बोलता बोलता टॅक्सी नाशिकला पोहोचली.पहाटे 5 वाजता रस्त्यावर थोडी वर्दळ होती.
काहीतरी खूप 'आपलंसं' गवसल्यासारखं वाटलं...बघता बघता अंबडगाव मागे पडलं..
टॅक्सीवाल्याने लिफ्टपर्यंत ब्यागा सोडल्या .आमची बिल्डिंग अचानक खूप सुंदर दिसत होती अन ती निःशब्दपणे उभी होती.
सरळ नाकासमोर जाणारा रस्ता आम्हाला खुणावत होता.त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारती, आम्हाला सलामी देत होत्या..टॅक्सीतून उतरल्यावर सर्वप्रथम माझी नजर आमच्या दुसर्‍या मजल्यावरच्या ब्लॉककडे गेली.आमचं घर अंधार ओढून गुडूप झोपलं होतं.

आम्ही बॅगा घेऊन वर आलो आणि कुलूप उघडणार इतक्यातच दरवाज्याच्या चौकटीवर सोनेरी अक्षरातील सुस्वागताची पताका, बघता बघता माझे डोळे पाण्याने भरून आले.हे सगळं आदल्या रात्रीच, समोरच्या डांगेंच्या प्रांजलीने लावलेलं होतं. आणि आमची लगबग कदाचित कानावर पडल्याने ते जागे झाले असावेत आणि मग सुहास्याने स्वागत झाले, लगेच गरम चहा पाजला आणि सकाळच्या न्याहरीचे आमंत्रण देखील. पण एक मात्र खरे इतक्या महिन्यांनी घरी परतल्यानंतर आपलं आपणच दरवाजा उघडून आत जाणं ही कल्पना थोडीशी क्लेश देणारी होती.

काही वेळाने दोघेही गुडूप झोपलो. थोड्या वेळाने जाग आली. संपूर्ण भेटीतील सर्वकाही मला पुन्हापुन्हा आठवत होतं

मी हळूच उठलो आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो.
बाहेर मंद वारा वाहात होता. आमच्या खिडकीसमोरचं पीटीसी मधील माझे आजोबा असल्यागत मोठ्ठं झाड वा-यावर हळुवारपणे डुलत होतं.दूरवरून येणारा फुलांचा सुगंध मनाला भुरळ पाडत होता. तब्बल सहा महिन्यांनी मी, आपल्या देशातली सुंदर पहाट पाहात होतो.
आमचा नेहमीचा खंड्या आणि भारद्वाज फांदीवर येऊन बसला आणि पहाट मंगल करून गेला.
दूरवर कुठेतरी मुरळी आला होता... वॉचमन, मग मोलकरीण, मग पल्याडच्या गच्चीतून पिंट्या .... सगळे आळीपाळीने पाहून हात करत होते..

..आणि पूर्वदिशा हळूहळू उजळू लागली होती.........!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

अप्रतिम! किती सुंदर लिहिलं आहे. खुप दिवसात वाचलेलं हे उच्च ललित आहे. सगळ्या भावना कशा योग्य आणि प्रभावी मांडल्या आहेत. अगदी पोचल्या.
पाहिला पॅरा वाचुन आईबाबांच्या भेटी आणि त्यांची परत जायची वेळ आली की होणारे दुःख आठवलं. Sad

खूप छान लिहिले आहे . नात्यातल्या बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचे अमेरिकेहून जाऊन आल्यावरचे मनोगत वाटले.

खूप छान लिहिले आहे . नात्यातल्या बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचे अमेरिकेहून जाऊन आल्यावरचे मनोगत वाटले.>>>> अगदी अगदी

एकीकडे लेकींच्या, नातवांच्या सहवासाची ओढ, वेगळ्या परंतु प्रगत देशाचा दुहेरी अनुभव आणि दुसरीकडे स्वतःचे घर स्वतःचे स्वतः बनबलेले/निवडलेले एक विश्व यामध्ये होणारी भावनांची घालमेल आणि त्यातून हेच आपले विश्व इथेच आपले सुख (वैयक्तीक आहे, कुणाला अजून कशात सुख वाटेल, उदा. तिकडेच राहण्यात) अशी अनुभूती होणे सगळेच मनोगत अगदी सुरेख मांडले आहे.

फारच छान!
मला पण अमेरिकेत सहा महिने राहिल्यानन्तर भारताची ओढ वाटायला लागते. काहीही करा हा देश, हे घर आपलं वाटतंच नाही. इथलं रुटिन कंटाळवाणंच वाटतं.
आई बाबा, सासु सासरे, बहिण भारतात आहेत म्हणुन वाटतं का असं? ते इकडे आले कायमचे तरी वाटेल का तसंच असा विचार करता उत्तर होच येतं. हा देश परकाच आहे आणि परकाच रहाणार माझ्यासाठी. इथे आम्ही किती वर्ष राहु का कायमचे स्थाईक होऊ माहीत नाही पण इथे काहीच आपलेपणा नाही ही भावना माझ्याबाबतीत १००% तशीच आणि कायम रहाणार आहे

Dhanyu रिया कोणीतरी तरी सत्य 4मत मांडले.
मी देलॉइत मधून 6 महिने अमेरिकेत राहून आलोय,
अतिशय फालतू देश.
लोके का एवढे स्तुती करतात देव जाणे.

>>>>>>इथलं रुटिन कंटाळवाणंच वाटतं.
लोकंच नसतात फारशी. सुनंसुनं उर्जारहित वाटतं. लाँग आयलंडमध्ये आमच्या भागात फार कमी लोकवस्ती आहे. मग जर्सी सिटी च्या मध्यवर्ती भागात खूप छान वर्दळ असे.
सुपिरीअर, विस्कॉन्सिनमध्ये तर इतकं ओसाड होतं.
पण इथली स्वच्छता फार आवडते मला. आय मीन कोणाला आवडणार नाही? पब्लिक रेस्टरुम वगैरे सोईसुविधा, रहदारीच्या पाट्या अगदी अप टु डेट आणि अचूक असतात, लोकांचे मॅनर्स. हे सर्व आवडते.