आकाशी झेप घे रे पाखरा - पॅराग्लायडिंग पायलट बनण्याचा अनुभव - भाग १

Submitted by मध्यलोक on 14 December, 2023 - 12:43

भाग १ : https://www.maayboli.com/node/84447
भाग २: https://www.maayboli.com/node/84450
भाग ३: https://www.maayboli.com/node/84454
भाग ४: https://www.maayboli.com/node/84459 (अंतिम)
================================================================

तुम्हाला स्वप्न पडतात का? जर ह्याचे उत्तर हो असेल तर कोणती स्वप्न?
१) परीक्षेला बसलोय, गणिताचा पेपर आहे पण काहीच आठवत नाहीये आणि आपण नापास होतोय
२) आपण बस/रेल्वेच्या मागे धावतोय तेवढ्यात बस/रेल्वे सुटली आणि आपण मागे राहिलो
३) कसल्या तरी भीतीने दातखीळ बसली आणि सगळे दात पडले
४) आपण हवेत उडतोय आणि इमारती वरून उड्या मरतोय किंवा उंच आकाशात भरारी घेतोय
लिस्ट तशी बरीच मोठी आहे पण ह्यातील शेवटचे स्वप्न हे माझे आवडते स्वप्न, तुमचे हि आवडते स्वप्न असणार ह्याची शक्यता जास्त आहे. हे स्वप्न सत्यात यावे अशी आपल्या सगळ्यांची एक सुप्त ईच्छा असते आणि ही ईच्छा पूर्ण करण्याची मला संधी मिळाली.

या वर्षीच्या उन्हाळ्यात एक वेगळी ऍडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करावी असा विचार डोक्यात होता. त्यात माझ्याकडे दोन ऑप्शन होते, पहिला म्हणजे स्कायडायव्हिंग तर दुसरा म्हणजे पॅराग्लायडिंग. स्कायडायव्हिंग मध्ये आकाशातून उडी मारून खाली येणे तर पॅराग्लायडिंग मध्ये जमिनीवरून उडी घेऊन आकाशात झेप घेणे. मग काय वरून खाली येण्यापेक्षा खालून वर जाणे हा मार्ग मी निवडला. आणि शोध सुरू झाला पॅराग्लायडिंग बद्दल माहिती मिळवण्याचा.

पॅराग्लायडिंग बद्दल इंटरनेट वर शोधताना जवळपास सगळी माहिती टँडम फ्लाईट बद्दल मिळत होती. ह्यात आपण एका निष्णात पायलट सोबत असतो. फ्लाईटचे सर्व कंट्रोल पायलटच्या हातात असतात आणि त्याच्या सोबत आपण हवेत झेप घेतो. ठिकाण आणि हवामान ह्या नुसार ही टँडम फ्लाईट 15 ते 20 मिनिटे असते. पुण्याजवळ कामशेत, पांचगणी तर भारतात बिर बिलिंग, मनाली येथील पॅराग्लायडिंग साईट्स प्रसिद्ध आहेत आणि भरपूर देशी विदेशी पर्यटक इथे ह्याचा आनंद घेतात.

मला ही टँडम फ्लाईटची कल्पना आवडली पण नंतर वाटले हा अनुभव फक्त एक वेळच मिळेल, पण पुढे काय, आपल्याला पुन्हा उडावे वाटले तर पुन्हा टँडम फ्लाईट घ्यावी लागेल आणि ही कसरत खिशाला काही परवडणारी नाही हे ही लक्षात आले.

अश्यातच इंटरनेट वर शोध करताना माहिती मिळाली "Introduction To Paragliding" ह्या "University Of Calgary" मधील कोर्स बद्दल. अगदी स्वस्तात आणि खिशाला परवडणारा असा हा तीन दिवसीय कोर्स होता. पहिल्या दिवशी क्लास रूम ट्रेनिंग होते. त्यात ग्लायडरचे भाग, ग्लायडरचे विविध प्रकार, उड्डाणाचे विज्ञान आणि बेसिक हाताळणी अशी माहिती देणार होते. तर दुसऱ्या दिवशी कॅल्गरी मधीलच एका भागात असणाऱ्या पार्क मध्ये किंवा छोट्या टेकडीवर उडण्याचे प्राथमिक प्रशिक्षण देणार होते. आणि तिसरा दिवस हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला होता जर दुसऱ्या दिवशी हवामान योग्य नसेल तर दुसऱ्या दिवशी करण्याचे प्रशिक्षण तिसऱ्या दिवशी करणे हा प्लॅन होता. पण जर दुसऱ्या दिवशी प्रशिक्षण झाले तर तिसरा दिवस बोनस दिवस असणार होता आणि दुसऱ्या दिवशीचे प्रशिक्षण पुन्हा करण्याची संधी मिळणार होती.

मला हा तीन दिवसांचा सुटसुटीत कार्यक्रम असलेला कोर्स आवडला होता आणि त्यात दोन दिवस प्रत्यक्ष उडण्याची संधी.. म्हणजे मजा येणार होती.

बायकोला ही सगळी माहिती दिली. ह्या खेळात असणारे सगळे धोके आणि अती जोखीम ह्या बद्दल सांगितले. पण माझ्याप्रमाणे तिच्याही अंगात आणि रक्तात जोखमीच्या खेळाबद्दल असणारी सळसळ (किडा म्हणा हवं तर) आणि प्रेम (पॅशन) भरपूर असल्याने आणि सोबतीला खेळात घेतली जाणारी सुरक्षा बघून तिने मला पूर्ण पाठिंबा दिला.

मी आता पुन्हा विचार न करता कोर्स साठी नाव नोंदणी केली..तारीख होती 15 मार्च आणि कोर्स सुरू होणार होता 27 एप्रिलला.. रोज मनात एक धाकधूक असायची आणि आपल्यापुढे काय मांडले आहे ह्याचा विचाराने मजा यायची.

दिवस सरत होते आणि 27 एप्रिल येण्याची मी वाट बघत होतो.

01_14122023.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच आहे..
तुम्ही शागां का पूर्वीचे ?

भारीच आहे..
तुम्ही शागां का पूर्वीचे ? >>>>
धन्यवाद.
नाही एकच ID आहे हा माझा आणि आधी पासून लिखाणासाठी मध्यलोक हेच नाव आहे

>>>>>पण माझ्याप्रमाणे तिच्याही अंगात आणि रक्तात जोखमीच्या खेळाबद्दल असणारी सळसळ (किडा म्हणा हवं तर) आणि प्रेम (पॅशन) भरपूर असल्याने आणि सोबतीला खेळात घेतली जाणारी सुरक्षा बघून तिने मला पूर्ण पाठिंबा दिला.
कौतुक आहे.

कुठून केला हा कोर्स लिंक द्या ना? मी मागील वर्षी केला होता टेंपल पायलट्स मधून. मजा आली होती.
Submitted by बोकलत on 15 December, 2023 - 08:25

बोकलत जी, हा कोर्से मी कॅल्गरी, कॅनडा येथील university of Calgary येथून केला (link: https://www.ucalgary.ca/ActiveLiving/registration/Browse/Sky/Paragliding).
टेंम्पल पायलट सोबत तुमचा अनुभव कसा होता ह्या बद्दल लिहा म्हणजे इथल्या मंडळीला त्याचा फायदा होईल. तुम्ही आता रेग्युलर flying करता का, तुमच्याकडे ग्लायडर आहे का. मी पुण्यात आल्यावर मला सोबत हवी आहे. पुणे, मुंबई आणि महाबळेश्वर जवळ काही flying साईट आहेत तिथे फ्लाय करायचा विचार आहे. कोणी सोबत असेल तर भारतात येताना माझे ग्लायडर सोबत आणता येईल नाही तर उगाच वजन व्हायचे.

रच्याकने.... पुण्यात असताना मला सुद्धा टेंम्पल पायलट मधून कोर्स करायचा होता पण तेव्हा वेळ मिळाला नाही. मजेची गोष्ट म्हणजे या वर्षी माझ्या ८ वर्ष्याच्या पुतणीने टेंम्पल पायलट सोबत flying केले आणि तिनेच मला प्रेरणा हि दिली.

अच्छा मला वाटलं पुण्यातून केलात. मी P1 कोर्स केला. पहिल्यांदा जेव्हा एअरबॉर्न होतो तेव्हा एकदम भारी वाटतं. माझ्याकडे ग्लायडर नाही. छंद म्हणून हा खेळ जोपासणे जरा अवघड वाटत आहे. पुरेसा वेळ पाहिजे. पण भारी वाटतं.