Can you hear the music !

Submitted by अस्मिता. on 6 December, 2023 - 21:24

वैधानिक इशारा* जड-आध्यात्मिक लेख आहे, परत फिरा. Happy

डेकार्टच्या मते आपण विचार करतो म्हणून आपण 'असतो', I think therefore I am ! पाश्चिमात्य तत्त्वज्ञान कुठेतरी विचारांतच अडकून पडले आणि पौर्वात्य त्यामानाने कितीतरी पुढे 'निर्विचारी' अवस्थेत गेले. अद्वैतवाद हा त्याहीपुढे जाऊन आत्म्याचे खरे रूप दाखवतो. त्यामुळे ज्यांना खऱ्याखुऱ्या अध्यात्माची ओळख हवी आहे, त्यांना जगभर फिरून पुन्हा घरी परतावेच लागते. पण फिरावंही लागतं , कारण इतर संस्कृतीतील अध्यात्मिक गूढ हे आपल्या आयुष्यातही टप्प्यांसारखे येतच असते.

एका भटक्यानी एकदा बुद्धाला थेट विचारलं , 'परमात्मा' अशी काही गोष्ट खरोखरच अस्तित्वात असते का ? बुद्धाने उत्तरादाखल मौन धारण केले. कारण कुठलंही उत्तर दिलं असतं तरी ते चुकीचंच ठरलं असतं. प्रज्ञेच्या प्रांतात येणाऱ्या गोष्टी ह्या त्या अनुभूती दरम्यानच अस्तित्वात असतात. जेव्हा आपण त्याला काही तरी नाव देत असतो ती अनुभूती नष्ट होत असते. जरा-व्याधी-मृत्यू यांच्यापासून अलिप्त असणाऱ्या तेजस्वी परमतत्त्वाला बौद्धप्रणालीत 'तथागत-गर्भ' असेही म्हणतात.

एखादी गोष्ट गूढ असली की आपण आपल्या सोयीसाठी त्याला पटकन नाव देऊन व्याख्येत अडकवतो. मग आपल्याला फार खोलात जायची गरज पडत नाही. त्यामुळे 'ब्रह्म' आणि 'भ्रम' एकदाच प्रकट झाले आहेत असंही म्हणता येईल. सुरवातीच्या संशोधनानुसार आपले ब्रह्मांड हळूहळू आकुंचन पावत जाईल असे गृहितक होते. पण प्रत्यक्षात बिग बॅन्ग(विश्वनिर्मिती) नंतर ते प्रसरण पावत चालले आहे. भौतिकशास्त्रातल्या थेअरीजपेक्षा कितीतरी अधिक वस्तुमान अस्तित्वात आहे. त्यामुळे आपल्या कल्पनेच्या पकडीत न आलेले जे वस्तुमान आहे, ती अशी ऊर्जा आहे ज्याने विश्वाच्या चेतासंस्थेसारखे प्रत्येक जड-सूक्ष्म अस्तित्वाला धरून ठेवले आहे. ही ऊर्जा कालातीत(timeless) आणि अ-मितीय(dimensionless) आहे. या ऊर्जेने सगळ्या दृष्यादृष्याला जोडले आहे. हे तेच 'नादब्रह्म' आहे, जे सर्व आध्यात्मिक अनुभवाच्या मूळाशी आहे. ज्या नादब्रह्माच्या लहरींवर हे ब्रह्मांड श्वास घेते, तोच प्रत्येक धर्माचा कणा आहे. ह्याच नादब्रह्माचे अवकाश आपल्या आत आणि बाहेर आहे. ह्या नादब्रह्माचा शोध घेण्यासाठी अनेक योगी, साधू, शमन, लामा यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

वैदिक परंपरेतील मिथकानुसार यालाच 'इंद्रजाल'ही म्हटले जायचे. कारण इंद्र हा पृथ्वीचा राजा. ह्याच्या कृपेने पाऊस पडतो, ह्यानेच सूर्याला जन्म दिला. त्याच्यामुळे सृष्टी निर्माण झाली. याने पाडलेल्या पावसाच्या दवबिंदूत एका नव्या सृष्टीचे प्रतिबिंब पडते. सर्व दवबिंदूंचे प्रतिबिंबही एकाचवेळी एकमेकांवर पडते, त्यामुळे अनंतसृष्टींचा आभास निर्माण होतो.

Indrasnet.jpg
#Indra's net of jewels विकी

अवकाश(ether?) ही अशी पोकळी आहे की ज्यात पंचमहाभूतांचे अधिष्ठान झाल्यावर त्याला एक जड- अस्तित्व येते व नादाने त्यात चैतन्य निर्माण केले जाते. त्यामुळे त्याला काही ठिकाणी yin and yang किंवा शिव(शून्यता) आणि शक्ती(ऊर्जा) म्हटले आहे. 'अवकाश' आणि 'नादब्रह्म' या संकल्पनांना समजण्यासाठी फ्रॅक्टल हा आकार उदाहरणादाखल घेऊ. Fractal हा एक गुंतागुंतीचा भूमितीय आकार आहे, यात दरवेळी एक पूर्ण आकार व नव्या आकाराचे बीज दिसते. प्रत्येक आकारात आणखी एक आकार असं ते अविरत अनंतापर्यंत उकलत जातं. प्रत्येक आकार हा एकाच वेळी मर्यादित आणि अमर्याद असतो. ज्याच्या वापर पुरातन वास्तूकलेत आणि मूर्तिकलेत बुद्धप्रतिमा घडवण्यासाठी केला जायचा. पीठ पाण्यात कालवून सरबरीत भिजवले व त्याला एका भांड्यात घातले व त्या भांड्याच्या काठाला tunning fork पुन्हापुन्हा आदळला तर ते पातळ पीठ वर उडून विशिष्ट आकार घेईल. तसाच या नादाने आपल्या अवकाशाला तात्पुरता स्थूल-आकार दिला जातो.(Timeless world of waves and the Solid world of things.) ज्याला नाव नाही त्याला नाव देऊन, जे सतत बदलत असतं त्याचा काळ निमिषार्ध थांबवून आपण आपल्या दृष्टीने त्याला 'स्थूलत्व' देतो. For our perception defining to exist by imagining a solidity??

EXTREME1.gif
#Fractal साभार विकी.

अगदी विश्वाच्या प्रारंभी बिंदूचा महास्फोट झाला तेव्हा तो बिंदू अतिशय घन -सूक्ष्म होता, त्यापासून म्हणजे त्या अद्वैतापासून- singularity पासून हे बिंदूकण भौतिकदृष्ट्या 'द्वैत' झाले. ह्या द्वैतावस्थेआधी जे होते, ते ज्यु आणि ख्रिश्चन धर्मात 'लोगोस' किंवा हिंदू धर्मात 'आद्य ओमकार' असे मानले जाते. 'कुन फाया कुन' या सूफी गाण्यातही 'जब कुछभी नहीं था, वही था वही था' सांगून तेच समजावले आहे. बायबलमध्ये ह्याला In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God” (John 1:1). This one verse establishes the Word as being both divine and eternal in nature असे विशद केले आहे. जे काही पवित्र व चिरंतन आहे ते हे 'नादब्रह्म'. ज्यापासून सगळं अस्तित्वात आलं ते हे 'नाम', आवाजाला शब्दात बांधणं कठीण आहे, त्यामुळे 'नाम' ही व्याख्या सुद्धा मर्यादित आहे . कदाचित यामुळेच गौतम बुद्धांनी मौनाने उत्तर दिले असावे.  Happy

-अस्मिता
मला पूर्ण समजलं आहे असं नाही. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचाही प्रयत्न केलेला नाही. अमर्याद गूढाचं अशक्य स्पष्टिकरण द्यायचा मनापासून प्रयत्न केला आहे. Happy
त्यातही माहितीपट इंग्रजीत असल्याने मला मराठीत कितपत समजवता आले शंकाच आहे. जिथे शक्य नव्हतं तिथे इंग्रजीतच लिहिलं.

संदर्भ-
१. Inner worlds outer worlds माहितीपट. नक्की बघा. वरचा लेख त्याचाच परिचय आहे ‌, ह्या मालिकेत अजूनही माहितीपट आहेत. तिथे आकाश हा शब्द ether साठी वापरला , तो मी 'अवकाश' केला.
https://youtu.be/aXuTt7c3Jkg?si=i2Zs7IsmLlzuYAqm
https://awakentheworld.com/series/inner-worlds-outer-worlds-series/

२. "Can you hear the music" हे शीर्षक 'ऑपनहायमर' चित्रपटामधील पार्श्वसंगीतावरून दिले आहे, जे नादब्रह्मासाठी चपखल वाटले. सध्या रिपीटावर आहे.
Ludwig Göransson https://youtu.be/vQu5RQA_XN0?si=XM7LX8a_ni7pQANP

३. https://en.m.wikipedia.org/wiki/Buddhabrot

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर चिंतन.
चिंतन आणि स्पेस यांना मर्यादा नाहीत. स्पेस बाबत रोज नवनवीन शोध लागतात.
स्पेस आणि लाईफची सांगड घालण्याचा प्रयत्न हा सुद्धा सनातन आहे. अगदी जंगलात गुहेबाहेर झोपणार्‍या आदिमानवालाही आकाशात दिसणार्‍या आकाशगंगेचं गूढ आकर्षण होतंच. आपापल्या आकलनानुसार चिंतन करत राहणे हा उच्च कोटीचा मनोरंजनाचा प्रकार आहे.

याच ओढीतून जगात तत्त्वज्ञानं निर्माण झाली. भारतात त्याला दर्शने म्हणतात. ती सात आहेत. यापैकी दोन दर्शने नास्तिक आहेत. बौद्ध आणि चार्वाकाचे दर्शन नास्तिक समजले जाते. ज्यात आत्मा आणि देव यांचे अस्तित्व नाकारले जाते त्याला रूढ अर्थाने नास्तिक म्हटले जाते. नास्तिकाचे अर्थ खोलात वेगवेगळे आहेत.

रजनीशांनी वेगवेगळ्या दर्शनांकडे कसे पहायचे हे शिकवले. त्यामुळे ते कसे होते यात रस नाही. रस्त्याने जाणारा मनुष्य सुद्धा काही न काही शिकवतो. रजनीशांचा स्वतःचा दर्शनशास्त्राचा अभ्यास होता. त्यातला कमर्शिअल भाग वगळला तर काय घ्यायचे , काय नाही, आपला पिंड काय , आपल्याला काय मानवते हे समजण्यासाठी रजनीश दिशा देतात. असा एखादा गुरू असल्याशिवाय दर्शनाकडे पाहता येत नाही.

येऊ दे अजून....
पुढे इथे कशा प्रकारचे प्रतिसाद येतात ते पाहून माझी मतं देईन.

छान माहिती, जड अजिबात वाटला नाही लेख.
समजलाय असं म्हणता येणार नाही मला कारण ह्या गोष्टी वाचताना प्रत्येक वेळी वेगळा अर्थ उमजतो Happy

अध्यात्म हा माझा पिंड नाही. पण जे लिहिलयस छान लिहिलय, आणि विचारांना चालना देणारं आहे. व्हिडिओ नक्की बघेन.
आचार्य प्रतिसाद आवडला. चार्वाकाबद्दल माबो वरतीच कुठे तरी प्रतिसाद लिहिलेला.
रजनिशांबद्दलच मत पटलच. सर्वच विचारवंत नवीन काही मार्ग दाखवत रहातात. आपल्याला कोणता पटतो, पचतो त्यानुरुप आपला पिंड बनत जातो.
अस्मिता तुझ्या लिखाणातून असे वेगवेगळे दृष्टिकोन मांडत असतेस ते आवडतं. सामोही छान लिहिते.
मी वाचते पण प्रतिसाद देण्याइतकी अध्यात्मिक समज नाही. सो हाही प्रतिसाद केवळ वाचलं, आवडलं इतपतच घे.
धन्यवाद, लिहित रहा.

लेख स्वप्रतिभेने फार मस्त पेलला आहेस. किती अवघड विषय आहे हा.
---------------------------
अवांतर -
एका सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ऐकलेले वाक्य -
सिद्धांत - एकाच वेळी, अवकाशातील एकाच बिंदूस , दोन एन्टिटी व्यापू शकत नाही.
हे जर खरे असेल तर -
(१) अगदी जड पातळीवरती, भूत माणसाला झपाटू शकणार नाही कारण त्याकरता दोघांनाही एकाच वेळी एकच शरीर धारण करावे लागेल.
(२) उच्च पातळीवरती - देव हा सर्वव्यापी आहे म्हणजे देव व आपण एकाच वेळी ,एकच अवकाश व्यापतो. पण वरी सिद्धांतानुसार, तसे शक्य नाही. म्हणजे आपणच देव आहोत, सारे चराचर देव आहे. कारण तसे झाले तरच ईश्वर सर्वव्यापी होइल.

फ्रॅक्टलस्शी ओळख एका लेखातून, पहील्यांदा तूच करुन दिलीस. काय अजब चीज आहे ना ही फ्रॅक्टल्स. किती भन्नाट आहे. किती सुंदर आहे. अगदी परफेक्ट.

एक अध्यात्माच्या मार्गावर चालणारे साधक होते .. त्यांनी बऱ्याच वर्षाच्या साधनेनंतर त्यांना 3 दिवस अनाहत नादाचा अनुभव आला असं एके ठिकाणी म्हटलं आहे . त्यांच्या बोलण्याच्या प्रामाणिक पणाबद्दल अजिबात शंका नाही पण त्यावेळी त्यांचं वयही बरंच होतं , त्या दिवसात ते आजारीही होते त्यामुळे नाद यावा ह्या इच्छेतून झालेला तो भास कशावरून नाही अशी शंका येते ..

दुसरीकडे एके ठिकाणी त्यांनी कबरींजवळ धूसर आकार / ज्योती दिसायला सुरुवात झाली होती आणि हे काय दिसतं आहे असं एका ज्येष्ठ साधकाला विचारल्यावर त्याने दहन न करता पुरल्यामुळे देहाला चिकटून राहतात , त्यांना पुढे जाणं कठीण जातं एवढं त्रोटक उत्तर दिलं आणि विषय संपवला . हे ह्यांच्याऐवजी दुसऱ्या कुणीही सांगितलं असतं तरी विश्वास ठेवला नसता पण माणूस खोटं बोलणारा नाही ह्याची खात्री असल्यामुळे हादरायला झालं थोडं .. म्हणजे वरवर आत्मा , देव सगळा विश्वास असला तरी आत कोणी खरं बघितलं आहे , पुरावा काय आहे , माणसाने रचलेली भव्य कथा कल्पना कशावरून नाही अशी शंकाही एके बाजूला होती , अजूनही आहे .. त्या कल्पनेला एक हादरा बसला .

एकदा वाचून कळण्यासारखा विषय नाही इतकंच मला पहिल्या वाचनात कळलं आहे. Happy
पुन्हा नक्की वाचेन, माहितीपटही पाहीन.

तरीही काही वाक्यांपाशी खिळले.

>>> आय थिंक, देअरफोर 'आय' अ‍ॅम. - 'मी'पणाचीच व्याख्या! मी विचार करतो असा मी जोवर विचार करतो तोवर माझा मीपणा जाणार नाही! Happy
>>> आपण आपल्या सोयीसाठी त्याला पटकन नाव देऊन व्याख्येत अडकवतो.
व्हेन यू डिफाइन समथिंग, यू ऑल्सो कन्फाइन इट - हे कुठेशी वाचलेलं पटकन आठवलं.
>>> 'जब कहीं पे कुछभी नहीं था, वही था वही था'
होय, त्यावरून हा गा़लिबचा शेरही आठवला:
न कुछ था तो खु़दा था, कुछ न होता तो खु़दा होता
डुबोया मुझ को होने ने, न होता मैं तो क्या होता?!

व्हेन यू डिफाइन समथिंग, यू ऑल्सो कन्फाइन इट - हे कुठेशी वाचलेलं पटकन आठवलं.
>>> Happy If you name me, you negate me. By giving me a name, a label, you negate all the other things I could possibly be.”
— Søren Kierkegaard.
(Danish philosopher )

तोवर माझा मीपणा जाणार नाही! >>> मी तर म्हणेन नका जाईना मीपणा, निराकाराच्या शक्यतेचा विचार सुद्धा केलेला नाही. माझ्यादृष्टीने एखादी गोष्ट आपल्याला झेपत नसेल तर ठीक आहे पण तिथंच ती संपत असेल असं मला मानता येत नाही. हे मला मागेच चर्चेत नोंदवायचं नव्हतं पण सविस्तर मांडून पटवायचं होतं. Happy

याच ओढीतून जगात तत्त्वज्ञानं निर्माण झाली. भारतात त्याला दर्शने म्हणतात. ती सात आहेत. यापैकी दोन दर्शने नास्तिक आहेत. बौद्ध आणि चार्वाकाचे दर्शन नास्तिक समजले जाते. ज्यात आत्मा आणि देव यांचे अस्तित्व नाकारले जाते त्याला रूढ अर्थाने नास्तिक म्हटले जाते. नास्तिकाचे अर्थ खोलात वेगवेगळे आहेत.
>>>> अनुमोदन. हे लेख लिहिताना मला अजिबात आठवलं नाही. बाकीचा प्रतिसादही पटला - आवडला. धन्यवाद. Happy

झकासराव, फार छान लिंक दिली आहे तुम्ही. वरवर वाचून
सृष्टी से पहले सत्य नहीं था,
असत्य भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं,
आकाश भीं नहीं था
छिपा था क्या कहाँ,
किसने देखा था
उस पल तो अगम,
अटल जल भी कहाँ था

भारत एक खोजचे शीर्षक गीत आठवलं. Happy

मी म्हणजे फकत स्मृती आहेत. जगातील सर्व दर्शने शब्दांचा फाफट पसारा आहेत. जी गोष्ट इंद्रियातीत आहे त्याचे वर्णन कसे करणार.
ते नित्य नूतन आहे.

व्हिडिओ बघितला. तो आतला आवाज, वैश्विक आवाज, नादब्रह्म, गंधार, नटराज, शिव शक्ती, यिनयांग ऐकलं. पुढे काय? मारो सू?
तोच आवाज माझ्यात आहे, तीच स्पंदने मला आणि विश्वाला सतत बदलवत आहेत ... नव्या फ्रॅक्टलचा शोध लागला चिकटव, हिग्ज बोसॉन आणखी एक मणी ओव, आणि थेट उपनिषदांपर्यंत तो मणी मागे ओढ.

कांव्होल्युटेड आणि गोलगोल फ्रॅक्टल सारखं डोकं झालंय. माफ करा, पण हे सगळं असं आहे हे भरल्यापोटी समजलं तरी पुढे काय हा प्रश्न उरतोच. उत्तर कर्मफल, कंपन, धारण केलेले सतत बदलणारे आकार इ. असेल आणि पुढचा शोध लागल्यावर मागची मण्यांची धूसर माळ हळूहळू स्पष्ट होणार असेल तर आपण आपलं रोज सकाळी आरशात बघून 'अहम् ब्रहमास्मी' म्हणावं आणि कामाला लागावं.

अमित, you made it sound so mundane just to prove your point.
पोट भरल्यावर आपण जे निवडतो तीच आपली ओळख असते, नाही तर मग 'मनुष्यप्राणीच' आपण. सगळे सिनेमे, सगळी पुस्तकं, सगळ्या कला ह्या पोट भरल्यानंतरच्याच, ऑपनहायमर बघतो तसं हेही. कुणाला तरी गरगरल्यासारखं होईल म्हणून मी स्वतःला कायम एका साच्यात बांधून टाकण्यापेक्षा इतरांनी आपापले तारतम्य बाळगून वाचावे/बघावे.

लेख वाचायला मला आवडलाच, पण अध्यात्मिक लेख वाचून जो प्रश्न नेहेमी पडतो तसेच झाले.
असं वैश्विक ज्ञान काही असतं का मानवाला होणारे ज्ञान हे कांद्याच्या पापुद्र्यांसारखे लेअर्ड अनेक थर असलेलं असं असतं? एक उलगडला की दुसरा. एका काळातील माणसांनी.. हो माणसांनी .. ते समजावून सांगायला इंद्र ब्रह्मा मॉडेल वापरलं, एका काळातील माणसांनी आणखी खालचे थर दिसल्यावर पर्टिकल मॉडेल वापरलं. उद्या कोणी आणखी वापरेल. यात कालपरत्त्वे काही साम्यस्थळे असल्याने रेघ मागे खेचायचा मोह होणार, यात गैर नाही की चूक नाही. तू म्हणतेस तसं तारतम्य ठेवून विचार करावा.

दर्शनं ही शब्दांचा फाफटपसारा >> अनेकदा वाटतं असं. दर्शने निर्माण झाली तेव्हां जे काही आजूबाजूला आहे त्याचे यम नियम समजावून घेणारी आणि सांगणारी , शब्दबद्ध करू शकणारी व्यक्तिमत्वे होती त्यांच्या आकलनानुसार त्यांनी केलं. त्या वेळी अन्य अनेकांनाही ते सुचले असेल.कदाचित त्यांना तेव्हढी प्रतिष्ठा नसेल.

त्या वेळी जेव्हां फक्त तेलाचे दिवे असतील, रात्री आकाशगंगा तेजस्वी दिसत असेल. तार्‍यांचे स्फोट डोळ्याने दिसत असतील. अजून वीस वर्षांनी आपण आकाशगंगा पाहू शकणार नाही. भाfunction at() { [native code] }आत सात ठिकाणे आहेत जिथून आकाशगंगा डोळ्यांनी दिसते. लडाख मधून स्वच्छ दिसते. राजस्थानातून दिसते. इशान्येकडच्या राज्यातून दिसते. युरोपिअन देशात दिसत नाही. अमेरिकेत एकदा दिवे गेले होते तेव्हां १९७४ साली आकाशगंगा पाहून पोलिसांना फोन गेले होते.युएफओ असावे असा संशय होता.

लाईट पोल्युशन, डिफ्युजन्,एअर पोल्युशन यामुळे विकसित भागात दिसत नाही. पुढील वीस वर्षात स्क्रीन टाईम वाढल्याने पोल्यूशन कमी केले तरी दूरची नजर कमी झाल्याने ती दिसणार नाही.

अशात ज्या वेळी आजच्या इतका वैज्ञानिक दृष्टीकोण प्रगत झालेला नव्हता तेव्हां जेव्हां अवकाश स्वच्छ डोळ्यांनी पाहताना त्या वेळी त्याचे आकलन कसे झाले असेल ? पूर्वी विज्ञान नावाची शाखा अस्तित्वात नव्हती. जे काही होते ते तत्त्वज्ञानच होते आणि ते अध्यात्माशी निगडीत होते. त्या वेळचे तत्त्वज्ञान आता आपल्याला भुरळ पाडते.

नादब्रह्म हे कानाला कसे असेल ? मानवी असेल का ? विश्न मुके आहे का ? हे सगळे म्युट मोड वर चाललेय का ?
नेप्च्युनजवळ अवकाशात रेकॉर्ड केलेला विश्वाचा आवाज
https://www.youtube.com/watch?v=MuODoF16Cck&list=RDQMvNaCeuSefLs&start_r...

साउंड ऑफ युनिव्हर्स नावाचे अनेक व्हिडीओज आहेत. त्यांचा सोर्स समजत नाही.

https://www.youtube.com/watch?v=n-fDXTagIAk
यातले स्पष्टीकरण थोडे समजले.

बुद्धाने उत्तरादाखल मौन धारण केले. कारण कुठलंही उत्तर दिलं असतं तरी ते चुकीचंच ठरलं असतं. >> हे वाचताना श्रोडींगरस् कॅट आठवली.

कुन फाया कून - आणि नासदीय सूक्त सुरुवात सारखी आहे.

जब कही पे कुछ नहीं भी नहीं था, वही था वही था

नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नोव्योमा परोयत्।
सृष्टी से पहले सत् नहीं था, असत् भी नहीं, अंतरीक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था. (इथे भारत एक खोज चं संगीत डोक्यात वाजायला लागतं - yes, I can indeed hear that music Wink ).

एक झपकी घेऊन तो ताजातवाना झाला.
किती वेळ झाला ? त्याला गंमत वाटली. खर तर वेळ आणि वाटणे हे नवीनच तो शिकला होता.
कुठल्याही गोष्टीचं काहीही वाटणे हे नवीन होते. वेळ सुद्धा नवीनच होती.
त्याने एक डुलकी घेतली होती.
आता कंटाळा घालवायला (?)
कंटाळा हे काय नवीनच ?
मग वेळ (?) घालवायला ?
तो तरंगत एका ठिकाणाहीन दुसरीकडे आला.
थोड्या "वेळापूर्वी " त्याला "अंतर"म्हणतात असे समजले होते.
त्याला गंमत "वाटली".
अंतर , वेळ, गंमत वाटणे हे त्याला कसे काहीच माहिती नव्हते ?
त्याने त्याचा नेहमीचा खेळ खेळायला सुरूवात केली.

त्याने सक्शन पॉइण्ट्स मधे लेझर रेज सोडून पाहिले. बरंच काही ओढून घेतलेलं होतं.
त्या दोन्ही भुजा फैलावल्या.
दोन्ही ?
छे ! अनंत भुजा !
त्याने सगळा पसारा गोळा करायला सुरूवात केली.
त्याला लागलेल्या ड्डुलकीच्या काळात सक्शन पॉईण्ट्स मधे बरंचसं गोळा झालेलं होतं.
कुणीतरी त्याला ब्लॅकहोल म्हटलेलं होतं.
तो"हसला".

हसणे नवीन होते.
हा खेळ सुंदर होता. नवीन काही समजत होते.
त्याने सगळंच एकत्र केलं.
मग अनंत भुजांनी ते एकत्र केलं.
त्याला "आठवले".
एक महिला डिंकाचा लाडू वळत होती.
त्याने धूळ, दगड्,गोल, सक्शन पॉइण्टस, दिवे, प्रकाश, अंधार सगळं डिंकाच्या लाडूसारखे वळायला सुरूवात केली.
"अरे थांब थांब, हे एकत्र करू नकोस"
त्याची आई म्हणाली.

आई ?
आपल्याला कुठून ही संज्ञा समजली ?
आपली कुणी आई नाही. आपले कुणी वडील नाहीत. आपल्याला मूल बाळ नाही.
हे ही नव्यानेच समजलेले.

कितीतरी दाब टाकून त्याने एक छोटी गोळी बनवली. ती आणखी छोटी आणखी छोटी केली.
त्याची आई म्हणत होती,थांब थांब
ते काय म्हणत होते ? सिंग्युलॅरिटी ?
आता ही गोळी यापेक्षा छोटी होणार नाही.
तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे ?

केव्हढा तरी मोठा स्फोट झाला.
महाप्रचंड.
केव्हढी तरी उर्जा बाहेर पडली.
केव्हढा तरी प्रकाश बाहेर पडला.
तो सुद्धा फेकला गेला.

त्याने एक गिरकी घेतली. पुन्हा खेळ सुरू झाला.
त्याने आजूबाजूला पाहिले.
दूरवर त्याच्या सारखाच कुणी त्याचे विश्व आवरत होता.
त्याची गोळी बनवत होता.
पण याला जे सुचले होते ते कुणालाच नाही.

पापणी लवायच्या आत त्यातून द्रव्य वाहेर पडले.
काही तारे झाले, ग्रह झाले, क्वासार, गॅलेक्सीज बनल्या.
पुन्हा पापणी लवायच्या आत काही तारे त्याने दाबले. तिथे सक्शन पॉइण्ट्स बनवून ठेवले.
त्या भोवती गॅलेक्सीज फिरू लागल्या.

पण त्याचे लक्ष त्या निळ्या ग्रहावर जास्त होते.
गेल्या वेळी त्यांनी पापणी लवायच्या वेळेला मोजले.
१.४ बिलीयन कोटी प्रकाशवर्षे.
आणि प्रकाशाचा वेग सुद्धा मोजला.

हे त्यांच्या डोक्यात कसे चालते ?
आपन तर फक्त बलाबल बनवले.
हे कुठून आले ? त्यांनी वेळ मोजली, अंतर मोजले.
त्यांचा विचार त्याने आत्मसात केला.
मग त्याने त्यांच्यात मेल फिमेल वर्गीकरण केले.
मल्टीप्लिकेशन केले.
विचार करू शकणार्‍यांचे मल्टीपिलिकेशन
एकटे वाटू नये म्हणून विचार न करू शकणारे जीव सुद्धा होते.
त्यांचेही मल्टीप्लिकेशन केले.

या वेळी खेळात त्याने थोडा फरक केला.
मेल फिमेल खेळाचा आता कंटाळा आला होता.
त्याने उभयलिंगी बनवले.
पुनरूत्पादनासाठी लिंग बदलणारे पण एकसमान शक्ती असलेले जीव,

त्यांच्या शाळेतला वर्ग तो ऐकत होता.
शिक्षक जीवशास्त्र शिकवत होते.
" जेव्हां मूल जन्माला घालायचे असते तेव्हां काही जण स्त्री बनतात काही जण पुरूष "

आता यांच्यात स्पर्धा सुरू होईल.
यांना अपत्ये होतील. मग मालकी हक्क गाजवण्यासाठी स्पर्धा सुरू होईल.
ते हा ग्रह खणून काढतील. प्रगत हत्यारे बनतील.
कळून सुद्धा ते वर्चस्वासाठी ग्रह ओरबाडून काढतील.
वातावरण नष्ट होऊ लागेल.
एक ठिणगी पडले. संरक्षक कवच नष्ट होईल.
मग हा ग्रह कापसासारखा जळू लागेल.
त्याचा वेग मंदावेल, त्याच्या मुळे आजूबाजूच्या वेगावर परिणाम होईल...

आपला खेळ बिघडेल
आणि पुन्हा डुलकी लागेल.
तेव्हां हे सगळे सक्शन पॉईंट्स मधे गडप झालेले असेल.
पुन्हा त्यांनी त्याचे नाव ब्लॅकहोल केलेले होते.

ते कसा काय विचार करतात ?
या विचाराने तो पुन्हा "हसला"

त्याने दूर पाहिले.
तो मघाशी जिथे होता.
तिथे आता तो दुसरा होता. त्याने त्याचा खेळ आरंभला होता.

आदि मी अनंत मी

( भरपूर पकवून झाले. आता थांबतो Lol )

एकदम फ्रॅक्टल लेख आहे. थोडा समजणारा आणि थोडासा गूढ. ते गुढ समजून घेण्याकरता पुन्हा वाचावा तर नवीन काही दाखवणारा!

या जगात जे आहे, जे चालू आहे त्याच्या मागे दोन शक्यता असू शकतात - सर्वांमागे काही कार्यकारणभाव आहे (ही झाली आस्तिकता, वेद हेच सांगतात) किंवा सगळं रँडमली घडलं / घडतं आहे (ही झाली नास्तिकता). आश्चिगने या रँडमली घडण्यावर एक सुंदर लेख लिहिला होता माबोवर. बौद्धमत नास्तिक म्हणावं तर त्यात पुनर्जन्म आहे. म्हणजे एका जन्मातल्या कर्माने पुढचा जन्म मिळतो हा कार्यकारणभाव आहे.

अवकाश(ether?) ही अशी पोकळी आहे की ज्यात पंचमहाभूतांचे अधिष्ठान झाल्यावर >>> पंचमहाभूतातले एक अवकाश आहे. अवकाश म्हणजे टाईम आणि स्पेस यांनी बनलेला "फरक". चलाच्या अविश्कारासाठी फरक अत्यावश्यक असतो. अगदी थोडक्यात एखादी वस्तू चालते हा काळ आणि अंतर यातला फरक असतो.

आचार्य, सात दर्शने कोणती ? सामान्यपणे सहा आस्तिक दर्शने आहेत - सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, मिमांसा (पूर्वमिमांसा), वेदांत (उत्तरमिमांसा) . तुम्ही सांगितलेली २ नास्तिक दर्शने मिळवली तर आठ होतील.

अमित, पोट भरण्याबरोबरच आपल्याला आनंद पण हवाच असतो. पोट भरण्याशिवाय आपण जिवंत राहू शकणार नाही तर आनंदाशिवाय जगण्याला अर्थ असणार नाही. आपल्या जीवनात आनंद येत-जात असतो. पण जर आपली पातळी बदलली तर कदाचीत तो आनंद कायमचा टिकेल. एक उदाहरण म्हणजे एक माणूस उकिरड्यात बसला आहे. त्याला भोवती कचराच दिसतोय. पण जेंव्हा तो माणूस दहा मजली इमारतीच्या गच्चीवर जाईल तेंव्हा त्याला उकिरड्याच्या बाजूला असलेली बागही दिसेल. तोच माणूस जेंव्हा चंद्रावर जाईल तेंव्हा त्याला एक सुंदर निळा ग्रह दिसेल, तो उकिरडा दिसणारही नाही. (रच्याकने आपले जगणे म्हणजे उकिरडा असे मला जराही म्हणायचे नाहीये Wink ) आता या उदाहरणाची अ‍ॅनॉलॉजी - मी मेल्यानंतरही माझ्यातले कण तसेच राहतील. त्यांच्यापसून दुसरा जीव बनेल नाहीतर काही वस्तू बनेल. हे जेंव्हा मला "आकळेल" तेंव्हा माझी मरणाची भीती जाईल, मी जास्त आनंदी राहीन. आजही माझ्या बुद्धीला ते माहीत आहे - म्हणून मला ते "कळलं" आहे पण "आकळलं" नाहीये. ते आकळण्याकरता अध्यात्म ! ते आकळून घ्यायलाच पाहिजे असा अट्टाहास नाहीच.

हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद, अस्मिता !

माधवजी
भारतॉय तत्त्वज्ञानात
१) वैदिक दर्शन आणि
२) अवैदिक दर्शन
असे दोन प्रकार आहेत.

सहा वैदिक दर्शनांमधे चार्वाक हे नास्तिक दर्शन आहे.
अवैदिक दर्शनांमधे बौद्ध हे नास्तिक दर्शन आहे. प्रतिसाद ओघात दिला गेल्याने एव्हढी अचूकता पाळलेली नाही.
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5...

छान लेख आणि प्रतिक्रिया!
माणसाने पोट भरल्यावर काय करावं यासाठी भारतीय अध्यात्म सर्वोत्तम मार्ग सुचवतं. As Harari says, money or religion are the fictions that worked. Similarly, भारतीय आध्यात्मिक विचार हे अतिशय अवघड पण महत्त्वाचे fiction आहे. जर जगातील सर्वांनी त्याचे पालन केले तर जगाचे खरोखरच कल्याण होईल. पण असे होणार नाही कारण ही धारणा सोपी नाही आजिबातच.

सर्वांनी लेखातील विषयाच्या अनुषंगानेच लिहावे ही विनंती.

हर्पा, अनिंद्य, जिज्ञासा, माधव आणि आचार्य मनापासून आभार.
जि, मला वाटलंच तू वाचणार. Happy
दुपारी पुन्हा एकदा निवांत वाचेन मग प्रतिक्रिया देईन. Happy

खूपच सुंदर.
समजलेच असे काही नाही. प्रयत्न करीन समजून घ्यायचा.

( हल्ली प्रतिसाद द्यायची भीती वाटते. लगेच अपूर्ण लिखाण वरती येते)

नेहमीप्रमाणेच 'अस्मिता'टच लेख आहे. काही पुस्तके/लेख वाचताना माझी आई मला सांगायची "हे नुसते वाचू नको, जिरवून वाच". म्हणजे, अनेकदा वाचून त्यावर चिंतन मनन करावे लागते तेंव्हाच ते लिखाण कळते. हा किंवा असे लेख हे जिरवून वाचावे लागतात. 'अवकाशाशी जडले नाते' हा जसा अवकाश आणि पुंजभौतिकीच्या अनुषंगाने गप्पांचा धागा आहे, तसाच अध्यात्मिक गप्पांसाठीचा एक धागा सुरु करावा असे सुचवायचे बरेच दिवस मनात होते. तोवर योगायोगाने अनायासे हा धागा आलाच.

>> ऊर्जेने सगळ्या दृष्यादृष्याला जोडले आहे. हे तेच 'नादब्रह्म' आहे, जे सर्व आध्यात्मिक अनुभवाच्या मूळाशी आहे. ज्या नादब्रह्माच्या लहरींवर हे ब्रह्मांड श्वास घेते, तोच प्रत्येक धर्माचा कणा आहे.

हे वाक्य या लेखाचा सार आहे असे म्हणता येईल. परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दलचे बुद्धांचे मौन आणि Fractal च्या उदाहरणातून स्पष्ट केलेली नादब्रह्माची कल्पना, लेखातील या दोन्ही गोष्टी वरील वाक्याभोवती फिरतात.अद्वैत हि कल्पना किंवा "अहं ब्रह्मास्मि" म्हणजे आत्मा आणि ब्रह्म एकच आणि एकमेकांत आहे (नादब्रह्माच्या कालातीत उर्जेने जोडले गेलेले) . म्हणूनच Fractal चे उदाहरण चपखल आहे. ज्या माहितीपटाचा तुम्ही संदर्भ दिला आहे तो सुद्धा संपूर्णपणे पाहिला. प्रभावी आहे. त्याचा शेवट खूप सुंदर आहे. लेख खूपच गहन व अंतर्मुख करणारा झाला आहे. लेखावरील प्रतिसाद सुद्धा माहितीपूर्ण व चिंतनीय आहेत.

सर्वकाही सहमत. पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. अध्यात्मिक अनुभूती ही प्रज्ञेच्या प्रांतात येते. तर विज्ञानाचे निष्कर्ष हे तर्काच्या प्रांगणात येतात. र.आ. यांनी लिहिल्यानुसार प्राचीन काळात तत्त्वाचे ज्ञानग्रहण विविध प्रकारे केले गेले. त्याला दर्शनशास्त्र म्हणतात. त्यामध्ये प्रज्ञामूलक आणि तर्कमूलक अशा दोन धारणा आहेत. दोन्हीही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ व तितक्याच उपयुक्त आहेत. पण त्यांच्या वाटा (approach) परस्परभिन्न आहेत. त्यांच्यातील साधर्म्य पहायचा/सांधायचा प्रयत्न अनेकदा अनेकांकडून केला जातो. पण तो निष्कारण वाटतो.

प्रज्ञामूलक (instuitionistic)
नादब्रह्मा हि अनुभूती आहे. लेखात लिहिल्यानुसार ती नाव देऊन अथवा शब्दात मांडून कळणार नाही. कारण ती अनुभूती प्रज्ञेच्या प्रांतात येते. अध्यात्म या शब्दातच सर्वकाही आहे. जे विश्व आपल्याला जाणवते आहे आणि ज्या अंतर्गत चैतन्यास ते जाणवते तेच चैतन्य चराचरांत आहे (एक तत्व). आपले शरीर,मन, स्मृती, इंद्रिये यांच्यापासून अलिप्त असलेल्या त्या चैतन्याची अनुभूती जितकी अधिक तितके अस्तित्व कळत जाते. सुकर होते. म्हणूनच परमात्मा बाहेर कुठे नसून आपल्यातच आहे आणि तो त्या विश्वव्यापी अशा एकाच नादब्रह्माशी तादात्म्य पावलेला आहे याचा साक्षात्कार ज्यांना होतो ते enlightned होतात. ओशो उल्लेख करतात त्यानुसार त्या अवस्थेत जन्म/मृत्यू, मिलन/ विरह, प्रेम/तिरस्कार, तृप्ती/भूक, आसक्ती/विरक्ती, आपले/परके या साऱ्याकडे एकाच दृष्टीने पाहण्याची पोहोच येते. समतोल साधला जातो. नादब्रह्म समजणे ते हेच. Yes, they can hear the music Happy

तर्कमूलक (rationalistic)
आईनस्टाईन आणि समकालीन भौतिकशास्त्रज्ञांनी पुंजभौतिकीमधील मूलकणांची एक सारणी बनवली. कण आणि तरंग यांच्या द्विधेत शेकडो वर्षे अडकून पडलेल्या पुंजभौतिकीला गणिताच्या माधमातून वाट मिळवून दिली. त्यातून Standard Model तयार झाले. रसायनशास्त्रातील आवर्तसारणीमध्ये जशी माहित असलेली मूलद्रव्ये आधी टाकली आणि नंतर तेच extrapolate करून माहित नसलेली मूलद्रव्ये "अशी असायला हवीत" अशी अनुमाने बांधून त्यानुसार ती नंतरच्या काळात ती शोधली, तोच प्रकार इथे झाला. आधी विविध क्षेत्रे आणि त्याशी संबंधित असलेले कण मांडले गेले. पण वस्तुमान मिळवून देणारे कण हाताला लागेनात. म्हणून वैतागून "God damn particles!" असे नाव दिले. तेच पुढे God's Particle म्हणून ओळखले गेले. बर, केवळ या कणांमुळे वस्तुमान प्राप्त होते असेही नाही हे सुद्धा इथे नमूद केले पाहिजे. कारण माध्यमांतून बरीच विपर्यस्त माहिती येते. हे कण फक्त काही प्रमाणात कारणीभूत आहेत. त्या पातळीवर जे कण असतात ते मुळात कण नसतातच. लहरी असतात. त्या लहरी दोन प्रकारच्या असतात. त्यांच्या अंतर्भूत गुणधर्मांमुळे त्यांचे पुढे वस्तूकण व प्रकाशकण बनतात. हे सगळे गणितातील Spin Statistic Theorm नुसार घडते. तर्कसंगत आहे. अनुभूती नव्हे. याच्या आधारे आजवर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. काही अद्याप व्हायच्या आहेत (जसे कि Dark Matter, Dark Energy इत्यादी) पण येणाऱ्या काळात त्यांची सुद्धा उकल होईल. पण थोडक्यात काय? तर सर्व जड विश्वाच्या मुळाशी एकच एक प्रकारचे तरंग आहेत हि थियरी वैज्ञानिकानी सिद्ध केली आहे. Yes, they can hear the music Happy

पण म्हणून वरील दोघांना एकच तत्व सापडले म्हणण्याची घाई करणे योग्य नव्हे. कारण त्या दिशा वेगळ्या आहेत, ते realms वेगळे आहेत, त्या धारणा वेगळ्या आहेत, त्यांच्या वाटा वेगवेगळ्या आहेत. जरी त्यांची findings कदाचित एकच असतीलही. तरीही अजून कोणत्याच तत्वानुसार ते सिद्ध झालेले नाही. ओशो त्यांच्या प्रवचनांतून तर्कमूलक धारणेचे पुरस्कर्ते दिसून येतात. बुद्धांचे विचार त्यांनी अनेकदा उर्धृत केले आहेत. पण त्यांची तर्कमूलकता हि प्रज्ञामूलक सिद्धांतांना आधार देण्यापुरती आहे. सर्वच धर्मातील तर्कविसंगत बाबींना त्यांनी यथेच्छ झोडपले आहे. पण ते सुद्धा कधी कधी "अणुभोवती इलेक्ट्रोन फिरतो" अशासारख्या विधानांचा विपर्यास करून भलतेच निष्कर्ष काढतात तेंव्हा महदाश्चर्य वाटते.

असो. प्रतिसाद लिहिता लिहिता बरेच लिहित गेलो. आता थांबतो. विचारमंथन करायला लावणारा एक उत्कृष्ट लेख लिहिलात Happy

function at() { [native code] }उल जी
समा बांधलात
__/\__

ज्यांना मराठी समजले नसेल, संस्कृत समजले नसेल त्यांनी घालिब, सुफी इ. साहित्य वाचावे. खरे तर हिंदी सिनेमातूनहि खूप काही काही शिकायला मिळते नि समजते. मग कशाला संस्कृत नि वेद, उपनिषदाच्या नादी लागायचे.
कारण आपल्या अध्यात्माचे असे आहे, ज्याला समजले असे वाटते त्याला समजले नसते नि जो समजले नाही असे म्हणतो तोच खरे बोलतो.

बापरे अतुल, निःशब्द.. ! मी सहजासहजी होत नाही आणि निःशब्द. Happy काही तरी रिफ्रेशिंग, सुस्पष्ट आणि तार्किक वाचायला मिळाले. आता मला हे जिरवावं लागणार आहे.

नंद्या+१
मला वाटतं खरोखरच पूर्ण कळलेले जिवंतच रहात नसावेत, कोणत्याही मानवी आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्यांना हे अशक्य आहे. मानवी शरीरात एवढी चेतना मावतच नसावी.

माधव , हो(@अवकाश आणि पंचमहाभूतांचे अधिष्ठान)तिथं गडबड झाली असावी. तोपर्यंत डोक्याचा भुगा झाला होता. तुम्ही 'आनंद' आणि 'आकळणं' छान समजावले आहे.

आचार्य आणि माधव, विस्तृत अभिप्रायांसाठी व चर्चेत भर घालण्यासाठी मनापासून आभार. Happy

धन्यवाद रानभुली. Happy

आचार्य, 'आदि मी अनंत मी' वाचले , छान स्फुट आहे. लिंकही बघितली. दर्शनावरच्या पोस्टीही अद्भुत. बुद्ध मलाही नास्तिक वाटतो, नक्की माहीत नाही पण त्याच्यामते अंतस्थ चेतना हीच ईश्वर असावी.

@ मूकवाचकांसहित सर्वांना,
माझा अध्यात्माचा आणि विज्ञानाचा विशेष अभ्यास नाही पण तुम्ही ज्या विश्वासाने माझ्याशी संवाद साधता आहात- प्रोत्साहन देत आहात-वाचत आहात, त्याबद्दल कृतज्ञ आहे. /\

ते आकळून घ्यायलाच पाहिजे असा अट्टाहास नाहीच.>>> सहमत. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडत याच आयुष्यात समांतरपणे आकळण्याकडे छोटीछोटी पावलं उचलता आली तर आयुष्याला एक पूर्णत्व येईल असंही वाटतं. एरवी आयुष्य आपण फारच तुकड्यातुकड्यांत जगतो ते तुकडे जोडायला काही तरी भरीव हवं असं वाटत राहतं. आपण सगळे कशाचीतरी वाट बघत असतो, असंही सतत वाटायला लागलं आहे आजकाल. Happy

Pages