दखनी चित्रपटांचे वर्गीकरण

Submitted by रघू आचार्य on 1 December, 2023 - 23:54

माफ करा. नमनाला मूठभर तेल न घालता थेट विषयावर येत आहे.

दक्षिणेचे सिनेमे बघताना दोन दशकाच्या आधी लक्षात आलेली गोष्ट म्हणजे त्यांचे साचे आहेत. त्याच साच्यात नायक बदलून गोष्ट सांगतात. पण साचा बदलत नाहीत. यातल्या काही साच्यांबद्दल अजिबात आक्षेप नाही. साच्यातला असूनही काही काही चित्रपट ठसठशीत बनतात. दक्षिणेच्या प्रेक्षकाला साचेबद्ध चित्रपट अंगवळणी पडलेले असतात, त्यामुळं त्याला त्यात वावगं वाटत नाही. तरीही वेगळ्या वाटेवरचे सिनेमे सुद्धा बनतात. त्यातले काही यशस्वीही होतात पण ते आपल्या पर्यंत पोहोचतातच असे नाही.

दोन दशकात दक्षिणेकडच्या चित्रपटातले थुलथुलीत नायक हा प्रकार नव्या पिढीत गायब झाला. थुलथुल्यांचे सिनेमे आजही येतातच. आता तर आपणही सरावलो आहोत.उदा मोहनलाल हा पूर्वीपासून कुठल्याच अँगलने सडपातळ नायक नाही. विजयकांत , चिरंजीवी हे सुटलेले नसले तरी किमान रजनीकांत, नागार्जुन प्रमाणे सडपातळ नाहीत. रजनीकांत ७२ वर्षांचा आणि नागार्जुन ६२ वर्षांचा. एखादे वर्ष वाढले असेल. नवे आलेले सुद्धा आता चाळीशीच्या पुढेच आहेत. पण या पिढीतले नायक फिटनेस बद्दल सजग आहेत , तसे ते वैविध्याबद्दल आग्रही नाहीत. साच्यांचा मोह त्यांना सुद्धा सुटत नाही.

विविध प्रकारचे दक्षिणपंथी साचे

१. भ्रष्टाचार मिटवण्यासाठी हिंसा - हा प्रकार आपण पहिल्यांदा हिंदुस्तानी ( इंडीयन) या कमल हसनच्या चित्रपटात पाहिला. पण त्या आधीपासून हा साचा तिकडे आहेच. अपरिचित नावाचा चित्रपट यातला त्यातला त्यात वेगळा म्हणता येईल. यात नायक जी काही हिंसा करतो ती पाहून भ्रष्टाचार्‍यांची दया येऊ लागते. भीक नको पण कुत्रं आवर या न्यायाने भ्रष्टाचारापासून मुक्ती नको पण तुझा हिंसाचार आवर ही भावना तीव्र होऊ लागते. यातल्या नायकांना एखादी जुनी मार्शल आर्टची विद्या अवगत असते. तसेच ते नेहमीच्या रूपात ओळखू येत नाहीत. कोण हिंसा करतंय हे कळत नाही. पण देशभरात हा जो कुणी अज्ञात व्यक्ती आहे त्याच्याबद्दल क्रेझ निर्माण होते. टीव्ही डिबेट मधे नागरीक एंकरला गप्प करतात. मंत्र्याच्या मागे पब्लीक लागते असे दृश्य दिसते. काही काही चित्रपटात या अज्ञात नायकाचे नाव घेऊन काही स्थानिक तरूण आपापल्या परीने भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा करताना पकडले जातात त्यामुळे पोलीस कन्फ्युज होतात असे वेगळेपण दाखवले जाते. अशा वेळी नायक गर्दीत उभा राहून हसत निघून जातो. अशा थीमवर हिंदीत सुद्धा काही सिनेमे आले होते. एका मधे चार तरूण एका गॅरेज मधे त्यांचं भ्रष्टाचार विरोधी कार्यालय थाटतात आणि तिथून हॅकींग वगैरे सगळं ऑपरेट करून गुन्हे करतात.

२. सायबर क्राईम - हे चित्रपट ज्याला संगणक, इंटरनेटचं काहीच ज्ञान नाही त्याच्यासाठी धक्क्यावर धक्के देणारे असतात. आफ्रिकेतल्या जंगलात राहणार्‍या माणसाला इस्त्रोच्या मोहीमा जशा अचंबित करून टाकणार्‍या वाटतात तसे हे सिनेमे सायबर अडाण्यांसाठी चंबूवासे ( तोंडाचा आ वासणे) ठरतात.

उदाहरण म्हणून किडम नावाचा चित्रपट आहे. नावावरून हा बालचित्रपट वाटला. पण ते इंग्रजीतलं किड नसून कीडा या शब्दाचं दक्षिणीरूप आहे.
यातली नायिका ही बसल्या जागेवरून गुन्हेगारांचे फोन हॅक करून ते काय गुन्हा करणार आहेत हे पोलिसांना सांगत असते. तिने त्यांचे इअरफोन्स सुद्धा हॅक केलेले असतात. फोनचे कॅमेरे हॅक करून ती नियमित स्क्रीनशॉट्स पोलिसांना पाठवत असते.
सिड द हॅकर , मायावन (मायावी), प्रिन्स, की असे काही नमुने आहेत. हिंदीतला मिकी व्हायरस हा याच साच्यातला आहे.

याच प्रकारात वेगळेपण म्हणजे सायबर एक्सपर्ट व्हिलन असणे. यातला व्हिलन हा एकट्या महिलांचे व्हिडीओज हॅक करून मिळवत असतो. त्यांचे सीक्रेट्स जाणून घेऊन त्यांना ब्लॅकमेल करत असतो. त्याला ट्रेस करणार्‍या पोलीस अधिकार्‍याच्या बायकोलाही तो ब्लॅक मेल करतो. हा चित्रपट वेगळा ठरण्याचे कारण म्हणजे सायबर साच्यासोबत यात आणखी एक साचा वापरला आहे. त्याबद्दल पुढच्या पॅरात बोलू.
डिजिटल थिफ https://www.youtube.com/watch?v=L-w06wCBOEc&t=653s

३. अब्बास मस्तान ठिक्कर साचा - धक्क्यावर धक्के देणे ही अब्बास मस्तान यांची शैली आहे. पण अब्बास मस्तान सुद्धा शरमेने काळे ठिक्कर पडतील असा धक्क्यांचा साचा दक्षिणेत आहे. यात इंटर्व्हलपर्यंत चित्रपट एका लयीत घडत राहतो. त्यात नायक नायिकेला पटवण्याचे चॅलेंज वगैरे देतो. तीन तासात तू पटशील असा मनोवैज्ञानिक दबाव आणतो. जसे विंबल्डन मधे जॉन मॅकेन्रो हा समोरच्याला तू हरणार आहेस असे डोळ्यात डोळे घालून सांगायचा त्यामुळे कच्चा मानसिक पाया असलेला खेळाडू त्याच्या या दबावाला बळी पडून पराभूत मानसिकतेचा शिकार होई. अगदी तशाच पद्धतीने नायिकेला आता तीन तासानंतर आपलं काही खरं नाही. आपण पटणारच आहोत तर जास्त विरोधात का जा म्हणून चंबळेच्या डाकूंप्रमाणे आत्मसमर्पण करते.

इतक्यात संकटांची मालिका सुरू होते आणि तिला नायकाचे अमानवी स्वरूप दिसून येते. यात कधी कधी नायिका, नायकाचे वडील, भाऊ, आई ( ज्या कॅरेक्टरला चित्रपटात जास्त महत्व असेल ते) किंवा नायकाचा परममित्र हे आगीच्या खाईत सापडतात आणि ते मेले म्हणून जाहीर होते. पण शेवटी धक्के उलगडत जाताना मध्यांतराच्या आधी जी कार खाईत पडली तिच्यातून संबंधिताला एक तर नायकाने आधीच ओढून काढलेले असते किंवा त्या व्यक्तीने उडी मारलेली असते. ही खेळी नायकाने खलनायकापासून त्या व्यक्तीला सेफ ठेवून हिंसाचार करण्यासाठी केलेली असते. वरच्या पॅरामधला सिनेमा हा असाच आहे. त्यातला पोलीस अधिकारी हा सायबर क्रिमिनलला गंडवण्यासाठी बायको (गफ्रे) ला नाटक करायला सांगतो आणि तो सापळ्यात अडकतो.

हे धक्के अनेक प्रकारचे असतात ज्याचा उलगडण्याचा साचा ठरलेला असतो. मध्यांतराच्या आसपास कलाटणी मिळते तेव्हां अनेक गोष्टी प्रेक्षकांपासून दडवून ठेवल्या जातात आणि शेवटी "कस्सं फसवलं, अश्शं नव्हतंच मुळ्ळी, ए ए फसला " छापाचा रहस्यभेद असतो. त्यासाठी फ्लॅशबॅक तंत्राचा अजीर्ण होईल असा वापर केला जातो. इतका कि आपल्या कानात मागे उभा फ्लॅशबॅक, पुढे उभा फ्लॅशबॅक हे गाणे वाजू लागते.

कहानी हा हिंदी सिनेमा अशाच कलाटण्यांमुळे गाजला पण त्यातलं रहस्यभेदन उच्च कोटीचं होतं ज्याच्या जवळपास सुद्धा हे दक्षिणी सिनेमे जाऊ शकत नाहीत.

४. लार्जर दॅन लाईफ नायक - मुख्यत्वे रजनीकांतचे सिनेमे या प्रकारचे असतात. अशा सिनेम्यांची कथा कशीही कुठूनही कुठेही जाते. तिचा उद्देश एकच नायक हा साक्षात देवाचा अवतार असून कधी कधी देव सुद्धा रजनीदर्शनाला येत असावेत अशी शंका निर्माण करणे.

उदा लिंगा या चित्रपटात रजनी चोर असतो. पण एका गावात राजवाड्यात चोरी करायला आल्यावर त्याला सुपरनॅचरल पावर मुळे त्या राजवाड्याशी कनेक्शन असल्याचे जाणवते. हा सुद्धा दक्षिणेचा टच. मग त्याला लिंगा या राजाबद्द्ल समजते. लिंगा हा राजा असून याला लोकांच्या कल्याणाची कळकळ असते. त्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून तो धरण बांधतो. शाहू महाराजांपासून प्रेरणा घेतलेला एव्हढाच भाग आहे. पण नंतर दरबारातले अस्तनीतले निखारे,फसवून घेतलेल्या सह्या आणि ब्रिटीशांचे कटकारस्थान यामुळे तो कफल्लक होतो. पण त्याची कसलीच तक्रार नसते. तो हसत हसत दुसरीकडे निघून जातो. दारीद्र्यात जगू लागतो. त्याची बायको खानावळ किंवा तत्सम उद्योग करते. त्यातून तो पुन्हा वैभव प्राप्त करतो. तो गरीब झाल्यावर जे जिणे जगतो ते महा मेलोड्रामा सदरात मोडते. एव्हढी संकटे येत असताना नायकाने शांतपणे हसणे हा रजनीचा युएसपी. अशा सीन्सला तमिळ प्रेक्षक कसा ढसाढसा रडतो हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे.

बाबा या चित्रपटात भावाला वाचवण्यासाठी रजनी गुंडांचा मार खातो. गुंड त्याला सळई, मोठा बांबू, मोठा रॉड अशा अनुक्रमे जास्त हाडेमोड करणार्‍या आयुधांचा वापर करून टोले देत असतात. त्या प्रत्येक फटक्याला रजनी हसत असतो. जेव्हढा ताकदीने फटका तेव्हढाच रजनी हसत असतो. इथे नायकाचे महानत्व ठसवले जाते. तो लार्जर दॅन लाईफ आहे हे पटते. मनात आणले तर या गुंडांची चटणी झाली असती पण आपला नायक केवळ भावासाठी मार खातोय म्हणून प्रेक्षक रडू लागतात. बरं नायक पण साक्षात रजनी ! त्याला दुखापत होणे हा तमिळ अस्मितेला हात घालण्याइतकाच ज्वलंत प्रकार ! कधी कधी भीती वाटते कि प्रेक्षक भावनातिरेकाने थेटर तर जाळणार नाहीत ना ?
पण चित्रपटगृह हे दक्षिणेच्या प्रेक्ष्कांना मंदीराप्रमाणे पवित्र असल्याने असे प्रसंग ओढवत नाहीत. तसेच नायक हा दैवतच असल्याने त्याचे ५९०, ६०, १०० फूट होर्डिंग लावणे, त्याला हार घालणे हे प्रकार एमजीआर, एनटीआरच्या काळापासून चालत आलेले आहेत. ते आजही चालूच आहेत.

५. सिस्टीम सुधारणारे नायक / नायिका - यातले नायक किंवा नायिका हे आर एस एस च्या तालमीत वाढल्याप्रमाणे सातत्याने समान नागरीक कायदा, भय भूक भ्रष्टाचार, सिस्टीम याबद्दल बोलत असतात आणि सिस्टीम सुधारण्यासाठी संघर्ष करतात. यात सुद्धा धक्के दिलेले असतात.
एका सरकारी शाळेत एक शिक्षिका येते आणि शाळा सुधारण्यासाठी मेहनत घेते. आजूबाजूच्या वस्त्यात जाऊन मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांवर दबाव आणते. प्रसंगी त्या पालकांचे गुन्हे उघड करते. शाळा चांगली बहरू लागल्यावर शहरात ज्याचे खासगी शाळा कॉलेजेस आहेत असा लोकप्रतिनिधी तिला दम देतो. ती बधत नाही. मग तिच्यावर हल्ले सुरू होतात. मुलांच्या जाती शोधून मुलांची स्क्रिप्टेड भांडणे तिच्यावर जळणारे शिक्षक घडवून आणतात. ती मधे पडताच प्लाननुसार दुसर्‍या जातीचे लोक मोर्चे आणतात. कलेक्टरला दखल घ्यावी लागते. पण मिटींगमधे काय होते हे दडवले जाते. कलेक्टर अचानक निघून जातो.

शेवटी कळते कि नायिका आर्मी मधे आहे हे कलेक्टरला तिने त्या मिटींग मधे सांगितलेले असते. कलेक्टर पण प्रवाहाप्रमाणे वाहणारा असला तरी त्याला कदर असते. शेवटी नायिका हाणामार्‍या सुद्धा करते. आर्मीचा अधिकारी अशा प्रकारे मिशन मोड मधे शाळा सुधारवण्यासाठी पाठवला जाऊ शकतो असा संदेश आपल्याला यातून मिळतो

६. भय पट - दक्षिणेचे भयपट हे आपल्या समजुतीपेक्षा खूप वेगळे असतात. यात मोठाले वाडे, राजवाडे असतात. त्यात बहुधा एखादे रहस्य असते. एखादा दुष्ट आत्मा एखाद्या पेटीत बांधून ठेवलेला असतो. पण त्या आत्म्याच्या शापाने राजकन्या सुद्धा शापात बद्ध असते. काही वर्षांनी तिसर्‍या चौथ्या पिढीत या आत्यांचे अस्तित्व, गूढ मृत्यू हा भयाचा भाग असतो. मग गावाची सुटका करायला नायक / नायिका एखादा मणी, हाडुक, त्रिशूळ आणायला जंगलात जातो, दिव्य करतो आणि शेवटच्या रीळात दुष्ट शक्ती मुक्त झाल्याने हाहाकार उडतो. नायक / नायिका वेळेत पोहोचून तिचा नायनाट करतो. पण चित्रपट संपल्यावर दुष्ट शक्तीचा केस, एखादे हाडुक पडलेले दिसते. मग पुढचा भाग.

यात वेगळेपणा आणण्यासाठी शापित चित्र, घरावर फिरणारा अ‍ॅणाकोण्डा, किन्नरचे भूत असे प्रकार येतात.

७. पावर फुल एन आर आय व्हिलन - महेशबाबू, अल्लु अर्जुन, रवी तेजा यांच्या चित्रपटात असा व्हिलन असतो जो पूर्वाधात अनेक function at() { [native code] }याचार करतो. बदला घ्यायची वेळ येते तेव्हां तो हाँगकाँग, थायलंड, सिंगापूरला निघून जातो. मग नायक त्या देशात जाऊन बदला घेतो. या चित्रपटात एकमेकांना अड्ड्यात जाऊन दम देणे, शब्दबंबाळ सीन्स यांची भरमार असते. तसेच दोनशे गुंडांची धुलाई असते. एखाद्या बीफच्या फॅक्टरीत चॉपरमशीन ज्या वेगाने मांसाचे तुकडे करते त्याच वेगाने नायक दोनशे जणांना ठोसे मारतो. प्रेक्षकांच्या मानवी मर्यादांचा विचार करून ते क्रमाने दाखवले जातात अन्यथा एकाच वेळी ते ठोसे लगावले आहेत असा त्याचा अर्थ होय. मग फ्रेम पॉज होते आणि पुढच्याच क्षणी एकाच वेळी गुंड हवेत उडतात आणि नायक जर लुंगीत असेल तर लुंगी अर्धी बांधत पुढे निघतो. उपरणे असेल तर खांद्यावर उपरणे टाकतो त्याचा चप्प चप्प चप्प असा आवाज पंचक्रोशीत घुमतो. बहुधा हे उपरणे पंचधातूचे असावे त्यामुळे नायकाच्या पोलादी शरीरावर आदळताच आवाज होतो. रजनी असेल तर गॉगल फिरवून डोळ्यावर बसवणे, हवेत सिगरेट फेकून पिस्तुलाने पेटवणे असे जादूचे प्रकार दिसतात.
अन्य नायक असेल तर बूटातला पाय फिरवून वादळ निर्माण केले जाते. एव्हढा पराक्रम करूनही " ह्या ! त्यात काय ? गुटखा खाऊन पिंक मारण्याइतकी किरकोळ गोष्ट आहे" असे बेदरकार भाव नायकाच्या चेहर्‍यावर असतात. रवी तेजा असेल तर चेहर्‍यावर भाव नसणे हीच बेफिकीरी समजावी. तो तिकडचा सलमान खान आहे.

८. फॅमिलीमॅन नायक - याचाही जनक कमल हसन असावा असे वाटले होते. पण हा साचाही प्राचीन आहे. थेवरमगनम हा कमलचा सुपरहीट सिनेमा त्यानेच लिहीलेला होता. त्याच्यावर हिंदी सिनेमा बनवताना त्यानेच स्क्रीप्ट लिहीली. त्यासाठी तो स्वतः दिलीपकुमारच्या घरी गेला होता. दिलीपकुमारने तेव्हां फायनल निवृत्ती घेतली होती त्यामुळे ते नकारावर ठाम राहिले. तो रोल अमरीश पुरीने केला आणि विरासत प्रचंड हिट झाला.
या प्रकारच्या सिनेमात नायक हा सर्वशक्तिशाली असतो पण त्याच्यासाठी फॅमिली सर्वोच्च असते. फॅमिली व्हॅल्यूज ( हे काय ते गुलदस्त्यातच राहते) तो जिवाची बाजी लावतो. फॅमिलीला नायक साधा भोळाच वाटतो. पण नायक फॅमिलीसाठी नायिकेलाही सोडतो. दोन कुटुंबातले वैर मिटवण्यासाठी फॅमिलीतल्या कर्त्यावरचा वार अंगावर घेतो आणि मग मरतो किंवा जगतो.

यातली फॅमिली ही नेहमी हुकूमशहाच असते पण त्या फॅमिलीला गावाबद्दल तळमळ असते. कर्ता पुरूष हा मुगले आजम मधल्याअकबराप्रमाणे करारी आणि हृदयात दहशत निर्माण करणारा पण फणस असतो. या गावात पोलीस, न्यायालये मासे मारत असतात. याच कर्त्या पुरूषाचा हुकूम चालत असतो. सरंजामी व्यवस्था कशी चांगली असते हे पटत राहते. पण खलनायक कारस्थानाने कुटुंबाचं सर्व हडप करतो. कधी कधी कर्त्याची हत्या होते. कुटुंब देशोधडीला लागते. नायक शहरातून शिकून येतो आणि सगळे ठीक करतो. नंतर त्याचे रूपांतर सुद्धा हाणामारीतज्ञ अण्णा हजारेंमधे होते (अण्णांचा हुकूम गावात चालायचा).

साचा तोच ठेवून थोडे वेगळेपण सेन्सॉर बोर्ड चालवून घेते. एकदमच साचा मोडला तर बहुतेक सेन्सॉर मधे अडकत असावा.
ताक . कमल हसनला नकार दिल्यावर दिलीपकुमारने किला नावाच्या चित्रपटात काम केले होते.

सुरूवातीलाच उल्लेख केलेले काही गोड साचे म्हणजे कलेला वाहिलेले सिनेमे.

यात शंकराभरणम, सागर संगमम सारखे सिनेमे येतात. या साच्यातले बहुतेक के विश्वनाथ दिग्दर्शित चित्रपटातला नायक कलेसाठी आणि तत्वांसाठी जगतो. हे चित्रपट पाहताना कंटाळा येत नाही.

राजामौली मुळे भव्यपटांचा एक साचा अलिकडे जन्माला आला आहे. तो घट्ट झाला कि त्याचाही आदरसत्कार करूयात.

याशिवायही आणखी काही साचे असतील तर माहिती द्यावी ही विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"इलेक्ट्रिक इंजिनांचे पेंटोग्राफ असतात तसे चौकट आकारात हात उंचावून हवेली च्या बाल्कनीमधून, सज्जातून लोकांना नमस्कार करणे."...."हीरो हा त्याचे वय व एकूण कर्तृत्व याच्याशी विपरित प्रमाणात लाइफमधे काहीतरी काहीतरी भारी करत असतो. " - खास फा टच असलेल्या कमेंट्स आहेत ह्या Lol

हपा च्या कमेण्ट्स धमाल आहेत.

तेलगू चित्रपटात नायक नायिकेला काहीतरी टिपिकल सामाजिक कार्य करताना बघतो, उदा. अंध व्यक्तीला रस्ता क्रॉस करून देणे, अनाथ मुलांना शिकवणे आणि त्यावरून तो इंप्रेस होतो >> हो. हे खूप चित्रपटात आहे. चिरंजीवीचा एक आलेला गेल्या वर्षी ज्यात सलमान पण आहे. त्यातही.

खरं म्हणजे तो आधी तिच्या बेंबीला पाहून इंप्रेस झालेला असतो >>> :हहपुवा:
साऊथच्या लोकांना कशाचं आकर्षण असेल काही सांगता येत नाही. Rofl
पण ती मनाने चांगली असल्याचा पुरावा त्याला समाजकार्य पाहून मिळतो. पुढे चित्रपटात ती सहसा ते कार्य चालू ठेवताना दिसत नाही. >> Lol

साधी भोळी गरिबी आणि चॅप्टर डांबिस श्रीमंती हा इथला नियम आहे. नायिका गरीब असेल तर ती मनाने श्रीमंत असते. पण नायक गरीब असेल तर तो गुन्हेगार असला तरी गरिबीपुढे ते काहीच नाही म्हणून सगळं माफ असतं. नायिकेचा काका मामा वगैरे कुणीतरी कॉमेडियन असतो. >>>> हपा, आता येऊ द्या साऊथच्या एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू. धमाल असेल याची खात्रीच पटली.

बेंबीज डे आउट हा कळस आहे Lol हिरो कुठल्याही कलर, साईज, उंची , फिटींगचा असला तरी हिरॉईन मात्र फेअर अँड लव्हली वालीच असावी लागते.

हिरो जितका कुटूंबवत्सल तितकाच व्हिलनही कुटूंबवत्सल असतो त्यामुळे त्याच्या घरातल्या किंवा प्रत्यक्ष त्याचा मृत्यूचा बदला घेणारी (बाकी छोट्या गुंडांना हाताशी घेऊन) स्त्री व्हिलन गुंडीन(गुंडाची बायको किंवा बहीण) जी त्याच्या इतकीच क्रूर असू शकते हेही एक दोन चित्रपटात पाहिलंय.

गोर्‍या मडमा " अय्यय हुकू हुकू, अय्यय्य सुकू सुकू" म्हणत नाचत असतात तेव्हां भारतीय प्रेक्षकाला जे ब्रिटीशांच्या राज्याचा सूड घेतल्याचे समाधान मिळते तसे काही तरी होत असावे >> हो..हे मजा म्हणून नाही, पण खरंच असं विश्लेषण काही चित्रपट विश्लेषक करतात. ह्या असल्या गोष्टींना ब्रिटिश विरुद्ध स्थानिक, हिंदी/उत्तर भारतीय वि दक्षिणी, गोरे वि काळे, उच्चवर्णीय वि इतर अशा संघर्षाची किनार आहे. तरी मजा अशी आहे की त्यात संघर्षाचं नेतृत्व हे पुरुषी नायकाकडेच आहे. पुरुषी असं म्हणण्याचं कारण ताकद, मारामारी, राकट बळकट शरीर हीच जणू तथाकथित पौरुषत्वाची इतिकर्तव्यता असते. त्या साहाय्याने तो इतर गुंडांना लोळवण्याबरोबरच नाजूक पण माज असलेल्या उच्चवर्णीय/परदेशी वगैरे स्त्रीवर वर्चस्व गाजवतो. इथे वर्षानुवर्षे पिचलेल्या आणि कायम अन्यायच सहन करण्यातून आलेल्या पब्लिकच्या न्यूनगंडाला चुचकारलं जातं आणि त्यांचा पुरुषी अहंकार सुखावून अन्याय परिमार्जन केल्याचा आनंद दिला जातो. जवळपास हाच प्रकार आपल्याकडे डोंबिवली फास्टमध्ये झाला असं मी म्हणेन. फक्त तिथे अन्याय्य व्यवस्था ही कामचुकार सरकारी यंत्रणा होती आणि सहन करणारं पब्लिक म्हणजे आपण होतो.

नायक आणि त्याच्या कुटुंबावर अन्याय झालेला असतो , तोच तो कंपनी बळकावणं किंवा fraud करून त्याच्या बापाला गोत्यात आणणं formula, आणि हिरोईन बहुतेक वेळा villain ची मुलगी असते. मग हिरो काहीतरी उचापत्या करून बदला घेतो. एक butterfly painting चा चित्रपट आठवतोय.

दोन कुटुंबातील किंवा भावांमधील वैर. हिरो एका कुटुंबात राहतोय. पण त्यांना माहीत नाही हा वैर्याचा मुलगा , मग चित्रपट संपताना गळाभेट

खुसखुशीत आहे.

मी फारसे साऊथचे चित्रपट पाहत नाही. पण जे काही मोजके पाहिलेत त्यांना हे सगळे फीचर्स लागू पडतात.
बाकी हपा, मी_अनु, फारएंड यांची विशेष टिपण्णी नेहमीसारखीच मजेशीर.

१. हिरो .... गावातील सगळ्या मुली भाळलेल्या असतात पण हा मात्र एकीशीच 'स्टॉक -निष्ठ' असतो. फक्त तिलाच कुठंकुठं चिमटे काढत असतो, बाकी सगळ्या मात्र मातेसमान असतात. हे पूर आल्यानंतर तिला कळतं. मग दोघं सर्वांची सेवाशुश्रुषा करतात. जेवायला काही उरलं नाही तरी चुलीपाशी एक गाजर वाटून खातात व एकमेकांकडे बघून नारदमुनीसारखं हसतात. >>> कमल हसनच्या सिनेमात पहिल्यांदा चिमटे काढायचा प्रकार पाहिला होता. आता सवय झाली. Lol नादर मुनीसारखं हसण्याचा प्रकार लिंगा मधे पण आहे.

२. परदेशी गेला तर तिथेही सगळ्या पोरी याच्याच मागे असतात, त्याचं प्रवचन ऐकण्यासाठी लोकच काय तर पायलटही स्वतःची फ्लाईट चुकवतो. पण याला मनोजकुमार सारखे झटके येतात आणि तो परत येऊन भात-शेती करतो. ट्रेंचकोट जरी घालत असला तरी लुंगीचं महत्त्व अधोरेखित करायचं विसरत नाही. बेवॉचची टीम लाल बेदिंग सूट एकवेळ विसरेल पण हे लुंगी आणि पंचा ... शांतम पापम! >>>> Lol शिवाजी द बॉस !

३. हिरो एका वेळी वीस जणांना प्रत्येकी पाचपाच लिटर रक्त देऊ शकतो आणि रक्तदानानंतर पार्लेजी सुद्धा न खाता रस्त्याच्या मधोमध खूर्चीवर बसून व्हिलनगॅन्गला हवेत उडवू शकतो. >>> Lol अमर अकबर अँथनीचा सीन उलटा केला आणि साऊथचा हिरो एक वेळेला तीन जणांना रक्त देउन नंतर त्यांना कडेवर घेऊन जातो असे दाखवले तरी कमीच वाटेल.

फारएण्डच्या सर्वच्या सर्व कमेण्ट्स खास आहेत. विशेषतः

इलेक्ट्रिक इंजिनांचे पेंटोग्राफ असतात तसे चौकट आकारात हात उंचावून हवेली च्या बाल्कनीमधून, सज्जातून लोकांना नमस्कार करणे. दुसरे म्हणजे यातील बाप माणूस जो असतो तो पिक्चर मधे एकदातरी नाट्यमय सीन मधे स्क्रीनभर पंजा दिसेल असा उंचावून सर्व उपस्थितांना गप्प करतोच. >>> यातलं पेन्टोग्राफ नमस्कार हे नामकरण कहर आहे . कसली भारी आणि चपखल उपमा आहे.

अनेक पिक्चर्स मधे साउथच्या हीरोसमोर दोन हिरॉइन्स असतात. बहुतांश दोन्ही नॉर्थ इंडियन्स. दोघी त्याच्या मागे असतात. बाकी हिरॉइन्सला हॅरॅस करणे आणि ते कौतुकाने दाखवणे >>> Lol

म्हणजे २०-२२ वर्षांचा तरूण आख्खे अनाथालय चालवतो, किंवा तो मोठमोठ्या कंपन्या अ‍ॅक्वायर करण्यात माहीर असतो वगैरे. >>> चिरंजीवीच्या गॉडफादर मधे आहेत हे प्रकार.

बाकी मोटरसायकल वरचा हीरो एक सर्क्युलर धूळ न उडवता नॉर्मल पद्धतीने कधीच न निघणे, साध्या फाइटचे १:४० हे गुणोत्तर >>> Rofl

आचार्य, खूपच अभ्यास केलायं तुम्ही दक्षिणेतल्या चित्रपटांचा..
छान लिहिलायं लेख..
मी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच दक्षिणी चित्रपट पाहिलेत.. ते पण हिंदीत डब असलेले..!

या नाताळच्या सुट्टीत रामोजी सिटीला भेट द्यायचा विचार आहे.. बघूया एखाद्या दक्षिणी चित्रपटाचं शुटींग बघायला मिळालं तर..!

बेंबीज डे आउट हा कळस आहे >>> Lol

आचार्य, खूपच अभ्यास केलायं तुम्ही दक्षिणेतल्या चित्रपटांचा. >>> मध्यंतरी सर्वच टीव्ही वाहिन्यांवर दक्षिणेचे डब्ड सिनेमे दाखवायचे. कारण टिव्ही इंडस्ट्रीत वेतनावरून संप चालू होता आणि बॉलीवूडच्या सिनेमांसाठीची रक्कम वाढत चालली होती. त्यातच जाहिरातदारांनी वाहिन्यांनी आकारलेले दर देण्यास नकार दिलेला. यामुळे साऊथचे सगळे सिनेमे दाखवले जात होते. त्या काळात दुसरे काहीच बघायला नव्हते. युट्यूबवर पण दक्षिणी सिनेमे आणि टिव्हीवर पण.

जेवायला काही उरलं नाही तरी चुलीपाशी एक गाजर वाटून खातात व एकमेकांकडे बघून नारदमुनीसारखं हसतात. >>>>>>> सो फनि ........ह ह ह

जबरदस्त निरिक्षण आणि भन्नाट लेख! Lol एकतर साऊथ चे डब केलेले सिनेमे, ते सुद्धा इतक्या बारकाईने बघायचे, त्यासाठी दंडवत!
ह पा, फारएंड, अस्मिता च्या अभ्यासपूर्ण कमेंट्स कहर आहेत Biggrin

Pages