सारखवट

Submitted by ज्येष्ठागौरी on 27 November, 2023 - 02:17

सारखवट....
मध्यंतरी ऑफिसमधून घेतलेल्या छोट्याश्या सुट्टीत ज्युली अँड ज्युलिया नावाचा भलताच गोड सिनेमा समोर आला.त्यातून मेरिल स्ट्रीप लाडकी मग काय एका बैठकीत बघितला.ती छोटीशी सुट्टी अगदी अगदी कारणी लागली.सिनेमा अतिशय साधा सरळ आणि मधुर.ज्युली ही एका कॉल सेंटरमध्ये काम करणारी मुलगी, 9/11 हल्ल्यानंतर पीडितांना मदत करणारी तिची ही कंपनी , लोकांना मदत करता करता त्यात काम करणाऱ्या ह्या तरुण मुलीला त्या सगळ्या करुणरसामुळे दुःखानं आतून पोळल्यासारखं झालंय,तिची आर्थिक परिस्थिती बेताची त्यामुळे नोकरी करणं गरजेचं आहे.घरी सुस्वभावी चांगला
नवरा आणि एक मांजर आहे. पण तिच्या मनात सतत एक दुःखाची साय साठून आहे.. काहीतरी आतून ठसठसत आहे..अशात स्वयंपाकाची आवड असलेल्या तिला एका जुलिया चाईल्ड नावाच्या फ्रेंच बाईचं कुकबुक सापडतं आणि ती त्यातली रोज एक कृती करुन बघायला सुरुवात करते आणि त्यावर एक छोटं स्फुट लिहिते.स्वतःला एक आव्हान म्हणून ती रोज एक अशा तीनशे पासष्ट कृती करुन पाहण्याचं ती स्वीकारते आणि त्यात तिला अनेक गोष्टी सापडत जातात किंबहुना ती स्वतः सापडत जाते, संघर्षाचे टोकदार खिळे बोथट होतात ,आतली दुःखाची भावना निवळत जाते.
तिचा ब्लॉग यशस्वी होत जातो आणि अगदी शेवटी तिला तिच्या गुरुमाऊलीला भेटायचा योग येतो पण भेट होत नाही पण ती समाधानी आहे कारण तिच्या पदरात खूप काही पडलं आहे..इतकी साधी गोष्ट. आपल्याला एकदा ज्युली भेटते आणि एकदा ज्युलिया ..त्यांच्यातले समान धागे उलगडत जातात. दोघींचा कालखंड जरी वेगळा असला तरी त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये एक प्रकारचं साम्य असतं. ज्युलीला कुकबुक वाचता वाचता, करुन पाहता पाहता,आयुष्यात दुःखाशिवाय काहीतरी वेगळं समोर येतं.त्या कृती करुन बघताना,बघायच्या आधी सामानाची जुळवाजुळव करताना, त्या जमल्या की होणारा आनंद,त्या फसल्या की होणारी निराशा,त्यातून परत घेतलेली उभारी! बघण्यासारखं आहे! नवीन आयुष्याशी हातमिळवणी, नवऱ्याशी प्रेम असून होणारे खटके अशा अनेक वळणांचा हा प्रवास बघणं सुखावह आहे..
सिनेमातील कामे तर उत्तम आहे पण फ्रान्स आणि अमेरिका इथल्या वेगवेगळ्या काळातलं चित्रण फार सुंदर आहे.काही इतक्या छोट्या गोष्टी मधुर पद्धतीनं समोर येतात.ज्युलिया सढळ वापरत असलेलं बटर इतक्या वेळा समोर येतं, btw फ्रेंच कुकिंग हे बऱ्यापैकी उष्मांक असलेलं जेवण असतं आणि आणखी एक विनोद आठवला की the most desirble things in life are either expensive , fattening or married to someone else. विनोदाचा भाग सोडला तर ज्युलिया म्हणत असते की कुठलाही पदार्थ चांगला होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बटर बटर बटर! ती वापरत असलेल्या बटरचा संदर्भ शेवटी फार गोड घेतलाय, ह्या दोघी कधीच भेटत नाहीत पण एक आदर म्हणून ज्युली जुलियाच्या फोटोपाशी बटरचं पाकीट ठेवून येते!
ज्युली ही ज्युलियाच्या आयुष्याचा re run असावा अशी त्यांची समांतर आयुष्य, एकमेकींना कधीही न भेटलेली, न भेटणारी.. वेगवेगळ्या कालावधीत , वेगवेगळ्या देशात, भिन्न आर्थिक, मानसिक परिस्थितीतून वाहणारी ह्या दोन गावांना जोडणारी एक सुंदर नदी!
सिनेमा बघून छान प्रसन्न वाटलं पण एका वेगळ्या प्रकारची भावनाही जागृत झाली.सारखवट हा शब्द कुठसा वाचण्यात आला..सारखवट म्हणजे साधर्म्य, त्या दोघींच्या आयुष्यात, आयुष्यातलं साधर्म्य!आणि ते बघता बघता एकदम असं वाटलं की
आपलं आयुष्य हे कोणाच्यातरी आयुष्याचा re run आहे की काय किंवा कोणाचं तरी आयुष्य हे आपल्या आयुष्याचा re run असू शकतो आणि ह्या कल्पनेनं रोमांचकारी वाटलं.कधीतरी आई मुलीची किंवा बहिणी बहिणींची आयुष्य अगदी क्वचित थोडीफार सारखी असू शकतात, पण तेही एखादा प्रसंग.. एखाद्या घटनेकडे बघण्याचा, त्या घटनेला प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देताना सारखेपणा येतही असेल,त्यात समान वातावरणाचा, संस्कारांचा, जनुकीय जडणघडणीचा भाग मोठी खेळी करत असेल.
आपल्याकडे तुळशीचं पान अंगावर असणं म्हणजे घरातल्या कोणाचा तरी पूर्वजांचा पुनर्जन्म असणं मानलं जातं किंवा एखाद्या मुलाचा स्वभाव किंवा कलागुण किंवा अवगुणही आधीच्या पिढीतल्या कोणासारखे असणं हे वेगळं आणि कोणाच्या आयुष्याशी सारुप्य असणं हे आणखी वेगळं...एक छोटी कल्पना मला आतून वेगळेपणा देऊन गेली.आपल्या आयुष्याशी साधर्म्य असणारी व्यक्ती ह्या वेळी असं आपल्यासारखं आयुष्य जगली आहे,जगत आहे किंवा जगणार आहे ही गंमत पण आहे आणि थरारसुद्धा!कालखंड वेगळा असू शकेल किंवा अगदी आत्ता आपल्याला समांतर, आपल्यासारखं आयुष्य कोणी जगत असेल किंवा आपण कोणासारखंतरी आयुष्य ह्या घडीला जगतोय ह्या कल्पनेनं फार वेगळं वाटलं .ती व्यक्ती other side of the globe असेल किंवा अगदी शेजारच्या गल्लीतही असू शकेल.. मध्यंतरी एक समांतर नावाची मालिका होती त्यात नायकाला,असे संकेत मिळत असतात, त्याच्यासारखं आयुष्य असणाऱ्या कोणाकडून तरी..पण बहुतेकदा आपल्याला तसा कुठलाही संकेत मिळत नाही,त्यातून आपण आपलं वागणं आपलं नशीब प्रारब्ध बदलू शकत नाही.मग आपण आपल्या जगण्याला , त्यात आपण जगलेल्या क्षणांना, कृतींना,चुकांना आपण खरोखर जबाबदार असतो की फक्त कठपुतळी असतो..
आपल्या भल्याबुऱ्या वागण्याचं प्रतिबिंब कोणाच्या आयुष्यात पडणार आहे..मग मी आणखी सावधचित्त असायला हवं की मी मुक्तचित्त असायला हवं कारण माझं आयुष्य एका विशिष्ट मार्गावर मार्गक्रमण करणार आहे जो कोणीतरी आधी जगलाय किंवा आखलाय की मी जगताना कोणाच्यातरी आयुष्याचा मार्ग आखतीये,सगळं चिवित्र आहे..
अचानक हे सगळं कर्माच्या सिद्धांतापर्यंत जाऊन पोहोचतंय की काय..तुमच्या कर्मांचा आलेख आधीच रेखलाय की हा लेखाजोखा कुठेतरी नोंद होतोय का?हे बघणं फार विशेष असणारे, एक अगदी बाहेरुन बघता येणारे किंवा ह्या व्यूहात गुरफटून बघता येणारे.आत्ता वाटतंय की एखाद्या व्यक्तीबद्दल अतीव आपलेपण वाटतं त्याचं कारण, रक्ताचं/बिनरक्ताचं नातं, मैत्री ह्यापलीकडचं काही असेल का?माझ्या एका मैत्रिणीशी ह्याबद्दल बोलले तेंव्हा ती म्हणाली की चित्रगुप्त म्हणतो ना तो तर आपल्यातच असतो, गुप्त चित्र..म्हणजे आपण जे काही आपल्या ज्ञानेंद्रियांनी अनुभवतो आणि कर्मेंद्रियांनी जे काही करतो त्या सगळ्यांचे संस्कार,ठसे म्हणू या..आपल्या चित्तावर उमटत असतात.
त्या संस्कारानुसार आपल्या वासना असतात.वासनांनुसार आपण त्या त्या विशिष्ट परिस्थितीत त्या वासना पूर्ती साठी जन्म घेतो.काय आहे
हा विचार!
Many lives many masters हे पुस्तक खूप पूर्वी वाचलं होतं,त्यातही हाच संदर्भ आहे.
विपश्यनेत संकारा म्हणलंय ती हीच संकल्पना आहे खरी!
आपल्या भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्यांचं काय नातं असतं?सगळं भांबावून टाकणारं आहे खरं..तसं बघितलं तर सामान्य चारचौघांसारखं आयुष्य आपल्या आयुष्यात आत्ता ह्या घडीला कोणीही डोकावून बघत नाहीये तसा कोणाला रसही नसतो पण हा action replay असेल तर भारीच आहे असं वाटलं..वयाच्या त्या त्या विशिष्ट टप्प्यांवर आई/वडिलांसारखं दिसणं, वागणं,विचार करणं,काळजी करणं, काळजी सोडून देणं, एखादी गोष्ट सहज स्वीकारणं, उडवून लावणं, परिस्थितीला प्रतिसाद देणं हे सारखवट असल्याचं द्योतक आहेच.
आपल्याला कधीतरी déjà vu होतं म्हणजे ही घटना घडलीय आपल्या आयुष्यात आधी, ह्या जागी आलोय आधी कधीतरी, पण खरंतर पहिल्यांदाच पाहिलेलं असतं ते सगळं असंच काहीसं असतं की काय..
आपल्या आजूबाजूला अशी माणसं आहेत की जन्म मृत्यु ह्या दोन बिंदूंमधला प्रवास हा केवळ शारीर असतो असंही मानणारी आहेत आणि जन्मजन्मांतरीचा प्रवास समजून घ्यायचा ध्यास घेणारीही आहेत..माझं मला समजून घेतानाचा हा प्रवास जरी आता परतीचा आहे तरी थरारक आहे पण मला माणूस म्हणून आतून अधिक मृदू करणारा व्हावा, समृद्ध करणारा व्हायला हवा.
ह्या हृदयीचं खरंच त्या हृदयी जात असेल तर ते घासून पुसून लखलखीत असायला हवं की जसं आहे तसं?
कुणीतरी आहे 'तिथं' ही भावना फार सुखावणारी आणि गूढही आहे..असं वाचनात आलं की गीतेत भगवंतांनी म्हणलंय की तुझे सगळे जन्म तू जाणत नाहीस..मग अनादि अनंत अशा प्रवाहात अशी पुनरावृत्ती,असा सारखवट प्रवास होत असेल का!
©ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सिनेमाची ओळख छान करून दिली आहे. जमले तर नक्की बघीन हा चित्रपट.

<< सारखवट म्हणजे साधर्म्य, त्या दोघींच्या आयुष्यात, आयुष्यातलं साधर्म्य! >>
मायबोलीवर एक सदस्य आहेत, ज्यांना नको तिथे शब्द मोडायची सवय आहे. त्यांची आठवण झाली आणि त्यांनी हा शब्द 'सार खवट' लिहिला असता का? असा विचार डोक्यात आला.

छान

छान लिहिलं आहे.
हा चित्रपट अगदी सगळा नाही, पण बघितलाय.

हा चित्रपट पाहिलाय . पण ह्या नजरेने नाही . तुम्ही जास्त छानपैकी संबंध जोडला आहे . आता परत पाहीन . बऱ्याच दिवसांनी दिसलात मायबोलीवर. छान वाटले वाचून .

नवी माहिती कळली.पिक्चर बघेन.
सारखवट हा शब्द आणि साखरवट वाचला आणि कोणत्यातरी पदार्थाची कृती असेल वाटलं.मग सारखवट असा वाचला.तरी खवट शेंगदाणा आठवला.
पण लेख मस्त जमलाय.

उबो, वावे, किल्ली, डश, अश्विनी आणि अनु धन्यवाद! माझी एक वहिनी आयुर्वेद तज्ञ आहे हा लेख वाचून तिनं कळवलं की तिच्या एका आयुर्वेदातल्या सरांनी पेशंट्सचा अभ्यास करायला सांगितला होता की एकसारख्या दिसणाऱ्या लोकांमध्ये आजारपणाची लक्षणं सारखी दिसतात का आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे सारखेपणा सापडतो! हे आणखी वेगळं! असो!

एकसारख्या दिसणाऱ्या लोकांमध्ये आजारपणाची लक्षणं सारखी दिसतात का आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे सारखेपणा सापडतो! >>> जुळ्या भावंडाचे आयुष्यच एकसारखे असते का? माझ्या ओळखित कोणी जुळे नाही. त्यामुळे मला नेहमी हा प्रश्न पडतो.

खूप छान लिहिलं आहे.
बऱ्याच दिवसांनी दिसलात मायबोलीवर. छान वाटले वाचून >>>>>>+१११

आपल्याकडे आजोबांचे गुण नातवात उतरतात असं मानलं जातं, नाही का? पण परिस्थिती मात्र बदललेली असते. त्यामुळे आयुष्यात सारखेपणा येईल अशी शक्यता कमीच.
अर्थात कॅलिडोस्कोपमधल्या आकृत्यांची पुनरावृत्ती होत नसेलच असं कसं मानायचं?
अनंत धागे अन् अनंत तुकड्यांतून आयुष्याचं वस्त्र विणलं जात असताना, तीच वीण उमटली तर... तर...
मोठा विलोभनीय विचार आहे.
लेख आवडला.

सिनेमा पाहीलेला आहे.
मेनी लाइव्ज मेनी मास्टर्स वाचलेले आहे. सगळ्या शेवटी थिअरीज आहेत. ब्रायन वेइस यांचे रिग्रेशन थेरपी मेडिटेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला झोप लागते. एकदा बसून प्रयत्न करेन. कारण जर पलांगावर झोपून, कानाला हेडफोन अलावुन ट्राय केले तर ताबडतोब झोप लागते.
लेख आवडला.

सामो ,लंपन abuva प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

फार छान ग
चित्रपट बघेन नक्की, अन तुझी ही दृष्टी मनात राहिल

तुम्ही छान लिहिले आहे.
बघितला आहे सिनेमा. तुम्ही लेखन केल्याप्रमाणे तितक्या उंचीला गेला असं काही वाटलं नव्हतं. मेरिल स्ट्रिप आणि एमी ॲडम्स दोघी खूपच आवडतात. Many lives many masters ही वाचलं होतं, तितकं आठवत नाही पण बहुतेक पाल्हाळ वाटलं होतं.

'सारखवट' हे निसर्गाचे वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त व्हायचे माध्यम असावे, आपण निसर्गाचा आवेग असतो काही नवं -काही जुनं घेऊन, काही नव्या- काही जुन्या वाटा शोधत कुठूनतरी कुठेतरी जात असतो. आपली वाट जिथे संपते तिथे साधर्म्य असणाऱ्या दुसऱ्या कुणाची तरी सुरू होऊ शकते म्हणून आपणही थांबून रहायचं नाही. आनुवंशिक असो-नसो हीच कलेक्टिव्ह उत्क्रांती ! Happy

छान लेख. लेकीला ज्युली जुलीआ सिनेमा खूप आव्डतो. मेरील स्ट्रीप आहे ना. का इतर कोणी. लेक रेगुलर स्वयंपाक करत नाही त्यामुळे तिला नॉवेल्टी होती. मला ३६५ दिवस स्वयंपाक कधी सु ट्टी मिळाली तर बरे अशी परिस्थिती असल्याने मी पूर्ण बघितला नाही. त्यात ते फ्रेंच कुकींग.

सारख वट चे एक उदाहरण सांगते किंवा योगा योग म्हणा. सायरस ब्रॉचा इथे भारतात एक फेमस एम्टीव्ही अँकर आहे.( बकरा) आणि आता त्याचा सायरस सेज पॉड का स्ट भयंकर पॉप्युलर आहे. तर ह्याचा वाढदिवस व माझ्या लेकीचा वाढदिवस एकाच दिवशी. इतकेच नव्हे तर त्याची आई ऑलिव्हिआ चा वाढ्दिवस माझ्याच वाढदिवशी. लेक सायरस सारखीच आहे स्वभावाने व नॉनव्हेज दोघाम्ना फार प्रिय. ओलिव्हिआ बद्धल फारशी माहिती नाही. पण लेकावर लक्ष ठेवुन असते व हा ही फॅमिली बरोबर आईजवळच राहतो. प्रेम आहे दोघांत. पारशी. वडील आता हायात नाहीत सायरसचे. लैच भारी योगा योग.

छान लिहिलंय चित्रपट पाहिला नाही ..शोधते..
खूपवेळ मी साखरवट असे वाचत होते
सारखवट हा शब्दच मला माहीत नव्हता..!

प्रेम आहे दोघांत. पारशी.>> काल सायरस पॉड्कास्त मध्येच कळले की ऑलिव्हिया ह्या कॅथलिक आहेत. व पारशी व्यक्तीशी विवाह. खरे तर सायरसने आएचाच इंटरव्यु घ्यायला हवा.

छान लेख.