अरेंज मॅरेज, अजुन एक किस्सा - ताटातलं वाटीत.. !

Submitted by छन्दिफन्दि on 15 June, 2023 - 02:58

“ट्रिंग ट्रिंग .. ट्रिंग ट्रिंग “
“मधुरा, डेस्क वरची रिंग कधीची वाजतेय. घे ना फोन. “
“हो हो “ म्हणत एका हाताने सेंड क्लिक करत दुसऱ्या हाताने तिने रिसिव्हर कानाला लावला.
“मधुरा ?”
“कोण बोलताय आपण ?” आवाज फारसा ओळखीचा तर वाटत नाहीये, ती मनाशी पुटपुटली.
“मी, मिलिंद. थोडं बोलायचं होत. स्वाद मध्ये येऊ शकाल का सहा वाजता?”

मिलिंद ?? ओह रविवारी बघायला आलेला. म्हणाव तर साधा म्हणावं तर तरतरीत अस काहीस मधलच व्यक्तिमत्व. तिने आवडलाय कि नाही ह्याचाही विचार केला नव्हता. आई बाबांच्या तगाद्यापोटी तुला हे कार्यक्रम करावे लागत होते.

तस तर आई-वडिलांनी पूर्ण मोकळीक दिलेली. पण अजुनही कोणी कधी क्लिक झाले नाही किंवा त्या दृष्टीने विचार केला नाही म्हणा पण आता तिच्यावर हे वर संशोधन करायचे काम लादल गेल होत. भानावर येत ती म्हणाली,
“का बर ?”
“भेटल्यावर सांगतो. प्लीज नाही म्हणू नको … “
त्याचा आवाज इतका प्रांजळ होता की पटकन तिला नाही म्हणवले नाही.

***

स्वादच्या बाहेरच मिलिंद उभा होता. फिक्कट निळा शर्ट, सडसडीत अंगकाठी, सावळा रंग बहुदा नियमित व्यायाम करत असावा. उगाच तिने डोकं चालवलं.

“दोन चहा “ तिनेच ऑर्डर दिली, “चालेल ना ?”
“हो हो “

“मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. रविवारी आपण भेटलो पण आपल्याला बोलायला जेम तेम अर्धा तास मिळाला. तरीही त्या अर्ध्यातासात मला जे जाणवलं त्यावरून तू थोडी स्पष्टवक्ती, सरळमार्गी , स्वतंत्र विचारांची मुलगी वाटतेस. आणि मनापासून सांगतो मला तू खरंच आवडलीस. “

“मी अजून तितकासा विचार नाही केला पण आतापर्यंत नाही म्हणायला कारणही नाही सापडलंय हे हि खरंच.“ ती मिश्किल हसत म्हणाली.

“तू तुला हवा तेव्हढा वेळ घे. पण तुझ्या कानावर घालायचं होतं. कदाचित माझे वडील गावाहून तुझ्या घरी फोन करतील… “ चहाचा घोट घ्यायच्या निमित्ताने तो मध्येच थांबला.

मधुराला त्याच्या चेहऱ्यावर सांगू कि नको हे प्रश्नचिन्ह अगदी स्पष्ट दिसत होत.
“किती विचार करतोस? सांग काय सांगायचं ते .. “ तिच्या तोंडातून नकळत बाहेर पडल.

चहाच्या वाफेने त्याच्या चष्म्यावर एक अस्पष्ट पडदा चढला. तो पुसायला त्याने चष्मा काढला. त्याचे बोलके डोळे, लांबसडक बोटे…
“हम्म हा अगदीच काही वाईट नाहीये. बोटांवरूनआठवलं की पेटी पण वाजवतो वाटतं? “ मधुराचं मन रविवारच्या भेटीची क्षणचित्रे आठवू लागल.

इकडे मिलिंदचाही धीर एकवटला.
“माझे आई-बाबा, विशेषतः बाबा थोडे जुन्या आणि कर्मठ विचारांचे आहेत. गावाच्या बाहेर स्वतः कधी पडले नाही पण मुलाला शिकवलं. तर त्यांना माझ्या लग्नात तो सगळं खर्च भरून काढायचा आहे. मला हे अजिबात मान्य नाही आणि ह्याची पूर्ण कल्पना आहे की शिकली सवरलेली, कोणतीच स्वाभिमानी मुलगी ह्याला तयार होणार नाही’. पण मग माझे वडील हे सर्व मान्य असणाऱ्या कोणातरी मुलीबरोबर माझं लग्न लावून देतील. मला तर अशा स्वतःची मते नसलेल्या मुलीशी लग्नच नाही करायचे. कल्पना आहे हे सगळं तुझ्या आकलनाच्या पलीकडचं असू शकतं. तुला मी आवडलो असेल तर प्लीज हो म्हण. माझे बाबा काही रक्कम मागतील, किंवा लग्न असं करून द्या तस करून द्या वगैरे म्हणतील. जे ऐकून तुम्ही रागवाल, संतापाल. पण खात्री बाळग मला ह्याची आधीच कल्पना होती म्हणून मी गुपचूप पैसे साठवूंन ठेवलेत. तुम्ही त्यांना हो ला हो करा. त्यांच्या सगळ्या अटी मान्य करा. मी साठवलेले सगळे पैसे त्यासाठी खर्च करेन पण त्यांना हे पैसे मी खर्च करतोय हे सांगू नका. कारण त्यांना समजावणे म्हणजे दगडावर डोके आपटणे आहे. “
एका दमात मिलिंद बोलून मोकळा झाला.

ही संध्याकाळ एक वेगळच वळण घेत होती. एखाद्या चित्रपटाच्या कथेत शोभून दिसेल असे काही प्रत्यक्षात घडत होते. आधी सहजच म्हणून भेटायला तयार झालेली मधुरा मिलिंदच्या त्या प्रांजळ बोलक्या डोळ्यांत, पोट तिडकीने बाबांच्या कर्मठपणा विषयी बोलण्यात , मुख्य म्हणजे धीर एकवटून हे सगळं काहीशा अनोळखी मुलीला सांगण्यात तिला त्याच एक हवंहवंसं रूप दिसायला लागलं.

“पण मग पुढे काय आणि कसं होईल ?” परत तिचं तोंड डोक्याच्या आधी धावलं.

“ आई बाबा गाव सोडून कधी शहरात येत नाहीत त्यामुळे तू काळजी करू नकोस. कधी गावाला गेलो तर माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही.” मिलिंद कळकळीने बोलत होता.

***
दोन महिन्यांनी
एकुलत्या एका लेकाचं लग्न धुमधडाक्यात आपण सांगितल्या प्रमाणे लावून दिल म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते.

इकडे लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला मिलिंद डोळ्यांनीच गप्प करू बघत होता.

तर मधुराचे आई-बाबा त्यांच्या लाडक्या लेकीचं अजब जावयाबरोबरच गजब लग्न बघत सुखावत होते.

तळटीप- ही गोष्ट एका कानगोष्टी करत ऐकलेल्या खऱ्या गोष्टीवर आधारित आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदर्श ,
सासू सासरे,(इथे मुलगा आणि मुलगी दोघांचे आई वडील आले)
नवरा बायको
बॉस कर्मचारी .
अशा जोड्या जगात अस्तित्वात च नाहीत.
आपण वेगळ्याच कुठल्या तरी ग्रहावर राहतो आणि अगदी गुणवान आहोत .
असे समजून प्रतेक जन प्रतिक्रिया देत असतात.

गोष्ट म्हणुन ठिक आहे पणं रियल लाईफ मधे रिस्की आहे. आज मुलगा आई वडिलांसाठी खोटं बोलतोयं उद्या अजुन कश्यासाठी तरी बोलेलं. आज त्याचे बोअलणे तिच्या फेवर मधे आहे म्हणुन ठिक आहे पण उद्या तसे असेलच असे नाही...

वाचून दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद!

वाचून दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद!

सगळ्यांना खूश ठेवण्यासाठी सगळ्यांशी खोटं बोलणार्‍यांसारखी घातक माणसं नव्हेत दुसरी! व्हाइट लाइज आर स्टिल लाइज! >>

एकेकाळी माझे विचार असेच होते. पण जमिनीच्या व्यवहारांमुळे ग्रामीण भागाशी संपर्क येत गेला. आठ वाजताची वेळ दिली असेल तर मी आठ वाजता हजर होई. लोक हळूहळू अकरा पर्यंत येत, माझी चिडचिड व्हायची. पण सोबतच्या लोकांनी शांत रहायला शिकवले.
व्यवहारात थोडंसं जरी कुणी खोटं सांगितलं कि मी लगेच तेच धरून बसायचो. पण सोबतच्या लोकांनी कुठले बोलणे कानाआड टाकायचे, कुठले गांभीर्याने घ्यायचे हे शिकवले.
माझ्यासारख्या माणसाला तिथे काट्यावर काटा म्हणतात. Lol
म्हणजे दिलेल्या वेळी घड्याळाचा काटा काट्यावर आला आणि समोरची पार्टी आलेली नसेल कि अस्वस्थ होणारा.
ग्रामीण भागात माणसे लवकर बदलत नाहीत. संकुचित विचार असतात. पण भलं होत असेल आणि समजावून सांगितले तर मान्य करतात. अशा मंडळींना बदलवत बसण्यापेक्षा व्यवहार होण्यासाठी थोडे खोटे बोलून व्यवहार पार पाडणे यात कुणाला काही चूक वाटत नाही. खोटे बोलणे आणि फसवणे यात फरक आहे. एकदा व्यवहार ठरला कि मग कल्पना दिली जाते. समजूत काढली जाते.

एसडी बर्मन मृत्यूशय्येवर असताना त्यांना एक गाणे आताच रेकॉर्ड व्हावे असे वाटत होते. रेकॉर्डिंग एक कि दोन दिवसांनी होते. किशोरकुमार आणि आरडी यांनी गाणे रेकॉर्ड झाले असे खोटेच सांगितले. एसडींना आपले म्हणणे ऐकल्याचे समाधान वाटले. मग त्यांनी ते ऐकायला मागितले. तोपर्यंत एक दिवस उलटून गेला. गाणे व्यवस्थित रेकॉर्ड झाले. त्यांना ऐकवले गेले. त्यांनी समाधानाने मान हलवली आणि मी सांगितले तसेच किशोरने गायले असे म्हटले. रात्री एसडी गेल्याची बातमी मिळाली.

हे सुद्धा खोटेच बोलणे. उद्देश वाईट नव्हता. त्यांना फसवले असे म्हणता येईल का ?

तुम्ही गेलेल्या एरिया मधली ग्रामीण माणसे होपलेस होती. तुमचं काम असल्याने दगडाखाली हात अडकल्याने तुम्हाला सर्व क्युट मानून घ्यावं लागलं.मान्य.
पण जोवर लग्न होत नाही तोवर या मॅनिप्युलेटेड हुंडा ऑफर वाल्या मुलीचा हात दगडाखाली नाहीये.तिला असले विअर्ड लोक स्वतःचं नुकसान करून घेऊन क्युट मानण्याची जबरदस्ती नाही.(लग्नात तडजोडी दोन्ही पक्ष करतातच.पण त्या अश्या एका पार्टीला खुश दाखवण्या साठी नसाव्या.या आईबाबांना 5 वेगवेगळ्या मुलींच्या बापाने तोंडावर सांगितलं असतं हुंडा देणार नाही, तर पुढच्या वेळी 'ठीक आहे, फक्त लग्न करून द्या, बाकी आम्ही बघतो' म्हणाले असते.आपण पायंडा पाडून यांना 'काहीही मागितलं तरी मान्य होईल' अशी सवय लावतोय.)

धागालेखिका: ही चर्चा तुमच्या काल्पनिक कथेनिमित्ताने होतेय ही चांगली गोष्ट.

casual leave संपली म्हणून सिक leave टाकणारे (त्यासाठी फॅमिली डॉक्टर कडे सर्टिफिकेट घेणारे )
छोट्या मुलांना "बाप्पा शिक्षा करेल ", "लाथ मारलीस तर पायात किडे पडतील" , "बाप्पा बघतोय सगळं " सांगणारे
नरो व कुंजरो वा करणारे (धर्मराज )

पुराणा पासून कलियुगापर्यंत अशा कितीतरी उदाहरणे देता येतील.

पहिला दगड त्याने मारावा ज्याने एकदाही पाप केले नाही ह्या गोष्टी प्रमाणे मग कोणालाच काही बोलता येणार नाही.

पण हे खोटं बोलण्या बद्दल चालू नसून दोन पक्षांपैकी एका पक्षाच्या आईबाबांना दुसऱ्या पक्षाचं मानसिक नुकसान करून ऍट एनी कॉस्ट खुश करण्यातल्या ग्रे एरिया बद्दल चालू आहे ना?

पण हे खोटं बोलण्या बद्दल चालू नसून दोन पक्षांपैकी एका पक्षाच्या आईबाबांना दुसऱ्या पक्षाचं मानसिक नुकसान करून ऍट एनी कॉस्ट खुश करण्यातल्या ग्रे एरिया बद्दल चालू आहे ना?>>>> "व्हाइट लाइज आर स्टिल लाइज!" वर चलू आहे.

तुम्ही गेलेल्या एरिया मधली ग्रामीण माणसे होपलेस होती >> एखाद्या भागाबद्दल नाहीये ते. अगदी पुण्याला, मुंबईला खेटून असलेल्या भागाबाबतही आहे. वेल्हा, मांजरी, खडकवासला, वाघोली, केसनंद, वडगाव मावळ, शिंदे अशी अनेक गावं. या सगळ्याच गावातली माणसे होपलेस असतील तर आपण आपल्या कोषातच रहायचे का ? ते व्यवहार्य आहे का ? फिक्स्ड पगाराची नोकरी असेल तर शक्य आहे.

ही पोस्ट दुसऱ्या प्लॅटफॉर्म्स वरही टाकलेली, ज्या काही शे दोनशे मराठी लोकांनी वाचले असेल त्यात ४-५ जणींना अशा प्रकारचे अनुभव स्वत: आले किंवा त्यांनी बघितले.

Submitted by छन्दिफन्दि on 16 June, 2023 - 01:39>>>> त्यानंतरच्या काही तासात अजून ३-४ प्रतिसाद आले की असं प्रत्यक्षात घडलंय.

मी पण उडत उडत ऐकलेल्या गोष्टीच बीज पकडून हि गोष्ट लिहिली, अगदी हलक्या अंगाने.
पण त्या बायकांचे प्रतिसाद वाचून आता वाटले जे आपल्याला गमतीशीर वाटते किंवा येथील काही लोकांना तत्वनिष्ठ प्रश्न वाटतो ती काहींची रिऍलिटी आहे.

याच्यातून दोन गोष्टी मला जाणवल्या
१. किती मोठी सामाजिक दरी आहे एका वर्गाला तत्व वगैरे म्हणत कुरवाळता येणारे प्रश्न दुसऱ्या वर्गाची दुखरी बाजू किंवा वास्तव आहे आणि ह्याची पहिल्या वर्गाला सुतराम कल्पना नाही

२. समाजातील बदल असेच घडत असतात, साम दाम दंड वापरून एक (शहाणी ) पिढी आधीच्या पिढीला नवीन गोष्टी स्वीकारायला तयार करत असते.

पण रघू, होपलेस माणसांबरोबर जिथे डील करावं लागेल तिथे आपण करतोच ना.कोषात न राहता.शी ट हॅपन्स म्हणून.
इथे लाल झेंडे (रेड फ्लॅग) दिसतायत, जे डील जुळेल ते किमान 35 वर्षांचं आहे, डील ला हो नको म्हणण्याचा पर्याय अजून आपल्या जवळ आहे, तिथे मुद्दामून कोषातून बाहेर पडायला संकटं निर्माण करून घ्यायची?
उद्या 'आईबाबा कर्मठ आहेत, आमच्या घरी पिढ्या न पिढ्या बायकोला मारण्याची पद्धत आहे.मी व्हिडिओ कॉल करून त्यांच्या समोर तुला एकच थोबाडीत मारतो.ते चालवून घे.नंतर पुढच्या कॉल मध्ये आपण फक्त तुला वळ उठल्याचा मेकअप करून त्यांना दाखवत जाऊ.' अजूनही 'ओके'?

mi_अनु तुम्ही ज्या पोट तिडकीन बोलताय मी समजू शकते. एखाद्या मुलीने खाईत उडी घालण्यासारखे आहे वगैरे

तुम्हाला ही अनालॉजि आवडणार नाही कदाचित,

पण एखादया अमेरिकन माणसाने
"हे भारतीय त्या दरवाजांना लोम्बकळत कसे काय प्रवास करतात उघड्या दरवाज्याच्या ट्रेन मध्ये? त्यापेक्षा स्वतःची गाडी घेऊन का नाही जात ऑफिसला ", किंवा
" एका बेडरूम च्या घरात ४-५ माणसे राहतात ? यांना मुलांची काही कदरच नाही त्यांना काही privacy च देत नाहीत "
असं म्हणण्यासारखं आहे.

त्यांच्या प्रॉब्लेम्स वर ते लोक त्यांच्या पद्धतीने उत्तर शोधतात, चूक बरोबरच्या पलीकडचा हा प्रश्न आहे.

मला का आवडणार नाही Happy
इथे चर्चा मी, तुम्ही, भारत, अमेरिका यावर चालू नाहीच आहे.मुलीच्या आजूबाजूला 100% मुलं अशीच आहेत, ती सगळी हुंडा मागतायत, अश्या एखाद्या मुलाबरोबर डील हा तिच्याकडे लग्न व्हायला एकमेव उपाय आहे म्हणा, सगळे मुद्दे मागे घेते.

मला तरी त्या मुलाने त्याच्या दृष्टीने काढलेले solution ठीक वाटले.
आता एक खोटं बोलतोय आणि नंतर अशा प्रकारे खोटं बोलला तर, तशा प्रकारे खोट बोलला तर वगैरे तर्क काढण्यात काय अर्थ आहे.
खोटं न सांगता झालेल्या अरेंज किंवा लव्ह मॅरेज मध्ये नंतर सगळं आलबेल असत का??

दोन्ही केसेस मध्ये सगळ्या ( खोट बोलणं/ खोट न बोलण) या शक्यता असणारच ना.

अनुजी, खोटं बोलणं आणि फसवणे यातला फरक (उद्देश) लक्षात न घेता सरसकट होपलेस ठरवणे यात आपली टॉलरन्स लेव्हल किती आहे हे महत्वाचे आहे. खेडेगावातली माणसं शिकलेली नसतात. पण व्यवस्थित रित्या पटवून दिल्यास ते मत बदलत नाहीत असे नाही. जे काही संकुचित विचार असतात ते ही त्यांनी स्वतःचे स्विकारलेले नसतात. सगळे बोलतात करतात म्हणून आपणही इतकेच असते.

वेळ महत्वाची असते. वेळेला थोडं समजुतीने घेण्यासाठी करावं लागतं. एकदा त्याची मानसिकता बदलायची झाली कि मग सांगायचे. ग्रामीण भागात, राजकारणात कधीच तत्वासाठी अडून बसून वाद घालून चालत नाही. लवचिकता आणि लाडीगोडीने समोरच्याला वळणावर आणावे लागते. एकदम होपलेस असे लेबल लावून चालत नाही.

ईतके प्रतिसाद बघून समजले कथेवर वैचारीक लफडा चालू आहे.

हे जर अरेंज मॅरेज असेल तर मुलगी बावळट आहे. तिने फालतूची रिस्क घेतली आहे.

जर मुलगा तिच्या लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट प्रेमात असेल तर तिने त्याला सरळ सांगावे,
"भावा, तुझे खरेच माझ्यावर प्रेम असेल आणि तुझे आईवडील चूक आहेत हे तुला माहीत असेल तर आताच क्लीअर स्टँड घे आणि मी हुंडा न घेता या मुलीशीच लग्न करणार हे त्यांना सांग"

ज्या नात्याचा पायाच खोटेपणावर टिकला आहे ते कसे टिकणार?

संसारात ढवळाढवळ करायला सासूसासरे शेजारच्या बेडरूममध्येच झोपणारे हवेत याची काही गरज नाही. गावावरूनही छळून तुमचे मानसिक स्वास्थ्य ढवळून काढता येतेच.

आणि जो नवरा आताच ओळखपाळख नसलेल्या मुलीला तडजोड करायला सांगतोय तो लग्नानंतर आपल्या बायकोला हक्काने तडजोडच करायला सांगणार ईतके बेसिक आहे हे.

उगाच हुंड्याचे पैसे भरतोय या ऑफरने हुरळून जाण्यात काही अर्थ नाही. मी तर म्हणतो त्यापेक्षा सन्मानाने हुंडा भरून नवरा विकत घ्यावा Happy

अजून एक मुद्दा काही प्रतिसादात आला म्हणून लिहीतोय

हुंडा घेणे ही जी एक लोभी वृत्ती आहे तिचा आणि शिक्षणाचा किंवा गावाकडे राहण्याचा फारसा संबंध नाही.

माझ्या अनुभवांनुसार आमच्या गावात नाही कोणी हुंडा घेत. मग ते शिक्षित असो वा अशिक्षित.
पण शहरातले शिकलेले लोकंही अश्या अपेक्षा ठेवताना पाहिले आहे.

@ मी अनु, आबा, छन्दिफन्दि

धागालेखकाने जो किस्सा मेन्शन केला आहे त्यात पण मुलाने मुलीला विश्वासात घेतलेले आहे. गावात लग्न जोरात करणे, हुंडा घेणे या गोष्टी चढाओढीने होतात. माझ्या मुलाला तुझ्यापेक्षा जास्त हुंडा मिळाला हे प्रतिष्ठेचं लक्षण सुद्धा असू शकतं. सगळेच लोभापोटी हुंडा मागतात असे पण नाही. या केस मधे यातले काय लागू आहे ते माहिती नाही. पण मुलाला हुंडा नकोय हे पुरेसं नाही का ? मुलीसाठी हा मुलगा स्वत्: हुंड्याचा बंदोबस्त करतोय, तिच्या घरच्यांना फटका नको हे बघतोय. हे काहीही महत्वाचे नाही का ?

मुलीने पण हा विचार केलाच असेल. नांदायचेय मुलासोबत, त्याच्या वडलांसोबत नाही. शिवाय जर प्रतिष्ठेसाठी हुंडा घेतला असेल तर लग्न लागून गेलं. समवयस्क लोकात एव्हढा हुंडा मिळाला म्हणून पाठ थोपडून घेतली असेल आणि पाच सहा वर्षांनी सत्य समजलं तरी खूप फरक पडणार नाही. गावात अशा गोष्टी घडत राहतात.

मुलगी पळून गेली तरी महिना दोन महीने खानदान कि इज्जत, तू मला मेली, मी तुला मेलो हे सगळं होतं. फार तर वर्ष सहा महीन्यात मुलीचं जावयासहीत व्यवस्थित घरी जाणं येणं सुरू होतं. सगळेच संबंध तोडतात, मारून टाकतात असे नाही.
आपण आपला कोष बनवला कि मग उर्वरीत जगासंबंधी एकदम टोकाची मतं बनतात.

माझी सुरूवातीची मतं ही कामानिमित्त संबंध वाढत गेले तशी बदलत गेली.

"पण व्यवस्थित रित्या पटवून दिल्यास ते मत बदलत नाहीत असे नाही. जे काही संकुचित विचार असतात ते ही त्यांनी स्वतःचे स्विकारलेले नसतात. सगळे बोलतात करतात म्हणून आपणही इतकेच असते." हे सर्व कॉम्प्रो मुलीने लग्न किंवा एंगेजमेंट ची कमिटमेंटही दिलेली नसताना का स्वीकारावे?हा एकच शेवटचा मुलगा उपलब्ध आहे का?

होपलेस शब्द अती आहे, तो मी मागे घेते.

हा एकच शेवटचा मुलगा उपलब्ध आहे का? >>> तो वेगळा इश्यू आहे. त्यावर मी बोलत नाही. कुणाला काय आवडावे हे आपण कसे ठरवणार ? पण त्याच्यातला प्रामाणिकपणा आवडला असेल तर हरकत काय आहे ? जिथे समंजस मुलांची वानवा असेल तिथे त्या मुलीने जर हा विचार केला तर तिला पुढे इतका समजून घेणारा मुलगा मिळेलच हे तरी कसे सांगता येईल ? तिच्यावर सुद्धा प्रेशर असेलच.

होपलेस शब्द अती आहे, तो मी मागे घेते. >>> __/\__

सामाजिक स्थिती जशी बदलत जाते तसे प्रथा बन बदलतात.
तीस एक वर्ष पूर्वी हुंडा घेतल्या शिवाय मुली न शी बहुसंख्य लोक लग्न करत नव्हती.
कायदे आले हुंडा बंदी सारखे पण सामाजिक प्रश्न कायद्याने सुटत नसतात ..

आता मुली न ची संख्या कमी झाली आहे.मुलगा च हवा म्हणून गर्भपात,एक किंवा दोन च मुल ह्या मुळे मुली कमी झाल्या आहेत.
आता मुलीचं च मिळत नाहीत लग्नासाठी त्या मुळे हुंडा हा प्रकार बंद च झाला आहे.
आता उशिरा लग्न 40 नंतर मुल, तिघांचेच कुटुंब, असे प्रकार चालू आहेत
फाजील व्यक्ती स्वतंत्र हा विचित्र प्रकार आहेच जोडीला.
त्याचे बरे वाईट परिणाम पुढील दहा वीस वर्षात दिसून येतील च .
मुल आणि वृध्द लोक ह्यांच्या वर खूप वाईट परिणाम आज च्या सामाजिक बदलेल्या स्थिती च नक्कीच होणार आहे.
मुला न मध्ये हिंसक भावना निर्माण होण्याची दाट शक्यता आहे..
पुढारलेल्या देशात तशी प्रकरण दिसत च आहेत.
ह्या सर्व बदलेल्या स्थिती च

समाजावर काय वाईट किंवा चांगला परिणाम होईल ते काळ च ठरवेल च
लग्नात फालतू गोष्टी वर आवड म्हणून खर्च करायचा हे श्रीमंत मुलींच्या कुटुंबात जोरात हा प्रकार चालू आहे ती प्रथा हुंडा प्रथे पेक्षा पण वाईट आहे..
ज्याच्या कडे पैसे नाहीत त्यांच्या वर पण कर्ज काढून लग्नात फालतू भरपूर खर्च करण्याचा मानसिक दबाव असतो..

लग्नातील खर्च पूर्ण पने wastage of money आहे.
पण register लग्न करणे किंवा देवळात वैदिक पद्धतीने लग्न करणे ..
हा पर्याय अगदी नगण्य लोक निवडत आहेत

हे सर्व कॉम्प्रो मुलीने लग्न किंवा एंगेजमेंट ची कमिटमेंटही दिलेली नसताना का स्वीकारावे?हा एकच शेवटचा मुलगा उपलब्ध आहे का?>>>+१
माझे मत मी_अनु सारखेच. तिचे मन गुंतले वगैरे होते असे नाही, तिने फार विचार पण केलेला नसतो. मग हा जुगार खेळायची गरज नाही.
उलट हा रेड फ्लॅग आहे, वडिलांना नाराज नको करायला म्हणून अजून काय काय तडजोडी करायला लागतील सांगता येत नाही. तो मुलगा असेलही चांगला पण अजूनही त्याला त्याच्या आयुष्याचा चार्ज घेता आलेला नाहीये. अजूनही वडील इन चार्ज आहेत!
नांदायचेय मुलासोबत, त्याच्या वडलांसोबत नाही >>>> हे आपल्या समाजात असे नसते. कुटुंबाशी लग्न करावे लागते!
रघू आचार्य यांची उदाहरणे इथे लागू होत नाहीत असे वाटते. नोकरीनिमित्त डील करावे लागणे वेगळे आणि इथे गरज नसताना खड्ड्यात उडी मारणे वेगळे. मुलीचे आधीच त्याच्यात मन गुंतले असेल तर मग ठीक होते.

“ नोकरीनिमित्त डील करावे लागणे वेगळे आणि इथे गरज नसताना खड्ड्यात उडी मारणे वेगळे. मुलीचे आधीच त्याच्यात मन गुंतले असेल तर मग ठीक होते.” - सहमत! शोले मोड ऑनः ‘शायद, ज़मीं और शादींमें यहीं फ़र्क़ हैं’ ज्या नात्यात बाथरूम आणि बेडरूम शेअर करावी लागते त्या नात्याचा पाया असत्य/फसवाफसवीच्या तडजोडीवर घालू नये असं माझं मत आहे.

ज्या नात्यात बाथरूम आणि बेडरूम शेअर करावी लागते त्या नात्याचा पाया असत्य/फसवाफसवीच्या तडजोडीवर घालू नये असं माझं मत आहे.≥>>> १००%agreed

पण ज्यांना b &b शेअर करायचीय त्यांच्यात १००% पारदर्शकता आहे.

इतक्या मनापासून ही गोष्ट वाचल्याबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार.

मतमतांतरे तर असणारच तेही अगदी टोकाची.
असा एखादा नायक तुमच्या/ तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात असे proposal घेऊन आला तर त्यावर तुम्ही कसे व्यक्त व्हाल या वरून चाललेली ही चर्चा नक्कीच रंजक आहे.

लगे रहो.

इतक्या मनापासून ही गोष्ट वाचल्याबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार.

मतमतांतरे तर असणारच तेही अगदी टोकाची.
असा एखादा नायक तुमच्या/ तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात असे proposal घेऊन आला तर त्यावर तुम्ही कसे व्यक्त व्हाल या वरून चाललेली ही चर्चा नक्कीच रंजक आहे.

लगे रहो.

Pages