अरेंज मॅरेज, अजुन एक किस्सा - ताटातलं वाटीत.. !

Submitted by छन्दिफन्दि on 15 June, 2023 - 02:58

“ट्रिंग ट्रिंग .. ट्रिंग ट्रिंग “
“मधुरा, डेस्क वरची रिंग कधीची वाजतेय. घे ना फोन. “
“हो हो “ म्हणत एका हाताने सेंड क्लिक करत दुसऱ्या हाताने तिने रिसिव्हर कानाला लावला.
“मधुरा ?”
“कोण बोलताय आपण ?” आवाज फारसा ओळखीचा तर वाटत नाहीये, ती मनाशी पुटपुटली.
“मी, मिलिंद. थोडं बोलायचं होत. स्वाद मध्ये येऊ शकाल का सहा वाजता?”

मिलिंद ?? ओह रविवारी बघायला आलेला. म्हणाव तर साधा म्हणावं तर तरतरीत अस काहीस मधलच व्यक्तिमत्व. तिने आवडलाय कि नाही ह्याचाही विचार केला नव्हता. आई बाबांच्या तगाद्यापोटी तुला हे कार्यक्रम करावे लागत होते.

तस तर आई-वडिलांनी पूर्ण मोकळीक दिलेली. पण अजुनही कोणी कधी क्लिक झाले नाही किंवा त्या दृष्टीने विचार केला नाही म्हणा पण आता तिच्यावर हे वर संशोधन करायचे काम लादल गेल होत. भानावर येत ती म्हणाली,
“का बर ?”
“भेटल्यावर सांगतो. प्लीज नाही म्हणू नको … “
त्याचा आवाज इतका प्रांजळ होता की पटकन तिला नाही म्हणवले नाही.

***

स्वादच्या बाहेरच मिलिंद उभा होता. फिक्कट निळा शर्ट, सडसडीत अंगकाठी, सावळा रंग बहुदा नियमित व्यायाम करत असावा. उगाच तिने डोकं चालवलं.

“दोन चहा “ तिनेच ऑर्डर दिली, “चालेल ना ?”
“हो हो “

“मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. रविवारी आपण भेटलो पण आपल्याला बोलायला जेम तेम अर्धा तास मिळाला. तरीही त्या अर्ध्यातासात मला जे जाणवलं त्यावरून तू थोडी स्पष्टवक्ती, सरळमार्गी , स्वतंत्र विचारांची मुलगी वाटतेस. आणि मनापासून सांगतो मला तू खरंच आवडलीस. “

“मी अजून तितकासा विचार नाही केला पण आतापर्यंत नाही म्हणायला कारणही नाही सापडलंय हे हि खरंच.“ ती मिश्किल हसत म्हणाली.

“तू तुला हवा तेव्हढा वेळ घे. पण तुझ्या कानावर घालायचं होतं. कदाचित माझे वडील गावाहून तुझ्या घरी फोन करतील… “ चहाचा घोट घ्यायच्या निमित्ताने तो मध्येच थांबला.

मधुराला त्याच्या चेहऱ्यावर सांगू कि नको हे प्रश्नचिन्ह अगदी स्पष्ट दिसत होत.
“किती विचार करतोस? सांग काय सांगायचं ते .. “ तिच्या तोंडातून नकळत बाहेर पडल.

चहाच्या वाफेने त्याच्या चष्म्यावर एक अस्पष्ट पडदा चढला. तो पुसायला त्याने चष्मा काढला. त्याचे बोलके डोळे, लांबसडक बोटे…
“हम्म हा अगदीच काही वाईट नाहीये. बोटांवरूनआठवलं की पेटी पण वाजवतो वाटतं? “ मधुराचं मन रविवारच्या भेटीची क्षणचित्रे आठवू लागल.

इकडे मिलिंदचाही धीर एकवटला.
“माझे आई-बाबा, विशेषतः बाबा थोडे जुन्या आणि कर्मठ विचारांचे आहेत. गावाच्या बाहेर स्वतः कधी पडले नाही पण मुलाला शिकवलं. तर त्यांना माझ्या लग्नात तो सगळं खर्च भरून काढायचा आहे. मला हे अजिबात मान्य नाही आणि ह्याची पूर्ण कल्पना आहे की शिकली सवरलेली, कोणतीच स्वाभिमानी मुलगी ह्याला तयार होणार नाही’. पण मग माझे वडील हे सर्व मान्य असणाऱ्या कोणातरी मुलीबरोबर माझं लग्न लावून देतील. मला तर अशा स्वतःची मते नसलेल्या मुलीशी लग्नच नाही करायचे. कल्पना आहे हे सगळं तुझ्या आकलनाच्या पलीकडचं असू शकतं. तुला मी आवडलो असेल तर प्लीज हो म्हण. माझे बाबा काही रक्कम मागतील, किंवा लग्न असं करून द्या तस करून द्या वगैरे म्हणतील. जे ऐकून तुम्ही रागवाल, संतापाल. पण खात्री बाळग मला ह्याची आधीच कल्पना होती म्हणून मी गुपचूप पैसे साठवूंन ठेवलेत. तुम्ही त्यांना हो ला हो करा. त्यांच्या सगळ्या अटी मान्य करा. मी साठवलेले सगळे पैसे त्यासाठी खर्च करेन पण त्यांना हे पैसे मी खर्च करतोय हे सांगू नका. कारण त्यांना समजावणे म्हणजे दगडावर डोके आपटणे आहे. “
एका दमात मिलिंद बोलून मोकळा झाला.

ही संध्याकाळ एक वेगळच वळण घेत होती. एखाद्या चित्रपटाच्या कथेत शोभून दिसेल असे काही प्रत्यक्षात घडत होते. आधी सहजच म्हणून भेटायला तयार झालेली मधुरा मिलिंदच्या त्या प्रांजळ बोलक्या डोळ्यांत, पोट तिडकीने बाबांच्या कर्मठपणा विषयी बोलण्यात , मुख्य म्हणजे धीर एकवटून हे सगळं काहीशा अनोळखी मुलीला सांगण्यात तिला त्याच एक हवंहवंसं रूप दिसायला लागलं.

“पण मग पुढे काय आणि कसं होईल ?” परत तिचं तोंड डोक्याच्या आधी धावलं.

“ आई बाबा गाव सोडून कधी शहरात येत नाहीत त्यामुळे तू काळजी करू नकोस. कधी गावाला गेलो तर माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही.” मिलिंद कळकळीने बोलत होता.

***
दोन महिन्यांनी
एकुलत्या एका लेकाचं लग्न धुमधडाक्यात आपण सांगितल्या प्रमाणे लावून दिल म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते.

इकडे लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला मिलिंद डोळ्यांनीच गप्प करू बघत होता.

तर मधुराचे आई-बाबा त्यांच्या लाडक्या लेकीचं अजब जावयाबरोबरच गजब लग्न बघत सुखावत होते.

तळटीप- ही गोष्ट एका कानगोष्टी करत ऐकलेल्या खऱ्या गोष्टीवर आधारित आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही नाही पसंत पडलं हे! हा मुलगा कधीही परत "आई बाबा म्हणाले म्हणून" अशा कारणाने इतरही कर्मठ गोष्टी तिच्यावर लादू शकतो!! मुळात लग्न करून जाताना मुलग्याइतकेच मुलाचे आई-बाबा ही बघायला हवेतच! कारण घराच्या विचारांची तीच बैठक असते. आपल्याकडे लग्न फक्त मुलाशी नाही होत, मुलाचा संपूर्ण परिवार त्या मुलीला सांभाळावा लागतो.

असाच एक किस्सा मी ऐकला होता मात्र तो लग्नानंतरच्या वर्षभराचे सणवार-मानपान बद्दल होता. मला स्वतःला असे काहीच झेपणारे नाही.

हमम...
सोच अपनी अपनी.

एक one liner मी ऐकलेली. पण एकदम गंमत आणि आश्चर्य दोन्ही वाटलेल. त्या ओघाने हा किस्सा!

मला लिखाण म्हणून आवडलं आणि कथा बीज ही आवडलं.
म्हणजे एखाद्या मुलाचे शिक्षणाने, जग बघितल्याने विचार बदलू शकतात हे शक्य वाटतय मला.
उलट तो मुलगा खूप matured वाटला मला. आई वडिलांना बदला बदला सांगून डोकं फोडत राहिला नाही .त्यामुळे त्यांची रिलेशन्स बिघडली नाहीत. तसेच त्याला जे हवं होतं ते ही मिळवलं त्याने.
लग्ना आधी जो मुलगा इतका trNsparant आहे तो लग्ना नन्तर ही तसाच राहिल आणि मुलीला नेहमी सपोर्ट करेल . एकदा अक्षता पडल्या की आई वडिलांच्या अवास्तव मागण्या आल्या तर स्पष्टपणे नकार देण्याचं बळ ही मिळेल त्याला.

म्हणजे एखाद्या मुलाचे शिक्षणाने, जग बघितल्याने विचार बदलू शकतात हे शक्य वाटतय मला.
उलट तो मुलगा खूप matured वाटला मला. >>> १००%
एकदम बरोबर पकडलंयत.
आपल्याला दिसतं  त्याच्या पलीकडे खूप मोठं  आणि वेगळं जग असतं, चांगलं-वाईट.  आपल्या परिघातून बाहेर पडलो की ते काही जणांना जाणवत, बदलवत.  
शिक्षणाने त्या बाहेरच्या जगाने बदलेला मुलगा ज्याला सहचारिणी पण तशीच हवी की जी परत नकोशा वाटेकडे घेऊन जाणार नाही. 

गोष्ट म्हणून ठिके.पण या सुखी संसाराचा पूर्ण पायाच 'आईबाबा काही खेडं सोडून आपल्या बरोबर राहायला येत नाहीत' या गृहितकावर आहे.अशी गृहितकं चुकू शकतात.हुंड्याचे पैसे नवऱ्याने स्वतः गुपचूप दिलेत हे ज्यांना माहीत आहे(मुलगी,मुलीचे आईवडील, आईवडलांना जवळचे त्यांचे भाऊ बहीण, भाऊ बहिणींची मुलं सुना.त्यापैकी कोणीतरी कोणत्या तरी वादात तावतावात हे रहस्य बोलून जाऊ शकतं.असं झाल्यास मुलाची अवस्था ना घर का ना घाट का होईल. (असो.त्यांचं त्यांना.आपल्याला काय फरक पडतो म्हणा.)

मी_अनु तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे.
Some battles are not worth fighting.

पुण्या मुंबई बाहेरच्या आणि महाराष्ट्राबाहेरचे बऱ्याच लोकांकडून इतके वेगवेगळे किस्से ऐकलेत. आपल्याला वाटत गोष्टी फक्त सिनेमात होतात पण त्याची खरी अस्पष्टशी घटना घडलेली असते.

मी_अनु तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे.
Some battles are not worth fighting.

पुण्या मुंबई बाहेरच्या आणि महाराष्ट्राबाहेरचे बऱ्याच लोकांकडून इतके वेगवेगळे किस्से ऐकलेत. आपल्याला वाटत गोष्टी फक्त सिनेमात होतात पण त्याची खरी अस्पष्टशी घटना घडलेली असते.

आवडली कथा.

मिया बीबी राजी हे बरोबर. दोघांना मान्य असेल तर बाकीचे लोक गौण आहेत. ज्यांचा संसारात फारसा हस्तक्षेप नाही त्यांच्यासाठी काही क्षण देखावा करायला हरकत नाही. जी गोष्ट (हुंडा)चुकीची आहे त्याबाबतीत खोटे बोलल्याने पाप लागत नाही. Lol

कितीही पुरोगामी विचारांचे असले तरी मुलावर पण अव्यक्त दडपण असतेच घरच्यांचे. आपला मुलगा ताब्यात तर जाणार नाही ना ही काळजी मुलाकडच्या महिलांना असते. तर पुरूषवर्गाला सुद्धा मुलाने, सूनेने मान दिलेला आवडतो. अहं कुरवाळला गेलेला आवडतो. त्याला लहान थोर असे नाव सुद्धा आहे. परंपरा म्हणून अशा खूप गोष्टी आहेत ज्यात समाज, वडीलधारे म्हणून सत्ताधार्‍यांचा इगो जपावा लागतो.

माझ्या मित्रमंडळीतले काही शहरात असताना अगदी मॉडर्न राहतात. गावाकडे गेले की वेगळे राहणीमान असते. नवरा बायकोला रागवायचे नाटक करणार, तिनेही त्याला पूरक अभिनय केला कि गावातल्या बायाबापड्या मग लटक्या रागाने मुलाला रागे भरतात आणि सूनेला "गुणी हाय माजी बाय" म्हणत कौतुक करतात. एकदा का त्यांनी डोळे भरून मुलगी कशी मुलाच्या ताब्यात आहे हे नाटक पाहिले कि वर्ष दोन वर्ष निश्चिंती असते.

खूपच थोड्याशा घरात आदर्श म्हणावे असे वातावरण असते. ते प्रातिनिधिक चित्र नाही.

गावाकडे गेले की वेगळे राहणीमान असते.>>> अगदी अगदी.
असही ऐकलंय गावाला गेल्यावर त्यांना साडी नेसून सासऱ्यांसमोर यायचं नाही, घुंघट अस सगळं सांभाळावं लागतं. ते लोक दोन एक वर्षांनी काही दिवसांसाठी जातात म्हणून घेतात सांभाळून.
पण इकडे टीम लीडर / प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करायचे आणि तिकडे घुंघट.
ह्या सगळ्यात परत तेच प्रत्येकाची प्रश्न पत्रिका वेगळी असते त्यामुळे त्यांना जमेल, झेपेल तशी त्यांची उत्तरपत्रिका असते.

जी गोष्ट (हुंडा)चुकीची आहे त्याबाबतीत खोटे बोलल्याने पाप लागत नाही>>> पुण्यकर्म म्हणजे ** मागणाऱ्यांची पोलीसात तक्रार करणे. ही मुलगी तिच्या व्यक्तिमत्वा वरून ते करायला समर्थ नक्कीच होती. Bw Bw

ही पोस्ट दुसऱ्या प्लॅटफॉर्म्स वरही टाकलेली, ज्या काही शे दोनशे मराठी लोकांनी वाचले असेल त्यात ४-५ जणींना अशा प्रकारचे अनुभव स्वत: आले किंवा त्यांनी बघितले.

मला पटतं,खेडेगावात एक घाव 2 तुकडे असे बाणेदार उपाय चालत नाहीत. 2 दिवस गोडी गुलाबीने भेटायला जायला घुंघट किंवा इतर तडजोडी पण चालतात.
पण कधीकधी ही 'फक्त 2 दिवस' वाली गृहितकं गडबडली(कर्मठ सासू सासरे कायमचे मुलाकडे राहायला येणं/दोघांपैकी कोणी एक देवाघरी जाऊन दुसऱ्याचा संभाळ मुलाच्या घरी होणं.) की स्त्री चे हाल आणि नवऱ्याचं सँडविच.

ज्या नात्यात 30-35 वर्ष काढायची ते नातं 'तसंही जास्तीत जास्त वेळ एकच प्रिय माणूस सोबत असेल, हे लोक कधीमधी भेटणार, तितका वेळ काहीही चालवून घेऊ' या गृहितकावर जोडावं, का रेडीमेड अजून चांगले लोक शोधावे हा मूळ मुद्दा(ही लेखिकेवर टीका वगैरे नाही.थिंकिंग लाऊड, लेखनाने विचारात पाडलं म्हणून.)

कोव्हीड लॉकडाऊन काळात माझ्या काही ओळखीच्या स्त्री कलिग्स ची अशी बरीच गृहितकं साफ तोंडावर पडली.

परिस्थिती पलटणार असेल तर विचार करून सर्वांना विश्वासात घेणं चांगलं. त्यानंतर जे आपली सोबत करतील ते आपले असे म्हणायचे.

प्रसिद्ध दिवंगत अभिनेते शशी कपूर यांनी घरात न सांगता जेनीफरशी लग्न केले. शम्मी कपूरच्या मदतीने घरात मध्यस्थी केली. जेनीफर नास्तिक होती. पण सासूला खूष करायला ती उपास तापास, व्रत वैकल्ये हे सगळं करायची.
https://www.bbc.com/marathi/india-60793792?fbclid=IwAR2oPHk3IA2q1CHF1E0u...

बॉलीवूडच्या आघाडीच्या घराण्याची ही कथा आहे. तर बॉलीवूडचे दाखले तरी कसे द्यायचे ?

लग्न ही तडजोड आहेच. अगदीच माझ्या मनासारखे व्हावे असे दोन्ही बाजूंनीही होत नाही. झाले तर एक व्यक्ती आनंदी राहणार नाही. संसारात एक जरी पक्ष दु:खी राहिला तर तो सुखाचा कसा होणार ? त्यामुळे दोघांनी अशा बाबतीत स्थळ काळ परिस्थितीनुसार एकत्रच निर्णय घेणे चांगले.

वर म्हटलेय तसे तत्त्वासाठी, जो मुलगा स्वतःहून मी हुंड्याचे पैसे द्यायला तयार आहे, फक्त वडलांना कळू देऊ नका म्हणतोय, त्याच्या कडे दुर्लक्ष करून पोलीस तक्रार केली पाहीजे. पण मग दोघांनी एकमेकांचा विचार नको करायला. तत्त्वासाठी त्यावर पाणी सोडायला पाहीजे.

का रेडीमेड अजून चांगले लोक शोधावे >>> हे आवडल Lol Lol Lol

(ही लेखिकेवर टीका वगैरे नाही.थिंकिंग लाऊड, लेखनाने विचारात पाडलं म्हणून.)>> केली तरी काही हरकत नाही. मुद्दे पटू नाही शकत.

ट्रिकी आहे खरे. जर मुलगा फारच आवडला असेल Wink तर मग तडजोड करावीच्च. Happy
पण जर ह्म्म्म्म!!! comme ci comme ça - ठिकठाक तर मग अजुनी शोध घ्यावा.

मला आता भाजी बाजारात असल्याचा feel यायला लागलाय.
Lol Lol Lol

पलिकडच्या भाजीवल्याकडे कोणी जास्त ताजा आणि स्वस्त दिसतोय मग आधी तिकडे बघुया छाप.

"नोकरी ही लग्नाच्या बायकोसारखी काय समजलास? दुसरी चांगली दिसते म्हणून पहिली सोडण्यात काहीच अर्थ नसतो, शेवटी सगळ्या बायका आणि सगळ्या नोकऱ्या सारख्याच! काय समजलास बेंबट्या !" हे वरच्या काही कंमेंट्स वरून हे आठवले.
थोडं अवांतर

>>>>>>>नोकरी ही लग्नाच्या बायकोसारखी काय समजलास? दुसरी चांगली दिसते म्हणून पहिली सोडण्यात काहीच अर्थ नसतो
हाहाहा

>>> मला आता भाजी बाजारात असल्याचा feel यायला लागलाय
पण 'अरेन्ज्ड' मॅरेजमध्ये ते अध्याहृतच असतं की.

माझं या बाबतीत मी_अनुला अनुमोदन. मला ही लबाडी क्यूट वाटत नाही. सगळ्यांना खूश ठेवण्यासाठी सगळ्यांशी खोटं बोलणार्‍यांसारखी घातक माणसं नव्हेत दुसरी! व्हाइट लाइज आर स्टिल लाइज!
लोभी सासर आणि खोटारडा नवरा - फार मोठं रिस्क घेतलं आहे या मुलीने!

हाच डायलॉग उलटा करून बघा.>>> म्हणजे कसा??

>>> मला आता भाजी बाजारात असल्याचा feel यायला लागलाय
पण 'अरेन्ज्ड' मॅरेजमध्ये ते अध्याहृतच असतं की.>>>
जरुर/ सक्तीच नाही.

मी अनु व स्वाती यांच्याशी सहमत.
मुलगा आईबाबांच्या इतक्या कह्यात असेल तर लग्नानंतर मुले कधी/किती असावीत, सुनेने नोकरी करावी का ? वगैरे अनेक प्रश्नात ते नक्कीच लुडबुड करतील. शिवाय पहिल्या दिवाळीला वगैरे अपेक्षाही असतीलच.

Pages