समाधान

Submitted by सामो on 10 February, 2023 - 10:30

खरे तर हा लेख आहे पुस्तकाची ओळख जी की मी 'सध्या काय वाचताय' धाग्यावर देउ शकले असते. पण हे पुस्तक वाचल्यापासून माझ्या लक्षात एक आले आहे आणि ते म्हणजे आपल्याला हे पुस्तक नि-तां-त आवडले आहे. इट सिम्प्ली रेझोनेटस विथ माय फिलॉसॉफी ऑफ लाइफ. 'Embrace your inner sloth.' आजूबाजूची धावपळ, उरस्फोड, चिंधीभर तुकडे मिळवण्याकरता जीवघेणी स्पर्धा आणि एकंदरच असंतुष्टता आहे, ती माझ्या आकलनाबाहेर आहे. अंहं माझ्या अयुष्याचा ती हिस्सा आहे पण नेहमीच मला परका वाटत आलेला हिस्सा आहे.

तर हे पुस्तक आहे - Jamie Varon या लेखिकेचे Radically Content: Being Satisfied in an Endlessly Dissatisfied World

https://books.google.com/books/publisher/content?id=D9JCEAAAQBAJ&pg=PP1&img=1&zoom=3&hl=en&bul=1&sig=ACfU3U17fHhLiSBOqXmauWZCB_robp4zEg&w=1280

विविध अंगांनी लेखिकेने या असंतुष्टतेचा आढावा घेतलेला आहे. आपल्याला वाटत असते की - अमके झाले की मग मी सुखी होइन. मी बारीक झाले की मग सारे काही मनासारखे होइल, मला अमुक इतके पे पॅकेज मिळाले की मी आनंदी जीवन जगू शकेन. पण हे सारे आहे मृगजळ. कारण आयुष्य कधीच परफेक्ट नसते. अनिश्चितता आणि इम्परफेक्शन हा आयुष्याचा स्थायी भाव आहे. पण हे आपल्याला कळते पण वळत नाही तर बरेचदा कळतही नाही आणि मग असे डोळे उघडविणारे एखादे पुस्तक वाचले की आपल्या लक्षात येते की अरे खरच की हा तर समाजाने केलेला बनाव आहे. फसवणुक आहे. आपण विविध उत्पादने खरेदी करावीत म्हणुन आपल्याला कॅपिटॅलिस्ट सोसायटीने विकलेली एक प्रकारची सतत असंतोष खदखदत ठेवण्याची ही आहे एक विचारधारा. आणि आपण आहोत या विचारधारेचे प्रमुख ग्राहक व एक बळी. मग यात अनेक मुद्दे आले - लठ्ठपणा कुरुप आहे, काळा रंग कुरुप आहे, तुमचे स्वतःचे घर नसले तर तुम्ही दु:खीच असायला हवे, तुम्हाला मूल होत नसेल तर तुमच्यात काहीतरी कमी आहे, स्टे होम मॉम दु:खीच असणार - असे अनेक मतप्रवाह आणि चूकीच्या समजूतींचे आपण शिकार होउन बसलेलो आहोत. पूर्वी एके काळी असलेले हे सांस्कृतिक ब्रेन वॉशिंग आता तुम्हाला आपले खरखुरे विचार वाटू लागलेले आहेत. कधीकधी तर या सगळ्याचा कंटाळा येतो. वाटू लागते की आपल्याला या सर्व स्पर्धेपासून दूर पळायचे असते, पण पळून कुठे पोचायचे असते कोणास ठाउक. आपण समाधानी नाही हे आपण जाणतो पण हेच माहीत नसते की मग समाधान आहे कशात! प्रत्येक गोष्ट जास्त-जास्त-अधिक-अधिक हवी. आणि ही हाव थांबणारी नसतेच. अधिक पैसा - अधिक कपडे- अधिक दागिने, सँडल्स, पर्स, पगार. पण हे सारे मिळवताना कशाची हानी होते आहे, आपण काय पणाला लावत आहोत - ते आपल्या लक्षात येत नाही. लेखिका म्हणते एक गैरसमज हासुद्धा असतो की सतत असमाधानी राहीले नाही तर आपण आयुष्यात प्रगतीच करु शकणार नाही. किंबहुना आपल्या विकासाचा कणा म्हणजे ही खदखद आहे आणि म्हणुन ती आवश्यकच आहे. सोशल मिडीयामुळे हा फॅक्टर अधिकच अधोरेखित होत असतो. अपल्याला स्वतःची लाज वाटली की आपण प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होउ, आपल्या महत्वकांक्षा पूर्ण करु - असा काहीसा आपल्या गैरसमज असतो. अपण स्वतःचे शत्रू असतो, मुद्दाम बनतो. कशासाठी ही उरस्फोड. एकदा निवांत बसावे, विचार करावा - आपण अन्य कोणाच्या तथाकथित 'आदर्श' आयुष्याच्या कल्पना तर कवटाळत नाही आहोत. आपल्याला काय पाहीजे - 'मला' काय हवे. माझा आनंद कशात आहे.

या पुस्तकाच्या प्रेमात पडले आहे मी. हार्ड कव्हर कॉपी विकत घेते आहे. खरे तर काही प्रती. कारण माझ्या प्रिय मैत्रिणींना, आवडणार्या सग्यांना हे पुस्तक भेट द्यायला मला फार फार आवडेल. क्वचितच असे एखादे पुस्तक सापडते ज्याच्या आपण प्रेमात पडतो - आ-कं-ठ!!

रोज मी प्रार्थना वाचते -
न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः।
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां सूक्त जापिनाम्‌॥

तेच क्वचित असे पुस्तकरुपाने सामोरे येते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरवात वाचली...
बाकी‌ उद्या....
सध्या....
झाले समाधान । तुमचे धरिले चरण ॥१॥
आतां उठावेंसें मना । येत नाहीं नारायणा ॥ध्रु.॥
सुरवाडिकपणें । जेथें सांपडलें केणें ॥२॥
तुका म्हणे भोग । गेला निवारला लाग ॥३॥

छान मांडलंय....
Sloth embrace करणं म्हणजे असेल हरी वगैरे चालणार नाही. हरी ही त्याचीच मदत करतो जो प्रयत्नशील असतो. महाभारतात भगवान सर्वत्र आहे पण स्वत: काही करत नाही करवून घेतो.
अमर्याद भोगाची इच्छा जशी घातक तसाच आळसही घातक...
आपला प्रयत्न नेहमी आपल्याला हवा असलेला कंफर्ट झोन मिळविण्यासाठी पण तेही एक मृगजळ...कारण कंफर्ट झोनची व्याख्या आपणच विस्तारत जातो.

फकीरीत समाधान मानायला खरंच मनाची मशागत व्हायला हवी. येड्या गबाळ्याचे काम नाही.

धन्यवाद कुमार.

दत्तात्रेय साळुंके अगदी बरोबर - निष्क्रियता हा दुर्गुणच आहे. पण हा जो लंबक ह्युमन 'बिईंग' कडून ह्युमन डुईंग कडे गेलेला आहे. काहीतरी सतत मिळवत रहायचं, अचिव्ह करायचं तो ही अर्थात ज्याने त्याने निवडलेला पर्याय आहे.
पण माझा तसा पर्याय खरच कधीच नव्हता. आहे त्यात समाधानी राहून, अंथरुण पाहून पाय पसरावेत आणि खरच एक अनकॉम्प्लिकेटेड आयुष्य जगता यावे. निदान आपण निर्माण केलेल्या समस्या येउ नयेत.
अजुनही निसर्गात रमून जायला आवडेल. शांत व स्थैर्य असलेले आयुष्य आवडेल. आजही आयुष्य खूप खूप अनकॉम्प्लिकेटेड आहे पण स्थिरता नाही ना मिळण्याची शक्यता.
अर्थात - कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता. कहीं ज़मीन कहीं आसमाँ नहीं मिलता.
कोणीतरी मला म्हटलेले होते - एकाच जागी स्थिर रहायलाही पळावेच लागते कारण जग पुढे पुढे पुढे चालले आहे. तुम्ही एकाच जागी स्थिर रहाल तर १००% मागेच पडाल. ही जी धावाधाव आहे ती आपापल्या कुवती नुसार करता येण्याचा पर्याय हवा. व तो तसा दिला असता तर मी १००% मागेच पडले असते. पण त्यात शून्य पश्चात्ताप असता.

>>>>अजुनही निसर्गात रमून जायला आवडेल. शांत व स्थैर्य असलेले आयुष्य आवडेल. आजही आयुष्य खूप खूप अनकॉम्प्लिकेटेड आहे पण स्थिरता नाही ना मिळण्याची शक्यता.>>>>

तुमच्या बाबतीत खरं असेलही पण गावाकडचे बहुसंख्य बोलतात शहरात बरं अन् शहरातले बोलतात गाव बरा....
अपवाद ही असू शकतात.

मला कोकणी रानमाणूस युट्यूब चॅनेल आठवलं.. मी याचे बहुतेक व्हिडिओ पाहिलेत.

अमेरीकेत शहर व निसर्ग या दोहोंचा रम्य समन्वय साधणे अतोनात सोपे आहे. सबर्बमध्ये शांत निसर्ग आहे. बागा आहेत, बायसिकल ट्रेल्स, वॉकिंग ट्रेल्स पणआहेत व शहर अतिशय जवळ असल्याने त्या सुखसोईही आहेत. अमेरीकेत ही खूप चांगली सोय आहे खरी.

फक्त आम्ही सतत घर पाठीवर घेउन फिरलेलो आहोत. पण त्या आव्हानांना उत्तर देण्यातही एक कधीही कंटाळा न येणारी नूतनता होती. छान छान राज्यं, तिथले जीवनमान पहावयास मिळाले. पण तेव्हा तरुण होतो, आता वाटतं जरा तरी स्थिर व्हावं.

कोंकणी रान माणूस चा प्रसाद गावडे ह्याचे vbloggs फार सुंदर असतात. त्याचा एक जुना व्हिडिओ आत्ता पाच मिनिटांपूर्वी पाहून मायबोली उघडली तर कोंकणी रानमाणूस चा उल्लेख!

लेख आवडला.

प्रत्येक गोष्ट जास्त-जास्त-अधिक-अधिक हवी. >> ते फक्त एवढंच नसतं.. तर इतरांपेक्षा जास्त हवं असतं.

आपण जेव्हा निवांत बसायचं ठरवतो, तेव्हा आपण एकटे असतो. आणी इतरांच्या दृष्टीने अयशस्वी असतो. तिकडे दुर्लक्ष करता यायला हवं.

छान लिहिलस
प्रतिसादही छानच
अमेरिका - शहर- निसर्ग समन्वय पटलच
धन्यवाद ग

छान ओळख. मी शोधेन हे पुस्तक लायब्ररीत मिळाले तर. पुस्तक न वाचताच बोलतेय पण विथ ऑल सेड अ‍ॅन्ड डन, inner sloth फिलॉसॉफी मला वैयक्तिकदृष्ट्या पटेल का याबाबत साशंक आहे. पुस्तक वाचून मत बदलेल की ठाऊक नाही पण वाचायला आवडेल.

चांगला विषय आणि चांगलं लिहिलंय. सगळ्यांचे प्रतिसादही चांगले इन्फर्मेटिव्ह आणि विचारप्रवर्तक आहेत. Happy

सामो,
खूप छान सुंदर ओळख करून दिलीत पुस्खतकाची. खरंतर तुम्ही पुस्तकाबद्दल लिहिता आहात हे वाटलंच नाही, तुम्ही स्वतःचेच विचार लिहिले आहेत असं वाटत राहिलं. या लेखावरून आणि तुमच्या इतर प्रतिसादांमधून हे जाणवत राहतं की तुम्ही जीवनाचा अतिशय डोळसपणे आनंद घेत आला आहात . खरं तर तुमचा हेवाच वाटतो की हे सगळं जीवन कसं स्वीकारायचं याचं तुम्हाला अतिशय उत्तम भान आहे.
मागे मित्राशी बोलताना, आपल्याला जीवनात नेमकं काय हवं आहे हे शोधायचा एक छान मार्ग त्याने सुचवला होता. करायच असं, कि शांत बसायचं आणि मागच्या दोन-चार वर्षात आयुष्यात घडलेले समाधानाचे क्षण किंवा प्रसंग कोणते ते आठवायचे. बस !त्यातले पहिले तीन-चार प्रसंग किंवा घटना जीवनात सतत येण्यासाठी जे काय करायला लागेल ते करायचं .
सुखी - आनंदी आणिक समाधानी होण्याचा सोपा मार्ग आहे हा.

सामो, छान लिहिलयं! प्रतिसादही वाचनीय.
खरे तर आनंद, समाधानाचे छोटे छोटे प्रसंग रोजच्या जगण्यातच येत असतात पण बरेचदा आपण ते गृहित धरतो, मनात त्याची नोंद होत नाही, मनाविरुद्ध झालेली शुल्लक गोष्ट मात्र लगेच नोंदली जाते. रोज रात्री झोपताना आजच्या दिवसात काय चांगले घडले, कशाबद्दल कृतज्ञ आहे असा विचार केला तर लक्षात येते की दिवस चांगला गेला. अगदी वाईट प्रसंगातही मदत येईपर्यंत आपल्यासोबत धीर देत थांबलेले तिर्‍हाईत, फारशी ओळख नसतानाही जॉबसाठी कुणीतरी दिलेला रेफरन्स , स्पेशालिस्टची अपॉइंटमेंट लवकर मिळावी म्हणून धडपडणारी फॅमिली डॉकची ऑफिस मॅनेजर असे काही न काही पॉझिटिव असते. ते पॉझिटिव पकडायची हळू हळू मनाला सवय लावली की आपल्याला आतुन छान वाटायला लागते.
माझी आजी नेहमी सांगायची, ' दुसर्‍याच्या ताटाकडे बघू नये' थोडक्यात दुसर्‍याकडे काय आहे त्याच्याशी तुलना नको. सो कॉल्ड आयडिअल लाईफचा तुकडा चावडीवर मांडायची चढाओढ आणि इनफ्ल्युएंसर्सचा गलबला बघून 'ती काय म्हणाली असती ' असे मनात आल्यावाचून रहात नाही.

काही ध्येय ठेवून ते साधण्यासाठी माझ्या कुवतीप्रमाणे खटपट करण्यात मला समाधान वाटते. कुणीतरी दुसऱ्याने "तू खरं म्हणजे असंतूष्ट राहता कामा नये" हे माझ्यावर लादणे मला मान्य नाही.
"तू इतकी संथगतीने प्रगती करतो आहेस " हे सुद्धा लादणे अमान्य.
मी माझ्या पद्धतीने काम,आराम यांचे काळ ठरवले आहेत.
नवश्रीमंत प्रत्येक जगातल्या प्रत्येक शहरात मध्यवर्ती भागात येत राहणार आणि तिथले जुने लोक बाहेर,दूर ढकलले जाणार यात नवीन काही नाही. तो रेटा भयानक आहे. तो थोपवणे अशक्य. त्या शर्यतीबरोबरच मानसिक रेटाही आहेच.
पुस्तक हे एक निमित्त आहे पण @सामो यांनी घेतलेला विषय चर्चा सुरू करणारा आहे.

मस्त लिहिले आहे सामो. Happy

मला मात्र दिवसेंदिवस srd यांच्यासारखे होते आहे. एकुणएक सेल्फ हेल्प बुक्स किंवा सेल्फ हेल्प स्पिचेस हे पेट्रनायझिंग वाटायला लागलेत. मला मुळातच कोणी मला मी कसं वागावं हे सांगितलेलं आवडंत नाही. कधीकधी ते माझे विचार स्पष्टं करायला मदत करत असेल तर गोष्ट वेगळी, पण ते तेवढं जुळून येत नाही. किंवा माझ्या गाभ्याशी align होत नाही किंवा ते मला आज चालते पण काही महिन्यात एकतर मी ईवॉल्व होते पण ती व्यक्ती/ विचार तिथंच रहातात व ते माझ्यापुरते कालबाह्य होते. पुस्तकांत किंवा परक्या माणसात मला माझे solace शोधता येत नाही. I guess I am too quick, result oriented and too headstrong , हा दुर्गुण आहे की सद्गुण कुणाला माहिती !
माझा प्रतिसाद लेखातल्या भावनांशी समांतर नाही , तरीही इतर प्रतिसाद बघून मी लिहून टाकले.

सामान्य माणूस सामान्य का असतो तर त्यांचेकडे असामान्यांसारखे मोठमोठे गुण, निर्णय घेण्याची क्षमता, ते वागवण्याची कुवत नसते. काही वेळा परिस्थितीच सतत विरुद्ध जात राहाते.
"तुम्हाला नाही म्हणायचे असते तेव्हा हो म्हणायची चूक करू नका" ही सुद्धा पुस्तके आहेत. पण बाबांनो तो सामान्य माणूस बंधनाने बांधलेला असतो आणि कळ सोसून 'हो'च म्हणतो.

अस्मिता,
मलाही srd सारखे स्वतःपुरते ध्येय ठेवून प्रयत्न करायला आवडते. माझे असंतुष्ट असणे हे दुसर्‍याने काय मिळवले त्यावर अवलंबून नसते तर मी जे ध्येय ठरवले आहे तिथे पोहोचण्यासाठी प्रयत्न करणे, ते काम अजून चांगले कसे होईल याचा विचार्/कृती अशा प्रकारचे असते. इतरांच्या दृष्टीने माझे ध्येय काहीवेळा अतिसामान्य असते तर काहीवेळा फारच महत्वाकांक्षी. मला त्याने काही फरक पडत नाही, मी मनापासून प्रयत्न करते.

मी अधून मधून सेल्फ हेल्प बुक वाचते, मला पटेल्/झेपेल ते घेते बाकी सोडून देते. काही गोष्टी त्या फेजला गरजेच्या नसतात पण नंतर कधीतरी त्यातले काही वापरले जाते तर कधी हे आधी माहित असते तर.. असेही होते, आणि माहित नसल्याने जो प्रवास केला तो बघता तेव्हा थोडा त्रास झाला पण अनुभवातून शिकलो की ... असेही वाटते. काही वेळा चक्क जुनाच विचार फक्त वरचे पॅकेजिंग जरा चकाचक असे मनात येते.

भास्कराचार्य खूप आभार.
------------
पशुपत किती सकारात्मक लिहीले आहेत. कौतुकाबद्दल, आपले खूप आभार. माझ्या बाबांचा व माझा स्वभाव खूप सारखा आहे. आमच्या घरासमोर बाबांनी २ गुलमोहर लावलेले. त्यांचे नामकरणही केले होते - जय, विजय. प्रत्येक उन्हाळ्यात, त्यांना आलेली पहीली कळी ते मला आवर्जून दाखवित. पावसात आडोशाला बसलेली गडद मखमली, निळे ठिपके असलेली पाकोळी त्यांनी मला दाखवलेली. मी तो क्षण विसरुच शकत नाही. पावसाळ्याचे मंतरलेले वातावरण आणि ते नितांत सुंदर फुलपाखरु. काही क्षण निव्वळ मॅजिकल असतात. उदाहरणार्थ - एक धरण पहायला आमच्या शाळेने आम्हाला नेलेले होते. त्या पुलाच्या खाली काही लहान काळ्या पक्ष्यांची (https://en.wikipedia.org/wiki/Swallow) चिखलाने लिंपलेली, घरटी होती. एका घरट्यात, इवलीशी काळी चिमणी, अंडी उबवत बसली होती. मी तिला हात लावला तर ती इतकी मऊशार होती की बस्स. भुर्रकन उडाली.
---------------
@स्वाती -
>>>>>>>>>माझी आजी नेहमी सांगायची, ' दुसर्‍याच्या ताटाकडे बघू नये'
बाप रे काय सुंदर शिकवणुक आहे. अगदी बावनकशी. निव्वळ अमूल्य संस्कार आहेत हे.
-------------------------
@शरदजी - पटले.
---------------------
@अस्मिता - भावना पोचल्या.

सर्वांचे विस्स्तृप्रतिसादांबद्दल, आभार.

सामो, आपला मेंदू आवडत्या गोष्टींची आणि नावडत्या गोष्टींची वर्गवारी अतिशय अचूकपणे करत राहतो. तुमच्या मन:पाटलावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आठवणी तुम्ही अतिशय सुंदरपणे जपलेल्या आहेत , आणि त्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येणे या परता आनंदाचा भाग कोणता!
भाग्यवान आहात.
मला ही आवडणाऱ्या काही गोष्टी सापडलेल्या आहेत.
एक म्हणजे टेकडीवर फिरायला जाणे. ते मी न चुकता केले पंधरा-वीस वर्षे ,करत आलो आहे. सर्व ॠतूंमधला निसर्ग पहाणे म्हणजे त्या जगन् नियंत्याचे विविध विलोभनीय रूपांमधले दर्शन!
दुसरी गोष्ट, मी शास्त्रीय संगीताचा वाटसरू . माझ्या जीवनातलै एक कायमचे आवडते दृष्य म्हणजे मी माझ्या रियाजाच्या खोलीत बसलेलो आहे , सूर्य मावळलेला आहे , पूर्वेकडून चंद्र उगवत चालला आहे , आणि फणसाच्या झाडामागून लख्ख प्रकाश चंद्राचा पसरला आहे आणि मी छानसा बागेश्री किंवा पुरिया धनश्री गातो आहे आणि हातात माझ्या एक थंड दुधाचा कप आहे आणि मी या सगळ्यात रमून गेलेलो आहे . हे पण मी वरचेवर अनुभवत असतो.
आणि तिसरी अतिशय आवडती गोष्ट म्हणजे माझ्या आई-वडिलांना मी दर सुट्टीच्या दिवशी लॉंग ड्राईव्हला नेत असे! त्यात दोन
गोष्टी साध्य होत. त्यांच्याशी अतिशय छान उत्तम वातावरणात मनमोकळेपणाने गप्पा व्हायच्या आणि त्यांनाही या जगाची त्यांच्या परीने , माझ्या परीने सफर घडवण्याचा आनंद मला मिळायचा.
काळाच्या ओघात हा उपक्रम थांबला कारण ते दोघेही आता नाहीत.