बलशाली भारत होवो .... !

Submitted by छन्दिफन्दि on 28 August, 2022 - 10:02

राष्ट्रगीताची धून ऐकू आली कि अंगावर काटा येतो, छाती अभिमानाने भरून येते. वंदे मातरम सुरु होताच कान टवकारतातच , पण तन-मन आर्त होत, कुठेतरी खेचलं जातं. जगाच्या काना कोपऱ्यात कुठेही असलेल्या ( बहुतांशी) सर्व भारतीयांचं असचं होत असावं.
आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, त्यानिमित्ताने खूप सारे कार्यक्रम आयोजित केले जातायत, 'हर घर तिरंगा' ह्या पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन घराघरात तिरंगा फडकतोय, तिरंग्याचे पावित्र्य आणि सन्मान राखला जातोय ना ह्याचीही दक्षता घेतली जाईलच (ही अपेक्षा), सगळंच खूप सुखावणारं आहे.

आपल्या सुजलाम सुफलाम सोन्यासारख्या देशाला दोन्शे वर्ष लुबाडून, ती सगळी संपत्ती साता समुद्रापार आपल्या देशी धाडुन, भारताला दारिद्र्याच्या हलाखीच्या परिस्थिती ढकलून, त्याची शल्क करुन, म्हणजे त्याची होता होईल ती वाट लावून ७५ वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट १९४७ ला अखेर ब्रिटिश भारत सोडून गेले. गेले म्हणजे त्यासाठी हजारो देशभक्तांनी, स्वातंत्र्य सेनानींनी लढा दिला, आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आपल्या मातृभूमीला गुलामीच्या शृंखलांतून मुक्त केले.

ह्या ७५ वर्षांचा आढावा घ्यायचा झाला तर सर्व प्रथम हरित क्रांती, स्वातंत्रोत्तर नजीकच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा होता, गव्हासारख्या रोज लागणाऱ्या धान्यासाठीही इतर देशांवर अवलंबित्व होते. आज भारत अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे उलटपक्षी कितीतरी देशांना अन्नधान्याची निर्यात करत आहे. मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांति झाली, शहरीकरणं होऊ लागले, दळणवळणाची साधने प्रगत होऊ लागली. ट्राम, आगगाडी ते

मोनोरेल, मेट्रो , बैलगाडी ते खाजगी विमान सेवा, छोट्या नावा ते पंचतारांकित जहाजे हा बदल झपाट्याने झाला.

दळणवळणाच्या प्रगतीबरोबरच दूरसंवाद साधनांमध्येही फरक पडत गेला, पोस्ट ऑफिस, पत्र , तारा ते दूरध्वनी आणि त्यापलीकडे जाऊन मोबाइल फोनच नव्हे तर स्मार्ट फोन्स घरोघरी, गावोगावी जाऊन पोहचलेत आणि त्याबरोबरच पोहोचलं ते ३g, ४g करत नजीकच्या भविष्यात ५g च नेटवर्क.

गेल्या २-३ वर्षांत कॉव्हिडने पूर्ण जगाला वेठीस धरले, तेव्हा स्वतः लस बनवून फक्त आपल्या सर्व १२० कोटी जनतेलाच नाही तर आपल्या सारख्या अन्य प्रगतशील किंवा गरीब देशांनाही लसीचा पुरवठा केला.

संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाने तर भारतातील तरुणांसाठी जागतिक द्वारेच खुली झाली, त्यानंतरचा प्रगतीचा आलेख खूपच वेगाने उंचावला.

आधार कार्ड प्रणाली सारखा प्रोजेक्ट तर सर्व जगासाठी अभ्यासनीय युजकेस झाला.

भारताने विकसित केलेल्या UPI (Unified Payments Interface) चा किरकोळ खरेदी विक्रीसाठी नियमित वापर होतोच पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ही त्याचा स्वीकार आणि प्रसार होऊ घातलाय. भारताने अंतरिक्षात तर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेतच, पण पूर्वी चेष्टेचा विषय असणारे हवामान खाते आता अचूक अंदाज वर्तवू लागलेत. आज संरक्षण क्षेत्रात भारत, १४० देशांच्या यादीत, चौथ्या क्रमांकावर आहे तर २०२२ मध्ये आर्थिक दृष्ट्या UK लाही मागे टाकत जगातील पाचवी मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे. आणि आजच्या घडीला जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे. राजकीय दृष्टया सुद्धा भारताने कोणा एकाची बाजू न घेता नेहमीच राष्ट्रहित आद्य ठेवून स्वतंत्र धोरण अवलंबिले.

७५ वर्षांमधला हा आलेख नक्कीच प्रत्येक भारतीयांची मान उंचावणारा आहे. विशेषतः जेव्हा देशाची लोकसंख्या १२० कोटींवर पोहोचलीये, उत्तरेकडे शेजारी राष्ट्रे गेली कित्येक वर्षे सतत कुरापती काढायला बघत असतात, दहशतवाद्यांचा धोका गेली दोन-एक दशके जाणवतो आहे, नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे तेव्हा तर हे यश अधिकच कौतुकास्पद वाटते.

विविधतेने नटलेल्या आपल्या परंपरा ज्या अनेक जातीजमाती आणि धर्माच्या लोकाना सामावून घेतात, जेथे २६ च्या वर भाषा बोलल्या जातात, आणि तेव्हढ्याच प्रकारच्या त्यांच्या खाद्यपरंपरा, पेहराव आणि उत्सव आनंदाने साजरे केले जातात, जे कुठल्याही जुलूमशाहीला, बळजबरीला बळी न पडता पुरून उरले त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.

ज्यांच्याशिवाय हे केवळ अशक्य होते त्या आपल्या स्वातंत्र्य सेनानींना, ज्यांच्यामुळे विकसित झाले त्या वैज्ञानिकांना, तज्ञांना, शास्त्रज्ञांना आणि जे ही सार्वभौमता, प्रगती अबाधित ठेवतात त्या सैनिकांना त्रिवार सलाम !!!

इतर सर्व देशांप्रमाणे थोड्या फार प्रमाणात आपल्यासमोरही आव्हानं आहेत, जस की वाढती लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, धर्मावरचे राजकारण, भ्रष्टाचार पण त्यावरही उपाय करून, प्रसंगी मात करून प्रगतीचा हा अश्वमेध असाच धावता ठेवू आणि विजयाची पताका, प्यारा तिरंगा फडकत ठेवू !

वंदे मातरम !!!

तळटीप - माझे वयक्तिक मत मांडले आहे, जास्तीत जास्त योग्य माहिती/देण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव बघत असताना, एक संक्षिप्त आढावा घ्यावासा वाटला.

तो लिहीत असताना इतकं छान वाटलं, अभिमान वाटला आणि तो आपल्याबरोबर वाटावा वाटलं म्हणून हा लेख.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< कान खडे होतातच >>
एकदम दाताखाली खडा आल्यासारखं वाटलं, पहिल्याच परिच्छेदात. बदलाल का जरा?

छान लेख.

{{ अवांतर:-
प्रश्न: वाक्यात उपयोग करा- 'कान खडे होणे' (१- गुण)
उत्तर: एटीएम मधून पैशे बाहेर येण्याआधी नोटांची एक सुखद फडफड ऐकू आली आणि बबनचे कान घाईघाईने खडे झाले.}}

लेख आवडला,

"क्रिटिकल एन्लीसिस" तर आपण सगळेच कायम करत असतो, थोडीफार उत्तम बाबींची मांडणी झाली तर काहीच हरकत नाही असे वाटते

Thank you, तुम्ही वाचून प्रांजळ प्रतिक्रिया दिल्यात त्यासाठी धन्यवाद

@उपाशी बोका , @पाचपाटील , @मनिम्याऊ
ते खरं आहे , पण मला कान खडे होने साठी निश्चित शब्द मिळत नव्हता, आणि भावना तर पोहचवायच्या होत्या. लेख पूर्ण करण्याची तर खूप घाई होती, कारण खूप दिवसांपासून ते मनात होते( इंग्लंड च्या राणीचा सत्तरी निमित्त सोहळा झाला तेव्हापासून डोक्यात एक कल्पना तयार होत होती) १५ ऑगस्ट च्या समारंभाने तर आणखीनच उद्युक्त केले.
तर थोडक्यात जर कुणालाही मराठी योग्य शब्द / वाक्प्रचार मिळाला तर कृपया सांगा .

@पाचपाटील वाक्यात उपयोग छान केलात

खडे होना हा हिंदी वाक्प्रचार मराठीत वेगवेगळ्या शब्दांत अवतरतो. जसे,
कान खडे होना - कान टवकारणे,
रोंगटे खडे होना - रोमांच उठणे, शहारे येणे/ उठणे, अंगावर शिरशिरी येणे.
सामने आ के खडे होना - समोर येऊन ठाकणे, दत्त म्हणून उभे राहाणे
वगैरे . अर्थात अर्थछटा थोड्या वेगळ्या असतात.

हपा Lol Lol Lol Lol

Lol

आमचं हिंदी : दत्त कै के खडे रैना

हपा Lol

He said Datta and stood in front of him...

दत्ताच्या बरोबरीचा कोणी इंग्रजी देव आहे का ? ग्रिक लोकांत बरेचसे देव आहेत. त्यांच्याकडे असे काही म्हणत असतील. He said Poseidon and stood in front of him...

.प्रगतीचा हा अश्वमेध असाच धावता ठेवू >> अश्वमेध यज्ञाचे नाव आहे. धावतो तो यज्ञानिमित्त सम्राटाने सोडलेला घोडा.

टक्केवारी प्रतिसाद पाहता हां धागा एकंदर ललित लेखन विभाग मधून शुद्ध लेखन आणि व्याकरण विभागात हलवावा लागणार.

वयक्तिक, शक्ल धाडुन असे लिहिले आहे. प्लस भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे आहे. बाकी जनतेची सद्य परिस्थिती ह्यावर आम्ही काय बोलावे. त्यांच्या भावनेचा मान राखला पाहिजे. पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा.

75 वर्षाचं जगातील सर्व च देशाचा इतिहास बघितला ( अगदी काहीच मोजके च देश सोडले तर) सर्व च देशांनी सर्व च क्षेत्रात जोरदार प्रगती केली आहे.
कॉम्पुटर,मोबाईल,गाड्या ह्या पहिल्या कोण कडेच नव्हत्या त्या मुळे ती उदाहरण नको.
शेती क्षेत्रात उत्पादन सर्वच देशांनी वाढवले आहे भारतात काही वेगळे घडलेले नाही.
तुलना केली तर भारत मागेच पडला आहे.
शिक्षण क्षेत्र पासून सर्वच क्षेत्रात भारताची अधोगती झाली आहे.
सर्वात जास्त गरीब लोकांची सर्वात जास्त संख्या भारतात आहे.
कायदा आणि सू व्यवस्था काय आहे सर्वांना माहीत आहे.
रुपया पूर्ण घसरला आहे.
बेरोजगारी उच्च स्तरावर आहे.
जल स्तोत्र प्रदूषित होत आहेत.
मीडिया स्वतंत्र नाही माकड चाळे करत आहे.
त्या पेक्षा पाकिस्तानी मीडिया खूप उच्च दर्जा ची आहे
बाकी देशांशी तुलना च नको.
पाचवी महासत्ता म्हणजे काय हे कोणी ठरवले हेच कळतं नाही.

हेमंत३३, जाऊ द्या हो.
हे सर्व खरे असले तरी जे काय चांगले झाले तेवढेच फक्त पहायचे, इतर देशांच्या मानाने कमी असले तरी आम्ही भारतात रहात होतो त्यावेळेपेक्षा खूपच प्रगती झालेली आहे. - अमेरिकेतले तंत्रज्ञान चोरून का होईन! ( मी पुण्यात रहात असे.)
आता माणसे कधी सुधारणार? कामचुकार, प्रत्येक कामात अडचणी आणणे, वेळेवर न येणे, जिथे तिथे लाच, कायदे पाळायचे नाहीत - हे तर असेच चालायचेच. आमच्या आधीच्या पिढी पासून हेच. ते काही सुधारायचे नाही.

अमेरिकेतले तंत्रज्ञान चोरून का होईन! ( मी पुण्यात रहात असे.)
आता माणसे कधी सुधारणार? कामचुकार, प्रत्येक कामात अडचणी आणणे, वेळेवर न येणे, जिथे तिथे लाच, कायदे पाळायचे नाहीत - हे तर असेच चालायचेच.

नंध्या चे पुन्हा एकदा २ ड्रिंक घेऊन भारताला नावे ठेवणे सुरू. बरं अजून आरक्षणाबद्दल काही बोलला नाही. ते बहुदा तिसऱ्या ड्रिंक नंतर सुरू होत असेल. अमेरिकेकडून भारताने कोणते तंत्रज्ञान चोरले हे सांगू शकशील का? अमेरिकेतळे काही राक्षस शाळेत जाऊन निरपराध लोकांना गोळ्या घालतात ते कायद्यात बसते वाटते. भारताच्या सुधारण्यात तुझा केसभर (इथे तुझ्या मनात जो शब्द आहे तो इमॅजिन करावा) हातभार नाही. तुमच्या भाषेत ते लूजर्स का काय ते तू आहेस.
भारतात शिक्षण घेऊन बाहेरच्या देशात जाऊन तिथल्या देशाच्या आणि स्वतःच्या तुंबड्या भरून (ह्यात काही वावगे नाही, पण) तिथे बसून स्वतःच्या देशाला सतत नावे ठेवणे ह्याला कोडगेपणा म्हणतात.
मायबोलीच्या प्लॅटफॉर्मवरून भारताला सतत नावे ठेवणाऱ्या झक्क्की उर्फ नंध्या ह्या आयडीने खालील प्रश्नांची उत्तरे प्रामाणिक प्रमाणे द्यावीत.
१. स्वतःच्या मुलांना/ नातवांना शाळेत पाठवतानी कधीच भीती वाटली नाही का? असल्या अमानुष नारसंहारापेक्षा गड्या आपला गाव बरा असे वाटले नाही का?
२. कधी रेस्तराँ अथवा मॉल मध्ये कुत्सित किंवा आक्रमक रेसिस्ट कमेंट कधीच ऐकायला मिळाली नाही का? आपण इथले नाही आहोत परके आहोत अशी भावना कधीच आली नाही का?
३. एवढ्या वर्षांच्या तिथल्या वास्तव्यात कधीच कोणत्या अभारतीय व्यक्तीने तुमच्या कामात अडथळा आणला नाही का? गौर वर्णीय बॉस, लँडलोर्ड, पोलीस हे नेहेमी आपल्याशी सौजण्यानेच वागले का?

@Hemant 33
भारता बाहेर जाण्याआधी मलाही तसेच वाटायचे थोड्याफार प्रमाणात किती गर्दी, खड्डे ,भ्रष्टाचार , इ. इ.
परंतु दुसऱ्या देशात(अमेरिकेत ) काही वर्षे राहिल्यावर कळले कि इकडे हि प्रॉब्लेम्स आहेतच, तिकडून (भारतात असताना) त्याचं जे कौतुक मी ऐकलेलं ती झाली एक बाजू .
दुसरी बाजू इथे रहिवासी झाल्यावर कळली.
आणि तुम्ही प्रगतीचं म्हणाल तर ७५ वर्षांपूर्वी (developed country ) ब्रिटन (इतर युरोपिअन देश )कुठे होता आणि आता कुठे आहे ? आणि त्यांच्याच (अव ) कृपेमुळे भारत ज्या परिस्थितीत होता तेथून कुठे आला ?

नन्द्या७५
अमेरिकेतले तंत्रज्ञान चोरून का होईन!<<<< तुम्ही हा मुद्दा संदर्भ आणि पुराव्यांसह सिद्ध करावा अशी अपेक्षा !
आता माणसे कधी सुधारणार?<<<<< मग अमेरिकेत सर्व सुधारित आणि सर्वगुणसंपन्न लोक राहतात का ??? तर अजिबात नाही. इकडे हि फसवणारे ( अगदी गोऱ्या कातडीचे लोकंसुद्धा ), extreme वंशवाद, वर्णवाद (ज्यात लोकं मारली जातात) आहे, तरुणाची आयुष्य उध्वस्त करणारा ड्रुग्स चा विळखा ... हि लिस्ट आरामात कितीही लांब होऊ शकते.

आणि एक छोटी अनालॉजि द्यायची तर

एका चार जणांच्या कुटुंबाला आठ पोती धान्य दिले आणि आठ जणांच्या कुटुंबाला दोन पोती धान्य दिले. नंतर दुसऱ्या कुटुंबाला कसं रोज रडावं लागतं आणि पहिला कुत्म्बा कसं छान समाधानी आहे ह्याचे गुणगान गायल्यासारखे आहे

स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला आज ७६ वर्षे पूर्ण झाली. प्रौढ होऊन परिपक्वतेकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या भारत देशाला आणि नागरिकांना अनेक शुभेच्छा.