जेम्स वेब्ब दुर्बीण: काही रोचक आणि रंजक माहिती

Submitted by अतुल. on 16 July, 2022 - 13:12
James Webb Telescope

काहीच दिवसांपूर्वी जेम्स वेब या ‘नासा’ च्या इन्फ्रारेड दुर्बिणीने घेतलेले SMACS J0723 या दीर्घिका समुहाचे सुस्पष्ट फोटो जगभर प्रसिद्ध झाले. या दुर्बिणी विषयी विशेषतः ज्या रोचक आणि रंजक गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊ.

जेम्स वेब पृथ्वीभोवतो नव्हे तर सूर्याभोवती फिरते

    जेम्स वेब दुर्बीण (Observatory) हि आजवरची अवकाशात पृथ्वीपासून सर्वाधिक दूरवर स्थित केलेली इन्फ्रारेड दुर्बीण आहे. यापूर्वीची हबल दुर्बीण हि पृथ्वीपासून ५४० किलोमीटर अंतरावर पृथ्वीभोवती फिरत ठेवलेली आहे. पण जेम्स वेब्ब पृथ्वीपासून तब्बल पंधरा लाख किलोमीटर अंतरावर आहे! आणि विशेष म्हणजे पृथ्वीभोवती न फिरता ती सूर्याभोवती फिरते आहे. होय, ती पृथ्वीसोबतच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहे.

    अवकाशातील कोणत्याही खगोलाभोवती (ग्रह/तारे इत्यादी) वस्तू एका ठराविक कक्षेत राहण्यासाठी विशिष्ट गतीने त्या खगोलाभोवती फिरत ठेवावी लागते (अन्यथा ती वस्तू एकतर त्या खगोलावर जाऊन तरी आदळेल, नाहीतर आपली कक्षा सोडून कायमची दूर निघून जाईल). या वक्राकार गतीमुळे त्या वस्तूला आपसूकच केंद्रापसारक बल (Centrifugal force) प्राप्त होते. पृथ्वीभोवती अवकाशात पाच बिंदू असे आहेत. या बिंदूंच्या ठिकाणी पृथ्वी आणि सूर्य यांचे गुरुत्वीय बल, तसेच त्या बिंदूंच्या कक्षेत सूर्याभोवती फिरणाऱ्या वस्तूचे केंद्रापसारक बल, हि सर्व बलं एकमेकांस तुल्यबळ ठरतात. इथे या सर्व शक्ती सारख्याच प्रमाणात पण परस्परविरोधी बाजूनी वस्तूला ओढत असतात. परिणामी या जागेत कोणतेही एक बल वा गुरुत्वाकर्षण प्रबळ नसते. म्हणून या ठिकाणी वस्तू “ठेवल्यासारखी” जागच्या जागी स्थिर राहू शकते. यांना लॅग्रँजियन बिंदू (Lagrangian Points) असे म्हणतात. कारण इटालियन-फ्रेंच गणिततज्ञ जोझेफी-लुईस लॅग्रँजे यांनी कोणत्याही दोन ग्रहगोलांदरम्यान असे पाच बिंदू कुठे असू शकतात ते शोधण्याचे समीकरण इ.स. १७७२ साली तयार केले.


    वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे पृथ्वी आणि सूर्य यांच्या आसपास असे पाच बिंदू आहेत. जेम्स वेब यातीलच एका म्हणजे L2 या बिंदू शेजारी त्या बिंदू भोवती छोट्या कक्षेत फिरत ठेवलेली आहे (या व्यतिरिक्त अजूनही असे काही पाच-सहा उपग्रह यापूर्वी तिथे फिरत ठेवलेले आहेत). जेणेकरून तिची पाठ नेहमी पृथ्वी आणि सूर्य यांच्या बाजूला तर तोंड विरुद्ध दिशेला अवकाशाकडे असेल. याचा फायदा असा कि सूर्याकडून येणारी उर्जा तिच्या पाठीशी बसवलेल्या सौरउर्जा पॅनलला मिळत राहील आणि त्याचबरोबर तिच्या तोंडाकडे अवकाश निरीक्षणासाठी जे रेडिओ-आरसे बसवले आहेत त्यांना सूर्याचा वा पृथ्वीचा अडथळा कधीच येणार नाही.
    घराच्या समोर घरातल्या गोंगाटापासून बऱ्याच दूर अंतरावर घराकडे पाठ करून दूरवर आकाशात पाहत खुर्ची टाकून बसावे, अगदी तसेच हि दुर्बीण पृथ्वीपासून तब्बल पंधरा लाख किलोमीटर अंतरावर पृथ्वीकडे पाठ करून “बाहेरच्या अवकाशात डोळे लावून” बसली आहे. आणि तशीच ती पृथ्वीसोबत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहे.

हबल आणि इतर दुर्बिणी

    याआधी एप्रिल १९९० मध्ये हबल दुर्बीण प्रक्षेपित केली होती. ती खरेच “दुर्बीण” होती. काचेची दुर्बीण. जिच्यातून दीर्घ-प्रदीर्घ अंतरावर असणाऱ्या तेजोमय खगोलांकडे पाहता येत असे (जसे तारे, आकाशगंगा, मोठे पण परप्रकाशित ग्रह, नेब्युलाज इत्यादी). या दुर्बिणीमुळे अतिदूरवर असलेल्या बऱ्याचशा खगोलांच्या स्वच्छ स्पष्ट प्रतिमा प्रथमच मानवाला पाहता आल्या. इतकेच नाही, तर विश्वाचे वय १३.७ अब्ज वर्षे आहे याचे गणित, जवळपास प्रत्येक दीर्घिकेच्या (आपल्या दिर्घिकेला ‘आकाशगंगा’ म्हणतात. विश्वात अशा अब्जावधी आहे) केंद्रस्थानी अतिविशाल कृष्णविवर असते, नेब्युला ढगांपासून सूर्यमाला निर्माण होतात, विश्वातले सर्वात मोठे तारे, जवळपासची अँड्रोमेडा दीर्घिका, विश्वात गूढपदार्थाचे (Dark Matter) अस्तित्व इत्यादी. या व अशा कितीतरी महत्वाच्या शोधांमध्ये ‘हबल’ने मोलाची भूमीका बजावली आहे. एडविन हबल या प्रख्यात खगोल वैज्ञानिकाचे नाव तिला दिले गेले. (अर्थात ‘नासा’ सारख्या जगातील इतरही अवकाश संशोधन संस्थांनी इतरही अनेक दुर्बिणी अवकाशात स्थिर केल्या आहेत).


इन्फ्रारेड दुर्बीण? का? असे काय आहे इन्फ्रारेड प्रकाशात?

    अतिदीर्घ अंतरावरून येणाऱ्या दृश्यमान प्रकाशाला प्रचंड मर्यादा येतात. जसे कि कोट्यावधी प्रकाशवर्षे दूर अंतरावरच्या त्या तेजोमय खगोलांकडून येणारा प्रकाश, हा वाटेत असणारे धुलीकणांचे अतिविशाल ढग, अस्ताव्यस्त पसरलेले नेब्युलाज व इतर अनेक प्रकाशमान खगोल यांच्यामुळे 'हबल'पर्यंत येईतोवर फार फार क्षीण झालेला असतो. त्यामुळे अतिदीर्घ अंतरावर असणाऱ्या दीर्घिका वा ताऱ्यांच्या प्रतिमा खूपच धूसर येत. म्हणून त्यांचे निरीक्षण करणे फार जिकीरीचे होऊन जाते. यासाठी केवळ दृश्य प्रकाशकिरणांवर अवलंबून न राहता त्या तेजोमय खगोलांकडून येणाऱ्या इतर किरणांच्या प्रतिमा घेणे जास्त उपयुक्त ठरते. याचसाठी दृश्य प्रकाशकिरणांपेक्षा जास्त लांबीच्या प्रकाशकिरणांची निवड केली जाते. या किरणांना वास्तविक ‘प्रकाश’ म्हणता येणार नाही कारण ते डोळ्यांना दिसत नाहीत. संपूर्ण विद्युतचुंबकीय लहरी आणि त्यातल्या आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या किती हे खालील आकृतीवरून ध्यानात येते.


    तारे/नेब्युलाज/दीर्घिका अशा विश्वातल्या तेजोमय खगोलांमधून या सर्वच लहरी उत्सर्जित होत असतात (कारण या तेजोमय ज्योती म्हणजे अतिविशाल अक्राळविक्राळ अशा नैसर्गिक अणुभट्ट्याच असतात जणू). वर दाखवल्याप्रमाणे त्यातल्या फार कमी लहरी आपल्याला दिसतात ज्याला आपण दृश्य प्रकाश म्हणतो.

यामध्ये लक्षात येईल “दृश्य प्रकाशकिरणांपेक्षा कमी तरंगलांबीच्या” लहरी म्हणजे अल्ट्राव्हायोलेट, एक्स-रे आणि गामा किरणे. वर उल्लेख केल्याप्रमाणे या तरंगलहरी अवकाशातच विविध अडथळे आणि धुलीकण यांमध्ये विरून जातात किंवा अतिक्षीण होतात. आणि “दृश्य प्रकाशकिरणांपेक्षा जास्त तरंगलांबीच्या” लहरी म्हणजे इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ लहरी या सर्वाधिक दीर्घ अंतराचा प्रवास करतात.

अजस्त्र अशा रेडिओ दुर्बिणी आणि वैश्विक पार्श्वकिरणांचा शोध

    यापैकी रेडिओ लहरी पकडून त्याद्वारे अभ्यास करण्यासाठी रेडिओ दुर्बिणीची निर्मिती केली गेली. तरंगलांबी जास्त असल्याने या दुर्बिणीचे आरसे (परावर्तक) मोठे असावे लागतात. तसेच जास्त तरंगलांबीच्या लहरी असल्याने पृथ्वीच्या वातावरणाचा फारसा त्रास होत नाही. त्यामुळे या दुर्बिणी जमिनीवरच स्थिर केलेल्या असतात. कोणत्याही दुर्बिणीला अतिदूरच्या वस्तू जास्तीत जास्त स्पष्ट दिसाव्यात यासाठी चांगले अँग्युलर रिझोल्यूशन असणे आवश्यक असते. ते मिळवण्यासाठी त्यांचा आकार वाढवला गेला. त्या अवाढव्य झाल्या. जगातील अनेक नामांकित अवकाश संशोधन संस्थांनी या रेडिओ दुर्बिणी बसवल्या आहेत. या दुर्बिणीद्वारे रेडिओतरंग आणि मायक्रोवेव्ह पकडले जातात.


    वैश्विक पार्श्वकिरणोत्सर्ग CBMR (Cosmic Background Microwave Radiation) म्हणजे विश्वनिर्मितीच्या अगदी सुरवातीच्या काळात निर्माण झालेले मायक्रोवेव्ह तरंगकिरण. विश्वातील निर्वात पोकळीत हे किरण अजूनही अस्तित्वात असल्याचा शोध रेडिओ दुर्बिणीमुळे पण केवळ अपघातानेच लागला. या शोधामुळे विश्वनिर्मितीच्या अभ्यासामध्ये फार मोलाची मदत झाली. “हे किरण कुठून येत आहेत? रेडिओ दुर्बीण खराब झाली कि काय? ती गरम झाल्यामुळे किरणासारखे काही दिसतेय कि काय? त्यावर कबुतरांची घाण पडली कि काय?” अशा शंकांनी सुरवात झालेला प्रवास CBMR च्या शोधापाशी थांबला. आणि ते शोधणाऱ्या वैज्ञानिकांना त्यावर्षीचा नोबेल पुरस्कार मिळाला.

‘हबल’ने शोधली सर्वात दूरची दीर्घिका

    दृश्य प्रकाशावर काम करणाऱ्या दुर्बिणी झाल्या, रेडिओ दुर्बिणी झाल्या. अतिदूरच्या (अब्जावधी प्रकाशवर्षे) खगोल ज्योतींकडून येणारे किरण पकडण्यात या दोन्हींना अगदी पूर्ण नसले नसले तरी बरेचशे यश आले होते. हबलद्वारे अतिदूरवरील दीर्घिकांचा अभ्यास करणाऱ्या टीमला (MACS team) काही दीर्घिकांचे समूह असे सापडले कि ते गुरुत्वीय भिंगेसारखे (Gravitational Lens) काम करत होते. त्यामुळे या समुहाच्या मागील दीर्घिका फारच ठळक आणि स्पष्ट दिसत होती. जसे नेहमीच्या काचेच्या भिंगेतून पलीकडची वस्तू मोठी दिसते, अगदी तसेच दीर्घिकांच्या समुहात असलेल्या तीव्र गुरुत्वाकर्षणामुळे पलीकडून येणाऱ्या प्रकाशाचे विस्फारण होते आणि पलीकडचे खगोल ठळक व मोठे दिसू लागतात. या दीर्घिका समूहांपैकी MACS 0416, MACS 0025, MACS 0647, MACS 0717 हि काही नावे.
    अशा समूहांपैकीच एक SMACS 0723. याच्या मध्ये विश्वाच्या सुरवातीच्या काळातील दीर्घिका दडल्या आहेत असे आढळून आले. 'हबल'ने शोधलेली आजवरची सर्वात दूरवरची दीर्घिका म्हणजे GNz11. हि साडेतेरा अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर आहे. म्हणजे आता जो काही तिच्याकडून येणारा प्रकाश दिसतो आहे तो तब्बल साडेतेरा अब्ज वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे विश्व निर्मितीनंतर (जी जवळपास १४ अब्ज वर्षांपूर्वी झाली) केवळ चाळीस ते पन्नास कोटी वर्षानंतरचा हा प्रकाश!

जेम्स वेब्ब दुर्बीण: अंदाज पन्नास कोटी डॉलर, प्रत्यक्ष खर्च दहा अब्ज डॉलर

    या अतिदूरच्या समुहातून दिसणाऱ्या दीर्घिका अजून स्पष्ट दिसण्यासाठी, इन्फ्रारेड किरणांवर चालू शकणाऱ्या दुर्बिणीची गरज असल्याचे काही वैज्ञानिकांना अगदी १९८० पासून वाटत होते. प्रत्यक्षात मात्र सर्व चाचपण्या गणिते आकडेमोडी आणि प्रपोजल बनवायला १९९६ साल उजाडले. या साली 'नासा' मधल्या एका कमिटीने १३.६ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरच्या दीर्घिका पाहता येतील अशी इन्फ्रारेड दुर्बीण बनवून ती २००७ पर्यंत लॉंच करण्याचा प्रस्ताव मांडला. Next Generation Telescope असे नाव असलेला हा प्रोजेक्ट होता. १९९६ साली यासाठी अपेक्षित खर्च अंदाजे पन्नास कोटी डॉलर इतका काढला होता. अमेरिकेसाठी तो अर्थातच किरकोळ होता. त्यानुसार काम सुरु झाले खरे पण पुढे अनेक अडचणी येत गेल्या. ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. आणि अखेर २० मीटर x १४ मीटर इतका पाया ज्यावर पूर्णपणे सोन्याचा वर्ख दिलेला ६ मीटर उंचीचा आरसा आहे, अशी तब्बल ६ हजारहून अधिक किलो वजनाची हि महाकाय इन्फ्रारेड दुर्बीण तयार झाली. ती लॉंच व्हायला २०२१ चा डिसेंबर उजाडला. तोवर खर्च सुद्धा अवाढव्य म्हणजे दहा अब्ज डॉलरच्या घरात गेला होता! आणि १९६० च्या दशकात ‘नासा’चे नेतृत्व करणारे जेम्स वेब्ब (ज्यांच्या काळात नासाचे यान चंद्रावर उतरले) यांच्या सन्मानार्थ या दुर्बिणीचे ‘जेम्स वेब्ब’ असे नामकरण करण्यात आले.


    २५ डिसेंबर २०२१ रोजी दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गियानामधल्या कौरौ शहराजवळील युरोपीयन अंतराळ केंद्राच्या अवकाशयान उड्डाण तळावर हि बहुचर्चित दुर्बीण रॉकेटसोबत अंतराळात झेपावायला सज्ज झाली होती. लॉंच करत असताना किंवा नंतरच्या काळातही दुर्बीण नादुरुस्त होऊ शकते. अशा वेळी ‘हबल’कडे अंतराळयानातून वैज्ञानिक पोहोचून हवी ती दुरुस्ती करू शकत होते. आणि तशी अनेकदा केलीसुद्धा आहे. कारण 'हबल' तुलनेने जवळ होती. पण 'जेम्स वेब्ब'बाबत तो पर्यायच नाही. इतक्या दूर अंतरावर अवकाशयानाने दुरुस्तीसाठी जाणे शक्य नव्हते आणि नाही. त्यामुळे लॉंच नंतर कोणत्याही कारणाने दुर्बीणीला जर काही अपघात वा नुकसान झाले असते, तर पंचवीसहून अधिक वर्षे सुरु असलेला दहाअब्ज डॉलरचा हा प्रोजेक्ट थेट कचऱ्यात जाऊ शकला असता!
    पण सुदैवाने तसे काही न होता, झेपावलेल्या रॉकेटमधून वाहून नेली गेलेली हि दुर्बीण तब्बल पंधरा लाख किलोमीटरवर असलेल्या L2 या आपल्या गंतव्यस्थानी जवळपास एक महिन्याने सुव्यवस्थितपणे पोहोचली. तिथे स्थिर झाल्यानंतर काहीच महिन्यांनी एक छोटुसा दगड (छोटी उल्का म्हणता येईल हवे तर) दुर्बिणीच्या आरशावर आदळला आणि इकडे वैज्ञानिकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण सुदैवाने कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही.

एक बाजू गरमागरम तर दुसरी अतिथंड

    इन्फ्रारेड दुर्बिणीत सगळ्यात अडथळा असतो तो उष्णतेचा. कारण सूर्याच्या उष्णतेमुळे निर्माण होणारी मायक्रोवेव्ह आणि इन्फ्रारेड किरणे, ज्यासाठी दुर्बीण बनवली आहे त्या दूरवरून येणाऱ्या किरणांना अगदी सहज वरचढ ठरली असती आणि मग दुर्बीण काही कामाचीच राहिली नसती. हे टाळण्यासाठी बहुस्तरीय सूर्य ढाल बनवलेली आहे. ज्यायोगे सूर्याच्या बाजूचे तापमान ८५ डिग्री पर्यंत गेलेले असताना दुर्बिणीच्या भागात मात्र अतिथंड म्हणजे उणे २३३ डिग्री इतके असते.


आजवरच्या सर्वधिक दूर दिर्घिकेचा फोटो

    यथावकाश या दुर्बिणीने आपले काम सुरु केले, आणि जसे आपणा सर्वाना माहिती आहे, काहीच दिवसांपूर्वी या दुर्बिणीने घेतलेला SMACS J0723 या दीर्घिका समुहाचा सुस्पष्ट फोटो जगभर प्रसिद्ध झाला. साडेचारहून अधिक अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेला हा समूह, वाळूचा अगदी छोटा कण हातभर अंतरावर धरला कि जितका दिसेल, तितका प्रत्यक्ष आकाशात त्याचा आकार आहे. पण 'जेम्स वेब्ब'ने अनेक तासांच्या अवधीत विविध तरंगलांबीच्या इन्फ्रारेड किरणांचे फोटो घेऊन हा एकसंध फोटो बनवला.


    आधी लिहिल्याप्रमाणे SMACS J0723 हा दीर्घिका समूह भिंगेसारखे काम करतो व त्यामुळे याच्या मागे असलेल्या दीर्घिका ठळक दिसतात. त्यातीलच एक आहे १३.६ अब्ज प्रकाशवर्षे दूर. म्हणजे हबलद्वारे शोधलेल्या GNz11 पेक्षा हा वीस लाख वर्षाहून अधिक जुना प्रकाश! पण विश्वाचा सुरवातीचा वीस लाख वर्षाचा फरक संशोधकांच्या दृष्टीने खूप मोठा असतो. यामुळे विश्वाच्या सुरवातीच्या काळातला बराचसा टप्पा समजण्यास मदत होणार आहे.

    दहाहून अधिक वर्षे पुरेल इतकी क्षमता असलेल्या या दुर्बिणीमुळे येणाऱ्या काळात अनेक गोष्टी उलगडण्यास मदत होईल असा विश्वास `नासा`च्या वैज्ञानिकांना वाटतो. हि तर केवळ सुरवात आहे!

संदर्भसूची:
Webb Orbit:
https://webb.nasa.gov/content/about/orbit.html

NASA’s Webb Delivers Deepest Infrared Image of Universe Yet:
https://www.nasa.gov/image-feature/goddard/2022/nasa-s-webb-delivers-dee...

What These Dazzling James Webb Telescope Images Mean for Space:
https://time.com/6195785/james-webb-telescope-images-released-space/

NASA unveils first images from James Webb Space Telescope:
https://www.washingtonpost.com/science/2022/07/11/nasa-james-webb-space-...

Webb telescope reaches its final destination far from Earth:
https://www.nature.com/articles/d41586-022-00128-0

Webb Reveals Deepest View of Universe Yet:
http://www.sci-news.com/astronomy/webbs-first-deep-field-10989.html

Hubble Space Telescope:
https://en.wikipedia.org/wiki/Hubble_Space_Telescope

Galaxy cluster:
https://en.wikipedia.org/wiki/Galaxy_cluster

MACS J0416.1-2403:
https://en.wikipedia.org/wiki/MACS_J0416.1-2403

Webb's First Deep Field:
https://en.wikipedia.org/wiki/Webb%27s_First_Deep_Field

GN-z11:
https://en.wikipedia.org/wiki/GN-z11

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@केशवकूल, वाह! मस्त माहिती दिलीत. अवकाशाचा विस्तार विचारात घेऊन बनवलेले असे काही टेबल आहे हे माहित नव्हते. म्हणजे दहा लाख प्रकाश वर्षांच्या पुढे प्रत्यक्ष अंतर वाढलेले असते तर!
(On the 'light'er note: हे म्हणजे इन्कमटॅक्स टेबल सारखे वाटते आहे. पहिले दहा लाख झिरो टॅक्स, पुढे जितका जास्त इनकम तेवढा जास्त टॅक्स Lol Light 1 )

बाय द वे, वरच्या एका कॉमेंट मध्ये मी जे विधान केले आहे त्याबाबत...

>> समजा अशीच आणि इतक्याच जुन्या काळातली किरणे उत्तरेला किंवा अन्य दिशांकडे आढळली तर त्याचा अर्थ काय होईल?

हे घडलेले आहे. आणि धाग्यातच ते उदाहरण आहे. 'हबल' ने शोधलेली GNz11 हि दीर्घिका उत्तरेला आहे, तर जेम्स वेब्ब ने शोधलेली दीर्घिका दक्षिणेला आहे. दोन्ही थोड्या फरकाने त्याच अंतरावर दिसत आहेत. कोणत्याही दिशेला तितक्या अंतरावर काहीतरी अस्तित्वात असेल. या दोन 'दिसल्या; कारण तिथून येणारे किरण 'दिसले' इतकेच.

म्हणजे सगळीकडे 'एकाच वेळी' विश्वाची 'सुरवात'! हो, कारण अवकाश प्रसारण पावत आहे याचाच अर्थ विश्व सुरवातीला एकत्र होते. सगळे अवकाश एक होते. Singularity! नंतर अवकाश म्हणजेच दिशा तयार झाल्या. Big Bang is not happened in the space. Big bang is the space itself.

Big Bang is not happened in the space. Big bang is the space itself.
>>>>+१
Higgs Boson theory ही तेच सांगते ना, म्हणून तर त्याला The God particle असेही म्हणतात. (ही थेअरी मागे पडली असल्यास कल्पना नाही. ) दृष्यादृष्य सृष्टीच्या चराचरात ह्या कणाचा अंश आहे. ह्या अंशातही एक सृष्टी आहे. म्हणून तर हे ब्रह्माण्ड (आपल्या मर्यादेच्या) अंतहीन आहे. दिशा, काळ, वेळ ,सूर्योदय , सूर्यास्त, ग्रहनक्षत्रांचे स्थान, अवकाशातील कुठलीही भौगोलिक घटना, धूमकेतूंच्या कक्षा, स्थान, अंतरे तर मानवी मर्यादांमधे घालून केलेला आकलनाचा प्रयत्न आहे. हे सगळे मानवी मर्यादेबाहेर असल्याने केवळ समजण्यासाठी त्याला एका डब्यात घालून दाखवावे लागते, जशा आपल्या जाणीवांच्या मिती उत्क्रांत होतील तश्या ह्या व्याख्या बदलत राहतील/डबा मोठा होईल, पण डबा तो डबाच! त्यामुळे हे सगळे कुठेतरी नेहमीच थिटे असणार आहे. Happy

अतुल एक शंका. वर एके ठिकाणी आपण लिहिले आहे की
"अर्थात हे होण्यासाठी वेळ लागतो. हबल मध्ये तर फार वेळ लागत असे. कारण प्रचंड गतीने ती दुर्बीण पृथ्वीभोवती फिरते. त्यामुळे दुसऱ्या फिल्टरने त्याच ठिकाणाहून प्रतिमा घेईतोवर बरीच वाट पाहावी लागे.

जेम्स वेब्ब सुद्धा याच तत्वावर फोटो घेते. इथे तितका वेळ लागत नाही. कारण हि पृथ्वीभोवती फिरत नाही."
ह्या दुर्बिणी आकाशाच्या एका जागी रोखून ठेवल्या असतात. त्यामुळे बराच वेळ हा प्रॉब्लेम नसावा. तसेच वेब सुद्धा सूर्याभोवती फिरत आहे.
मला वाटत की हबल मध्ये टाईम टू टाईम पृथ्वी आड येत असणार. वेबला हा इश्यू नसावा.

१)As Hubble orbits Earth, the Fine Guidance Sensors lock onto stars. The Fine Guidance Sensors are part of the Pointing Control System and aim Hubble in the right direction. The telescope can lock onto a target that is one mile away without moving more than the width of a human hair.
As Hubble orbits Earth, the Fine Guidance Sensors lock onto stars. The Fine Guidance Sensors are part of the Pointing Control System and aim Hubble in the right direction. The telescope can lock onto a target that is one mile away without moving more than the width of a human hair.
२)Hubble pictures start out as shades of black and white. The Space Telescope Science Institute adds colors to the pictures for different reasons. Sometimes colors are chosen to show how an object might look to the human eye. Other times colors are used to highlight an important detail
हे म्हणजे जुने काळे पांढरे चित्रपट कलर्ड करण्यासारखे आहे.

हबल मध्ये टाईम टू टाईम पृथ्वी आड येत असणार. >> +१. वेबच्या आडही सूर्य येत असेल, पण त्याची प्रचंड मोठी कक्षा आणि मोठा ऑर्बिटल पिरेड असल्यामुळे त्याचा कालसापेक्ष आवाका फारच जास्त असावा.

उत्कृष्ट लेख. अनेकांना किचकट वाटू शकणारी माहिती अगदी सोप्या शब्दांत लिहिली आहे. शिवाय ती रंजकही आहे.
लेख तर सुंदर आहेच. आणि प्रतिसादही एकापेक्षा एक सुंदर आहेत. त्यांवर अभिप्राय द्यायचा झाला तर एक लांबलचक लेखच होईल.
हा लेख मराठी विज्ञानपत्रिका किंवा तत्सम नियतकालिकात यावा.

>> आपल्या जाणीवांच्या मिती उत्क्रांत होतील तश्या ह्या व्याख्या बदलत राहतील

वाह! थोडक्यात बरेच काही सांगून जाणारे वाक्य आहे. एक ठळक उदाहरण मला जाणवते ते असे कि एकाच गतीत असलेली वस्तू, त्याला कसला अडसर आला नसेल तर, त्याच गतीत सातत्त्याने जात राहते. हा गतीचा साधा नियम. समजा हि वस्तू लोखंडी गोळा आहे. पण, ज्या व्यक्तीला काळाच्या मितीत मागे पुढे 'दिसते' त्याला तो गोळा दिसणार नाही तर ती एक लोखंडी कांबी (rod in the dimension of time) दिसेल Happy

@केशवकूल, हो हबल प्रचंड वेगाने फिरते पृथ्वीभोवती. शेकडो किलोमीटर उंचीवरून सुद्धा एक पृथ्वीप्रदक्षिणा करायला तिला फक्त दीड तासाच्या आसपास वेळ लागतो म्हणजे पहा. त्यामुळे हो, सातत्याने पृथ्वी आड येणे हि समस्या होती हे मी सुद्धा वाचले आहे.

@हरपा: नाही वेबच्या आडही सूर्य कधीच येणार नाही. पृथ्वी आणि सूर्याकडे कायमची पाठ राहील असे तिला बसवले आहे.

@हीरा खूप खूप धन्यवाद. आपले प्रतिसाद नेहमीच माहितीपूर्ण असतात. लिहिलत लांबलचक लेख तर वाचायला नक्की आवडेल.

@फालतू Wink Lol

थॅंक्स अतुल
आपला हा लेख ज्ञानात भर टाकणारा आणि त्याच वेळी मनोरंजक ही आहे. खूप छान चर्चा.
अजून येऊ द्या.

लेख अगदी सोप्या भाषेत आहे. आवडला.
प्रतिसादातील चर्चा ही माहितीत भर पाडत आहे. लिंक्स वाचतो आहे. हे सगळं किती इनसिग्निफिकंट आहे आणि त्याच वेळी मानवाने मेंदूच्या जोरावर काय करुन दाखवलं आहे! डोकं शब्दशः गरगरतय!

एका जागेवर स्थिर कोणतीच अवकाशात वस्तू नाही
अस्तित्व टिकवूनठेवण्यासाठी ठराविक वेगाने फिरणे हे must आहे.
नाहीतर सूर्यमाला कुठल्या कुठे निघून जाईल आणि स्थिर वस्तू विशाल पोकळीत हरवून जाईल.

Hemant 33
हे आठवले.
In Lewis Carroll's Through the Looking-Glass, the Red Queen tells Alice that the world keeps shifting so quickly under her feet that she has to keep running just to keep her position. we are forced to keep running merely to keep still.
आपल आणि महागाईचे हेच नाते आहे.

रच्याकने: जेम्स वेब्ब दुर्बिणीचं नाव बदलावं असा एक मतप्रवाह आहे.
जेम्स वेब्ब लवेंडर स्केअर मध्ये त्याच्या नासाच्या कारकीर्दीत सामिल होता की काय असा एक संशय आहे.
हे एक चांगलं आर्टिकल वाचनात आलं.
त्यातलाच एक कोट,
The question is whether we judge them by the standards of their time, or by those we hold today.
टिळक, सावरकर, गांधी, कॅनडाचा जॉन ए मॅक्डोनाल्ड, अमेरिकेचा वॉशिग्टंन आणि अनेकोनेक ऐतिहासिक व्यक्ती हाडामासाच्या असल्याने वैयक्तिक आयुष्यात किंवा सार्वजनिक आयुष्यात घेतलेले निर्णय काळाच्या कसोटीवर तावुन सुलाखुन निघत नाहीत. मग असे पेच पडतात.

विश्वाचे रूप बघून डोक सुन्न होत काही सुचत नाही .
अती प्रचंड अती विशाल ,अती किचकट असे रूप आहे.
माणसाची चिकाटी पण मोठी आहे.जाणून घेण्याची जीज्ञासा माणसात प्रचंड आहे.

विश्व आणि सजीव सृष्टी खरेच खूप किचकट रचना आहे..
अती प्रचंड शक्ती असणारा तरुण माणूस पण मेंदू मधील काही मिलिमीटर भागात दोष निर्माण झाला तरी शक्ती हिन होतो.
त्याचे शक्ती शाली स्नायू काही कामाचे राहतं नाहीत.
निसर्ग मधील प्रतेक गोष्टीत मी हरवून जातो

फारच समयोचित आणि माहितीपूर्ण लेख, अतुल !
जेम्स वेब पृथ्वीसोबतच सूर्याभोवती फिरते, हे लेकीने जेव्हा सांगितले होते तेव्हा फारच भारी वाटले होते.
This is a developing story, नवीन अपडेट्स लेखात (किंवा प्रतिक्रियेतही ) वाचायला आवडतील.
याच संदर्भातील काल न्यूजलेटरमध्ये वाचलेली एक बातमी, MITचे प्रोफेसर Robert Simcoe ही दुर्बिण वापरून १०० तास निरीक्षण करणार आहेत. Happy

पृथ्वी आणि सूर्याकडे कायमची पाठ राहील असे तिला बसवले आहे >> अच्छा! पण मग त्याचा व्ह्यू (दृष्टी - कोन) कायम बदलत राहील ना? एक पे रेहना - असं होणार नाही.

खूप सुंदर लेख. माझ्यासारख्यांना अवघड असणारा एक महत्वाचा विषय सोपा करून समजावून सांगितला आहे.
शाळेच्या मुलांसाठी खूप उपयोगी लेख आहे.

ही दुर्बीण पृथ्विभोवती फिरत नसून सूर्याभोवती फिरते.
इथेच एक धोका संभवत असतो तो म्हणजे इथे अशनी असू शकतात आणि ते आपटतील.

आताच्या बातमीनुसार तसेच लहान अशनी आपटून आरशांची वाट लागली आहे.

१. फोटो १३ अब्ज वर्षांपूर्वीचा आहे का? तर हो आहे. फोटोतल्या प्रकाशाचे वय तेवढेच आहे.

२. त्या आकाशगंगे मधून जेव्हा प्रकाश निघाला तो काळ आणि तेव्हाचे ती आकाशगंगा आणि आपण यातले अंतर ५ अब्ज वर्षे होते किंवा असावे.

३. या विश्वात ती आकाशगंगा आणि आपण दोघेही जेथे होतो तेथेच स्थिर असतो तर तेव्हा आणि आजही हे अंतर तेवढेच स्थिर असते. आणि प्रकाशाला पोहोचायला तेवढाच वेळ लागला असता. विश्व प्रसरण पावत असल्याने तो वेळ प्रचंड वाढत चाललेला आहे.

४. आता ती आकाशगंगा जर अजूनही अस्तित्वात असेल तर तिच्यापासून आपले या घडीचे अंतर अंदाजे ४६ अब्ज वर्षे झालेले असेल.

>> एका जागेवर स्थिर कोणतीच अवकाशात वस्तू नाही

मुद्दा योग्यच आहे. गती हि सापेक्ष असते. इथे 'स्थिर' आपल्या (पृथ्वीच्या) तुलनेत, असे अभिप्रेत आहे. वास्तविक त्यास पृथ्वीची गती असते. धाग्यात लिहिल्याप्रमाणे L2 च्या ठिकाणी सर्व बलं एकमेकास मारक ठरल्यामुळे तिथे उपग्रह नेऊन सोडला कि पृथ्वीसोबत तो आपसूक फिरत राहतो. या आकृतीमध्ये पाहिल्यास लक्षात येईल पृथ्वी आणि सूर्याभोवतीची गुरुत्वाकर्षण क्षेत्रे कशी प्रभावी आहेत आणि लॅग्रँजियन बिंदूंचे महत्व का आहे:


L2 निवडण्यामागे उर्जेची बचत या मुख्य हेतूबरोबरच इतरही कारणे आहेत.

>> पृथ्वी आणि सूर्याकडे कायमची पाठ राहील असे तिला बसवले आहे >> अच्छा! पण मग त्याचा व्ह्यू (दृष्टी - कोन) कायम बदलत राहील ना? एक पे रेहना - असं होणार नाही.

खूप छान मुद्दा Happy जेम्स वेब्ब स्वत:च्या अक्षाभोवती फिरू शकते. म्हणजे अर्धे आकाश ती पाहू शकते असे उल्लेख दुर्बिणीचे डॉक्युमेंटशन केलेल्या वेबसाईटवर आढळते. याचा अर्थ एका वर्षात एका सूर्य प्रदक्षिणेत संपूर्ण आकाश निरीक्षण ती करू शकेल. आता फिरण्याच्या नेमक्या मर्यादा कशा आहेत याबद्द्ल मात्र माहिती मिळत नाही.


>> तसेच लहान अशनी आपटून आरशांची वाट लागली आहे.

मे महिन्यात छोटा दगड आदळल्याने नुकसान झाले होते त्याचा उल्लेख धाग्यात आहे. दुर्बिणीने फोटो त्यानंतर पाठवले आहेत. आता वैज्ञानिकांना असे लक्षात आले आहे कि हे नुकसान जेवढा अंदाज केलं होता त्यापेक्षा बरेच जास्त असण्याची शक्यता आहे. तशा बातम्या काल व आज येत आहेत.

@अमितव, धन्यवाद. होय नावाच्या वादाविषयी मी ओझरते वाचले होते.

@राधिका, @सुर्या---, @रानभुली व प्रतिसाद करणाऱ्या सर्वांनाच खूप खूप धन्यवाद.

>>जेव्हा प्रकाश निघाला तो काळ आणि तेव्हाचे ती आकाशगंगा आणि आपण यातले अंतर ५ अब्ज वर्षे होते >> सूर्यमालेचे/ पृथ्वीचे आजचे वय ४.५४ बिलिअन वर्षे आहे. त्यापूर्वी सूर्यमाला तयार झालेला तो सोलार नेब्युला ढग नेमका कुठे होता, त्यापासून ती आकाशगंगा किती अंतरावर होती हे इतकं सांगता येतं का? ५ अब्जच्या शून्यात माझा गोंधळ होत असेल तर क्षमस्व. अब्ज न म्हणता बिलिअन चालणार असेल तर ते म्हणू या का?

अतुलजी, जिथे जिथे मराठी पर्यायी शब्द वापरलेले आहेत तिथे मूळचे इंग्रजी परिचित शब्द वापरा. दीर्घिका हा शब्द अलिकडे अलिकडे वाचनात येऊ लागला आहे. गॅलॅक्सी हा सर्वांना माहिती असलेला शब्द आहे. दीर्घिका हा नवीन शब्द आहे. बनवला आहे. त्यामुळे गॅलॅक्सी शब्द वापराने मराठीवर कोणतेच आक्रमण होण्याची शक्यता नाही.
आकाशगंगा आपण मराठीत गॅलॅक्सीला म्हणत होतो ना ? कि फक्त आपल्याच मिल्की वे या गॅलॅक्सीसाठी हा शब्द आहे ?

त्यापासून ती आकाशगंगा किती अंतरावर होती हे इतकं सांगता येतं का?>> ४.६ बिलियन हा प्रिसाइज आकडा बऱ्याच बातम्यांमध्ये आहे. बिलियन आणि अब्ज यात गोंधळ व्हायला नको. दोन्हींत एकही शून्य कमी जास्त नसतो.

माझ्या आधीच्या प्रतिक्रियेत आकाशगंगा शब्दाऐवजी तेथे गॅलॅक्सी शब्द वाचला तरी हरकत नाही Wink

येणाऱ्या प्रकाशाचे vishleshan करून दुर्बीण प्रतिमा बनवत असावी .
हे आपण जसे समजतो तसे फोटो नसावेत.
असे मला वाटत.
अंतर पण तसेच ठरवले जात असावे.
प्रकाशाची wavelengths वैगेरे चा विचार करून

पण असा प्रश्न पण मनात येतो .प्रकाशाचे वर्तन आपण आपल्या भौतिकशास्त्र च्या नियमन ठरवत आहोत
अजून पण प्रकश चे वर्तन वेगळे असेल जेव्हा तो आपल्याला माहीत नसलेल्या मिडीयम मधून प्रवास करेल तेव्हा.
त्याचा वेग पण आपण जो गृहीत धरला आहे तो नसेल ,त्या पेक्षा वेगळा असेल .

आणि त्या मुळे आपले सर्व अंदाज चुकीचे पण ठरतील.
अशा विचित्र अनेक शंका मला येत असतात.
शंका न घेता विश्वास ठेवणे म्हणजे ज्ञाना चे नवीन दरवाजे,रस्ते बंद करून टाकणे असे मला तरी वाटते.

अमितव
१ बिलिअन= १०^९ . म्हणजे एकावर नऊ शून्य =१०००००००००.
जर एक अब्ज = १०० कोटी (?) तर एक अब्ज = एक बिलिअन. हे जमेल!
थोडे अवांतर
जगाची लोकसंख्या ८ बिलिअन कडे वाटचाल करत आहे.
जेफ बोझोची संपत्ती जवळपास १०० बिलिअन डॉलर आहे.
McDonald’s: “Over 99 Billion Served.”
When you are 31 years, 7 months, 9 hours, 4 minutes, and 20 seconds old, you’ve lived your billionth second
मराठीतील आकाशगंगा म्हणजे इंग्रजी मिल्की वे =अवर galaxi. विश्वात अंदाजे २०० बिलिअन गॅॅलाक्सी आहेत.तर आकाशगंगा आणि गॅॅलाक्सी ह्या मध्ये फरक आहे.
@filmy ४. आता ती आकाशगंगा जर अजूनही अस्तित्वात असेल तर तिच्यापासून आपले या घडीचे अंतर अंदाजे ४६ अब्ज वर्षे झालेले असेल.>>>तुम्हीच लिहिलेला क्रमांक १ आणि हा क्रमांक ४ हे विरोधी आहेत न?
आपल्याला रेड शिफ्ट आणि ब्लू शिफ्ट माहित असेल असे गृहीत धरतो.तर मग मागे मी दिलेले टेबल पहा. गोंधळ व्हायचे कारण नाही. नाही तर ह्यावर एक स्वतंत्र धागा काढावा लागेल.

विश्वात अंदाजे २०० बिलिअन गॅॅलाक्सी आहेत.

अशी वाक्य टाळावीत असे सुचवावे असे वाटते.
विश्वात अंदाजे 200 बिलियन galaxy असाव्यात असा अंदाज आहे.
हे वाक्य योग्य आहे.
आहेत ( म्हणजे पक्का आकडा ,असाव्यात म्हणजे पक्का आकडा नाही फक्त अंदाज)

तसा आकाशगंगा आणि galaxy ह्या मध्ये काही फरक नाही.
पण सूर्यमाला ज्या galaxy मध्ये आहे तिला आकाश गंगा म्हणतात.
का?
ह्याला काही उत्तर नाही.
फरक काही नाही त्या मुळे वर्गीकरण करता येईल.

ok .filmy
GN-z11
It is observed as it existed 13.4 billion years ago, just 400 million years after the Big Bang; as a result, its distance is sometimes inappropriately reported as 13.4 billion light-years, its light-travel distance measurement.

Distance
≈32 billion ly
(present proper distance)
≈13.4 billion ly
(light-travel distance)

Quick Update: आतापर्यंत आढळलेली सर्वात दूरवरची दीर्घिका (Galaxy) शोधण्यात जेम्स वेब्ब ला यश मिळाले आहे अशा बातम्या झळकत आहेत. GLASS-z13 नाव दिले गेलेली हि दिघिका सर्वात लांब म्हणजे १३.५ बिलियन प्रकाशवर्षे अंतरावर आहे. दुसऱ्या शब्दांत, आता दिसणारी तिची अवस्था विश्वनिर्मिच्या (Big Bang) नंतर केवळ ३०० मिलियन वर्षांच्या आतली असावी.

Pages