देवबाग,तारकर्ली च्या वॉटर स्पोर्ट्स शी संबंधित

Submitted by Nikhil. on 31 May, 2022 - 05:28

भयंकर आहे हे सगळं! कोकण ट्रीपला जाताय? सावधान, आधी नीट चौकशी करा.

*येवा कोकण आपलाच (अ)नसा*
आणि कोकण अजिबात सुरक्षित नसा
(हा गेल्या आठवड्यातील AdvDr Suchitra Ghogare-katkar यांचा अनुभव आहे, गेल्या सोमवारचा)

नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी, फेसाळणाऱ्या लाटा आणि लाटांची गुंज... निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकण किनारपट्टीचे पर्यटकांना खूपच आकर्षण आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात बाराही महिने पर्यटक कोकणात येत असतात.‌ पर्याटकांसाठी किणारपट्टीवर अनेक नवनवीन बीच साईट्स समोर येत आहेत. बीच रिसॉर्ट्स, होम स्टे या माध्यमातून कोकणवासीयांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळाले आहे. ही खूपच चांगली गोष्ट आहे. पण याची दुसरी बाजू म्हणजे कोकण पर्यटन अजिबात सुरक्षित नाही. त्यावर प्रशासन, पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियंत्रण हा संशोधनाचा विषय आहे.
पर्याटकांसाठी सोयीसुविधांचा अभाव आहेच पण यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे पर्याटकांची सुरक्षितता होय. पण या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय पातळीवर काहीच काम केले जात नसल्याचे वारंवार लक्षात येते. पर्यटक बुडाल्याच्या बातम्या आल्या की प्रशासन जागे होते पण यावर कोणत्याही उपाययोजना आखल्याचे, त्या अंमलात आणल्याचे वर्तमानपत्रात वाचायला मिळत नाही आणि प्रत्यक्ष गेल्यावर तर दिसतही नाही. एकूणच कोकणात येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे हे नक्की. याचा काल आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला.
विस्तिर्ण अशा कोकण किनारपट्टीवर छोट्या छोट्या गावालगतच्या किनाऱ्यावरील सुरक्षेसाठी उपाय योजना करणे तसे अवघडच. पण प्रसिद्ध पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेविषयी आनंदच दिसून येतो.
देवबाग तारकर्ली येथे वॉटर स्पोर्टस् विकसित होऊन बरेच वर्ष झाली आहेत. त्याठिकाणी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांचे काहीच तिथे काहीच नियंत्रण नाही. भरती ओहोटी च्या वेळा आणि त्या अनुषंगाने पर्यटकांसाठी नियमावली, सुरक्षा व धोक्याच्या सुचना याच्या पाट्या कुठेच आढळल्या नाहीत. एकूणच इथे प्रशासन कुठेच दिसत नाही. दिसतो तो फक्त स्थानिक व्यवसायिकच.
काल सकाळी त्सुनामी आयलंड पहाणे आणि तिथे वॉटर स्पोर्टस् राईड्स घेणे या उद्देशाने गेलो. बोट ठरवताना लाईफ जॅकेट्स आहेत ना असे विचारले होते तेव्हा 'हो' असे उत्तर दिले होते. मात्र बोटीत बसल्यावर तिथे लाईफ जॅकेट्स नव्हतीच. याचे कारण विचारल्यावर इथे जवळच जायचं आहे जॅकेट्स ची गरज नाही असे उत्तर मिळाले. समोरच त्सुनामी आयलंड दिसत होते त्यामुळे इट्स ओके म्हणत तो विषय सोडून दिला.
त्सुनामी आयलंड, पुढे खाडी व समुद्र संगम आणि क्रोकोडाईल बीच अशी राईड आम्ही घेतली होती. त्याप्रमाणे
त्सुनामी आयलंड वर बोटीतील इतर पर्यटक उतरले. आम्ही दोन मिनिटे पुढे गेलो तिथेच बोट थांबवून त्या मुलाने पाण्याच्या रंगातील फरक दाखवला व परत लगेच फिरला. आम्ही म्हटलं हे ठिकाण आपण खूप लांबून दाखवताय पैसे मात्र भरपूर घेतलेत. तर त्याने कांगावा केला. शुध्द फसवणूक आहे हे कळत असूनही हा विषय सोडून दिला.
परत येऊन स्कूटर राईड बनाना राईड घेत होतो तेव्हढ्यात पॅरासेलिंग बुक झाल्याने बोट न्यायला आली. त्यातून थोडे पुढे गेलो व परत त्यातून पॅरासेलिंग च्या बोट मध्ये बसलो. तिथेच फक्त लाईफ जॅकेट्स होती व तो बोटमन वारंवार सुरक्षिततेच्या सुचना देत होता. एवढीच एक सकारात्मक बाजू तीन दिवसांच्या कोकण प्रवासातील.
पॅरा सेलिंग करुन परत आलो व त्सुनामी बेटावर जायला दुसऱ्या बोटीत बसलो. बेटाजवळ आलो तर सर्व बेट पाण्याखाली गेले होते. लाटांचा जोर वाढला होता. एकूण परिस्थिती पाहून आम्ही तिथे न जाण्याचा निर्णय घेतला व आम्ही यातून उतरणार नाही असे सांगितले. तसेच आम्ही पैसे देतो पण आम्हाला इथे न सोडता पुढे जाऊन धक्क्यावर सोडा अशी विनंती केली. पण तुम्हाला ज्याने सोडलंय तोच घेऊन जाईल तुम्ही बोटीतून उतरा असे सांगून त्याने आम्हाला अक्षरशः बोटीतून बाहेर पडायला भाग पाडले.
बोटीतून उतरणे भयंकर होते. एकतर खांद्यापर्यंत पाणी होते. लाटांचा जोर वाढला होता. बोट पूर्ण एका बाजूला कलत होती. यात छोट्या अमोघच्या डोळ्याखाली बोटीचा जोरदार मार लागला तर त्याच्या डॅडीच्या म्हणजे मेहूण्यांना पायाला मार लागला. बहिण आणि तिचा छोटा मुलगा उतरत असताना जोराची लाट आली आणि बोट नेमकी त्याच बाजूला पूर्णतः झुकली आणि ती दोघीही बोटीच्या खाली अडकता अडकता वाचली.‌ बोटीतून उतरल्यावर पुढे सुरू झाली तो जीवघेणा थरार.
(त्याविषयी लिहायचं म्हटलं तरी अंगावर शहारे येतात मन अस्वस्थ बनतं आणि म्हणूनच ही पोस्ट लिहायची अर्धवट सोडून दिली होती.
पण आजची दुर्घटना वाचली आणि पुन्हा यावर लिहिण्याची गरज लक्षात आली.)
अंगावर येणारी प्रत्येक लाट काळजाचा ठोका चुकवत होती. आमच्या खंद्या एवढी पाण्याची पातळी वाढली होती आणि त्यात लाटांवर लाटा येत होत्या. साडेसात वर्षांच्या अरुष दाक्षिणी दोघांना तिथल्या एका छोट्या माचणावर बसवले होते. मोबाईल पैसे पर्स वगैरे महत्वाचे साहित्य बरोबर नेहलेल्या मोठ्या वॉटरप्रुफ बॅग मध्ये ठेवले होते. आणि माचणाचे एक एक खांब पकडून आम्ही लाटांना सामोरे जात होतो. लाटेच्या तडाख्यात माझा चष्मा वाहून गेला. अनेकांचे साहित्य वाहून जात होते. लहान मुलांसाठी भयंकर स्थिती होती. पण स्थानिकांना या परिस्थितीशी काहीही देणंघेणं नव्हते. ते निर्ढावलेपणाने या परिस्थितीकडे बघत होते. एका माचणावर बसलेल्या स्थानिक लोकांना मदतीसाठी विनंती करत होतो. आमच्या बोटीच्या माणसाला फोन लावा म्हणून ओरडुन सांगत होतो. पण ते अक्षरशः दुर्लक्ष करत होते.
त्सुनामी बेटावर माचणे तयार करुन त्यावर खाद्यपदार्थ वेगवेगळ्या वस्तूंची दुकानदारी लावलेले स्थानिक लोक तिथले त्यांची दुकाने गुंडाळून गायब झाली होती.
बेटावर पर्यटकांशिवाय कोणीही नव्हते आणि प्रत्येकजण लाटांचा सामना करत मदतीसाठी ओरडत होते. एक बोट आली पण तो आम्हाला घेऊन जायला नकार देत होता. कारण तेच... तुम्ही ज्या बोटीतून आलात त्याच बोटीतून परत जा असे सांगितले जात होते. पण यावेळी आम्ही त्याचे ऐकले नाही व एकमेकांना हात देत त्या बोटीपर्यंत पोहचलो आणि बोटीत बसलो. आम्ही त्याला वेगळे पैसे देण्याची तयारी दाखवूनही तो आम्हाला घेऊन जायला नकार देत होता.
आम्ही आठजण बोटीत चढलो. पर्यटकांची दुसरा ग्रुप चढला. त्यांची तर अत्यंत वाईट अवस्था होती. मोबाईल पैसे साहित्य भिजले होते पण याहीपेक्षा सहा महिने ते चार पाच वर्षे वयोगटातील त्यांची मुले होती. एक मूल तर अक्षरशः लाटेवर हातातून निसटून गेलेले दोन गटांगळ्या खाऊन परत पकडले होते. बहुतेक डॉक्टरांचा तो ग्रुप असावा कारण डॉक्टर नावाने ते एकमेकांना संबोधित होते. मुलांची सुरक्षितता धोक्यात आल्यामुळे त्यातील आया घाबरल्या होत्या आणि चिडलेल्या होत्या.
आम्ही धक्क्यावर परत आलो व पार्किंग कडे जायला निघालो तर समोर आम्हाला बोट ठरवून दिलेला व्यक्ती भेटला. त्याला घडलेला प्रकार सांगितला तर तो हसत हसत म्हणाला "तुमचा फक्त चष्माच गेला लोकांचे फोन, पाकीटे अजून काय काय नेहमीच जात असतं."
त्याचं हे वाक्य ऐकून एक महत्वाची बाब लक्षात आली ती म्हणजे अशा घटना त्यांच्यासाठी नेहमीच्याच आहेत.
हा सर्व प्रकार अनुभवल्यानंतर काही महत्वाचे प्रश्न मनात उपस्थित झाले आहेत. ते म्हणजे...
१. तीन दिवसांच्या अख्या पर्यटनामध्ये मालवण परिसरात एकही पोलिस आम्हाला दिसला नाही.
२. देवबाग जवळच्या धक्क्यावर कुठेही सूचना फलक नव्हते. सुरक्षितता उपाययोजना याविषयी माहिती फलक नव्हते.
३. बोटींमध्ये सुरक्षितता जॅकेट्स नव्हतीच. इतरही सुरक्षित बाबी नव्हत्या.
४. बहुतांश बोटी जुन्या आढळल्या.
५. बोटींचे कसलेचं नियोजन नव्हते.
६. स्थानिक प्रशासन पोलिस कोस्टल गार्ड यापैकी कोणीही तिथे उपस्थित नव्हते की यावर प्रशासनाचे नियंत्रण आहे असे कुठेच दिसून आले नाही.
७. जाताना आवर्जून आधार कार्ड घेऊन गेलो होतो. MTDC मान्यताप्राप्त होम स्टे ला थांबलो होतो पण त्याने फक्त नाव विचारले. तिथे कोणतेही रजिस्टर नव्हते. ओळखपत्र मागणे ही दूरची गोष्ट.
सर्व अनागोंदी कारभार. फक्त आणि फक्त व्यवसायिक लोकांचं साम्राज्य.
एकूणच स्थानिक प्रशासन, पोलिस, जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग, कोस्टल गार्ड इ. कोणीच तिथे दिसून आले नाही.
एकूणच सगळा व्यवसायिकांचा बाजार. पर्यटकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याचबरोबर पर्यटकांची आर्थिक लूट हाही वेगळा विषय आहे.
हे सगळं अनुभवल्यावर मनात विचार येतो 'यावा कोकण आपलाच असा' नव्हे तर "यावा कोकण आपलाच नसा" आणि "कोकण अजिबात सुरक्षित नसा" हे खरं आहे.
यावर शासनाच्या सर्व संबंधित विभागाने त्वरित दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज घडलेली दुर्घटनेतून शासनाला जाग येईल ही अपेक्षा.
- अॅड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर सातारा
कोकणातून परत आल्यावर या घटनेविषयी लिहून वॉट्सऍपवर पोस्ट केले होते. ते तेव्हाच फेसबुक वर पोस्ट करायला हवे होते. कदाचित प्रशासनाने दखल घेतली असती असे वाटतंय.
#Namrata Desai

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिकाम्या बाटल्या त्यात टाका असा बोर्ड ही लावला होता तरी सकाळी किनाऱ्यावर बियर च्या बाटल्यांचा खच पडला होता
>>>

बोर्ड ते आधी वाचत असतील. प्यायल्यावर शुद्ध राहत नसेल Happy

आजकाल बहुतांश किनाऱ्यावर विकेंडला हेच दृश्य असते
म्हणून स्थानिकांना पर्यटक नको असतील का?

>>>>>>>>.हल्ली डायपर लाऊन ठेवतात, म्हणजे शी केली तर दिवसभर पोर तसेच
डायपर बदलत असणारच की. रडेल ना मूल आग आग होउन. मला नाही वाटत कोणी इतके गलिच्छ रहात असतील.

>>>>>>>>>या सगळ्यामुळे गावातल्या लोकांचे मत पर्यटक विरोधी बनलेले आहे. पर्यटक हवेत कारण पोट त्यावर अवलंबुन,०पण त्यांनी निट वागायला नको का? हा प्रश्न सगळे विचारतात.
Sad

म्हणून स्थानिकांना पर्यटक नको असतील का?>>>>

विकणारे स्थानिकच आहेत ना?
पैसा सगळ्यांनाच हवाय मग पर्यटकांना जे हवं ते पुरवले जाणारच

स्थानिकांना नको असेल तर एकी दाखवून गावात दारूबंदी करावी

पण तसे काहीही होणार नाही

स्थानिकांना नको असेल तर एकी दाखवून गावात दारूबंदी करावी
पर्यटक (काही) कधीकधी फार बेछूट वागतात. स्थानिकांना बऱ्याच वेळेला पैसा नको पण चंगळवाद आवर म्हणायची वेळ येते. दारूबंदी आमच्या गावाजवळ यशस्वीरित्या राबवण्यात आली आहे. दारूबंदी च्या निर्णयापर्यंत पोचण्याचा प्रवास भयानक होता.
https://maharashtratimes.com/-/articleshow/11357284.cms

पर्यटकांच्या या मद्यधुंद पाटर््यांना पायबंद घालण्याचा एक प्रयोग दापोली तालुक्यातील जालगावमधील ग्रामस्थांनी मात्र यशस्वी केला आहे. महाराष्ट्रात आदर्श गाव ठरलेल्या सुमारे साडेसात हजार लोकवस्तीच्या या जालगावमध्ये गेल्या १० वर्षांहून अधिक काळ कोठेही गावठी दारुविक्री कंेद किंवा बिअरशॉपी नाही. त्याचप्रमाणे जालगाव व्यापारी संघटनेशी संबंधित असलेल्या ५५ दुकानांत कोठेही गुटखाखा विक्री केली जात नाही. तेथील व्यापाऱ्यांनी स्वत:हूनच प्लास्टिक कॅरीबॅगला रामराम ठोकला आहे. अशा या सृजनशील गावात आलेल्या पर्यटकांनी स्वत:च्या मर्यादा पाळल्याच पाहिजेत, पर्यटनाच्या नावाखाली आम्ही गावात धिंगाणा सहन करणार नाही, असा येथील ग्रामस्थांचा आग्रह आहे.

बेस्ट
एकदम स्तुत्य उपक्रम

दारूबंदी च्या निर्णयापर्यंत पोचण्याचा प्रवास भयानक होता.>>>
कल्पना करू शकतो, ज्यांचे हात वर पोचले आहेत ते आणि उद्दाम पर्यटक यांच्याशी पंगा घेणे अजिबात सोपे नसणारे
पण ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आणि अमलात आणला त्याबद्दल मनापासून अभिनंदन

त्याचप्रमाणे जालगाव व्यापारी संघटनेशी संबंधित असलेल्या ५५ दुकानांत कोठेही गुटखाखा विक्री केली जात नाही.
म्हणजे या ५५ दुकांनाव्यतिरिक्त जे व्यापारी संघटनेशी संबंधित नाही अश्या दुकानात मिळु शकेल ?

म्हणजे या ५५ दुकांनाव्यतिरिक्त जे व्यापारी संघटनेशी संबंधित नाही अश्या दुकानात मिळु शकेल ?
गावातील सर्व दुकाने व्यापारी संघटनेशी संबंधित आहेत. ग्रामीण भागात व्यापारी संघटनेच्या मदतीविना दुकान चालवणे हे बिना हँडलची सायकल चालवण्यासारखे असते .

विकणारे स्थानिकच आहेत ना?
>>>
असे गरजेचे नाही. लोकं सोबतही मद्य नेतात.

स्थानिकांना नको असेल तर एकी दाखवून गावात दारूबंदी करावी
>>>>
त्यांना स्वत:ला प्यायला हवी असेल. पण पर्यटकांनी एका दिवसासाठी येत बेछूट पिऊन गोंधळ घालणे नको असेल. त्यासाठी त्या सर्वांनी दारू पिणे सोडणे हा जालीम ऊपाय आहे. एवढे सोपे असते दारू सोडणे तर जगातल्या सर्वांनीच सोडली नसती का?

“आता ते कुणाला ऐकणार नाहीत” - ह्यातल्या ‘आता’ चा तीव्र निषेध!! ह्यातून सर इतर वेळी / काही वेळा, इतरांचं म्हणणं ऐकून घेतात असा भलताच अर्थ निघून गरीब बिचार्या वाचकांचा गैरसमज होऊ शकतो. सरांच्या प्रतिमेला तडा जाईल ते आणखी वेगळंच. Happy

“आता ते कुणाला ऐकणार नाहीत” - ह्यातल्या ‘आता’ चा तीव्र निषेध!! ह्यातून सर इतर वेळी / काही वेळा, इतरांचं म्हणणं ऐकून घेतात असा भलताच अर्थ निघून गरीब बिचार्या वाचकांचा गैरसमज होऊ शकतो. सरांच्या प्रतिमेला तडा जाईल ते आणखी वेगळंच. Happy

दारूबंदी आमच्या गावाजवळ यशस्वीरित्या राबवण्यात आली आहे. //

वा वा खूप चांगला निर्णय. या निर्णयानंतर पर्यटकांच्या संख्येत घट झाली का?
मुळात जर कुलदैवतवाले भावकीतले पर्यटक सोडून इतर यायला नकोच असतील तर अशी दारूबंदी करणे, लोकांना खांद्यापर्यंत पाण्यात सोडून घाबरवणे असे प्रकार करावेच लागतील Proud

किनाऱ्यावर बियर च्या बाटल्यांचा खच पडला होता
वाळूवर बाटली फोडता येत नाही हे चीड आणणारे असते. बाकी कोणत्याही प्रसिध्द धबधब्यावर चांगले बूट शूज घालून जावे लागते. पाय घसरू नये म्हणून सांडल्स ठीक पण फोडलेल्या दारूच्या बाटल्यांच्या काचा लागू नये म्हणून.

_________________________________
जालगाव,दापोली समुद्राजवळ नाहीत. किनाऱ्यावरच्या गावकऱ्यांची दु:ख काय कळणार?

आशूचॅम्प हो, दारूचे दुष्परीणाम माझ्या आवडीचा विषय आहे. आणि मी तो निघाला की कोणाला ऐकत नाही. शाळेच्या व्हॉटसपग्रूपमधूनही यासाठी चार वेळा बॅन झालो आहे.

असो,
दारू अशी गोष्ट आहे जी आपण पिताना उत्साहवर्धक पेय वाटते, दुसऱ्याने पिल्यास त्रासदायक.
मुळात कोकण, समुद्रकिनारे वा धबधबेच नाहीत तर कुठल्याही पर्यटनस्थळी सार्वजनिक जागेत दारू प्यायला आणि दारूच्या नशेत फिरायला मनाई हवी. जसे ड्रायव्हिंग करताना तसेच ऑन ड्यूटी पोलिसांबाबत मद्यपानाचे कडक नियम असतात तसे सार्वजनिक जागी संचार करतानाही हवे.

मुळात कोकण, समुद्रकिनारे वा धबधबेच नाहीत तर कुठल्याही पर्यटनस्थळी सार्वजनिक जागेत दारू प्यायला आणि दारूच्या नशेत फिरायला मनाई हवी. जसे ड्रायव्हिंग करताना तसेच ऑन ड्यूटी पोलिसांबाबत मद्यपानाचे कडक नियम असतात तसे सार्वजनिक जागी संचार करतानाही हवे.>>>

कधी नव्हे ते सुसंगत आणि शहाण्यासारखे बोललात

माझी मद्यपानाविरोधातली मते क्लीअर आहेत आशूचॅम्प. फक्त मद्यप्राशनाची आवड असणारे बरेचदा ते पर्सनली घेतात आणि राडा होतो.

एखाद्याच्या मद्यप्राशनाचा समाजाला त्रास होत असेल तर जबाबदार नागरीक म्हणून मत मांडतो.
एखाद्याच्या मद्यप्राशनाचा त्याच्या कुटुंबियांना त्रास होत असेल तर सामाजिक जाण ठेऊन मत मांडतो.
एखाद्याचे मद्यप्राशन त्याच्या स्वत:च्या आरोग्याला घातक असेल आणि ती व्यक्ती ओळखीतली असेल तर हितचिंतक म्हणून चार शब्द लिहितो.

Pages