देवबाग,तारकर्ली च्या वॉटर स्पोर्ट्स शी संबंधित

Submitted by Nikhil. on 31 May, 2022 - 05:28

भयंकर आहे हे सगळं! कोकण ट्रीपला जाताय? सावधान, आधी नीट चौकशी करा.

*येवा कोकण आपलाच (अ)नसा*
आणि कोकण अजिबात सुरक्षित नसा
(हा गेल्या आठवड्यातील AdvDr Suchitra Ghogare-katkar यांचा अनुभव आहे, गेल्या सोमवारचा)

नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी, फेसाळणाऱ्या लाटा आणि लाटांची गुंज... निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकण किनारपट्टीचे पर्यटकांना खूपच आकर्षण आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात बाराही महिने पर्यटक कोकणात येत असतात.‌ पर्याटकांसाठी किणारपट्टीवर अनेक नवनवीन बीच साईट्स समोर येत आहेत. बीच रिसॉर्ट्स, होम स्टे या माध्यमातून कोकणवासीयांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळाले आहे. ही खूपच चांगली गोष्ट आहे. पण याची दुसरी बाजू म्हणजे कोकण पर्यटन अजिबात सुरक्षित नाही. त्यावर प्रशासन, पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियंत्रण हा संशोधनाचा विषय आहे.
पर्याटकांसाठी सोयीसुविधांचा अभाव आहेच पण यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे पर्याटकांची सुरक्षितता होय. पण या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय पातळीवर काहीच काम केले जात नसल्याचे वारंवार लक्षात येते. पर्यटक बुडाल्याच्या बातम्या आल्या की प्रशासन जागे होते पण यावर कोणत्याही उपाययोजना आखल्याचे, त्या अंमलात आणल्याचे वर्तमानपत्रात वाचायला मिळत नाही आणि प्रत्यक्ष गेल्यावर तर दिसतही नाही. एकूणच कोकणात येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे हे नक्की. याचा काल आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला.
विस्तिर्ण अशा कोकण किनारपट्टीवर छोट्या छोट्या गावालगतच्या किनाऱ्यावरील सुरक्षेसाठी उपाय योजना करणे तसे अवघडच. पण प्रसिद्ध पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेविषयी आनंदच दिसून येतो.
देवबाग तारकर्ली येथे वॉटर स्पोर्टस् विकसित होऊन बरेच वर्ष झाली आहेत. त्याठिकाणी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांचे काहीच तिथे काहीच नियंत्रण नाही. भरती ओहोटी च्या वेळा आणि त्या अनुषंगाने पर्यटकांसाठी नियमावली, सुरक्षा व धोक्याच्या सुचना याच्या पाट्या कुठेच आढळल्या नाहीत. एकूणच इथे प्रशासन कुठेच दिसत नाही. दिसतो तो फक्त स्थानिक व्यवसायिकच.
काल सकाळी त्सुनामी आयलंड पहाणे आणि तिथे वॉटर स्पोर्टस् राईड्स घेणे या उद्देशाने गेलो. बोट ठरवताना लाईफ जॅकेट्स आहेत ना असे विचारले होते तेव्हा 'हो' असे उत्तर दिले होते. मात्र बोटीत बसल्यावर तिथे लाईफ जॅकेट्स नव्हतीच. याचे कारण विचारल्यावर इथे जवळच जायचं आहे जॅकेट्स ची गरज नाही असे उत्तर मिळाले. समोरच त्सुनामी आयलंड दिसत होते त्यामुळे इट्स ओके म्हणत तो विषय सोडून दिला.
त्सुनामी आयलंड, पुढे खाडी व समुद्र संगम आणि क्रोकोडाईल बीच अशी राईड आम्ही घेतली होती. त्याप्रमाणे
त्सुनामी आयलंड वर बोटीतील इतर पर्यटक उतरले. आम्ही दोन मिनिटे पुढे गेलो तिथेच बोट थांबवून त्या मुलाने पाण्याच्या रंगातील फरक दाखवला व परत लगेच फिरला. आम्ही म्हटलं हे ठिकाण आपण खूप लांबून दाखवताय पैसे मात्र भरपूर घेतलेत. तर त्याने कांगावा केला. शुध्द फसवणूक आहे हे कळत असूनही हा विषय सोडून दिला.
परत येऊन स्कूटर राईड बनाना राईड घेत होतो तेव्हढ्यात पॅरासेलिंग बुक झाल्याने बोट न्यायला आली. त्यातून थोडे पुढे गेलो व परत त्यातून पॅरासेलिंग च्या बोट मध्ये बसलो. तिथेच फक्त लाईफ जॅकेट्स होती व तो बोटमन वारंवार सुरक्षिततेच्या सुचना देत होता. एवढीच एक सकारात्मक बाजू तीन दिवसांच्या कोकण प्रवासातील.
पॅरा सेलिंग करुन परत आलो व त्सुनामी बेटावर जायला दुसऱ्या बोटीत बसलो. बेटाजवळ आलो तर सर्व बेट पाण्याखाली गेले होते. लाटांचा जोर वाढला होता. एकूण परिस्थिती पाहून आम्ही तिथे न जाण्याचा निर्णय घेतला व आम्ही यातून उतरणार नाही असे सांगितले. तसेच आम्ही पैसे देतो पण आम्हाला इथे न सोडता पुढे जाऊन धक्क्यावर सोडा अशी विनंती केली. पण तुम्हाला ज्याने सोडलंय तोच घेऊन जाईल तुम्ही बोटीतून उतरा असे सांगून त्याने आम्हाला अक्षरशः बोटीतून बाहेर पडायला भाग पाडले.
बोटीतून उतरणे भयंकर होते. एकतर खांद्यापर्यंत पाणी होते. लाटांचा जोर वाढला होता. बोट पूर्ण एका बाजूला कलत होती. यात छोट्या अमोघच्या डोळ्याखाली बोटीचा जोरदार मार लागला तर त्याच्या डॅडीच्या म्हणजे मेहूण्यांना पायाला मार लागला. बहिण आणि तिचा छोटा मुलगा उतरत असताना जोराची लाट आली आणि बोट नेमकी त्याच बाजूला पूर्णतः झुकली आणि ती दोघीही बोटीच्या खाली अडकता अडकता वाचली.‌ बोटीतून उतरल्यावर पुढे सुरू झाली तो जीवघेणा थरार.
(त्याविषयी लिहायचं म्हटलं तरी अंगावर शहारे येतात मन अस्वस्थ बनतं आणि म्हणूनच ही पोस्ट लिहायची अर्धवट सोडून दिली होती.
पण आजची दुर्घटना वाचली आणि पुन्हा यावर लिहिण्याची गरज लक्षात आली.)
अंगावर येणारी प्रत्येक लाट काळजाचा ठोका चुकवत होती. आमच्या खंद्या एवढी पाण्याची पातळी वाढली होती आणि त्यात लाटांवर लाटा येत होत्या. साडेसात वर्षांच्या अरुष दाक्षिणी दोघांना तिथल्या एका छोट्या माचणावर बसवले होते. मोबाईल पैसे पर्स वगैरे महत्वाचे साहित्य बरोबर नेहलेल्या मोठ्या वॉटरप्रुफ बॅग मध्ये ठेवले होते. आणि माचणाचे एक एक खांब पकडून आम्ही लाटांना सामोरे जात होतो. लाटेच्या तडाख्यात माझा चष्मा वाहून गेला. अनेकांचे साहित्य वाहून जात होते. लहान मुलांसाठी भयंकर स्थिती होती. पण स्थानिकांना या परिस्थितीशी काहीही देणंघेणं नव्हते. ते निर्ढावलेपणाने या परिस्थितीकडे बघत होते. एका माचणावर बसलेल्या स्थानिक लोकांना मदतीसाठी विनंती करत होतो. आमच्या बोटीच्या माणसाला फोन लावा म्हणून ओरडुन सांगत होतो. पण ते अक्षरशः दुर्लक्ष करत होते.
त्सुनामी बेटावर माचणे तयार करुन त्यावर खाद्यपदार्थ वेगवेगळ्या वस्तूंची दुकानदारी लावलेले स्थानिक लोक तिथले त्यांची दुकाने गुंडाळून गायब झाली होती.
बेटावर पर्यटकांशिवाय कोणीही नव्हते आणि प्रत्येकजण लाटांचा सामना करत मदतीसाठी ओरडत होते. एक बोट आली पण तो आम्हाला घेऊन जायला नकार देत होता. कारण तेच... तुम्ही ज्या बोटीतून आलात त्याच बोटीतून परत जा असे सांगितले जात होते. पण यावेळी आम्ही त्याचे ऐकले नाही व एकमेकांना हात देत त्या बोटीपर्यंत पोहचलो आणि बोटीत बसलो. आम्ही त्याला वेगळे पैसे देण्याची तयारी दाखवूनही तो आम्हाला घेऊन जायला नकार देत होता.
आम्ही आठजण बोटीत चढलो. पर्यटकांची दुसरा ग्रुप चढला. त्यांची तर अत्यंत वाईट अवस्था होती. मोबाईल पैसे साहित्य भिजले होते पण याहीपेक्षा सहा महिने ते चार पाच वर्षे वयोगटातील त्यांची मुले होती. एक मूल तर अक्षरशः लाटेवर हातातून निसटून गेलेले दोन गटांगळ्या खाऊन परत पकडले होते. बहुतेक डॉक्टरांचा तो ग्रुप असावा कारण डॉक्टर नावाने ते एकमेकांना संबोधित होते. मुलांची सुरक्षितता धोक्यात आल्यामुळे त्यातील आया घाबरल्या होत्या आणि चिडलेल्या होत्या.
आम्ही धक्क्यावर परत आलो व पार्किंग कडे जायला निघालो तर समोर आम्हाला बोट ठरवून दिलेला व्यक्ती भेटला. त्याला घडलेला प्रकार सांगितला तर तो हसत हसत म्हणाला "तुमचा फक्त चष्माच गेला लोकांचे फोन, पाकीटे अजून काय काय नेहमीच जात असतं."
त्याचं हे वाक्य ऐकून एक महत्वाची बाब लक्षात आली ती म्हणजे अशा घटना त्यांच्यासाठी नेहमीच्याच आहेत.
हा सर्व प्रकार अनुभवल्यानंतर काही महत्वाचे प्रश्न मनात उपस्थित झाले आहेत. ते म्हणजे...
१. तीन दिवसांच्या अख्या पर्यटनामध्ये मालवण परिसरात एकही पोलिस आम्हाला दिसला नाही.
२. देवबाग जवळच्या धक्क्यावर कुठेही सूचना फलक नव्हते. सुरक्षितता उपाययोजना याविषयी माहिती फलक नव्हते.
३. बोटींमध्ये सुरक्षितता जॅकेट्स नव्हतीच. इतरही सुरक्षित बाबी नव्हत्या.
४. बहुतांश बोटी जुन्या आढळल्या.
५. बोटींचे कसलेचं नियोजन नव्हते.
६. स्थानिक प्रशासन पोलिस कोस्टल गार्ड यापैकी कोणीही तिथे उपस्थित नव्हते की यावर प्रशासनाचे नियंत्रण आहे असे कुठेच दिसून आले नाही.
७. जाताना आवर्जून आधार कार्ड घेऊन गेलो होतो. MTDC मान्यताप्राप्त होम स्टे ला थांबलो होतो पण त्याने फक्त नाव विचारले. तिथे कोणतेही रजिस्टर नव्हते. ओळखपत्र मागणे ही दूरची गोष्ट.
सर्व अनागोंदी कारभार. फक्त आणि फक्त व्यवसायिक लोकांचं साम्राज्य.
एकूणच स्थानिक प्रशासन, पोलिस, जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग, कोस्टल गार्ड इ. कोणीच तिथे दिसून आले नाही.
एकूणच सगळा व्यवसायिकांचा बाजार. पर्यटकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याचबरोबर पर्यटकांची आर्थिक लूट हाही वेगळा विषय आहे.
हे सगळं अनुभवल्यावर मनात विचार येतो 'यावा कोकण आपलाच असा' नव्हे तर "यावा कोकण आपलाच नसा" आणि "कोकण अजिबात सुरक्षित नसा" हे खरं आहे.
यावर शासनाच्या सर्व संबंधित विभागाने त्वरित दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज घडलेली दुर्घटनेतून शासनाला जाग येईल ही अपेक्षा.
- अॅड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर सातारा
कोकणातून परत आल्यावर या घटनेविषयी लिहून वॉट्सऍपवर पोस्ट केले होते. ते तेव्हाच फेसबुक वर पोस्ट करायला हवे होते. कदाचित प्रशासनाने दखल घेतली असती असे वाटतंय.
#Namrata Desai

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहा महिन्याचे बाळ घेउन भर मे महिन्यामध्ये कोकणात जाऊन पाण्यातल्या जागी जाण्याचे धाडस करणा-या लोकांना सलाम.

सहा महिन्याचे बाळ घेउन भर मे महिन्यामध्ये कोकणात जाऊन पाण्यातल्या जागी जाण्याचे धाडस करणा-या लोकांना सलाम. >> +१ .

नुकतेच दुसर्‍या एका धाग्यावर माझा अनुभव लिहिला होता मी.. काश्मिर मधे ६ महिन्याची जुळी बाळे घेउन डोंगर चढायला आलेले आई वडील ( आई वडील घोड्यावर आणि बाळे २ स्थानिक लोकांच्या कडेवर चालत चालत... घोडा आणि चालणारे यात बरेच अंतर पडत होते... ), लहान बाळांना गुलमर्ग फेज १ जिथे भयंकर वारा आणि सोबत पाउस पण होता अशा ठिकाणी आणणारे आई वडील असे महान लोक दिसले.

खांद्यापर्यंत पाणी होते तरी उतरलो असे चुकुन लिहिले आहे का ? कमरेपर्यंत म्हणायचे आहे का ?

मलाही माथेरानच्या पावसात पाचसात महिन्यांचे भिजणारे बालक दिसले होते. आईबाप देखील हायक्लास सोसायटी होते. आम्ही जवळपास अर्धा तास एके टपरीवजा हॉटेलमध्ये चरत ऊभे होतो. तिथे ते आलटून पालटून आईवडिलांच्या कडेवर भिजत होते. पावसाची सर कमी जास्त होत होती. मी कंटीन्युअस तेच बघत होतो कारण तेव्हा माझी मुलगी दोनतीन महिन्यांची असल्याने ते जास्त रिलेट होत होते.

बाकी याचे कौतुक करावे की वेडेपणा म्हणावे समजत नाही..

सहा महिन्याचे बाळ घेउन भर मे महिन्यामध्ये कोकणात जाऊन पाण्यातल्या जागी जाण्याचे धाडस करणा-या लोकांना सलाम.>>अगदी अगदी हेच आलं डोक्यात

सरकार,व्यावसायिक सुरक्षिततेच्या उपाययोजना करतील तेव्हा करतील पण आपण आपली खबरदारी घ्यावी,
पाणी कंबरेएवढं असेल किंवा खांद्याएव्हढं पण बोटी मधून उतरल नाही तर कोणीही ढकलून देत नाही
त्यांनाही त्यांचा धंदा करायचा असतो त्यामुळे व्यावसायिक लोक सुद्धा आपल्या कलाने घेतात,त्यांची वागणूक अगत्याची ठेवतात (कामाचा भाग म्हणून)
अलिबागच्या नागाव काशीद ,मुरुड बीच,तारकर्ली येथे बरेचदा जाणे झाले आहे,वॉटर स्पोर्टची फारशी आवड नसल्याने एक दोन वेळाच केले आहेत पण बीच वर ते व्यवसायिक लोक आजूबाजूला वावरत असतातच त्यामुळे त्यांची वागणूक पाहिली आहे
लॉकडाउन नंतर तारकर्ली ला गेले नाही पण अलिबाग ला जाणे होतं

मिक्स ग्रूप असतो. काही लोकांना ते एडवेंचरस वाटते. तर काही लोकं ईथवर आलोत तर जरा रिस्क घेऊया म्हणतात. हे लोकं लहान मूलवाले नसतात. पण ज्यांच्याकडे असतात ते देखील मग त्यांच्या सोबत उतरतात.

तसेच अजून एक हुमायून नेचर म्हणजे लहान मुलांना सोबत घेऊन आलो ही चूक झाली हे तेव्हा कळलेले असते. पण मान्य करायचे नसते. मग अट्टाहासाने माघार घ्यायचे टाळतात.

आम्ही पावसाळ्यात गोव्याला गेलो होतो , पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो म्हणून समुद्रात जाऊ नका अश्या पाट्या होत्या किनाऱ्यावर, एवढंच नाही तर गार्ड ही गस्त घालत होते पण काही अति शहाणे जिथे गार्ड नव्हते तिथपर्यंत लांब चालत गेले आणि मग पाण्यात गेले.
तेव्हा मला वाटत पर्यटक ही काही वेळा आलोच आहोत तर करूनच राहू ह्या मूड मध्ये असतात.

स्थानिकांना ही धंद्याची हाव असतेच. हे सगळीकडेच घडत . साधी वांगी घेतली तरी तो पटकन आपल्या नकळत एखाद दोन किडकी वांगी गळ्यात करतोच. आंबे तर किती खराब निघतात विचारूच नका.

त्यामुळे दोन्ही बाजू थोड्या थोड्या जबाबदार आहेत असं मला वाटत.

आपल्याकडे भारतात प्रसिद्ध देवळांचे गाभारे खूप लहान आणि कोंदट असतात. एकदा लायनीत उभं राहिलं की परतीची वाट ही बंद होते. अश्या गर्दीच्या ठिकाणी मला लोटालोटीची, चेंगराचेंगरीची खूप भीती वाटते. अश्या ठिकाणी मी बाहेर बसणं प्रिफर करते . बाहेरूनच नमस्कार .

>>>>>>>>आपल्याकडे भारतात प्रसिद्ध देवळांचे गाभारे खूप लहान आणि कोंदट असतात. एकदा लायनीत उभं राहिलं की परतीची वाट ही बंद होते. अश्या गर्दीच्या ठिकाणी मला लोटालोटीची, चेंगराचेंगरीची खूप भीती वाटते. अश्या ठिकाणी मी बाहेर बसणं प्रिफर करते . बाहेरूनच नमस्कार .

अगदी बरोबर ममो.

कार्ल्याला बोकडाच्या रक्तात इलेक्ट्रोक्युशन होउन स्टँपेड वगैरे झालेला अशी बातमी वाचलेली आहे.
सप्तशृंगी का कोणत्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेउन जमावाने , मुलीवर अत्याचार केल्याची बातमी वाचलेली आहे.

हे असले वाचले ना की खरच...

उन्हापावसात फिरवल्याने बालके शक्तिमान होतात असा समज असावा. परदेशी जोडपी आपल्या बालकांना टबातल्या पाण्यात तरंगवून धाडसी आणि धीट करतानाचे फोटो पाहायला मिळतात. मग ही कल्पना इकडे अजून import झाली नाही अशी धारणा असेल.
बाकी 'अभी नही तो कभी नही' असे लोकही असणारच. पर्यटन आता धार्मिक, मजेचे, न राहता साहसी होत आहे.

गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेताना, तिथे उभा असलेला देखरेख करणारा मनुष्य वस्सकन ओरडलेला "पुढे चला - पुढे चला". बाप रे आपण कोणत्या मनोवस्थेत असतो आणि अचानक असा आवाज येतो तेव्हा दचकायला होते, त्रास होतो.
बरे गर्दीही नव्हती. अर्थात ही वोन्ट नो कारण तो आत गाभार्‍यात/समाधीजवळ होता.
पण एकंदर आपल्याकडॅ एटिकेटस, सुसंस्कृतपणा कमीच. इन फॅक्ट डाउनराईट रानटीपणा कधीकधी दिसून येतो.

यावर्षीच्या जानेवारीतच तारकर्लीलाच गेलो होतो. आणि तिथे नेमके हेच सगळे (त्सुनामी आयलंड, पॅरासेलिंग इत्यादी) केल्याने हे सगळे को-रिलेट झाले. भयंकर अनुभव आहे. "खांद्याइतके पाणी अतिशयोक्ती वाटते" याच्याशी सहमत आहे. वाचतानाच हा प्रश्न मनात आला होताच. कारण छातीच्या वर पाणी गेले कि पाय आपसूकच तरंगू लागतात. जिथे स्वत:चाच तोल सांभाळणे कठीण तिथे मुलांना कसे वागवणार? पण असो. जरी कमरे इतके पाणी असले तरीसुद्धा ते धोकादायकच आहे अशा ठिकाणी.

मागे एकदा पॅरासेलिंग करत असताना दोर तुटून एक जोडपे समुद्रात पडल्याची बातमी वाचली होती. याशिवाय, दरवर्षी समुद्रात पर्यटक बुडाल्याच्या बातम्या येतात. समुद्र हा धोकादायकच. पण गणपतीपुळे, गुहागर, मुरुड वगैरे ठिकाणचे जास्तच धोकादायक. मुरुडला तर एके वर्षी तब्बल १४ विद्यार्थी बुडाले होते.

या सगळ्यातून धडा घ्यायचा म्हणून कोकणात गेल्यावर समुद्रात कमरेपेक्षा खोल पाण्यात जायचे नाही आणि वॉटर स्पोर्टच्या वाटेलासुद्धा जायचे नाही असे ठरवले होते. निर्धार! पण तरीही यावर्षी पॅरासेलिंग केलेच. मुलाचा हट्ट, बरोबर आलेले कुटुंब आपल्या मुलांना घेऊन वॉटर स्पोर्ट करतात, अखिलाडू वृत्ती असल्याचा शिक्का आपल्यावर येण्याची शक्यता इत्यादी "पिअर प्रेशर" पुढे आपला हा निर्धार फार काळ टिकत नाही हे हि तितकेच खरे. मागे एकदा सोबत आलेल्या मित्रांची चार कुटुंबे एका धरणाच्या पाण्यात नौकाविहार करून आली. माझ्या "दुराग्रहा"पोटी आम्ही मात्र गाडीतच बसून राहिलो Lol असे घडल्यामुळे मनाची समजूत घालून यावर्षी पॅरासेलिंग केले. सुदैवाने तो अनुभव खूप छान होता. विशेष म्हणजे ती बोट आणि त्यावरची सर्व साधने नवी आणि दर्जेदार होती. (मुलाला आधीच सांगितले होते, जर मला तिथे काहीही कळकट, मळकट, तुटके, फुटके असे दिसले तर आपण परत यायचे. "मरण्यापेक्षा परत आलेले परवडते" या भाषेत सांगितले होते Biggrin )

त्सुनामी आयलंड मात्र मी गेलो नाही. पण जे गेले त्यांचा अनुभव असा कि तिथे पाणी नॉर्मली गुडघ्याखाली असते. पण भरती वगैरे असेल तर छातीइतके येते. पण अशावेळी तिथे टुरिस्टना घेऊन जातही नाहीत. तसेच, पाणी अगदी कमी असले तरी तिथे उतरण्याची जबरदस्ती करत नाहीत. (माझ्या सोबत जे होते त्यांनी सांगितले त्यांच्यापैकी काहींनी नावेतच थांबणे पसंद केले होते). शिवाय पाणी वाढू लागले (कोणत्याही कारणामुळे) तर लगोलग हाकारे घालून टुरिस्टना परत नेण्याची तत्परता दाखवली जाते.

अर्थात हे सगळे असले तरी धाग्यात लिहिल्यानुसार "पर्यटकांची सुरक्षितता" या दृष्टीने प्रशासनाचा अंकुश वगैरे काही कुठे दिसून येत नाही हे खरेच आहे. पण ते तसेही इतरत्र अनेक ठिकाणी लागू पडते.

Hazardous activity त भाग घेणे हे सरकार किंवा इन्शुरन्स कुणीही कव्हर करत नाही.

हे फोरवर्ड व्हायरल झाला आहे. त्यात एका ग्रुपवर कोकणी लोकांच्या काही शेलक्या कमेंट्स अशा होत्या-
१. तुम्हाला कोणी आमंत्रण देऊन बोलावलं होतं का?
२. टुरिझम हा काही आमचा मुख्य व्यवसाय नाही. इतरही कामं असतात. त्यामुळे तुम्ही इथे गर्दी करून आमच्यावर उपकार करत नाही.
३. तुम्हाला मॉरिशस युरोप मालदीव काय अगदी गोवा पण परवडत नाही म्हणून तुम्ही कोकणात येता. मग तुम्हाला कमी पैशात एकदम मॉरिशस लेव्हलची सर्व्हिस कशी भेटेल?

थोडक्यात असं वाटलं की तिथल्या स्थानिकांना पर्यटकांचा उपद्रवच होत असावा. आजकाल ज्याचा कोकणाशी तसा काही संबंध नाही- म्हणजे मूळ गाव, कुलदैवत, भावकी यातलं काही कोकणात नाही- असेही लोक कोकणात जात असतात ते स्थानिकांना तितकं रुचत नसावं.

प्रदेशात जेव्हा पर्यटनासाठी लोक येऊ लागतात तेव्हा वाहनचालक,मालक,हॉटेलमालक आणि कर्मचारी यांना पैसे मिळू लागतात आणि पर्यटक यावेसे वाटतात. मग त्यांचे आचरट चाळेही खपवून घ्यावे लागतात .
कोकणात तशी वृत्ती नाही म्हणून तशा कॉमेंटस येतात. मलाही जाणवलं की कोकणातल्या लोकांना पर्यटक नकोच आहेत. फक्त कुलदैवतासाठी येणारे भाविक हवे आहेत.
दुसरी गोष्ट जाणवली ती म्हणजे एखादी गोष्ट कुठे आहे विचारले तर "माहीत नाही, इथे नाही" अशी उत्तरे देतात. खरं म्हणजे ती जागा,दुकान,हॉटेल तिथून जवळच असते. पण त्यांची खुन्नस असते. हलकटपणा करून पर्यटकांना कसं घालवता येईल हेच पाहतात. संस्कृती बुडू नये आणि शेजाऱ्याच्या व्यवसायाला हातभार लागू नये हीच इच्छा असते.
गोड बोलणे हे दुर्मिळ गोष्ट आहे.
केरळ,कर्नाटक,हिमाचल,राजस्थान राज्यातल्या लोकांना पर्यटक पाहण्याची सवय असते आणि यावेसे वाटतात तिथेच जावे.

पण एखादी जागा लोकप्रिय झाल्यावर 'तिथे इतकेच पर्यटक आलेले चालतील, जास्त झाले तर आम्हाला भार होईल' यातलं 'जास्त' ते पर्यटक कसं ठरवणार?जसं लोणावळ्याला ऐन पावसाळ्यात काही संख्येनंतर पर्यटक आत घेणं बंद करतात तसं काही करावं लागेल.किंवा हॉटेल बुकिंग होताना त्या गावात एकूण ठराविक संख्या किंवा वर झाल्यावर बुकिंग आपोआप बंद होणे असं काही.

'आम्ही बोलावत नाही तरी तुम्ही मोठ्या संख्येने येता आणि मग हे असं होतं बघा' हा युक्तिवाद काही पटला नाही.एखादं हॉटेल पुण्यात प्रसिद्ध झालं, गर्दी वाढली तर मालक 'तुम्ही का येता, मुळात आमची इच्छा नाही इतके लोक यावे,आमच्या व्यवस्थेवर ताण पडतो, तुम्ही प्रसिद्धी वाचली तरी येऊ नका' म्हणेल की येणाऱ्या लोकांची नीट वेटिंग व्यवस्था करेल?

आम्ही बोलावत नाही तरी तुम्ही मोठ्या संख्येने येता आणि मग हे असं होतं बघा' हा युक्तिवाद काही पटला नाही.
>>>>

हा युक्तीवाद पर्यटन व्यवसायातले करत असतील तर ते चूक आहे.
पण जर स्थानिक रहिवासी असे म्हणत असतील तर त्यांना नकोच असेल पर्यटकांचा ऊपद्रव.

सोसायटीतील चार घरात ट्यूशन घेतली जात असेल आणि त्याचा त्रास ईतरांना होत असेल तरीही त्यांनी ट्यूशनल येणाऱ्या जाणाऱ्यांशी सौजन्यानेच वागावे हि अपेक्षा चूक आहे.

मुळात कोकण पर्यटन आता केवळ समुद्र म्हणून सीमित आहे असे दिसते

1) किल्ले/ इतर ऐतिहासिक स्थळे - नॉन मराठी लोकांना फारसे देणेघेणे नाही याच्याशी , हल्ली मराठी लोकांना सुद्धा देणेघेणे नसावे. (अर्थात , सिंधुदुर्ग , विजयदुर्ग वगैरे ठळक अपवाद)

2) देवळे- उत्तरे/ दक्षिणेतील भव्य वास्तूंची सवय झालेल्या उत्तरी जनतेला कोकणातील देवळे आवर्जून पहावी अशी वाटणे कठीण आहे

3) गुढ, राईत दडलेले कौलारू देऊळ जाऊन त्या जागी जिर्णोद्धारीत चकचकीत देऊळ उभे राहिले तर मराठी जनतेला सुद्धा कितपत रुचेल माहीत नाही.

4) तास दीड तासाचा प्रवासकरून जो स्पॉट पाहायला जातो तो 10 मिनिटात पाहून संपतो. त्यामुळे आवर्जून साईट सीईनग करायला म्हणून कोकणात फिरण्याचा उत्साह कमी होतो

त्यामुळे कोकण = सी फूड + समुद्र इतकेच उरते
कोकणी लोकांनी जे नैसर्गिक असेट्स आहेत ते फायद्यासाठी वापरावेत. टुरिसम साठी असणारी इतर वैशिष्ट्ये लौकरच लोप पावणार आहेत.

कोकण खूपच ओव्हररेटेड आहे. गोव्याला जावे किंवा थायलँड - बँकॉक पटाया फुकेत मस्त आहेत. डोंट वेस्ट युअर टाइम. हौस असेल तर मिकॉनॉस सांतोरीनी. बघा कोणी येत असेल तर मी बस काढते आहे. पटाया हून पण स्पीड बोटीने एका आय लँड ला नेतात. पण सर्व सेफ्टी पत्करून जाकेट घातल्या शिवाय बोटीत पाउल ठेवु देत नाहीत.

भात फिश करी सोल कढी घरी पण करता येते. उगीच कोणी रुड अन प्रोफेशनल वागले तर मी तरी खप्वून घेणार नाही. व ते सहा महिन्यांची बाळॅ वगैरे मोस्ट अवॉइडेबल.

जोडपी बाळे नेतात कारण असे ही असू शकते की घरी बघणा रे कोणी नसेल. आजी आजोबा युरोप टुर वर व मुलगा सून कोकणा त असे झाले तर काय करतील तरूण जोडपी!!

मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मात्र मी असे करणार नाही. मुले चालती फिरती होईपरेन्त थोडे काँप्रमाइज. पण हे पूर्ण वैयक्ति क मत आहे जजमेंट नव्हे. माझी सुन मुलगी असती तर मी आपण हुन मुले सांभाळ ली असती व त्यांना जा बरं मज्जा करुन या म्हटले असते.

कोकण खूपच ओव्हररेटेड आहे. गोव्याला जावे किंवा थायलँड - बँकॉक पटाया फुकेत मस्त आहेत.
>>>

सिंबा म्हणतात तसे आहे हे. बाहेरील पर्यटकांसाठी कोकण समुद्रापुरता आहे Happy

सिंबा बरेच मुद्दे पटले

जसे.

3) गुढ, राईत दडलेले कौलारू देऊळ जाऊन त्या जागी जिर्णोद्धारीत चकचकीत देऊळ उभे राहिले तर मराठी जनतेला सुद्धा कितपत रुचेल माहीत नाही.
>>>
बिलकुल नाही.

4) तास दीड तासाचा प्रवासकरून जो स्पॉट पाहायला जातो तो 10 मिनिटात पाहून संपतो.
>>>>
कोकणाची खरी मजा स्पॉटवर नसून त्या प्रवासात आहे.

मागे ऑर्कुटवर कोकणातले गावातले आजूबाजूच्या परीसरातले फोटो टाकलेले. गणपतीतील असल्याने सगळीकडे छान हिरवळ, वाहणारे ओढे नद्या झरे वगैरे. रोजच्या आंघोळीचा वहाळ. कपडे धुवायची नदी, जवळच मोठा तलाव असल्याने त्याचाही फोटो. कौलारू घर, अंगण, तुळस, विहीर आणि या सर्वांना सामावून घेणारे हिरवळीने आच्छादलेले कुंपण.. जिथे चार दुकाने आहेत, जिथे एस्टीचा मोठा स्टॉप आहे, ती जागाही काही कृत्रिम आणि चकाचक नाही तर नजर जाईल तिथवर हिरवागार गालिचा आणि रस्त्याच्याही दुतर्फा असलेली मुद्दाम कोणी न लावलेली झाडे...
फोटो अल्बम बघून कोकणाबाहेरचे मित्र म्हणाले अरे सगळीकडे हे असेच असते का.. मी म्हटले माहीत नाही. जेवढे फिरलोय आमच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या गावात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिथे हेच दिसले आहे.
उद्या या जागेला कमर्शिअल स्वरूप द्यायचे म्हटले तरी कसे देणार. आजकाल पर्यटक तर चार दिवस गोंधळ घालायला येतात. ना कि निवांतपणा शोधत. कोकणच्या निसर्गाला त्याच्या मूळ स्वरुपात अनुभवायचे असेल तर मला तरी नकोच वाटते हे.

कोकणाची खरी मजा स्पॉटवर नसून त्या प्रवासात आहे

मुंबई-गोवा रोड कोकणातून जातो तो मुळात समुद्राला साधारणपणे चाळीस किमी दूर ठेवून. महाराष्ट्रातल्या दूरच्या पर्यटकांची कोकणची चित्रे पाहून समजूत वेगळी झालेली असते. माडापोफळीच्या ( नारळ सुपारी) सावलीत असलेली नळीच्या छपरांची टुमदार घरे,किनारा जवळच. सावधान. रत्नागिरी, खेड,चिपळूण,कुडाळ. . . येथे धडाधड गृहसंकुले उभी राहात आहेत.

जोडपी बाळे नेतात कारण असे ही असू शकते की घरी बघणा रे कोणी नसेल. आजी आजोबा युरोप टुर वर व मुलगा सून कोकणा त असे झाले तर काय करतील तरूण जोडपी!!>>>>>>

आयुष्य असे लगेच संपत नाही हे गृहीत धरुन मुले जन्माला घातली की ती सहा महिन्याची नाही होत तर लगेच पर्यटनाला का बरे धावायचे? लहान मुल कधीही झोपते, कधीही भुकेजते, कधीही शी सु करते. त्याला झोपायला सुखासीन जागा हवी, या खान्द्यावरुन त्या, मांडीवरुन हातात असे करुन झोपवले तर त्या जीवाला किती तो त्रास.. हल्ली डायपर लाऊन ठेवतात, म्हणजे शी केली तर दिवसभर पोर तसेच.. तुमच्या पर्यटन विषयीच्या ईच्छा पु-या करायला त्या गरिब जिवाला का त्रास ???

आपल्याकडे सुरक्षिततेचा विचार कोणीही करत नाही. खोपोलीला झेनिथ च्या धबधब्याच्या इथे दरवर्षी कोणीतरी अपघात होऊन मृत्यू पावते. पालिकेने बोर्ड लावला आहे आणि जाळी देखील लावली आहे. अति हुशार जनता जाळीवरून उडी मारून पलीकडे जाते. तुमचा जीव तुमची जबाबदारी.
जिथे सुरक्षित नाही तिथे लोक गेलेच नाहीत तर आपोआप या व्यवस्था उभारल्या जातील.
कोकणात पर्यटनाविषयी एक मुद्दा असा ऐकला की पर्यटकांमुळे तिथे गोष्टींचे भाव (उदाहरणार्थ रिक्षा भाडे) अव्वाच्या सव्वा लावले जातात. त्यामुळे स्थानिकांना पण गोष्टी महागात पडू लागतात. याला लोक वैतागले आहेत.
शिवाय Srd यांनी लिहिल्याप्रमाणे कोकणचा समुद्र किनारा तसा समुद्र पर्यटनासाठी सुरक्षित नाहीच आहे.

मी आंबोलीत राहते जिथे बाराही महिने पर्यटक असतात. बाकी ऋतुत काही त्रास नाही, फक्त माझ्या घराच्या आजुबाजुला निवासी हॉटेले असल्यामुळे रात्री काराओकेवरच्या रेकण्याचा त्रास अधुन मधुन सहन करावा लागतो इतकेच :).

पण पुर्ण गावाला पावसाळ्यात खुप त्रास सहन करावा लागतो. इतकी वर्षे पर्यटक गावाबाहेरच्या धबधब्यावर गर्दी करत. पण ते आता गावात घुसुन कुठल्याही ओहोळात डुंबायला लागलेत. पुरुष अन्गावर जेमतेम कपडे घालुन असे डुम्बायला व नाचायला लागले की गावातल्या बायका घराबाहेर पडायलाही घाबरतात. २०२० मध्ये पर्यटकानी फक्त नियोजीत स्थळावर जावे, इतरत्र फिरु नये अशी तजवीज करायचे चालले होते पण तेव्ढ्यात लॉक्द्डाउन लागला. २०१९ मध्ये तिन चार किमीच्या ट्रफिक रांगा गावात लागलेल्या, कारण मुर्ख पर्यटक स्वतची गाडी सगळ्यात पुढे घालायच्या प्रयत्नात सगळ्यांनाच बुच मारत होते. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणारुआंचे हाल होते होते.

या सगळ्यामुळे गावातल्या लोकांचे मत पर्यटक विरोधी बनलेले आहे. पर्यटक हवेत कारण पोट त्यावर अवलंबुन,०पण त्यांनी निट वागायला नको का? हा प्रश्न सगळे विचारतात.

नवीन Submitted by अश्विनीमावशी on 2 June, 2022 - 09:05
>>>>>> अगदी सहमत. तेवढं त्या बसमध्ये माझी एक सीट राखून ठेवा Happy

मी आता नुकताच अंजर्ले ला जाऊन आलो
तिथे समुद्र किनारी मोठ्या संख्येने टेबल खुर्च्या टाकून, काही जण खाली वाळूत सतरंजी टाकून पीत बसलेले

क्षणभर गोव्याला आलोय का असा भास झाला

रिसॉर्ट च्या लोकांनी कचरपेटी ठेवली होती आणि रिकाम्या बाटल्या त्यात टाका असा बोर्ड ही लावला होता तरी सकाळी किनाऱ्यावर बियर च्या बाटल्यांचा खच पडला होता

एक कोकणातील मित्र म्हणाला आजकाल बहुतांश किनाऱ्यावर विकेंडला हेच दृश्य असते

Pages