'हेमाशेपो' बद्दल...

Submitted by Barcelona on 27 November, 2021 - 11:16

कधी कधी संस्थळांवर धूसफूस होते नि कुणीतरी वैतागून 'हेमाशेपो' लिहून जाते म्हणजे 'हे माझे शेवटचे पोस्ट'. अर्थात वैतागलेले परत वाद घालायला येतातच आणि येत नसतील तर न वैतागलेले आयडी राखीच्या चिकाटीने ‘मेरे शे पो वाले आयेंगे’ करत त्यांना उचकवणाऱ्या पोस्टी टाकत राहतात. पण गेल्या दोन वर्षात हेमाशेपो प्रकार कमी झाला, निदान माझा तरी....

नकळत करोनामुळे भान आले की हे खरंच हेमाशेपो ठरले तर... आयुष्यात कुठली पोस्ट शेवटची असेल माहिती नाही म्हणून आपण बहुतेकजणं सुखी आहोत. बहुतेकजण लिहिण्याचे कारण काही ‘आज फिर मरानेका इरादा है’ वृत्ती असणाऱ्यां आयडीना अनेक वेळा त्यांचे शेवटचे पोस्ट कुठले हे पक्के ठाऊक असते. तर उलट काही आयडी प्रत्येक पोस्ट शेवटची पोस्ट असल्यागत संतुलित, संयमित, प्रेमळ टाकत असतात. सोशल मिडिया वर असं ड्रामा-फ्री राहायचं म्हणजे - हाय कंबख्त तूने पी ही नही…

बाकी राग-लोभात लिप्त इतरेजनांना अज्ञानात सुख असते. आपली शेवटची सोशल मिडीया पोस्ट कशी असेल, काय असेल याची कल्पनाही न करण्यात अमरपट्टा मिळाल्याचे सुख आहे.

आता म्हणाल काय एवढं शेवटच्या पोस्टचं…
असतं हो महत्त्व. सेलिब्रीटी गेल्यावर त्यांचे शेवटचे ट्वीट काय होते हे बर्‍याचवेळा मिडीयात प्रसिद्ध केलेले आढळते. कोबे ब्रायंटचे शेवटचे ट्विट लेब्रॉन जेम्सचे अभिनंदन करणारे होते तर पॉल वॉकरने ‘दि बॉईज आर बॅक’ लिहीले.. पण फास्ट फ्यूरीअस सिनेमा येण्याआधीच अपघातात गेला. माया अँजेलोचे शेवटचे ट्विट फार सुरेख होते - स्वतःचे ऐका आणि त्या नीरवतेत कदाचित परमेश्वराचा आवाज ऐकू येईल.

माझे शेवटचे पोस्ट कुणी प्रसिद्ध ही करणार नाही म्हणून जाताना निश्चितच सेलिब्रीटींपेक्षा जरा कमी स्ट्रेस असेल. सगळ्यात सोप्पं तर सो मि पोस्ट करत असतानाच यमाने मला घ्यायला यावं. तेव्हा माझं ना त्याच्या रेड्याकडे लक्ष ना त्याच्या पाशाकडे म्हणून त्यानेच 'ध्यान कित्थे ध्यानचंद' पोस्ट टाकून मामला झटपट निपटावा. पण देव नसतो म्हणे त्यामुळे शेवटची पोस्ट आपली आपल्यालाच टाकावी लागणार. आणि असतो देव म्हणालात तरी मी काय कबीर किंवा जनाबाई नाही की माझे काम त्याने करावे.

कदाचित माझी शेवटची पोस्ट 'इंटरनेट' ऐवजी 'मेटाव्हर्स' मध्ये असेल किंवा कुठल्या तरी कल्पनाही करता येत नसलेल्या टेक्नॉलॉजीमध्ये असेल. 'मेटाव्हर्स' मधल्या कुठल्याश्या कोल स्राऊसने आपल्याला बघून 'आफरिन आफरीन' म्हणावं नि आपल्याला हार्टअटॅक येऊन उत्तरादाखल केलेलं 'नमकीन सी बात है' शेवटचं पोस्ट ठरावं... क्या बात है!! नातवंडे ओरडतात ‘आज्जी, मेटाव्हर्स मध्ये असलं काही घडतं नाही’. पण तिथे काय घडतं हे अजून झकरबर्गलाही उमजलेले नसल्याने सब जायज है.. नाहीतर कदाचित त्या मॅडमॅक्स प्रमाणे पोस्ट-अ‍ॅपोकॅलिप्टीक जग असेल नि उरलेल्या कुण्णाला बॉलिवूडची गाणी माहितीही नसल्याने 'अरे बंडू, ह्या गुहेच्या भिंतीवर "राईट हियर राईट नाऊ है खुशी का समां" कोर बरं' सांगायची वेळ यायची.

एकूणात एखादे बॉलीवूडीय गाणेच शेवटची पोस्ट व्हावी अशीच माझी इच्छा दिसते. मी इतकी प्रसिद्ध किंवा प्रतिभाशालीही नाही की मला 'लास्ट लेक्चर' टाईप भाषण करायची रँडी पॉशसारखी संधी मिळेल. त्यामुळे काही संदेश वगैरे द्यावे भावी पिढीला इतपत कधी विचारच नाही केला. पण ज्यामुळे माझं आयुष्य सुटसुटीत गेलं तेवढं आजीकडून ऐकलेलं एक शहाणपणाचं वाक्य लिहू शकले तर लिहीन - “मन, अंगण, आणि हिशेब नेहमी स्वच्छ ठेवावं”. (नाही लिहू शकले तर ज्यांना उत्सुकता असेल त्यांना इथे पाठवा).

माझा देह जाळतील, पुरतील, जलसमाधी मिळेल कि माझे अवशेष सापडणारही नाहीत हे मला माहिती नाही. तेव्हा जिवंत असणाऱ्यांच्या जे सोयीचे असेल ते घडेल. पण कुठेतरी वाचलं होतं 'एपिटाफ' ही अनादी काळापासून चालत आलेली "शेवटची सोशल मिडीया पोस्ट" आहे. एपिटाफ म्हणजे थडग्यावर लिहीलेलं वाक्य. माझा एपिटाफ झालाच तर एपिटाफ म्हणून "हिने अंगण व हिशेब नेहमी स्वच्छ ठेवले...आता मनाचं काय एवढं.." लिहीलेलं असावं.... तेच माझं शेवटचं पोस्ट.

तोवर कुठेही हेमाशेपो लिहीलं तर त्याचं काय एवढं…

(चित्र साभारः पिक्साबे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे भयंकर आवडलेलं आहे.
हेमाशेपो ला विशेष अर्थ नसतो.आपण कोणीच आपला मुद्दा मांडून गप्प बसणारे संत नसतो.मुद्द्यावर झणझणीत प्रति मुद्दा आला की आपण बाह्या सरसावून पदर केस बांधून तावातावाने लिहायला बसलंच पाहिजे Happy ओरिजिनल आयडी ने जमलं नाही तर ड्युप्लिकेट ने.
(सकाळ वर बातमी खाली प्रतिसाद लिहिणं सोपं होतं तेव्हा असं तावातावाने लिहायला माझा एक वेगळा मेल आयडी होता.मग ते व्युकल प्लगीन आल्यावर बोअर झालं.आता तो मेल आयडी वेगवेगळ्या साईट ची प्रमोशनल मेल्स येण्यासाठी वापरते. सोशल मीडियावर राजकारणावर वाद घालणे ही ते फिजेट स्पिनर फिरवत बसण्या सारखी हालचाल आहे.आपल्याला वाटतं आपण सतत कार्यमग्न आहे, आणि प्रत्यक्षात अत्यंत फलहीन क्रिया तासनतास चालू असते.)

फारच भन्नाट मस्त लिहिलं आहे. चिमकुटे, कोपरखळ्या, विनोदी आणि खोल. खुदुखुदु हसताना विचार करायला लावणारं.

तुम्ही आजीचा सुविचार पूर्वीही कुठेतरी लिहिला होतात, प्रचंड भारी आहे ते. मी हा लेख परत x 3 तरी वाचणार आहे.

छान लेख
मलाही बरेचदा वाटते की मनात आलेले कुठेतरी कागदावर उतरवल्याशिवाय, कोणालातरी सांगितल्याशिवाय, सोशलमिडीयावर टाकल्याशिवाय मेलो तर आत्मा तळमळत राहील. जणू आयुष्यातील एखादे काम अधुरे राहीले.... आणि हे होणारच आहे. कारण आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला काही ना काही कामे पेंडींग असतातच. त्यामुळे कुठल्याही क्षणाला आलेला मृत्यु हा काहीतरी अधुरे ठेऊनच जाणार.. आणि आलाच एखादा क्षण आयुष्यात जिथे पुढे काय करायचेय याची योजनाच नसेल तर आयुष्य तसेही तिथेच संपलेले असेल.

<< कारण आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला काही ना काही कामे पेंडींग असतातच. त्यामुळे कुठल्याही क्षणाला आलेला मृत्यु हा काहीतरी अधुरे ठेऊनच जाणार.. आणि आलाच एखादा क्षण आयुष्यात जिथे पुढे काय करायचेय याची योजनाच नसेल तर आयुष्य तसेही तिथेच संपलेले असेल. >>

------ मृत्यु हेच सर्वात महत्वाचे असे पेंडिंग काम आहे... त्या क्षणापर्यंत इतर काही कामे एक विरंगुळा म्हणून आनंदाने करत रहायची. Happy

मृत्यु हेच सर्वात महत्वाचे असे पेंडिंग काम आहे... त्या क्षणापर्यंत इतर काही कामे एक विरंगुळा म्हणून आनंदाने करत रहायची.
>>>>
ये भी सही है...
मागे मी एका स्मशानावर एक पाटी वाचलेली.
आना तो तुझे यही पे था कुत्ते.. बस्स भौंकने मे जिंदगी गुजार दी Happy

मस्तच लेख..
हेमाशेपो चं माहीत नाही पण हामाशेफो (हा माझा शेवटचा फोटो) असं समजून प्रत्येक फोटो मी मस्त केस सोडून, बत्तीशी दाखवत आणि कुठेही पोस्टायच्या आधी थोडाफार एडिट करूनच टाकते.. क्या पता कल हो ना हो

छानच लेख. माहितीपूर्ण आणि चुरचुरीत.
"कुठेही मृत्यु घंटा वाजली तरी ती माझ्यासाठीच आहे, कारण माझ्यातला एक अंशही आता संगतीनेच मृत्यु पावला आहे" असे वाटणारे लोक जर तेव्हा आजूबाजूला असतील तर दुसरे काही लिहायला नको कारण त्यांच्या हृदयावर आपले नाव कोरले गेलेले असेल....

हेमाशेपो वाचलं की हेमामालिनी (किंवा कोणतीही हेमा) ने सांगितलेली शेपूच्या भाजीची रेसिपी असंच वाटतं नेहमी. त्यामुळे आपोआपच एक करपट ढेकर येतो मेंदूत.

>> हेमा) ने सांगितलेली शेपूच्या भाजीची

Lol मला सुद्धा शेपूची भाजी किंवा खमंग बडीशेप आठवते. हेमा कंपनीची बडीशेप.

>> स्मशानावर एक पाटी वाचलेली.
आना तो तुझे यही पे था कुत्ते.. बस्स भौंकने मे जिंदगी गुजार दी Happy

ऋन्मेऽऽष, गेलेल्या व्यक्तीला श्वानाची उपमा?
अजून शंभरएक प्रतिसाद पडू शकतात यावर Biggrin

Prayers

खूप छान
आवडलं
सीताई मस्त लिहितेस

लेखन आवडले, तिकडे आधी वाचले , मग पुन्हा इकडे वाचले.
तुझी नेहमीची मिश्किल शैली जरी असली तरी लेखाचा आशय व गाभा गंभीर आहे. तशी तर प्रत्येक पोस्टच शेवटची असू शकते , त्यामुळे उगाच आक्रमक, जजमेन्टल किंवा दुखावणारी नसावी एवढेच प्रयत्न करू शकतो. 'एपिटाफ' वगैरे पेक्षा मला अदृष्य झालेले आवडेल, किंवा कमीतकमी फूटप्रिंटस् , फिजिकली पण आणि वर्च्युअली पण... आणि सोमिवर काहीही लिहा , लोक आपापल्या भिंगातूनच बघणार, गाळणार, सोयीचं घेणार ह्याला पर्याय नाही. Happy
हे अशात वाचलेले, अगदीच पटलेले...
You act like mortals in all that you fear, And like immortals in all that you desire !!
Lucius Annaeus Seneca

मी जरा घाबरले शिर्षक बघून. मग वाचलं. छान लिहीलय, ते म्हणतात ना कि असं नाचा कि कोणीही आपल्याला बघत नाही,
"Dance like no one is watching, love like you've never been hurt; sing like no one is listening, and live like it's heaven on earth.” तस असं लिहा जसं हेमाशेपो हे जोडता येईल.

सर्वांना धन्यवाद. सामो, लिंक करता धन्यवाद. छान आहे की धागा. मात्र चुकीच्या जागी काढला म्हणेन. वाचू आनंदे मध्ये पब्लिकने धबाधब प्रतिक्रियांची भर टाकली असती. जमलं/पटलं तर बदल.

खरंय सीमंतिनी ताई कोरोना आल्यापासून असंच काहीसं वाटतंय कोणता क्षण हेमाशे होईल .. लेख छान आहे

रश्मी Lol लिंक करता धन्यवाद. धमाल लेख आहे. नाही गटग हेमाशेपो बद्दल नाही. हे उगीच मुक्तचिंतन उर्फ पॉप फिलॉसॉफी आहे.
रमड, स्वाती२, पिहू१४ धन्यवाद.

Pages