लागली कशी ही उ- च- की

Submitted by कुमार१ on 29 September, 2021 - 06:14

“मला, लागली कुणाची उचकी”, ही पिंजरा चित्रपटातील लावणी माहीत नाही असा मराठी गानरसिक विरळा. उषा मंगेशकर यांच्या स्वराने जगदीश खेबुडकरांच्या या चित्रगीताला अजरामर केलेले आहे. असो. आज ते गाणे हा आपला विषय नाही. तरीसुद्धा हे गाणे माझ्या ओठांवर यायचे कारण म्हणजे…….
.....
.....
आज त्या गाण्यातील ‘उचकी’ वर काही आरोग्यलेखन करीत आहे.

आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी उचकी लागते. ती अचानक येते व थांबतेही. अशा अचानक १-२ उचक्या लागल्या की, “कोण माझी आठवण काढतंय आज” असा पारंपरिक सुखद विचार मनात चमकून जातो खरा. जशी ही उचकी थांबते तसे आपण तिला विसरून आपल्या कामात गढून जातो. सटीसामाशी अशा किरकोळ उचक्या येणे व थांबणे हा एक सामान्य प्रसंग असतो. घटकाभर तो आपल्या आजूबाजूच्यांची करमणूकही करतो ! मात्र कधी कधी एखाद्याला लागलेली उचकी थांबता थांबत नाही. अक्षरशः ५-१० सेकंदांमागे एक अशा गतीने त्या उचक्या येतच राहतात. त्यातून उचकी लागलेला माणूस त्रासून जातो. मग त्या थांबण्यासाठी बरेच घरगुती उपाय करून पाहिले जातात. बऱ्याचदा त्यांना यश येते. काही वेळेस मात्र हे प्रकरण एवढ्यावरच निवळत नाही. उचक्यांवर उचक्या येतच राहतात आणि संबंधित माणूस अगदी अत्यवस्थ होतो. या स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अनेक आजारांचे उचकी हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. न थांबणाऱ्या उचकीचे निदान होणे आवश्यक ठरते. ते झाल्यावर गरजेनुसार वैद्यकीय उपचार केले जातात. अशा या आपल्याला अधूनमधून ‘उचकवणाऱ्या’ उचकीचे अंतरंग या लेखात समजून घेऊ.

लेखाची विभागणी अशी करतो :
• व्याख्या व मूलभूत माहिती
• वैशिष्ट्ये
• कारणमीमांसा
• रुग्णपरीक्षा व तपासण्या
• उपचार

व्याख्या व मूलभूत माहिती
उचकीची शास्त्रशुद्ध व्याख्या अशी आहे :

‘कंठामध्यें सशब्द असा आचका बसणे’

आपली छाती व पोट यांच्या सीमेवर श्वासपटल (diaphragm) हा स्नायू असतो. तो जेव्हा अचानक वेगात आकुंचन पावतो, तेव्हा हवा तोंडाने आत खेचली जाते आणि स्वरयंत्र बंद होते. त्यातून जो ‘हिक’ असा आवाज येतो त्याला उचकी म्हणतात. योग्य इंग्लिशनुसार तो शब्द hiccup असा आहे (hic-cough हा चुकीचा अपभ्रंश आहे, कारण या घटनेचा खोकल्याशी अर्थाअर्थी संबंध नाही. सामान्य शब्दकोश हा फरक लक्षात घेत नाहीत). बरेचदा उचकी काही मिनिटात थांबते. जेव्हा ती ४८ तासांहून अधिक काळ चालू राहते तेव्हा ती ‘टिकून राहणारी’ म्हटली जाते. त्याहून पुढे, जर ती एक महिन्याहून अधिक काळ चालू राहिली तर तिला ‘अनियंत्रित’ म्हणतात. वैद्यकाच्या इतिहासात नोंदलेला प्रदीर्घ काळ उचकी टिकून राहण्याचा विक्रम तब्बल ६८ वर्षांचा आहे !! चार्ल्स ऑसबॉर्न नावाचे हे गृहस्थ ९६ वर्ष जगले. त्यांच्या वयाच्या ९५व्या वर्षी त्यांच्या उचक्या अचानक थांबल्या. या अभूतपूर्व घटनेमुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदलेले आहे.

वैशिष्ट्ये

जेव्हा एखाद्याला उचकी लागते तेव्हा दर मिनिटाला ४ ते ६० इतक्या प्रमाणात उचक्या लागू शकतात. दोन उचक्यांमधले अंतर संबंधित व्यक्तीसाठी साधारण समान असते. उचकीचे प्रमाण आणि त्या व्यक्तीच्या रक्तातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण यांचे नाते व्यस्त (inverse) असते. उचक्या जास्ती करून संध्याकाळी अधिक लागतात. तरुण स्त्रियांना येणाऱ्या उचक्या बर्‍याचदा मासिक पाळी सुरू होण्यापूर्वीच्या १-२ दिवसांमध्ये येतात.

कारणमीमांसा
उचकी या लक्षणावर वैद्यकाच्या इतिहासात अनेक शतकांपासून अभ्यास चालू आहे. परंतु आजही आपल्याला त्याची परिपूर्ण कारणमीमांसा समजलेली नाही. सन १८३३ मध्ये Shortt या वैज्ञानिकाला तिचा कार्यकारणभाव शोधण्यात प्रथम यश आले. श्वासपटलाला संदेश देणारी जी नर्व्ह असते तिच्या अतिरिक्त उत्तेजनामुळे (irritation) आपल्याला उचकी लागते. या मूलभूत शोधानंतर पुढे त्यावर अधिक अभ्यास होऊन १९४३मध्ये एक थिअरी मांडली गेली. त्यात संबंधित चेतातंतू, मज्जारज्जू व मेंदूतील विशिष्ट केंद्र यांची सांगड घातली गेली. या सर्व घटकांच्या समन्वयातून उचकीची प्रतिक्षिप्त क्रिया घडते. उचक्या कुठल्याही वयाच्या व्यक्तीला येऊ शकतात. एक नवलाईची गोष्ट म्हणजे गर्भातील जिवालासुद्धा त्या अधूनमधून येत असतात !

आता उचकीनिर्मिती होण्यास जबाबदार असलेल्या घटकांचा आढावा घेतो.
A. अल्पकाळ टिकणाऱ्या उचक्या :
प्रौढांमध्ये याची महत्त्वाची कारणे अशी :
१. अतिरिक्त खाद्य अथवा हवा जठरात जाऊन ते फुगणे
२. तापमानात अचानक झालेले मोठे चढ-उतार
३. बेसुमार मद्यपान अथवा तंबाखूसेवन
४. ताणतणाव अथवा अतिउत्तेजित अवस्था.

B. दीर्घकाळ टिकणाऱ्या उचक्या : विविध आजारांमध्ये वर उल्लेख केलेल्या चेतातंतूंवर परिणाम होतो. त्यामुळे उचक्या लागून राहतात. या संदर्भात 100 हून अधिक आजारांचा अभ्यास झालेला आहे. तरीसुद्धा एखादा आजार व उचकी लागून राहण्याचा कार्यकारणभाव अद्यापही अस्पष्ट आहे.
काही प्रमुख आजार/ स्थिती अशा आहेत:
१. विविध मनोविकार
२. मेंदू व मज्जारज्जूचे आजार
३. काही हृदयविकार

४. घसा व पचनसंस्थेचे दाहजन्य आजार
५. चयापचयातील बिघाड: यामध्ये रक्तातील सोडियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियम कमी होणे, किंवा ग्लुकोजची पातळी वाढणे
६. काही औषधांचे दुष्परिणाम : विशेषतः गुंगी आणणारी औषधे आणि स्टिरॉइड्स.

आजारांमुळे येणाऱ्या उचक्या जर अनियंत्रित राहिल्या तर त्यांचे दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामध्ये मुख्यतः हे आहेत :
१. जठरातील अन्न व रस वारंवार अन्ननलिकेत येणे
२. हृदयताल बिघाड
३. निद्रानाश व शरीराचे वजन कमी होणे.

रुग्णपरीक्षा व तपासण्या

रुग्णाला लागलेल्या उचक्या तर सहज दिसतात. मग त्याची अंतर्गत तपासणी कशासाठी हा प्रश्न पडू शकेल. परंतु अनियंत्रित उच्चक्यांची असंख्य कारणे बघता बारकाईने रुग्णतपासणी करणे आवश्यक असते. यामध्ये डोके, कान, डोळे, तोंड, मान, छाती व पोट हे सगळे बारकाईने पाहिले जाते तसेच मज्जासंस्थेची रीतसर तपासणी होते.

अशाप्रकारे रुग्णतपासणी केल्यानंतर डॉक्टरांना एक प्राथमिक अंदाज येतो. त्यानुसार खालीलपैकी योग्य तेवढ्या चाचण्या केल्या जातात :
१. प्रयोगशाळा चाचण्या : सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम व ग्लुकोज यांची रक्तपातळी, यकृतासंबंधीच्या चाचण्या, रक्तातील पेशींची मोजणी, लघवी, थुंकी तपासणी इत्यादी.
२. प्रतिमा चाचण्या : छातीचा एक्स-रे, फ्लुओरोस्कोपी, गरजेनुसार मज्जासंस्थेच्या सखोल अभ्यासासाठी सिटीस्कॅन व एमआरआय तपासण्या.

उपचार
कोणत्याही मोठ्या आजाराविना आलेल्या सौम्य ते मध्यम प्रमाणातील उचक्यांसाठी घरगुती उपाय जरूर करावेत. या पारंपरिक उपायांमुळे उचकी प्रक्रियेच्या काही चेताघटकांवर परिणाम होऊन ती थांबू शकते. अशा सोप्या उपायांची यादी देखील भरपूर मोठी आहे ! ३ गटांत तिचा विचार करू :

. सोपे उपाय : बारीक केलेली खडीसाखर चघळणे, लिंबू चावत बसणे, पाण्याने गुळण्या करणे, बर्फाचे पाणी पिणे. पेल्यात पाणी घेऊन त्याच्या पलिकडील बाजूने पिणे असाही एक द्राविडी प्राणायाम करतात. पेल्यात पाणी घेऊन तो हातात धरायचा. असे धरल्यावर पेल्याची अंगठ्याकडची, म्हणजे जवळची बाजू टाळायची. उलट, जिथे पेल्यावर तर्जनी टेकली आहे तिकडे तोंड न्यायचे.

२. श्वसनासंबंधी उपाय : श्वास रोखून धरणे, जोरजोरात श्वास घेणे व सोडणे, वेदना झाल्यागत मोठा आ वासणे, कागदी पिशवी तोंडाभोवती बांधून त्यात श्‍वासोच्छ्वास करणे (या कृतीने रक्तातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढते)

३. लक्ष विचलित करण्याचे उपाय : प्रेमळ व्यक्तीची अथवा घटनेची आठवण काढणे, ध्यान, मनन, इत्यादी.
व्यक्ती आणि प्रकृतीनुसार वरीलपैकी १-२ उपाय करून पाहावेत. हे सर्व उपाय जरी काटेकोरपणे शास्त्रोक्त नसले तरीदेखील त्यांचा उपयोग झाल्याचे अनुभव आहेत.

अन्य काही उपचार प्रशिक्षित व्यक्तीकडून करवून घेता येतात. ते असे :
१. मानेच्या मागच्या भागावर विशिष्ट पद्धतीने चोळणे
२. तोंडातील पडजीभेला चमचा अथवा कापूसकाडीने चेतवणे
३. उलटी करायला लावून जठर रिकामे करणे
४. बर्फगार पाण्याने जठर धुऊन काढणे
५. गुदद्वारात बोट घालून मसाज करणे.

वरीलपैकी एक अथवा अधिक उपायांनी रुग्णास गुण न आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. डॉक्टरांच्या मते जर एखाद्या विशिष्ट आजारामुळे उचक्या येत असतील तर त्या आजारावर प्रथम उपचार केले जातात. तरीही उचक्या न थांबल्यास गरजेनुसार डॉक्टर विविध प्रकारचे औषधोपचार करू शकतात. यासाठी खालील प्रकारची औषधे वापरली जातात:

• मेंदूतील चेतारासायनिक क्रियांवर परिणाम करणारी
• ताणतणाव कमी करणारी
• पचनसंस्थेचे नियमन करणारी
• गुंगी आणणारी व भूल द्यायची औषधे
• स्नायूंचा ताण कमी करणारी

अशाप्रकारे उचकी-नियंत्रणासाठी अनेकविध उपाय उपलब्ध आहेत. तरीसुद्धा एक गोष्ट वैद्यकशास्त्राने मान्य केलेली आहे. या विषयावरील ज्ञान आणि माहितीचा साठा प्रचंड जमा झालेला आहे. परंतु त्या तुलनेत प्रभावी उपचारांच्या बाबतीत मात्र अद्यापही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

समारोप
तर अशी ही उचकीगाथा. अचानक कुणीतरी आपली आठवण काढल्याने आपल्याला उचकी लागते, हा सुंदर कल्पनाविलास आहे ! लेखाच्या प्रारंभातील लावणीनुसार त्याकडे मनोरंजन म्हणून पाहता येते. प्रत्यक्षात उचकी लागण्यामागे बरीच शास्त्रीय कारणे आहेत. त्यांचा उहापोह या लेखात केला. सामान्य स्वरूपातील उचकीसाठी पारंपरिक घरगुती उपाय मोलाचे आहेत. ते सर्वांना नीट माहिती व्हावेत या उद्देशाने त्यांचे विवेचन केले. मात्र अनियंत्रित उचकी हा दुर्लक्ष करण्याचा विषय नाही. त्याप्रसंगी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
…………………………………………………………………………………..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राचीन धनु डी
धन्यवाद.

गरम पेय सावकाश फुंकून पिणे आणि तिखट पदार्थ हळूच चाखून सावकाश खाणे एवढी काळजी आपण घेऊ शकतो.

Pages