ठेहराव..

Submitted by पाचपाटील on 10 June, 2020 - 07:45

७५ दिवस..!
बाईकने नकार देणं साहजिकच..
पण शेवटच्या एका दणदणीत किकनंतर तिच्यात जीव आला.
बाजीराव रोड, JM रोड करत करत डेक्कनला वळसा घालून FC रोडवरून घरी.
सगळं जसंच्या तसं.
झाडंही सगळी जागच्या जागी आहेत हे एक बरं.
पण तरीही सगळं नवं नवं..

ह्या गॅपमुळे चारभिंतीत सादळलेली सगळी इंद्रियं एकाच
राईडमध्ये लख्ख, धारदार आणि स्वच्छ..
पण त्यामुळेच बाईक चालवण्यातली सहजता बोंबललेली...
सगळ्या गाड्या आपल्याच अंगावर येतायत असं वाटणं, एकवेळ ठीक.
पण साध्या हॉर्न्सच्या आवाजानंही दचकायला होणं, तेही
पुण्यातल्या रस्त्यांवर, म्हणजे कायच्या काय झालं..!

पण येतंय रूळावर हळूहळू सगळं असं दिसतंय.
फक्त लायब्ररी तेवढी सुरू झाली तर बरं..
सव्वाशे वर्षांपासूनची जुनी दगडी बिल्डिंग.
त्या चर्चसारख्या उंच उंच छत असलेल्या ऐसपैस विस्तारात प्रवेश करत आपोआप लहान लहान होऊन जातो आपण..
पुन्हा पहिल्यापासून सुरू करायचंय तर तिथूनच बरं.

बाहेरची वर्दळ, धावपळ, वैताग सगळं बाहेरच विरून जातं..
आत फक्त शांतपणे न्यूजपेपर्स, मॅगझिन्सची पानं पलटलेले आवाज अधूनमधून.
तिथल्या स्थल-कालात एक समजूतदार आणि समृद्ध असा 'ठेहराव' साठून राहिलेला असतो.

मग आपल्याही हालचाली आपसूकच संथावतात.
आपण रेंगाळत राहतो थांबत-थांबत, चवीनुसार, रांगभर
पुस्तकांच्या शेल्फ्समधून..

एखाद्या पुस्तकासाठी खूप दिवस मागं लागलो की तिथले लोक त्या भुलभुल्लैय्यात शिरून नेमकं शोधून हातावर
ठेवतात आणि गूढ हसतात एखाद्या झेन मास्टरसारखं..
तोपर्यंत आपली 'वेळ' आलेली नसते असं समजायचं.

फार पोरकं पोरकं वाटतं लायब्ररीशिवाय, पुस्तकांशिवाय..
तेव्हा येऊ द्या त्यांना माझ्या ओंजळीत निवांत..
ती काही मला धोका देतील असं वाटत नाही..
आणि दिलाच तर गोड मानून घेता येईल.
एवढं 'देणं' तर मी नक्कीच लागतो त्यांचं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy ... _/\_

अगदी अगदी झालंय लेख वाचुन..
तुम्ही कुठल्या लायब्ररीचे मेंबर?? मी पुणे मराठी लायब्ररी, नारायण पेठ ची मेंबर आहे.. गेले दोन-अडीच महीने नवीन काही वाचता आलेलं नाही.. कोणास ठाऊक कधी सगळ पुर्वपदावर येणार... Sad

हो.. सगळा स्टॉक कधीचा संपून गेलाय पुस्तकांचा.. व्हायला हवं लवकर सगळं सुरळीत...
मी पुणे नगर वाचन मंदीरचा मेंबर.. लक्ष्मी रोडला आहे... Happy

अरे वा! जवळ जवळ आहेत दोन्ही लायब्ररी! Happy
पण या लायब्ररीबद्दल जास्त माहिती नाही.. नक्की चक्कर मारेल..

मी काहीतरी बोलू का?
Lol
मी या लोकडाऊन मध्ये कितीतरी दिवस फक्त घरात बसून होतो. फक्त घरात.
एके दिवशी सरळ परवानगी काढली, आणि गावी घरी निघून आलो. तिथून आता शेतात रवानगी केलीये स्वतःची.
खरं सांगायला गेलं तर, जो आधीच फेज होता ना, म्हणजे लोकडाऊन 1 आणि 2, तेव्हा मात्र प्रचंड विचित्र वाटत होतं. पण नाऊ आय एम एन्जॉइंग द फेज.
आता शेतातील जीवन वगैरे जास्त बोर करत नाही. Happy
पण एक सांगू शकतो, या लॉकडाऊन मुळे सगळ्या शहरांनी, झाडांनी, प्राण्यांनी, पक्षांनी आणि मुळात सर्व नॅचरल इकोसिस्टमने मोकळा श्वास घेतला (माणूस सोडून.)
एका ८० वर्षांच्या वृध्दाच्या तोंडून हे वाक्य ऐकल होतं.
"मानवाने कायम निसर्गाशी प्रतारणा केली, त्याच्या इतर पोराबाळांना पोरकं केलं. म्हणून ही फक्त एक प्रतिक्रिया आहे."
लेट्स एन्जॉय अनलॉकडाऊन नाऊ, वरील गोष्टींच भान ठेवून...

बादवे, लेख आवडला...

अज्ञा! बाबारे! तु लकी माणुस! Lol
तुला गाव तरी आहे.. आमच तस नाही.. पुस्तकच काय तो आधार! (या गरीबाला Wink ) Happy

@5पाटील, अवांतर गप्पांसाठी क्षमस्व! Happy

@ मन्या <<नक्की चक्कर मारेल..>>> जरूर. चांगली आहे ती लायब्ररी Happy

आता शेतातील जीवन वगैरे जास्त बोर करत नाही...>>>
चांगलं केलंत.. पण तिकडं कुठंतरी quarrentin व्हावं लागेल म्हणून मी तो विचार सोडून दिला.. Happy

@अज्ञा, तरीच म्हंटले, एवढी सलग सवड का मिळाली कथेसाठी. गपगुमान सांगितल्या वेळेला पुढचे भाग टाकतो आहेस. Rofl
घ्या मजा शेतघराची.

पाचपाटील
मस्त वाटलं वाचून . भारी . काव्यात्म लिहिता

मन्या
मस्त . मी त्या ग्रंथालयाचा मेंबर होतो. खूप वर्षे . पण सोडून दिली .

अज्ञा
नशीबवान आहात . प्रत्यक्ष निसर्गात न शेतात काम करता . अनुभवता

@बिपिनदा, हो.. मी गेल्याच वर्षी जॉईन केलीये.. एकाच ठिकाणी असंख्य पुस्तकांचा अनमोल खजिना!! Happy

पुण्यात लक्ष्मी रोड सोडून विस्तारित भागात इमारतीसह मराठी ग्रंथालये कुठे कुठे आहेत? केवळ कुतूहल. बाकी काही नाही. औंध पाषाण सुस बाणेर मगरपट्टा वगैरे ठिकाणी मराठी पुस्तके सहज मिळण्याची सोय आहे का?

मी या बाबतीत फार श्रीमंत आहे. आमचे आबासाहेब अश्याच एका मोठ्या, शहरातल्या सर्वात जुन्या दगडी शाळेच्या दगडी ग्रंथालयाचे ग्रंथपाल आहेत. उन्हाळ्यात तर कित्येकदा मी तिथेच लहान सहान पुस्तके एका बैठकीत वाचून संपवली आहेत. नोंद केलेल्या २०, २२ पुस्तकातलं तिथे वाचून झालेलं पुस्तक बदलून द्या असा मी हट्ट करताना रागावलेले वडील..
भर उन्हाळ्यात थंडगार असणारी ती १८व्या शतकातली इमारत, शिसवी कपाटे, काळ्या लाकडाची भक्कम टेबले, आणि तो पुस्तकांचा विशिष्ट मोहक वास !