गुरु ठाकूरची गाणी आणि काही आठवणी

Submitted by अजय चव्हाण on 17 May, 2020 - 00:05

गुरू ठाकुर हे नावं पहिंल्यादा चर्चेत आलं ते "मन उधाण वार्याचे, धुंद पावसाचे" ह्या गाण्याच्या रिलिजनंतर. तुफान गाजलं होतं हे गाणं आणि ह्याच्याच जोडीला "मल्हारवारी" हे सुद्धा. हे गाणं जेव्हा रिलिज झालं तेव्हा मी शाळेत होतो. आठवी नववीत असेल. फुलपाखरासारखं फुलायचं वय होतं ते. अशा वयात मन खरचं उधाण वार्यासारखंच असतं आणि नेमके शब्द अगदी काळजात उतरायचे. जुलैच्या पाऊसात छत्रीबरोबर चाळे करत मी मजेत ते गाणं गात जायचो. त्यावेळी मोबाईलचा फारसा सुळसुळाट नव्हता. वाॅकमेन तर शाळेत अलाऊडच नव्हता. तसाही आमच्याकडे नव्हताच म्हणा, इतकंच कशाला टी.व्ही असून नसल्यासारखाच. बहिणीची दहावी म्हणून केबल काढलेली. तेव्हा फक्त एक रेडीओच आमच्या मनोरंजनाचा एकमेव साधन. त्यात कॅसेट टाकून किंवा एफ एम वर गाणी ऐकू शकत होतो. मी माझे खाऊचे पैसे जमा करून 15 रूपयांची रिकामी कॅसेट विकत घेऊन वर परत 15 रूपयांमध्ये माझ्या आवडीची गाणी भरून आणली होती. शाळेतून घरी आल्यावर खुपदा रिपीट मोडवर वाजणारं हे माझं गाणं..पावसाळयात रविवारी खिडकीत बसून पाऊस पाहायचा आणि हे गाणं ऐकण्यात वेगळाच सुखद अनुभव यायचा. आज युट्युब आहे, मोबाईल आहे, खुप साधने आहेत पण ह्या मजेला "ती" सर नाही. हुश्शऽऽ गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी आणि दुसरं गाणं म्हणजे "मल्हारवारी" हे गाणं. ऐकल्यानंतर अंगात चैतन्य सळसळायचं, हुरूप यायचा, पाय आपोआप थिरकायचे. काय ते एक एक शब्द..

"ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती,
साद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती"

मन अगदी गहीवरून यायचे. कुठल्या तरी दुर गावी नेऊन पोहचवायचे अर्थात गायक आणि संगीतकारांचा मौलाचा वाटा आहेच पण शब्दच असे होते की... क्या बात..

ह्या गाण्यावरचा डान्स तर अगदी तर शाळा- काॅलेजच्या गॅदरिंगला हमखास ठरलेला असायचा. मी ही केला होता ग्रुपसोबत. त्यामुळे जरा जास्तच जवळीक आहे आणि मुख्य म्हणजे -
"मी हाय कोळी"ला नवी रिप्लेसमेंट मिळाली आणि तमाम लहान मुलांची डान्स करताना घालायच्या लुंगीपासून (लुंगी कसली? रूमालच) सुटका झाली आणि प्रत्येक वर्षी तरी काय तोच पोशाख, लुंगी आणि कान.टोपी. त्यापेक्षा सफेद कुर्ता आणि भगव्या फेट्यात नाचताना रूबाब जाणवायचा. डान्स करताना लुंगी सुटायची भिती नाही आणि सुटल्यानंतर शाळेत आणि नंतर आयुष्यभर ती फजिती शाळेच्या ग्रुपवर ऐकून embarrass होण्याची भीती नाही.

Guru_Thakur_2010.jpg

मराठी चित्रपटसृष्टीला अनेक श्रवणीय गीतांची देणगी मिळालीय पण मध्यतंरी फारशा श्रवणीय गाण्याची शृंखला थांबली होती आणि ती गुरू ठाकुर ह्यांच्या गीतांमुळे पुन्हा सुरू झाली असं मला तरी वाटतं. गदीमानंतर मला भावलेला गुरू ठाकुर नंतर नंतर आणखीनच आवडू लागला. अगदी काॅलेजला जायला लागल्यावर त्याचं "परी म्हणू की, अप्सरा ती मेनका" काॅलेजमध्ये सायन्स- मधली घार्या डोळ्यांची मोनिका तेव्हा माझी क्रश होती. तिला पाहील्यावर हे गाणं आठवायचं. मी ही कधी मजेत गुणगुणताना ती मोनिका असं म्हणायचो. काॅलेजातल्या मुली तेव्हा "ही गुलाबी हवा" ऐकण्यात जास्त धन्यता मानत होत्या. तेव्हा हवा खरीच गुलाबी होती शराबी होती. नेमक्या फिलींग्स गुरू ठाकुरच्या शब्दांमुळेच व्यक्त होऊ लागल्या आमच्या. काॅलेजमध्ये गेल्यावर तरूणाई नुसती सळसळत होती आणि गुरू ठाकुर आम्हाला व्यक्त व्हायला नवी गाणी देत होता.

2010 मध्ये नटरंग प्रदर्शत झाला. ह्या चित्रपटाबरोबर गाणीसुद्धा चांगलीच गाजली अजय-अतुलचा संगीतात खुप मोठा वाटा असला तरी शब्दांबद्दल गुरू ठाकुरचा वाटा कुणीच घेऊ शकत नाही. अप्सरा आली हे गाणं आणि वाजले की बारा ह्या लावणीला तर रसिकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं.

"सहाची बी गाडी गेली, नवाची बी गाडी गेली,
आता बाराची गाडी निघाली"

अफाट कल्पकता..इतकंच म्हणू शकतो मी. ह्या बाराच्या गाडीनेच गुरू ठाकूर कुठेच्या कुठे पोहचला...त्यानंतर त्यातलचं.

"खेळ मांडला" ह्या गाण्याचे शब्द अक्षरक्षः काळीज चिरून जातात..

"उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जीणं अंगार जीवाला जाळी
बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे
इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा, जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला,
खेळ मांडळा"

किती ती आर्तताऽऽ आणि लगेच शेवटी तरी न्हाई धीर सांडला.
किती धीर त्या शब्दांत.. गाणं ऐकल्यानंतर डोळ्यांतून पाणी आल्यावाचून राहत नाही आणि सावरायलाशिवायही राहत नाही. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या "क्षणभर विश्रांती" ह्या चित्रपटातलं "हा जीव बावरा" हे गाणं.. हे गाणं कधी कधी बसमध्ये ऐकत काॅलेजला जायचो. मोबाईलला बाळसं धरण्याचे ते दिवस. हातात मोबाईल फक्त गाणी, गेम्स आणि 100 SMS पॅक टाकून चॅटीग ह्यापुरता मर्यादित. त्यातल्या त्यात गाणी ऐकण्याचं मला फार वेड. शक्यतो 100 च्या वर गाणी मावत नव्हती. माझ्या मोबाईलमध्ये फारशी गुरू ठाकुरचीच गाणी ऐसायची. गुलजार, आनंद बक्षी, समीर, मजरूह सुलतानपुरी हया दिग्गजांच्या पंक्तित मराठीत गुरूला ठाकुरला बसवलं तर वावग ठरू नये. काॅलेजमधले अमराठी पोर-पोरीसुद्धा मराठी गाणी आवर्जून ऐकत असतं. मराठी गाण्यांना अमराठी रसिक मिळणं ह्या भाग्यात गुरू ठाकुरचा खारीचा वाटा कुणीच नाकारू शकतं नाही.

झेंडा मधलं "अंतरी वाजते" ह्या गाण्याचं दुसर्या कडव्यातले शब्द मला जास्त भावतात..

"श्वास गंधाळती
शब्द भांबावती
रोमरोमांतली कंपने बोलती
मोहरे-मोहरे पाकळी-पाकळी
भारलेल्या जीवा आवरावे किती
का अशा जागल्या सांग संवेदना"

संवेदना जागल्याच होत्या. प्रेम करायच्या वयात अंतरी वाजलेल्या अस्पष्ट सूराला अप्रतिम साजेसे शब्द लाभले होते.. एकेक गाण्याबद्दल लिहायचं झाल्यास पुस्तकच छापावं लागेलं.
लावणी म्हणू नका, प्रेमगीत, सॅड गीत आणि अशाच विविध भावनांची गाणी गुरू ठाकुरने लिहली आहेत आणि अजुनही लिहतोच आहे..

आता याउपर फारसं काही न लिहता मला प्रचंड आवडलेल्या गाण्यांबद्दल लिहतो.. मला काहीच प्रोब्लेम नाही ह्या चित्रपटातलं "गाज येता गो" हे गाणं खरंतरं इतकं छान आहे की, माहेरला जातानाची काय ओढ असते हे पुरूष म्हणून कधी कधी समजून घ्यायला कमी पडत असू तर हे गाणं नक्की ऐका..कोकणी शब्दांची जादू आणि कोकणात माहेर असलेल्या स्त्रियांसाठी हे गाणं म्हणजे खासं पर्वणीच आहे..

अचूक शब्दाविष्कार आणि नेमक्या भावना शब्दात मांडण खुप कठीण आहे. एक कवी म्हणून मी स्वतः हे समजू शकतो. लेखक व्हायला खुप सोप्पं आहे पण कवी होणं म्हणजे महाकठीण. तशा भावना मनात आणाव्या लागतात. फार संवेदनशील मन असावं लागतं आणि मुळात म्हणजे वेड होता आलं पाहिजे तरच रसिकांना वेड लावता येतात. "मला वेड लागले प्रेमाचे" हे गाणं ऐकलं असेल तर पटेल तुम्हालाही..

जाता जाता मला नुकतचं भावलेले गुरू ठाकुरचं कोकणी शब्दांत बद्ध केलेलं ह्या गाण्याविषयी लिहायला जास्त आवडेलं..कारण सध्याच्या लाॅकडाऊनमध्ये उद्धस्त झालेल्या मनांना नक्कीच हे शब्द धीर देतील..


होणार होतला जाणार जातला
मागे तू फिरू नको
उगाच सांडून खऱ्याची संगत
खोट्याची धरू नको
होणार होतला जाणार जातला
मागे तू फिरू नको
उगाच सांडून खऱ्याची संगत
खोट्याची धरू नको
येईल दिवस तुझा हि माणसा
जिगर सोडू नको
तुझ्या हाती आहे डाव सारा
इसार गजाल कालची रे
देवाक् काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे.

गुरू ठाकुरचा हा प्रवास कधीही न संपो. त्याच्या लेखणीतून अशीच छान छान गाणी लिहली जावोत आणि आमच्यासारख्या रसिकांना शब्दांची, गाण्यांची जादू वेड लावत राहो हीच सदिच्छा.

फोटो आणि माहिती आंतरजालावरून साभार.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages