चक्राता - २ तयारी

Submitted by साक्षी on 5 June, 2019 - 05:06

या आधीचा भाग इथे वाचा.

एप्रिल मधे परिक्षा संपल्यावर मेल परत चेक केले. आमच्याकडे चांगली दुर्बिण नव्हती. किकांना विचारून दुर्बिणीने चक्राता शॉपिंगचा श्रीगणेशा केला. (इथेच लेकाला नक्की समजलं की आम्ही कँपची तयारी करत आहोत.)
मग कॅमोफ्लाज कपडे, चांगले शूज ही सगळी खरेदी झाली. गरज असलेल्यांबरोबर गरज नसलेल्यांनीही (पक्षी लेकाने) हात, आमचे खिसे साफ करून घेतले. फोटोग्राफी शिकायचं बकेट लिस्ट्मधे केव्हाचं आहे पण ते न झाल्याने अजुन मोठी, चांगली लेन्स विकत किंवा भाड्याने घ्यायचं रद्द केलं.

पक्षी ओळखण्यातही मुलगा २रीत असेल तर मी पहिलीत आणि नवरा के.जी. मधे आहोत/ होतो. खरं तर या कँपला १०वी नाहितर निदान ८वी ९वीच्या विद्यार्थ्यांनी जायला हवं पण आम्ही विचार केला कुठे परिक्षेला बसायचं आहे नुसताच अभ्यास करायचा आहे. smile पण त्यामुळे एक रेफेरंन्स बुक हवं होतं. प्री-कँप मीटिंग मधे किकांनी सजेस्ट केलेलं birds of indian subcontinent खरेदी केलं.
पुण्यात आणि नंतर दिल्लीत तेव्हा प्रचंड उन्हाळा होता. देहेरादून ला थंडी असणार होती आणि पाऊसही असू शकणार होता. त्यामुळे तिन्ही ऋतूंचे कपडे घ्यावे लागले. नोर्मल कपडे ४-५ सेट्स, स्वेटर्स, कानटोप्या, रेनी जॅकेट्स, उन्हाळी टोप्या, कॅमेरा, त्याची आहे ती लेन्स, दुर्बिण, त्यांचे योग्य कपडे, बॅटरीज, चार्जर्स, प्रत्येकाला पाण्याची बाटली (स्टील ची) असं करत बरच सामान झालं.

२७ मे ला संध्याकाळी ६ च्या पुणे - दिल्ली फ्लाइट्ने आमचा प्रवास चालु झाला. दिल्लीत पोहोचल्यावर आमच्याकडे वेळ होता. एअरपोर्ट वरून दिल्ली रेल्वे स्टेशनला मेट्रोने गेलो. दिल्ली मेट्रो हा खूपच आनंददायी अनुभव होता. संध्याकाळ असल्याने उकाडा कमी होता, मग तिथून सायकल रिक्षा करून आम्ही जुनी दिल्ली बघत बघत जामा मशिद जवळ करीम्सला गेलो. करीम्सला जेऊन बाहेर मस्त शाही टुकडा, लस्सी वगैरे दिल्ली स्पेशल खाऊ खाल्ला. पण जुनी दिल्ली बघून फारच वाईट वाटले. सगळ्या रस्त्त्यांवर लोंबकळणार्या उघड्या विजेच्या तारा, अतोनात गर्दी, गाड्यांनी भरून वहाणारे रस्ते, दुसर्याला न जुमानता पुढे जाणारी वहाने, सगळंच भयानक वाटलं. त्या गर्दीतच रस्ता अडवून चाललेली लग्नाची मिरवणूक बघून मला आमच्या दत्तवाडी एरिआची आठवण झाली.

रात्री ११:५० ला नंदादेवी एक्स्प्रेस मधे बसलो. आधीपासून डिक्लेर केल्याप्रमाणे लेक सगळ्यात वरच्या बर्थ्वर झोपला खरा पण तो लोळत लोळत पडेल का काय हेच डोक्यात असल्याने मी मधल्या बर्थ वरून दर तासाने उठून तो अजुनही सरळच झोपला आहे ना चेक करत होते.
IMG_20190428_063806.jpg
सकाळी ६-६:३० वाजता दूनला पोचलो. रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ एक हॉटेल रूम बूक केली होती. दुपारच्या जेवणाला सगळे भेटणार होते त्यामुळे आमच्याकडे सकाळचा थोडा वेळ शिल्लक होता. फ्रेश होऊन नाष्ता करून पलटण बाजार बघायला गेलो. ही तर आपली पुण्यातली तुळशीबाग होती. खरेदी तर करायची नव्हतीच. मग बळच काहितरी खादाडी करत परत आलो आणि रूम वेकंट करून सगळे भेटणार होते तिथे हॉटेल आंगन ला येऊन पोहोचलो. आमच्या नेहेमीच्या वेळेत पोहोचण्याच्या सवयीप्रमाणे १:३०-२:०० वाजता भेटायचे ठरले होते आणि आम्ही १ वाजताच आंगनच्या अंगणात बागडत होतो.

या नंतरचा भाग इथे वाचा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचत आहे .. उत्सुकता आहे कोणते कोणते पक्षी दिसले ,आणि एकंदरीत पक्षी निरीक्षणात काय काय नोंदी ,धमाल केलीत याची ..