वावटळ भाग ३

Submitted by Vrushali Dehadray on 18 May, 2018 - 01:24

वावटळ भाग ३

तिथे सुरु झाले त्यांचे मैत्री पर्व. स्वयंपाकघरात तो आजूबाजूला वावरताना वाटणारे अवघडलेपण दूर झाले. उलट दोघांनी मिळून काम करणे तिला आवडायला लागले. दोघांनी मिळून भांडी घासणे. एखादा पदार्थ करायचा झाल्यास त्याची तयारी करणे. कित्येकदा बाहेरचा डबा खायचा कंटाळा आल्यावर दोघे मिळून झकास स्वयपाक करत. तो भाजी करायचा, ती गरम गरम गरम पोळ्या नाहीतर भाकऱ्या करायची. एखाद्या दिवशी तो लवकर आला तर तिच्यासाठी खाणे करून ठेवायचा. कधीतरी पावभाजी, कधी मिसळ. दोघांनी मिळून करण्यात वेगळीच मजा होती. आता सोमवारी निघताना तिचे पाय जड होत नव्हते नि शुक्रवारी संध्याकाळी घरी जायचे म्हणून हुश्श होत नव्हते. पण हे तिच्या लक्षातही आले नाही. त्याचे वाचन अफाट होतं. तिच्या वाचनात बराच काळ खंड पडला होता. पण त्याच्या मदतीने तिने वाचनाशीही नाळ जुळवली. जेवण झाल्यावर खरकटा हात घेऊन ते तासन तास एखाद्या पुस्तकावर चर्चा करत बसत. एकमेकांची मते पटली नाहीत तर तावा तावाने वाद घालत. एखादं दिवशी ऑफिसच्या निमित्ताने नवरा यायचा. एखादी रात्र राहायचाही. त्यावेळी मात्र तो मोकळेपणा कमी व्हायचा. ते परत एकमेकांना निमओळखीचे होऊन जात. लोकल ट्रेन मधल्या सहप्रवाशासारखे....

तीचे जागा शोधण्याचे प्रयत्न सुरूच होते. पण त्यात आधीसारखी असोशी नव्हती. प्रत्येक जागेत काही ना काही समस्या येतच होती. कुठे वस्ती चांगली नाही, तर कुठे भाडे जास्त, तर एखादी हवेशीर नाही म्हणून पाउल ठेवता क्षणी नकोशी वाटायची. सुरुवातीला एखाद्या ठिकाणी नाही जमले की ती खूप निराश व्यायची. पण नंतर नंतर ते ही कमी झाले. नकळत प्रत्येक जागेची तुलना सोहमच्या जागेशी व्हायची आणि मग ती आवडायची नाही. ‘आपण हल्ली जागा नाकारण्यासाठी बहाणे शोधत असतो का?’ मनात आलेला विचार तिने पाल पडल्यासारखा झटकला.

जागा बदलण्याचा विषय घरीही कधी निघाला नव्हता. मुंबईला जाताना नवऱ्याच्या स्वभावात जाणलेली कोवळीक हे अळवावरच पाणी ठरलं. पुन्हा त्या कोवळीकीची कधी चाहूलही लागली नाही.

“मुंबई मानवली हो तुला. इथे होतीस तेव्हा संध्याकाळी आल्यावर सुकलेली दिसायचीस. आता एवढी मुंबैहून येतेस पण छान फ्रेश असतेस.” एकदा ती शुक्रवारी रात्री आल्यावर सासूबाई म्हणाल्या. तिने चमकून त्यांच्याकडे पाहिले. पण तो टोमणा नव्हता. त्या खरोखरच कौतुकाने म्हणत होत्या. ती मात्र ते ऐकून अस्वस्थ झाली.

....आणि मग ती रात्र आली. त्या रात्री तिला काही केल्या झोप लागेना. शेवटी ती कंटाळून बाहेर आली. अंधारात तशीच सोफ्यावर बसली. मोबाईलशी चाळा करताना तिला कुमारच्या निर्गुणी भजनांचा फोल्डर सापडला. एखादा अनपेक्षित ठेवा सापडावा तसं तिला झालं. ‘सुनता है गुरू ग्यानी....’ कुमारचे जादूभरे स्वर अंगावर मोरपीस फिरवत होते. सोफ्यावर मागे मान टाकून तिने डोळे मिटून घेतले. ते स्वर तिच्या रंध्रारंध्रात झिरपत होते. त्या स्वरांनी ती खोलवर मोकळी होत होती. तिला गुंगी आल्यागत झालं. तेवढ्यात कुमारच्या स्वरात दुअसारा स्वर मिसळला गेला. ‘गगन मे आवाज हो रही है’ सोहम मुक्त कंठाने गात होता. तिला अजूनच रिलॅक्स वाटल. असा किती वेळ गेला ते कळलच नाही. तिला शांत शांत वाटत होता. एखाद्या डोहात आत आत गेल्यासारख. तिथे होता अंधार, छाती व्यापणारी शांतता आणि त्या शांततेचाच एक भाग होता कुमारचा स्वर ---- सोहमचा स्वर.

“झोपलीस का? आत जाऊन झोप जा. पहाट व्हायला आली. अंग अवघडेल इथे.” सोहमचा आवाज कुठून तरी लांबून आल्यासारखा वाटत होता. आपण जागे आहोत का झोपलेले हेच तिला कळत नव्हतं. कळून घेण्याची इच्छाही नव्हती. जगाच्या अंतापर्यंत ते गाणे असेच चालू राहावे असं वाटत होतं. ‘गायचं सोडून सोहम बोलतोय कशाला?’ तिने त्रासिकपणे डोळे उघडले. सोहमची आकृती अंधारात समोर उभी होती. “आत जाऊन झोप जा.”

“नको. तू गा. अजून खूप गा.” तिने परत डोळे मिटले.

तिला डोक्यावर सोहमचा हात जाणवला. “उठ, उद्या म्हणजे आज ऑफिस आहे तुला. आत जाऊन झोप.”

शेवटी तिने नाईलाजाने डोळे उघडले. ती नीट जागी झाली. सोहमने डोक्यावरचा हात काढला.

“किती वाजले?”

“चार”

“किती सुंदर गातोस तू.”

तो नेहमीप्रमाणेच कपाळावर बोट घासत हसला. स्वयंपाकघरात जाऊन त्याने दिवा लावला. तीही त्याच्या मागोमाग आत गेली. आता तिची गुंगी पूर्ण उडाली होती. थकवा पूर्ण गेला होता. त्या स्वरांनी जणू काही एक अनामिक उर्जा तिच्या रंध्रात ओतली होती.

“कॉफी घेउया?” तिने विचारले.

“कॉफी घेतली तर झोप पूर्ण जाईल. तुला त्रास होईल उद्या ऑफिसमध्ये”

“नाही होणार. उलट खूप फ्रेश वाटतंय मला.”

तो परत हसला. “बस. मी करतो.”

ती परत सोफ्यावर बसली डोळे मिटून. मनातल्या सुरांशी खेळत. जणू काही डोळे उघडले असते तर ते सूर निसटून गेले असते.

“घे.” त्याने तिच्यासमोर मग धरला. दुसरा मग घेऊन तो समोर बसला.

किती तरी वेळ दोघे काही न बोलता बसून होते. अशा वेळा ती इथे नवीन रहायला आली होती तेव्हाही यायच्या. पण त्या नि:शब्दतेत आणि आत्ताच्या मूकपणात खूप अंतर होते. आजचे अबोलपण पूर्णतेने भरलेले होते. एखादे भांडे धान्याने किंवा पाण्याने शिगोशिग भरावे तसे. आणि तिला यातला एकही कण, एकही थेंब पडू द्यायचा नव्हता. एखाद्या शब्दानेही ते भरलेपण सांडेल, रिते होईल असं वाटत होता तिला. ती डोळे मिटूनच कॉफी पीत होती. तेवढ्यात ते सूर पुन्हा आले. ती त्यांच्या कुशीत शिरायला लागली. गारठ्यात दुलई लपेटल्यावर सर्वांगाला होणाऱ्या मऊ मुलायम उबदार स्पर्शासारखे ते सूर तिला स्पर्शत होते. त्या सुरांमध्ये काय नव्हते - तान्ह्या बाळाच्या स्पर्शातली कोवळीक, आजीचा खरबरीत स्पर्श, आईचा मायाळू हात, पुरुषाचा कणखर सुखावह वेदना देणारा स्पर्श..... या सगळ्यातून जाणवणारी एक आश्वासक उब. सोहम नेमके काय गात होता हे तिला समजतही नव्हते. कळत होते फक्त सूर. शब्दांच्या पलीकडे नेणारे, अंगाखांद्यावरून गालावरून फिरणारे. खोलवर आत पोचणारे.

“उठ आता. सकाळ झाली.” सोहमचा हात पुन्हा तिच्या डोक्यावर.
तिने डोळे घडले तेव्हा लख्ख उजाडले होते. ती उठून आत गेली. तिने मुक्यानेच आवरले नी ऑफिसला गेली. दिवसभर सूर डोक्यात घुमतच होते. तिला गप्प गप्प बघून मैत्रिणीने विचारले देखील, “का ग, बर नाहीये का?” ती नुसती हसली. ती तिला काय सांगणार होती? आणि सांगूनही तिला कळले असते का ते भरलेपण? भारलेपण?

संध्याकाळी बॉसला सांगून ती जरा लवकर निघाली. चहा करून घेतला. तेवढ्यात सोहमही आला.

“तू गाण शिकायचास?” त्या रात्रीने त्या दोघांचा अहोजाहो पासून सुरू झालेला प्रवास एकेरीवर आणला. दोघांच्याही नकळत.

“हो. पुण्याला होतो तेव्हा चालू होतं. इथे आलो नी बंदच पडलं. काल कुमारचे स्वर ऐकले नि मी मला विसरून गेलो. मला माहीत नव्हतं तुला गाण आवडत ते.”

“मी पण विसरूनच गेले होते.” तिच्या डोळ्यासमोर घरातलं चित्र आलं. “ए, बंद कर ग तुझ ते आ...ऊ. डोकं उठलं.” गाणी लावल्यावर तिला दहाव्या मिनिटाला ऐकावं लागायचं. “हव तर हेडफोन लावून ऐक” अशी उदार परवानगीही मिळायची. हेडफोन लावून गाणे ऐकणे तिला कधीच आवडले नाही. हेडफोनमधून गाण फक्त यांत्रिकपणे मेंदूत जातंय असं तिला वाटायचं. आणि तिला तर संपूर्ण शरीर न्हाऊ घालणारे सूर हवे असायचे.

त्या रात्रीने आनंदाचं आणखी एक नवं दालन तिच्यासाठी खुल केलं. आता अधून मधून त्यांचा एकत्र गाणी ऐकण्याचा - रेकॉर्डेड आणि सोहमची असा कार्यक्रम होऊ लागला. एखाद्या दिवशी राहुल देशपांडे नाहीतर कौशिकीला ऐकण्यासाठी ते बाहेरही जाऊ लागले. पण तिला सर्वात भावायचे ते त्या पहिल्या रात्रीसारखा अंधार करून कोणत्याही साथीशिवाय सोहम गायचा ते, अतीव शांतीचा अनुभव देणारं गाणं.

तो गाण्याच्या रात्रीचा प्रसंग येईपर्यंत ती प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगायची. त्याला इंटरेस्ट असो वा नसो. बहुतेक वेळा ती काय सांगतीये इकडे त्याचे लक्षही नसायचे. सगळ्याच बाबतीत त्याचा एक निरीच्छपणा असायचा. आज लग्नाला इतकी वर्षे होऊन सुद्धा त्याला नेमके काय आवडते हे ती खात्रीपूर्वक सांगू शकली नसती. खाणेपिणे, कपडेलत्ते, खरेदी, नाटक, सिनेमा यात तो तिच्याबरोबर असायचाही आणि नसायचाही. एखादी गोष्ट मनापासून आवडलीये म्हणून त्याला खूप आनंद झालाय किंवा बिनसलीये म्हणून तो निराश झालाय, कमालीचा संतापालाय असं कधीही घडायचं नाही. घरातल्या कोणत्याही गोष्टीत त्याने मनापासून भाग घेतलाय किंवा पुढाकार घेऊन काही केलय अशी एकाही गोष्ट ती सांगू शकली नसती. रात्रीचे व्यवहारही एक टिकमार्क काम म्हणून तो आटोपतोय असं वाटायचं. ना देण्यातली उत्कटता ना घेण्यातली ओढ. फक्त एक जैविक क्रिया. तिने केलेली एखादी गोष्ट त्याला आवडली नाही तर तीव्रतेने कधी विरोधही केला नाही. मैत्रिणी, नातेवाईक तो तिला किती स्वातंत्र्य देतो म्हणून नेहमीच वाखाणत असतं. यामागच खरे कारण तला माहीत होते. विरोध करून आपल म्हणण रेटल तर जवाबदारीही घ्यायला लागते जी त्याला कधीच नको असायची. बाहेर मात्र त्याच्या वागण्याच उदात्त म्हणून कौतुक व्हायचं. सोहम बरोबर रहाण्याला हो म्हणण्यामागेही हेच कारण होते. फारशी कटकट न होता सोय होतीये ना. असं पुरुषाबरोबर राहावे का एवढा विचार करण्याचा त्रास घेणारा तो नव्हता.
हल्ली अनेकदा तिला प्रश्न पडायचा की तिचं तिच्या नवऱ्यावर प्रेम आहे का? पूर्वी असा प्रश्न मनात आला की ती ‘हो आहे’ अस म्हणून तो विचार ती बाजूला सारायची. आता मात्र हा प्रश्न मनात आला की तिला भीती वाटायची. आपलं नवऱ्यावर प्रेम नाही तर मुंबईला बदली झाल्यावर आपण एवढे का हादरलो? सोहम बरोबर राहताना अस्वस्थ का झालो? प्रेम आणि सवय यात नेमका फरक काय? सुरांत चिब भिजल्याची घटना नवऱ्याला सांगावी असं आपल्याला का नाही वाटल. का? त्याला कळणार नाही म्हणून की ......? तिच्यात आणि सोहममध्ये मैत्रीच्या पुढचे काहीतरी आहे का?हा विचार मनात येताच ती दचकली. आपण असा काहीतरी विचार करतोय या विचारानेच ती घाबरली. अंगावर पडलेले कोळीष्टक झटकावे तसा तिने तो विचार झटकला. पण खोड्याळ मुलासारखा तो विचार परत परत उसळ्या मारून येत राहिला.

ती ओढ नेमकी कधी जाणवायला लागली. नाही सांगता येणार? एकमेकांशी स्पष्ट बोलल्यावर अवघडलेपण नाहीसे झाले तेव्हा? की पहिल्यांदा त्याचे गाणे ऐकल्यावर? की त्याने डोक्यावर हात ठेवला तेव्हा? ते बाहेर गाण्याच्या कार्यक्रमांना जायला लागले तेव्हा? नेमक सांगता येत नव्हत. ओसाड वाटेवरून जाताना काही अंतर कापल्यावर तुरळक हिरवाई दिसायाला लागते आणि मग ती वाट घनदाट झाडीत नेमकी केव्हा शिरली ते कळूच नये असं. सोहमच्या सहवासात तिच कलासक्त मन फुलायला लागल होत. एखाद्या वठलेल्या झाडाला अचानक पालवी फुटावी तसं. निष्पर्ण वाळवंटात खूप काळ चाललेला पांथस्थ ओअॅसिसमध्ये पोचल्यावर त्याने पंचेंद्रीयांनी त्या ओलाव्याचा थेंब नि थेंब टिपून घ्यावा तसे ती सोहमच्या सहवासातले क्षण टिपत होती. मधेच तिचे मन धोक्याचा इशारा द्यायचे पण ती तिकडे कानाडोळा करायची.

एकदा रुही कॉलेजच्या कामासाठी दोन दिवस मुंबईला आली होती. तिला आईमधला हा फरक जाणवला. “ती म्हणाली देखील, “आई, तुझ्याकडे बघायला मस्त वाटतंय.”

“का ग?”

“तू खूप मोकळी वाटतीयेस. सोहम एकदम कुल आहे. किती सहजतेने मदत करत असतो कामात. तुम्ही गाण्याच्या वगैरे कार्यक्रमांना जाता का? सोहम म्हणाला मला.”

तिला काय बोलावे ते सुचेना. एका तरुण मुलीला आपली आई एका दुसऱ्या माणसाबरोबर बाहेर जाते हे कळल्यावर कसे वाटेल हा विचारच तिच्या मनात आला नव्हता. अंधारात एकदम वीज चमकावी नि पायाखालचा खड्डा दिसावा असं तिला झालं. तिचा चेहरा बघून रुही म्हणाली, “इट्स ओके. जात जा. पहिल्यांदाच या गोष्टींसाठी तुला पार्टनर मिळालाय. असा पार्टनर आयुष्यात असण खूप गरजेच असतं. पुण्यातली तू आणि मुंबईतली तू यात खूप फरक पडलाय, चांगला.” आणि ती समजूतीच हसली.

‘ही एवढी मोठी कधी झाली?’ आज त्या दोघींमधले मायलेकीचं नातं गळून पडलं.

तिला कधी कधी आश्चर्य वाटायचं की ह्याने अजून लग्न कसं केलं नाही? नाही म्हणायला त्याला एक दोन मैत्रिणी होत्या. ती असताना त्यातली एक एकदा घरीही आली होती. ती रहायला आल्यावर अगदी सुरुवातीच्या काळात. पण पुढे मात्र त्याच्या मैत्रिणींचे अस्तित्व कधी जाणवले नाही. प्रत्यक्षातही आणि फोनवरही. मित्र मात्र होते. त्याच्यासारखेच अतरंगी. ते घरी आले की मात्र तीचं अस्तित्व तो विसरूनच जायचा. एक दिवस ती घरी आली तर घरात वेगळंच दृश्य. त्या दिवशी खरे तर ती मैत्रिणीकडे रहायला जाणार होती. पण ऐनवेळेला प्लॅन बदलला आणि ती घरी आली. तो आणि त्याचे दोन मित्र हॉलमधेच होते. पेयपानाचा सगळा साज टीपॉयवर मांडला होता. घर सिगारेटच्या धुराने भरून गेले होते. हे दृश्य बघून ती जरा धसकली. काही न बोलता ती तिच्या खोलीत गेली. जरा वेळाने दारावर टकटक ऐकू आली. दारात तो अपराधी चेहऱ्याने उभा होता. “तू येणार नव्हतीस म्हणून आम्ही ......”

“इट्स ओके. मीच अचानक आले.” त्यावेळी तिच्या लक्षात आल की त्याच्या आयुष्यातली ही प्रायव्हसी आपण घालवली आणि त्याने ते कधी जाणवूनही दिले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीही तो अपराधी चेहऱ्यानेच वावरत होता.

“आता बास बर का. तुझ्या चेहऱ्यावर बारा वाजलेले बघवत नाहीयेत.” तिच्या तोंडात ही भाषा बघून तो सैलावला.

“मी नेहमी घेत नाही. असं कधीतरी.”

“अरे ठीक आहे ना. एवढे स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. खर तर मी तुझी प्रायव्हसी घालवली हे माझ्या इतके दिवस लक्षातच नाही आले. खूप दिवस झाले तुला एक गोष्ट विचारायचीये.”

“मी लग्न का नाही केले?”

‘याला आता आपले मन इतके वाचता यायला लागले?’

“एक होती ऑफिसात. वाटायचे की हिचे नि आपले चांगले जमेल. पण मी तिला विचारायच्या आधीच तिचे जमले. कांदेपोहे प्रोसेसने जावं अस वाटल नाही कधी. हा आता आई लागते मागे. आता तर टिपिकल लग्नाळू वयाच्या बराच पुढे गेलोय. त्यामुळे जास्तच चिकित्सक झालोय. बघुया. “मैत्रिणी आहेत तशा इतर गरजासाठी. पण ते संबंध फक्त शारीर पातळीवरच राहिले.”

शारीरिक संबंधांबाबत तो इतके स्पष्ट बोलल्यावर ती जरा बावरली. पोळीभाजी, वरणभात नि केळ्याची शिकरण पद्धतीच्या तिच्या आयुष्यात या विषयावर फारसे मोकळेपणे बोलण्याची पद्धत नव्हती. ती या विषयावर जवळच्या व्यक्तीशीही कधी बोलली नव्हती किंबहुना आपण मनातल्या मनात तरी कधी मोकळे झालोय का या विषयावर हे ती आठवू लागली.

त्याचे लक्षच नव्हते तिच्या प्रतिक्रियेकडे. नेहमीचा मिश्कील सोहम हा नव्हता.

“आपण शरीर संबंधांचा एवढा बाऊ का करतो? ती एक पूर्ण जैविक क्रिया आहे. तहान भूकेसारखी गरज आहे. हे का नाही आपण मान्य करत? आणि मुळात प्रेम-लग्न-लैंगिक सुख हे एकाच अक्षावरचे टप्पे आहेत हे कोणी सांगितले? आणि ते त्याच क्रमाने यायला हवेत हे कोणी ठरवले? हा आता त्यातल्या त्यात आपल्याला प्रेम आणि लग्न याचा क्रम मागे पुढे झालेला चालतो पण शरीर संबंध? ते मात्र या क्रमातला शेवटचा टप्पा असायला हवेत असं आपण मानतो.”

“बरोबरच आहे ते. नाहीतर इतर प्राणी नि आपल्यात फरक तो काय राहिला? गुहेतल्या आदिमानवापासून सुरु झालेला आत्तापर्यंतचा प्रवास व्यर्थच नाही का? भावनांचा अनुभव हा मानवाच्या उत्क्रांतीमुळे शक्य झाला आहे. लैंगिक सुख हा प्रेमाची परिणीतीचा अत्त्युच्च टप्पा असतो.” आता तिची भीडही चेपू लागली.

गुहेपासून बहुमजली बिल्डींग पर्यंतच्या प्रवासाचा संबंध फक्त शरीरासंबंधांशीच आहे का? योनिशुचिता हे पुरुषप्रधान संस्कृतीने बायकांवर निरंकुश सत्ता ठेवण्यासाठी रचलेला डाव आहे. आणि आपण त्यालाच आयुष्याची इतिकर्तव्यता मानून बसतो. मुळात लैंगीकतेचा संबंध जैविक गरजेशी आहे, प्रेमाचा संबंध भावनिक गरजेशी आणि लग्नाचा संबंध असलाच तर सामाजिक गरजेशी. आपण जबरदस्तीने तीन वेगवेगळ्या कळपातले प्राणी एकाच दावणीला बांधतोय. ”

“पण अनिर्बंध संबंध ठेवले तर लग्न व्यवस्थेला तरी काय अर्थ राहिला? समाजाची घडी टिकेल का अशाने?"

“लग्न हे पुरुषी समाजव्यवस्थेने वर्चस्व टिकवण्यासाठी रचलेले आणखी एक थोतांड. मला सांग किती लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये प्रेम असतं? ती केवळ एक सोय असते. त्यांच्यापैकी कितीजणांतले संबंध परस्पर संमतीने किंवा तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रेमातून निर्माण झालेले असतात आणि किती बलात्कार असत्तात?” बलात्कार हा शब्द ऐकून ती शहारली.

“म्हणून या तीनही गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. त्याची एकत्र मोट बांधू नये. हा मिळाल्याच एका ठिकाणी तर नथिंग लाईक इट. बट अदरवाइज इज अलसो ओके.”

“जाउदे. हा विषय संपणारा नाही. आटप आता. आपल्याला उशीर होतोय.”

तो हसला. “पळ काढतीयेस तू. निरुत्तर झालीयेस म्हणून किंवा पटलय म्हणून. पण कबूल करवत नाहीये. आणि असही होतना की एखादी व्यक्ती आवडते, नकळत तिच्या प्रेमात कधी पडतो ते कळतही नाही. माहिती असतं की लग्नही शक्य नाहीये आणि शरीर संबंधही. पण म्हणून प्रेम संपत नाहीत. पण………. ” त्याने वाक्य अर्धवट सोडले. “चला आवरुया.” तो तिची नजर टाळून निघून गेला.

मग दिवसभर तिच्या डोक्यात तोच विषय घुमत राहिला. ‘त्याने वाक्य अर्धवट का सोडलं? तो कोणाबद्दल बोलत होता?’ या विचाराने तिला भीतीही वाटू लागली आणि कुठेतरी ........

दुपारी तिचा फोन वाजला. ‘सोहमचा फोन.’ तो उचलायचीही भीती वाटायला लागली. ‘मला नाही ऐकायचे त्याला काय वाटतेय ते.’

“अग फोन वाजतोय तुझा. उचल ना.” मैत्रीण म्हणाली. तिने नाईलाजाने फोन उचलला.

“ए, तू सकाळचे सगळे इतके सिरीअसली घेऊ नकोस हा. नाहीतर हा काय भयंकर माणूस आहे म्हणून ताबडतोब दुसरी जागा बघायला लागशील.” हा नेहमीचा मिश्कील सोहम होता. तिला हायसे वाटले पण कुठेतरी अपेक्षाभंगाची हुरहूरही होती.

दुसऱ्या जागेचा विषय तसा मागेच पडला होता. काही जागा मिळाल्या पण होत्या. पण त्या तिला फारशा आवडल्या नाहीत. तो दुसऱ्या जागेबाबत म्हणाल्यावर ती चपापली. दुसरी जागा आपल्याला खरच मिळत नाहीये की आपण ................

सगळे तिथेच थांबले असते तर किती बरं झालं असतं. निदान दुसरी जागा मिळत होती तेव्हा तरी आपण शिफ्ट व्हायला हव होत. “तू हल्ली घर शोधतच नाहीयेस का?” एका शनिवारी सासुबाईंनी विचारले. तिला एकदम खडबडून जाग आल्यासारखे झाले. ‘काय चाललय आपलं? का मृगजळाच्या मागे लागतोय? हे चाललय ते चूक आहे.’
तिने त्या मोहमयी दुनियेतून बाहेर पडण्याचा निश्चय केला. सोमवारी सोहमने गाण्याच्या कार्यक्रमाला जायचे सुचवल्यावर तिने काहीतरी थातुरमातुर कारण सांगून नाकारले. वागण्यात परत तुटकपणा आला आणि त्याचबरोबर आपण असे वागतोय याचे अपराधीपण. त्यालाही हा बदल जाणवला.

“काही झालय का पुण्याला?” त्याने विचारले.

“छे. काही नाही. आज मला यायला उशीर होईल. जागा बघायला जायचंय.”

त्याने दुखावल्या नजरेने पाहिले. तिने बघितले न बघितल्यासारखे केले. नवीन जागेत नाकारण्यासारखे काही कारणही दिसत नव्हते. पण “कशाला जातेस? इथे चांगली सेटल झाली आहेस की. जागा बदलायला काही ठोस कारण आहे का तुझ्याकडे?” या त्याच्या बिनतोड युक्तिवादावर तिच्याकडे उत्तर नव्हतच. त्याच्या आवाजात कधी नव्हे ती एक व्याकुळता जाणवली. तिने त्याच्याकडे बघितले. तो पटकन वळला. चेहऱ्यावरचे भाव लपवण्यासाठी. कधी नव्हे ती पुन्हा अभ्रं दाटून आली. यावेळी त्याच्याकडून. खरे तर हेच एक ठोस कारण पुरेसे होते जागा बदलण्यासाठी. गाडी उताराला लागली होती.

“दुसरी जागा मिळालीये.” पुण्याला घरी गेल्यावर जेवणाच्या टेबलावर तिने विषय काढला.

“पण कशाला बदलायची जागा? अॅडजस्ट झालीयेस की चांगली इथेच.”

सोहमचे आणि तुझे मस्त पटतय की. कशाला जागा बदलातेस आई? ”

खर तर तिलाही नकोच होते ते. पण स्वत:च्या मनाशी ते कबूल करायाला धजावत नव्हती ती. नवऱ्यानेच सांगितल्यावर तिला हुश्श झाले. सासूबाई मात्र काहीच बोलल्या नाहीत.
(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच हा पण भाग.
रोज नवीन भाग येतो म्हणून आणखीनच मस्त.
पु.ले.शु.

“आपण शरीर संबंधांचा एवढा बाऊ का करतो? ती एक पूर्ण जैविक क्रिया आहे. तहान भूकेसारखी गरज आहे. हे का नाही आपण मान्य करत? आणि मुळात प्रेम-लग्न-लैंगिक सुख हे एकाच अक्षावरचे टप्पे आहेत हे कोणी सांगितले? आणि ते त्याच क्रमाने यायला हवेत हे कोणी ठरवले? हा आता त्यातल्या त्यात आपल्याला प्रेम आणि लग्न याचा क्रम मागे पुढे झालेला चालतो पण शरीर संबंध? ते मात्र या क्रमातला शेवटचा टप्पा असायला हवेत असं आपण मानतो.”

>> हे वाचून एकदम थबकलेच!
आत्ता परवाच https://www.maayboli.com/node/66173 या धाग्यावर लिहिलेलं की

"शारीरिक आकर्षण, प्रेम, लग्न या सगळ्या गोष्टी एकत्र, एका नात्यातूनच मिळतील असे नाही..."

===
किती लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये प्रेम असतं? ती केवळ एक सोय असते. त्यांच्यापैकी कितीजणांतले संबंध परस्पर संमतीने किंवा तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रेमातून निर्माण झालेले असतात आणि किती बलात्कार असत्तात?
>> अगदी हेच प्रश्न मलादेखील पडतात.

“म्हणून या तीनही गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. त्याची एकत्र मोट बांधू नये. हा मिळाल्याच एका ठिकाणी तर नथिंग लाईक इट. बट अदरवाइज इज अलसो ओके."
>> सहमत Lol