भोज्या (अंतिम भाग)

Submitted by अतरंगी on 15 November, 2017 - 00:22

चूक आणि बरोबर यात निवड करणे कायमच सोप्पे असते. अवघड असते ते दोन चुकीचे पर्याय समोर असताना त्यातला कमीत कमी हानिकारक पर्याय निवडणे.

माझ्या समोर जे दोन पर्याय होते दोन्ही मध्ये रिस्क होतीच, पण कमी रिस्क होती ती तिथे थांबून राहण्यात. दिवसभर वारं वाह्यल्याने रात्र जरा सुसह्य झाली. जुलाबाची फ्रिक्वेन्सी पण जरा कमी झाली होती. वाळवंटातली चौथी रात्र !

थोडं फार असलेलं त्राण एकवटून टूल बॉक्स पासून चार पावलावर थोडी वाळू बाजूला करून एक खड्डा करणं आणि त्यात गाडीतलं एक फूट मॅट त्यात नेऊन टाकणं एवढं सोडून काही डोकं चालवण्याच्या मी पलीकडे गेलो होतो.

एक एक पाऊल कष्टाने टाकत गाडी मागे जाणे आणि मग परत येऊन बसून राहणे. पाण्याच्या शेवटच्या बाटलीने तळ गाठलाय. गाडीतून काढलेलं पाणी थोडेसं शिल्लक आहे पण ते आता हात आणि शरीर धुण्यासाठी सोडून कशासाठी करायच्या लायकीचे राहिले नाही.

पहाटे पहाटे पिण्याच्या पाण्याचे शेवटचे दोन घोट घेऊन ती सुद्धा गाडीत फेकून दिली. आता माझ्याकडे थोडे फार ड्राय फ्रुट सोडून खायला आणि प्यायला काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. शांत पणे गाडीतल्या घड्याळाकडे बघता बघता तिथेच आडवा झालो.

कधी तरी जाग आली तेव्हा परत एकदा एक एक पाऊल कष्टाने टाकत गाडीमागे जाऊन आलो आणि बाटलीत जमा झालेली दोन चार घोट लघवी पिऊन कसं बसं टूल बॉक्स मधलं भरपूर ऑइल खड्ड्यात ओतून ते वाहून जायच्या आत त्यात एक पेटलेला कागद टाकला. ऑईलचा काळा धूर बघत बघत डोळे बंद करून पडून राह्यलो. तो काळा धूरच आता माझी महत्वाची लाईफ लाईन होता.

मध्ये परत डोळे उघडले तेव्हा धूर दिसत नव्हता. परत जाऊन राहिलेलं ऑइल पेटवावं या उद्देशाने मी गाडी बाहेर पडलो खरा, पण तिथे पर्यंत पोचण्याची ताकत शरीरात शिल्लक नव्हती. दोन चार पावले टाकून मटकन खाली बसलो. हाताला वाळूचा असह्य चटका बसल्यावर तसाच सरकत सरकत गाडी कडे आलो. समोर चार पाच फुटांवर टूल बॉक्स आणि त्यात ऑइल, तिथे जाऊन फक्त त्यात एक पेटलेला कागद टाकायचा होता पण ते सुद्धा करायला उठणं होत नव्हतं. तसाच गाडीच्या सावलीत गाडीला टेकून थोडा वेळ बसलो....

जेव्हा डोळे उघडले तेव्हा डोळ्यासमोर सिलिंगची नक्षी होती, हळूच बाजूला नजर टाकली तर हातात लावलेले सलाईन दिसत होते. I made it ! वाळलेल्या गालांवरून परत एकदा अश्रू ओघळले. समाधानाने मी शांत पण डोळे मिटून पडून राहिलो.

डॉक्टरनी सांगितलेलं रेस्ट शेड्युल पूर्ण केल्यानंतर ऑफिस जॉईन केल्यादिवशी संध्याकाळी इसिड्रोचा जेवायला सोबत जाऊ या म्हणून फोन आला. मी संध्याकाळचं खेळणं वगैरे बंद केल्याने तसाही रिकामाच होतो. त्याला म्हणलं ये मग लवकरच, जरा गप्पा मारत बसू. मला पण माझी गाडी अडकल्यावर पुढे काय काय झालं ते अजून कोणी नीट सांगितलं नव्हतं. मला नक्की कळत नव्हतं की एवढ्या सगळ्या सिस्टीम आणि फॅसिलिटी असून रेस्क्यू टीम माझ्या पर्यंत यायला आख्खे 3 दिवस आणि 4 रात्री कश्याकाय लागल्या?

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर इसिड्रोनेच विषयाला हात घातला

"Listen man, I am really sorry. It was all my mistake. Actually that day I came late from sabkha 10 and next day I didn't notice that the entry on your name was of previous date and that day also we finished hydrotest very late so instead of coming to office I went straight to my room."

"Then when did u guys actually realized tht I'm missing?"

"Actually next day evening your friend Milind was the first one who noticed and started calling everybody."

मिलिंद पाटील, आमच्या साईटवरच्या सगळ्या मराठी लोकांना धरून चालणारा. जनरली कोणीही घरून आलं की संध्याकाळी मिलिंदच्या रूम वर जमायचं आणि भारतातून आणलेल्या पदार्थांचा सामूहिक फडशा पाडायचा हा नेहमीचा कार्यक्रम. मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी संध्याकाळी माझा फोन लागला नाही, पण मी प्रवासाने वगैरे दमून झोपलो असेन किंवा बॅटरी संपली असेल असं त्यांना वाटलं. आम्ही एकाच कंपनीच्या नावाखाली, एकाच लोकेशन जरी काम करत असलो तरी त्यांचा आणि माझा वर्क रिलेटेड जास्त काही संबंध नव्हता. ते नवीन प्लांट आणि पाईपलाईन कॉन्स्ट्रुकॅशन मध्ये होते आणि मी Asset Integrity ला. मराठी असणं हाच तो काय तो कॉमन धागा. मी जेव्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी खेळायलापण आलो नाही तेव्हा त्यांनी मला परत फोन केला. फोन बंद होता म्हणून त्यांनी स्विमिंग पूल वर चक्कर मारली तिथे पण मी नव्हतो. त्याच रात्री बायकोने त्यांना फेसबुकवर शोधून माझा फोन लागत नाही, काहीच कॉन्टॅक्ट नाही म्हणून मेसेज केला. त्यानंतर मिलिंदने बार्टचा नंबर शोधून त्याला विचारलं की मी नक्की कुठे आहे? बार्टने सगळ्यांना पटापट रात्रीत कामाला लावलं. माझी गाडी अडकल्यापासून यासीनला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करेपर्यंत एक दिवस दोन रात्री होऊन गेल्या होत्या. यासीनला संपर्क करायचा खूप प्रयत्न करून पण त्याचा फोन लागला नाही. फोन,ईमेल, sms सगळं करून पण काही रिस्पॉन्स न मिळाल्याने सगळंच अवघड व्हायला लागलं. इतक्या सगळ्या धावपळीत आणि बार्ट त्याआधी ट्रेनिंग मध्ये असल्याने त्यांच्या इनबॉक्स मधल्या सतराशे साठ इमेल्स मध्ये त्याने यासीनचा इंस्पेक्शन रिक्वेस्टचा ईमेल पहिलाच नाही.

रेस्क्यू टीमने एक उपाय म्हणून फिल्डवर्क करणाऱ्या सगळ्या युनिट्सना मिसिंग पर्सन नोटिफिकेशन पाठवलं. ज्यात माझे डिटेल्स, माझ्या गाडीचे डिटेल्स आणि माझी ब्रिफ मेडिकल हिस्टरी (ब्लड ग्रुप, मेजर इलनेस, एलर्जीज वगैरे), लास्ट नोन लोकेशन, Missing Since वगैरे सगळे डिटेल्स होते. हे सगळं होईपर्यंत दोन रात्री आणि दोन दिवस उलटून गेले होते. तोच ईमेल यासीनच्या क्रू ला पण आला. त्यातल्याच एका फोरमनने नाईट शिफ्टला आल्यावर ईमेल पाहिल्या पाहिल्या सबखा 67 बद्दल कळवलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सबखा 67 मध्ये आणि जवळपास शोधाशोध करताना त्यांना माझे काहीच डिटेल्स मिळाले नाहीत. कारण मी लावलेला रेडियम ट्रँगल 87 वरून 67 च्या रूट वर होता. रेस्क्यू टीम सरळ मेन रोड आणि आजूबाजूच्या रोडस वरून मला शोधत आली. That was really dumb decision ! त्यांना जर कळले होते की मी 87 वरून 67 ला आलोय तर सर्वात आधी तोच रूट बघायला हवा होता. रेस्क्यू टीम 67 वरून जाणारे सगळे रुट्स वन बाय वन चेक करत असताना त्यांना लांबून धूर दिसला नाही. पण शेजारच्या ड्रीलिंग साईट वरच्या सिक्युरिटीने तो पाहिल्या पाहिल्या इमर्जन्सी सर्व्हिसेसला अलर्ट केलं. रेस्क्यू टीम साधारण एक तासाभरात तिथे आली तेव्हा मी गाडीशेजारी वाळूने माखून अलमोस्ट बेशुद्ध अवस्थेत पडलेलो होतो.

मी सापडेपर्यंत इसिड्रोच्या जीवात जीव नव्हता. कारण मुळात सगळा दोष त्याच्यावर येणार होता. यासिन घरी पोचून दुसऱ्याच दिवशी फॅमिलीसोबत त्याच्या बहिणीकडे युरोपला जायला निघाल्यामुळे त्याचा फोन शेवटपर्यंत लागलाच नाही. इतक्या सगळ्या गोष्टी एकामागे एक जुळून येणं हे खरेच कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं.

आमच्या कंपनीच्या सेफ्टी, सर्च अँड रेस्क्यू प्रोसिजर्स विषयी आम्हा सर्वांनाच कायम खात्री होती. सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं की हा घोळ नक्की झाला कसा. माझ्या निष्काळजीपणाने सगळ्या सिस्टीमवर मात केली होती! मी ऑफिस जॉईन केल्यावर जवळ जवळ बारा पंधरा दिवस सेफ्टी आणि रेस्क्यू टीमने माझ्या सोबत बसून सगळं समजावून घेतलं. Lesson learned चा ईमेल सगळ्या कंपनीत पाठवून सगळ्या फिल्ड वर्क करणाऱ्या लोकांकडून सजेशन मागवण्यात आले.

कंपनीच्या सगळ्या साइट वरून लोकांनी वेगवेगळी सजेशन पाठवली. त्यातली सगळ्यात महत्त्वाची कमेंट होती एका अमेरिकन कलीगची.. "युरिन डिस्टीलेशन करणे चुकीचे आहे. त्यातुन पाण्यात विरघळणारा अमोनिया गॅस तयार होतो, त्यामुळेच जुलाब झाले असावेत. युरिन डिस्टीलेशन वगैरेच्या फंदात न पडता डायरेक्ट युरिन पिणेच जास्त योग्य आहे....."

सर्वांच्या कमेंट्सचा विचार करून कंपनीच्या डेझर्ट सर्व्हायव्हल ट्रेनिंग मध्ये आणि गाडीतल्या इमर्जन्सी बॉक्स मधील कंटेंट मध्ये त्यानंतर बरेच बदल करण्यात आले.

याशिवाय कितीही चांगल्या सिस्टीम बनवल्या, इक्विपमेंट प्रोवाईड केली आणि ट्रेनिंग दिलं, तरी सेफ्टी गाईडलाईन्स मध्ये छोटे छोटे शॉर्टकट घेतले, निष्काळजीपणा केला की काय होऊ शकते याची केस स्टडी म्हणून माझीच हकीकत एका सेपरेट सेशन मध्ये आता दाखवली जाते. Happy

सेफ्टी डिपार्टमेंटला एक केस स्टडी मिळाली आणि मला आयुष्यभरासाठी एक धडा.....

Stay Vigillant, Stay Safe !!!!!!

Always.......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेफ्टी डिपार्टमेंटला एक केस स्टडी मिळाली आणि मला आयुष्यभरासाठी एक धडा.....>>>>
...आणि हे सगळं आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
पुलेशु!

सुरुवातीची दोन वाक्ये माझी नाहीत. ती Fanaa चित्रपटातील आहे. मला खूपच आवडतात म्हणून सारखी इकडे तिकडे पेरत असतो Wink

हुश्श...
छान रंगली होती ही कथा,

ही सत्य घटना आहे का? आणि तुमच्या सोबत घडली आहे का?

नाही सिमबा, ही जशीच्या तशी सत्यघटना नाही. फक्त कथा आहे. पण लिहिताना नायकाच्या दृष्टिकोनातून लिहिलेली.

हे कोणाची तरी गाडी अडकणे, बंद पडणे वगैरे असे किस्से आमच्याकडे उठसुठ घडायचेच. जेव्हा ऑइल फिल्ड पहिल्यांदा सापडलं तेव्हा तंत्रज्ञान इतके डेव्हलप झालेले नसल्याने तेव्हा अनेक इंजिनिअर, टेक्निशियन हे रेस्क्यूची वाट पहात मृत्युमुखी पडले होते. आता सगळे इन्फ्रास्ट्रक्चर असल्याने आणि टेक्नॉलॉजिची मदत असल्याने आता कोणी मृत्युमुखी पडत नाही. पण एखादं दोन दिवस वाळवंटात कोणी अडकले तरी त्या बद्दल फार काही चर्चा होण्याइतकं काही विशेष वाटत नाही Happy

मस्तच.....
आवडली कथा..तुमची विचारशक्ती अफाट आहे....अशाच चांगल्या कथा येऊ दया अजुन.

सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.

राहुल, आधी कथेचे नाव 3 nights 4 days desert safari असे देणार होतो पण मग काही सस्पेन्स राहिला नसता म्हणून भोज्या हे नाव दिले. भोज्याला शिवल्यासारखे शिवून येणे असा वाक्प्रचार आहे.

कथा लिहायचा पहिलाच प्रयत्न होता. Happy जमेल की नाही शंका होती. रोजच्या आयुष्यातला विषय असल्याने आणि असे छोटे मोठे प्रसंग अनुभवले असल्याने डिटेलमधे लिहता आले.

पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.

Khup aavadali katha. Suruvatipasun shevataparyant salag vachali.