आमचं आगर

Submitted by मनीमोहोर on 7 September, 2017 - 14:44

कोकणात आगर म्हणजे घराच्या आजूबाजूचा परिसर. अलिबाग साईडला वाडी ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तोच आमच्या भागात आगर ह्या शब्दाला.

आमचं आगर खूप मोठं आहे. पण आमचं घरच उतारावर असल्याने आगर ही तीन लेव्हल वर आहे . प्रत्येक लेव्हलला पाच सहा तरी पायऱ्या आहेत. पावसाळ्यात आगरातल्या सगळ्या वाटा कोकणातल्या अति पावसामुळे उखडल्या जातात म्हणून दिवाळी पूर्वी सगळ्या वाटा चोपण्याने चोपून, शेणाने सारवून नीट केल्या जातात. दिवाळीत या वाटांवर पणत्या ठेवून त्या उजळल्या ही जातात . एरवी मात्र आगरात रात्री अगदी मिट्ट काळोख असतो.

घरात काही कार्य वैगेरे असलं की आगारातल्या वाटा ही अशा रांगोळ्या घालून सुशोभित केल्या जातात.

vaataa.jpg

आगराचा खुपसा भाग नारळी पोफळीनी व्यापला आहे . ही झाड उंच वाढतात. वाऱ्या वादळाने झाड घरावर पडून काही नुकसान किंवा अपघात होऊ नये म्हणून ती घरापासून थोडी दूरच लावलेली आहेत. पोफळीना नागवेली आणि मिरीवेल ह्यांनी लपेटून घेतले आहे. एक ठराविक अंतर सोडून लावलेली ती झाडं भर दुपारी ही आगरात सूर्य प्रकाश येऊ देत नाहीत . आणि दररोज शिपण केल्यामुळे आगर नेहमीच गार असतं. उन्हाळ्यात दुपारी लाईट गेले तर पुरुष माणसं सरळ आगरातल्या पंप स्टेशन वरच्या स्लॅब वर चटई टाकतात आणि ताणून देतात. अंतू बर्व्याच्या शब्दात म्हणजे अगदी 'एअर कंडिशन की हो' ! तिथे एकदा तरी दुपारी झोपायचं माझं स्वप्न आहे .. बघू कधी प्रत्यक्षात येत ते . नारळ मुद्दाम झाडावर चढून उतरवावे लागतात पण नवरात्राच्या सुमारास पोफळी ( ओल्या सुपाऱ्या ,) पिकतात आणि आपसूकच खाली पडतात . रोज दोन वेळा त्या वेचून आणणे हे मोठंच काम असत त्या दिवसात . त्या ओल्या सुपाऱ्या पंधरा वीस दिवस खळ्यात वाळवल्या आणि वरच टरफल काढलं की मग आत आपण शहरात पाहतो तशी सुपारी मिळते.

पोफळी आणि खाली आगरात जाणारी वाट

aagar.jpgDSCN1416_0.jpgaggar 2.jpg

पपई, चिकू पेरू अननस अशी फळझाड ही आहेत आमच्याकडे. कोकण प्रसिद्ध आहे आंब्यासाठी पण आमच्या घरचे चिकू आंब्याला ही मागे टाकतील इतके मस्त असतात. असतात. आकाराने लांबट गोल आणि ह्याची साल असते बाहेरून खरखरीत. त्यामुळे सालासकट खाता नाही येत. पण चवीला साखर फिकी पडेल इतके गोड आणि रसाळ. अननसाला कधी कधी घुशी लागतात आणि वरून दिसतो भरलेला पण आतून खाऊन पोकळ करून टाकलेला असतो. इतकं वाईट वाटत त्यावेळेस ...

पपई, पेरू किंवा इतर कोणती ही फळ आम्ही सगळी नाही उतरवत झाडाकरून. थोडी पक्ष्यांसाठी ठेऊन देतो झाडावर . त्यामुळे सकाळ संध्याकाळ साळुंक्या, खंड्या, दयाळ, कोकिळा, पोपट, भारद्वाज, असे पक्षी फळ खायला येत असतात आगरात . दयाळ तर इतके माणसाळलेत की आम्ही मागच्या मांडवात काही काम करत असलो तरी धीटपणे आमच्या अगदी जवळ येतात न घाबरता. कधी कधी पपई खायला डोक्यावर शिंग असलेला भला मोठा हॉर्न बिल ही येतो . तो आला की मग मात्र इतर छोट्या पक्ष्यांची तिथून गच्छंती झालीच म्हणून समजा.

हे अवीट गोडीचे चिकू

RSCN1516.jpg

फोटो चांगला नाहिये पण तरी ही

IMG_20170309_092956.jpg

आरारूट ही घरीच करतो आम्ही. एक दळा आरारूट ही लावतो आगरात दरवर्षी. ह्याची पान साधरण हळदी सारखी असतात. आणि रताळ्या सारखे कंद लागतात ह्याला. ते स्वच्छ धुवून किसायचे आणि मग पाण्यात घालून चांगले चोळायचे . किस पिळून काढून टाकायचा . ते पाणी संथावल की साका खाली बसतो . वरच पाणी हळू काढायचं आणि खाली बसलेला साका उन्हात चार आठ दिवस वाळवायचा .. की झालं आरारूट तयार . हे बाजारात मिळतं तसं अगदी गुळगुळीत नसून थोडं दाणेदार असत आणि तितकं शुभ्र ही नसत. पण चवीला अप्रतिम लागत. ह्याची गोड खीर किंवा जिरं, मिरची घालून तिखट लापशी ही छानच लागते. तोंड आलं तर आरारूटाची खीर हा उत्तम घरगुती उपाय आहे. …कोकणातून येताना आरारूटाची छोटीशी पुडी असतेच प्रत्येकाच्या सामानात.

हे आरारूट

DSC05286.JPG

पूर्वी जेव्हा तिन्ही त्रिकाळ भातच असे जेवणात आणि गडी माणसं ही असत न्येरी आणि जेवायला तेव्हा आम्हाला तांदूळ खूपच लागत असे. त्यावेळी आगरात ही आम्ही भात लावत असू. तो दिवसा गणिक वाढणारा, वाऱ्यावर डुलणारा, मन प्रसन्न करणारा भात शेतीचा हिरवा गालिचा आम्हाला सैपाकघराच्या खिडकीतून अगदी सहज दिसत असे. भाद्रपदात भाताला लोंब्या आल्या की त्याचा सुवास आमच्या सैपकघरात ही दरवळत असे. हल्ली मात्र भाताचा खपच कमी झाल्याने आम्ही आगरात भात लावत नाही आणि म्हणून ह्या स्वर्गीय सुखाला आम्ही मुकलो आहोत.

एक रिठ्याचं झाड ही आहे आमच्या आगरात. अजूनही खूप रिठे लागतात त्याला. पण आता वापरच होत नाही. पूर्वी साबण वापरणे परवडणारे नव्हते तेव्हा केस धुवायला, कपडे धुवायला आणि अंगाला लावायला सगळ्या साठी रिठयांचांच वापर होत असे. कोकणात रिठयाला रिंगी असं म्हणतात. आज ज्या रिठयाकडे ढुंकून ही पाहिलं जातं नाही त्या रिठयांचं एके काळी रेशनिंग करावं लागे हे सांगितलं तर कोणाचा विश्वास ही बसणार नाही. कालाय तस्मै नमः . दुसरं काय ?

सांडपाणी जिथे सोडलं जात तिथे पाणी जास्त लागणारी झाडं जसं की केळी, कर्दळी आणि अळू वगैरे लावलं जातं. ती बुटकी, जाडी, गावठी केळी चवीला फारच सुरेख लागतात. कोकणात घरोघरी अळू आणि शेवगा असतातच. मुंबईची मुलं सुट्टीत आली कोकणात की त्यांचा आळवाच्या पानावर पाणी टाकून मोती जमवण्याचा खेळ चाललेला असतो. शहरात अळूची देठ खूपदा फेकून देतात पण आमच्याकडे देठीची सुद्धा चिंचगुळ, नारळ घालून अगदी चविष्ट भाजी केली जाते.

आमच्या घरात तर नेहमीच माणसांची वर्दळ असते . त्यामुळे कधी कोणाशी काही जिवा भावाच्या गोष्टी बोलायच्या असतील किंवा कधी काही सिक्रेट कुणाला सांगायचं असेल तर त्याला आगरा सारखी दुसरी योग्य जागा नाही. कधी कधी तर आगरात आमच्या इतक्या गप्पा रंगतात की घरातल्या माणसाना आम्हाला कुकारे घालून बोलवावं लागतं . कधी लहान मूल किरकिरत असेल तर आगरातून जरा फिरवून आणलं की ते हमखास रमत .

दुपार झाली की कोकणात भर उन्हाळ्यात ही वारा सुटतो. मागच्या गॅलरीत बसून वाऱ्यावर डुलणाऱ्या पोफळी बघणे हा माझ्या अवीट गोडीचा कार्यक्रम आहे. समुद्राच्या लाटा बघण्याचा जसा कधी कंटाळा येत नाही तसच हे पोफळीचं नर्तन बघण्याचा ही कधी कंटाळा येत नाही. संध्याकाळ झाली, काळोख पडला की मात्र दिवसभर नयनरम्य दिसणार आगर गूढ भासायला लागतं. मिट्ट काळोख आणि गर्द झाडी यामुळे कंदील किंवा बॅटरी असली तरी आगरात जाण्याचं डेअरिंग नाही होत माझं.

मे महिन्याचे दिवस होते . आंब्या फणसाची कामं, पाव्हणे आणि गप्पा टप्पा यामुळे झोपायला उशीरच झाला होता. रात्री मला जाग आली तर चूकून मागील दारचा दिवा राहिलाय अस वाटलं कारण उजेड दिसत होता. नाहीतर इथे बाहेर मिट्ट काळोख असतो . पण क्षणभरातच लक्षात आलं आणि मग खोलीत राहणं अशक्यच होत. दार उघडून बाल्कनीत आले आणि किती बघु असं झालं . पौर्णिमा जवळ आली होती. आकाशात चंद्र माथ्यावर आला होता. मनात म्हटलं दिवा लागला आहेच ... पण देवाजीचा आकाशीचा दिवा लागलाय... सगळा आसमंत त्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघत होता. सगळीकडे निःशब्द, निरव शांतता होती. अप्रतिम दृश्य होत. चंदेरी प्रकाश म्हणजे काय ते मला तेव्हा कळलं. . आकाश निरभ्र होत त्यामुळे अधिकच सुंदर दिसत होत. रोजच्याच नारळी पोफळीना चंदेरी रंग प्राप्त झाला होता. ती लांबवर दिसणारी घाटी ही चंद्र प्रकाशात चमकून उठली होती. किती तरी वेळ भान हरपून मी बघत होते.... आगराचं ते मनमोहक रूप माझ्या मनावर कायमच कोरलं गेलं आहे

आगरातली विविध प्रकारची वृक्षसंपदा, नाना प्रकारची फुलं , अनेकविध पक्षी यामुळे आमच्या घराची शोभा कैक पटीने वाढली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. आमच्याकडे पण हेच शब्द वापरले जातात. पण असे लेख फोटोंशिवाय अपूर्ण आहेत. तेव्हा फोटो टाकाच असल्यास.

खूप सुंदर ममो!
आता एक काम करच. छान पैकी कॅमेरा घेऊन गावाला मुक्काम कर ८/१० दिवस आणि गाव, घर, आड, आगर याचा मस्त फोटो कोलाज/ पोर्ट्फोलिओ करून इथे दे Happy

अह्हा... किती सुंदर लिहिलंय... कोणतं तरी पुस्तक वाचतेय वाटावं अशी अप्रतिम शैली आहे तुमची. जमल्यास प्लीज फोटो टाकणार का? आगर चा?
दिवेआगर नाव आठवलं. Happy

मस्त वर्णन आहे कोकणचं,

सांडपाणी जिथे सोडलं जात तिथे पाण्यावर पोसली जाणारी केळी कर्दळी आणि अळू लावलं जात. ती बुटकी जाडी गावठी केळी चवीला फारच सुरेख लागतात.
>>> Happy Happy Happy
गावी आमच्या सुध्दा घराच्या मागे आहे..

छान लेख Happy
समुद्राच्या लाटा बघण्याचा जसा कधी कंटाळा येत नाही तसच हे पोफळीचं नर्तन बघण्याचा ही कधी कंटाळा येत नाही.>>> अगदी खरंय

फारच सुंदर! अगदी माझं गाव डोळ्यासमोर उभं राहिलं.
आम्ही वाडी म्हणतो. नारळ-पोफळींच्या मधेमधे एखाद-दोन लिंबाची झाडं आहेत. सोनचाफा आहे, पूर्वी सोनटक्का होता. तो सगळा मिश्र सुवास आठवला तुमचा लेख वाचून.

व्वा ! अतिशय सुंदर उतरलंय आगराचं वर्णन! चंद्रप्रकाशातील आगराच्या वर्णनाने तर चार चांद लावलेत.

हे सारं कधीही न पाहिलेल्या माझ्यासारख्या वाचकाच्या नजरेसमोर हा सारा नजारा उभा करायची ताकद आहे तुमच्या लेखनात, खरंच.

एक सुचवू का? तुमचे हे सारे कोकण स्पेशल लेख- घर, खळ्यावरचा लेख, बोळाची खोली, हा आत्ताचा लेख तसंच तुम्ही लिहीलेलं गणपती, पालखी, नवरात्र यांचं वर्णन , अजूनही असतील जे मी नाही वाचलेत, हे सारे कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे लेख, थोडाफार हात फिरवून आणि त्या त्या ठिकाणाचे प्रोफेशनल फोटो काढून एक छानसं पुस्तक प्रकाशित करायचं मनावर घ्या. कोकणापासून कैक वर्षांपुर्वी दूर निघुन आलेल्या कैक जीवांची नाळ कोकणाशी जोडून ठेवण्याचे काम नक्की करेल ते पुस्तक.

मन:पूर्वक शुभेच्छा !!

किती सुंदर वर्णन केलय...
तुमचे सगळेच लेख नेहेमीच मस्त असतात....प्रत्येक वेळी वाचताना वाटतं , तुम्ही किती नशीबवान आहात... Happy

हेमाताई अजून एक अप्रतिम लेख. तुमच नाव पाहील्यावरच आता छान हिरवगार वाचायला मिळणार हे समजल. शेवटचा चंद्रप्रकाश खुप सुंदर लिहीला आहात. तुमचे अनुभव आणि माझे अनुभव बरेचसे जुळतायत अस वाटल वाचताना. मी पण जुन्या आठवणींत गेले पुन्हा.

तेव्हा आगरात ही आम्ही भात लावत असू. तो दिवसा गणिक वाढणारा, वाऱ्यावर डुलणारा, मन प्रसन्न करणारा भात शेतीचा हिरवा गालिचा आम्हाला सैपाकघराच्या खिडकीतून अगदी सहज दिसत असे. भाद्रपदात भाताला लोंब्या आल्या की त्याचा सुवास आमच्या सैपकघरात ही दरवळत असे. >> हेच वर्णन आमच्या वसई च्या घराला १००% लागु होत. फक्त आगराच्या ऐवजी घराच्या चारी बाजूनी भात शेती आणि स्वयंपाकघरा बरोबर मागची पडवी, पुढची ओटी आणि कोणतीही खिडकी इतकाच फरक Happy

खूप छान लेख. अगदी डोळ्यासमोर उभे राहिले आगर. हे खरे वैभव. तुम्ही अतिशय भाग्यवान आहात!!

नेहमीप्रमाणे सुंदर लेख ममो.. चंद्रप्रकाशाचे वर्णन खूप सुरेख !
घरची आठवण कायमच येते तुमचे लेख वाचल्यावर..

Pages