मन एक घराचा माळा

Submitted by santosh watpade on 28 July, 2017 - 04:56

मन एक घराचा माळा मन ओसरीतला रावा
मन खाटेवरची तगमग मन गतकाळाचा धावा
वाटेत पसरुनी डोळे पायरीत बसली सांज
मन ओठामधली हाक मन खळलेला ओलावा...

मन कैवल्याचा वासं करुणेची भरली कासं
मन यौवन तटतटलेले मन धुंद क्षणांचा त्रासं
पिळवटून तृष्णेकाठी श्वासांची भरली वळणी
मन चिंब कोवळे पानं मन हिरवा श्रावणमासं...

मन बावरलेली राधा ..मन कालिंदीचा घाटं
कृष्णाच्या मोहापायी झुरणारी पाऊलवाटं
उडणारा पदर गुलाबी मन खांद्यावरचा हातं
मन मोहवणारी वेणू मन देहावरची लाटं...

मन व्यक्तपणाचा निर्झर मन अव्यक्ताची रौरव
मन निर्विकार संन्यासी मन तारुण्याचा उत्सव
हळव्या स्वप्नांचे दारं हा जगण्याचा आधारं
मन एक रिकामी बारव मन या देहाचे वैभव...

मन अंधाराची ग्वाही मन जागवलेल्या राती
मन पुर्णत्वाचे साक्षी मन लक्ष दिव्यांच्या वाती
कोणाची वेडी माया कोणाची कातळकाया
मन प्रारब्धाचे फोड मन बरडावरची माती...

-- संतोष वाटपाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!
मन व्यक्तपणाचा निर्झर मन अव्यक्ताची रौरव
मन निर्विकार संन्यासी मन तारुण्याचा उत्सव>> हे आवडलंय