http://www.maayboli.com/node/62663 पुढे -
इतक्यात फोनची रिंग वाजली...
आईच्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलत होते.. काळजीची जागा आता भितीने घेतली होती. तिने पटकन रिक्षा बोलावून घेतली.
आमची रिक्षा हॉस्पिटल समोर थांबली.. समोर राजूकाका उभा होता...
आईने त्याच्याकडे संतापाने पाहिलं तसं तो म्हणाला ,"वहिनी ऐकुन तरी घ्या"
"एक शब्द बोलू नका भाऊजी.तुम्हाला आपलं समजुन सगळं सांगितलं आम्ही. तुम्ही खोटं बोललात आमच्याशी? लाज वाटते का? खोटे फोन केलेत.पळवून आणलंत माझ्या नवर्याला ? का ? कशासाठी? काय विचार केलात नेमका? चांगले चालत बोलत होते. कसेही असले तरी माणसांमधे होते ते. आता ? बेशुद्ध? आयसीयू मधे? काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? आम्हाला आधीच त्या बाबाने सांगितलं होतं की घराबाहेर गेला की हातचा गेला माणुस... कोणा कडे पासू आम्ही?" आई फाडफाड बोलत सुटली होती.
काकाने आमच्याकडे पाहिलं. म्हणाला "मुलींसमोर नको हे सगळं.. प्रिया तू प्रितीला घेऊन दुसरीकडे बैस"
"काही गरज नाहीये, तुम्ही आमच्या आयुष्यात लुदबुड करणं बंद करा" आई कडाडली. "तुमचा स्वत:चा संसार नीट झाला नाही म्हणुन तुम्ही...."
"बास वहिनी, हे सगळं बंद करा आणि माझ्या सोबत चला" काकाच्या आवाजात जरब होती... आम्ही सगळेच काका मागे गेलो..
______________________________
डॉक्टर माधुरी! नावाप्रमाणेच चेहर्यावर गोडवा. आवाज मृदु!
"काही झालं नाहीये तुमच्या मिस्टरांना ताई. घाबरू नका. शांत बसा इथे, पाणी प्या" त्या आईला सांगत होत्या. आई खुर्चीवर बसली.
"थायरॉईड..म्हणाल तर साधा आजार म्हणाल तर मोठा.. वेळेत उपचार मिलाले की माणुस अगदी ठणठणीत रहातो बघा. दुर्लक्ष करून चालत नाही" आमच्या हातात कागद देत त्या म्हणाल्या.
पुढे चार तास त्यांनी आम्हाला बाबांना नेमकं काय झालंय आणि त्यावर उपाय काय ते समजावलं.
"शरीर थंड पडणं,बेशुद्ध होणं,आवाज घोगरा होण,वजन अचानक कमी होणं, काहीही खाता पिता न येणं ही सगळी थायरॉईडची प्रायमरी लक्षणं आता तुमच्या मिस्टरांना जे काही झालंय त्याला फक्त छोट्याश्या ऑपरेशनची आणि मग औषधांची गरज आहे. त्यानंतर त्यांना कधीच काही त्रास होणार नाही"
"तुम्ही अनेक वर्षांपासून त्या जागे बदल काहीबाही ऐकत आलाय. अचानक आलेल्या स्ट्रेसने त्यांची थायरॉईड डिफिसिएन्सी ट्रिगर होणं आणि नेमकं त्याच वेळी तुम्हाला भुताबद्दल कोणी तरी सांगणं यामुळे या इतका उशीर झालाय. आपण वेळीच ट्रिटमेंट केली तर त्यांना काहीच होणार नाही. थोडा विश्वास ठेवा"
" अहो पण ते सांगतायेत ना त्यांना कोणीतरी बाई दिसली' आईने विचारलं.
"वहिनी, होळकर ब्रिज! कॉलेजकुमार आणि आर्मीवाल्यांचा अड्डा.. अर्थातच कॉल गर्ल्सचं रोजचं ठिकाण... तुमच्या डोक्यात असतं ते दृष्य तुम्हाला प्रत्यक्षात दिसतं, त्याने एकदा तरी आरशात पहायचं ना दिसतेय का ती ते"
" मग नेमकं त्याच वेळेस स्तोत्र बंद पडणं?" आई विचारात पडली होती.
" अहो किती दिवसांपासून सांगतोय तो की गाडीत प्रॉब्लेम आहे... टेप चालत नाहीये नीट. मशीन आहे ते बंद पडलं"
" आणि अमावस्या?' या वेळेला प्रश्न मी विचारला... आम्ही खरंच गोंधळून गेलो होतो.
"चंद्र बिचारा एखाद्या दिवशी सुट्टीवर जायचाच.. नेमका तो दिवस तोच असावा हा योगायोग आहे बाळा" काकाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला..
"मला भिती वाटतेय डॉक्टर... चुकलं काही आपलं तर?" आईला सगळं पटत होतं पण माणसाचं मन असच असतं.
"तुम्ही सगळे उपाय करतच आहात ना ताई? यालाही एकदा ट्राय देऊन बघायला काय हरकत आहे? इतक्या सुशिक्षित आहात तुम्ही. सगळ्याचा भुताखेता पलिकडे जाऊन विचार करून बघा की"
_______________________________________________
पुढे महिना भराने आई बाबा आल्या गेलेल्याला हा किस्सा सांगत होते. सगळे मांत्रिक तोंडात मारल्यासारखे गप्प झाले होते. काहींच्या म्हणण्यानुसार ती बाई पुन्हा येऊ शकली असती वगैरे वगैरे. पण आमच्यासमोर आमचे बाबा ठणठणीत उभे होते आणि आम्हाला झपाटलेलं 'अविचाराचं' भुत केंव्हा पळून गेलं होतं. ऑपरेशन नंतर त्यांना होणारा त्रास बंद झाला होता. आम्ही त्या घटनेपासून शहाणे झालोय. किमान या बाबतीत तरी शाहनिशा केल्यापासून आता विश्वास ठेवत नाही कारण भुतामुळे नाही पण स्वत:च्याच मुर्खपणामुळे बाबांना गमवणार होतोत आम्ही.बाबांना होणार्या त्रासाची खरंच शारिरीक त्रासाशी डायरेक्ट संबंध असू शकतो हे आम्ही पार विसरलो होतोत... घडणार्या प्रत्येक घटनेचा संदर्भ सोयीस्कर रित्या भुताशी जोडून मोकळे झालो होतोत. आधीच शारीरीक दुखणं त्यात कामाचं ओव्हर प्रेशर, अपुरी झोप आणि टेंशनचा ओव्हरडोस... शरीर आणि मन थकणारच की. त्यात असलेला एक आजार आणी त्यावर न झालेले उपचार. पण आम्ही तेच चित्र बघत होतोत जे बाकीचे दाखवत होते...
राजूकाका तेंव्हा नसता तर?
बरं एक सांगायचं राहिलं.... त्या नंतर राजु काका कुठे गेला ते कोणालाच कळालं नाही.... त्याचा आमचा कॉण्टॅक्टच नव्हता काही...
आता मागच्या ६ महिन्यांपुर्वी बाबांना तो बेळगावात असल्याचं कळालं... बाबा त्याला भेटुन आले पण हे सगळं घडलेलं त्याला आठवत नाही म्हणे... आणि गेल्या १० वर्षांपासून तो पुण्यात आलाच नाहीये हे तो शपथेवर सांगतोय.. आम्ही फार खोलात शिरत नाहीये कारण भुतांवर नसला तरी देवावर आमचा आंधळा विश्वास आहे
** समाप्त**
______________________________________________________
मायबोलीवर बरेच भुतांचे अनुभव वाचले, भुतं, आत्मे आहेत की नाहीत यावर चर्चा करण्या इतकी मी मोठी नाही आणि ती माझी इच्छाही नाही. मला इतकंच म्हणायचंय की आपल्याला काही होत असेल तर सर्वात आधी मेडिकल हेल्प घ्या. घरगुती उतारा उतरून टाकल्याने ताप गेला वगैरे गोष्टी लॉजिकली चुकीच्या आहेत. आपल्याला सगळं माहीत असतं पण आपल्यावर वेळ येते तेंव्हा आपण आपली विचारबुद्धी गमावून बसतो. त्यात चुक कोणाचीच नाही. अगदी हा अनुभव वाचतानादेखील एकाच्याही मनात थायरॉईडचा विचार आला का? कारण आपण वातावरण निर्मितीतून बाहेत येत नाही आणि ही ह्युमन टेंडंसी आहे...अशिक्षीत लोकांबाबत मी काही करू शकत नाही पण सुशिक्षीत लोकांना भुताचा विचार करण्याअधी एक क्षण पॉज घ्यावासा वाटावा म्हणून हा सगळा कथाकथन प्रपंच!
- प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
वाचुन बर वाटले. मानवी मन
वाचुन बर वाटले. मानवी मन खरेच कमाल असते.
सुखाचा शेवट वाचुन छान वाटलं.
सुखाचा शेवट वाचुन छान वाटलं.
खुप छान! अगदी योग्य आणि
खुप छान! अगदी योग्य आणि अपेक्षित शेवट!
कारण भुतांवर नसला तरी देवावर आमचा आंधळा विश्वास आहे Happy>>>
हे सत्य!
रिया, लेखनशैल छान ओघवती आहे!
छान शेवट...ह्युमन टेंडन्सी,
छान शेवट...ह्युमन टेंडन्सी, देवावरचा विश्वास... मस्त
छान लिहिले आहे आणि शेवटचा
छान लिहिले आहे आणि शेवटचा ट्विस्ट आवडला.
तळटीपेशी १००% सहमत!!
योग्य शेवट....आवडलं रिया
योग्य शेवट....आवडलं रिया
यु टर्न ,कहाणी मे ट्विस्ट.छान
यु टर्न ,कहाणी मे ट्विस्ट.छान ओघवतं लिहीलं आहे.तुझ्या आईबाबांना दिर्घायुरोग्य लाभो अशी सदिच्छा.
आवडलं लिखाण!
आवडलं लिखाण!
शेवटी घडल ते छान घडलं ....
शेवटी घडल ते छान घडलं .... आधी अंगरोग तपासणे अन त्यातुन काही झाले नाही, तर अन तरच बाहेरचे बघणे असे आम्ही सदैव ऐकत आलो आहोत.
उगा कुणा दारावर आलेल्यांकडून "स्वतःचे भविष्य वगैरे" बघु नये....
आमच्या इतेह लई ताप होतो अशांचा.... दर दोनचार दिवसांनी येतातच.. काहीबाही सांगत सुटतात.. १०० खडे मारतात, दोन चार तरि बसतातच... अन मग त्याच मुद्द्यांना घेऊन घाबरवुन सोडतात.... आता काय? आषाढी वारी आहे.... वारी च्या आगेमागेबरोबर असली बरीच पोटार्थी थोतांडवाली धेंड येतिल ....
मागे मला एक जण असाच पकवायला लागला होता.... मग मी त्याला सुनावले , म्हणले, मीच ज्योतिषी आहे... तुझाच हात दाखिव... सांगतो तुला तुझेच भूत अन वर्तमान अन भविष्य... ! तर मग नको नको म्हणायला लागला...
लिंबू शी सहमत शब्द न शब्द,
लिंबू शी सहमत शब्द न शब्द, आधी डॉक्टर नंतर बाहेरचं असं बघत आलोय, अगदी अशिक्षित लोकांतही,
छान लिहिले आहे आणि शेवटचा
छान लिहिले आहे आणि शेवटचा ट्विस्ट आवडला. >> +१
जीव भांड्यात पडला!! थँक गॉड
जीव भांड्यात पडला!! थँक गॉड तुझे बाबा त्यातून बरे झाले. रीया किती सस्पेन्स तयार केला होतास! भारी लिहिलंस खरंच.
हॅपी एंडिंग झालं हे छानच.
हॅपी एंडिंग झालं हे छानच. लवकर पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद!
पण तरी राजूकाका प्रकरणात तू कुठेतरी सस्पेन्स क्रिएट केलाय..त्याला आठवत नाही, पुण्यात आला नाही म्हणतो म्हणजे काय. हे खरं आहे की मिर्च मसाला!
अश्या अनेक घटनांत एकतर भुताची
अश्या अनेक घटनांत एकतर भुताची / बाधा वगैरेची अनुभूती येते किंवा परमात्मा / ईश्वर असण्याची प्रचिती येते.
दोन्ही गोष्टी मानवी विचारशक्ती आणि कृतीच्या पलीकडे असतात. पण खचुन न जाता आपली बुद्धी शाबूत ठेवून तारतम्याने वागणे हेच सर्व संकटातुन बाहेर पडायला उत्तम प्रयास असून साहाय्यभूत ठरतात हेच पुनः एकदा सिद्ध झाले आणि खुप आनंद वाटला.
हां अनुभव ईथे शेयर केल्याबद्दल रिया ह्यांना खुप खुप धन्यवाद !
किती सस्पेन्स तयार केला होतास
किती सस्पेन्स तयार केला होतास
>>
एक्झॅक्टली.... आम्ही त्यातुन महीनाभर गेलोय
धन्यवाद मंदळी
सनव, काही गोष्टी सिक्रेट्च
सनव, काही गोष्टी सिक्रेट्च बर्या की
-----जीव भांड्यात पडला!! थँक
-----जीव भांड्यात पडला!! थँक गॉड तुझे बाबा त्यातून बरे झाले. रीया किती सस्पेन्स तयार केला होतास! भारी लिहिलंस खरंच.----------+१
लेखन आवडले. नेमके लिहीले आहे. लिह्ते व्हा.
छान लिहीलयं रीया. ओघवती
छान लिहीलयं रीया. ओघवती लेखनशैली.
यानिमीत्ताने नानाकळा आणि लिंबूटिंबू यांचेही एकमत दिसले.:)
दुसऱ्या भागात वर्तवलेला अंदाज
दुसऱ्या भागात वर्तवलेला अंदाज खरा ठरला ! बाबा पूर्णपणे बरे झाले हे मस्त झालं. लेखनशैली आवडली... लिहीत रहा.
छान लिहीलंय रीया, शेवट आवडला.
छान लिहीलंय रीया, शेवट आवडला.
>>>> यानिमीत्ताने नानाकळा आणि
>>>> यानिमीत्ताने नानाकळा आणि लिंबूटिंबू यांचेही एकमत दिसले.:) <<<< हो तर ! आमचे बर्याच बाबतीत एकमत असते...
दि ग्रेट पीपल, ऑल्वेज थिन्क्स अलाईक....
मला वाटल च होत तु श्रध्देकडे
मला वाटल च होत तु श्रध्देकडे झुकणारा शेवट करशील.
छान लिहिलसं.
छान लिहिलसं.
लिखाण जबरी जमलेय !
लिखाण जबरी जमलेय !
भन्नाट अनुभव घेतला आहेस.
अर्थात तेव्हा बाबांची अशी स्थिती पाहून काय क्लेश झाले असतील याची कल्पना आहे. पण आजच्या तारखेला त्यातून कुठलेही पर्मनण्ट डॅमेज न होता तुम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडला आहात ही जमेची बाजू.
शेवटचा राजूचाचा ईज ईक्वल टू देव हा ट्विस्ट मात्र नाही आवडला. एका अंधश्रद्धेपासून लोकांना सावध करून दुसरा (अंध!) श्रद्धेचा मार्ग दाखवणे असे झाले.
अर्थात हा तुझा हेतू नसावाही. आपले अनुभव कथन करणे ईतकाच हेतू असावा. पण पब्लिक फोरमवर प्रकाशित झाल्यावर आपला काय हेतू आहे यापेक्षा त्याचे परीणाम काय होतात हे जास्त मॅटर करते. आणि लिखाण प्रभावी असल्याने परीणामही तितकाच प्रभावी होऊ शकतो म्हणून हे लिहावेसे वाटले.
जसे भूताची भिती घालून फसवले जाते तसेच देव तुम्हाला काहीतरी देईल असे आमिष दाखवूनही फसवले जातेच.
तसेच तुमच्या केसमध्ये भूताचे वा अमानवीय काही निघाले नाही याचा अर्थ भूत नसतातच असेही नाही.
असो, लिहिता राहा वरचेवर.. मायबोलीवरही प्रकाशित करत जा ..
अगदी हा अनुभव वाचतानादेखील
अगदी हा अनुभव वाचतानादेखील एकाच्याही मनात थायरॉईडचा विचार आला का? कारण आपण वातावरण निर्मितीतून बाहेत येत नाही आणि ही ह्युमन टेंडंसी आहे
बाबांचा आवाज घोगरा होणे व बेशुद्ध होणे ह्या लक्षणांमुळे हिस्टेरिआ व डायबेटिक कोमा असण्याची शक्यता वाटली. भुताखेताचा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे किंवा विश्वास नसल्यामुळे तसं काही निघणार नाही ह्याची खात्री होती.
राजूकाका कदाचीत तुमची परिक्षा घेत असेल
मस्त लिहीलंयस , रीया.
मस्त लिहीलंयस , रीया.
अजुन काही वेगळा शेवट केला
अजुन काही वेगळा शेवट केला असतास तर आवडली नसती. छान आहे.
छान लिहीलंय रीया, शेवट आवडला.
छान लिहीलंय रीया, शेवट आवडला. >>>> +१००
लिखाण मस्तच जमलंय.
लिखाण मस्तच जमलंय.
तसेच कुठे थांबून अचानक क्रमश:चे टुकटुक करावे ही नॅक पण मस्तच जमलीय.
राजुकाका हे राजुकाकाच दाखवले असते तर ... असा विचार मनात तरळुन गेला खरा.
पण जे दाखवलेय ही पण एक लेखन शैलीच.
Rajukaka, hmm ...
Rajukaka, hmm ...

Those who Don't wanna trust can say he was just messing up with us
मी त्याच्याबद्दल जास्त काही न लिहिण्याचं तेच कारण आहे
आम्ही आमच्यापुरतं त्या घटनेला देवाची कृपा मानतोय
कोणी काहीही म्हणा पण आमचं जग श्रद्धेवरच तरुन आहे
कथा आणि शैली आवडल्याबद्दल सगळ्यांना खुप थॅंक्स..
आणखी सविस्तर प्रतिसाद नंतर लिहिन
Pages