५१, ट्युलिप गार्डन

Submitted by स्वप्ना_राज on 11 May, 2017 - 02:52

शेवटची इमेल पाठवून कविताने लॅपटॉप बंद केला. तिची पाठ भरून आली होती. घडयाळाकडे लक्ष गेलं तेव्हा ती चपापली. बारा कधी वाजले? झोपायला हवं आता. पाय न वाजवता ती बेडरूममध्ये आली. पवन शांत झोपला होता. तिने त्याच्या अंगावरचं पांघरूण नीट केलं आणि आपल्या बेडवर पडली. आता डोक्यात काही विचार न येता झोप लागेल तर बरं असं वाटत होतं पण मन कधी आपलं ऐकतं का? विचार करायचा नाही असं म्हटलं की विचार दुप्पट वेगाने मनात येतात. गेल्या वर्षभरातल्या घटना नको नको म्हणताना तिच्या डोळ्यांसमोर यायला लागल्या.

आधी आठवला तो चेतनचा मृत्यू. चेतन. तिचा जिवलग मित्र, प्रियकर आणि मग नवरा. दोन्ही कुटुंबाकडून लग्नाला काही विरोध व्हायचा प्रश्नच नव्हता. लग्नानंतर दोन वर्षांनी झालेला पवन. दृष्ट लागावा असा संसार. तिला नेहमी भीती वाटायची की आपल्या आयुष्यात सुख पाहुणं म्हणून आलंय. आणि ती शेवटी खरी ठरली. ऑफिसातून घरी येताना चेतनच्या गाडीला अपघात झाला. हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत सगळा खेळ संपला होता. कविताचे डोळे भरून आले. छाती फुटून जाईल असं दु:ख आता कायमचं सोबतीला होतं. ती बेडवरून उठली आणि खिडकीतून बाहेर बघत उभी राहिली. पण मनाला काय त्याचं? त्यातले विचार चालूच होते. चेतन गेला आणि ते घरच काय पण ते शहरसुध्दा परकं वाटायला लागलं. श्वास कोंडून गुदमरून जाईलसा वाटायचा. सासर-माहेर दोन्हीकडून आधाराचा हात पुढे होता. पण तिला स्वत:च्या पायावर उभं रहायचं होतं. तिचं मन तिला सांगत होतं की हीच वेळ आहे आधार नाकारायची. तिने मनाचं ऐकलं. त्या शहराचा निरोप घेतला. दोन्हीकडच्यांचा बराच विरोध पत्करूनही.

आता इथे आयुष्य पुन्हा नव्याने सुरु करायचा प्रयत्न. आधी नव्या शहरात जम बसवायचा म्हणजे खूप दमछाक झाली. घर, नोकरी, पवनची शाळा. दु:ख तात्पुरतं विसरायला झालं. नोकरी ठीकठाक होती. पवनच्या शाळेचं सुध्दा व्यवस्थित होतं. फक्त हे अपार्टमेंट तिला अजिबात आवडलं नव्हतं. ऑफिस आणि पवनची शाळा दोन्ही जवळ पडतात म्हणून नाईलाजाने तिने इथं रहायचं ठरवलं होतं. खूप शोधाशोध करण्याइतका वेळही नव्हता हाताशी. पण लीज संपली की इथनं बाहेर पडायचं हे अगदी नक्की होतं. जेव्हा एजंटने तिला हे अपार्टमेंट दाखवलं तेव्हा खूप जुनाट आहे म्हणून तिने आधी नाही म्हटलं होतं. खूप कोंदट वाटत होतं घरात. धूळही फार होती. अजूनच उदास वाटायला लागलं होतं तिला तिथे. पाच मिनिटं सुध्दा थांबायची इच्छा होत नव्हती. पण त्या एरियातली बाकीची अपार्टमेंटस् तिला परवडणार नव्हती.....निदान सध्या तरी. 'जाऊ देत. आपल्याला तरी काय एक वर्षंच तर काढायचं आहे' असा विचार करून तिने राहायला यायचं ठरवलं होतं.

कविता खिडकीतून बाजूला झाली. झोपायला हवं आता. ती बेडवर पडली आणि पडल्या पडल्या झोपी गेली. घड्याळात एकचा टोला पडला.
---------------------------------
संध्याकाळी ती आणि पवन घरी आले तेव्हा जवळपास सात वाजले होते. फ्रेश होऊन लगेच स्वयंपाकाला लागलीच ती. पवन दिवाणखान्यात गृहपाठ करत बसला होता. तेलाची कथली उघडल्यावर डोक्याला हात लावायची वेळ आली तिच्यावर. तसं तेल संपायला आलंय हे दोन दिवसांपूर्वीच लक्षात आलं होतं तिच्या पण आज आणू, उद्या आणू असं करताकरता राहून गेलं आणि आज ही वेळ आली. त्यांच्या गल्लीत वाण्याचं दुकान नव्हतं. आता १५ मिनिटं मोडून दोन गल्ल्या टाकून असलेल्या वाण्याकडे जाणं भाग होतं.

तिने पटकन कपडे बदलले. पवनला घरात एकट्याला ठेवायचं? का बरोबर न्यायचं?

'पवन, राजा, घरातलं तेल संपलंय. वाण्याकडून आणावं लागेल. तू घरी थांबशील का? १५ मिनिटांत येते मी परत. का येतोस माझ्याबरोबर?'

पवनने तोंड उघडायच्या आधीच बेल वाजली. 'आता ह्या वेळी कोण आलं' म्हणत कविताने दरवाजा उघडला तर समोर एक साठीपलिकडचा पुरुष उभा. कविताच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह आलं. एक तर ते नुकतेच इथे रहायला आले होते. दुसरं म्हणजे दिवसभर माय-लेक बाहेरच असत. त्यातून लोकांच्या चांभारचौकशा टाळायला त्यांच्याशी जास्त बोलायचं नाही हे कविताचं धोरण. त्यामुळे शेजाऱ्यांशी काहीच ओळख नव्हती. हा माणूस कोण ते कळेना.

त्या पुरुषाच्या लक्षात हा गोंधळ आला असावा. तो हसला आणि म्हणाला 'मी जेधे. ह्या मजल्यावर पलिकडे रहातो. घ्या, तुम्हाला तेल हवं होतं ना.' असं म्हणत त्याने हातातली तेलाची वाटी पुढे धरली. कविता अवाक झाली.

'पण आधी हे सांगा की तुम्हाला कसं कळलं मला तेल हवंय?' तिच्या स्वरात संशय आणि उघड नाराजी होती. काय भोचक लोक आहेत! दरवाज्याला कान लावून असतात का काय.

तिचा एकंदर आवेश बघून तो माणूस चपापला. मग सावरून म्हणाला 'अहो रागावू नका. मी आमच्या विकीला फिरायला घेऊन चाललो होतो' त्याने एका छोट्या पांढर्या कुत्र्याकडे बोट दाखवलं. 'तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाशी बोलत होतात ते ऐकायला आलं बाहेर. म्हटलं आता परत कुठे तुम्ही पंधरा मिनिटं वाया घालवून जाणार ना. म्हणून मिसेसला थोडं तेल द्यायला सांगितलं. ह्या आमच्या मिसेस.' असं म्हणून त्याने पलिकडच्या घराबाहेर आलेल्या एका बाईशी ओळख करून दिली.

कविता वरमली. काय झालंय काय आपल्याला? एव्हढा पटकन राग का येतो आजकाल?
'सॉरी हं. म्हणजे.....' तिने माफी मागायचा केविलवाणा प्रयत्न केला.
'जाऊ दया हो. होतं असं कधीकधी.'

त्यांचे आभार मानून कविता घरात आली खरी पण तिच्या मनातला संशय काही जात नव्हता. गेले काही दिवस सतत कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे असं तिला का कोणास ठाऊक पण ठामपणे वाटत होतं.
----------------------------------------------------------------
'पवन....आवर लवकर. मला उशीर होईल नाहीतर'. कविता ओरडून म्हणाली. पवन आपलं दफ्तर घेऊन आलाच धावत. तिने दाराला कुलूप घातलं. मायलेक लिफ्टमध्ये शिरले.

'तुम्ही ५१ मध्ये आलाय न राहायला?' लिफ्टमधल्या माणसाने ते आत शिरल्या शिरल्या विचारलं. कविताने नुसतीच मान हलवली. एव्हढ्यात तिला कोणाशी ओळख नको होती. गप्पा तर अजिबात नको होत्या.

'मी लेले. ८२ मध्ये रहातो. हैदराबादहून मुव्ह व्हायचं म्हणजे बरंच त्रासाचं काम असेल ना' तो पुढे म्हणाला.

ती नुसतीच हसली. तेव्हढ्यात लिफ्ट ग्राउंड फ्लोअर वर उघडली. तिने पवनचा हात धरला आणि धावत बाहेर पडली. आपलं वागणं थोडं शिष्टपणाचं होतंय हे जाणवत होतं तिला. पण नाईलाज होता.

रिक्षात बसता बसता मात्र तिच्या एकदम लक्षात आलं - त्या माणसाला कसं कळलं आपण हैदराबादहून मुव्ह झालोय ते? आपण एजंटला बोललो होतो ते त्याने ह्याला सांगितलं असेल का? पण ह्याला सांगायची काय गरज? आणखी काय काय सांगितलं असेल? आणि आपल्याला रिक्षात बसेस्तोवर असं का वाटत होतं की त्या माणसाचे डोळे आपला पाठलाग करताहेत?
--------------------------------------------------
'ममा, आपण इथे किती दिवस रहाणार आहोत?' पवनच्या प्रश्नाने तिने खिडकीतून नजर वळवली.
'इथे म्हणजे? ह्या सिटीत?'
'हं.....आणि ह्या घरातसुध्दा'
'एक वर्षं तरी रहावं लागेल ह्या घरात पिल्लू. का रे? तुला आवडत नाही हे घर? ही सिटी?'

पवन विचारात पडल्यासारखा दिसला. बोलू की नको हा गोंधळ त्याच्या चिमुकल्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता.

'पिल्लू......काय झालंय?'

पण इथेतिथे भिरभिरत्या नजरेने बघत पवन गप्प झाला. कविताला सवयीने माहीत होतं की त्याला सांगायचं नसलं तर किती विचारलं तरी तो काही बोलणार नाही. सांगेल नंतर त्याचा मूड असेल की असं स्वत:ला तिने समजावलं खरं. पण तरी काळजी मन कुरतडत राहिली - पवनला काय होतंय? का आपली होणारी ही चिडचिड त्याला अस्वस्थ करतेय?
--------------------------------------------------
त्या दिवशी ऑफिसमधून यायला उशीर झाला आणि सगळं आटोपेपर्यंत रात्रीचे दहा वाजले. झोपायला जायच्या आधी दात घासताना तिची उद्या करायच्या कामाची उजळणी चालू होती. 'मेडिकल पॉलिसीचा प्रीमियम. पवनच्या शाळेतली पेरेंट-टीचर मिटींग. स्नेहलला म्युच्युअल फंडाचे फॉर्म्स भरून द्यायचे आहेत. आईला वाढदिवसाचं विश करायचं आहे. नरेनला.....'. ती एकदम दचकली आणि तिने घाईघाईने केस झटकले. छतावरुन केसात पडलेला एक मोठा पोपडा खाली पडला. 'शी! काय हे! एक काम धड नाही करता येत. युसलेस!'. तिने रागारागाने वर पाहिलं.

ते घरात रहायला आल्यापासून काही दिवसातच तिच्या लक्षात आलं होतं की घरात बऱ्याच ठिकाणी छतावरचे पोपडे निघताहेत. तिने एजंटला फोन करून बोलावून झापलं सुध्दा होतं की घर रेंटवर द्यायचं आहे तर नीट रंग का नाही काढून घेतला मालकाने. खरं तर एजंटसुध्दा घराची अवस्था बघून थोडा अवाक झाल्यासारखा दिसला तिला. मागची भाडेकरू घर सोडून गेली तेव्हा नवा रंग दिलेला होता म्हणे. मग तो म्हणाला 'मॅडम थोडा चीप रंग वापरला असेल. मालक स्वत: थोडेच इथं राहतात. ते तर परदेशात'.

ह्यालाही २-३ आठवडे होऊन गेले होते आणि मधल्या काळात छतावर पोपडे पडायचं प्रमाण वाढलं होतं. भूतबंगल्यात राहिल्यासारखं वाटायला लागलं होतं. बेडरूममध्ये तिच्या पलंगावरच्या छताला तर तीन मोठे पोपडे पडले होते आता. ते काही नाही. आज झोपायच्या आधी ते काढून टाकले पाहिजेत. रागाच्या तिरीमिरीत ती बेडरूममध्ये आली आणि तिने आतले दोन्ही मोठे दिवे लावले. मग बाथरूममधलं मोठं स्टेपर आणून ती त्याच्यावर केरसुणी घेऊन चढली. एका हाताने स्टेपरचा कोपरा पकडून दुसर्या हाताने तिने केरसुणीचा फटका मारून एक पोपडा खाली पाडला. आता दुसऱ्या पोपड्यावर केरसुणी मारणार एव्हढ्यात तिचं लक्ष पहिला पोपडा पडून उघड्या पडलेल्या छताच्या भागाकडे गेलं.

आधी आपण काय पहातोय ते तिच्या लक्षात येईना. किंवा आलं होतं पण जे दिसत होतं त्याच्यावर विश्वास ठेवायला मन तयार होत नव्हतं असं असेल कदाचित. तिचे डोळे विस्फारले. घसा कोरडा पडला. पाय लटपटायला लागले. तरी कसाबसा धीर करून तिने उरलेले दोन्ही पोपडे पाडून टाकले.

आता तर जे दिसत होतं ते बघून कविताचं डोकं गरगरायला लागलं. डोळ्यांपुढे अंधारी आली. स्टेपरला धरलेला तिचा हात सुटला आणि ती तोल जाऊन वरून खाली पडली. पडताना तिचं डोकं ड्रेसरच्या टोकाला खाटकन बडवलं आणि रक्ताची धार लागली.

भान हरपायच्या आधी कविताच्या डोळ्यांपुढे छताचे तिन्ही उघडे भाग फेर धरून नाचायला लागले. छताचे तिन्ही भाग.....आणि त्यातून तिच्याकडे रोखून पहाणारे असंख्य डोळे......जेधेंचे, लेलेंचे, कपूर, भास्करनचे डोळे....काही ओळखीचे....बरेचसे अनोळखी.....तिच्या.....बेडवरच्या.....छतावरचे.....पुरुषी......डोळे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाव.... किती दिवसानी दिसलीस गं.

कथा वाचली नाही अजून, वाचते आणि लिहिते. तुला पाहून बरे वाटले हे आधी सांगावेसे वाटले.

बापरे. मला नक्की कळाली नाही. ते सगळे खरच छ्तातुन बघत असतात की तिला तसे वाटते? की प्रतिकात्मक आहे, एकट्या स्त्रीला असेच अनुभव येतात म्हणुन.

भूतं आहेत हो ती सगळी. आणि मेल्यावर भूत बनूनही पुरुषांची नजर मेली (?) एकट्या बाईवर पडतेच असं काहीतरी लेखिकेला सुचवायचं असावंं असा माझा अंदाज.

>>बापरे. मला नक्की कळाली नाही. ते सगळे खरच छ्तातुन बघत असतात की तिला तसे वाटते? की प्रतिकात्मक आहे, एकट्या स्त्रीला असेच अनुभव येतात म्हणुन.

प्रतिकात्मक आहे.

>>भूतं आहेत हो ती सगळी. आणि मेल्यावर भूत बनूनही पुरुषांची नजर मेली (?) एकट्या बाईवर पडतेच असं काहीतरी लेखिकेला सुचवायचं असावंं असा माझा अंदाज.

रोजचा पेपर उघडलात तर मला काय म्हणायचंय ते कळेल. ही हसण्यावारी नेण्याची गोष्टच नाही.

सगळ्यांचे आभार Happy

{{{ रोजचा पेपर उघडलात तर मला काय म्हणायचंय ते कळेल. ही हसण्यावारी नेण्याची गोष्टच नाही. }}}

नक्कीच. पण या कथेत ते पुरेशा गांभीर्याने मांडलं गेलेलं जाणवत नाहीये. सिरीयसली कथा वाचताना जाणवतंय की ही मृतांची कॉलनी आहे / असावी.

अंगावर येणारी गोष्ट!!!! एकट्या स्त्रीवर किती डोळे रोखलेले असतात. ती कोणाच्या अध्यात मध्यात नसली तरी लोक टपून बसलेले असतात.

सुरवातीचा भाग चांगला फुलवलाय. शेवट पहिल्यांदा लक्षात नाही आला.

>>पण या कथेत ते पुरेशा गांभीर्याने मांडलं गेलेलं जाणवत नाहीये.

म्हणजे काय? मला खरंच कळलं नाही. स्पष्टपणे मांडलेलं नाहिये असं म्हणायचंय का?

>>सिरीयसली कथा वाचताना जाणवतंय की ही मृतांची कॉलनी आहे / असावी

ह्म्म्म्.......म्हणून 'पवनला काय होतंय? का आपली होणारी ही चिडचिड त्याला अस्वस्थ करतेय?' हे वाक्य टाकलं होतं......कदाचित शेवट धक्कादायक करायच्या प्रयत्नात हे असं झालं असावं. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

नुसत पवन च नाही गं , सुरुवातीला कविता ला घर कोंदट वाटतं , आवडत नाही. त्या मुळे डोके त्या च ट्रेक वर चालत .

मस्त.. आवडली..
लेखनशैली खिळवून ठेवणारी आहे.

छान