देशाचा अपमान

Submitted by नानाकळा on 5 January, 2017 - 11:51

"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" तन्मय, आमची थोरली पाती.
"इकडे ये, मला नीट ऐकू नाही आलं." अस्मादिक.
.
.
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" अ‍ॅक्शन रिप्ले.
"तुला कोणी सांगितलं? कुठे ऐकलं" (प्रश्नाचे सरळ उत्तर देतील तर पालक म्हणवून घेण्यावर बट्टा लागेल नै?)
"असंच, मला माहिती आहे." थोरली पाती.
"अरे, म्हणजे कुठं ऐकलं, कोणी सांगितलं, कोणी बोलत होतं का असं?"
"गौरव म्हणाला. केव्हापण जन-गण-मन म्हटलं तर देशाचा अपमान होतो."
.
.
वय वर्षे सहा, वर्ग पहिला. शाळेतल्या गप्पांमधे झालेला विषय घरी चर्चिला जाणे रोजचंच. आम्हालाही नवीन पिढी कोणत्या जगात वावरते हे कळते.
.
.
"आधी मला सांग देश म्हणजे काय?" मी. उगाचच शहाणपणा.
"अम्म्म... भारत."
"भारत म्हणजे काय?"
"अम्म... देश"
"भारतदेश म्हणजे काय?"
"अम्म्म्म्म्म्म्म्म........ नाशिक"
"बरं." जास्त ताणण्यात अर्थ नव्हता. देश काय हे समजण्याचं वय नाहीये हो. चला पुडं.
"अपमान म्हणजे काय?" ह्यात तरी त्याला नक्की काय समजलं हे समजायला हवं.
"अम्म्म्म.. त्रास!"
"हां... ठिक आहे."
.
.
.
"बरं, मग केव्हा म्हटलं पाहिजे जन-गण-मन तू सांग?" अस्मादिक.
"ताई सांगतील तेव्हा. शाळेत."
"..............."
.
.
.
खरं तर माझ्याकडे तन्मयला सांगायला खूप काही आहे. पण मी गप्प आहे.
.
.
देशभक्ती, देश, मान-अपमान, राष्ट्रगीत, काय कुठे केव्हा कसे म्हणायचे, कोणाचे ऐकायचे, नाही ऐकायचे, स्वातंत्र्य म्हणजे काय, अधिकार, कर्तव्ये, इत्यादी इत्यादी.
खूप बोजा आहे हो देशाचा नागरिक असण्याचा! एवढ्या लवकर कुठे?
.
.
सध्या मनाच्या आभाळात सृजनाची पाखरे भीरभीरतात. इवल्याशा खांद्यांवर कोवळ्या स्वप्नांचा भार पुरेसा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावना समजताहेत, पण आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे हे समजत नाहीये.

देशाचा अपमान असे काही नसते. देशवासीयांचा अपमान हे जास्त समर्पक ठरते.

देशाचा अपमान तुमच्या छोट्या मुलाला राष्ट्रगीत म्हणू न देण्यात आहे, की म्हणू देण्यात आहे, हेच आता कळेनासे झाले आहे, नानाकळा.

देशाचा अपमान असे काही नसते. देशवासीयांचा अपमान हे जास्त समर्पक ठरते. Uhoh देशाच्या प्रतिकांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान नाही का?
राष्ट्र्गीत आणि राष्ट्रध्वजाबाबत काही नियम असतात. त्यानुसार लोकांनी सारासार विवेक बाळगावा आणि कुठेही, केव्हाही, काळवेळ न बघता, मनाला वाटेल तेव्हा वगैरे राष्ट्रगीत गाणे टाळावे अपेक्षित आहे. शाळेत लहान मुलांना राष्ट्रगीत शिकवल्यावर ती उत्साहाच्या भरात कुठेही गातात हे टाळावे म्हणून शाळेच्या बाईंनी /मुलाच्या पालकांनी सांगितले असावे. मी शाळेत असताना पी. टी. च्या बाईंनी बरेच नियम पाठ करुन घेतले होते. जालावर शोधले असता
http://www.archive.india.gov.in/knowindia/national_symbols.php?id=6 मिळाले त्यात जनरल कॅटेगरीतली दुसर्‍या क्रमांकात यासंबधीत भाष्य आहे.

लहान मुलांसमोर राष्ट्र आणि देशभक्तीचा बाऊ करावा का?

हा हे लिखाण वाचून पडलेला प्रश्न.
ईथे याचे उत्तर शोधणे अपेक्षित आहे का?

लहान मुलगा जसे देव्हार्‍यातल्या रामकृष्णाच्या मुर्त्या घेऊन भातुकलीचे खेळ खेळतो,
तसे त्याला भारताच्या राष्ट्रध्वजाशी खेळायला देणे योग्य आहे का? त्याच्या हातून ध्वज पडेल, फाटेल, खराब होत त्याचा अपमान होईल याची काळजी करायची का?

याचे उत्तर त्याला ध्वज खेळायला देऊ नये असे असल्यास,
पुढचा प्रश्न - ईतर राष्ट्रांचे ध्वज खेळायला दिल्यास चालेल का?

त्याला तसे करू न देताना त्याला कारण काय सांगावे?
राष्ट्र ही संकल्पना समजावत ध्वजाचे महत्व सांगावे? की बस्स सुका दम द्यावा?

हे नियम बदलावे असं प्रामणिकपणे मला वाटतं. झेंडा लावयला आणि राष्ट्रगीत गायला योग्य काळ कशाला हवाय?
मग त्यातून कोणा नतद्रष्ट व्यक्तीने वरील दोन्हीचे काहीही केले तर तो अपमान न समजता मिळालेल्या स्वात्न्त्र्याची किम्मत समजावी आणि दुर्लक्श करावं.

अपमान होतोय की नाही हे मानण्या न मानण्यावर आहे.
अपमानाव्यतीरीक्त आणखी काही नुकसान आहे का? किंवा हे नियम लोकांना सक्तीने पाळायला लावण्यात ईतर काही फायदा आहे का? राष्ट्रीय एकात्मता टिकून राहील / भंग पावेल वगैरे?

ऋन्मेष, बाऊ करु नये पण असे संकेत आहेत हे समजावून नक्कीच सांगता येते. माझ्या लहानपणी तरी हीच प्रथा होती. इथे अमेरीकेत देखील ध्वज कसा हाताळावा हे माझ्या मुलाला ३-४ वर्षाचा असल्यापासून शिकवले गेले. साधारण १ ली पासून दोन विद्यार्थी ध्वजाची घडी घालायला आणि ३री-४ थीची दोन मोठी मुले ध्वज उतरवायला आणि चढवायला असे करतात. भारतातल्या शाळांतही अशाच प्रकारे शिकवत असत. जेव्हा आपला टर्न असे तेव्हा फार भारी वाटायचे.

मूळ मुद्दा इतक्या लहानपणी मुलांवर याचा बोजा असावा का यावर आहे, आणि त्या दृष्टीने "एवढ्या लवकर कुठे?" हे पटले. मात्र स्वाती२ ने लिहीलेले आहे तसे करणे हे बरोबर आहे. अशा constructive education process मधून झेंडा ही नीट हाताळायची गोष्ट आहे, घरी कपडे, पांघरूण जसे कॅज्युअली वापरतो, कोठेही टाकतो तसे प्रकरण नाही हे आपोआप सबकॉन्शसली लक्षात येते, "हे करू नका, ते करू नका" पेक्षा.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते फक्त संकेत आहेत, असावेत. ते पाळले नाहीत तर तो गुन्हा नाही. हे अमेरिकेत तरी आहे जे मला आवडते.

अमितव, भारतातही काही गोष्टी संकेतामधे येतात आणि काही नियम म्हणून. पण भारतात नसलेला कायदा हातात घेवून झोडपणे चालते. त्यात नक्की कायदा काय आहे हे सुशिक्षितांनाही माहित नसते. मग संधीसाधूंचे अधिकच फावते.

वरती त्या लिन्क मधे हे ही सापडले. बरेच दिवस शोधत होतो कारण आधी कोठेतरी वाचले होते. यामुळेच त्या चोक्सी वाल्या केस चे आश्चर्य वाटले होते.

Whenever the Anthem is sung or played, the audience shall stand to attention. However, when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem.

नानाकळा - इथे हे अवांतर असेल तर सांगा. तुम्ही लिहीलेले हे 'लेख' असण्यापेक्षा अशा चर्चेला उद्युक्त करणारे लेखन वाट्ले म्हणून लिहीत आहे.

कंटाळा आलाय तेच तेच तेच तेच वाचून आणि त्यावर चर्वितचर्वण करून. देश, राष्ट्रभक्ती, अपमान हे लबाडांचे नंदनवन आहे हे सांगण्याचाही कंटाळा. देश, देशभक्ती, प्रतिकांचा अपमान हे सोयीने असतं. जर तुम्ही अण्णांच्या आंदोलनात सामील असाल तर राष्ट्राच्या प्रतिकांचा अपमान हा देशद्रोह वाटत नाही. राज्यघटनेवर कुत्रा प्रातःविधी करतो हे चित्र अवमानास्पद वाटत नाही तर ते प्रतिकात्मक वाटतं. चार सिंहांच्या जागी लांडगे हा देशद्रोह वाटत नाही. काँग्रेसींना वाटतो. याउलट ज्यांना अण्णांचे आंदोलन हा फार्स आहे (सिरीयसली वाटणारे नॉन काँग्रेसी) त्यांच्यातही प्रतिकांचा अवमान म्हणजे देशद्रोह ते अभिव्यक्तीस्वातंत्र्य असे करंट्स असतात. एकाच एक प्रवाहात कुणी चालणारे नसतात.

अगदी पुरोगामी म्हणवणा-यांतही अनेक करंट्स असतात. इतकी भिन्न भिन्न मतं असलेल्या या देशात देश म्हणजे काय हे ठरवणं देखील सोपं नाही. देश म्हणजे देशातील माणसे ही कन्स्पेट मागे पडून देश म्हणजे देशातील प्रभावी संघटनेतील गुंड माणसे ही कन्सेप्ट रुजू झालेली आहे. ही संघटीत माणसे ठरवतील तो समूह म्हणजे देश आणि त्या समूहांच्या भावनांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान इतकं सिंपल झालेलं आहे. कदाचित पूर्वी वेगळे समूह ते ठरवत असतील. त्यामुळे आत्ताच्या समूहांना मागचा सगळा बदला घेण्याचा असुरी आनंद मिळत असावा.

आता अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे सत्तेत असतील तर देशाच्या प्रतिकांचा अपमान हा राष्ट्रद्रोह होऊ शकतो. पूर्वी सरकारेच राष्ट्रद्रोही असत. आता सरकारच्या विरोधी मत मांडणे हा राष्ट्रद्रोह असतो कारण सरकार लोकांनी निवडून दिलेले असते असे ज्ञान नव्यानेच ज्ञात झालेले आहे.

बाकी ज्यांना राष्ट्रद्रोही ठरवण्यात येत होते ते सद्गुणाचे पुतळे असल्याने त्यांच्यावर अन्याय वगैरे होत होता असेही नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत भ्रष्टाचारामुळे देशाची लाज जाणे हा अपमान नसेल तर मग अपमान कशाला म्हणायचे ? गुजरातेतल्या दंगलींनी देशाची लाज जात नसेल, देशातील एका नागरिकाने खाल्लेलं मांस कुठल्या प्राण्याचं आहे या संशयावरून त्याची हत्या होण्याने देशाची लाज जात नसेल आणि जन गण मन ला बसून राहण्याने होत्याची, ( काही दिवसांपूर्वी हे राष्ट्रद्रोही गीत होते, ब्रिटनच्या युवराजाच्या सन्मानार्थ लिहीले होते) तर तालिबानी रानटी टोळ्यांनी शासित अफगाणिस्तान आणि भारत यात फरक काय आहे हे कोण सांगेल ?

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला देशप्रेमाचे भरते येते. त्यावेळी मानापमानाचा खेळही बहरतो. हे एक दिवसाचे वन डे मातरम झाले की ध्वज पायदळी तुडवले जातात. आताही २६ जानेवारीच्या निमित्ताने उत्साहाला भरते येईल. पूर्वी काहींच्या मते २६ जानेवारी हा लादलेला दिवस होता. राज्यघटना एक अपवित्र ग्रंथ होता. आता सत्ता मिळते म्हटल्यावर तो पवित्र होऊ शकतो. शिवाय शब्दशः बदलण्याची आवश्यकता नाही हे समजल्यावर २६ जानेवारी "आपला" दिवस वाटू लागतो. उद्या पुन्हा राज्यघटना बदलायची झाल्यास त्यात बदल होऊ शकतात.

एकेकाळी ब्रिटीशांचे गुण गाणे हा ही राष्ट्रद्रोह होता कारण त्यांनी आपल्याला "लुबाडलेले" होते. अमेरिकन संस्कृतीचे गोडवे गाणे म्हणजे महान देशाच्या महान संस्कृतीवर घाला होता. आता त्यांच्या पुढच्या पिढ्या अशा सनातन्यांच्या नाकावर टिच्चून त्या त्या देशात जाऊन राहतात आणि तिथेच स्थायिक देखील होतात.

थोडक्यात हा सगळा समूहांच्या मान्यतांचा खेळ आहे. त्या मान्यता इतक्या प्रस्परविरोधी आहेत की एकाच राष्ट्रात असलेल्या भिन्न भिन्न राष्ट्रांमधे राष्ट्रांतर झाल्याने मन मारून जगावेसे वाटावे अशी सत्ताहीनांची अवस्था असते. अशा मूर्खांच्या अधिपत्याखाली (सर्वच प्रकारच्या) हा मानवतेचा अपमान आहे हे ज्या क्षणी बहुसंख्यांना समजेल त्या दिवशी राष्ट्राचा अपमान वगैरे वारंवार ऐकू येईनासे होईल.

प्रतिसादांसाठी धन्यवाद वाचकमित्रहो!

हे मुद्दाम रचलेले लेखन नाही. काल संध्याकाळी घरात घडलेला प्रसंग.

म्हटलं तर राष्ट्रगीतासंबंधी देशात चाललेल्या गदारोळाशी संबंध आहेही आणि नाहीपण. नियम कायद्यांच्या चर्चेपेक्षा आपलेपणाची आणि जबाबदारीची अजाणतेपणी आलेली समज मांडायची होती. देश म्हणजे नाशिक ह्या त्याच्या उत्तरातून त्याला भूभाग, भोवताल, तिथे राहणारी माणसे ही आपली आहेत, एक समूह आहेत हे कळतंय ह्यात आनंद वाटला.

देशाचा मान-अपमान, त्याबद्दलचे नियम-संकेत इत्यादींबद्दल माझे विचार वेगळे आहेत, ते त्याला समजण्याचे त्याचे वयही नाही व सध्या गरजही नाही. सो गप्प बसलो.

अजून बरंच काही वाटलेलं पण शब्दात मांडता येत नाहीये. जमलं तसं लिहिन...

अभिव्यक्तीच्या भरात दोन्हीकडच्या भक्तांच्या भावना दुखावल्या असल्यास मोठ्या मनाने क्षमा असावी.

गाववाले, वाचुन अस्वस्थ झालो. नकळत पोरे किती रेजीमेंटेड होतात हे वाचून खरच अस्वस्थ झाले. राष्ट्र , राष्ट्रभक्ती ह्यांच्यासंबंधी संकल्पना पोरांना आत्तापासून देण्यात काय हशील असाही प्रश्न पडतो. अन ह्या रेजीमेंतेशनला शिक्षणव्यवस्था हातभार लावते आहे हे एकार्थाने..... बाकी काय बोलणार, वरच्या चर्चेत सगळे आले.

रेजिमेंटेशन! काय चपखल शब्द वापरला आहे तुम्ही सोन्याबापू!
नानाकळा, लेख आवडला आणि पटला. पालक म्हणून तुमची भीती रास्त आहे.

गाववाले धन्यवाद, जिज्ञासा जी आभार

मला तो शब्द सुचला कारण मी स्वतः एका रेजिमेंटेड नोकरी असणाऱ्या वातावरणात रोजी रोटी कमावतो, रेजिमेंटेशन बद्दल माझे विचार (स्वतः रेजिमेंटेड असूनही) बॅलन्स आहेत, कारण मी त्याचे फायदे अन तोटे दोन्ही जवळून पाहतो आहे, पाहणार आहे.

4.It is not possible to give an exhaustive list of occasions on which the singing (as distinct from playing) of the Anthem can be permitted. But there is no objection to the singing of the Anthem accompanied by mass singing so long as it is done with due respect as a salutation to the motherland and proper decorum is maintained.