१/१/२१०२, स.न.वि.वि.

Submitted by कुमार१ on 1 September, 2016 - 00:25

बापरे ! काय धूळ पडली आहे या पेटीवर. सुमारे एक चौरस फूट आकारमान असलेली ही लोखंडी पेटी मागच्या शतकात कधी तरी या भिंतीत ठोकून बसवली होती. आता ती प्रचंड गंजली आहे आणि तिला बरीच भोकेही पडली आहेत. ती कुलूपबंद आहे खरी पण तिच्या किल्लीने ती उघडेल की नाही याची शंका आहे. एके काळी तिच्यावर तिच्या घरमालकाचे नाव रंगवलेले होते. आता ते नाव वाचण्यालायक राहिलेले नाही. कित्येक महिने घरातले कोणी तिला उघडून बघायच्या फंदात सुद्धा पडत नाही. ही पेटी एखाद्या नव्वदी उलटलेल्या जराजर्जर म्हाताऱ्याप्रमाणे तिचे उरलेसुरले आयुष्य कंठीत आहे. आज २१०२ साली ती अस्तित्वात आहे हेच एक मोठे आश्चर्य आहे.

कुठल्या पेटीचे वर्णन वाटतंय हे ? अर्थात, ही आहे एका जुन्यापुराण्या घरावरची पत्रपेटी !

सध्या आपल्यापैकी बहुतेकांकडे आपल्या तळहातात मावणारे प्रगत संगणक आहेत आणि आपली संदेशवहनाची कामे आपण त्यांच्याद्वारेच करतोय. त्यामुळे आता टपालसेवेला फारसे कामच राहिलेले नाही. आताशा जी घरे नव्याने बांधली जात आहेत त्यांच्या प्रवेशद्वाराशी टपालपेट्या कोणी बसवतही नाही. जी घरे पाउणशे वर्षांपूर्वीची आहेत त्याच घरांच्या बाहेर मोडकळीस आलेल्या व गंजलेल्या टपालपेट्या दिसतात .त्यांचा वापर कोणी करतच नाहीये. पण जणू एखादा ऐतिहासिक वारसा जपावा त्याप्रमाणे त्या घरांनी त्या पेट्याना अजून ठेवलेले आहे. अधूनमधून तशा घरातला एखादा सणकी तरूण त्या जुन्यापुराण्या पेटीचे उच्चाटन करतानाही दिसतो. आपल्या हाताने ‘पत्र’ लिहून ते कोणाला टपालाने पाठवणे हा केव्हाच इतिहास झालेला आहे. नाही म्हणायला देशात ‘पोस्ट’ नामक खाते आहे खरे, पण त्याचा उपयोग लोक कधीकधी एखादी वस्तू (पार्सल ) दुसऱ्याला पाठवण्यासाठी करतात. क्वचित एखादा नवा उद्योजक त्याच्या उत्पादनाची जाहिरातपत्रके टपालाने पाठवतो.

सध्याच्या इतिहासाच्या शालेय पुस्तकांमध्ये ‘टपाल : संदेशवहनाचे पूर्वीचे साधन ‘ या नावाचा एक धडा आहे आणि तो मुले कुतुहलाने वाचतात. आंतरजालावर शोध घेतला असता ‘टपाल व तारखाते ‘या संबंधी ऐतिहासिक माहिती देणारी काही संकेतस्थळे सापडतात. बघूयात जरा अशा एखाद्या स्थळात डोकावून म्हणजे कळेल तरी आपल्याला की काय यंत्रणा होती ही ‘टपाल’ नावाची.
..
अठराव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात अधिकृत टपाल यंत्रणा जगात अस्तित्वात आली. तेव्हा परगावच्या माणसाशी संपर्क साधण्याचे पत्र हे मुख्य साधन होते. सुरवातीस एका ठिकाणचे पत्रांचे गठ्ठे घोड्यांच्या पाठीवर टाकून दुसरीकडे नेले जात.

त्यानंतर मोठ्या शहरांमध्ये टपाल खाती स्थापन झाली आणि मग हळूहळू लहान गावांमध्ये त्यांचा विस्तार झाला. लिहिलेले पत्र टाकण्यासाठी गावाच्या निरनिराळ्या भागांमध्ये लाल रंगाच्या मोठ्या पेट्या बसवलेल्या असत. त्यामधून दिवसाच्या ठराविक वेळांत पत्रे काढली जात. नंतर ती टपाल कार्यालयात नेऊन त्यांची छाननी व वर्गीकरण होई. नंतर ती सार्वजनिक वाहतुकीने इच्छित गावांना पोचवली जात.
मग ती पोस्टमनद्वारे नागरिकांना घरपोच दिली जात. सुरवातीच्या काळात पोस्टमन प्रत्येक घरात जाऊन पत्रे देत असे. त्याकाळी आपल्याला एखादे पत्र येणे ही एक उत्सुकतेची बाब होती. आपल्या परिचिताच्या हस्ताक्षरातले पत्र वाचताना जणू काही तो आपल्याशी बोलतोय असे वाटे. त्या काळी अनेक लोक निरक्षर होते. अशा लोकांना आलेले पत्र पोस्टमन स्वतः वाचून दाखवी. ‘डाकिया डाक लाया’ यासारखी गाणी त्याकाळी प्रसिद्ध होती. एकूणच पोस्टमन व नागरिक यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. सुरवातीस पत्रांचे वितरण हे एखाद्या देशापुरतेच मर्यादित होते. नंतर विमानाचा शोध लागला आणि मग आंतरराष्ट्रीय पत्रव्यवहार सुलभ झाला.

तेव्हाच्या पत्रांमध्ये विविध प्रकार उपलब्ध होते. अगदी कमी मजकूर लिहिण्यासाठी ‘पोस्टकार्ड’ असे. ते पाठवण्याचा खर्च वर्षानुवर्षे खूप कमी ठेवलेला होता. गरीबातल्या गरिबालाही तो परवडावा हा त्यामागचा हेतू. अर्थात या उघड्या कार्डावर लिहिलेला मजकूर गुप्त राहत नसे, पण तो लिहिणाऱ्यालाही त्याची फिकीर नसे. जरा अधिक मजकूर लिहिण्यासाठी ‘अंतर्देशीय पत्र’ असे. त्या पत्रावर लिहिल्यावर त्याचीच घडी करून एका बाजूने चिकटवून ते पाठवत असत. ते पत्र त्याची चिकटवलेली बाजू न फाडता थोड्या कष्टाने चोरून वाचता येई. असे चोरून वाचणारे महाभाग वाढल्यावर टपाल खात्याने त्या पत्रात सुधारणा केली व ते सर्व बाजूंनी चिकटवून पूर्ण बंद होऊ लागले.

एखाद्याला २-४ पानी मजकूर पाठवायचा असला तर ती पाने पाकिटात घालून पाठवत. मग त्या पाकिटावर ठराविक रकमेची तिकीटे चिकटवत. त्या तिकीटांवर निरनिराळी चित्रे अथवा थोर व्यक्तींचे फोटो असत. अशा वापरलेल्या तिकिटांचा संग्रह करणारे बरेच लोक तेव्हा होते. हे संग्राहक देशविदेशातील अधिकाधिक तिकीटे मिळवण्यासाठी खूप धडपड करीत. त्यांच्या संग्रहाची ते अधूनमधून प्रदर्शने भरवित.
त्याकाळी विविध सणांच्या वेळी एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी रंगीबेरंगी छापील भेटकार्डेही पाठवत. वर्षातील मोठ्या सणाचे वेळीस लोकांच्या पत्रपेट्या अशा पत्रांनी ओसंडून वाहत असत.
काही पत्रे तर अजून खास असत.ती म्हणजे ‘प्रेमपत्रे’. दोन प्रेमिक एकमेकांना जी पत्रे पाठवत ती रंगीबेरंगी कागदांवर लिहिलेली असत. त्याना ‘गुलाबी पत्रे’ असे म्हटले जाई.

त्याकाळच्या वृत्तपत्रांमध्ये ‘पत्रमैत्री’ नावाचा जाहिरात विभाग असे. त्याद्वारे इच्छुक लोक पत्रमित्र मिळवत. अशा तरुणांमध्ये विरुद्धलिंगी पत्रमैत्रीचे आकर्षण असे. पत्रमैत्रीतून मन मोकळे करण्यासाठी एखादा जिवलग मिळून जाई. परदेशस्थ पत्रमैत्रीतून वेगळ्या संस्कृतीची ओळख होई.

त्याकाळी चांगले पत्र लिहिणे ही एक कला समजली जाई. पत्रांतून अनेकांची विविध प्रकारची हस्ताक्षरे बघताना मजा येई. पुरूष, स्र्त्री व मुले या प्रत्येकाचे अक्षर वैशिष्ट्यपूर्ण असे. एखाद्याचे पत्रातील वळणदार अक्षर वाचताना डोळे अगदी सुखावत तर एखाद्याच्या लेखनातील लांब फरकाटे त्या पत्राला वेगळीच शोभा आणत. पत्रातील थोडेफार अशुद्धलेखन कधीकधी छान विनोद निर्माण करे. एकंदरीत पत्रव्यवहार हा प्रकार माणसामाणसांत जिव्हाळा निर्माण करीत होता, असे दिसते.

टपालखात्यासंबंधी काही सुरस व चमत्कारिक कथा इथे एका संस्थळावर नोंदवलेल्या दिसतात. त्या काळी आपल्याच गावातील एखाद्याला लिहिलेले पत्र २-३ दिवसात मिळे तर देशभरातले पत्र साधारण ८ दिवसात. पण कधीकधी मात्र पत्रे खूप विलंबाने मिळत. त्यामुळे संबंधीताचे नुकसान होई. एखाद्याला त्याच्या नोकरीच्या मुलाखतीचे पत्र तो दिवस उलटून गेल्यावर मिळे तर कधी एखादी लग्नपत्रिका लग्न होऊन गेल्यावर पोचे. पत्र विलंबाने पोचण्याचे काही विक्रम टपालखात्याच्या नावावर जमा आहेत. एकाने परीचीतास लिहिलेले पत्र तब्बल २६ वर्षांनंतर पोचले जेव्हा तो परिचित हयात नव्हता. एका गावातील अनेक पत्रे बराच काळ गहाळ होत होती. त्या प्रकरणाचा तपास केल्यावर एक भलताच प्रकार उघडकीस आला. तिथला पोस्टमन हा विकृत होता व तो त्याच्या वाटपाची सर्व पत्रे चक्क नदीत फेकून देत होता.

अधूनमधून काही समाजकंटक विचित्र पत्रे लिहून अनेकांना त्रास देत. त्या पत्रांमध्ये असे लिहिलेले असे की हाच मजकूर तुम्ही पुन्हा लिहून तुमच्या १० परीचीताना पाठवावा. तसे न केल्यास तुमच्यावर देवीचा कोप होईल, वगैरे. अशा पत्रांनी काही काळ अक्षरशः धुमाकूळ घातला होता. म्हणजे, समाजाला अंधश्रद्धांमध्ये जखडून ठेवायचे काम आजच्याप्रमाणेच त्याकाळीही चालत होते, असे दिसते.

संदेशवहनाच्या संदर्भात टपाल यंत्रणेने सुमारे दोन शतके तिचा प्रभाव पाडला होता. तातडीच्या संदेशवहनासाठी तिच्या जोडीला तिचे ‘तारखाते’ हे भावंड होते. तातडीची परीस्थिती वगळता टपाल यंत्रणा हीच समाजातील प्रमुख संदेशवाहक होती. त्याकाळी खरोखरच पत्र हे दूरसंवादाचे सोपे, स्वस्त आणि प्रभावी माध्यम होते.
एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात टेलीफोन वापरात आला आणि एक संपर्क क्रांती झाली. तेव्हा आपल्याला दुसऱ्याशी यंत्राद्वारे बोलता येणे ही नवलाई होती. हळूहळू फोन यंत्रणेचे जाळे व व्याप्ती वाढत गेली. मग जगभरात कुठूनही कुठे बोलायची सोय झाली. अर्थातच त्याचा परिणाम पत्रलेखनावर झाला.
आता नागरिकांचे व्यक्तिगत पत्रलेखन कमी होऊ लागले. तरीसुद्धा कार्यालयीन पत्रव्यवहार, माहितीपत्रके व छापील निमंत्रणे पाठविण्यासाठी टपालसेवेचा वापर भरपूर होता. फोनच्या शोधानंतरही सुमारे ७५ वर्षे टपाल व टेलीफोन यांचा सहप्रवास सुखात चालला होता.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात माणसाच्या आयुष्यात संगणक अवतरला. यथावकाश त्याद्वारे संपर्क करण्याची आंतरजाल सेवाही उपलब्ध झाली. त्याद्वारे पाठवलेले ‘पत्र’ अर्थात इ-मेल आता जगात कुठेही क्षणार्धात पोचू लागले. याचा जबरदस्त दणका टपालसेवेस बसला. सुरवातीस संगणकावर फक्त इंग्लीशमध्ये टंकता येई. नंतर अनेक भाषांमध्ये टंकण्याची सोय झाली. त्यामुळे हाताने पत्र लिहून पाठवणे बरेच कमी झाले आणि कधीतरी ते कालबाह्य होईल हा विचार पुढे आला. वेगाने पोचणाऱ्या इ-मेलच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक टपालाला आता ‘स्नेल-मेल’ असे म्हटले जाऊ लागले. संदेश वहनातील हे क्रांतीकारी बदल जगातील विकसित देशात झटपट स्वीकारले गेले. गरीब देशांना मात्र या परिवर्तनासाठी बराच काळ लागणार होता.

दरम्यान दूरभाष यंत्रणेमध्ये अजून एक क्रांती झाली अन त्यातून आगमन झाले भ्रमणभाष अर्थात सेलफोन्सचे. आपल्या बरोबर बाळगायच्या या यंत्रांमुळे संदेशवहन अधिक गतीमान झाले. त्यानंतर या जादुई यंत्राद्वारे टंकलिखित संदेश पाठविण्याची सोय उपलब्ध झाली. असा संदेश क्षणार्धात दुसऱ्यास पोचू लागल्यावर टपाल खात्याचे पोस्टकार्ड आता खरेच अनावश्यक ठरले व ‘गरीब बिचारे’ भासू लागले.

भ्रमणभाष यंत्रणेचा प्रसार झपाट्याने होत गेला आणि जगातील बहुसंख्य लोक ‘मोबाईलधारक’ बनले. आता या फोनद्वारा कोणीही कोणाशीही कुठूनही व कितीही बोलू लागला. संदेशाची कामे फटाफट होऊ लागली. बोलणे हे लिहीण्यापेक्षा सोपे व कमी कष्टाचे असते. त्यामुळे आता पत्रलेखनाला जबरदस्त ओहोटी लागली. किंबहुना पत्र लिहिणे व ते वाचणे यांसाठी वेळ घालवणे बहुतेकांना अनावश्यक वाटू लागले.

आता टपालखात्याचे काम खूपच कमी झाले होते. पूर्वी शहरांमध्ये दर अर्ध्या किलोमीटरवर पत्र टाकण्यासाठी टपाल पेट्या बसवलेल्या असत. त्यातल्या कित्येक रिकाम्या राहू लागल्याने काढून टाकण्यात आल्या. लोकांच्या घरावरच्या पेट्यांमध्ये आता पत्रे पडेनाशी झाली.
आता अधूनमधून येणारे टपाल काय असे तर निरनिराळ्या संस्थांचे छापील अहवाल व विविध जाहिरातपत्रके. थोडेफार लोक एखाद्या नियतकालिकाची वर्गणी भरत व त्यांना ते टपालाने मिळे. कालांतराने छापील नियतकालिकेही बंद पडली व त्यांच्या इ-आवृत्त्या संगणकावर उपलब्ध झाल्या. एकंदरीत टपालसेवेलां आता घरघर लागली होती. एकेकाळच्या ‘पत्रपेट्या’ आता उपेक्षित ‘पत्र्याच्या पेट्या’ होऊन बसल्या होत्या!

एव्हाना एकविसावे शतक संपत आले होते. टपालखाते आता खरेच क्षीण झाले होते. महानगरांमध्ये जेमतेम ४-५ पत्रपेट्या शिल्लक राहिल्या होत्या तर लहान गावांत अशी एखादीच पेटी आपले अस्तित्व टिकवून होती. या पेट्या आता आठवड्यातून एकदाच उघडल्या जात. बऱ्याच टपाल कर्मचाऱ्यांना इतर खात्यांमध्ये सामावून घेतले होते.
जगातील बहुसंख्य लोक एव्हाना संगणकसाक्षर झाले होते. संदेशवहन आता खरोखरच ‘इ’ झालेले होते. या गतिमान युगातील टंकलिखित संदेशांची भाषा अगदी ठराविक व औपचारिक असे. त्यांमध्ये एकेकाळच्या हस्तलिखित पत्रांमधून जाणवणारा भावनिक ओलावा आता दिसेनासा झाला होता.

पूर्वीच्या एखाद्या पत्रातील "तब्बेतीची काळजी घे. औषधे वेळच्यावेळी घेत जा. पैशांची गरज लागल्यास हक्काने सांग’’ यासारख्या मजकुरातून पाझरणारी माया आता अनुभवता येत नव्हती. आता ‘मिस यू अन टेक केअर’ यांसारखे छापील तयार संदेश हजारो किलोमीटर अंतरावरून क्षणार्धात येऊन धडकत होते आणि ते वाचल्यावर पुढच्याच क्षणी सफाईने ‘डीलीट’ केले जात होते.
. .
आज २१०२ साली म्हणजेच बाविसाव्या शतकात ही टपालखात्याबाद्द्लची ऐतिहासिक माहिती संस्थळावर वाचून मजा वाटली. आज आपण संदेशवहनाची कामे अत्याधुनिक संगणकाद्वारे करतोय. हे संगणक आपल्या तोंडी आदेशावरूनही आपली कामे करताहेत. त्यामुळे आता आपण फारसे लिहीतही नाही.
हातात पेन घेऊन ३-४ पाने लिहायची या कल्पनेनेच अंगावर काटा येतो! अजून एखाद्या शतकानंतर कोणी स्वतःच्या हाताने पानभर तरी लिहीत असेल का ? कारण तेव्हा अगदी बालवाडीच्या प्रवेशापासूनच मुलांची बोटे संगणकावर आपटू लागली असतील.

म्हणजे हळूहळू माणूस आपल्या हाताने लिहिण्याची एक सुंदर कला विसरून जाईल की काय ? या कल्पनेने मात्र खूप अस्वस्थ वाटतेय. नको रे बाबा, इतक्या टोकाचे यांत्रिकीकरण नको. आपल्या हाताच्या बोटांना जरा वाकवूयात अन वळवूयात. स्वतःच्या हाताने लिहीण्यातसुद्धा जो वेगळाच आनंद असतो तो अनुभवूयात.

चला तर मग, उचलूयात का एक पेन व लिहूयात का एकमेकांना एखादे पत्र ? आपल्याला आलेले एखादे पत्र उघडून वाचण्यातली उत्सुकता काही औरच असते, बरं का !
***************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी व माझी सौ. प्रथम पत्राने एकमेकांना भेटलो. पत्र मित्र झालो. तिने 6 पानी तिच्या हिमालय प्रवासाचे वर्णन प्रथम पाठवले आणि मी तिच्या लेखन प्रेमात पडलो. सोबत देवदार वृक्षाचे पानही पाकिटात होते. पुढे टाळेबंदी संपल्यावर भेटलो. मागील वर्षी(2023) आम्ही नोंदणी विवाह केला.

पत्र वाचून 21व्या शतकात प्रेमात पडणारे आम्ही!

**पत्र वाचून 21व्या शतकात प्रेमात पडणारे आम्ही!
>>
हे वाचून अतिशय आनंद झाला Happy
तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा !

धन्यवाद @कुमार१. मी मिलेनियल असलो तरी हाडाचा पत्र लेखक आहे. गेल्या 10 वर्षात हजारो हस्तलिखित पत्रे पाठवून लिहिते केले आहे, आप्तेष्ट, मित्र मंडळ आणि कार्यालय सहकाऱ्यांना!

आजच 2 पोस्ट कार्डे लिहून हातावेगळी केली.
(सध्या 50 पैशाला मिळणारी एकमेव गोष्ट म्हणजे पिवळी पोस्ट कार्डे!)

@ ब्लू कोलंबसे,
हाडाचा पत्रलेखक >>>>
उत्तम ! उपक्रम चालू ठेवा आणि हस्तलेखनाची जोपासना करीत रहा
Happy
तुमच्याप्रमाणेच माझाही तो पूर्वी आवडता छंद होता : https://www.maayboli.com/node/71789

छान लेख.
मी हॉस्टेलला असताना मला आई-वडिलांनी लिहिलेली पत्रे जपून ठेवली आहेत.

ब्लू कोलंबसे,
किती रोमॅन्टिक, छान वाटले वाचून ! Happy

तेलंगणातील २०,००० विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांच्या दयनीय अवस्थेबद्दल मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्डे पाठवली आहेत. हा विचारपूर्वक योजलेला उपक्रम आहे.

https://www.thehindu.com/news/national/telangana/students-postcard-push-...

खोडसाळ पत्रांचं इतिहासातील पान>>>>>> रोचक माहिती
@ब्लू कोलंबसे, खूप छान Happy
गावाकडे अजूनही कुणी निवर्तल्यावर दशक्रिया विधी कधी ते कळवण्यासाठी पोस्टकार्ड पाठवली जातात. त्यात एकाच बाजूला मजकूर लिहितात व ती पत्रे वाचल्यावर फाडून टाकतात.

snail mail
हा शब्द e mail च्या शोधानंतर आला असा एक गैरसमज आढळतो. पण वस्तुस्थिती तशी नाही. तो १९२९सालीच प्रथम वापरल्याची नोंद Oxford(OED) मध्ये आहे. तेव्हा तो Indianapolis Star या दैनिकातील लेखात वापरला होता. अमेरिकेतील एक पत्र, पाठवल्यानंतर इच्छुकाला तब्बल ३ वर्षांनी मिळाले होते. म्हणून ती उपमा दिली गेली.
पुढे e mail चा शोध लागेपर्यन्त कित्येक दशके तो वापरात नव्हता.

सध्या आमच्या पत्रपेटीच्या आसपास मोठ्या प्रमाणात गोगलगायींची पैदास झालेली आहे आणि त्यातल्या काही गोगा मातीतून बाहेर पडून वरती वरती सरकत आमच्या (आणि इतरांच्याही) पत्रपेटीत जाऊन बसतात. कुठलीही पत्रं आली की ती कुरतडत बसणे हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यामुळे ती पेटी उघडली की पत्रांसोबत गोगांच्या शीतून बाहेर पडलेले कुरतडीचे अवशेषही बाहेर पडतात. त्या गोगा तिथे बहुधा रात्री येऊन जात असाव्यात; मला एकदाच एक जिवंत सापडली होती त्यात - रंगेहाथ (रंगेपाय म्हणावं का? पण ते त्यांच्या पोटात असतात.). त्यामुळे येणारी सगळीच पत्रं आता निराळ्या अर्थाने स्नेल मेल्स झाली आहेत.

Pages