पावसाळ्याचं आणि कोकणाचं माझ्या मनात एक अतूट नातं आहे. कोकण तसं तर वर्षभर सुंदरच दिसतं पण त्याच रुप सर्वात खुलुन येत ते पावसाळ्यात. मी पहिल्यांदा गेले कोकणात तेच मुळी पावसाळ्यात. ढगांची दुलई पांघरलेला बावडा घाट श्वास रोखत पार करुन कोकणात प्रवेश केला आणि मग मात्र त्या हिरवाईने मनाला जी भुरळ घातली ती अगदी आज पर्यन्त. मग पुष्कळ वेळा पावसाळ्यात ही निरनिराळ्या वेळी कोकणात , घरी जाणं झालं आणि कोकणातलं पावसाळ्यातलं नित्य नव रुप ही तितकच मोहवणारं भासलं.
आंब्या, फणसांचा आणि रतांब्यांचा मोसम चालु असेतो पर्यन्त रोज " चार दिवस येऊ नको रे बाबा, तेवढी आंब्यांची काढणी होऊ दे.... मग ये " अस विनवलं जातं पावसाला. पण एकदा का सिझन संपला आंब्याचा की मग मात्र त्याची अगदी आतुरतेने वाट पहिली जाते. आठ पंधरा दिवस आकाशात ढग जमवून त्याने ही तयारी केलेलीच असते. एखाद दिवशी संध्याकाळी किंवा रात्री ताशे वाजंत्र्यांच्या गजरात आगमन होत या हव्या हव्याशा वाटणार्या पाहुण्याच. कितीही तयारी केली असली तरी पहिल्या पावसात तारांबळ उडतेच कारण घरावरची कौलं दरवर्षी शाकारली तरी कुठेतरी फट राहुन पाणी गळती होतेच. मग गड्याला वर चढवून ते गळतं काढलं जातं. मागील दारचा आणि खळ्यातला मांडव ही झापा कुजुन खराब होऊ नयेत म्हणून तातडीने काढला जातो. मांडव काढला की खळं खूप मोकळं मोकळं दिसायला लागत. मुलांचे क्रिकेट वैगेरे सारखे खेळ मांडवाचा अडसर नसल्याने अधिक रंगतात. पण ते थोडे दिवसच कारण एकदा का पावसाची झड बसली की आठ आठ दिवस संततधार सुरु असते कोकणात. मग खळ्यात खेळणं तर सोडाच पाच मिनीटं बसता ही येत नाही.
पावसाच्या आगमनाबरोबरच भात शेतीची कामं सुरु होतात. भर पावसात ही कामं करावी लागतात. आमच्याकडे काही जमीन उतारावरची आहे त्यामुळे तिथे वेगवेगळ्या लेवलला ( पायर्या पायर्यांची ) भात शेती केली जाते. ते शेत फार सुंदर दिसत . लावणीच्या वेळी भरपूर पाउस आणि चिखल ही लागतो . घरातली मुलं आवर्जून जातात मजा करायला आणि चिखलात लोळायला . आमचे काही गडी खूप गमत्ये आहेत. ते मुलांना मुद्दाम चिखलात लोळवितात वैगेरे . मुलांना काय तेच हव असत. (स्मित) घरातल्या बायका ही चहा, बिस्कीट, वडापाव वैगेरे द्यायच्या निमित्त्ताने जातात शेतावर. खाली गुडघाभर चिखल पाणी, वरतुन मुसळधार पाउस, गारठलेली हवा , आणि हातात तो लाल चहाचा कप !
आमच्या कडे रेडे ही जुंपले जातात शेतीकामाला
From mayboli
लावणी लावताना
From mayboli
हा एक दुसर्या शेताचा
From mayboli
From mayboli
रोपं वाढली की असं दिसत
From mayboli
ही आमची डोंगर उतारावरची शेती . ह्याला पॅनोरमा पॉइंट असं नाव आहे आमच्याकडे. " कशाला हवं आहे माथेरान बिथेरान ला जायला ? " असं ही जोडुन देतात पुढे ( स्मित)
From mayboli
डॉगर उतारावरची शेती जवळून
From mayboli
भात शेती बरोबरच नाचणी , वरी, हळद, आरारूट हे ही लावल जात थोडं थोडं. कसं काय ते महित नाही पण लावणीच्या दिवशी रात्रभर बेडकांच संगीत सुरु असतं . आमचं शेत तसं घराजवळच आहे, रात्री त्यांच डराँव डराँव घरी ही ऐकु येत. भात लावताना थोडं थोडं अंतर सोडुन रोपं लावलेली असतात पण थोडेच दिवसात रोपं वाढतात आणि एक हिरव्या रंगाचा गालिचाच तयार होतो शेतात. गणपतीच्या सुमारास काही पिकात गोड दुधाचा दाणा तयार होतो त्यावेळी शेतात अतिशय सुंदर सुवास पसरतो त्या दाण्यांचा. चारी बाजूने घनदाट झाडी, पावसाळी हवा, दुरुन येणारा व्हाळाच्या पाण्याचा खळखळाट आणि मध्ये आमचं शेत.... जगातल सर्वात सुंदर दृश्य असत ते. वार्यावर हे शेत जेव्हा डुलत ना तेव्हा तर विचारुच नका किती सुंदर दिसत ते.
लावणीचं मुख्य काम झालं की मग गडी आंब्यांच्या कलमांकडे वळतात. कलमांची टाळमाती, कलमांभोवती असलेले गडगे दुरुस्ती, नवीन कलमांची लागवड वैगेरे कामं असतात.
घराजवळ ही परसदारी काकडी, कार्ली, दुधी, पडवळ, यांचे वेल मांडवावर सोडले जातात .सड्यावरच्या मांगरावर लाल भोपळ्याचे वेल सोडले जातात. उन्हाळ्यात मरगळेलं अळू ही पावसाळ्यात चांगलच फोफावत.
त्रिपुरी पौर्णिमेला आमच्याकडे कोहाळा लागतो खरा पण कोकणात कोहाळा हा अशुभ समजला जातो. मुद्दाम लावला जात नाही. पण कधी कधी आपोआपच कोहाळ्याचे वेल ही रुजून येतात. घरच्या भाज्या काही ही मसाला न घालाता ही चवीला अप्रतिम होतात. काकडी तर मुलं एक ठेवत नाहीत मांडवावर. पावसाळ्यात आमच्याकडे फुलांचा महोत्सवच असतो जणू. अनंत, अनेक प्रकारच्या तगरी, कर्दळी, सोनटक्का, गावठी गुलाब,प्राजक्त, विविध रंगाच्या आणि आकारच्या जास्वंदी, संध्याकाळी फुलणारी गुलबाक्षी वैगेरे आमच्या आगराची शोभा वाढवत असतात.
जास्वंद
From mayboli
From mayboli
पावसात गुरांना ओला चारा मिळतो पण गुरांनी कुणाच्या शेतात तोंड घालुन नुकसान करु नये म्हणून ह्या दिवसात गुरांच्या पाठी राखण्ये ( गुराखी ) असतात दिवसभर. चार पाच राखण्ये मिळुन सड्यावर मजा करत असतात तेव्हा कृष्णाची आणि त्याच्या सवंगड्यांची आठवण येते पण त्याच वेळी ही मुलं शाळेत का शिकायला जात नाहीत हा ही विचार मनात आल्या शिवाय रहात नाही. सड्यावर हिरच्या कुरणात चरणारी गुरं फार लोभस दिसतात. पण सड्यावर जायच्या वाटेच्या दोन्ही बाजुला आपल्या कंबरेपर्यन्त गवत माजलेलं असतं. पावसाची काळोखी आली असेल तर तिथुन जाताना भितीच वाटते.
पावसाळ्यातली आणखी एक सनसनाटी घटना म्हणजे आमच्या घरा मागेच असणार्या व्हाळाला ( वहाळाला) येणारा हौर म्हणजे पूर. तीन चार तास जोरात पाउस झाला तर हा वहाळ दुथडी भरुन वाहु लागतो. पाण्याला प्रचंड वेग आणि खळखळाट असतो . ते चहा सारख्या रंगाचं पाणी पहायला मग मंडळी अगदी छ्त्र्या वैगेरे घेऊन व्हाळापर्यन्त जातात. कधी कधी पाणी साकवा वरुन ही वहात असत तेव्हा मात्र इकडची मंडळी तिकडे जाऊ शकत नाहीत. थोडावेळ सगळं ठप्प होऊन जातं. खूप मोठा हौर असेल तर व्हाळाच पाणी आमच्या आगरात ही शिरत कधी कधी. कोकणातल्या विहीरी खूप खोल असतात पण व्हाळाला हौर आला की आपसु़कच विहीरींच ही पाणी वर येतं इतक की रहाटाशिवाय ही काढता येईल. कोकणातला हौर तो ... जसा येतो अचानक तसा पाऊस जरा कमी झाला की ओसरतो हि लगेच. .. पण हौर येऊन गेला की व्हाळ मात्र अगदी साफ, स्वच्छ आणि नितळ होऊन जातो
पावसाळ्यात वादळ वार्यांमुळे कुठे अपघात वैगेरे होऊ नये म्हणून MESB लाईट घालवूनच टाकते कित्येकदा. ढगाळ हवेमुळे भर दिवसा ही घरात विशेष करुन माजघरात आणि देवघरात अगदीच कमी असतो उजेड. अशा वेळी देवघरात भर दिवसा ही निरांजनं तेवत ठेवली जातात त्यांचा मंद, शांत आणि स्निग्ध प्रकाश एक प्रकारची समाधानाची गुंगीच आणतो मनावर. लाईट घालवले म्हणून मनोमन आभारच मानते मी वीज मंडळाचे. असो.
घरातल्या बायकांची आंब्या फणसाची आणि इतर उन्हाळी कामं झाली असली तरी अगदी वटसावित्री पासुन ते गौरीगणपती पर्यन्त अनेक सण उत्सव असतातच पावसाळ्यात . नागपंचमीच्या दिवशी अगदी भक्तिभावाने आगरातच असलेल्या वारुळाचे पुजन केले जाते. पिकाची नासाडी करणार्या उंदरांचा नाश नागोबा करतात म्हणून. मंगळागौर, हरतालिका, श्रावणी सोमवार, शनिवार हे ही जोरात साजरे करतो आम्ही. त्यामुळे घरातही एकंदर उत्साहाचेच असते वातावरण .
कोकणात जनरली उन्हाळ्याच्या दिवसात जातात मंडळी. पण पावसाळ्यात कोकण म्हणजे अगदी स्वर्ग असतो. मी तर मनाने कायमच कोकणात असते पावसाळ्यात आणि हे सर्व अनुभवत असते. ह्या अनुभुतीत तुम्हाला ही सामील करुन घेण्यासाठी हा लेखन प्रपंच......
<< तु आमच्या महासंमेलनात आहेस
<< तु आमच्या महासंमेलनात आहेस हा आमचा अभिमान आहे >> चला, मुख्य अतिथी ठरले ! आतां बिगी बिगी अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, खजिनदार ठरवा, तारिख, ठीकाण फिक्स करा आणि महासंमेलनाच्या तयारीला लागा !!
हेमाताई खुप सुरेख
हेमाताई खुप सुरेख लिहिलंयस.
तुमचे आणि जागुचे लेख खास आपल्या मातीतले वाटतात >>> +१
ममो, खूप सुंदर लेख आणि सुरेख
ममो, खूप सुंदर लेख आणि सुरेख फोटो. तंतोतंत वर्णन. अगदी कोकणाचा फेरफटका मारून आले. सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं बघ.
गणपतीच्या सुमारास काही पिकात गोड दुधाचा दाणा तयार होतो त्यावेळी शेतात अतिशय सुंदर सुवास पसरतो त्या दाण्यांचा. >>>>>.अशा दाण्यातलं दूध आम्ही चाखलय.
बेडकांच संगीत >>>>>>.हेही फार छान असतं. प्रत्येकाचे वेगवेगळे आवाज.
पण हौर येऊन गेला की व्हाळ मात्र अगदी साफ, स्वच्छ आणि नितळ होऊन जातो >>>>>>>>.किती वर्षांनी "हौर" शब्द वाचला. छान वाटलं.
लावणीचा फोटो पाहून आत्ता जावं लावणी करायला असं वाटलं.
रोपं वाढली की असं दिसत >>>>>>>>>तरवा छान दिसतोय. आणि ह्या छोट्या बाधांवरून चालताना तर फारच मजा येते. कधी पाय घसरतो, आणि आपण चिखलाला भेटतो , कळतच नाही.
मला पण घेऊन जा तुमच्याबरोबर महासंमेलनाला.
भाऊ, इन्द्रा, इन्द्रदेव
भाऊ,
इन्द्रा, इन्द्रदेव आले की कोकण खुलणारच ( स्मित)
शोभा, मस्त प्रतिसाद आवडला खुप
ममो, अगदी मिलिंद मुळीक
ममो, अगदी मिलिंद मुळीक यांच्या जलरंगातल्या चित्रालाही लाजवेल अशा तजेलदार रंगात पावसाळ्यातल कोकण डोळ्यांसमोर उभे केलत. खूप सुंदर अनुभूती.
मॅगी आणि ममो, आमंत्रणाबद्दल
मॅगी आणि ममो, आमंत्रणाबद्दल खूप खूप आभारी आहे. नक्की जमविन
मस्त
मस्त
<< किती वर्षांनी "हौर" शब्द
<< किती वर्षांनी "हौर" शब्द वाचला. छान वाटलं. >> माझ्या मनातलंच बोललात !
जल्ला, काय पाऊस चालूय! परत
जल्ला, काय पाऊस चालूय! परत एकदा रिफ्रेश करुन हे फोटु बघीतले, आणी मग फ्रेश झाले.
हेमा ताई कीत्ती गोड लिहीलयस,
हेमा ताई कीत्ती गोड लिहीलयस, तुझ कोकण प्रेम आणि कुटुंब वत्सल स्वभाव पुरेपुर उतरलाय लेखात..
आणि प्र.ची. तर आ हा हा!!!
शंभर प्रतिसाद !!! सायु, तुझा
शंभर प्रतिसाद !!! सायु, तुझा प्रतिसाद शंभरावा.
खूप खूप आभार सर्वांचे. कोकणावर असचं प्रेम करा
अप्रतिम... सुंदर ... शब्दच
अप्रतिम... सुंदर ... शब्दच अपुरे ..... काय लिहावे ... ताई तुम्ही अगदी कोकणी माणसाच्या मनातल तंतोतंत लिहतात ते पण सुंदर प्रचिच्या सोबत .. .... कोंकण मुळातच श्री देव परशुराम ह्यांनी बनविले आहे ... अर्थाथच देवभूमीच वाटते ....
कोकणच धरतीवरचा स्वर्ग !
कोकणच धरतीवरचा स्वर्ग !
अप्रतिम लेख आणि सत्यजितजीची कविता !
धन्यवाद !!!!
भारी लेख आणि फोटो. सगळ्या
भारी लेख आणि फोटो. सगळ्या कोकणातल्या आठवणी जाग्या होतात तुमचे लेख वाचून. छान मस्त फ्रेश वाटते.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात
जूनच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण कोकण किनारा दापोली ते गोवा चर्चाकीने करणार आहे. पावसाच्या हिशोबाने काय काळजी घ्यावी लागेल?
फोटो आणि लेख दोन्ही छान!
फोटो आणि लेख दोन्ही छान!
फक्त एकच वर्ष आजी आजोबांबरोबर पावसाळ्यात कोकणात गेले होते. तुमचा लेख वाचताना ती ट्रीप आठवली.
तुम्ही लीहीलायात तस सगळीकडे हिरवागार, पोपटी गावात, झाडी , मदत पावसात न्हायल्या मुळे एकदम ताजीतवानी.. आणि लाल मतीमुळे तपकिरी रंगाचे पाणी. पूर्ण canvas vat मुख्य दोनच रंग हिरवा आणि लालसर मातकट रंग.. खूपच नयनरम्य!
फक्त एकच आठवण
रत्नागिरीला होतो, रात्री आठच्या वेळेला आम्ही बाहेर जवळच काही आणायला म्हणून बाहेर पडलो.. आणि पाऊस सुरू झाला.... धुवांधार... एक शब्दप्रयोग आहे हत्तीच्या पाया एवढा जाड पाऊस..
त्या दिवशीचा तो पाऊस अगदी तसाच होता.. जाड जाड धारा, खूप वेगाने येणाऱ्या, वारा, आणि तो आवाज.. मुंबईतही जोराचा पाऊस पडतो... पण येवढं रौद्र रूप कधी बघितलं नव्हतं किंवा नाही..
धागा वर आलेला पाहून छान वाटलं
धागा वर आलेला पाहून छान वाटलं. मी ही पुन्हा वाचलं सगळं आणि मनाने कोकणात जाऊन पोचले.
अजिंक्यराव पाटील, मी पर्यटन असं फारच कमी केलं आहे कोकणात त्यामुळे मी सांगू शकणार नाही काही.
आमचा सगळा भर घरी जाऊन रहाण्यातच असतो. कोकणातील पर्यटनात रस नाही जास्त. . कारण आमचं गाव, घर हेच सर्वात बेस्ट आहे असं वाटतं. इतके वेळा कोकणात जाताना राजापूरची गंगा आलेली असते पण मी एखादाच पाहिली असेल. झाली ना बघून एकदा गंगा, काय पहायचं आहे प्रत्येक वेळी तिथे जाऊन, त्यापेक्षा डायरेक्ट घरी जाऊ या, तिथे फिरू या पायी पायी बागांमध्ये, सड्यावर, वगैरे वगैरे हा attitude असतो. पुढच्या पिढीला ही हेच आवडत कोकणात फिरण्या पेक्षा.
छंदी फंदी , धन्यवाद, छान लिहिली आहेस आठवण... कोकणातला पाऊस असतोच असा. रिमझिम असू दे, संसतधार असू दे, मुसळधार असू दे , वेड लावतो हे नक्की.
ममो, १०० % अनुमोदन! आपलंच घर
ममो, १०० % अनुमोदन!
आपलंच घर आणि गाव बेस्ट वाटतं मलाही!
पावसात कोकण फिरणे नको वाटते.
पावसात कोकण फिरणे नको वाटते. पाऊस वेड्यासारखा पडत असतो, विशेषतः जुलै ऑगस्ट मध्ये. घरात बसून पावसाची मजा घेणे ह्यापरते सुख नाही.
झाली ना बघून एकदा गंगा, काय
झाली ना बघून एकदा गंगा, काय पहायचं आहे प्रत्येक वेळी तिथे जाऊन, >> रंत्नांग्रीचा अंतू बर्वा आठवला. नेहेरूस बघुन आलात काय वर उत्तर देणारा.

परवा बारक्याला शाळेतून आणायच्या वेळेला थोडावेळ इथे असा दाणदाण पाऊस पडला. मी आनंदाने काम सोडून लगेच छत्री घेऊन भिजत गेलो आणायला.
सॉरी टू बी स्पॉईलस्पोर्ट पण
@ अजिंक्यराव पाटील >>> सॉरी टू बी स्पॉईलस्पोर्ट पण खरं सांगायचे तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस बसला असेल (हे फार महत्वाचे) तर कोकणात प्रवास करू नये.
चारचाकीने जाणार असाल तरी चालक कोकणातला असल्यास ठीक, नाही तर धो धो पडणाऱ्या पावसात समोरचे काही दिसत नसताना वळणावळणाच्या रस्त्यावर गाडी चालवणे ही फार मज्जेची गोष्ट नाही. पाऊस पडत नसेल तरी घाटांत धुके असेलच. स्पीड कमी ठेवून जावे लागेल आणि प्रवास कंटाळवाणा होईल. काही समुद्र किनाऱ्यांवर पाण्यात जाता येणार नाही. सीझन नसल्यामुळे मासे फारसे मिळणार नाहीत/फार महाग मिळतील. इतर खासियतीही कमीच मिळतील.
कोकणातला पाऊस एन्जॉय करायचा असेल तर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी हॉटेल/होमस्टे/रिझॉर्ट/ मित्राचे घर (असेल तर उत्तम) मध्ये राहून जवळ नेचर ट्रेल, वॉक्स वगैरेला जावे. पाऊस पडत असताना खिडकीतून/व्हरांड्यातून पाऊस बघत गेम्स खेळावेत, पुस्तके वाचावीत, चित्रपट पाहावेत. फिरायचंच असेल तर ऑगस्टमध्ये/गणपतीपूर्वी सप्टेंबरमध्ये जा. तरीही प्रवास करायचे ठरवले तर दापोली ते गोवा हा फारच ऍम्बिशस प्रवास होईल. स्कोप कमी करता आला तर पहा.
@ममो >>>>अप्रतिम लेख. तुमचे
@ममो >>>>अप्रतिम लेख. तुमचे लेखन नेहमी कोकणाचा एक टाइम स्लाइस डोळ्यापुढे उभा करते. कोकणाचे इतके प्रत्ययकारी वर्णन फारसे वाचले नाहीये.
सकाळी आम्हाला आज्जीकडे सोडून
सकाळी आम्हाला आज्जीकडे सोडून आई बाबा नोकरीला जायचे व संध्याकाळी घ्यायला यायचे. धुंवाधार पाऊस पडत असायचा. दुपारीच काळोखून आलेले असायचे. आजीच्या घरासमोर मोकळा कातळ गवत, तेरडा, सीतेचे अश्रू यांनी भरून गेलेला असायचा. छोट्या छोट्या खड्ड्यात पाणी साठलेले असायचे. अंगणात साचलेल्या निवळशंख पाण्यात आम्ही कागदी होड्या सोडायचो. नाहीतर उघडीप असेल तेव्हा कातळावरच्या डबक्यांत होड्या सोडायला आजूबाजूची मुले जमा व्हायची. लाकडाच्या चपटया ढलप्याला एका बाजूने दोन काटक्या दोऱ्याने बांधून मध्ये त्या काटक्यांना इलॅस्टिक/रबर लावून त्यात एक छोटी काटकी घालून तिला पीळ देणे व कोणाची बोट जोरात जाते हे पाहणे हा आवडता खेळ होता.
दूरवरून येणारी समुद्राची गाज, बेडकांची डरांव डरांव आणि संध्याकाळ झाली कि रातकिड्याची किरकिर याने आसमंत भरून गेलेला असायचा. घराकडे येणाऱ्या कच्च्या रस्त्यात मध्येमध्ये तळी झालेली असायची. आम्ही खिडकीला नाक लावून आईबाबांची वाट बघत असायचो.
पाऊसपाण्यातून नोकरी, मुलांची ने-आण करणे यात आईबाबा नक्कीच कंटाळत असतील, पण आमचे बालपण फार सुरेख होते.
सध्या समृद्धी महामार्गाचा
सध्या समृद्धी महामार्गाचा कोकण पट्ट्यातला कामाचा प्रकार बघता प्रवास कमित कमी करावा असं सुचवेन. खूप
डायवर्शन्स आहेत बहुतेक ठिकाणी. ताम्हिणीतून दापोली छान आहे, पण जसजसं खाली यावं तसतसं त्रासाचं आहे. चिपळूणातून कुंभार्ली सरळ उभा घाट सध्या खड्डेयुक्त आहे. कराड रस्ता डायवर्शन्स आहेत. कोकरूडमार्गे आंबाघाट डायवर्शन्स आहेत. रत्नागिरीत थेट हातखंब्यापर्यंत डायवर्शन्स आहेत. पुढचं सध्या माहिती नाही.
आणि पाऊस पडला की लाल मातीचा चिखल होणार.
चारचाकीने जाणार असाल तरी चालक कोकणातला असल्यास ठीक, नाही तर धो धो पडणाऱ्या पावसात समोरचे काही दिसत नसताना वळणावळणाच्या रस्त्यावर गाडी चालवणे ही फार मज्जेची गोष्ट नाही. पाऊस पडत नसेल तरी घाटांत धुके असेलच. स्पीड कमी ठेवून जावे लागेल आणि प्रवास कंटाळवाणा होईल. काही समुद्र किनाऱ्यांवर पाण्यात जाता येणार नाही. सीझन नसल्यामुळे मासे फारसे मिळणार नाहीत/फार महाग मिळतील. इतर खासियतीही कमीच मिळतील. >>>++++११११
Pages