माध्यमांमधील मराठी

Submitted by बे-डर on 23 June, 2016 - 16:06

मराठीविषयी सातत्यानं चर्चा सुरू असते. वृत्तपत्रं, दूरचित्रवाणी यांची भाषा, त्या माध्यमांमधील जाहिरातींचे (चुकीचे) अनुवाद, खरं तर भाषांतर; चुकीची वाक्यरचना, इंग्रजी धाटणीची वाक्यरचना, अतिरिक्त विशेषणांचा वापर, चुकीच्या शब्दांचा सर्रास वापर, इंग्रजी किंवा मराठी शब्दांची अयोग्य संक्षिप्त रूपं (त्यांची चुकीची पूर्ण रूप), परभाषांतील नावांच्या चुका... अशा अनेक गोष्टी आढळतात. त्याबद्दल संताप, हताशपणा, वैफल्य अशा भावना व्यक्त केल्या जातात. काही जण दुर्लक्ष करतात, तर काही जण हसून साजरं करतात.

मी 28 वर्षं मराठी पत्रकारितेत आहे. शास्त्रीय दृष्टिकोणातून मी मराठीचा अभ्यास केला नाही; पण वाचत, निरीक्षण करीत, काही वेळा शोधत राहिलो. अलीकडं मराठीच्या वापराविषयी मोठ्या प्रमाणात बेफिकीरी जाणवते. अनेकांना शब्दांविषयी प्रेम, आस्था नसते, असं जाणवतं. ‘चूक-बरोबर जाऊ द्या. समजल्याशी कारण!’, असाच खूप जणांचा सूर असतो. त्याच वेळी याबाबत आस्था असणारीही बरीच मंडळी भेटली, काहींचं वाचता आलं. त्यात पत्रकार, लेखक, वाचक, प्राध्यापक... असे सगळ्याच क्षेत्रांतील आहेत.

अनेकदा मराठी वृत्तपत्रांतल्या चुका दाखविल्या जातात. पण बरोबर काय हेच सांगितलं जात नाही. या धाग्यावर चुका दाखवून बरोबर/योग्य काय आहे, हे सांगावं, असं मी सुचवू इच्छितो. त्यानं काही अंशी तरी परिणाम साधला जाईल. कारण इंग्रजी ‘डिक्शनरी’ पाहायची सवय असली, तरी मराठी शब्दकोश चाळताना फार कुणी दिसत नाही. जिल्हा वृत्तपत्रांमधून किंवा मोठ्या वृत्तपत्रांच्या जिल्हा आवृत्त्यांमधून इंग्रजी वृत्तपत्रं, मराठी वा इंग्रजी शब्दकोश पाहायला मिळत नाहीत. असं दिशादर्शक काही नसल्यामुळं अशुद्ध शब्दच वारंवार वापरण्याची सवय होऊन तेच शुद्ध असं मनात बसतं.

त्याची काही उदाहरणं...
1) एका अनुदिनीवरील (ब्लॉग) लेखावर काही प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात एका वाचकानं लेखकाचं कौतुक करताना ‘तुम्हाला चरणस्पर्श’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. इथं वाचकाला जो आदर व्यक्त करायचा आहे, त्याच्या अगदी उलट त्याच्या शब्दांमुळे घडलं आहे. त्याचा अर्थ ‘तुम्हाला लाथ मारतो/मारते’ असा होत नाही का?

2) एका तरुण पत्रकाराने काल ‘वाणवा’ की ‘वानवा’ अशी शंका विचारली. त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना वेगवेगळ्या शब्दकोशांमध्ये ‘वानवा’ म्हणजे शंका, संदिग्धता असा अर्थ असल्याचं दिसलं. मी तरी आजवर हा शब्द उणीव, कमतरता याच अर्थानं वापरत आलो आहे.

अरुण फडके यांच्या ‘मराठी लेखन-कोश’मध्ये दिलेली माहिती अशी - वानवा (पु) - सामान्यरूप - वानव्या- आणि वानवा (स्त्री) - सामान्यरूप - वानवे-

हे वाचल्यावर प्रश्न पडला की, हा शब्द पुल्लिंगी कोणत्या अर्थाने वापरतात?

3) योजना राबविणे, योजनेअंतर्गत असे शब्द वृत्तपत्रांत नेहमीच दिसतात. यातील ‘योजनेअंतर्गत’चं एक तर ‘योजनेंतर्गत’ असं लिहिलं पाहिजे. मी ते साधं ‘योजनेत’ किंवा ‘योजनेमध्ये’ असं वापरतो. ‘यांनी प्रतिपादन केले’ या वाक्याचाही नेहमीच वापर होतो. यातील ‘प्रतिपादन’ चुकीच्या अर्थाने वापरलं जातं, असं वाटतं. ‘राबविणे’ यालाही चांगला पर्याय शोधण्याची खरोखर गरज आहे.

4) हल्ली ‘कर्जे स्वस्त’ किंवा ‘कर्जे महाग’ अशी शीर्षकं नेहमी दिसतात. ‘कर्ज’ शब्दाचं अनेकवचन ‘कर्जे’ असं होत का? कृपया जाणकारांनी माहिती द्यावी, ही विनंती.

5) आता लवकरच ऑलिम्पिक आहे. त्यातील अनेक विदेशी खेळाडूंच्या नावाचे मराठी उच्चारण-लेखन आणि इंग्रजी स्पेलिंग यात खूप फरक असतो. नुकत्याच झालेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या ऑनरिकस याचा उच्चार दूरचित्रवाणीवरील हिंदी समीक्षक ‘हेन्रीकस’ करीत होते. काही मराठी वृत्तपत्रांमध्ये ते ‘हेनरीकेज’ किंवा ‘हेन्रीक्स’ असं येत होतं. ते सामने थेट दाखविणाऱ्या वाहिनीवर मात्र देवनागरी लिपीत सातत्यानं त्याचा उल्लेख ‘ऑनरीकेज’ असाच दाखवित होते. दूरचित्रवाणीच्या क्रीडा वाहिन्या सातत्यानं पाहणाऱ्या एका मित्रानं ते नाव ‘ऑनरिकस’ असंच बरोबर असल्याचं कळविलं.

6) ‘शकणे’ याचा मोठा शाप मराठी वृत्तपत्रसृष्टीला लागला आहे. ‘याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही’, ‘त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही’ किंवा ‘नेमके कारण समजू शकले नाही’ ही वाक्यरचना चुकीची आहे. त्या ऐवजी ‘माहिती मिळाली नाही’, ‘त्यांच्याशी संपर्क झाला नाही किंवा साधता आला नाही’ आणि ‘नेमके कारण समजले नाही’ ही वाक्यं अधिक योग्य आहेत.

7) विविध प्रकारे (विविध आणि प्रकार हे समानार्थीच शब्द आहेत), दबाव, पाणी फेरले, इतिहास रचला हे नेहमीचे चुकीचे शब्द अगदी रूढ झाले आहेत. या वेळी, त्या वेळी, काही तरी, जरा तरी असे दोन वेगवेगळे शब्द सगळीकडे एकत्र करून लिहिले जातात. ‘1995मध्ये’ या ऐवजी ‘1995 मध्ये’ असं वेगवेगळं लिहिलं जातं. मराठी साहित्य संमेलन किंवा नाट्य संमेलन यांच्या बोधचिन्हांमध्येही असंच लिहिलं जातं - 79 वे साहित्य संमेलन. एक तर ते अक्षरी ‘एकोणऐंशीवे’ असं लिहावं किंवा आकड्याला पुढचे ‘वे’ जोडूनच घेतले पाहिजे.

अशा असंख्य बाबी आहेत. येणाऱ्या शंका, दिसणाऱ्या चुका इथे मांडणार आहे. आपणही त्यात सहभागी व्हावे, ही विनंती. पण केवळ चुका दाखवायच्या नाहीत, तर बरोबर काय आहे, हे सांगायचे आहे. त्यासाठी ‘मायबोली’कर मंडळींनी मदत करावी, अशी विनंती. ही माहिती ठरावीक काळाने काही मराठी पत्रकार, वाचक यांना इ-मेलने पाठविण्याचा विचार आहे. म्हणजे त्यांच्या मनात शंका असतील, तर उत्तरे मिळतील, आपणहून मिळत असलेल्या माहितीमुळेही काही जण मराठीच्या बिनचूक वापराकडे वळतील, किमान तशी काळजी घ्यावी, असं तरी त्यांना वाटेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोझेस ऑनरिके = पाश्चात्य देशांमध्ये वापरलेली नावे या चर्चेतून काढून टाकावीत.. कारण त्यांच्या भाषेचे नियम वेगळे असू शकतात.

>>मुद्दा क्र. ६ आणि ७ मधील शब्द का चुकीचे आहेत व त्यांचे योग्य पर्याय कोणते?
हो ना, मलाही असेच वाटले, हे चुकीचे का आहे ?
अनेकवेळा प्रथितयश वर्तमानपत्रांमधे लिहिलेले काही वाक्यप्रयोग खटकतात.

गोष्टीगावाचे - परदेशी नावांमध्ये गोंधळ होत राहणार. पण आपल्याला ती प्रसंगी मराठीत लिहावीच लागतात. त्यातल्या त्यात बरोबर किंवा कमी चुकीची नावे यावीत म्हणून.

अभि.नव व महेश -
`शकणे` हे Canचे अंध भाषांतर आहे. ल. ना. गोखले व बा. सी. गुर्जर यांनी संपादित केलेल्या `पत्रकारांसाठी मराठी` पुस्तकात एक उदाहरण दिले आहे - मुलाखतीसाठी गेलेला एक उमेदवार विचारतो, `मी आत येऊ शकतो का?` त्यावर मुलाखत घेणाऱ्यांपैकी एक जण त्याला म्हणतात, `(तू आत येऊ शकतोस की नाही) हे तुझ्या तंगड्यांना विचार!` इथे त्याने `मी आत येऊ का?` असे विचारायला हवे होते.
दबाव - दडपण
पाणी फेरले - पानी फेरना या हिंदी वाक्प्रचाराचा अनुवाद. पाणी पाडले, असं मराठीत म्हणता येईल.
इतिहास रचला - मराठीत `इतिहास घडविला` जातो.

परदेशी नावे जर मराठीतच लिहायची असतील तर प्रत्यक्ष त्या व्यक्तीने केलेला उच्चार योग्य धरावा....
उदः अरांचा सान्चेझ... जगात वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजी अक्षरांचे वेगळे उच्चार केले जातात.

बाहेर कशाला आता भारतातही इतर भाषांचे असे होते.
बंगाली (आणि काही पंजाबीही) लोक सगळ्या 'व' चे 'ब' करतात. पूर्वी Vijay ला बिजोय म्हणायचे.
आता स्पेलिंगही Bijay असे होऊ लागले.
परवा एक भेटला त्याचे स्पेलिंगही Bije असे होते.

विरेन्द्र = विरेन्दर = बिरेन्दर = बरिन्दर
शरण = सरण =सरन = स्रन = स्रान
नामक गोलंदाज आहे भारताचा.

यातील ‘प्रतिपादन’ चुकीच्या अर्थाने वापरलं जातं, असं वाटतं. <<< हे चुकीचे कसे आहे, हे कळले नाही. सांगाल का?

‘शकणे’ याचा मोठा शाप मराठी वृत्तपत्रसृष्टीला लागला आहे. <<< असे आधीही वाचले आहे. 'माहिती मिळू शकली नाही.', 'संपर्क होऊ शकला नाही.' यात चुकीचे काय, हे थोडे विस्तृतपणे कळले ('कळू शकले'च आले होते तोंडात!) तर आभारी राहीन. 'माहिती मिळाली नाही', 'संपर्क झाला नाही.' या सरळसोट वाक्यांपेक्षा वरची (शकणारी) वाक्ये थोडी दिलगिरीही व्यक्त करणारी वाटतात, असे मला वाटते. आम्ही अटोकाट प्रयत्न केला परंतु तरीही.... अशा प्रकारे.

बे-डर, खूप उपयुक्त धागा. इथे नक्की लिहीणार. जसे आठवेल तशी उदा. देतो :
१. 'रेल्वेखाली आत्महत्या' हे धादांत चूक असून कित्येक वृत्त प त्रात कायम असते. 'रेल्वेगाडीखाली आ.' असे हवे.
२. धाडसी चूक>> धाडशी हवे. (जसे, आळस चे आळशी)
३. 'सेफ्टी tank' चूक. 'सेप्टिक हवे. ( ही 'सकाळ' मध्ये झालेली चूक आहे. मी कळवले होते. त्यानी दिलगिरी व्यक्त केली)
४. मतिथार्थ चूक. मथितार्थ हवे.
५. प्रतिथयश चूक. प्रथितयश हवे.

विशेषत: बातम्यांमध्ये 'As you can see...' किंवा 'आप देख सकते हैं...' याचं सरळसरळ मराठीत 'तुम्ही बघू शकता...' असं केलं जातं. ते खरंच कानांना टोचतं.

आणखी एक माझं नेहमीचं लाडकं उदाहरण देते - 'खाना बनाना' याचं सरळसरळ भाषांतर करून 'जेवण बनवणे' असं मराठीत वापरलं जातं. स्वयंपाक केला की ते तयार पदार्थ जेव्हा आपल्या पुढे ताटात येतात आणि ते आपण खातो तेव्हा ते 'जेवण' होतं. (आज जेवायला काय आहे? / आज काय जेवलीस?)

आजकाल आणखी एक भयंकर टोचणारा शब्दप्रयोग म्हणजे 'छाप सोडणे'. मराठीत 'छाप पाडणे' म्हटलं जातं.

गजानन

प्रतिपादन - दोषांचे निरसन करून स्वमताची स्थापना करणे (`मराठी शब्दरत्नाकर` - (कै.) वा. गो. आपटे)

प्रतिपादन - शंकांचे निरसन करून आपले मत स्थापित करणे; पुष्टी देणे (`राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश` - मो. वि. भाटवडेकर)

प्रतिपादन - 1. हरकतींचे, दोषांचे निरसन करून स्वतःचे मत सिद्ध, प्रस्थापित करणे; विवेचन; आत्मसमर्थन 2. दान; देणगी देणे (प्रतिपादित - सिद्ध, प्रस्थापित, समर्थन केलेला. प्रतिपाद्य - सिद्ध करण्यालायक, समर्थनीय) (राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा मराठी शब्दकोश, खंड पाचवा)

... हे अर्थ पाहिले, तर कोणत्याही उद्गाराला सरसकट प्रतिपादन कसे म्हणता येईल? उदाहरणार्थ `शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना द्यावे, असे प्रतिपादन अमुक तमुक यांनी केले.` `यांचे कार्य लोकोत्तर व आदर्श घेण्यासारखे आहे, असे प्रतिपादन... यांनी केले` अशी वाक्ये अयोग्य वाटतात. अर्थात कोणी हेच योग्य आहे, असे समजून सांगितल्यास काही हरकत नाही. उलट त्याचे स्वागत आहे.

कुमार1.
नक्कीच. आपण अवश्य अशा चुका नजरेस आणून द्याव्यात. `सेफ्टी-टँक` शब्दावरून तीन-साडेतीन वर्षांपूर्वी कार्यालयात वाद झाला होता. कोणीच मान्य करीत नसल्यामुळे तोच शब्द संबंधितांनी वापरला. नंतर दोन दिवसांनी उलगडा झाला व `सेप्टिक-टँक` योग्य असल्याचे मान्य झाले.

`रेल्वेखाली आत्महत्या` हे तर खरोखरच गंभीर आहे. आपण लिहिले ते पटले.

`मतितार्थ`, `प्रतिथयश` या नेहमीच आढळणाऱ्या चुका आहेत.

ललिता-प्रीती

हिंदी-इंग्रजीचा पगडा. त्यातही दूरचित्रवाणी वाहिन्या बोकाळल्यानंतर अधिक. मराठी नभोवाणीच्या वाहिन्यांवर किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवर `खूप खूप धन्यवाद` असं नेहमीच ऐकायला मिळतं. `बहोत बहोत धन्यवाद` किंवा `मेनी मेनी थँक्स` याचं हे भाषांतर आहे ना? `मी तुझी मदत करतो` किंवा `माझी मदत कर ना जरा` अशीही वाक्यं नित्याची. `मी तुला मदत करतो` किंवा `मला मदत कर` असंच पाहिजे ना तिथे?

मानसिकता - नेहमीच वापरला जाणारा शब्द. त्या ऐवजी `मनोवृत्ती`?

मननीय लिहिलंत.

'या खाकी वर्दीची शपथ!' हे आणखी एक.
'तर पाहूया, त्यांचा दिवस कसा राहिला' हेही!

सुंदर धागा. ह्या धाग्याला पुढे 'प्रमाण भाषा म्हणजेच बरोबर का, बहुजनांना कळणारी भाषा काय चुकीची असते का', ईथपासून, जात-पात-धर्म ई. ठराविक वळणं लागू नयेत ही सदिच्छा.

विशेषनाम भाषेप्रमाणे बदलू शकत नाही. बिरेन - विरेन, किंवा सौरव गांगुली - सौरभ गांगुली (दै. सकाळ), महेंद्रसिंग धोनी - ढोणी (म. टा.)

छान आहे हा धागा . तुमच्यासारखे अजून भाषाप्रेमी हवेत माध्यमांमध्ये!! ती एफेम वरची हिंदी+ मराठी+ इन्ग्रजी अशी धेडगुजरी भाषा तर ऐकवत नाही अगदी.

वानवा, म्हणजे वा - नवा अशा अर्थी शंका/ संदिग्धता असा अर्थ असेल. पण वानवा हा कायम कमतरता अशाअर्थीच वापरलाय.
शकणे - शक्य - कॅन हे तुम्ही सांगितल्यावर समजले. ते आता मराठीत रूढ झालं आहे, त्या शब्दाला आपलसं करावं. चुकीचं असलं तरी गजानन म्हणतोय तसं दिलगिरी टाईप कनोटेशन मानावं.

चांगला धागा! भरपूर उदाहरणे सुचत आहेत. वेळ मिळाला की सविस्तर लिहीते. एक उदाहरण म्हणजे संपर्क करा हे हिंदीतील संपर्क करें चे शब्दशः भाषांतर आहे. मराठीत संपर्क साधावा असे म्हणणे योग्य आहे.

काही काळापूर्वीपर्यत मराठी वृत्तपत्रे व बातम्यात पंतप्रधान हा शब्द वापरला जायचा. आता हा शब्द नाहीसा झालाय. त्याची जागा हिंदी प्रधानमंत्रीने घेतलीय. मला हे नेहमी खटकते.

चांगला विषय, प्रतिक्रियांसहित वाचायला चांगला आहे धागा, नकळत स्वतःही करीत असलेल्या बर्‍याच चुका कळतील. Happy
बाकी सध्याच्या मिडिया व लोकशाहीच्या तथाकथित चौथ्या आधारस्तंभाबद्दल बोलणे टाळतोच. "गॉन केस" आहेत त्या. मागच्या दशकात, कुणाच्या तरी टेक्नोस्याव्ही डोचक्यात शिरले की प्रुफरिडर हवेतच कशाला? विनाकारणचा वाढीव खर्च ! कॉस्ट सेव्हिंग हवे, हल्ली बाजारात ढीगाने भाषांतराच्या/शुद्धलेखनातील चुका शोधण्याच्या सोई उपलब्ध आहेत कॉम्प्युटरवरुनच, तर बातमीदार जिथे असेल तिथुनच बातमी देईल, त्याच्या अधिकारातील नेमक्या "पेजवर" ती बातमी ऑनलाईन डकवेलही, हेड ऑफिसने निव्वळ बातम्यांचि पानांवरील अलाईनमेंट परत एकदा बघायची रात्री अमुक वाजता, अन प्रिंटींगला सोडायची पाने असा खाक्या..... त्याला फक्त एक माणूस पुरेल, बाकी नोकरांची भरताड हवीच कशाला?
मग मागल्या दशकात जवळपास सर्व वर्तमानपत्रातुन अत्यंत अनुभवी/व्यासंगी/अभ्यासू अशा जुन्या नोकरदार प्रुफरिडर्सना हैराण करवुन, अपमानित करुन डच्यु दिला गेला (जे बहुतांशी मागच्या पिढीतील ब्राह्मण होते). त्याचे परिणाम दिसताहेत आता. (यास पुण्यातील शनिवारवाड्या मागचे वृत्तपत्रही अपवाद नाहीच, मित्र म्हणवणार्‍या वृत्तपत्राने तर इंग्रजी/परकी भाषिक शब्दांच्या विनाकारणच्या भेसळीसहित या सर्व अशुद्धतेचे, जनसामान्यांची(?)/बहुजनांना समजणारी, बोजड नसलेली अशी भाषा, असे म्हणत उघड समर्थनच केले आहे - येव्हडि विशेषणे लावण्या ऐवजी त्यांनी "पेठी नसलेली भाषा" इतकेच म्हणले असते तरी चालले असते, नै? Proud )

(भाषाशुद्धिच्या धाग्यावर अत्यंत अशुद्ध भाषेत वरील मजकुर लिहिल्याबद्दल क्षमस्व , मी सामान्य वाचक आहे, अभ्यासु व्यासंगी वगैरे नाही. )

छान चर्चा..

मला आजकाल खुप सार्‍या, खुप सारे असे म्हणतात ते पण फार खटकते. मराठी वाटत नाही ते.

भाषा शुद्धीचे प्रयत्न पुन्हा चालू झाले तर काही फरक पडेल, पण लक्षात कोण घेतो ? Sad
सर्रास, हिंदाळलेले, इंग्रजाळलेले मराठी दिसू / ऐकू येत आहे , त्याचे कारण म्हणजे पात्रता नसलेल्यांंना ही कामे मिळत आहेत आणि पात्र असलेल्या लोकांना भिक्षापात्र Sad

हिंदीत शैतान/ शैतानी म्हणजे मस्तीखोर, दंगेखोर/ दंगामस्ती. पण एका जाहिरातीत चक्क लहान मुलांना सैतान म्हटलं होतं शैतानचं भाषांतर करून!
दर्शक की प्रेक्षक? मराठीत काय नक्की बरोबर आहे?
' मेरे साथ ऐसा बर्ताव ...' अशासारख्या वाक्यांमध्ये ' मेरे साथ ' चं भाषांतर ' माझ्याबरोबर' असं केलं जातं, जे चूक आहे. ' माझ्याशी' असं हवं.

स्वयंपाकाच्या टीव्ही शोजमध्ये सर्रास वापरात असलेला शब्द म्हणजे- 'टाकणे'. पदार्थ आचेवर ठेवला आहे. त्यात-
साखर टाका
कांदा टाका
बटाटे टाका

खायचा पदार्थ आहे ना? मग 'टाका' काय? Angry
'घाला', 'मिसळा', 'एकत्र करा'- कृतीप्रमाणे काहीही चालेल, पण यांच्याकडे अन्य क्रीयापदंच नाहीत! फक्त टाका!!
टाका म्हणजे टाकून द्या, अर्थात फेकून द्या.

पूनम, पण आपण ' चहा टाकू का? ' म्हणजे चहा करू का या अर्थाने वापरतो की. किंवा भाजी फोडणीस टाकली म्हणतो. देऊन टाक, घेऊन टाक म्हणतो. प्रत्येक वेळी टाकून देणे हाच अर्थ नसतो.

तर पाहूया, त्यांचा दिवस कसा राहिला >>> Lol

'भाज्या चिरणे'च्या ऐवजी 'भाज्या कापणे'...

'क्या आपके दातों में दर्द है?'चं भाषांतर 'काय तुमच्या दातात वेदना आहेत?' Angry

Pages