दार्जीलिंग सहल - भाग ४ - मॉल रोड, टायगर हिल

Submitted by दिनेश. on 12 March, 2016 - 03:03

दार्जीलिंग सहल - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/57963

दार्जीलिंग सहल - भाग १ प्रयाण आणि डेकेलिंग रिसॉर्ट http://www.maayboli.com/node/57965

दार्जीलिंग सहल - भाग २ - रॉक गार्डन http://www.maayboli.com/node/57976

दार्जीलिंग सहल - भाग ३ - बोटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/58000

दार्जीलिंगला गेल्यावर भेटणारा प्रत्येक माणूस मॉल रोड वर गेलेच पाहिजे असे सांगतो. हॉटेलने पण खास मॉल रोडवर जाण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी गाडी ठेवली होती. म्हणून आम्ही बोटॅनिकल गार्डन नंतर तिथे जायचे ठरवले.

वाटेत दिसलेल्या एका ठिकाणी खाऊन घेतले.. दुसरे काय, दम आलू आणि रोटी. पण अर्थातच प्रत्येक ठिकाणची
चव वेगळी होती. आणि एकंदर त्या हवेत भूकही छान लागत होती.

१)

मॉल रोड हा दार्जीलिंगचा मध्यवर्ती रोड म्हणता येईल. हा बर्‍यापैकी सपाट जागेवर आहे. एका बाजूने हारीने
दुकाने आणि एका बाजूला मोकळी जागा. तिथे बसायला बेंचेस आहेत.

रस्त्याच्या शेवटी एक स्टेज आहे. तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होत असावेत. त्या स्टेजच्या बाजूला एका टेकडीवर
जायचा रस्ता आहे. त्या वाटेने वर गेल्यावर महाकाल टेंपल लागते.

पण सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या रस्त्यावर वाहनांना बंदी आहे, त्यामूळे निवांत भटकता येते. ( राज उपाध्याय यांच्या साइटवर लिहिल्याप्रमाणे इथे बॅटरीवर चालणार्‍या टॅक्सीज आहेत, पण आम्हाला त्या दिसल्या
नाहीत. )

दोन्ही बाजूला हर प्रकारचा माल, म्हणजे चहा, लोकरी कपडे, सुवेनियर्स, खाद्यपदार्थ विकणारी दुकाने आहेत.
मला काही खरेदी करायचे नव्हते पण बंगाल सरकारचे एक शोरुम दिसले म्हणून आत शिरलो. कासुंदी पासून साड्यांपर्यंत बरेच काही होते, पण मला तरी किमती जास्त वाटल्या. विवेकने दुसर्‍या दुकानात काही शॉल्स, स्ट्रोल्स वगैरे घेतले, ते मात्र बरेच स्वस्त होते.

या रस्त्याची जी मोकळी बाजू आहे, तिथून हिमालयांच्या शिखरांचे दर्शन होऊ शकते.. कधी जर हवामानाची साथ असेल तरच.. ( आणि हा घटक दार्जीलिंगला अतिमहत्वाचा आहे. )

तर चला या रस्त्यावर फेरी मारु..

२)

३)

४)

५)

पण एकंदर ते प्रकरण मला काही फार इंटरेस्टींग वाटले नाही. हॉटेलमधे जाऊन खाऊ म्हणून आम्ही एका
हॉटेलमधे टेक अवे डिनर घेतले. तर तिथला कारभार एकदम निवांत ( हे उपाध्याय साहेबांनी गौरवलेले हॉटेल )
ऑर्डर दिल्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने ते मिळाले. हॉटेलात आम्ही दोघेच. वेळ घालवायला चहा मागितला,
तर तोही आला पंधरा मिनिटाने.. पण ठिक आहे, त्यांची लाईफस्टाईल आहे ती.. ( पण आम्हा मुंबईकरांना कशी रुचणार ? )

दुसर्‍या दिवशी पहाटे साडेतीनला आम्ही संदीप ला बोलावले होते.. इतक्या पहाटे कुठे जायचे होते ? तर टायगर हिलला !!

टायगर हिल ही दार्जीलिंग जवळची एक टेकडी आहे. इथून उगवत्या सूर्याची किरणे कांचनजुंगावर पडतात त्याचा
अप्रतिम नजारा दिसतो ( पण..... )
सूर्य कांचनजुंगापासून बर्‍याच दूरवर उगवतो आणि त्याची तिरपी किरणे कांचनजुंगावर पडतात. मग तांबूस ते सोनेरी अश्या रंगात ती शिखरे झळाळताना दिसतात. या नजार्‍याची चित्रे सर्व दार्जीलिंगभर दिसत राहतात.

तर तिथे जाण्यासाठि पहाटे साडेतीनला निघून चारच्या आधीच तिथे पोहोचणे गरजेचे असते. कारण नंतर तिथे खुप गर्दी होते आणि गाडी खुप खाली पार्क करावी लागते.
आम्ही चार वाजताच तिथे पोहोचलो तर आमच्या आधीदेखील काही मंडळी तिथे आली होती. तिथे एक मोकळी जागा आहे आणि एक तीनमजली इमारतही आहे. मोकळ्या जागेसाठी १० रुपये तर त्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यासाठी २० ते ४० रुपये तिकिट आहे. ( असे सर्व साइट्स सांगतात ) पण सध्या तरी ती इमारत पूर्णपणे कोसळलेली आहे. तिथे आता जाता येत नाही. दुरुस्तीचे काम चालू असेल असे वाटत नाही ( हे मात्र कुठल्याच साइटवर लिहिलेले नाही ).

मोकळ्या जागी पोहोचलात कि आणखी एक मजा. अंधारात पूर्व दिशा कुठली आणि कांचनजुंगा कुठल्या दिशेला
दिसेल याची कल्पना येत नाही. तिथे काहिही माहिती लिहिलेली नाही. आणि यावेळी मदत झाली ती स्थानिक महिलांचीच.

या महिला तिथे छान कॉफी विकत असतात. असते घोटभरच ( १० रुपये ) पण त्या वातावरणात ती कॉफी
अप्रतिम चवीची लागते. त्या महिलेला विचारल्यावर तिने हातातील बॅटरीचा झोत दाखवून सूर्य आणि कांचनजुंगा
कुठे दिसेल, ते अचूक दाखवले. मग त्या ठिकाणी आम्ही ठिय्या दिला.

कडाक्याची थंडी आणि भन्नाट वारा यांच्यामूळे माझेही हात गारठायला लागले होते ( एरवी मला थंडीचा त्रास होत नाही ) पण तिथेच काहि लोक टोप्या आणि हातमोजे विकत असतात ( ५० रुपये ) त्या घेतल्या आणि आम्ही
सूर्याची वाट बघत बसलो.

आलो त्यावेळी दार्जीलिंग गावातले दिवेच नव्हे तर आकाशातली नक्षत्रेही ठळक दिसत होती. आणि थोडे
फटफटायला लागले.

६) या फोटोत दिसतोय तो फडफडणारा झेंडा, त्यावरून वार्‍याची कल्पना यावी.

७) आणि मग दरीतून ढग उसळी घेऊ लागले. आधी जे दिसत होते, तेही दिसायचे बंद झाले.

मग काय ? बहुतेकांनी आशा सोडून दिली. काही जण परतही फिरू लागले. आमच्या शेजारी एक इतालियन
माणूस ऊभा होता. तो मला म्हणाला थांब इथेच. नक्की दिसेल. ( त्याचे खरेच कौतूक आहे. तो लोकांनी टाकलेला
कचरा, आपल्या जवळच्या पिशवीत जमा करत होता. लोक कॉफीचे कप्स, हातमोज्याच्या पिशव्या तिथेच
टाकून देत होते. तिथल्या भन्नाट वार्‍याने तो कचरा सगळीकडे पसरत होता. )

सूर्य बराच वरही आला, आता आम्हाला ती रंगाची जादू दिसणार नव्हती.

आणि अचानक धुक्याचा पडदा विरळ झाला आणि दूरही झाला. आम्ही आनंदाने एकमेकांना मिठ्या मारल्या.

८)

९) पण काही क्षणातच ते दृष्य अंधूक झाले

१०) आम्ही तिथेच थांबलो होतो. १५/ २० मिनिटांनी परत दिसू लागला तो.

११) दोन तीन मिनिटांनी परत...

खरं तर हे आश्चर्य आहे. कारण कांचनजुंगा त्या जागेपासून तब्बल २२५ किमी वर आहे. पण त्याची अमाप उंची आणि मधे नसलेला अडथळा, यामूळे हे दर्शन घडते. ( हवामान नीट असेल तर अगदी एवरेस्टही तिथून दिसू शकतो. )

या वरच्या फोटोत टायगर हिल जवळची झाडे आणि मधल्या जागेनंतर जो धूसर कांचनजुंगा दिसतो आहे, त्यावरून याची कल्पना यावी.

१२) नंतर सूर्य बराच वर आला तरी ढग हटायला तयार नव्हते.

१३) ऑप्टीकल झूम वापरून हा फोटो मिळाला.

१४) मग लगेच परत निघायची धांदल. हि टायगर हिल फक्त याचवेळी गजबजलेली असते. नंतर तिथे कुणीच नसते.
परतीच्या वाटेवरही धुक्याचेच साम्राज्य होते.

ही हिल आहे, घूम गावाच्या जवळ. इथून खाली उतरल्यावर एक बुद्ध मंदीर आहे. ( टायगर हिल ची अरेंज्ड टूअर उपलब्ध आहे. त्यात परत येताना काही देवळे दाखवतात. ) आम्ही या एकावरच समाधान मानले.

१५)

१६) देऊळ गौतम बुद्धाचे आहे पण आधी लक्ष जाते ते मूर्तीसमोर ठेवलेल्या प्रसादाकडे. भले मोठे शंकरपाळे,
खाजे वगैरे तिथे सजावटीत होते. फळे आणि सुका मेवा पण होता.

१७) बुद्धाची मूर्ती

१८) तिथलीच एका गुरुंची मूर्ती

१९) तिथल्या भिंतीवर काही चित्रेही आहेत.

तिथेच बाहेर लोकरीचे कपडे, शोभेच्या वस्तू विकत बरीच माणसे बसलेली असतात. आणि त्याच्या किंमतीही ( मुंबईच्या तूलनेत तरी ) खुपच कमी होत्या.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चालू आहे ही मालिका पण.
रच्याकने, पहिल्या फोटोतली रोटी एकदम आपल्या खुबुस सारखी दिसतीये.

अप्रतिम लेखन, फोटो सर्वच. लकी आहात, कांचनजुंगा. आम्हीपण लकी फोटो शेअर केलेत म्हणून Happy .

त्या इटालियन माणसाला खरंच hats off. का करतात असा कचरा.