संकेत - भाग ६ (अंतिम)

Submitted by मुग्धमानसी on 27 December, 2015 - 23:50

याधीचे भागः
'संकेत' भाग १ - http://www.maayboli.com/node/56790
'संकेत' भाग २ - http://www.maayboli.com/node/56815
'संकेत' भाग ३ - http://www.maayboli.com/node/56845
'संकेत' भाग ४ - http://www.maayboli.com/node/56884
'संकेत' भाग ५ - http://www.maayboli.com/node/56917
__________________________________________

मी आरशासमोर उभी आहे.
कधीकधी स्वत:ला समोरासमोर भेटावसं वाटलं की मी अशीच आरशासमोर उभी राहते. त्यावेगळा आरशाचा माझ्या घरात दुसरा कुठलाच उपयोग नाही.
ही माझ्यासमोरच्या आरशात उभी असलेली एकमेव व्यक्ती आहे जी माझ्या चेहर्‍यावरचे विद्रूप डाग पाहून दचकत नाही. किळस करत नाही.
माझं आडवं तिडवं अस्ताव्यस्त वाढलेलं शरीर पाहून ही हसत नाही.

माझ्या चेहर्‍यापलिकडची माझी ओळख या आरशातल्या इंद्रायणीला माहित आहे.
कावेरी आणि गोदावरी श्रीहरी लांजेकर!!! - तुम्हालाही कळणार आहे. तुमची बहिण तिचं ’बाईपण’ ओलांडून खूप पुढे गेलेली आहे. पशा, सुन्या आणि रवीपेक्षाही खूप जास्त ’माणूस’ झालेली आहे.

आज इथे हे सगळं प्रवचन सांगण्याचं कारण...
अर्थातच ती तीन मडकी. मेंदू थकेपर्यंत विचार केला. आणि काही सामान्य दुवे शोधले.
पेडणेकरांची फाईल वाचून काढली. त्यांच्या अनेक प्रॉपर्टीजपैकी एक जमिनीचा तुकडा लातूर जिल्ह्यात ’चाकूर’ गावी आहे. हे आबाचं गाव. ही जमिन पेडणेकरांनी ’जामदार’ आडनावाच्या इसमाकडून १९६६ साली विकत घेतली. म्हणजे आमच्या जन्माच्या एक वर्ष आधी. आमचे आई गावातून पळून गेली त्याच सुमारास. त्यावेळच्या जमिनीच्या सगळ्या कागदपत्रांवर ’चंद्राबाई जामदार’ यांचा अंगठा होता.
मी अजून बारकाईनं पाहिलं. मूळ व्यवहारात अनेक बदल आणि फेरफार झालेले दिसत होते. पहिल्यांदा जेवढी जमिन आणि मोबदला ठरला होता, त्यात कमी कमी होत होत शेवटी ठरल्यापेक्षा अगदिच कमी जमिन आणि तीही नाममात्र किमतीला विकावी लागली होती चंद्राबाईला. पैश्याची फारच चणचण असणार तिला... किंवा हातचं गिर्‍हाईक जाण्याची भिती. व्यवहारातला पेडणेकरांचा रस नंतर नंतर निघून गेलेला असणार. कदाचित... कदाचित आमची आई कारणीभूत असेल त्याला.
म्हणजे.... म्हणजे हा पेडणेकर...

आरशातली इंद्रायणी माझ्याकडे पाहून हसते आहे. आणि मी सून्न!
______________________________________________________

त्यादिवशी नलाक्का आम्हाला घेऊन मळ्यात गेली. यमी नव्हती सोबत. सुधा मात्र होती.
आम्हाला समजेना कि हिचा नवरा घरात थांबायचं सोडून मळ्यात काय करतोय?
नलाक्का मळ्यातल्या विहिरीकडे जात होती. विहीर जवळ येता येता तिचा वेग वाढू लागला. एका हातात तिनं सुधाचा हात घट्ट धरला होता. नलाक्काच्या चेहर्‍यावरचा आनंद बघून सुधा देखील खूश होती.

विहीर जवळ आली तशी नलाका ओरडली... "तो बघ सुधे... तुझा बाप..."
आणि काहिही कळायच्या आत तिनं सुधाला उचलून विहिरीत फेकलं. सुधा भयंकर किंचाळली. नलाक्कानं गर्र्कन वळून आमच्याकडे पाहिलं.
आमच्या तिघींच्याही चेहर्‍यावर मुर्तीमंत भीती उभी राहीली असेल त्यावेळेस...!! वेडी...!! हो... शाम्या सुतारापेक्षाही भयंकर वेडी दिसत होती नलाक्का. आम्ही थिजून एकमेकींना थरथरत चिकटून उभ्या होतो....
"जा सांगा जा त्या चंद्रीला... जिमिनीच्या हावेपाई सवताच्या लेकाचा संसार देशोधडीला लावला हाडळीनं. त्याच जिमिनीच्या हिरीवर जीव दिला म्हनावं म्या लेकरासंग. आता मेल्यावं बघ्ते... कोन ही जिमिन घ्येतंय आमच्याकडनं त्ये...."
काही समजायच्या आत नलाक्कानं विहिरीत उडी मारली. धप्पदिशी आवाज झाला काही क्षण खळखळ आणि मग सगळं शांत!
विहिरीच्या काठावर तीन तिळ्या बहिणी... चवदा वर्षांच्या... थरथर कापत एकमेकींना घट्ट चिकटून उभ्या.
----------

नलाक्काच्या घटनेनंतर आम्ही तिघीही सावरूच शकलो नाही. तिघीही भयंकर आजारी पडलो. ताप उतरता उतरेना तेंव्हा गंगात्तू घाबरली. त्यातून चंद्राबाई पिसाळल्यासारखी वागायला लागली. सगळ्या गावासमोर तिनं आम्हा तिघा बहिणींच्या नावानं घाणेरड्या आरोपांची लाखोली वहायला सुरूवात केली. त्यातून तिला नक्की काय शाबित करायचं होतं ते देव जाणे. नलाक्कानं यमीला आधीच फ़ेकलं होतं विहिरीत. त्या तिघींच्याही भिजलेल्या प्रेतांपुढे चंद्राबाईनं फोडलेला टाहो सार्‍या गावानं ऐकला. तो टाहो खोटा आहे हे माहित असलेल्या आम्ही तिघी.... पण आमची भितीनं वाचाच गेलेली!

चंद्रीचं आम्हा तिघींना अपशकूनी, पांढर्‍या पायाच्या नतद्रष्ट कार्ट्या म्हणून गावाबाहेर हाकलायचा चंग बांधला जणू. नलाक्काच्या सासरी असलेल्या दोन मुलींना आणि जावयांनाही तिनं भडकवलं. आम्ही अजूनही आजारी होतो... काय चाललं आहे ते समजायच्या पलिकडे...
गंगात्तूनं बिचारिनं सगळ्या गावाशी त्याकाळात एकतर्फी लढा दिला. आम्ही तिच्याचकडे होतो तेंव्हा. पण गंगात्तू तरी कितीकाळ लढली असती? तिचं वय झालं होतं. वेड्या नवर्‍याखेरीज उभ्या जगात तिचं कुणीच नव्हतं. शेवटी तिनं आमच्या सुरक्षेसाठी आम्हाला गावाबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला....

आम्ही अवघ्या चौदा-पंधरा वर्षांच्या.... लातूरच्या रेल्वे स्थानकावर गंगात्तू आम्हाला सोडायला आली होती. दोन दिवस रडून रडून डोळे सुजले होते तिचे. वेड्या शाम्याला सुद्धा फरफटत सोबत आणलेलं तिनं. त्याच्यात जीव आडकलेला नस्ता तर गंगात्तू आली असती आमच्यासोबत...
कुणीतरी गंगात्तूचा ओळखीचा माणूस होता... त्याच्याकडे तिनं आम्हा बहिणींना सोपवलं. जगातल्या सगळ्या चिंतेनं आणि भीतीनं त्या क्षणी तिच्या डोळ्यांत घरटं केलं होतं. तिच्या डोळ्यांत पाण्याचा खोल खोल डोह धरण फोडून वाहू पहात होता.
पण ती रडली नाही. तिला आम्हा तिघींनाही जगाशी सामना करण्यासाठी खंबीर करायचं होतं. तिच्याकडचे पैसे तिनं आम्हा तिघींना वाटून दिले. जणू आमच्या लवकरच होणार्‍या ताटातूटीची कल्पना होती तिला....
एकमेकींचा हात हातात घट्ट धरून आम्ही त्या अनोळखी इसमासोबत रेल्वेच्या डब्यात बसलो. गाडीनं तिच्या वेळात, तिच्या नियमांप्रमाणे धावायला सुरुवात केली. तिच्या पोटात आम्च्यासारखे असंख्य जीव-जंतू वळवळणारे... कुणाकुणाच्या सुखदु:खांचं सुतक साजरं करावं तिनं? आणि का?
रेल्वेच्या खिडकीबाहेरून धावणारी गंगात्तू शेवटपर्यंत काहिबाही सांगत होती. "काळजी घ्या गं लेकरांनू.... एकमेकीस्नी धरून रावा... तुमचा आबा बगतुय तुमास्नी आबाळातनं... त्यो घील काळजी तुमची. जपून रावा गं पोरिंनू.... आन मला माफ करा गं... आबाना दिलेलं वचन पुरं नाय करू शकले. जमंल तसं शिका गं.... आबाचं सपान पुरं करा.... जमत तसं गावाकडं या गं या म्हातारीला भेटाया..."
रेल्वे वेग पकडू लागली तसं धावताना गंगात्तूला धाप लागू लागली. आमच्या खिडकीच्या गजांवरचा तिचा हात आमच्या हातातून निसटू लागला आणि आता अगदीच न राहवून आम्हा तिघींनाही रडू आलं. एकमेकींच्या कुशीत शिरून आम्ही तिघी खूप खूप रडलो.

ती आमची शेवटची भेट. त्यानंतर आम्ही आजवर एकमेकींना भेटलो नाही.
ती ट्रेन कुठे जात होती माहीत नाही... पण जिथे पोचलो तिथं आम्ही एकत्र पोचलो नाही. एकमेकांना अगदी चिकटून बसलेल्या आम्हाला रात्री कुणी कधी वेगळं केलं कळलं नाही. बहूदा त्या इसमानं आम्हाला दिलेल्या रात्रीच्या जेवणात कसलंतरी औषध घातलेलं असावं.
मुंबईच्या V.T. स्थानकावर भांबावलेली मी एकटीच उतरले तेंव्हा भीतीनं गाळण उडालेली रडून रडून थकलेली उभ्या जगात एकटीच होते मी.... गोदीला आणि कावूला शोधत हाका मारत अनोळखी शहरात एकटीच फिरत होते.... कितीतरी दिवस....

पोटात भूकेचा डोंब उसळला... पण भिक मागायला मन धजेना. आबाच्या आठवणीनं जीव कासावीस व्हायचा. आबा जित्ता आसता तर असे हाल कधीच नस्ते होऊ दिले त्यानं आमचे.... आबा... का म्हून ग्येलास रं आमाला आसं सोडून. काय बी कसं न्हाय वाटलं तुला? गोदी कुटंय रं? कावूला पन भूक लागली आसंल... आबाSSSS ये की रंSSSS
_____________________________________________________________

मी आता निघते आहे. रस्त्यावरून भणाणा गाडी चालवत. आमच्या गावाच्या दिशेनं. आजच जायला हवं. आताच जायला हवं.

कामं उरकली आहेत सारी. पेडणेकरांची केस त्यांना जिंकवून दिली. त्यांच्या ’वारसदारांना’ न्याय मिळाला. ’न्याय’ मिळाला!!!
मी मुक्त केलं... आमच्या जन्माला कारणीभूत ठरल्याच्या ऋणातून त्याला... आणि जन्माला आल्याच्या ऋणातून स्वतःला.
आता मी जाते आहे. मुंबईच्या अर्थशून्य रस्त्यांवरून बेवारशी भटकणार्या मला उचलून ’स्नेहांकीत’ संस्थेची दिशा दाखवणारा तो हात... त्याचे ऋण उतरायला हवेत. आबाच आला त्या माणसाच्या रुपात माझ्या मदतीला धावून. गोदेला आणि कावूलाही आबा असाच कुठल्याना कुठल्या रुपात भेटला असेल. शेवटी आमचं ’कुटूंब’ एकत्र येतं आहे... आमच्या घरी....

गोदेला आणि कावूला भेटण्याच्या ओढीनं माझं मन माझ्या गाडीपुढे धावतं आहे. मला माहीतीये.... जगाच्या कुठल्यातरी टोकांतून एकाच नाळेतून जन्मलेल्या माझ्या बहिणीदेखिल आता दिशांची बंधनं कापून तिथंच येताहेत.... प्रवास करताहेत.... तेविस वर्षांच्या दिर्घ प्रवासाला आता तिथं पुर्णविराम मिळणार आहे.... आमच्या जन्मगावी... आमच्या आबाच्या कुशीत!

गोदेssss कावूssss आबाsssss म्या येतिय रंssssss

_________________________________________________________

समाप्त.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म.. म्हणजे पेडणेकरच त्यांचा बाप असतो तर.
जिमिनीच्या हावेपाई सवताच्या लेकाचा संसार देशोधडीला लावला हाडळीनं. >> हे नाही कळालं. चंंद्रीने कमी किमतीत पेडणेकरला जमिन विकली पण तिचा मुलाचा संसार देशोधडीला कसा काय लागला?

छान झालीये. पण काहीशी अपूर्ण वाटली. त्या तिघी भेटल्या असत्या तर काय याची उत्सुकता वाटतेय.

खूप आवडली.

चैत्रगंधा यांनी म्हटल्याप्रमाणे 'चंंद्रीने कमी किमतीत पेडणेकरला जमिन विकली पण तिचा मुलाचा संसार देशोधडीला कसा काय लागला?' हे पण नाही समजले. पण त्यावाचून कथेला खीळ नाही बसली. पण त्या तिघी बहिणी एकत्र कशा येणार त्या मागचे कारण नीटसे कळले नाही. आबा त्या माणसाच्या रुपात येऊन त्यांना एकत्र आणतो असे असेल तर ती फारच paranormal activity झाली.

मस्त आहे
काही काही गोष्टी कळाल्या नाहीत पण. ही विद्रुप कशी होते?
शेवटी त्या खरच भेट्णार असतात का?
गोदेssss कावूssss आबाsssss म्या येतिय रंssssss <<<त्यात आबांच पन नाव घेतलय त्यामुळे त्या आधीच मेल्याची शंका येतेय
नलाक्काला वेड का लागते? गंगात्या तिच्या बरोबर जाण्याची परवानगी ह्या तोघींना कशी देते? आणि नलाक्का विहीरीत उडी मारण्यासाठी तिघींना घेउन जाते मग फक्त सुधालाच विहीरीत लोटते का?

मुग्धमानसी कथा फारच सुंदर आणि अलंकारीर भाषेत आहे .अर्थात तुम्ही कवियत्री आहात म्हणूनच अस सुंदर अलंकारिक लिहू शकलात .. .. इंदू जेव्हा आरशासमोर उभी राहते त्यानंतरच सर्व त्यातून होणार्या तिच्या संकेताचा उलगडा फारच ठराविक शब्दात आणि समर्पक असा मांडला आहे . कथा न थांबता वाचली मनापासून आवडली..
शुभेच्छा
Happy