गच्चीची थोरवी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 December, 2015 - 01:24

प्रत्येकाच्या घराची, इमारतीची किंवा एखाद्या बंगल्याचीही आवडती वास्तू म्हणजे गच्ची. पूर्वी फक्त बिल्डिंगला गच्ची असायची. पण आता दारात अंगण असले तरी टुमदार बंगले, घरे या सगळ्यांच्या माथ्यावर गच्ची आकाशाच्या छपराखाली नांदताना दिसते. ही गच्ची पाऊस झेलत, उन्हाचे चटके खात एखाद्या कर्त्या व्यक्ती प्रमाणे कर्ती वास्तूच म्हणा ना. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच ही गच्ची प्रिय स्थान असते.

अहो किती जबाबदार्‍या पार पाडते ही गच्ची. सूर्योदयापूर्वीच गच्चीचा दरवाजा उघडलेला असतो. गच्चीवरील मोकळ्या हवेत मॉर्निंग वॉक, व्यायामासह गच्चीच्या नित्य कार्याला सुरुवात होते. घरातल्या तान्ह्या बाळांना डी व्हिटामिनसाठी गच्ची कोवळ्या प्रकाशकिरणांनी उबेत घेते. कडक ऊन आलं की मात्र गच्चीला बरीच वाळवणाची काम असतात. घरातले कपडे वाळवणे, तसेच घरातली धान्ये मधून मधून वाळवणे, सगळेच वाळवण्याचे प्रकार घरातील गृहिणी गच्चीवरच करते. त्यामुळे गृहिणीसाठी गच्चीचे महत्त्वाचे स्थान म्हणजे स्वयंपाक घराच्या पाठोपाठ असते. ही वाळवण झाली की संध्याकाळी घरातील बाळगोपाळ मंडळी खेळासाठी गच्चीवर धावून येतात. गच्चीचा अगदी कोपरा नी कोपरा बाललीला, खेळांनी दणदणून जातो. अगदीच ऊन गेले की घरातील वृद्धांसाठी मोकळी हवा घेण्याचे गच्ची म्हणजे आधार स्थान.

बरं ही गच्ची फक्त माणसांनाच नाही तर निसर्गातील विविध घटकांनाही सामावून घेते. अनेक वृक्षप्रेमी आपल्या गच्चीत कुंड्यांमध्ये झाडे लावतात. हल्ली टेरेस गार्डनिंगही खूप प्रचलित झाले आहे. त्यामुळे बर्‍याच गच्चीत अगदी मोठ्या झाडांसकट हिरवाई पसरलेली दिसते. ह्या वृक्षांवर पक्षी बागडताना दिसतात. संपूर्ण इमारत, घर, बंगल्याला पाणी देणार्‍या पाण्याच्या टाकीचा भारही गच्ची समाधानाने पेलत असते.

सणसमारंभासाठी गच्ची समारंभगृहाची भूमिका बजावते. बरेचसे इमारतीचे सार्वजनिक कार्यक्रम गच्चीवर खेळीमेळीच्या वातावरणात साजरे केले जातात. घरातीलही काही लहान कार्यक्रम गच्चीवर साजरे केले जातात. गच्चीवर खेळणार्‍या हवेत पतंग उडविण्यात वेगळीच मजा असते. दिवाळीत गच्चीवर पणत्या लावल्या की खालून गच्चीत चांदण्या अवतरल्याचा भास होतो. ऊन, पाऊस, थंडी झेलणारी गच्ची काळोख्या रात्रीच्या चांदण्यात आणि पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात तेजोमय होत असते. कोजागिरी पौर्णिमा तर गच्चीसाठी खासच दिवस असतो. भला मोठा चंद्र गच्चीवरून एखाद्या कंदिलासारखा भासतो. दूध, खीर नैवेद्यासकट घरातील लहानांपासून थोरांपर्यंतची संपूर्ण कुटुंबाची वा सगळ्यांनाच सामावणारी पौर्णिमेची पार्टी गच्चीत साजरी होताना गच्ची सुखावून जाते.

(लोकसत्ता -वास्तुरंग पुरवणीमध्ये दिनांक १२/१२/२०१५ रोजी प्रकाशीत)

हा झाला लेख. पण आपल्या सगळ्यांचे अनेक किस्से वा अनुभव असतील गच्चीसोबत ते नक्की शेअर करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल वाचलेला हा लेख. इथे अगदी इलुसाच दिसतोय.

आमचा गच्चीशी संबंध फक्त टीव्हीसाठीची अँटेना लावून घेण्यापुरताच येतो.एलायसीने केलेल्या डिझाइनमुळे गच्चीवर जायला थेट जिना नसून शेवटच्या मजल्यावरून एक लोखंडी निमुळती सरळसोट उभी शिडी आहे. तिला कुलुप असतं Sad

खरंच.. गच्ची,,हातात पुस्तक्,आनि कॉफीचा मग,,आनि समोर होणारा सुर्यास्त.
छान लिहले आहे.खुप आठवणी जाग्या झाल्या.

छान लेख.
माझ्याही आठवणी जाग्या झाल्या. गच्चीवर च अभ्यास करायचे अगदी लास्ट इयर पर्यंत.. शिवाय मैत्रिणी आल्यावर गच्चीवर गप्पा. धमाल करायचो आम्ही..

गच्चीचा आम्हीही खूप उपभोग घेतलाय. हिवाल्यात कोवल्या उन्हात बसणे, कण्से भाजून खाणे, रविवारी केस वाळविणे. उन्हाळ्यातली वाळवणांची राख्ण ( ती करता करता आपले कमिशन थोडे थोडे खाऊन वसूल करणे), माकडे आली की घाबरून खाली पळत सुटणे, बाळांना वर कोवळ्या उन्हात नेणे, संध्याकाळी शेंगा-बिंगा वर बसून निवडणे, उन्हाळ्यात रात्री झोपने - चांदन्यात.. वा वा जागुली, अनेक आठवणी जागवल्यास ग. Happy

छान लेख !
माझं बालपण गिरगांवातल्या चाळीत गेलं. मोकळा श्वास घेण्याचंच एकमेव ठीकाण नव्हे तर मित्रांबरोबर मोकळ्या गप्पा मारण्याचं, झोपण्याचं , झोपेत मधेच उठून सोमणानी नवशक्तीत दिलेल्या 'आकाशदर्शना'च्या टीप्सनुसार ग्रह, तारे वागताहेत कीं नाही हें ताडून पहाण्यचंही आमचं ठीकाण म्हणजे गच्ची ! गच्चीची व आमची गट्टी दृष्ट लागावी अशीच होती !

सुंदर लेख, मालाडला गच्ची म्हणजे आमचे अंगण होते. कितीतरी खेळ रंगायचे तिथे. उन्हाळ्यात रात्री झोपतही असू तिथे.
आता मात्र बहुतेक गच्च्या कुलुपबंदच असतात !

जागू मस्त लिहीलयस. आमच्या पुण्याच्या घराला लागुनच एक छोटीसी गच्ची आहे. आणि ती गच्ची त्या घरातला सर्वात आवडता भाग आहे. सकाळ संध्याकाळ आणि रात्री आमचा मुकाम गच्चीतच असतो. दुपारी नाईलाजाने घरात येतो. एकवेळ घर नसल तरी चालेल पण गच्ची किंवा गेला बाजार बाल्कनी तरी हवीच ( स्मित)

मस्त.. Happy
गच्ची म्हणजे पतंगबाजी..
गच्ची म्हणजे बॉक्स क्रिकेट..
गच्ची म्हणजे दिवाळीतील रॉकेट..
गच्ची म्हणजे मोकळ्या हवेतील व्यायामशाळा..
गच्ची म्हणजे रात्रीच्या गप्पा..
गच्ची म्हणजे शेजारच्या गच्चीशी नेत्रपल्लवी करायची जागा.. Happy

छान लेख.

गच्चीचा आनंद फार काही घेता आला नाही, श्रीरामपुरला थोडा घेता आला. मालक खाली रहायचे. आम्ही पहिल्या मजल्यावर आणि आमच्यावर गच्ची. बाकी आधी कौलारु चाळ आणि नंतर सोसायटीत राहील्याने गच्ची असली, तरी आम्ही पहिल्या मजल्यावर रहातो आणि गच्ची चौथ्या मजल्यावर, कोण जाणार एवढे रोज. नालासोपा-याला मात्र दोन मजली बिल्डींग आणि ९ विंगची सोसायटी आणि सर्व विंगच्या गच्च्या जोडलेल्या पण कुलुपं सर्वांना :(, काहीजण पाणी जाऊन सोडायचे आणि पाण्याचा त्रास होता म्हणून. पण कोजागिरी गच्चीवर व्ह्यायची, तेव्हा मजा यायची, इथे पाच विंग्ज पण गच्च्या वेगवेगळ्या. पण खाली आमच्या सोसायटीत खुप छान मोकळी जागा असल्याने कोजागिरी खालीच होते, वाळवणं पण खालीच घातली जातात, मोठं अंगण कसं तसा उपयोग, मुलांचे खेळ, गाड्यांना जागा सर्व छान खालीच आहे. Happy

पण मला आवडते गच्ची.

सगळ्यांचे अनुभव आवडले.

आमच्या जुन्या घराला गच्चीच नव्हती. कौलारू घर होते १ मजल्याचे. खुप इच्छा होती गच्ची असावी घराला.
लग्न झाल्यावर मात्र नविन घराला गच्ची बांधली. आता त्यावर वाळवण, शतपावली, आमची कोजागिरी, मुलींचे खेळ, रात्रीचे तारे सगळ पाहील जात. काल उल्का पडतानाही तिथूनच पाहील्या. ४ पाहिल्या नंतर डास त्रास देऊ लागले.

मस्त मस्त!
धुळ्याला असताना उन्हाळ्यात गच्चीत झोपायचो. रात्रीच्या वेळी दुरवरुन लग्नाच्या वरातीचा बॅन्ड्चा आवाज, कुठे 'गोन्धळ- जागरणा'चा आवाज, पडल्या पडल्या केलेले चान्दण्यान्चे निरिक्षण (रात्रीच्या वेगवेग्ळ्या प्रहरी सप्तर्षीन्ची जागा बदलते ते पहाय्च., आभाळात एक ७-८ तार्‍यान्चा एक पुन्जका असतो त्याला तिकडे 'चोरखाटले' म्हणत.) पहाटे मुल्लाची बान्ग, जवळच मार्केट यार्ड होत...तिथुन येणारी माईकवरची अनाउन्समेन्ट, हे सगळ सगळ आठवले!

आता इथेही पुण्यात गच्ची ठेवलीये. वास्तुशान्ती, बारसे, लहान मुलान्चे कार्यक्रम, १५-२० नातलग जमले की गच्चीत बसुन पहाटेपर्यन्त अन्ताक्षरी चालते. उन्हाळ्यात मच्छरदाण्या लावुन झोपतो.
वाळवण करायला सोप्पे म्हणुन नळही काढलाय. हिवाळ्यातल्या थन्डीत रात्री गच्चीत तीन विटान्ची चुल मान्डुन कधी गरमागरम खिचडी ... तर कधी गावराणी कोम्बडी शिजते. Lol

आम्ही २५ वर्षे ज्या घरात राहिलो ते घर म्हणजे एच ए एल कॉलोनी च क्वार्टर होतं. आमच्या पहिल्या मजल्यावरच्या घराला लागून घराएव्हढीच गच्ची होती. खुप खुप उपभोग घेतला आम्ही त्या गच्चीचा. काही आठवणी:
१. उन्हाळ्यातील वाळवण.
२. संध्याकाळी वार्षिक परीक्षेचा अभ्यास.
३. उन्हाळ्यात झोपणे. आम्हीच नव्हे तर खाली रहाणारे कुटुंब देखील आमच्याकडे गच्चीत झोपायला यायचे.
४. उन्हाळ्यात रोजची संध्याकाळची जेवण आणि कधी कधी अंगतपंगत.
५. तिथेच आम्ही छोटीशी बाग़ पण केली होती.
६. रात्री उशीरापर्यन्त बाबा रेडियो ऐकायचे. ती गाणी आजही लागली तरी गच्ची आठवते.
७.मोठ झाल्यावर मित्र मैत्रिणी सोबत मारलेल्या गप्पा.
८. पाण्याची साठवण.
९. उन्हाळ्यात गच्छीखालचे घर खुप तापायचे. तिथे रहाणाऱ्या कुटुंबाला गार वाटावे म्हणून आम्ही आणि त्यांची मुले गच्चीत पानी मारायचो. कधी कधी पाणी भरून ठेवायचो. मग त्या पाण्यात खेळणे.
१०. काकुंकडे किंवा आमच्याकडे अचानक पाहुणे आल्यास आई आणि काकुंचे crises management गच्चीतून व्हायचे. Lol
११.सगळ्यात अविस्मरणीय आठवण म्हणजे गच्चीच्या भोवताली असलेली हिरवीगारी झाडे - अम्बा, नारळ, केळ, सीताफल, पपई, काजू ही झाडे गच्चीभवती होती! आमच्या बिल्डिंग समोर कधीच घरे बांधली गेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात गच्चीत उभ राहील की समोर लांबच लांब पसरलेली हिरवळ!!!!

१२. आमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये एक जण रहायचे त्यांचे शेत होते. ते त्यांचा शेतमाल (गहू, हरबरा) आमच्या गच्चीत उन दाखवायला टाकायचे. त्यामुळे काही दिवस आमचे घर म्हणजे शेतकऱ्यांच्या घरासारखेहोऊन जायचे.

मुंबईचे नातेवाईक आमच्याकडे २ दिवस आले असतील तर ते हमखास ४ दिवसांनी जायचे :ड