द ओल्ड लेडी ऑफ थ्रेड्नीडल स्ट्रीट ( बॅंक आॅफ इंग्लंड )

Submitted by मनीमोहोर on 4 November, 2015 - 03:19

नावात ओल्ड लेडी आहे म्हणून इग्नोर नका करु ( स्मित) . खूप इंटरेस्टिंग आहे. वाचा पुढे, मजा येईल. हे टोपण नाव आहे तीनशे वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या जगातल्या सर्वात पहिल्या मध्यवर्ती बँकेचं, ( सेंट्रल बँक ) बँक ऑफ इंग्लंडचं. आपली जशी रिझर्व बँक आहे तशी इंग्लडची ही. पण आपली आहे यंग लेडी, अवघे ऐंशी वयमान.

साल १६९४ . म्हणजे बघा साधारण शिवाजी महाराजांच्या थोडासा नंतरचा काळ. इंग्लंडचा राजा तिस-या विल्यमचा फ्रान्स ने दारूण पराभव केला. आपल नौदल सुधारलं तरच भविष्यात आपला निभाव लागेल असं राजाला वाटलं. पण त्यासाठी खूप मोठ्या रकमेची गरज होती. राजा कडे एवढा पैसा नव्हता आणि कर्जाऊ रक्कम मिळवण्या एवढी बाजारात पत ही नव्हती त्याची. म्हणुन ही बँक स्थापन करायचं निश्चित केलं गेलं . खाजगी भागधारकांच्या ह्या बँकेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या चार आठवड्यात हवी असणारी रक्कम जमा झाली. भागधारकांना आठ टक्के लाभांश देण्याचे निश्चित केले. ही बँक सरकारची बँक झाली. राजाने ( सरकारने) बँकेला सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात चलनी नोटा इश्यु करण्याचे अधिकार दिले. बँकेने राजाला अर्थसहाय दिले. त्याच्या मदतीने राजाने नौदल सक्षम केले. अनुषंगाने शेती आणि उद्योगधंद्यांची भरभराट झाली. इंग्लंड बलशाली बनले. सरकारची बँक, आर्थिक विकासाला चालना आणि चलनी नोटांचे वितरण या आधुनिक काळातल्या मध्यवर्ती बँकेच्या कार्याची बीजं इंग्लंड मध्ये सतरा क्लार्क आणि दोन चपराशानी सुरु झालेल्या ह्या बँकेने अशा तर्‍हेने जवळजवळ सव्वा तीनशे वर्षांपूर्वीच रोवली.

ही बँकेची इमारत

From mayboli

सोन्याच्या किंवा चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात त्याकाळी ज्या नोटा इश्यु केल्या जात ती प्रत्येक नोट हातांनी लिहीलेली असे. आणि ती वर कॅशिअर सही करत असे. त्या काळात सर्वात लहान नोट होती पन्नास पौंडाची . पण तेव्हा तिथल्या जनतेच सर्वसाधारण वार्षिक उत्पन्न होत फक्त वीस पौंड. त्यामुळे कित्येक लोकांना उभ्या आयुष्यात एकदा ही नोट हाताळायला ही मिळत नसे. एकदा तरी नोट हाताळायला तरी मिळावी हे सामान्य जनतेचं स्वप्न स्वप्नच रहात असे कित्येकदा.

मग नंतरच्या काळात अंशतः छापील नोटा आल्या आणि सन 1744 साली पहिली शंभर टक्के छापील नोट बाजारात आली. कालांतराने गरजेनुसार त्यात अनेक बदल होऊन आपण आजच्या आधुनिक चलनी नोटेपर्यंत येऊन पोचलो आहोत. त्या काळात चलनी नोटा बँक ऑफ इंग्लंड बरोबर इतर बँकाही इश्यू करत असत पण हळूहळू इतर बँकांचे नोट्स इश्यु करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आणि नोट्स इश्यु करणे ही बँक ऑफ इंग्लंडची मक्तेदारी झाली.

लंडनच्या सिटी ऑफ लंडन ह्या प्रभागामध्ये सन १७३४ पासून ह्या बँकेचे मुख्य कार्यालय आहे आणि हा सगळा परिसर ही बँक म्हणूनच ओळखला जातो. इथे बँक नावाच एक खूप मोठ ट्युब स्टेशन ही आहे. ही बँकेची इमारत एखाद्या गढीसारखी आहे. हिच्या चारही बाजूला ठराविक अंतरावर मोठ्या मोठ्या रुंद खांबाची तटबंदी आहे आणि हिला रस्त्यावर उघडणारी एक ही खिडकी नाही. इमारतीच्या चारही बाजूना प्रत्येकी एक असे आपल्याकडे किल्ल्याला असतात तसे बुलंद दरवाजे आहेत. त्यामुळे बाहेरून आत काय असेल याची जरा ही कल्पना येत नाही. आत बँकेच सात मजली कार्यालय आहे. विशेष इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथल्या व्हाॅल्ट मध्ये इंग्लंड़चं आणि इतर काही देशांच सुमारे 4700 टन सोनं बारच्या रुपात सुरक्षित आहे. एखाद्या माॅल मधे चाॅकलेटचे बार ठेवावेत तसे प्रत्येकी 12. 4 किलो वजनाचे हे बार शेल्फवर विराजमान आहेत. सुरक्षेच्या कारणासाठी ह्या व्हॉल्टचे कर्मचारी कोण आहेत ह्याची ही गुप्तता राखली जाते. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा इथे तैनात आहे. एक मजेशीर गोष्ट म्हणजे ह्या व्हॉल्टच्या चाव्या सुमारे तीन फुट लांब आहेत. लंडनच्या एका अतिशय गजबजलेल्या भागात ह्या इमारतीच्या तळघरात ही एक अतिशय अवाढव्य अशी सोन्याची खाणच आहे म्हणा ना ! तुलने साठी सांगते की भारता कडे आहे फक्त ( ? ) ५५७ टन सोनं. आपणा पैकी काही ना आठवत ही असेल की १९९१ च्या आर्थिक आणीबाणीत परकीय चलन मिळवण्यासाठी आपण ही आपलं सुमारे ४० टन सोनं बँक ऑफ इंग्लंड कडे तारण ठेवल होतं.

मध्यंतरी लंडनला जाण्याचा योग आला . सिटी ऑफ लंडन ह्या लंडनच्या भागात फिरायला खूप छान वाटत. एकदा असेच बँक परिसरात फिरत असताना ह्या बँकेचं म्युझियम आहे असं नकाशावर दिसलं. मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात एकुणच खूप रस असल्याने पावल आपोआपच तिकडे वळली. सोने पे सुहागा म्हणजे ते विनामूल्य बघता येत होत. हे म्यूझियम खूप छान आहे. बँकेच्या स्थापनेचा इतिहास, इमारतीचा इतिहास, अगदी जुन्या काळची नाणी, पहिल्या कागदी चलनी नोटा, पहिल्या सेक्रेटरीचं हस्त लिखित, नोटांच डिझाईन कसं ठरवलं जात त्याचे नमुने, अवैध नोटा छापण कठीण करणार डिझाईनच कसं तयार केल जातं त्याचे नमुने, नोटा एका ठिकाणाहुन दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी पूर्वी वापरण्यात येणार्‍या लाकडी पेट्या, नोटा छापण्याचं पुरातन मशीन, आभासी गोल्ड व्हाॅल्ट मध्ये काढता येणारा सेल्फी, बँकेची कामं , देशाच्या विकासात बँकेची भुमिका असं सगळं अतिशय रंजक रीतीने सादर केलं गेलं आहे. इथल आणखी एक आकर्षण म्हणजे खर्‍या सोन्याच्या १२. ४ किलो वजनाच्या बारला आपण तिथे स्पर्श करु शकतो आणि आपली ताकद असेल तर उचलून ही बघु शकतो. हं... पण फक्त उचलताच येतो, उचलेगिरी नाही करता येत. ( स्मित ) तो बार परत तिथेच ठेवावा लागतो.... तो घरी ही न्यायला दिला असता तर किती मजा आली असती. !!! ( स्मित) लंडन मध्ये असणार्‍या मायबोलीकरांनी हे म्युझियम अजुन पर्यंत बघितलं नसल्यास जरुर बघाव.

गोल्ड व्हॉल्ट

From mayboli

ही बँक लंडनच्या ज्या सिटी ऑफ लंडन भागामध्ये आहे तो लंडनचा एक सर्वात जुना भाग आहे. लोकं ह्याला लाडानी नुसत सिटी सुद्धा म्हणतात. ह्याचं क्षेत्रफळ आहे फक्त १. २ चौरस मैल म्हणून ह्याला स्वेअर माईल असं ही संबोधल जातं पण लंडनच्या आणि पर्यायाने जगाच्या आर्थिक उलाढालीच हे केंद्र आहे. सर्व बँकांची कार्यालये, विमा कंपन्यांची मुख्यालये, विख्यात कंपन्यांची मु़ख्यालये ह्या परिसरात एकवटली आहेत. इथले रहिवाशी आहेत फक्त ८००० आणि सुमारे तीन लाख लो़क इथे दररोज कामासाठी येतात. त्यामुळे ऑफिसच्या दिवशी हा भाग खूप गजबजलेला असतो आणि शनिवार रविवार मात्र अगदी सुन्सान. भाग जुना असल्याने इथले रस्ते म्हणजे अगदी बोळकंडी सारखे आहेत. पण विश्वविख्यात कंपन्यांच्या मु़ख्यालयांमुळे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. इमारती ही जुन्याच तरी ही शानदार आहेत. त्यामुळे हा भाग फिरायला खूप छान आहे.

इथल्या रस्त्यांची नाव मात्र परंपरा प्रिय लंडनकरांनी रोमन काळात होती तीच अजून ही राखली आहेत. बहुतेक रस्त्यांना रोमन काळात चालणार्या अॅक्टेविटी वरुनच नाव मिळाली आहेत. जसं की पुडिंग लेन, मिल्क स्ट्रीट, पोल्ट्री, ब्रेड स्ट्रीट, ब्रिक लेन , चिपसाईड ( म्हणजे मार्केट प्लेस)... अशा नावांच्या रस्त्यांवर प्रसिद्ध कंपन्यांची ऑफिसं, मोठी मोठी रेस्टॉरंट्स, प्रसिद्ध दुकान पाहण खूप मजेशीर वाटत. एक गटर लेन नावाची लेन ही पाहिली मी सिटीत. ( स्मित)

सिटीतल्या थ्रेड्नीडल स्ट्रीट नावाच्या स्ट्रीटवर ही बँक आहे. पूर्वी इथे एका मर्चंट टेलरिंग कंपनीचं कार्यालय होतं म्हणून ह्या रस्त्याला हे नाव पडलं आहे असं म्हणतात. . तर झालं काय , १७९४ साली फ्रांस बरोबर झालेल्या युद्धात इंग्लंडचा खजिना रिकामा झाला होता. सरकारची कर्जे बेसुमार वाढली होती. म्हणून सरकारने नोटेच्या बदल्यात सोन्याची नाणी बँकेने वितरीत करु नयेत असा फतवा काढला. विरोधी पक्षांना हे मान्य नव्हते. पार्लमेंट मध्ये यावर जोरदार चर्चा सुरु होती. चर्चेच्या ओघात एका सभासदाने बँक ऑफ इंग्लंडचा उल्लेख दॅट ओल्ड लेडी ओफ थ्रेड्नीडल स्ट्रीट असा केला. दुसर्‍या दिवशी जेम्स गिलरी ह्या प्रसिद्ध व्यंगचित्रकाराचे खाली दिलेले चित्र पेपरात छापले गेले तेंव्हा पासून बँक ऑफ इंग्लंडला ओल्ड लेडी ओफ थ्रेडनीडल स्ट्रीट हे नाव जे चिकटले ते अगदी आजपर्यंत.

Catroon
From Drop Box

हे कार्टून नीट बघा आणि रस वाटला तर नेट वर आणखी माहिती शोधा. खूप रंजक माहिती मिळेल. इथे लेख लांबेल म्हणून तो मोह टाळतेय.
प्रतिसाद बघुन कार्टुन विषयी लिहीतेय थोडे ते असे.
ती म्हातारी आहे बँक ऑफ इंग्लंड. . ती बसली आहे बँक ऑफ इंग्लंडच्या खजिन्याच्या पेटीवर पण पेटीला डबल लॉक आहे. म्हणजे बँकेचा खजिना खुला होण्याची सुतराम शक्यता नाही. तिने घातलेला झगा एक पौंडाच्या नोटेचा आहे आहे कारण तेव्हा प्रथमच लहान मूल्याच्या म्हणजे एक पौंडाच्या नोटा नाईलाजाने छापाव्या लागल्या होत्या. तो निळा ड्रेस घातलेला इंग्लंडचा त्या वेळचा पंतप्रधान आहे. तो तिच्या खिशातुन सोन्याची नाणी काढायचा प्रयत्न करतो आहे कारण त्याला तेव्हा पैशाची फार गरज होती. पण ओल्ड लेडीने तर हात वर केले आहेत .
रच्याकने, आपल्याकडे ही मुंबईला रिझर्व बँकेचं असच करन्सी म्युझियम आहे ते पण खूप छान आहे जमल्यास लहान मुलांना जरुर दाखवावे.

माहिती : नेट वरुन फोटो २ आणि ३ नेट वरुन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुंदर माहिती!!!
ते सोन्याचे बार असे उघडे ठेवले आहेत त्याला काही सुरक्षा नाही का?

पणा पैकी काही ना आठवत ही असेल की १९९१ च्या आर्थिक आणीबाणीत परकीय चलन मिळवण्यासाठी आपण ही आपल सुमारे ४० टन सोनं बँक ऑफ इंग्लंड कडे तारण ठेवल होत.>>१९७४ ना?

लंडनचे हे सोने लुटमार करुन गोळा केलेले आहे. ब्रिटिशांनी कितीतरी देशांवर राज्य केले आहे. भारतातून हिरे माणके सोने चांदी ह्यांनी कितीतरी प्रमाणात लुटले आहे.

धन्यवाद प्रतिसादाबद्दल सर्वाना.

बी तो गोल्ड व्हॉल्ट मधला नेट वरुन घेतलेला फोटो आहे. व्हॉल्ट मधे सोनं असं शेल्फ वर ठवल गेल आहे पण व्हॉल्ट कड्या सुरक्षेतच आहेत आणि असायलाच हवेत. english मधे " as safe as bank vault " अशी फ्रेज ही आहे.
बी, १९७४ सालची राजकीय आणीबाणी. आणि १९९१ ची आर्थिक आणीबाणी.

बी, १९९१ मध्येच सोने फिजिकली तिकडे नेले होते. >> अगदी बरोबर.

इंग्रजांनी केलेली लूट मार हा या लेखाचा विषयच नाहीये. बँक ऑफ इंग्लंड बद्दल थोडी रंजक माहिती सांगणे एवढच अभिप्रेत आहे.

मुंबईला रिझर्व बँकेच असच करंसी म्युझियम कुठे आहे >>> सर पी. एम रोडवर फोर्ट भागात आहे. आपलं म्यूझियम ही विनामूल्य बघता येत. सोमवारी बंद असत मात्र.

ओळखंच कारण या विषयाचा आवाकाच प्रचंड आहे स्मित >> मित अगदी बरोबर. याचा आवाका प्रचंड आहे.

सुंदर लेख मनीमोहोर. रोचक माहिती, इतिहास आणि ललित सगळ्याचा तोल मस्त संभाळला आहे लेखात.

सिटी भाग पाई फिरायला खूप मस्त आहे. विशेषतः रविवारी. अगदी निवांत रस्ते असतात.

इंग्रजांना त्यांनी बँकिंग, करन्सी इत्यादीची सुरुवात केली असा एक अभिमान असतो. शिवाय आपल्याकडे हुशार मुले डॉक्टर वगैरे होतात तसे आईबाप मुलांनी 'फायनान्स - बँकिंग' मधली करियर घ्यावी अश्या विचाराचे असतात.

ऐ मस्तं गं.. मज्जा आली वाचायला,कितीतरी नवीन माहिती सांगितलीस.. व्वाह!!!!
३०० वर्षापूर्वी बँकेची कल्पना सुचून ती प्रत्यक्षात आणणं, टू इंप्रेसिंग!!!

ते गोल्ड वॉल्ट मीना प्रभूने प्रत्यक्ष पाहायचं सुख घेतलंय , तिने जसं वर्णन केलं त्याप्रमाणे ते वॉल्ट ,'क्या चीज है'..भारी!!! असं वाटलेलं..

Pages