युरुगुचे पुस्तक : भाग ८

Submitted by पायस on 23 June, 2015 - 18:38

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/54284

" तू कोण आहेस? त्वम् कः असि? दारे देसु का? हू आर यू? कि एत् व्हू? नॉर झारा? तुझी भाषा कोणती याने काय फरक पडतो? तू हे वाचू शकत आहेस म्हणजे तू या जगातून एक पाऊल बाहेर टाकले आहेस. आत्ताच्या आत्ता तुला कित्येक भाषा वाचता आल्या, कित्येक वेगवेगळ्या शक्यता अनुभवून बघितल्या आहेस. या जगात तू सर्वांपेक्षा वेगळा आहेस आणि हे निश्चित आहे. इथे मात्र तुझ्यासाठी अनंत शक्यता आहेत. अखेरचा निर्णय तुझा आहे; या अनंत शक्यतांनी भरलेल्या जगात यायचे कि याच जगात राहायचे. पण जर तू होकार दिलास तर तुला युरुगुच्या परिक्षेस सामोरे जावे लागेल. जर तू पास झालास तर या अनंत शक्यतांच्या जगात तुझे स्वागत आहे."
- उतारा, युरुगुचे पुस्तक

*******

ला आणि नोम्मोची हकिगत सांगून झाली होती. त्याला बंदिवान ठेवणे ला आणि नोम्मोच्या क्षमतेच्या बाहेरचे होते. पण आता त्यालाच या सर्व गोष्टींमध्ये रस निर्माण झाला होता. त्यामुळे त्याने त्या दोघांना आपल्या गुप्त स्थानावर नेले. ती एक छोटीशी बंगली होती. तिथे त्याने सर्व ऐकून घेतल्यावर ला आणि नोम्मो ला सहकार्य देण्याची तयारी दर्शविली पण अर्थातच त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळेच शिजत होते. ला आणि नोम्मोची तिथे राहायची सोय करून तो बाहेरच्या खोलीत विचार करत बसला. बाहेर जोरात पाऊस पडत होता. त्याचे सहजच काचेच्या तावदानातून बाहेर लक्ष गेले. वीज चमकली आणि ढगाचा गडगडाट झाला. पावसाचे दोन थेंब अलगद त्या तावदानावर पडले आणि खाली धावू लागले.
********

कुणाल व बुसुली त्या इमारतीपाशी पोहोचले. "इथेच?" बुसुलीने विचारले. कुणालने पुन्हा एकदा मोदिबोने दिलेला नकाशा पाहिला. त्यावरच्या खुणा आणि गूगल मॅप्सवरचा नकाशा या इमारतीकडे इशारा करत होता.
"एक मिनिट आपण कन्फर्म करुयात."
कुणालला काय वाटले कुणास ठाऊक पण त्याने सरळ कोपर्‍यावरची चहाची टपरी गाठली. गांधीजींचे चेहरे सर्वांना नाही तरी बर्‍याच जणांना बोलते करतात. त्या चहावाल्याने जेवढे माहित होते तेवढे घडाघडा सांगितले. कुणाल बुसुलीकडे आला व म्हणाला
"खून इथे नाही झालेला पण या चाळीचा मालक त्याच्या जवळच असलेल्या दुसर्‍या घरात मेलेला सापडला. त्याची जीभ आत वळवलेली होती. श्वास कोंडल्यामुळे त्याचा मृत्यु झाला. अखेरचा त्याला इथेच पाहिले गेले; तो वरच्या खोलीत भाडं वसूल करायला आला होता."
कुणालने सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या त्या एकांड्या खोलीकडे बोट दाखवले. जणू गच्चीवर शेड उभारल्या सारखी ती एकच खोली होती.
"चल तर मग." असे म्हणत बुसुली त्या इमारतीच्या आत शिरला.
********

काळ जणू जडवत् झाला होता. त्या तिघांकडे कोणीच लक्ष देत नव्हते. नक्की काय झालंय? ते तसेच चालत सर्वात वरच्या मजल्यावर पोहोचले. दरवाजा आधीच उघडलेला होता. श्श.... दोघांनीही आपापली पिस्तूले तयार ठेवली आणि ३.........२............१..........
"हॅन्ड्स अप!!" आतमध्ये दोनजण होते. त्यांनी शांतपणे हात वर करून आपली तोंडे दरवाज्याकडे केली. त्यातल्या तरुणाला पाहून प्रज्ञा चित्कारली
"कुणाल तू? तू इकडे कसा?"
*******

तावदानावरचे दोन थेंब आता दोन धारा बनल्या होत्या. तिरक्या रेषेत वाहत त्या दोन्ही धारा एकत्र झाल्या.
~*~*~*~*~*~

एक दिवस आधी

रिपोर्टरने त्या आंधळ्याविषयी शिंद्यांकडून अधिक माहिती मिळाल्यावर त्याला शोधायला अजिबात वेळ लावला नाही. लवकरच तो आंधळा त्या तिघांसमोर होता. प्रज्ञाला फक्त अनिरुद्धच्या खूनात रस होता तर जाधव आणि शिंदे यांना मुंबईतल्या इतर रहस्यमयी खुनांविषयी जाणून घेण्यात, खासकरून त्या जॉनीविषयी जाणून घेण्यात अधिक रस होता. शिंद्यांनी एक सेल त्याच्यासाठी मॅनेज केली होती. तो आत एका खुर्चीवर बसला होता. एक ठेवणीतला काळा गॉगल त्याच्या डोळ्यांवर होता, तो अंध असल्याची निशाणीच जणू!! याव्यतिरिक्त त्याच्या चेहर्‍यावर किंवा एकंदरीत पेहरावात नजरेत भरण्यासारखे काही नव्हते. गर्दीत सहज हरवून जाईल असा तो खुर्चीत शांतपणे बसला होता. जाधवांनी कोठडीत प्रवेश केला. त्याच्या समोर एक छोटेसे स्टूल होते. त्याच्यावर ते बसले. याला काय क्रमाने प्रश्न विचारावे याची त्यांनी क्षणभर मनाशी जुळवाजुळव केली.
"नाव?"
"काय फरक पडतो? सूरदास म्हणा हवे तर" तो कुत्सित हसत म्हणाला.
"कोणाच्या गँगमध्ये होता?"
"कोण्या एका गँगमध्ये नव्हतो. तरुणाईची रग अंगात होती. त्यामुळे बरा पैसा आणि थ्रिलवालं कोणतंपन काम अंगावर घ्यायचो. पण रसूलभाईची कामं जास्त प्रमाणात मिळायची."
"हं. पहिल्यापासून आंधळा नव्हतास म्हणजे. तुला कोणी आंधळा केलं?"
तो यावर काहीच बोलला नाही. जाधवांनी त्याला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. तो तरीही गप्प बसून राहिला.
"जॉनी हे नाव ऐकले आहेस कधी?"
"हो. रसूलभाईने त्याच्यावर नजर ठेवायचं काम माझ्यावर सोपवलं होतं."
"मग?"
"मी काम नीट पार पाडलं नाही. मग भाईपासून लपत छपत दिवस काढत होतो. भाईपण दुसर्‍याच कुठल्या कामात बिजी होते बहुतेक. त्यात मी ऐकलं कि जॉनी रसूलभाईला सापडला. मला वाटलं कि भाई आता आपल्या मागे नाही लागणार म्हणून जरा बाहेर दिसायला लागलो तर तुम्ही पकडलं."
"म्हणजे जॉनीवर नजर ठेवून असतानाच तुझ्या डोळ्यांना....... मग आता तरी सांगतोस कि नाही?"
प्रज्ञा थोडीशी अस्वस्थ होऊ लागली होती. अनिदादासोबत नक्की काय झालं हे तिला कळू शकत होते. मानसीला ती अखेरीस अनिदादाच्या खुनाचा पाठपुरावा करून रहस्य उकलल्याचं समाधान देऊ शकत होती. हे जॉनी जॉनी काय लावलंय? शिंद्यांना तिच्या मनस्थितीची कल्पना आली. त्यांनी तिला डोळ्यांनीच दाबले.
"हे बघ तुला जे काही घडलं ते सांगावे लागणार आहेच. तुझ्यावर आम्ही कुठलाही चार्ज अजून लावलेला नाही. जर तू आमची मदत केली......."
"तुम्ही कधी सैतान पाहिला आहे?"
हा प्रश्न इतका अचानक आला कि काही सेकंद सगळेच दचकले. जाधवांनी सावरून काही बोलण्याचा यत्न केला पण तेवढ्यात तोच पुढे बोलू लागला.
"मला तुमच्यापासून त्या रात्री काय घडले, मी काय पाहिले आणि इतर माहिती लपवायची अजिबात इच्छा नाही. तुम्हा सर्वांपेक्षा मला जास्त स्पष्टपणे ठाऊक आहे कि आपण सर्व किती धोकादायक परिस्थितीत अडकलो आहोत. या सर्वाचा संबंध कदाचित जॉनीशी असेलही पण माझे डोळे फोडणारा जॉनी नाही. तो जो कोण आहे त्याला तुम्हाला शोधून काढावे लागेल. असो तर त्या रात्री...........
................
.................
मला जॉनीवर लक्ष ठेवण्याचे काम नव्यानेच मिळाले होते. मी पूर्वी त्याच्याशी भांडलो होतो. थोडी बहुत हाणामारी झाली होती. जुगार्‍यांमध्ये काही सणकी जुगारी असतात ना जे फक्त नशीबावर विश्वास ठेवून खेळतात! हा जॉनी तसला जुगारी आहे. पूर्वी काहीतरी नोकरी करायचा बहुतेक; पण प्रचंड उधारी डोक्यावर घेऊन जगणार्‍या माणसाची नोकरी गेली असेल तर मला तरी आश्चर्य नाही वाटणार. असो तर अशा माणसावर लक्ष ठेवायचं काम मला मिळालं होतं. दोनच दिवसात माझी वाट लागणार आहे असं तेव्हा मला कोणी सांगितलं असतं तर मी त्याला उडवून लावले असते. त्या रात्री जॉनी परत कोणाशी तरी भांडला होता. यावेळेस फरक इतकाच होता कि जॉनी जिंकला होता आणि त्याच्या समोरच्याला जॉनीने चीटिंग केली आहे असे वाटत होते. हा समोरचा देखील बहुधा रसूलचाच माणूस होता. त्या एरियात तसेही जवळपास सगळेच छोटे लोक रसूलभाईचे ऐकतात त्यामुळे यावर जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही. जॉनीला कधी नव्हे तो राग आला आणि यावेळेस तो खरेच हमरातुमरीवर उतरला होता. नेहमी खरं तर तो इतका चिडत नाही. बहुधा एक प्युअर लक या विचारसरणीने खेळणारा जुगारी म्हणून त्याच्या इगोला धक्का बसला होता. मी त्याच्या पाठलाग त्या दिवशी घरापर्यंत करायचा हे आधीच ठरवून आलो होतो. बिग मिस्टेक! मी पाहिले कि जॉनी त्या माणसाचा पाठलाग करीत होता. तो मधूनच कोणाशीतरी बोलत होता, त्याचा राग व्यक्त करीत होता. स्वतःशीच बोलत असावा. महत्त्वाचे हे कि त्याने कोठून तरी एक पुस्तक काढले. साहेब शप्पथ घेऊन सांगतो कि मला तरी ते हवेतून काढल्यासारखे वाटले. ते त्याने अत्यंत चतुराईने त्या दुसर्‍या जुगार्‍याच्या हाती लागेल अशी व्यवस्था केली. नंतर त्या जुगार्‍याला एक दुसरा माणूस बाजूला घेऊन गेला. मी मात्र जॉनीचा पाठलाग चालू ठेवला पण च्यायला कसा काय कोण जाणे तो गल्ल्यांमध्ये नाहीसा झाला. मी चरफडत घरी जायला निघणार तोच मी तो भयंकर प्रकार पाहिला. कोण्या एकाला 'तो' फरफटत नेत होता. 'तो' कोण आहे हे माहित नाही पण तोच तुमच्या या केसची अंतिम कडी आहे. तो नक्की कुठल्याही गँगचा मेंबर नव्हता उलट कोणीतरी उच्चभ्रू वाटत होता. असा माणूस कुठल्याही किरकोळ गुंडाला मारण्यात उगाच वेळ घालवणार नाही. त्यामुळे नक्की 'तो' तुम्हाला हवा असलेला खूनी आहे. तो ज्याला फरफटत नेत होता तो असाच कोणीतरी होता. या शहराच्या गर्दीत असे खूपजण आहेत जे गायब झाले तर कोणाला काही फरक पडत नाही. भिकारी, किरकोळ गुंड ही त्यांची काही उदाहरणे. आधी मी थोडा गोंधळलो. हा अलिखित नियम आहे कि जर तुम्हाला सर्व्हाईव करायचे असेल तर अशा भानगडीत पडू नये. पण उत्सुकतेने भल्या भल्यांना सोडले नाही तर मी कसा मागे राहीन? मी थोडासा पुढे जाऊन तो काय करतोय बघायचे ठरवले. एवीतेवी जॉनी गायब झालाच होता तर हा काय करतोय हे पाहायला काय हरकत आहे. त्याने थोडी पुढे उभी असलेल्या एका पांढर्‍या गाडीपर्यंत त्याला ओढत नेले. तिच्या डिकीत त्याला टाकले. 'तो' आता गाडीत बसून निघणार एवढ्यात साला माझ्याकडून चूक झाली. एक बाटली तिथेच जवळ पडली होती, तिला धक्का लागला. बास त्याचे लक्ष वेधले गेले आणि तो माझ्यामागे लागला. काहीतरी एक्स्ट्रॉची खुराक वगैरे बरळत होता. त्याने मला शेवटी गाठलेच आणि एक रुमाल माझ्या तोंडाला लावला. क्लोरोफॉर्म!! मी लगेच श्वास रोखून धरला. मी बेशुद्ध नाही झालो पण थोडा असर झालाच. पण तेवढ्यात त्याच्यावर कोणीतरी हल्ला केला. हा जॉनीशी भांडलेलाच व्यक्ति होता. पण आता तो स्वतःला गॅम्बल मॅन म्हणवत होता. 'त्या'ने आपले शस्त्र काढून अत्यंत थंडपणे सरळ पायांवर हल्ला केला. गॅम्बल मॅन लवकरच हतबल होता. मी 'तो' गॅम्बल मॅनमध्ये गुंतला आहे तोवर पळ काढण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीतरी चाकूसारखे फेकून मारले."
सूरदासाने गॉगल काढला. ते डोळे भयानक दिसत होते. जाधवांसारखा खंबीर माणूसही जरा डगमगला.
"मग?"
"मग काय मी पळून गेलो. जान सलामत तो आँख पचास! नंतर कळले कि गॅम्बल मॅन मारला गेला. दॅट्स इट! तुम्हाला या माणसाला शोधायचे आहे. जॉनीचा संबंध या खूनांशी अप्रत्यक्षरीत्या आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यामार्फत या खुन्यापर्यंत पोहोचू शकाल."
"तू त्याचे वर्णन नाही करू शकणार."
त्याने नकारार्थी मान हलविली. "मी त्याचा चेहरा नीट पाहिला नाही. तसेही पुष्कळ अंधार होता."
जाधवांनी बाहेर पाहिले. शिंदे व प्रज्ञा त्यांना अनिरुद्ध विषयी विचारयला खुणावत होते.
"आणखी एक! तुला माहिमच्या किल्ल्याजवळ देखील पाहिले होते. एका मुलाची अ‍ॅक्टिवा ..."
"हो. मी चोरली होती. मग मी रसूलभाईच्या गँगमधल्या एका पंटरला ती विकली. तो या सगळ्यात डील कर...... अच्छा म्हणजे तिकडून सापडलेलो दिसतो आहे. असो. तर?"
"त्या मुलाचे काय झाले?"
"मला नाही माहित! मी त्याला अ‍ॅक्टिवा किल्ल्यापाशी लावताना पाहिले. तो किल्ली अ‍ॅक्टिवालाच सोडून गेला होता, मग मी चोरली. हां त्या किल्ल्यात मी त्याच्याआधी एका जोडप्याला जाताना पाहिले होते. आणि ओह्ह...."
"काय?"
तो हसू लागला. बराच वेळ खदाखदा हसल्यानंतर तो परत बोलू लागला.
"म्हणजे मी या सगळ्यात एक महत्त्वाचा दुवा आहे आणि मला हे माहितच नाही. ऐका आता, त्या दिवशी जॉनी माहिमच्या किल्ल्याजवळच कुठेतरी होता हे मला पक्के ठाऊक आहे. किल्ल्यात जाणारे जोडपे आफ्रिकन होते. त्यांना शोधणे तुम्हाला फार जड जाऊ नये. त्या जोडप्यापैकी जो पुरुष होता तोच त्या दिवशी 'गॅम्बल मॅन' ला पुस्तक मिळाल्यावर बाजूच्या गल्लीत घेऊन नाहीसा झाला होता."
जाधव, शिंदे आणि प्रज्ञा त्यानंतर बाहेर पडले. जॉनीच्या घराचा पत्ता सूरदासाने त्यांना सांगितला होता. आता त्यांच्याकडे दोन-दोन धागे होते. जॉनी आणि ते आफ्रिकन जोडपे!!
~*~*~*~*~*~

मोदिबोच्या झोपडीत आता सर्व एकत्र बसले होते - प्रज्ञा, कुणाल, इन्स्पेक्टर जाधव, इन्स्पेक्टर शिंदे, बुसुली, डॉ. नाडकर्णी आणि मोदिबो स्वतः! डॉ. नाडकर्णींनी सर्वांच्या वतीने बोलण्यास सुरुवात केली
" माझ्या मते मी सर्वांची माहिती एकत्र करतो म्हणजे सर्वांचाच गोंधळ कमी होईल. यानंतर आपल्याला एकमेकांचे सहकार्य लागणार आहे. त्यामुळे हे करणे जरुरीचे आहे.

या सर्वाचा उगम डोगोन जमातीच्या काही विशिष्ट कबिल्यांमध्ये आहे. डोगोन जमात पश्चिम आफ्रिकेत विस्तीर्ण प्रदेशात पसरलेली आहे. माली, नायजेरिया इ. देशांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. त्यांच्याकडे एकप्रकारची अतिमानवी शक्ति आहे - युरुगुचे पुस्तक! मला माहित आहे कि आपल्यापैकी बुसुली आणि मोदिबो वगळता कोणीही त्या इलेगुआच्या दंतकथेवर विश्वास ठेवणार नाही. पण तुम्ही त्या आंधळ्याकडून ऐकलेच कि कसे त्या जॉनीने हवेतून पुस्तक काढले! इलेगुआने नक्की काय प्रक्रिया केल्या ते माहित नाही पण त्याने ही अतिमानवी शक्ती बनवली हे नक्की! इतिहासात काय झाले हे आत्ता जाणून घेण्यात काही अर्थ नाही, तेवढा वेळही नाही.

युरुगुचे पुस्तकाचे अस्तित्व ज्या कबिल्यांना माहित आहे ते आलटून पालटून त्याचे रक्षण करतात. मी जेव्हा आफ्रिकेत एका संपूर्ण कबिल्याचा नरसंहार पाहिला तो त्या कबिल्याकडे युरुगुचे पुस्तक आहे या समजूतीतून झाला असावा. काही महिन्यांपूर्वी बुसुलीच्या कबिल्यात ते पुस्तक होते. बुसुली त्यासाठीच्या रक्षक दलात आहे. ला आणि नोम्मो, जे तुम्ही म्हणत असलेले आफ्रिकन जोडपे असणार, त्याच कबिल्यात राहणारे दोन जण. नोम्मोने नुकतेच रक्षकदल जॉईन केले. ला एक महत्त्वाकांक्षी स्त्री आहे. तिचे हेतु अजूनही अज्ञात आहेत पण तिने नोम्मोच्या मदतीने ते पुस्तक चोरले. मग ते दोघे कबिल्यातून फरार झाले. बुसुलीने जंग जंग पछाडले पण ते सापडले नाहीत. मग सुदैवाने अनेक वर्षांपूर्वी इथे येऊन स्थायिक झालेल्या त्याच्याच कबिल्यातील मोदिबोने 'ला' ला पाहिले आणि तिने बुसुलीशी संपर्क साधला. ते दोघे बहुधा समुद्रमार्गे आले असावेत.

मुंबईत आल्या आल्या त्यांनी पहिली जी काही क्रिया केली ती माहिमच्या आसपास केली असावी असे मोदिबोचे हे यंत्र (सर्वांनी मान वळवून त्या यंत्राकडे पाहिले. एका भांड्यावर विशिष्ट आकृत्या काढलेल्या होत्या. त्यात एक मारलेली कोंबडा ठेवलेला होती व खाली ठेवलेल्या मुंबईच्या नकाशावर कोंबड्याच्या रक्ताचे ठिपके होते - इथे इथे युरुगुच्या पुस्तकाने बळी घेतले) सांगते. तुमच्या माहितीशी जुळवल्यावर अनिरुद्धचा दुर्दैवी मृत्युशी याचा संबंध असावा. पण नंतर त्यांच्याकडून ते पुस्तक हरवले असावे कारण होणारे मृत्यु अनियमित, एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी होऊ लागले. तसेच एकाही ठिकाणी ला व नोम्मो दोघांपैकी कोणीही दिसले नव्हते. काहीतरी गडबड होती खरी. पण पुस्तक मुंबईत आले हे निश्चित! कोल्हा, युरुगुचे प्रतिक दिसू लागला. अनेक रँडम घटना घडत आहेत. प्रज्ञा तू कुणालला म्हणाली होतीस कि अचानक तुझा रस्ताच उलटा झाला. तू बरोबर रस्त्यावरून जात असूनही प्रत्यक्षात तू उलटा प्रवास करत होतीस. आणि इन्स्पेक्टर तुम्ही! सामान्य परिस्थितीत तुम्ही अशा एखाद्या डिटेक्टिव वर विश्वास ठेवला असतात? तुम्ही माना वा मानू नका हा युरुगुच्या पुस्तकाचाच प्रभाव आहे!

आता जर आपण फॅक्ट्स जोडल्या तर मी म्हणेन कि ज्या दिवशी अनिरुद्धचा मृत्यु झाला त्या दिवशी जॉनीच्या हाती पुस्तक लागले. बाय अ स्ट्रोक ऑफ लक, जॉनी त्या पुस्तकाचा वापर करून त्याच्या प्रती बनवू शकतो. त्याचा वापर करून जॉनी आपल्या शत्रूंना ठार करतो. जॉनी हा गुंडामध्येच वावरत असल्याने मुख्यत्वे सर्व मृत्यु हे गुंडांचे झाले. तसेच वेडे झालेले गुंड युरुगुचे नाव घेत होते हे या गोष्टीला पुष्टी देते. त्यामुळे रहस्यमय मृत्युंच्या मालिकेत फक्त एकच मृत्यु हा एका सामान्य नागरिकाचा झाला, जॉनीच्या घरमालकाचा!"

"डॉक्टर खरे तर माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही तरी तुमची थिअरी घटकाभर मान्य करूयात. पण अजूनही एक प्रश्न उरतोच! 'तो' कोण आहे? 'तो' कडे तर नक्की अशी कुठली शक्ति पण नाही. एक खूनी मोकाट सुटला आहे हे नक्की आहे. त्याला थांबवणे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे." जाधव त्यांना थांबवत म्हणाले.

"एक्जॅक्टली याच गोष्टीचा फायदा जॉनी आणि 'त्या'ने उठवला आहे. एकावेळी मुंबईत दोन दोन सीरियल किलर फिरत आहेत. दोन वेगवेगळ्या मोडस ऑपरंडी असल्याने तुम्ही कनफ्युज झालात. तुम्ही 'तो' च्या मागे लागा ना, पण ला आणि नोम्मोला देखील शोधा."

"ते काम माझ्याकडे लागले. पण मी त्यांना अनिरुद्धच्या खूनासाठी शोधणार आहे." शिंदे उत्तरले.

इतका वेळ शांत असलेला बुसुली आता बोलू लागला
"हे बघा इन्स्पेक्टर तुम्ही प्लीज या बाबतीत निर्णय आज रात्री माहिमच्या किल्ल्यावर जे काही आपण पाहू, ते पाहून मग घ्या. तुमचा विश्वास नसेलही पण धिस थिंग इज फार मोअर डेंजरस दॅन एनि सीरियल किलर!"

"बुसुली आम्ही आत्ताच काही आश्वासन नाही देणार. पण मला सुद्धा आता तुझा हा प्रयोग बघायचा आहे. अर्थात मला आत्ता अधिक महत्त्वाचा वाटणारा प्रश्न आहे कि हा दुसरा खूनी का बरे खून करत असेल?"

"भूक भागवायला!" प्रज्ञा उत्तरली

तिने आपल्या हातातले वर्तमानपत्र मध्ये ठेवले. त्यात अजून एके ठिकाणी मानवी हाडे मिळाल्याची बातमी हायलाईट केली होती.
"इथे नीट लक्ष द्या. त्या हाडांवर मांस अगदी थोड्या प्रमाणात बाकी होते. ती जळालेली नव्हती किंवा तुटली नव्हती. आता चित्र बघा! एखाद्या फ्रेटसॉने कापून काढल्यासारखे नाही वाटत?"

"तुला काय म्हणायचं आहे प्रज्ञा?"

"सर हे फक्त माझे इंट्युशन आहे."
"तरी बोल. जर डॉक्टरांची थिअरी बरोबर निघाली तर तुझा कोल्हा मॅच होतोय."
"एक लक्षात घेऊया कि 'त्या'ने आपल्या लक्ष्याला जागीच ठार नाही केले. त्याने फक्त अशांनाच मारण्याचा प्रयत्न केला ज्यांनी त्याचा चेहरा बघितला. म्हणजे त्याला त्याची ओळख लपवायची गरज आहे. दुसरे म्हणजे तो त्याच्या लक्ष्याला कुठेतरी घेऊन जात होता. याचा अर्थ त्याला त्याच्याकडून काहीतरी जाणून घ्यायचे असू शकते. पण सूरदास म्हणाल्याप्रमाणे एखादा उच्चभ्रू असे का करेल? म्हणजे त्याच्यासोबत काहीतरी करायचे होते. हाडांवर मांस असे उरते जेव्हा एखादा माणूस मांस खातो. आपण प्युअर कार्निव्होअर नसल्यामुळे आपण हाडांवरील मांस पूर्णपणे खाण्यासाठी बनलेलो नाही. सर 'तो' नरभक्षक आहे. तो केव्हा पासून हे सगळे करतोय माहित नाही पण असेच भिकारी, किरकोळ गुंड त्याच्या भुकेला बळी पडले आहेत. या जॉनीच्या अस्तित्वामुळे पडणार्‍या मुडद्यांचा वेग दुप्पट झाला आणि हा प्रकाशात आला. नाहीतर याच्यापर्यंत कदाचित कोणीच कधीच पोहोचू शकले नसते."
~*~*~*~*~*~

रसूल, किलर आणि जॉनी एका खोलीत बसले होते. रसूल आणि किलरने जॉनीचा विश्वास संपादित केला होता. जॉनीने अत्यंत खुशीने त्यांच्यासाठी आपल्या मित्राची - किलरने याची नोंद घेतली कि जॉनी शक्ति, पॉवर असे शब्द न वापरता मित्र हा शब्द वापरतो - मदत देण्याचे कबूल केले. त्याला फक्त पूर्णवेळ जुगार खेळण्यात रस होता. किलरच्या रुपाने त्याला एक योग्य पार्टनरही मिळाला होता. सर्वकाही आलबेल वाटत होते. पण रसूल व किलर दोघांनाही जाणीव होती कि यात एक मोठा फ्लॉ आहे.

जॉनीकडून त्यांनी एक खून करवून घेतला होता. जॉनीला तसेही त्या बारमालकाचा राग होताच, तर त्याने रसूलचा हफ्ता थकवला होता. पण यातून त्यांना लक्षात आले कि जॉनी जोवर एखाद्या माणसावर चिडत नाही तोवर तो पुस्तक मिळवू शकत नाही - किलरची नोंद : त्याचा मित्र त्याला पुस्तक देत नाही. याशिवाय काही अटी असाव्यात असा किलरचा अंदाज होता. रसूलकडे पेशन्स नावाच्या गोष्टीची प्रचंड कमी होती, पण केवळ पॉसिबल फायदे खूप जास्त असल्याने तो संयम बाळगून होता.

"६ बेसिक + ४ = १० ट्रिक्स. कॉन्ट्रॅक्ट सॅटिसफाईड!" किलरची टीम जिंकली होती. हरल्यामुळे जॉनी थोडा वैतागला होता. त्याच्या टीममेटला एक पुस्तक मिळणार हे जवळपास नक्की होते. त्याला मरण्यासाठीच तर आणले होते. रसूलने किलर कडे नजर टाकली. किलरने काम झालंय याची खूण केली.

किलरच्या लक्षात आले होते कि जॉनी ब्रिजमध्ये अत्यंत कमजोर प्लेयर आहे. जेवढा गेम लक बेस्ड तेवढा जॉनी चांगला प्लेयर. या माहितीचा वापर करून ते जॉनीचा फायदा घेत होते. पण किलर हे जाणून होता कि हा तात्पुरता उपाय आहे. त्यांना अधिक चांगल्या पद्धतीचा शोध घेणे भाग होते.
~*~*~*~*~*~

"तुझ्या मित्राच्या मृत्युबद्दल बुसुली माफी मागतो."
ते जसे माहिमच्या किल्ल्याजवळ पोचले तसा बुसुली प्रज्ञाला म्हणाला. प्रज्ञाला त्याचे फारच आश्चर्य वाटले.
"तू का माफी मागतो आहेस?"
"पुस्तक चोरीला गेले नसतेच तर हे सर्व झालेच नसते. म्हणून......."
"यात तू काहीच करू शकत नाहीस. तुला माफी मागायची काही एक गरज नाही आणि तरी जर माफी मागायची असेलच तर त्या दोघांची (तिने दोन इन्स्पेक्टरांकडे बोट दाखवले) खात्री पटवून दे कि युरुगुचे पुस्तक खरेच आहे."
बुसुलीने मान डोलाविली.

ते लवकरच जिथे अनिरुद्धचे प्रेत सापडले त्या जागी होते. आता मोदिबो बोलू लागली
"गेलेले सर्व बळी हे युरुगुच्या पुस्तकाच्या प्रतींमुळे गेले आहेत, फक्त हाच एकटा मूळ पुस्तकाचा शिकार आहे. त्यामुळे इथे आपण युरुगुच्या जगात जाऊन इथे नक्की काय घडले ते बघू शकतो. सर्वांनी आपापले हात धरा आणि एक वर्तुळ करा."
ते सर्व एका वर्तुळात एकमेकांचे हात धरून उभे राहिले.
"काहीही झाले तरी हात सोडायचे नाहीत. जोवर हात धरलेले आहेत तोवरच तुम्हाला जे काही घडले ते पाहायला मिळेल. तुम्ही सुरुवातीला युरुगुच्या जगातून प्रवास कराल. तुम्हाला विचित्र अनुभव येईल. पण हात सोडू नका."
असे म्हणत ती वर्तुळाच्या मध्ये उभी राहिली. तिने सर्वांवर हातातील भांड्यातले पाणी शिंपडले आणि कसले तरी मंत्र पुटपुटू लागली.

लवकरच सर्वांना भोवतालीचे जग धूसर भासू लागले. हळूहळू त्या जगाचा रंग लालसर, पिवळा, काळपट अशा ३ रंगामध्ये विभागला. ते सर्व एका ज्वालामुखीच्या मधून वाहत असलेल्या लावारसावर तरंगत जात होते. विशेष म्हणजे तो लावा बर्फासारखा थंड होता!! विचित्र अनुभव!!

परत भोवताल बदलला. ते पुन्हा किल्ल्यात आले होते. आता त्यांच्या समोर ला आणि नोम्मो उभे होते. ते देखील कसलीशी क्रिया करत होते. तिथे लवकरच एक करड्या रंगाचा कोल्हा प्रकट झाला. ते पुढे काही करणार इतक्यात तो कोल्हा एका वेगळ्याच दिशेला पाहू लागला, त्यांच्या उलट दिशेला. एवढ्यात तिथे अनिरुद्ध येऊन पोहोचला. नोम्मो त्याला थोपवून धरू लागला पण तो कोल्हा एका विशिष्ट दिशेला दिसेनासा झाला! ला प्रचंड चिडली. तिने अनिरुद्धच्या डोक्यावर मागून पुस्तकाने मारले. अनिरुद्ध खाली पडला. तो बेशुद्ध झाला नाही पण तेवढ्या वेळात ला आणि नोम्मोला त्याच्या समोर पुस्तक टाकता आले. अनिरुद्ध ते पुस्तक बघताच जणू ला आणि नोम्मोला विसरून गेला. ते पुस्तक वाचू लागला. लवकरच त्याने ते पुस्तक बाजूला टाकले आणि तो ते गाणे म्हणू लागला
"शोधतोय शोधतोय, युरुगु शोधतोय
त्याचे या जगी नवीन घर तो बांधतोय
पूर्वी अम्माने केले ते पुन्हा तो बघतोय
आणि आता स्वतःला देह तो शोधतोय
मी तर नाही पटलो त्याला
पुढचा कोण आहे?"
लाने ते पुस्तक उचलून घेतले आणि ती उद्गारली "हा पण प्रयोग अपयशी!" मग ते दोघे तिथून निघाले. मागे अनिरुद्धला काय होत होते कोणास ठाऊक! तो एकच वाक्य म्हणाला
"माझी श्वासनलिका कशी दिसत असेल?"
आणि त्याने आपलाच हात स्वतःच्याच गळ्यात खुपसला!
"म्हणून त्याच्या हातावर रक्त होते आणि गळ्यावर पाच भोके/जखमांच्या खुणा!" जाधव मनात म्हणाले.
प्रज्ञाने किंकाळी फोडली. या नादात तिने हात सोडला आणि ते एका झटक्यात परत वर्तमानात आले.
ती रडत होती. हा धक्का तिच्यासाठी असहनीय होता.
"म्हणजे अनिदादाने स्वतःलाच.....?"
कुणाल तिचे सांत्वन करत म्हणाला "नाही प्रज्ञा! हे सर्व त्या पुस्तकामुळे, त्या ला आणि नोम्मोमुळे झालंय!"
जाधव आणि शिंदे स्तब्ध होते. बुसुली त्यांच्याकडे पाहत म्हणाला
"आता तरी तुम्हाला आम्ही काय म्हणत आहोत ते पटतंय का?
"त्यांना पटो वा न पटो" नाडकर्णी मध्येच बोलले

एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळली..............

युरुगुचे पुस्तक, त्याची मूळ प्रत अजूनही ला आणि नोम्मो कडेच आहे!!

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/54837

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!

पण गड्या रे, हे आठ-आठ दिवस वाट पहायचं अन आलेला भाग आठ मिनिटात संपतो!
बहुत नाइंसाफी है!

*हावरट बाहुली*

अरेच्चा! अजूनही पार्टवाईज वाचणारे आहेत तर Happy मला गेल्या भागानंतर वाटलेले कि आता शीर्षकात 'अंतिम' असे दिसल्याशिवाय लोक्स बघणारच नाहीत Wink पुढच्या वेळेस कथेचे नावच 'अंतिम' ठेवतो Lol

जोक्स अपार्ट, सर्वांना - आत्तापर्यंतचे प्रतिसादक आणि केवळ वाचन मोड ऑन असलेले - प्रचंड धन्यवाद! डोक्याचा भुगा करणारी कथा असूनही नियमितपणे वाचून प्रतिसाद देता यापेक्षा माझ्यासाठी आनंदाची दुसरी बाब कुठली!

>>पण गड्या रे, हे आठ-आठ दिवस वाट पहायचं अन आलेला भाग आठ मिनिटात संपतो!
बहुत नाइंसाफी है!

*हावरट बाहुली* >> Lol व्यस्त प्रमाणाचे उदाहरण म्हणून गणिताच्या तासाला खपवता येईल Proud

डोक्याचा भुगा करणारी कथा असूनही >>>>>> खरच भुगा झालाय डोक्याचा या कथेमुळे.. अंतिम भाग आल्यावर पुर्ण कथा सलग वाचावी लागणार आहे.,.

खरच भुगा झालाय डोक्याचा या कथेमुळे.. अंतिम भाग आल्यावर पुर्ण कथा सलग वाचावी लागणार आहे.,.>>>>>>> एकदम बरोबर.... !!!!