युरुगुचे पुस्तक : भाग ७

Submitted by पायस on 15 June, 2015 - 07:03

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/54141

"इलेगुआ? युरुगु? हे काय चालू आहे बुसुली? आम्हाला नीट सविस्तर सांग आता तरी."
ते सर्व मोदिबोच्या ठिकाणी आले होते. बुसुली आणि मोदिबो शांतपणे जे कागद नाडकर्णी आणि कुणाल अभ्यासत होते ते पाहत होते. मोदिबोने मान हलविली आणि ती म्हणाली
"इलेगुआची कहाणी. तीच जी आपण मुलांना सांगतो."
बुसुलीने तिला आपले काम चालू ठेवण्याचा इशारा केला आणि तो त्या दोघांकडे वळला
"डॉक्टर पहिल्यांदा जेव्हा ही कथा ऐकवतात तेव्हा कोणालाही या कथेमागचे भयानक सत्य उलगडून सांगितले जात नाही. कथेची सुरुवात त्या कवितेने होते जी तुम्ही ऐकलीत."

"शोधतोय शोधतोय, युरुगु शोधतोय
त्याचे या जगी नवीन घर तो बांधतोय
पूर्वी अम्माने केले ते पुन्हा तो बघतोय
आणि आता स्वतःला देह तो शोधतोय
मी तर नाही पटलो त्याला
पुढचा कोण आहे?"

"हे गाणे आम्ही युरुगुला अम्माने हाकलून दिले त्या दिवसाची आठवण म्हणून एक उत्सव साजरा करतो त्या दिवशी फेर धरत नाचत म्हणायचे गाणे आहे. अर्थात आता ना तो उत्सव राहिला ना हे गाणे. याचे कारण सोपे आहे ती प्रथा पाळणारे क्रूर, अतिरेकी विचारांचे गट आता आमच्या समाजातून हळू हळू नाहीसे होत आहेत. युरोपीयांचे काही चांगले परिणाम झाले त्यातला हा एक! पण अजूनही काही जुन्या विचारांचे कबिले अशा प्रथा सौम्य स्वरुपात पाळतात. या गाण्याच्या पहिल्या ४ ओळी वेगवेगळ्या प्रकारे फेर धरत नाचत वारंवार म्हणायच्या. मध्ये एक गवती पुतळा उभारलेला असतो जो युरुगुचे आणि त्याला मानणार्‍या मतिभ्रष्ट मानवाचे प्रतिक आहे. मग लहान मुले आपल्या हातातल्या गवती काठ्यांनी त्याला टोचतात. मग कबिल्याचा सरदार येऊन त्याला आग लावून देतो आणि सर्व मेजवानीवर तुटून पडतात."
"मग यात चूक काय आहे? आम्ही देखील राक्षसी प्रवृत्तीचा संहार म्हणून रावणदहन करतो, त्रिपुरी वात जाळतो तशातलाच प्रकार!"
बुसुली खिन्न हसला. "अशा प्रथांमागे अनेकदा काही गोष्टी असतात ज्या उजेडात न आलेल्याच बर्‍या! मी जेव्हा युरुगुच्या पुस्तकाचा रक्षकदलाचा सदस्य बनलो, मी येतोच आहे त्याच्याकडे, तेव्हा मला अनेक गोष्टी समजल्या. फार पूर्वी गवती पुतळ्याजागी कबिल्यातील कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा, कबिल्याच्या दृष्टीने त्यांचा शत्रु असा कोणी किंवा जंगलात सापडलेला कोणी अनामिक असे. गवताच्या काठ्यांजागी छोटे भाले असत. अम्माचा वरदहस्त तुमच्या पाठीवर आहे अशी समजूत करून दिलेली लहान मुले अजाण वयात पहिली हत्या करत."
हे ऐकून दोघे स्तब्ध झाले होते.
"ही पाशवी प्रथा ३००-४०० वर्षांपूर्वीच खरेतर बंद पडली. पण किरकोळ स्वरुपात काही कबिले अशा अनेक प्रथा आत्ता-आत्तापर्यंत पाळत होते. या प्रथा बंद पडण्याचे एक कारण इलेगुआ आहे."
दोघांनी आता कान टवकारले.
"इलेगुआ साधारण ४०० वर्षांपूर्वीचा एका विशिष्ट डोगोन कबिल्याचा सरदार होता. इलेगुआने या सर्व प्रथांचा अभ्यास करून न जाणे कसे पण एक पुस्तक निर्माण केले. त्याला पुस्तक इतक्या साठीच म्हणायचे कारण ते त्या आकाराचे दिसते. बाकी आतल्या पानांवर फक्त चित्रविचित्र खुणा आहेत. संपूर्ण पुस्तक एका विशिष्ट प्रकारच्या पॅपिरसने बनवलेले आहे तर बाहेरून त्याला कातडी बांधणी आहे ज्यावर करड्या रंगाची फर आहे. कहाणी सांगण्यापूर्वी या पुस्तकाविषयी सांगणे गरजेचे आहे. जो कोणी हे पुस्तक वाचतो, खरे तर उघडतो; कारण एकदा उघडल्यावर तुम्हाला हे पुस्तक आपल्या नियंत्रणात घेते आणि तुम्ही ते वाचताच वाचता. तर जो कोणी हे पुस्तक वाचेल ती व्यक्ति युरुगुच्या अधीन होते आणि अम्माने बनवलेल्या नियमांच्या जगाच्या मनाने बाहेर जाते. थोडक्यात तुमच्या बरोबर काहीही होऊ शकते. तुमची स्मृती जाऊ शकते, तुम्हाला असे वाटू शकते कि तुम्हाला पंख आले आहेत आणि तुम्ही उडू बघता, तुम्हाला अचानक आत्महत्या करायची सणक येऊ शकते. काहीही, पण हे सर्व फक्त तुमच्या मनाचे खेळ आहेत. त्यामुळे तुम्ही पंख आले आहेत असे समजून उडायला जाल आणि इमारतीच्या गच्चीवरून खाली पडून मराल. युरोपीय पाद्री ख्रिश्चन धर्मप्रसाराला आलेले असताना त्यांना स्मृतीभ्रंश होऊन अचानक युरुगुचा प्रसार करावासा वाटू शकतो."
"फ्रीक!! पण हे खरेच अस्तित्त्वात आहे? आणि जर त्याच्यावर एक रक्षकदल नेमलेले आहे तर काळजी काय आहे? उलट आम्ही त्याच्यावर संशोधन करू शकू."
बुसुलीने केवळ एक कटाक्ष कुणालकडे टाकला आणि तो गप्प झाला. डॉक्टरांनी त्याला हातानेच थांबण्याचा इशारा केला आणि बुसुलीला डोळ्यांनीच शांत केले. ते पुढे म्हणाले
"पण मग याचा आमच्याशी काय संबंध? आम्ही याचा अभ्यास लगेच बंद करून टाकू."
बुसुली उठला आणि मोदिबोने तयार केलेला एक नकाशा त्यांना दाखवला. त्याच्यावर विशिष्ट कालखंड लिहिलेला होता.
"अरे हा तर मुंबईचा नकाशा दिसतोय. पण हे सगळे लाल ठिपके का आहेत?"
"डॉक्टर. पुस्तक चोरीला गेले आणि आता मुंबईत आहे आणि मी त्या पुस्तकाच्या मागे आहे. हे सर्व लाल ठिपके त्या पुस्तकाने घेतलेले बळी आहेत."
~*~*~*~*~*~

इलेगुआची कहाणी : कुणालने केलेले मराठी भाषांतर

तर ऐका रे पोराहो
एक होता राजा आणि एक होती राणी, दोघे मिळून सांगतात इलेगुआची कहाणी

तर या दोघांना झाली दोन जुळी मुले - एक मुलगा आणि एक मुलगी
मुलाचं नाव होतं इलेगुआ मुलीचे इलेलगी.

राजाला होती अजून एक राणी पण ती होती त्याची नावडती. तिचा मुलगा होता थोरला नाव त्याचे गोरो.
राजाला मात्र न गोरो आवडे न इलेगुआ, फक्त इलेलगीवरच त्याचा जीव! रोज रात्री तिला गोष्टी सांगून झोपवायची होती त्याला सवय! पण का कोण जाणे इलेलगीला आवडे तिच्या भावांची संगत अधिक.

तिघांनी कबिल्याच्या ओझाकडून एका एका नोम्मोची उपासना शिकली (नोम्मो = देव). गोरो ओगोचा उपासक झाला तर इलेलगी यासिगीची. पण इलेगुआने भलताच रस्ता पकडला तो बनला युरुगुचा उपासक! ओझाला अर्थातच हे कळेपर्यंत झाला होता उशीर. राजाने मग ओझाला दिले युरुगुच्या तोंडी. अर्थातच त्याला तो पटला नाही. पण या नादात इलेगुआ न जाणे कुठे हरवला.

अशीच अनेक वर्षे गेली. गोरो नवा राजा बनण्यास सज्ज झाला. अर्थात राजा अजूनही धट्टाकट्टा होता पण त्याचा वारसदार आत्ताच निश्चित झाला होता. आणि अचानक आसपासच्या इलाख्यात हल्ले सुरु झाले. युरुगुचे उपासक म्हणवणारे लोक हिंडू लागले. अशातच इलेलगी नाहीशी झाली. राजा मुलीच्या नाहीशा होण्याने खंगला, त्याने अंथरूण धरले.
या सर्व प्रकाराचा छडा लावण्याची जबाबदारी आता गोरोवर आली. गोरोने मोठ्या हिरीरीने या सर्व प्रकाराचा मागोवा घेतला आणि एक विचित्र वस्तु त्याच्या हाती लागली. त्या वस्तुला जो कोणी उघडून पाही तो मरत असे. गोरोने मात्र हार न मानता त्याच्यामागे असलेल्या दुष्ट शक्तिचा तिच्या दुनियेत जाऊन सामना केला. आश्चर्य म्हणजे या शक्तिमागे होता इलेगुआ. त्याने त्या शक्तिचे माध्यम म्हणून ते पुस्तक, युरुगुचे पुस्तक तयार केले होते. या पुस्तकाला अनश्वर बनवण्यासाठी त्याला एका खास व्यक्तिची आवश्यकता होती. म्हणून इलेलगीला त्याने पळवून नेले होते. गोरो त्या शक्तिला नमवून आपल्या दुनियेत परत आला. इलेगुआ तोवर राजाला मारून तिथे स्वतःचे राज्य करू पाहत होता. पण गोरोसमोर त्याची डाळ शिजली नाही. गोरोने त्याला मारून टाकले आणि इलेलगीला सोडवून मोठे संकट टाळले. पण इलेगुआचा शाप अजूनही अस्तित्वात आहे. जर इलेगुआपासून वाचायचे असेल तर गोरोने दिलेल्या मार्गावर चाला आणि चुकूनही युरुगुचे पुस्तक उघडून पाहू नका!!
~*~*~*~*~*~

मुंबई पोलिसांवर आता जबाबदारीचा अतिरिक्त भार येऊन पडला होता. कोल्ह्याच्या अफवा सुरू होऊन महिना व्हायला आला होता. अजून लोकांना गँगवॉर भडकण्याच्या शक्यतेचा तर पत्ताच नव्हता. आणि त्यात बाबा निश्चितानंद स्वामी त्याच्या मंडपात चित्र विचित्र यज्ञ करत बसला होते. देशातल्या इतर भागातले लोक काय बावळटपणा चालू आहे असा विचार करत होते. अनेकजण तर हा मीडिया स्टंट आहे अशा शब्दात संभावना करीत होते. काहीही असो, भक्त मोठ्या संख्येने येऊ लागले होते आणि जिथे गर्दी होते तिथे पोलिसाची ड्युटी लागलीच पाहिजे. कमिशनर आता त्रस्त झाले होते.
अशात निश्चितानंदाने नवीन खेळी खेळली. त्याच्या यज्ञांमध्ये अधून मधून करडा कोल्हा येऊ लागला. निश्चितानंद त्याला विविध भस्मांनी धमकावत आहेत असे प्रकार सुरु झाले. कमिशनरांना अंदर कि बात कळली होतीच - हा लेजर प्रोजेक्शन शो आहे. पण सद्य परिस्थितीत त्याला हात लावणे शक्य नव्हते. त्यांची आशा आता होती कि किमान
गँगवॉरचा धोका कमी होईल. जाधव आता याच्यावरच विचार करीत होते तेवढ्यात प्रज्ञा आली. त्यांनी त्यांच्या ठरलेल्या कॉफीगृहात प्रवेश करून कॉफीचा आस्वाद घेत बोलायला सुरुवात केली.
"काय समजलं आहे तुला प्रज्ञा? तू फोनवर फारच उत्तेजित होऊन बोलत होतीस."
"सर मी बराच धोका पत्करला यावेळी." असे म्हणत तिने एक फाईल त्यांच्या समोर टाकली. जाधवांनी आतला मजकूर चाळला.
"हा तर ऑटोप्सी रिपोर्ट आहे. तू......?"
"ही कॉपी आहे सर. मी ही मिळवण्यासाठी जे काही केले ते जाऊ द्या."
"असे कसे जाऊ द्या........" मागून एक आवाज आला. साध्या वेशात इन्स्पेक्टर शिंदे उभे होते.
"शिंदे......" जाधवांना काय बोलावे हे पटकन समजेना.
"महेश तुझी कामचलाऊ डिटेक्टिव अगदीच काही वाईट नाही. तू ज्या केसवर काम करत आहेस तिच्या काही डिटेल्स आता ओपन सीक्रेट आहेत कारण परिस्थिती कशी बिघडली आहे हे तू जाणतोसच. त्यामुळे मला तुम्हाला मदत करावीशी वाटली. आणि पोरी, प्रज्ञा नाव ना तुझं? अजूनही तुला पाठलाग होत असताना काय करावे, कसा टाळावा याचं प्रशिक्षण मिळायला पाहिजे. तू जेव्हा त्या वस्त्यांमध्ये फिरत होती तेव्हा सुद्धा मला तुझ्यामागावर माणसे ठेवावी लागली नाहीतर तू सुरक्षित बाहेर पडली असतीसच असं नाही. बरं मला आता माझी कामगिरी पण सांगू द्या कदाचित तुम्हाला मदत मिळेल. एक चाय भेज." शेवटचा हुकूम अर्थातच वेटरसाठी होता.
"ओके. पहिल्यांदा तर मला हे मान्य केले पाहिजे कि माझी थिअरी कि रसूल गॅंगने हा खून घडवून आणला ही चूक होती. मी माझ्या पद्धतीने तपास करून पाहिला तेव्हा मला खरेच काही सापडले नाही. माझ्याकडे दुसरी वेगळी माहिती मात्र या निमित्ताने आली जी मी तुला नंतर सांगतोच." इथे शिंदे थोडे घुटमळले. अर्थातच त्यांना प्रज्ञाला या दुसर्‍या प्रकरणात ओढायचे नव्हते.
"असो. प्रज्ञाला जे काम नीट जमले नाही आणि जे तिला जमणे तू अपेक्षित धरायला नको होते अगदी तुझा कोणी खास खबरी तिच्या मदतीस दिला तरी; ते म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेला कोणी माणूस शोधणे. त्यादिवशी माहिमच्या किल्ल्याच्या आसपास फिरणारी पोरं मी शोधून काढली. यातला एकजण धाक दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. त्याच्या म्हणण्यानुसार एका आंधळ्याला याची काहीतरी माहिती आहे कारण त्याने एक खून होताना पाहिला आणि खून्यानेच त्याचे डोळे फोडले. आता हा तोच खून आहे का माहित नाही पण त्याने सांगितलेली एक माहिती महत्त्वाची होती कि खूनी नक्कीच रसूल गँगचा मेंबर नव्हता. त्याचा पत्ता सारखा बदलत आहे."
"दॅट्स फाईन. मला वर्णन द्या मी त्याला शोधू शकतो." रिपोर्टरचे नवीन काम तयार होते.
"ओके प्रज्ञा नाऊ यूअर टर्न."
प्रज्ञा आता बावरून गेली होती. इतके भराभर तिच्या आयुष्यात यापूर्वी चढउतार कधी आले नव्हते. तिने कॉफीचा एक घोट घेत आधी स्वतःला शांत केले आणि मग ती बोलू लागली.
"माझा पहिल्या दिवसापासून विश्वास होता कि हे कुठल्याही गँग मेंबरचे काम नव्हते. पण माझ्या थिअरीप्रमाणे आढळलले ठसे कुत्र्यासारखे होते, पण कुत्रा नव्हे. मग कोणता प्राणी असू शकतो बरे? मी दोन कामे केली एक म्हणजे अनिदादाच्या बॉडीवरील जखमेचा फोटो नीट पाहिला आणि सॉफ्टवेयर वापरून त्या जखमांमधील अंतर शोधले. एक खात्री हीपण करून घेतली कि असे कोणतेही हत्यार अस्तित्वात नाही. मग मी वेगवेगळ्या शिकार्‍यांकडे जाऊन ते ठसे कशाचे आहेत हे समजून घेतले आणि सध्या सुरु असलेल्या घडामोडींवरून माझा निष्कर्ष असा आहे.
अनिदादाला मारण्यासाठी वापरलेले हत्यार हा एक पंजा आहे, मानवी पंजा. हो कोणीतरी प्रचंड शक्तीने पाची बोटे खूपसून त्याचा गळा फोडला. "
एक मिनिट, दोन्ही इन्स्पेक्टर आता गांगरून गेले होते. असा कोणी माणूस असू शकतो?
"थांबा मला पूर्ण करू द्या. ते ठसे. ते ठसे आहेत ग्रे फॉक्सचे. मुंबईत करडा कोल्हा दिसण्याचा बातम्या तशाही पसरलेल्या आहेतच ना. सो मला वाटतंय कि कोणीतरी असा आहे जो सीरियल किलिंग स्प्रीवर आहे, मोकाट सुटला आहे. त्याचा पाळीव प्राणी एक करडा कोल्हा आहे. त्याच्या अंगात अर्थातच राक्षसी ताकद असली पाहिजे कारण नुसत्या बोटांनी गळा फोडायला पाशवी शक्ती अंगात पाहिजे. आपल्याला एक सीरियल किलर पाहिजे सर. आणि तुम्ही म्हणताय तो आंधळा आपला त्याच्यापर्यंत पोचण्याचा क्लू आहे."
दोघे तिच्या या निष्कर्षावर शांतपणे विचार करत होते. त्या तिघांना हे ठाऊक नव्हते कि अर्थात या निष्कर्षात काही चुका होत्या; पण सत्यापासून हा निष्कर्ष फार लांब नव्हता. लवकरच त्यांना सत्य कळणार होते. त्यासाठी त्यांना तो आंधळा लवकरात लवकर मिळणे गरजेचे होते.
~*~*~*~*~*~

जाधव आणि शिंदे प्रज्ञा गेल्यानंतर सिगारेटसाठी वाटेत एका टपरीवर थांबले. सिगारेटचे झुरके घेता घेता महेशने आपल्या सीनियर ऑफिसरला विचारले,
"तुम्हाला प्रज्ञाची शंका आली हे मी समजू शकतो. तसेच ती माझ्यासाठी काम करत असेल हेही कळण्यासारखे आहे. पण तुम्ही तिला अटकाव का नाही घातला?"
शिंदे खोखो हसत म्हणाले, " अरे तुझी ही यंग डिटेक्टिव अगदीच नवखी आहे. तिच्याकडे डोकं आहे हे मला लवकरच कळून चुकले पण हिच्या अंगात अजून बाकीचे गुण यायचे आहेत जे बर्‍याच पोलिसांच्या उलट आहे त्यांच्याकडे हे गुण असतात पण वेगळा विचार, जसे तुमचे होम्स किंवा ब्योमकेश करतात, त्याचा अभाव असतो. हे गुण म्हणजे वेळप्रसंगी पॅनिक न होता भावनांवर नियंत्रण ठेवता येणे, चारी बाजूंना अवधान ठेवणे इ. खासकरून तिला जेव्हा तिचा पाठलाग होतो हे पटकन कळून येत नव्हते तेव्हा तिला समजणे अगदीच शक्य होते. तू सोडून कोणी दुसरे तिला पाठवणे शक्य नव्हतेच म्हणा. माझा तुझ्यावर वैयक्तिक आकस काहीच नाही आणि माझ्याबद्दल काहीही गैरसमज पसरलेले असले तरी मला तुझ्या क्षमतेवर विश्वास आहे. त्यामुळे या मुलीमार्फत तू काही वाईट काम करून घेणार नाही याची खात्री होती त्यामुळे मी हिच्यावर फक्त नजर ठेवणे पसंत केले."
महेश हसला. त्याने दुसरी सिगारेट पेटवत पुढे विचारले,
"तुम्हाला सीरियल किलिंगविषयी काही सांगायचे होते."
"हो. ऐक नीट. तू जॉनी हे नाव ऐकले आहेस का?"
रिपोर्टरने हे नाव कधीतरी सांगितल्याचे महेशला आठवले.
"हो. रसूल गँगच्या संदर्भात ऐकले होते. पण रसूल गँगचा मी पाठपुरावा या गँगवॉर रिलेटेड सीरियल किलिंगविषयी न केल्याने दुर्लक्ष केले."
"हं. तुम्ही या मुलाच्या खूनासंदर्भातच रसूल गँगची अधिक चौकशी केली. त्या अ‍ॅक्टिवा चोरासाठी या मुलीने घेतलेला शोध मी पाहिला. असो, सहसा याने काही तोटा झाला नसता पण इथे एक मेख आहे. रसूल जॉनीच्या मागे लागला आहे. मी असे म्हणेन कि त्याचा उजवा हात असलेला किलर रसूलला फोर्स करत आहे. कदाचित आतापर्यंत जॉनी रसूलला सापडला देखील असेल. तर मेख अशी आहे कि खूनांचे दे सोडून पण जे थोडे गँगस्टर्स वेड लागलेल्या अवस्थेत सापडले होते त्या सर्वांच्या आसपास जॉनी दिसला होता. आणखी एक, या आंधळ्याने जॉनीशी भांडण केले होते. आंधळ्याचा जेव्हा मी माग काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवटचा तो ज्या बारमध्ये दिसला तिथे काही किरकोळ कारणावरून तो जॉनीशी भांडला होता. थोडी मारामारी पण झाली होती. त्यामुळे कदाचित या आंधळ्यामुळे एका दगडात दोन पक्षी ठार होऊ शकतात."
आता महेश उत्साहित झाला. अखेर ही केस सुटण्यालायक एक धागा त्याच्या हाती आला होता.

~*~*~*~*~*~

तो त्याच्या भक्ष्याच्या छातीवर पाय रोवून उभा होता. त्याचे ते आसुरी हास्य खाली पडलेल्या माणसाला थरकाप आणण्यासाठी पुरेसे होते. त्याने मग क्लोरोफॉर्म लावलेला रुमाल त्याच्या तोंडावर दाबला आणि भक्ष्य घरी न्यायला तो आता रेडी होता. तेवढ्यात मागून एक आवाज आला
"मस्त. मग आता याला लगेच खाणार?"
ला चालत येत होती. तिच्या सोबत नोम्मो होता.
याने आपले शस्त्र बाहेर काढले. तो त्यांच्याकडे हिंस्त्र नजरेने पाहू लागला. कोणत्याही प्राण्याला त्याचे खाणे चालू असताना टोकलेले आवडत नाही. अशावेळी आपोआप चेहर्‍यावर एक प्रकारचे चिडखोर भाव येतात. त्याच्या डोळ्यात आत्ता तसेच भाव होते. माझ्या शिकारीच्या मध्ये येऊ नका.
"युरुगुच्या वारस म्हणून शोभतो खरा हा. चल आमच्याबरोबर. याला आपण घेऊन जाऊ हवे तर."
आता तो गोंधळला. ला काय म्हणत आहे हे त्याला कळेना.
"युरुगु? कोण युरुगु?"
ला क्षणभरच थबकली. लगेच सावरत तिने नोम्मोला इशारा केला. नोम्मोने चपळाई दाखवत एका विशिष्ट बिंदूवर आघात केला. तो बेशुद्ध पडला.
"हा काय प्रकार आहे ला? तू सांगितलेली सगळी लक्षणे याला लागू पडत होती."
लाने प्रत्युत्तर म्हणून त्याच्या कानाखाली वाजवली.
"मूर्ख!! तू चुकीचा माणूस पकडलेला दिसतो. मी म्हटलं होतं ना कि युरुगुदेवांची शक्ति एकापेक्षा अधिक माणसांकडे आकर्षित होऊ शकते. पण फक्त वारस तिला नियंत्रित करू शकतो. हा त्या इतर लोकांपैकी एक असावा. सध्या याला घेऊन चल. याच्याकडून काही माहिती निघते का ते बघू."
गाल चोळत नोम्मोने मान डोलाविली. "आणि याचे काय?"
त्या पडलेल्या गुंडाकडे, भक्ष्याकडे पाहून ला ने फक्त हाताने त्याला जायची खूण केली. ती कोणी आसपास नाही ना याची खात्री करत पुढे झाली व आपल्या कंबरेला लटकावलेल्या पिशवीतून तिने एक छोटीशी विष लावलेली सुई बाहेर काढली. त्या गुंडाच्या मानेजवळच्या शिरेत हलकेच ती सुई तिने टोचली आणि ती देखील नोम्मोप्रमाणेच अंधारात दिसेनाशी झाली.
~*~*~*~*~*~

किलर आणि रसूल त्या खोलीत जे काही चालू होते ते बघणारे मूक प्रेक्षक होते. अर्थातच जॉनीने किलरच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळले होते. मग रसूलने किलरच्या सांगण्यावरून बॉक्सरच्या ताब्यात जॉनीला दिले होते. बॉक्सर रसूल गँगमधला टॉर्चर स्पेशलिस्ट होता. अर्थात किलरने हे सर्व अशा रीतिने मॅनेज केले कि जॉनीला चुकूनही वाटू नये कि बॉक्सर हा किलर व रसूलचा माणूस आहे. त्यामुळे जॉनी हा कोण धटिंगण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता, एकीकडे मार खात.
बॉक्सरचे ब्रास नकल कधीच लाल झाले होते. जॉनीचा चेहरा ओळखण्याच्या पलीकडे गेला होता. आता अ‍ॅडव्हान्स टॉर्चर टेकनिक्स वापराव्यात का याचा विचार करायला बॉक्सरने सुट्टा ब्रेक घेतला होता. तेवढ्यात किलरने रसूलचे लक्ष वेधले,
"ते बघ तो काहीतरी पुटपुटतो आहे ते दिसतंय का?" रसूलने होकारार्थी प्रतिसाद दिला.
"आता माझी थिअरी करेक्ट असेल तर गंमत बघ. अ‍ॅन्ड आय अ‍ॅम सॉरी."
"का?"
"थिअरी बरोबर असेल तर बॉक्सर वाचणार नाही."
रसूल बघू लागला. बॉक्सरच्या पायाशी एक पुस्तक आले होते. कुठून आले कोणास ठाऊक?
"तू जर रेकॉर्डिंग नंतर पाहिले तर तुला कळेल कि अचानक हवेतून प्रकट झाले. ते सोड पुढे बघ."
बॉक्सर ते पुस्तक वाचत होता. कधी वर्तमानपत्र सुद्धा न वाचणार बॉक्सर मन लावून पुस्तक वाचत होता. तो अचानक एक गाणे म्हणू लागला,
"शोधतोय शोधतोय, युरुगु शोधतोय
त्याचे या जगी नवीन घर तो बांधतोय
पूर्वी अम्माने केले ते पुन्हा तो बघतोय
आणि आता स्वतःला देह तो शोधतोय
मी तर नाही पटलो त्याला
पुढचा कोण आहे?"

मग बॉक्सर थांबला. फक्त किलरला, ज्याला काही प्रमाणात ती धूसर कोल्ह्याची आकृती दिसत होती त्याला एक फासा पडल्याचा आवाज आला.
"ओ माय डार्लिंग रुबी. तू इथे कशाला आलीस. मी तुझ्यासाठी काहीपण करायला तयार आहे म्हटलं ना!"
रसूल चक्रावला. "अरे त्याची गर्लफ्रेंड रुबी, ६ महिन्यांपूर्वी अ‍ॅक्सिडेंट मध्ये गेली ना?"
किलरने काही न बोलता पुढे बघण्याची खूण केली.
"हो डिअर. मेरा दिल सिर्फ तेरा है. यकीन नही है तो ये ले."
असे म्हणून बॉक्सरने जवळ पडलेला चाकू उचलला आणि आपले हृदय चाकूने कापत बाहेर काढायला सुरुवात केली.
रसूलचे तोंड किलरने दाबून धरले. "त्याला धोक्याची कल्पना होती. आता तू त्याला वाचवू शकत नाही. उसे जान् दे. ते पुस्तक बघ. कसं जळतंय."
ज्या क्षणी बॉक्सरने हृदयाची शेवटची शरीराला जोडणारी रक्तवाहिनी तोडली तसे तो स्वतःचे हृदय हातातच ठेवून खाली कोसळला. तो रुबीकडे निघून गेला होता. ते पुस्तक जळून हवेत विरून गेले.
"क्या समझा?"
रसूल अजूनही गोंधळलेलाच होता. थोडासा चिडलेला देखील होता.
"ठीक से समझा!"
"देख गँगवाले मर रहे. पहिल्यांदा मी याच्यात फक्त गँबलर म्हणून इंटरेस्ट घेतला. पर अब मुझे यकीन है कि इसकी वजहसे गँगवाले मर रहे है. अब तू देख भी लिया कि ये सब कैसे होता. भाई अपने पास अब मुंबईपर राज करने का हथियार है. कैसे पकडेगा तू ऐसे कत्ल को? और कैसे रोकेगा ऐसे कातिल को? अब कुछ समझा?"
"समझा. आता याला जाऊन बॉक्सर पासून वाचवायला येतच होता ऐसा यकीन दिलाने का. फिर इसको अपने साथ धीरे धीरे लाने का. फिर अख्खा मुंबई अपनाच!!"
किलरच्या चेहर्‍यावर एक विजयी हास्य होते. खाली जॉनी मात्र बेशुद्ध पडला होता, तर तो अदृश्य कोल्हा जॉनीचा चेहरा चाटत होता.
~*~*~*~*~*~

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/54397

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप गुंतागुंत झाल्याने आणि मागचा भाग यायला खुप उशीर झाल्याने रस कमी झालाय.
आता समोर येईल ते वाचतेय बस्स.

पायस गुंतागुंत वाढत चालली आहे... पुढचे भाग लवकर येऊ दे...

शेवटचा भाग टाकल्यावर सलग वाचून काढायला पाहिजे ही कथा तरच कळेल.

आत्ताचे भाग फार गुंतागुंतीचे नाही वाटत आहेत. रहस्य उलगडायला सुरुवात झालीय असं जाणवतय.

पुढचे भाग जरा लवकर लवकर टाका म्हणजे लिंक तुटत नाही.

सर्वांना धन्यवाद Happy

गुंतागुंत - सुटायला सुरुवात झाली ना राव! इतक्या वेळ जे वेगवेगळे फिरत होते सगळे आता एकत्र यायला सुरुवात झाली आहे. बरं आता सध्या कोण कोठे आहे ते पाहूया

प्रज्ञा, इन्स्पेक्टर जाधव, इन्स्पेक्टर शिंदे - अनिरुद्ध आणि इतर खून प्रकरणांचा तपास करत आहेत. आता ते एका आंधळ्याला भेटणार आहेत. (हा आपल्या कथेत आधी येऊन गेला आहे)
आलोक आणि इतर डॉक्टर मंडळी - हा प्रज्ञाच्या प्रेमात आहे. इतर डॉक्टर्सचा अजून मेजर रोल नाही.
बुसुली, मोदिबो, डॉक्टर गंगाधर नाडकर्णी, कुणाल - यांना अ‍ॅक्चुअली युरुगुचे पुस्तक शोधण्यात रस आहे. ते युरुगुच्या पुस्तकाने अधिक काही वाईट घडण्याच्या आत त्या शक्तीला थांबवू इच्छितात.
ला, नोम्मो, '?' - '?' आपला दुसरा खूनी आहे, नरभक्षक आहे. ला आणि नोम्मोने चुकून त्याला युरुगुच्या पुस्तकाचा मालक म्हणून पकडले आहे. ला आणि नोम्मोला युरुगुचे पुस्तक पाहिजे पण अर्थातच त्याचा प्रताप थांबवण्यासाठी नाही. हा नरभक्षकही अर्थातच विकृत मनोवृत्तीचा मनुष्य आहे.
निश्चितानंद आणि कंपनी - निश्चितानंद एक ढोंगी बाबा आहे. त्याला तापत्या तव्यावर पोळी भाजून घ्यायची आहे म्हणून तो यज्ञ वगैरे स्टंट करतोय. त्याची अशी समजूत आहे कि हे कोल्हा वगैरे सब झूट आहे आणि तो फक्त वर्णनाशी जुळणार्‍या कोल्ह्याचा बळी देणार म्हणजे लोकं समजतील निश्चितानंद आपला मसीहा आहे.
रसूल, किलर आणि आता जॉनी - जॉनीकडे युरुगुचे पुस्तक आहे. रसूल आणि किलरला त्याची कल्पना आहे पण ते काय आहे हे माहित नाही. ते त्याचा वापर करण्याच्या विचारात आहेत.
इलेगुआ?? - इलेगुआ कोण होता हे पुढे स्पष्ट होईल पण तूर्तास एवढे पुरे कि त्याने युरुगुचे पुस्तक बनवले.

बाकी मी एक प्रांजळपणे कबूल करतो कि ही कथा जरुरीपेक्षा जास्त क्लिष्ट आहे आणि मला नियमितपणे लिहिता न आल्याने ती अधिकच क्लिष्ट वाटते आहे. या अनियमितपणामागे अर्थातच कारणे आहेत पण हे एक्सक्यूज दिल्यासारखे होईल त्यामुळे अधिक काही बोलत नाही. एवढी गुंतागुंतीची कथा वाचता आहात हेच माझ्यासाठी खूप आहे त्यामुळे अधिक काही बोलत नाही. पुढचा भाग लवकरच येईल.

आता मी संपल्यावरच पहिल्यापासून एकत्र वाचणारे नाहीतर माझा गोंधळ उडतोय. गेल्या भागात फारच गोंधळ झाला होता.
आत्ता जरा कमी.

हं !
खरचं इंटरेस्टिंग झालीय कथा आता ..
गुंतागुंत सुटत चाल्लीये खरी पण एवढ्या मोठ्या गॅप नी टाकली कि संदर्भ हरवल्यासारखे वाटतात ..
असो .. लिहित राहा लवकर लवकर..
बाकि माबोवरच वाचन पटापट होत पण तुमच्या या कथेचा भाग आला कि मी राखुन ठेवते ब्लँक माईंड असताना वाचायसाठी .. नै तर कळतच नै Lol

मस्त! बऱ्याच दिवसांनी भाग आला की गोंधळायला होतं! पण तुमच्या स्पष्टीकरणाने मदत झाली. ह्या भागाची वाक्य रचना जरा जास्तीच गुंतागुंतीची झाली आहे. बऱ्याच जागी योग्य विराम चिन्हे हवी होती असे वाटले. ती नसल्याने फार रसभंग होतो वाचताना.