टिम आयडेंटीटी - भाग १

Submitted by प्रकु on 15 June, 2015 - 09:11

पुण्यातील एका हॉटेलात ‘टिम आयडेंटीटी’चे गटग चालू होते. सर्व सहा सदस्य उपस्थित होते. कॉलेजात असताना ज्यांना आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा आहे अशा होतकरू तरुणांनी एकत्र येऊन ‘टिम आयडेंटीटी’ची स्थापना केली होती.

यामध्ये मुख्य पुढाकार होता तो ‘अंशुमन अंतुले’ याचा. अंशुमन अभ्यासात वगेरे ठीकठाक होता. पहिला वगेरे नाही कधी, पण चांगल्या मार्काने पास होत असे. आभ्यासाच तो फारसं मनावर घेत नसे. स्वतःची अशी ‘वेगळी’ ओळख निर्माण करण्याचे त्याचे ध्येय होते. तो नेहमी झपाटल्यागत त्याचाच विचार करीत असे. चे गुवेरा त्याचा आदर्श होता. त्याचा सर्वत्र दिसणारा टोपी आणि मोठ्या केसातला फोटो त्याचा ‘फेवरेट फोटो’ होता. तो त्याने आपल्या बेडरूम मध्ये उशीच्या बरोब्बर वरती छतावर लाऊन ठेवला होता. थकून भागून रात्री अंथरुणावर पडले, कि भक्तिभावाने त्या फोटोकडे पाहत तो निद्रिस्त होत असे. डोळा लागता लागता त्या टोपीखालचा चे चा चेहरा जाऊन आपला चेहरा आला आहे असा भास त्याला रोजच्या रोज होई. मग अंशुमनचे स्वतःचे अस्तित्व नष्ट होऊन चेंशुमन प्रकट होत असे. चेंशुमन म्हणजे चे + अंशुमन. (हे नाव सुद्धा त्यानेच ठेवले होते. पुढे मागे एफिडेवीट करून घ्यायचा त्याचा विचार होता.) पेहराव केशभूषा ‘चे’ ची बाकी अंशुमन. त्यातून मग पुढे एक स्वप्नांची मालिका सुरु होत असे.

‘एका उघड्या जिप्सीमध्ये मागे उभा राहून चेंशुमन शहरात प्रवेश करीत आहे. एक पाय जिप्सीच्या कठड्यावर. एक हात कमरेवर ठेवलेला. दुसऱ्या हातात एक झेंडा. झेंड्यावर मधोमध चेंशुमनचे ब्लेक अँड व्हाईट चित्र. नजर जमिनीपासून पंचेचाळीस अंश वरती. निरभ्र आकाशाचा वेध घेणारी. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची प्रचंड गर्दी. ‘चेंशुssss चेंशुss चेंशुssss चेंशुss’ अशा अखंड घोषणा. गाडी चालूच, सर्व लोक फक्त चेंशुकडे बघत आहेत बाकी कुठेही नाही. घोषणा चालूच. ‘चेंशुssss चेंशुss sss..............चेंश...चें.......’ हळूहळू घोषणा बंद. ‘अरे यार काय भारी वाटत होतं. अजून थोडावेळ ऐकल्या असत्या. झोपच.. आवरेना... काय.....पण......’ अशा प्रकारे चेंशु निद्रिस्त होत असे. सकाळी झोप चावळली कि पुन्हा घोषणा. ‘चेंशुss चेंशुs चेंशुss चेंशुs’ ‘आता लोक नव्या जोमाने रात्रीपेक्षा एकदम जास्त एनेर्जेटिक घोषणा देत आहेत’ ‘चेंशुss चेंशुs’ ‘अहाहा! क्या ब्बात है! चला आता मस्त आवरून कॉलेजला जाऊ. आज काहीतरी तुफानी केलीच पाहिजे. पूर्ण कॉलेजात हव्वा करायची आज आपली.’ असा काहीसा विचार करत चेंशुचा दिवस सुरु होत असे. अरे नाही, चेंशुचा दिवस संपत असे आणि अंशूचा दिवस सुरु होत असे.

कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून त्याची वेगळी ओळख निर्माण करण्याची मोहीम सुरु होती. पहिल्या दिवशी काय तर तो कॉलेजला सायलेन्सर खराब झालेली अतिशय कर्कश्य आवाज करणारी अॅक्टीव्हा घेऊन आला. दोन दिवसापासून सायलेन्सर खराब होऊन सुद्धा त्याने ते मुद्दाम दुरुस्तीला दिले नव्हते. का तर पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये एन्ट्री करताना सगळ्यांनी आपल्याकडेच पाहावे हा अट्टहास. आणि झाले तसेच. तो आल्या आल्या सगळे त्याच्याकडे पाहायला लागले. आपला प्लॅन सक्सेसफुल झाल्याचा त्याला जाम आनंद झाला. म्हणून त्याने गाडी दुरुस्तीला न टाकता तशीच वापरण्याचा घाट घातला.

तीन चार दिवस गेले. कॉलनीतल्या लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. आई-बाबांनीही त्याला अनेकदा गाडी दुरुस्त करायला सांगितले. पण त्याने काही ऐकले नाही. आयती मिळणारी प्रसिद्धी सोडायला त्याचे मन काही तयार होईना. त्यामुळे तो आपले तसेच दिवस काढत होता. कॉलनीतील लोकांचा असंतोष वाढत चालला होता. गडगडे नावाचे गृहस्थ कॉलनीच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष होते. त्यांचा आणि श्री अंतुले (अंशुमनचे वडील) यांचा जुना छत्तीसचा होता. अंतुल्यांनी गडगडेंच्या नातवाच्या वाढदिवसाला हळू आवाजात गाणे वाजवण्याची सूचना करून कार्यक्रमाचा निरस केला होता. त्याचा वचपा काढण्याची नामी संधी गडगडेंना या निमित्ताने मिळाली. त्यांनी तत्काळ त्याचा फायदा घेऊन अंतुलेंकडे एक लिखित पत्रक पाठवून दिले,

श्री अंतुले,
आपले चि. अंतुले अत्यंत आवाज करणारी, ध्वनिप्रदूषक दुचाकी वापरून परिसराच्या शांततेस बाधा पोहोचवत आहेत. वेळोवेळी विनंती करून त्याची दखल न घेतल्या कारणाने हा पत्रप्रपंच करावा लागत आहे असे आम्ही सखेद नमूद करू इच्छितो.

चि. अंतुले यांच्या दुचाकी मुळे होणारे दुष्परिणाम खालीलप्रमाणे :
१. वृद्धांचे आयुष्यमान घटत आहे.
२. तरुण मंडळी वृद्ध होत आहेत.
३. परिसरातील हिरवळ कमी होत आहे.
४. मुद्दा क्र. २ आणि ३ चा एकमेकांशी संबंध नाही.
५. लहान मुलांचा एलियन या संकल्पनेवर विश्वास बसत आहे. ‘‘ते’ दररोज सकाळी साडेनऊ आणि संध्याकाळी सहाला आपली पाहणी करायला येतात.(या आपल्या गाडीवान मुलाच्या येण्या जाण्याच्या वेळा आहेत.) ‘ते’ आता लवकरच आपल्याला पकडून नेणार आहेत’ अशी मुलांची धारणा होऊन त्यांच्यात दहशद पसरत आहे.
६. मागच्या वृक्षारोपणावेळी रस्त्याच्या दुतर्फा लावलेले लहान लहान वृक्ष उन्मळून पडत आहेत.
७. परिसरातील पक्षी नाहीसे होत आहेत. त्यामुळे झाडाखाली लावलेल्या गाड्या खराब होणे बंद होऊन त्याची साफसफाई करून उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

वरील सर्व मुद्द्यांची गंभीर दखल घेऊन आपण तत्काळ ध्वनिप्रदूषक दुचाकीचा वापर थांबवण्यासाठी योग्य पावले उचलावीत अशी आम्ही आपणास विनंती करतो. अन्यथा आम्हाला नाईलाजाने उपोषणाचे अस्त्र उगारावे लागेल (चि. अंतुलेंच्या तोंडाला काळे फासण्याचा जहाल मतवाद्यांचा प्रस्ताव देखील विचाराधीन आहे). आपण जुने आणि जबाबदार सदस्य आहात त्यामुळे प्रस्तुत प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा आमचा मानस आहे. आम्ही वाढदिवसाच्या वेळी सहकार्य केले तसे आपणही आता सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो.

तसदीबद्दल क्षमस्व. तत्काळ लेखी उत्तराची अपेक्षा करत आहोत.
सोबत सभासदांच्या सह्यांचा कागद जोडलेला आहे.

धन्यवाद.

ता.क. – एक दूरगामी परिणाम
मुद्दा क्र. ५ मधील अफवा स्त्रियांना हळूहळू खरी वाटायला लागल्यास त्याचा वेगाने प्रसार होण्यास वेळ लागणार नाही. शहराच्या आजूबाजूच्या खेड्यांतील लोक हि अफवा ऐकून शेवटचे दिवस मजेत घालवू म्हणून घरे जमिनी विकायला काढतील त्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात येईल. असा याचा दूरगामी परीणाम होऊ शकतो हे आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. धन्यवाद.

आपला विश्वासू
अ.र.गडगडे
(अध्यक्ष)
‘निर्मल नगर पर्यावरण मंडळ’

..........

गडगड्याचे असे खरमरीत पत्र पाहून अंशुमनच्या बाबांचा एकदम भडका उडाला. त्यादिवशी अंशूला यथेच्छ चोप आणि यापुढे बसने कॉलेजला जाण्याची शिक्षा मिळाली. दुसऱ्या दिवशी श्री अंतुले स्वतः रजा टाकून गाडी (ढकलत) नेऊन दुरुस्तीला देऊन आले आणि सभासदांना समक्ष भेटून त्यांचा राग शांत केला.

पहिल्याच आठवड्यात गाडीची सोय गेल्यामुळे अंशुमन थोडा नाराज झाला. परंतु त्याच्या करामती मात्र सुरुच राहिल्या. कधी कोणाच्या दुचाकीवर मागे मागच्या बाजूला तोंड करून बसून कॉलेजचा एक राउंड मारून येणे, कधी मुसळधार पावसात सगळे आडोशाला उभे असताना पावसात जाऊन हात पसरून उभे राहणे, कधी कॉलेज समोरच्या ग्राउंड मध्ये उंचच उंच बॉल फेकत कॅच कॅच खेळणे, एक ना अनेक. याचेच फळ म्हणून कि काय कॉलेजातले बरेच जण त्याला ओळखू लागले होते. काय म्हणून ओळखतात मूर्ख म्हणतात कि हुशार म्हणतात याची त्याला पर्वा नव्हती. लोक आपल्याला ओळखतात हे पाहूनच तो आपल्या परफॉर्मन्स वर खुश होत असे.

दरम्यान कॉलेजमध्ये त्याला दोन जिगरी मित्र सुद्धा मिळाले. जयेश कुमार आणि सुदीप निकम. ते आपले अंशुमनच्या बढाया ऐकत, कधी स्वतः बढाया मारत त्याच्यासोबत फिरत असत. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे आपले ध्येय अंशुमन सगळ्यांना खुलेपणाने सांगत असे. विविध सेलिब्रिटीज, ते जगात कुठेही गेले तरी त्यांच्या मागे फिरणारे लोक. अशा अनेक कथा तो सांगत असे. ते ऐकून या दोघांनाही मग आपलीपण अशी वेगळी ओळख निर्माण व्हावी असे वाटून जाई. त्यांचे हे वाटणे मात्र क्षणिक असे. अंशुमन सारखे ते ध्येयाने झपाटले वगेरे जात नसत.

कॉलेजचे स्पोर्ट्स आणि डेज हा अंशुमनसाठी अत्यंत महत्वाचा काळ असे. कॅरम, क्रिकेट, टेबल टेनिस अशा खेळांमध्ये पारंगत असल्याने त्याचा खेळाच्या मैदानावर दबदबा होता. तो त्याच्या वर्गाचा क्रिकेट कप्तान होता. त्यातही तो नेहमी पहिली फलंदाजी आणि पहिली गोलंदाजी करत असे. या दोन्हीला तो योग्य न्याय सुद्धा देत असे. त्यामुळे कोणी त्यावर कधी आक्षेप घेतला नाही. क्रिकेटमध्ये दोन,तीन आणि इतर सर्व खेळांमध्ये मिळून दोन,तीन असे दरवर्षी पाच ते सहा पारितोषिके अंशुमनला मिळत असत. पूर्ण कॉलेज खरोखर कौतुकाने त्याच्याकडे बघत असे. तो त्याच्या वर्षातला सर्वोत्तम काळ असे. हि मिळणारी प्रसिद्धी, निर्माण होणारी ओळख त्याला सुखाऊन जात असे. स्पोर्ट्स नंतर येणाऱ्या डेजमध्येही विशेष हटके काहीतरी करण्याचा त्याचा प्रयत्न असे.

असेच तिसऱ्या वर्षात असताना ग्रुप-डे चा प्लॅन करते वेळी त्याला एक नामी कल्पना सुचली. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा असणाऱ्या मुलांचा एक ग्रुप तयार करायचा. पूर्ण ग्रुप साठी सारखे टी-शर्ट शिवून आणायचे असे त्याने ठरवले. जयेश आणि सुदीपने फारसा विचार न करता या कल्पनेला होकार दिला. अंशुमनच्या आग्रहाखातर ग्रुपचे ‘टिम आयडेंटीटी’ असे नामकरण करण्यात आले. आता ते ग्रुप साठी आणखी सदस्य शोधण्याच्या मोहिमेला लागले.

अंशुमनने आपल्या इतर काही मित्रांना हि कल्पना ऐकवली. त्याच्या ओळख निर्माण करण्याच्या फिलोसॉफी मध्ये कोणाला फारसा रस नव्हता, तरी अजून चार-पाच जणांनी ‘टिम आयडेंटीटी’ हे नाव आवडल्यामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा, पण अंशुमनच्या कल्पनेला होकार दिला. अशा प्रकारे आठ जणांची ‘टिम आयडेंटीटी’ तयार झाली आणि अंशुमन त्या टिमचा अघोषित लीडर झाला. टिमसाठी शर्ट तयार करून आणण्याची जबाबदारी त्याने स्वतःकडे घेतली. आपल्या टिमचा पहिला ग्रुप डे त्याला एकदम खास करायचा होता. त्याकरता शर्टही खासच हवा. म्हणून मग त्याने मुंबईच्या एका मित्राला फोन करून तिकडे शर्ट तयार करायला टाकले. ग्रुपचे नाव एकदम उठून दिसायला हव वगेरे वगेरे गोष्टी बजाऊन सांगितल्या. शर्ट तयार करून ते मुंबईहून पार्सलने पाठवण्यात येणार होते.

ग्रुप डेचा आदला दिवस उजाडला. अजून पार्सल काही आले नाही. अंशुमनचे मुंबईला चार फोन करून झाले. ड्रेस अजून तयारच होत होते. त्याच्या मनात नाना विचारांचे काहून माजले. बेकअप प्लॅन म्हणून त्याने सलमान स्टाईल पांढरे बनियान घालून त्यावर काळ्या लिपस्टिकने ‘टिम आयडेंटीटी’ लिहून जावे म्हणजे हटके दिसेल अशी योजना आखून ठेवली. जयेश-सुदीपला तत्काळ त्याने हि योजना सांगितली. पुढचे दोन-तीन मिनिटे शांततेत गेले. कोणीच काही बोलले नाही.

हळूहळू आपण जे ऐकले तो भास नव्हता, अंशुमन खरेच असे बोलला याचे दोघांना आकलन झाले. मग मात्र जयेशने अंशुमनला कडाडून विरोध केला. आपल्या टिम लीडरचे बुद्धिचातुर्य पाहून सुदिपचे डोळे रीनच्या जाहिरातीतल्या बनियनपेक्षाही जास्त पांढरे झाले. त्याला काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळेना. थोडे सावरल्यावर त्याने काहीच न बोलता ‘काळी लिपस्टिक असते का.?’ या त्या मानाने सोप्या प्रश्नावर विचार करत बसण्याचा निर्णय घेतला. इकडे अंशुमन आणि जयेशच्या मसलती सुरु होत्या,

‘काहीपण काय अंश्या.? कॉलेजमध्ये.? बनियानवर.? मंदावला का काय.?’

‘काहीपण काय त्यात.? सलमान तर......’

‘सलमान आणि सामान्य नागरिक मध्ये फरक असतो भाऊ. त्याने लोकांना चिरडून मारल तरी लोक त्याच्यासाठी प्रार्थना करताएत. तू एखाद्या म्हाताऱ्याला गाडीने छोटीशी धडक दे बर. हेच लोक तुला मारायला धावतील.’

‘तोच तर फरक आपल्याला घालवायचाय. मगच आपली आयडेंटीटी तयार होईल ना.’

‘कसली आयडेंटीटी.? काहीपण काय यार..’

‘आरे तेच तर आपल्या ग्रुपच एsम आहे.’

‘हो पण म्हणून कोणीही बनियानवर कॉलेजला जायला तयार होणार नाहीये. हि आयडिया ऐकून सगळे आपली टिम सोडून जातील.’

या युक्तिवादावर मात्र अंशुमन निरुत्तर झाला. टिमच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला म्हणल्यावर त्याने शांतपणे माघार घेतली आणि पुन्हा मुंबईला फोन केला. दुपारपर्येंत शर्ट तयार होणार होते पण आता ते पार्सलने मागवण्यात अर्थ नव्हता. शेवटी अंशुमन स्वतःच मुंबईला जाऊन धावपळ करून शर्ट घेऊन आला. त्याय घरी यायला रात्री बराच उशीर झाला. दुसऱ्याच दिवशी ग्रुप डे होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी ‘टिम आयडेंटीटी’ सर्व मेंबर्स ठरल्या प्रमाणे एका मित्राच्या रूमवर जमले. अंशुमन विजयी मुद्रेने शर्ट घेऊन आला व एकेकाला देऊ लागला. शर्ट काळ्या रंगाचे होते. त्यावर मागच्या बाजूला रबर प्रिंटने या खांद्यापासून त्या खांद्यापर्येंत ‘टिम आयडेंटीटी’ असे लिहिलेले होते. त्याखाली एक झक्कासपैकी चित्र होते. सगळ्यांना मागची बाजू आवडली. पुढची बाजू पाहून मात्र पुन्हा दोन-तीन मिनिटे शांतता पसरली.

पुढच्या बाजूला एकामागे एक असे बरेच एल-ई-डी लाऊन छातीवर ‘टिम आयडेंटीटी’ असे लिहिण्यात आले होते. त्याखाली एल-ई-डी नेच ‘आयडेंटीटी’चा आय तयार केलेला होता. शर्टाच्या खालून एक काळी आणि एक लाल अशा दोन वायर्स बाहेर आलेल्या दिसत होत्या. म्हणजे ते एल-ई-डी शोभेसाठी नसून चालू होणारे होते. सर्वांनी शांतपणे अंशुमन कडे पहिले. त्यालाही कळेना आता काय प्रतिक्रिया द्यावी. तोही ते शर्ट पहिल्यांदाच पाहत होता. कॉलेजला जायची वेळ होत आली होती. त्यामुळे आता जे समोर आहे त्याला चांगले म्हणण्याशिवाय काही पर्यायच नाही हे त्याने ओळखले. तो म्हणाला,

‘अरे वा, छानच आयडिया आहे. काहीतरी इंजिनियरिंग वापरल्या सारख दिसेल.’

बाकी ग्रुप मेंबर्स अजूनही शांतच होते. त्यातले दोन जण एकदम डीसेंट वगेरे टाईपचे होते. त्यांनी साधा थोडी चमकी असलेला शर्टपण कधी घातलेला नव्हता. ह्याने डायरेक्ट एल-ई-डीच लाऊन आणले म्हणल्यावर त्यांची चांगलीच सटकली, ‘तू हे अस डिझाईन चॉइस केल होतं.?’ त्यातला एकाने विचारले.

‘नाही म्हणजे.... खरतर मीपण शर्ट पहिल्यांदाच पाहतोय. मी एका मित्राला सांगितल शर्ट बनवायला टाक म्हणून. तो डान्सर आहे ना, ते नेहमी त्याच्याकडूनच बनवून घेतात. म्हणून.’ इति अंशुमन.

‘छान. एखादा फोटो तरी पाठवायला लावायचा होतास डिझाईनचा.’

‘आणि आतून हे एल-ई-डीचे पाय ओपनच आहेत. शर्ट घातल्यावर टोचणार नाहीत काs.?.’ दुसराही सुरु झाला. दोघेही भांडणाच्या पवित्र्यात आले होते.

‘हो ना. राहून गेल वाटत गडबडीत. घाई झाली ना जरा.’ अंशुमन आपला त्यांना काहीतरी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करत होता. ग्रुप-डेचा प्लॅन फसू नये अशी त्याची मनापसून इच्छा होती.

‘हो ते ठीके पण आता काय करायचं.? चिलखत घालायचं का आतून.’

‘अं.... आयडिया चांगली आहे तशी. पण ते चिलखतं मिळवणार कुठून.?’

‘काय चांगली आयडिया ए. औघडे यार तुझ. मी काही असा शर्ट घालून येणार नाहीये. जाउदे जातो मी घरी. तुम्ही जा कॉलेजला. बेस्ट ऑफ लक’ असे म्हणून एकजण तर निघून गेला. आता दुसराही जाण्याच्याच तयारीत होता.

‘आणि हे एल-ई-डी चालू कसे करायचे भाऊ’ त्याने विचारले.

‘ते ना. अं..... काही बॅटरी वगेरे आहे का पाहतो..... तसे आपल्या हृदयात एक मोठा बल्ब लावण्याईतकी पॉवर असते म्हणे’

‘मग काय आता हृदयात तारा खुपसतो का.?’

‘नाही. बघू ना काहीतरी. बॅटरी तर नाही दिसते यात.’

‘राहूद्या नाहीये तर. असती तरी काय अस लायटिंग अंगावर घालून येणार नव्हतोच मी’ असे म्हणून तोसुद्धा शर्ट अंशुमन देऊन कडे निघून गेला.

बाकी जयेश आणि सुदीप तर थांबणारच होते. पण उरलेले तिघे आकाश, प्रसाद आणि निखीलसुद्धा थांबले. ते तसे जरा संभ्रमातच होते. पण अंशुमन त्यांचा चांगला मित्र होता, सो ‘दुसरं काहीतरी करू पण एकत्रच करू’ म्हणून ते थांबले. अंशुमनने त्यांना ‘हा लास्ट ग्रुप-डे आहे, काहीतरी हटके करूया, पुढच्या वर्षी प्रोजेक्ट असेल’ वगेरे वगेरे गोष्टी सांगून हाच प्लॅन राहू देऊ म्हणून आग्रह धरला. आत्ता शेवटच्या क्षणी दुसरे काही करणेही शक्य नव्हते म्हणून शेवटी सगळ्यांनी हाच प्लॅन राहू द्यायचे मान्य केले.

प्लॅन तर तसाच राहिला होता. आता एल-ई-डी कसे चालू करायचे यावर विचार करणे गरजेचे होते. अंशुमनने पुन्हा मुंबईच्या शर्टवाल्याला फोन लावला. त्याच्याकडून गडबडीत बॅटरीच सांगायचं राहून गेल होतं म्हणे. फोनवरूनच त्याने कोणती बॅटरी आणायची ते सांगितले. आपली भारतीय लोकांची एक खासियत असते. बऱ्याच गोष्टींचा आपल्याला अट्टहास असतो. त्यासाठी धावपळ गडबड गोंधळ झाल्याशिवाय आपल्याला कामाचा फील येत नाही. तसच अंशुमनच होतं. बाकी ग्रुप मेंबर्स म्हणाले ‘अरे जाऊदे. तसेच शर्ट घालून जाऊ. तसेही लाईट एवढ्या उन्हात कुठे दिसणार आहेत.’ पण नाही. हा निघाला बॅटऱ्या आणायला. चार दुकानं शोधल्यावर त्याला हव्या तशा बॅटऱ्या मिळाल्या तेव्हा कुठे त्याला बरे वाटले. त्या घेऊन तो रूमवर आला.

रूमवर सगळे त्याचीच वाट पाहत होते. बॅटरी दोन पेन्सिल सेल एकत्र करून जेवढा आकार होईल तेवढी आणि आयताकृती होती. त्याच्या वरच्या बाजूला दोन वायर्स जोडून ते प्रेसफीट करण्याची व्यवस्था होती. बॅटरी बरोबर स्पेसिफिकेशनची आहे कि नाही ते त्यांनी नीट तपासून पहिले अन्यथा सगळे एल-ई-डी निकामी होण्याची शक्यता होती. मग निघून गेलेल्या दोघांच्या शर्टला बॅटरी लाऊन प्रयोग करण्यात आले. सर्व एल-ई-डी व्यवस्थित चालू होत होते. हे काम बिनघोर पार पडल्याबद्दल सगळ्यांनी अंशुमनचे हार्दिक अभिनंदन केले.

आता सर्वांना कॉलेजला जायची घाई झाली होती. दोन मिनटात सगळ्यांचे आवरून झाले. एल-ई-डीचे पाय टोचू नये म्हणून त्यांनी आतून एक शर्ट त्यावरून हा एल-ई-डीचा शर्ट घातला होता. शर्टाच्या खालून निघणाऱ्या वायरी पॅंटच्या खिशात जात होत्या. त्याप्रमाणे सगळ्यांनी आपापल्या बॅटऱ्या त्या खिशात ठेवल्या आणि वायरी त्याला जोडून टाकल्या. मनातून त्यांना जरा धाकधूकच वाटत होती लोक काय म्हणतील म्हणून. अंशुमन मात्र एकदम आनंदात होता. त्याची काहीतरी हटके करण्याची हौस पूर्ण होत होती. आज सगळेजण त्यांच्याकडे पाहणार होते. तो शर्टकडे बघत आपल्या ‘टिम’मेट्सला उद्देशून उत्साहाने म्हणाला,

‘येस! याला म्हणतात काहीतरी हटके. हव्वाए आपली आज कॉलेजमध्ये.’

बाकीच्यांनाही लाईट लागल्यावर जरा हटके काहीतरी केल्यासारख वाटायला लागलं होत. सगळे थोडे साशंक मनाने तरी उत्साहाने कॉलेजला निघाले. आज चांगल काही होईल कि नाही ते माहित नव्हत. पण वेगळ काहीतरी नक्कीच होणार होतं. कॉलेजला जाण्यासाठी रूममधून बाहेर पडल्यावर सगळ्यांनी आपापल्या बॅटऱ्या डिस्कनेक्ट करून लाईट्स बंद करून ठेवले. अंशुमनने मात्र चालूच ठेवले होते. आकाशने त्याची फिरकी घ्यायला सुरुवात केली,

‘अंश्या. ऊन आहे बरका बाहेर. गरम होऊन एल-ई-डी फुटतील आणि तोंड काळ होईल.’ जोरदार हशा पिकला.

‘इथेच तर आहे कॉलेज. आणि तुमच्या सारख्या मित्रांसोबत राहून आधीच माझ तोंड काळ झालेलं आहे.’ अंशुमन म्हणाला. सगळे ‘हो का साल्या’ म्हणून अंशुमनच्या मागे धावले. त्यांची मस्ती मारामारी सुरु झाली तेवढ्यात एकजण म्हणाला,

‘ए ए ए आज मस्ती करू नका बरका. घर्षणाने हिट निर्माण होते. एल-ई-डी फुटले तर ठीके एकवेळ. पण बॅटरी फुटली तर अस्थानी अपंगत्व यायचं.’ यावर सुरुवातीला सगळे हसले खरे. नंतर मात्र त्यांना खरच चिंता वाटू लागली.

‘काय यार काहीपण डोक्यात घालून देतो. बॅटरी फुटेल म्हणे. दिवसभर टेन्शन राहील डोक्याला.’

‘हो ना. बॅटरी खरच फुटते ना हिट ने.?’

‘हो बहुतेक. फुटते बॅटरी.’

‘आरे...! काहीही काय, आगीत वगेरे टाकल्यावर फुटते बॅटरी. उगाच काहीही विचार करू नका. एवढी हिट निर्माण होणारे का घर्षणाने.’ अंशुमनला नवीन शंका नको होत्या.

‘पण झालीच तर काय करणार.? किती घाण किस्सा होईल.’ मन चिंते ते वैरीही न चिंते म्हणतात ते हेच.

‘काही नाही होत चला गपचूप. खिशात हात घालून ठेवा. चटका बसायला लागला कि काढून फेकून द्यायची बॅटरी.’

‘हं म्हणजे कॉलेजमध्ये स्फोट होईल आणि आपल्याला अटक.’

‘हं होईल अटक. काय करायचं मग आता.? जायचं का परत निघून.?’ अंशुमन वैतागला.

‘नाहीरे अंश्या. गंमत चालुए आपली. तू एवढा मुंबई पालथी घालून नर्तक मित्राकडून शर्ट शिवून आणले, अस कस घरी जायचं आपण’ पुन्हा अंशुमनच्या फिरक्या घेणे सुरु झाले.

‘होना. किती वणवण भटकाव लागलं बिचाऱ्या अंश्याला.’

‘राहूद्याss चला!’

‘ए पण पोरांनो आज सांभाळून राहा बरका. आग ओकणाऱ्या मास्तरांसमोर जाऊ नका. नाहीतर झालाच समजायचा स्फोट.’

‘हो आणि हॉट पोरींना खेटायला जाऊ नका. नाहीतर नियती तिथल्या तिथे शिक्षा देईल.’

‘तू रे अंश्या. त्या सुलोचनापासून दूर रहा जरा. नाहीतर जाशील सेल्फी काढायला न ढम्मकन स्फोट व्हायचा. बिचारी सुलो घाबरून जाईल.’

‘शिवाय नंतर सेल्फीमध्ये काळा धूरच दिसायचा फक्त.’

‘बर. अजून काही.’ इति अंशुमन.

‘नाहीरे फक्त धूर कसा. सुलो किती गोरीपान आहे अंश्याची. ती दिसेल ना सेल्फित. आपला अंश्या मात्र......’

‘बाsस..... कळाल.... अजून.?’

‘सध्यातरी काहीनाही. वेळोवेळी आम्ही सूचना देत राहू तेव्हा फक्त लक्ष ठेव.’‌

‘बर ठीके.’

गमतीजमती करत सगळे कॉलेजला पोहोचले. इतर ग्रुप मेंबर्स एल-ई-डी लावायला जरा टाळाटाळ करत होते. आत जाऊन जरा रागरंग पाहू मग लाऊया हळूच असे त्यांचे म्हणणे पडले. अंशुमनने मात्र परत सगळ्यांना काहीतरी भाषण देऊन गेटमध्ये थांबूनच एल-ई-डी चालू करायला लावले. सुदीपच्या कनेक्शन मध्ये नेमकी काहीतरी गडबड व्हायला लागली. बॅटरीवर वायर्स लावल्या होत्या तिथे हाताने दाबून ठेवले तरच एल-ई-डी सुरु राहत होते.
अंशुमनने लगेच पुढाकार घेऊन त्याला आपली बॅटरी देऊन स्वतः त्याची बॅटरी घेतली. यातही त्याची एक योजना होतीच. त्याने एक हात खिशात घालून अंगठा योग्य प्रकारे बॅटरीवर अॅडजस्ट केला आणि ते प्रेशर कमी जास्त करून एल-ई-डी चालू बंद करू लागला.

चमकदार अशा ‘टिम आयडेंटीटी’ने पार्किंगमधून आत प्रवेश केला. समोरून काही जणांनी त्यांचे लाईट नोटीस केले, इतरांना मात्र उन्हामुळे ते दिसतच नव्हते. कॉलेजच्या इमारतीत गेल्यावर मात्र ते बर्ऱ्यापैकी नोटीस होऊ लागले. सगळेजण त्यांना काहीना काहीना कॉम्प्लिमेंट देत होते. शिक्षकांपर्येंत हि बातमी पोहोचल्यावर ‘टिम आयडेंटीटी’ला स्टाफरूम मध्ये पाचारण करण्यात आले. सगळ्यांनी कुतुहलाने कसे केले, काय केले वगेरे चौकशी केली. यांनीही मग आयडिया आमचीच होती, ते कापडावर नीट बसवता यावे म्हणून मुंबईला करायला दिल्याचे सांगितले. कनेक्शन्स मात्र आम्ही केल्याचे सांगितले. बऱ्याच जणांनी ग्रुपच्या नावावरून फिरक्या घेतल्या.

कॉलेजमध्ये प्रत्येक डेच्या शेवटी संध्याकाळी त्या दिवसाच्या सर्वोत्तम परफॉर्मन्सला बक्षीस देण्याची प्रथा होती. काहीतरी का होईना इंजिनियरिंग वापरली म्हणून त्या दिवशीचे बेस्ट ग्रुपचे पारितोषिक चक्क ‘टिम आयडेंटीटी’ला मिळाले. स्टेजवर जाऊन अंशुमन रोख रुपये ३००१/- चे पारितोषिक घेऊन आला. टाळ्यांचा जोरदार कडकडात झाला. टिम मेंबर्सच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ते खालून ‘अंशूsss अंशूss’ अशा घोषणा देत होते. आपल्या नावाच्या घोषणा ऐकून तर त्याला गलबलूनच आले. त्याचे कित्येक दिवसांचे स्वप्न पूर्ण होत होते. कॉलेजमध्ये दर ‘डे’चा समारोप डीजे लाऊन केला जात असे. सर्वजण बेफाम नाचत असत. अंशुमन स्टेजवरून खाली येत असतानाच तो डीजे सुरु झाला. त्याच्या मित्रांनी त्याला खांद्यावर उचलून घेतले आणि ‘हिप हिप हुर्रे’ ‘इस्ट अॅण्ड वेस्ट अंशू इस द बेस्ट’च्या आरोळ्या दिल्या. ‘टिम आयडेंटीटी’चे सर्व मेंबर्स त्या दिवशी तुफान नाचले. इतरही सगळेजण त्यांच्या आनंदात सहभागी झाले.

त्या दिवशी रात्री ते सहाजण हॉटेलमध्ये जेवायला गेले. सगळे एकदम आनंदात होते. अंशुमनने हि कल्पना लाऊन धरल्याने, धडपड केल्याने हे सगळे झाले त्याबद्दल सर्वांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले. अंशुमनने सुद्धा विनयाने तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे हे झाले असे म्हणून क्रेडीट त्यांना परत केले. सर्वांनी पार्टी मस्त एन्जॉय केली. त्यांच्या कॉलेज लाईफमधला तो एक अविस्मरणीय दिवस होता.

ग्रुप-डेच्या निमित्ताने स्थापन झालेली हि ‘टिम आयडेंटीटी’ पुढेही तशीच राहिली. ते सहाजण नेहमी सोबत राहू लागले. सबमिशन्स, लायब्ररीत थोडासा आभ्यास, उरलेला वेळ गप्पागोष्टी अस करत दिवसातला बराच वेळ ते सोबत घालवत असत. त्यांच्यामधले मैत्रीचे बंध यादरम्यान नकळतपणे एकदम घट्ट होऊन गेले. पाहता पाहता कॉलेजामधल त्यांच शेवटच वर्ष सरल. नोकरीची शोधाशोध वगेरे सुरु झाली. हे सगळे तसे पुण्याचेच होते. त्यामुळे अधूनमधून त्यांच भेटणं होत असे.

अंशुमन आणि जयेशला पहिल्या एकदोन महिन्यातच नोकऱ्या मिळाल्या. बाकी चौघांना मात्र काही काम मिळेना. कॉलेज संपून सहा आठ महिने लोटले तरी त्यांचा शोध काही संपायची चिन्हे नव्हती. अंशुमनही त्याच्या कंपनीतल्या कामाने पुरता हताश झालेला होता. त्याच्या मते कंपनीमध्ये त्याला सेपरेट अशी काही आयडेंटीटीच नव्हती. त्यामुळे त्याला तिथे काही करमेना. तो नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळ करायची योजना आखत होता. आपली नवीन योजना टिम बरोबर शेयर करण्यासाठीच त्याने आजचे म्हणजे जिथून हि कथा सुरु झाली ते गटग आयोजित केले होते.

एकमेकांची प्राथमिक विचारपूस झाल्यावर अंशुमनने लगेच विषयाला हात घातला,

‘यार ते कंपनीमध्ये काही मजा नाही येते राव मला. मी काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात आहे. काहीतरी व्यवसाय वगेरे.’

‘मलापण आता हे जॉब वगेरे शोधण्यात वेळ घालवू नये, सरळ काहीतरी व्यवसाय सुरु करावा अस वाटतय. किती दिवस टाईमपास करणार. घरी बसायलापण नको वाटत आता’ आकाश म्हणाला.

‘हो यार खरं आहे. घरी बसायचं म्हणजे अवघड काम आहे’ इतरांनी त्याला अनुमोदन दिले.

‘काय करायचं ठरवलंय मग तुम्ही.?’ अंशुमनने विचारले.

‘आमच अस ठरलं नाही अजून काही. पाहूया विचार करून. तुझा काय विचार आहे अंश्या.? तू काहीतरी म्हणत होतास ना.? काहीतरी नवीन आयडिया सांगणार आहेस म्हणून’

‘हं तेच. माझा तोच विचार चालू होता काय करायच त्याचा. मध्ये नाशिकला गेलेलो मावशीकडे. तेव्हा काकांशी बोलणं झाल जरा. ते रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत आणि आता सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रोव्हाईड करण्याचा व्यवसाय करतात. तर ते म्हणत होते तुम्ही मित्रांचा काही ग्रुप वगेरे असेल तर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी वगेरे काढू शकता. मेट्रोपोलीटन सीटीज मध्ये चालेल तसा व्यवसाय.’

‘डिटेक्टिव्ह एजन्सी.? साउंड्स इंटरेस्टिंग. पण अस खरच असत का काही.? म्हणजे अशा एजन्सीज वगेरे.? मी अशी खऱ्यामध्ये कोणी डिटेक्टिव्ह एजन्सी वगेरे चालवत अस ऐकलेलं नाहीये’ निखिलने प्रामाणिकपणे शंका उपस्थित केली.

‘हम्म मी पण काही ऐकलेलं नाहीये अस. आपण स्थापन जरी केली समजा तरी केसेस कोण देईल आपल्याला.?’ सुदीप म्हणाला.

‘नाही हे असतात खरं अशा गोष्टी. आपल्याला माहित नाही. म्हणजे अगदी खुनाच्या वगेरे केसेस नाही मिळत लगेच. पण इतर वेगळ्या केसस मिळू शकतात. म्हणजे आता लग्न करण्याआधी समोरचा मुलगा किंवा मुलगी कसे आहेत अशी माहिती काढण्यासाठी सुद्धा आजकाल डिटेक्टिव्हची मदत घेतली जाते. अस काहीतरी पासून सुरुवात करता येईल’ इति अंशुमन.

‘हो अस एक आर्टिकल वाचलय मी. इंडियन एक्स्प्रेस मध्ये आल होत. दिल्लीमध्ये वगेरे आहेत अस काम करणारे लोक.’ आकाश म्हणाला.

‘हं इथे पुण्यात पण आहेत एक दोन अस म्हणत होते काका’ अंशुमन म्हणाला.

‘डिटेल मध्ये सांग कि जरा काय डिस्कशन झाल ते’

‘डिटेल म्हणजे खूप काही डिटेल मध्ये नाही झालं. ते म्हणाले ग्रुप तयार असेल तुमचा तर बोलू आपण अस. आपण हव तर आत्तापण स्काईप थ्रू डिस्कशन करू शकतो त्यांच्याशी. आधी कोण कोण तयार आहे ते सांगा.’

‘सद्ध्या तरी मी घरीच आहे सो मला तरी काही प्रोब्लेम नाही. आय एम इन’ आकाश म्हणाला.

बाकीच्यांनीही मग प्रायोगिक तत्वावर का होईना करून तर पाहू, तसेही घरी बसून काय करणारे. शिवाय इन्वेस्टमेंटपण लगेच काही करायची नाहीये म्हणून लगेच होकार दर्शवला. जयेशने मात्र नोकरी सोडून त्यांना सामील होण्यास तयार झाला नाही. त्याचेही बरोबरच होते. हातच सोडून पळत्याच्या पाठीमागे कोण जाईल.

अंशुमनचा कंपनी सोबत असलेल्या कराराचा कालावधी संपत आला होता. त्यामुळे तो तर तयारच होता. बाकी सगळे इतक्या पटकन तयार झालेले पाहून त्याच्यात उत्साह संचारला. त्याने लगोलग काकांना स्काईप लाऊन टिमची आणि काकांची ओळख करून दिली. काकांनी टिमला काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या. पुढच्या
आठवड्यात पुण्याला आल्यावर ते त्यांना पुढील मार्गदर्शन करणार होते.

अस बिझनेसच डिस्कशन वगेरे करून सगळ्यांना आपण प्रोफेशनल्स असल्यासारखे वाटू लागले. जेवण वगेरे झाल्यावर नेहमीच्या कट्ट्यावर थांबून त्यांनी काहीवेळ गहन चर्चा केली. याच दरम्यान ‘टिम आयडेंटीटी’ या नावाचा शोर्टफॉर्म करून ‘टिआय डिटेक्टीव्ह एजन्सी’ किंवा ‘टिआयडिए’ असे त्यांनी आपल्या संस्थेचे नामकरण सुद्धा करून टाकले. यथेच्छ गप्पा झाल्यावर ‘बघूया आता काय काय होतंय’ म्हणून सगळे आपापल्या घरी गेले.

त्यांना त्यावेळी कुठे माहिती होत कि पुढच्या चार दिवसातच त्यांना त्यांची पहिली केस मिळणार आहे म्हणून!

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला क्रमशः ..
चांगलय.. तेवढ ते खाली लिहा आणि शिर्षकात भाग १ वगैरे पन.. म्हणजे वाचणार्‍याला कल्पना येते Happy

मला डिटेक्टिव गिरि च्या कथा खुप आवडतात.
पण तुमची कथा करमणुकीत पण लय भारी निघाली.
' मग काय आता हृदयात तारा खुपसतो का.?'

चटका बसायला लागला
कि काढून फेकून द्यायची बॅटरी.’

‘हं म्हणजे कॉलेजमध्ये स्फोट होईल आणि
आपल्याला अटक.’

पोट धरुन हसलो मी.
वाचकांना धरुन ठेवण्यात हा भाग यशस्वी राहीला.