// कहानी "कुंची"की\\
मध्यंतरी कपाट आवरताना एका प्लॅस्टिक पिशवीत एक कुंची सापडली. सापडली म्हणजे ती हरवलेली नव्हतीच. ती फ़क्त पुढे आली.
ती कुंची आधी माझ्या नणंदेकडे होती. कलांतराने कधी तरी ती कुंची नणंदेने माझ्या धाकट्या जावेला दिली होती.....जेव्हा आमच्या घरातल्या सर्वात छोट्या(आणि लाडक्या) सदस्याचा जन्म झाला...... माझी पुतणी.
त्या आधी नणंदेने तिच्या मुलींसाठी ती कुंची वापरली होती. त्यातल्या मोठीचे, ती कुंची घातलेले गोड फ़ोटो आहेत.
मग हळूहळू कुटुंबातली मुलं मोठी होत गेली. आणि ती कुंची दृष्टीआड आणि विचाराआड सुद्धा.
नंतर परत कधी तरी जावेने ती कुंची माझ्या स्वाधीन केली. तिची लेक मोठी झाल्यावर! मी ती कपाटात ठेवली. हो......कारण माझीही मुलं आता मोठी झालेली होती.
आताच एक महिन्यापूर्वी माझ्या (मामे)भावाला नातू झाला. या नातवाला भेटायला माझा भाऊ अमेरिकेला जाणार आहे. कारण या माझ्या भावाचा मुलगा आणि सून ........आणि आता नातू ...सुद्धा अमेरिकेत असतात. आणि भावाची सून मेक्सिकन आहे.
आता भावाबरोबर नातवाला काही तरी पाठवायचं म्हणून मी बाळंतविडा करायला घेतला. आणि भावाचा मुलगा त्याच्या मेक्सिकन बायकोला......भारतातून आत्याने "बाळंतविडा" पाठवलाय.........हे कसं समजावून सांगेल, याचा विचार करत २ दुपटी, २ झबली/सुरकी*(हा शब्द माहिती नसल्यास तळटीप पहावी!) शिवली. एका मैत्रिणीला स्वेटरचा सेट विणायला सांगितलं. कारण माझ्या मेंदूचा विणकामाचा भाग बंद आहे.
मग डोक्यात आलं.......नुसती झबली, दुपटी पाठवण्यात इतकं काहीच विशेष नाही. आता तिकडे अमेरिकेत रहाणाऱ्या आपल्या मेक्सिकन सुनेला भारतीय/महाराष्ट्रियन संस्कृतीचं वैशिष्ठ्य नको का दाखवायला?
मग एकदम "त्या" कुंचीची आठवण झाली. लगबगीने "ती" कुंची बाहेर काढली. इतकी जुनी असूनही जाणवणारी सुंदर सफ़ाईदार शिलाई, जरीच्या बुट्ट्यांचा आणि रेघारेघांच्या काठांचा कल्पक उपयोग करून बनवलेले छान डिझाईन, पुढे चेहेऱ्याभोवती महिरपीसारखे शोभणारे लाल गोंडे!
पण आता या कुंचीला किंचित जुनकट वास येऊ लागलेला. हो.... .......इतकी जुनी म्हटल्यावर थोडा वास येणारच. पण इतकी जुनी म्हणजे किती? काही अंदाज आहे का तुम्हाला? माझ्या नणंदेच्या आणि जावेच्या मुलींनी वापरलेली म्हणून ती जुनी .......असं नाहीच बरं का? असं म्हणत असाल तर तुमचा अंदाज चूक!
मगं तुम्ही म्हणाल.............त्याही पेक्षा जुनी म्हणजे तुमच्या पिढीने वापरलेली, म्हणून जुनी?
नाहीच्च! म्हणजे माझ्या नवरोबांनी आणि त्यांच्या भावंडांनी तर ती वापरलीच. पण इथेही तुमचा अंदाज चूकच बरं का!
कारण ही कुंची त्याहीपेक्षा पाठीमागच्या काळाची साक्षिदार होती...
हो हो..........माझ्या सासऱ्यांची ही कुंची. त्यांची जन्मतारीख २२/११/१९२२! बसतोय का विश्वास? नाही हो ...जन्मतारखेवर नाही. जन्मतारीख असू शकते ना अशी कोणतीही? मी म्हणते ...........कुंची इतकी जुनी आहे यावर?
तर माझ्या सासऱ्यांचे आईवडील सासरे अगदी लहान असतानाच त्यांना अनाथ करून एका पाठोपाठ एक देवाघरी गेले. तेव्हाच्या त्यांच्या मॅट्रिकपर्यन्त त्यांचा सांभाळ मावशीने केला. म्हणतात ना, माय मरो आणि मावशी जगो! मग पुढे त्यांनी अगदी एकट्याने आणि स्वता:च्या हिमतीवर जीवनाशी झुंज दिली आणि पुढच्या पिढ्यांना अभिमान वाटेल असा एक पायंडा पाडला आणि आदर्श घालून दिला! He was a really a self made man!
(हे विषयांतर वाटेल, पण आजिबात नाही.) पण म्हणूनच त्यांनी जीवनात इतकी स्थित्यंतरे पाहिली, इतकी स्थलांतरे केली, किती जग पाहिलं(त्या काळच्या मानाने) आणि स्वता:ची एक आयडेन्टिटी निर्माण केली, या सर्व जगण्याच्या धडपडीत सुद्धा त्यांनी ही कुंची इतका काळ स्वता:जवळ का जपून ठेवली असेल?
या विशाल जगात एकट्या पडलेल्या एका मुलाने जपलेली गत काळाची आणि आपल्या बालपणीची अमूल्य आठवण आणि आईच्या प्रेमाची आठवण करून देणारा बालपणीचा एक दुवा!
पण तरीही एकंदरीत काळाचा विचार करता मला जरा कन्फ़्यूजिंग वाटायला लागलं. आणि खरंच वाटेना की काही वर्षातच ही कुंची १०० वर्षांची होईल? म्हणून नणंदेला फ़ोन केला आणि खात्री करून घेतली की ती कुंची माझ्या सासऱ्यांचीच! मग मनात विचार यायला लागले.
कुणी या कुंचीचं कापड आणलं असेल, कुणी शिवली असेल, गोंडे लावले असतील, आईने किती कौतुकाने ती आपल्या बाळाला घालून पाहिली असेल.......................................................!!
तर अशी ही कुंची बघून मला कुंची शिवण्याची स्फ़ूर्ती आली. मग कापड बाजारात गेले. तिथे स्पेशली धारवाडी खण मिळणारे एक दुकान आहे. तिथे कापड पसंत केलं, दर विचारला. आणि एक मीटर खणाचं कापड मागितलं. आधी हिरवागार रंग आणि लाल काठ असं कॉम्बिनेशन पसंत केलं, पण सेल्समनने कात्री चालवण्यापूर्वी मी परत विचार बदलला. म्हटलं आधीच नवीन प्रकारचं इम्पोर्टेड वस्त्र पाहून माझी मेक्सिकनअमेरिकन सून जरा बुचकळ्यातच पडणार, त्यातच तिच्या बाळाचा एकदम हिरवागार पोपट नको करायला..........या विचाराने लालसर मरून असं एकरंगी कॉम्बिनेशन असलेला खण घेतला. माझी जरा दोलायमान अवस्था पाहून दुकानदार म्हणाला, " मॅडम, कुठल्याही साडीवर चालणार बघा हा ब्लाऊज...खणाचं असंच असतं बघा".
त्याला काय जातंय म्हणायला? त्याला खण खपल्याशी मतलब! बिघडलं मॅचिंग, तर माझं बिघडेल! (अरेच्च्या काहीही??).......
मग मी स्पष्ट केलं की हे कापड मी ब्लाउजसाठी घेत नसून "कुंची"साठी घेत आहे. दुकानदार माझ्याकडे एकदम सहानुभूतियुक्त नजरेने पहायला लागला.
या बाईला नक्की काय शिवायचंय? काय म्हणतेय ही नक्की? मी चांगलं मॅचिंगचं समजावून सांगतोय हिला आणि ही? इ.इ.
मला आश्चर्य वाटलं की दुकानदारालाही "कुंची" हा शब्द नवीनच होता. मग मला त्याला समजावून सांगणं भाग पडलं. मग??? असं कसं?
एवढा स्पेशली धारवाडी खण विकायला बसलाय आणि "कुंची" माहिती नाही?(ही वाक्य मनातल्या मनात अगदी वरच्या पट्टीत म्हटली!) हे बरोबर नाही. बरं तसा अगदी विशी तिशीतलाही नव्हता वाटत.
ओक्के......आता याला सांगितलंच पाहिजे सगळं! मग कुठली त्याची लवकर सुटका?
त्याचं "कुंची" या विषयावरचं संपूर्ण बौद्धिक घेऊनच मी त्याला खणाचे पैसे दिले आणि खण ताब्यात घेतला. आता तो कधीच नाही विसरणार "कुंची"!
काय बिशाद आहे पुन्हा विसरण्याची?
मग दुसऱ्या एका दुकानातून लाल्लाल चुटुक्क गोंडे आणले. अस्तराचं कापड होतंच इतक्या सगळ्या शिवणाच्या गाठोड्यात!
घरी आल्यावर कुंची शिवली. ते गोंडे मस्तपैकी कुंचीला लावले. कुंची तय्यार!
असो..........यातला विनोदाचा विषय वगळता....... कुंचीविषयी बोलू काही.
.........कुंची सध्या फ़ारशी वापरात नाही. पण पूर्वी जेव्हा लहान बाळांना तेल, मालिश आणि धुरी द्यायची पद्धत होती तेव्हा सगळे सोपस्कार होईपर्यंत बाळराजे अगदी झोपेला आलेले असत. आणि शरिरात चांगली ऊब आलेली असे. मग त्या छोटुल्याला सगळे कपडे चढवीत बसलं तर चांगली आलेली त्याची झोप उडून जाऊ नये म्हणून पटकन कुंची घालायची, झटकन सगळीकडून गुंडाळून त्या कुंचीत बाळराजांचं चांगलं घट्ट मुटकुळं बांधायचं, मग काय बिशाद, बाळराजे लवकर उठण्याची?
मग पुन्हा शी शू मं मं ची वेळ होईतो पर्यंत मस्त परीराज्यात गाईगाई!
त्यामुळे बऱ्याच वेळा घराघरातून ही अशी कुंचीधारी बाळं बागडताना दिसत. मग अंगावर दुसरं काही वस्त्र असायलाच पाहिजे असं काही नाही. किंबहुना ते नसायचंच! हो.........या कुंच्या अंमळ मोठ्याच शिवलेल्या असत.
तसंही अंगाबरोबरच्या टिचक्या कपड्यांची एवढी आत्तासारखी "फ़्याशन" नव्हती तेव्हा. कुंचीच काय पण बहुतेक सगळेच कपडे वाढत्या मापाचे शिवण्याची संस्कृती होती तेव्हा! आणि वरच्याचे कपडे खालच्याला असं करत करत शेवटच्या मेंबरला कधीच नवे कपडे मिळत नसत.
आणि बाळराजे......म्हणजे त्यांचं डोकं..... मोठे होत जातील तसतसे या कुंचीचे बंद, असलेल्या जागचे काढून थोडे थोडे खाली खाली लावले जात.
मग काय तोपर्यंत हळूहळू बाळराजे आख्खेच कुंचीतून बाहेर येण्याच्या मापाचे झालेले असत. यानंतर निसर्गनेमिक्रमे घरात त्यांच्या नंतरच्या येऊ घातलेल्या नव्या सदस्यासाठी ही कुंची परत नीट कपाटात ठेवली जायची!
तर अशीही कहानी कुंचीकी!
तळटीपा: *सुरकं: हे अगदी लहान अर्भकासाठीचं एक अंगात घालण्याचं वस्त्र म्हणजेच झबलं. हे अगदी मऊसूत अश्या सुती कापडाचं शिवायचं! हे शिवायलाही आणि घालायला काढायलाही अत्यंत सोपं. याला अंगात घालायला एक चौकोन आणि त्याला वर गळ्यापाशी जोडलेला नेफ़ा. या नेफ़्याला पुढे गळ्याखाली एक काजं. या नेफ़्यात नाडी घालून त्या नाडीची दोन्ही टोके काज्यातून बाहेर काढायची. कपडा बाळराजाला घातला की फ़क्त नाडी ओढायची फ़ार तर एक सुरगाठ बांधायची. आणि सुर्रकन नाडी ओढून घालायचं झबलं म्हणून ते सुरकं!
डिस्क्लेमर: या कुंचीचा टिनाच्य लुंजीशी किंवा टीव्ही शीरियल रुंजीशी काहीही संबंध नाही!
सुंदर लेखन.. कुंचीच एवढी
सुंदर लेखन.. कुंचीच एवढी सुंदर आहे कि कुणालाही जपून ठेवावीशी वाटेल. ( माझे झबलेही आईने अजून ठेवलेय. )
पुर्वी नवजात बाळाला एकदम नवीन कपडे घालत नसत. खुपदा इतर बाळांचे वापरलेले कपडेच घालत असत. त्या कारणासाठी असे कपडे जपून ठेवले जात.
बाळ जन्माला यायच्या आधी काहिही तयारी करणे समाजमान्य नव्हते. दुपटी पण वापरलेलीच मागून आणत असत.
मस्त तू दिलेली कुंची जपून
मस्त

तू दिलेली कुंची जपून ठेवली गेली तर मेक्सिकन-भारतीय वंशजही शंभरेक वर्षांनी या कुंचीचं एक सांस्कृतिक ठेवा म्हणून कौतुक करतील
छान लिहलयं.. सासर्यांची कुंची
छान लिहलयं.. सासर्यांची कुंची मस्तच! कित्ती जपुन ठेवलीय..
नवीन प्ण सुंदर झाली आहे!
मस्त मानुषी ताई आमच्या घरात
मस्त मानुषी ताई




आमच्या घरात पण एक निळसर जांभळ्या रंगाची कुंची होती... म्हणजे आहे..... म्हणजे होती
म्हणजे आत्ता ती आमच्या घरातच आहे पण ती कुठे तरी लपून बसलीये. सापडत नाहीये
आता चैत्रातल्या हकुला गौरीचं बाळ करायला परत शोधली जाईल. पुर्ण लेख वाचताना माझ्या डोळ्यासमोर तिच कुंची होती
तुमच्या दोन्ही कुंच्या मस्त आहेत
छान. सासर्यांच्या कुंचीबद्दल
छान. सासर्यांच्या कुंचीबद्दल वाचुन डोळे पाणावले.
तुमची नवीन सुद्धा छान झालीये.
मस्तं लेख! मस्तं
मस्तं लेख!
मस्तं कुंच्या!
कृपया सुरक्याचा फोटो टाकणे.
माझ्या मुलांच्या खूप सुंदर कुंच्या आहेत.
काठाचे ब्लाऊजपीस खास विकत घेऊन शिवलेल्या.
छान दिसतात.
सुंदर लेखन.......... कुंचीच
सुंदर लेखन..........
कुंचीच एवढी सुंदर आहे कि कुणालाही जपून ठेवावीशी वाटेल. >>++११११११११११
मस्त लिहिले आहे
आई ग्गं!!! कस्लं गोडुमिट्टं
आई ग्गं!!! कस्लं गोडुमिट्टं लिवलंस गं मानु... कुंची... बाप्रे हा शब्द च जणू मनाच्या कोणत्या तरी आतल्या , तळातल्या चोरकप्प्यात गेला होता.. खाडकन तो अदृष्य खण( ड्रॉवर.. तुझा धारवाडीनाय!!
) उघडला गेला की...
खूपच छान जपून ठेवलायस तू हा ठेवा...
आणी तू शिवलेली कुंची ही गोड आहे अगदी..
,,'हिरवागार पोपट '
रच्याकने आता तो दुकानदार बघ पुढच्या गिर्हाईकांना ,' अहो या खणाची कुंची फार शोभून दिसेल बाळाला, घ्याच तुम्ही असा आग्रह करत असेल
दिनेश... दुपटी पण वापरलेलीच
दिनेश... दुपटी पण वापरलेलीच मागून आणत असत.>>>>>> पूर्वी चं कॉटन काय किंवा मांजरपाट काय हल्लीच्या कापडासारखं मऊ नसायचं. म्हणूनच नवजात बालकास वापरून वापरून मऊ झालेलं घालण्याची पद्धत असणार.
वरदा:तू दिलेली कुंची जपून ठेवली गेली तर मेक्सिकन-भारतीय वंशजही शंभरेक वर्षांनी या कुंचीचं एक सांस्कृतिक ठेवा म्हणून कौतुक करतील >>>>>>>>>>> हा विचार फक्त एक पुरातत्व शास्त्रज्ञच करू जाणे!
ठांकू गं!
चनस, रिया, सस्मित, सृष्टी, साती सर्वांना धन्यवाद.
साती ...सुरकी सध्या पुण्याला पाठवली आहेत. पण अजून शिवणार आहे. त्याचे नक्की फोटो डकवीन.
वर्षू ...............अहो या खणाची कुंची फार शोभून दिसेल बाळाला, घ्याच तुम्ही असा आग्रह करत असेल हाहा>>>
यू गॉट द पॉइन्ट!
आणि हो........खणावरचा जोक अगदी खणखणीत !
सुरेख लेख. सासर्यांची कथा
सुरेख लेख. सासर्यांची कथा ऐकून खरेच डोळे पाणावले. त्यांना ह्या कुंचीचे किती मोल असेल नाही का.
माझ्या नणंदेची आई पण ती लहान असतानाच गेली. तिच्या कडे देखील आईचे असे काहीच नाही. त्याचे मलाच वाइट वाटते. मी माझ्या मुलीसाठी तिच्या बाबांच्या वस्तूंचे एक बॉक्स बनवून ठेवले आहे. तिला जेव्हा त्यांची आठवण येइल तेव्हा तिला ते बघता येइल व लग्नात तिला दिले म्हणजे कार्मिक ओझे संपले. ती तुमची कुंची म्हणजे एक अमुल्य ठेवाच आहे फॅमिलीचा.
तुम्ही शिवलेली देखील छानच आहे. सुरक्याचा फोटो टा़काल का म्हणजे कल्पना येइल. घरी खूप कापडाचे तुकडे असतात तेव्हा पाच सहा शिवून ठेवेन.
मी लहान असताना आमच्या इथे कधी कधी धनगरांचे तांडे येत त्यातही अशी कुंची घातलेली दोन तीन मुले असत. त्यांचे राहाणे माळावर तेव्हा थंडी वाजत असेल तर मुलांना उत्तम प्रोटेक्षन मिळत असेल. ह्या कुंचीने. त्यात गोंड्याचा थाट!
नव्या बेबीचे नाव काय आहे?
फार आवडले लेखन! कुंची पाहून
फार आवडले लेखन! कुंची पाहून माझ्या छोट्या मावसबहिणीसाठी आईने शिवलेली सॅटिनच्या कापडाची कुंची, मी दुकानातून आणलेले गोंडे, टिकल्या वगैरे आठवले. नवी कुंची ही एकदम झक्कास झालेय.
सासर्यांची जपून ठेवलेली कुंची - फार मोठा सांस्कृतिक ठेवा. इथे अमेरीकेत स्टेट फेअरला अशा कुंचीला ब्लू रिबन नक्की!
गोड लिहिलय. तुमच्या
गोड लिहिलय. तुमच्या सासर्यांची कथा वाचताना खरच डोळे पाणावले.
तुम्ही शिवलेली कुंचीही मस्त आहे.
ती जुनी कुंची केवढी सुंदर
ती जुनी कुंची केवढी सुंदर आहे. तुम्ही सांगितलं नसतं तर अजिबात अंदाज आला नसता एवढी जुनी आहे याचा. सुबक शिवण आहे किती. तुम्ही शिवलेली नवी कुंची पण मस्तच.
नाव काय म्हणालात त्या दुकानाचं?
फुल टू नॉस्टालजिक करणारे
फुल टू नॉस्टालजिक करणारे लिखाण ....
सुर्रेखच लिहिलंय ....
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय.
सुरेख लिहिलंय. दोन्ही
सुरेख लिहिलंय. दोन्ही कुंच्या मस्तच.
सासर्यांचं वाचून गलबललं.
अमा........ती तुमची कुंची
अमा........ती तुमची कुंची म्हणजे एक अमुल्य ठेवाच आहे फॅमिलीचा.+१००
आणि <<<<<<< मी माझ्या मुलीसाठी तिच्या बाबांच्या वस्तूंचे एक बॉक्स बनवून ठेवले आहे. तिला जेव्हा त्यांची आठवण येइल तेव्हा तिला ते बघता येइल व लग्नात तिला दिले म्हणजे कार्मिक ओझे संपले. >>>>>>>>. हे भिडलंच. पण ते संपत वगैरे नाही बरं....!
बेबीचं नाव "अहमय दिएगो " असं ठेवलं आहे. भारतीय+मेक्सिकन.
स्वाती<<<<<<<<<इथे अमेरीकेत स्टेट फेअरला अशा कुंचीला ब्लू रिबन नक्की!>>>>>>>> धन्यवाद.
झेलम,शशांक, शोभनाताई सर्वांना धन्यवाद.
आणि शिडीबाय.......दुकानाचं नाव...मी कुठे काय म्हटलं?
असो........अगं एरवी खण किंवा काहीही कापडचोपड घ्यायला "सारडा"च. पण आता जाऊ म्हणाली....वैनी ..इतक्या आत कशाला जाता? इथे जवळच "तुळजाई" नावाचं नवीन दुकान आहे तिथे जा.
तर "तुळजाई" !
मानुषीताई, बाळाच्या आईला
मानुषीताई, बाळाच्या आईला आवडली का कुंची? एवढ्यात कळलं नसेल कदाचित. पण कळलं की नक्की सांगा हं. उगाचच उत्सुकता!
अश्विनी........... भाऊ
अश्विनी........... भाऊ एप्रिलात जाईल तिकडे.
मलाही उत्सुकता आहेच ....बाळाच्या आईला आवडेल का कुंची?
मानुषी कुंचीकथा आवडली ..
मानुषी कुंचीकथा आवडली .. मस्तच आहेत कुंच्या दोन्ही सुद्धा.. तु शिवलेली कुंची पन मस्त.. फेश फ्रेश एकदम..
आणि हो.. डिस्केमर सॉल्लीड
ती जुनी कुंची केवढी सुंदर
ती जुनी कुंची केवढी सुंदर आहे. तुम्ही सांगितलं नसतं तर अजिबात अंदाज आला नसता एवढी जुनी आहे याचा. सुबक शिवण आहे किती. तुम्ही शिवलेली नवी कुंची पण मस्तच. >>> + १०००
मस्त लिहिलंय मानुषी. आवडलंच
मानुषी, कुंची कुंची कथा
मानुषी, कुंची कुंची कथा मस्तच.
टिना अगो प्रज्ञा धन्यवाद.
टिना अगो प्रज्ञा धन्यवाद.
मस्त. सुरेख आहे तुम्ही
मस्त.
सुरेख आहे तुम्ही शिवलेली कुंचीही.
अतिपरिचयामुळे सहज गृहित धरत गेलेल्या वस्तू एक दिवस अचानक 'सांस्कृतिक ठेवे' होतात त्याची गंमत वाटते.
कुंची कथा आवडली. ती जुनी
कुंची कथा आवडली. ती जुनी कुंची सुंदरच आहे आणि टिकलेय ही किती छान इतक्या जणांनी वापरून सुध्द्दा. कापड, शिलाई, सजावट सगळचं सुंदर आहे. अशीच जपून ठेवा तिला घराण्याचा ठेवा म्हणून. सासर्यांची कथा ही मनाला भिडली.
तु शिवलेली ही सुंदरच झालीय. खूप सफाई आहे तुझ्या शिवणकामात. सूनबाई नक्की खुश होतील कुंची बघुन.
तु जे सुरकं म्हणतेस ना त्याला आम्ही नाडीच झबलं म्हणतो. घालायला, काढायला खूप सोप्प. आणि गळयाशी चुण्या येतात त्यामुळे दिसत ही किती छान !! त्याचा पण फोटो टाक ना. कित्ती दिवसात ते पाहिलं ही नाहीये. शाळेत असताना आम्हाला शिवणकामात ते शिवायला शिकवलं होतं
कुंची ची कहाणी आवडली , १९२२
कुंची ची कहाणी आवडली , १९२२ ची कुंची हातावर शिवली आहे की मशीनवर ?
हल्ली कुंच्या दिसत नाहीत .
मानुषीताई किती सुंदर, ओघवता
मानुषीताई किती सुंदर, ओघवता आणि गोड लेख.
तुम्ही शिवलेली कुंचीपण फार क्युट आहे. जुनी पण खूप सुंदर आणि सुस्थितीत.
कुंची ह्या शब्दाशीच माया आणि गोडवा जोडलेला आहे.
आमच्याकडे आहे १०० वर्षापूर्वीची कुंची. जी माझ्या आईच्या आजोळकडून आलीय. माझ्या आजीची आहे ती कुंची. आजी असती तर ती ९५ च्या आसपास असती.
ती कुंची आई आणि मावशीला वापरली मग आम्हा तीन भावंडासाठी वापरली.
मग माझ्या मुलासाठी वापरली आणि आता माझ्या बहिणीच्या मुलीला दिली, तीन वर्षापूर्वी. ती बाळ होती तेव्हा.
धन्यवाद मानुषीताई, तुमच्या या लेखामुळे त्या कुंचीचा स्पर्श आजही जाणवला. अगदी आजी आठवली.
सासऱ्यांना तुमच्या खरंच सलाम
सासऱ्यांना तुमच्या खरंच सलाम आणि त्यांच्या मावशीला पण.
मानुषीताई किती सुंदर, ओघवता
मानुषीताई किती सुंदर, ओघवता आणि गोड लेख. जुनी आणि तुम्ही शिवलेली कुंची - दोन्ही खूप गोड आहेत.
'कुंची' ह्या श्ब्दाने बाळाचा स्पर्श , त्याचा एक वास - तेल, धुरी मिश्रित - सगळ्याची आठवण एकदम ताजी झाली.
काल वाचला लेख... नक्की कसं
काल वाचला लेख... नक्की कसं वाटलं ते सुचत नव्हतं... सुजाता बापट ह्यांनी बर्रोब्बर पकडलं मला...
<<'कुंची' ह्या श्ब्दाने बाळाचा स्पर्श , त्याचा एक वास - तेल, धुरी मिश्रित - सगळ्याची आठवण एकदम ताजी झाली.>>
लेख तर सुंदर आहेच पण लेखाची नायिका केवळ अप्रतिम... १९२२ ची ती कुंची किती म्हणजे किती गोड आहे. त्यामागच्या लेखिकेच्या भावना वगैरे बाजूला ठेवल्या तरीही... सुरेखच आहे.
आणि हे पीढ्या-पीढ्या मागचं जपून ठेवलेलं लेणं... मानुषी, कौतुक आहे तुमचं.
Pages