नोकरदार स्त्रिया: आजार आणि सामना

Submitted by मो on 10 February, 2015 - 09:47

गेल्या ५० वर्षात जगभरातील प्रगत आणि प्रगतीशील देशांमध्ये नोकरदार किंवा व्यवसाय करणार्‍या स्त्रियांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लग्नापूर्वी शिक्षण पूर्ण करुन स्वावलंबी होण्याकडे अनेक मुलींचा कल दिसून येतो. नोकरी व्यवसायात बस्तान बसेपर्यंत आपत्यप्राप्ती लांबवणे किंवा '१ या २ ऐवजी' १ बस कडे कल झुकणे ह्या गोष्टीही आजकाल काही प्रमाणात पाहण्यात येत आहेत. बर्‍याचजणी मूल झाल्यावरही नोकरी/व्यवसाय करत राहण्याला प्राधान्य देत आहेत. हे चित्र कमी अधिक प्रमाणात जगभरातील आहे. 'घर चालवणे' ह्याबरोबरच बाहेर पडून घराबाहेर काम करणे ही जबाबदारी जरी बर्‍याच स्त्रिया घेत असल्या तरी हे सर्व करताना त्या नोकरी, मुलांचे संगोपन, घरकाम आणि नातेसंबंध/कार्यक्रम आणि ह्या सर्व पातळ्यांवर लढताना दिसून येतात. घर आणि नोकरी/व्यवसाय ही कसरत साधताना अनेक स्त्रियांवर अतिरिक्त ताण येतो. अजूनही भारतातल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अनेक घरांमध्ये स्वयंपाक, घरकाम आणि मुलांचे, घरातील ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन ही जबाबदारी मुख्यत्वे स्त्री पार पाडते. बर्‍याचदा घर आणि नोकरी-व्यवसायातील ताण आणि जबाबदार्‍या ह्याची परिणिती ही ह्या स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आजारपणात होते.

'द हिंदू' ह्या वर्तमानपत्राने मार्च २०१४ मध्ये विविध शहरांमधील १२० निरनिराळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या २८०० स्त्रियांचे सर्वेक्षण केला. त्यात असे पाहण्यात आले की भारतातील ७५% कामकरी स्त्रियांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार आहेत. ह्या सर्वेक्षणात वेगवेगळ्या हुद्द्यांवर काम करणार्‍या स्त्रियांची मुलाखती घेतल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे बर्‍याच जणी आपल्याला असणार्‍या ह्या आजाराबद्दल अनभिज्ञ किंवा डिनायल मध्ये आढळल्या. डॉक्टरकडे जाणे किंवा ह्यावर काही उपचार घेणे ह्यापेक्षा वेळ मारुन नेणे, अंगावर काढणे किंवा घरगुती उपायांवर अधिक जणी भर देतात हेही आढळले.

नोकरदार स्त्रियांमध्ये मुख्यत्वे खालील आजार आढळले -
१. ताण
२. निरुत्साह (फटीग)
३. डिप्रेशन
४. डोकेदुखी
५. मळमळ, भुकेचा अभाव
६. झोप न येणे
७. हायपर टेन्शन, कोलेस्ट्रेरॉल
८. स्थुलता
९. पाठदुखी
१०. अनियमित मासिक पाळी
११. इन्फर्टीलिटी

** हे आजार नोकरी व्यवसायानिमिताने डबल ड्युटी करणार्‍या स्त्रियांमध्ये जास्त पाहण्यात आले, पण ते इतरही अनेक स्त्रियांमध्ये आढळतात. त्यामुळे जरी हा लेख नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वरील समस्यांना तोंड देणार्‍या स्त्रियांच्या समस्यांचा आढावा घेत असला तरी खाली चर्चिले गेलेले उपाय हे सर्वच स्त्रियांना उपायकारी ठरतील.

घर, नोकरी ह्याबरोबर येणारे ताणतणाव आणि वरील समस्यांचा सामना करायचा कसा? सर्वप्रथम आपण आजारी आहोत हे मान्य करा आणि दुर्लक्ष करणे/अंगावर काढणे बंद करा. आधी साधी वाटणारी पाठदुखी, फक्त दुर्लक्ष केल्यामुळे क्रॉनिक पाठदुखी होऊन वेळ आणि पैसे दोन्हीचाही अपव्यय करु शकते. सतत ताणाखाली राहणे, झोप व्यवस्थित न मिळणे, व्यायामाचा आभाव ह्याची परिणिती अनियमित पाळी, मधुमेह, हायपर टेन्शन, स्थुलता इत्यादी मध्ये होऊ शकते. एक्ट्रीम केस मध्ये ती प्रजनन संस्थेवरही परिणाम करु शकते.

स्वतःकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही करु शकता ती म्हणजे व्यायाम. कोणत्याही प्रकारे दिवसातला अर्धा तास तुम्ही एखादा शारीरिक व्यायामप्रकार (चालणे/पळणे/पोहणे/जिम/योगसनं/किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम) केला तर अर्धं युद्ध तिथेच जिंकलात समजा. व्यायामाची गरज आणि फायदे मायबोलीवर बरेचदा सविस्तर चर्चिले गेले आहेत. पण व्यायामाचे अतिशय मुलभूत फायदे सांगायचे म्हटले तर वजन आटोक्यात ठेवणे, इम्युनिटी वाढवणे, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा करणे इत्यादी. अगदी सुरुवातीच्या स्टेजेस मधला मधुमेह, हायपर टेन्शन, कोलेस्टेरॉल तुम्ही फक्त व्यायामानेही नियंत्रित ठेवू शकता.

ऑफिसमध्ये कितीही जास्त काम असलं तरी दर तासाला पाय मोकळे करुन येत जा. खुर्ची वर बसल्या बसल्या मानेचे, खांद्याचे व्यायाम करत जा. अधून मधून उठून स्ट्रेचींग करत जा. सतत एकाच ठि़काणी बसून राहिल्याने सर्व स्नायूंवर ताण येतो, तो ताण अगदी एका मिनिटाच्या व्यायामानेही जाऊ शकतो. काँप्युटरवर काम करणार्‍यांची सगळ्यात मोठी तक्रार असते ती पाठदुखी, खांदेदुखी आणि डोळेदुखीची! तासाभराने, किंवा जेंव्हा कधी वेळ मिळेल तेंव्हा खांदे, मान, कंबर, डोळे गोलाकार फिरवून तो ताण घालवत जा. सर्वांसमोर करायला संकोच वाटत असेल तर तुम्ही बाथरुम मध्ये जाऊन हे उभ्याचे व्यायाम करु शकता. ऑफिसला खिडकी असेल तर नजर जेवढी दूरवर नेता येईल तेवढी दूर नेऊन तिथे टक लावून पाहत राहिल्याने सतत काँप्युटरकडे किंवा नजीकच्या वस्तू बघितल्यामुळे येणारा ताण चटकन कमी होतो. डोळ्यावर थंड पाण्याचा हबके मारा. माऊस आणि किबोर्डच्या सतत मुळे हातावर/बोटांवर येणारा ताण घालवण्याकरता वेळ मिळाला की बोटे झटकणे, मुठीची उघडझाप करणे आणि मनगटे गोलाकार फिरवणे हे व्यायाम करा. ह्या सर्व २-५ मिनिटात करता येण्यासारख्या व्यायामांमुळे ताणल्या गेलेल्या स्नायुंना ताबडतोब आराम वाटतो.

तुम्ही जर फिरतीचे काम किंवा फिल्डवर्क करत असाल तर उन्हात फिरताना टोपी/स्कार्फ/छत्री, गॉगल, पाण्याची बाटली, जमल्यास सनस्क्रीन हे नेहेमी बरोबर ठेवा. अतीश्रमामुळे, व्यवस्थित हायड्रेटेड न राहिल्यामुळे चक्कर येऊ शकते, अश्या वेळी ही पाण्याची बाटली फार महत्त्वाची! अतीश्रमामुळे झोप न येण्यास त्रास होऊ शकतो. खूप वेळ उभे राहण्याचे काम असेल तर जमत असल्यास थोड्या वेळाने बसत जा. बैठे काम करणार्‍यांप्रमाणेच बाहेर काम करणार्‍यांनाही स्ट्रेचिंगची आवश्यकता असते. त्यामुळे वर सांगितलेले व्यायाम त्यांनाही लागू होतात.

बैठं ऑफिसमधलं काम असो वा फिरतीचं जास्त श्रमाचं काम, दोन्हीही कामांमध्ये स्ट्रेस असू शकतो. अश्यावेळी अधून मधून दीर्घ श्वसन, प्राणायाम हे फार फायद्याचे ठरते. दर अर्ध्या तासाने ५ दीर्घ श्वासोच्छवास करणे ही स्वतःला सवय लावून घ्यायला पाहिजे. अतिशय सोपा आणि अतिशय गुणकारी असा हा स्ट्रेसबस्टर आहे. असं म्हणतात की आपल्या शरीरातील ७०% टॉक्सिन्स हे श्वसनामधून बाहेर पडतात. जर तुम्ही योग्य प्रकारे श्वासोच्छवास करत नसाल तर तुम्ही तुमच्या तुमच्या शरिरातील टॉक्सिन्स योग्यप्रकारे/पूर्णपणे बाहेर काढत नाही आहात. शरीरातील ताण कमी करणे, विचारांना अधिक क्लॅरिटी आणणे, प्रतिकारशक्ती वाढवणे इत्यादी आणि इतर अनेक फायदे दीर्घ श्वसनाने मिळतात. मुख्य म्हणजे रक्ताला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आणि कार्बन डायॉक्साईड काढणे हे दीर्घश्वसनाने अधिक चांगल्या प्रकारे साधले जाते. दीर्घ, हळू श्वसन करणे ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी सवय लावा. जेंव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर खूप एकाग्र होऊन किंवा ताणाखाली काम करता तेंव्हा छोटे छोटे श्वास घेतले जातात, अश्यावेळी लक्षात ठेवून दीर्घ श्वसन करायला शिका.

जेवणाच्या वेळा ठरवून घ्या आणि कितीही काम असले तरी वेळेवर जेवण करत जा. जेवल्यावर लगेच बसण्यापेक्षा ५-१० मिनिटाची फेरी मारुन या. तसेच दर तासाला उठून पाय मोकळे करत चला. दुपारचे जेवण जास्त घेण्यापेक्षा, एक छोटे लंच घेऊन थोड्या थोड्या वेळाने छोटे सकस स्नॅक्स्/फळे खात चला.

आजकाल बर्‍याचदा नीट घडी बसेपर्यंत मूल नको असा नवरा बायकोचा एकत्रित निर्णय असतो. नोकरी व्यवसायात ताण तणाव असतात, व्यायाम करायला वेळ नसतो, अश्या वेळेला बर्‍याचदा ह्याचा परिणाम स्त्रीच्या मासिक पाळीवर, प्रजनन संस्थेवर होऊ शकतो. स्ट्रेस, व्यायामाचा आभाव आणि त्याच बरोबर अनियमित जीवनशैली ह्यामुळे PCOS (पॉलीसिस्टीक ओव्हेरिअन सिंड्रोम), हार्मोनल इम्बॅलन्स इत्यादी आजारांचा बर्‍याच जणींना सामना करावा लागतो. त्यामुळे नियमितपणे चेकअप करुन घेणे, कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करुन घेणे हे महत्त्वाचे ठरते. बर्‍याच ऑफिसेसमधून वार्षिक तपासणी होत असते, त्याचाही जरुर लाभ घेत जा.

कुठल्याही नोकरी व्यवसायात कमी अधिक प्रमाणात राजकारण पाहण्यात येते. अनेकदा तुम्ही त्याचा भाग बनू शकता, त्याचा अतीव स्ट्रेस येऊ शकतो, इतका की ह्या राजकारणापायी डिप्रेशनमध्ये गेलेल्या आणि त्यामुळे नोकरीला तिलांजली दिलेल्या महिला पाहण्यात येतात. ऑफिसातलं राजकारण कसं टाळणं हा ह्या लेखाचा विषय नाही परंतू ते घरी आपल्याबरोबर घेऊन येऊन त्याचा आपल्याला पदोपदी त्रास न होऊ देणं बर्‍याच अंशी आपल्या हातात असू शकतं. असं म्हणतात छंद हा जगातला सर्वात उत्तम स्ट्रेसबस्टर आहे. सुटीच्या दिवशी (शक्य असल्यास प्रत्येक दिवशी) स्वत:करता थोडासा का होईना, वेळ काढा. आवडत्या पुस्तकाची ४ पानं वाचा, चांगलं संगीत ऐका, मैत्रिणीशी गप्पा मारा, शॉपिंगला जा. अशी एखादी गोष्ट करा ज्यात तुम्हाला पूर्ण आनंद मिळतो आणि तेवढा वेळ तुम्ही सगळे ताण तणाव विसरुन जाता. तुमच्याकरता फक्त तुम्हीच वेळ काढून शकता हे नेहेमी लक्षात ठेवा. घरातल्या कामांची विभागणी करा. जमेल तिथे घरच्यांबरोबर कामे वाटून घ्या. घरच्या आणि बाहेरच्या जबाबदार्‍या पार पाडताना आपण तब्येतीची हेळसांड करत नाही आहोत ना हे तपासून पाहत चला.

जरी वरील शारीरिक/मानसिक तक्रारी खर्‍या असल्या तरी ह्याची एक दुसरीही बाजू पाहण्यात आली आहे. कधी कधी दिवसातले ७-८ तास घराबाहेर असणं हे काही स्त्रियांच्या मानसिक आरोग्याकरता लाभदायी ही ठरु शकतं. नुकत्याच NPR वाहिनीने घेतलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की अनेक स्त्रियांनी ऑफिसला जाणं हेच एक स्ट्रेसबस्टर, स्वत:करता असलेला दिवसातला वेळ आहे असं सांगितलं. वर्क-लाईफ बॅलन्स महत्वाचा! तुम्हाला हा बॅलन्स साधता आला तर उत्तमच. नोकरी/व्यवसाय आपल्याकरता, आपण नोकरीकरता नाही हे लक्षात ठेवा. स्वत:ची शारीरिक/मानसिक काळजी घ्या, आणि ही डबलड्युटी यशस्वी रितीने पार पडणार ह्याची खात्री ठेवा.

----

वरील लेख हा नोकरी व्यवसायातील स्त्रियांमध्ये मुख्यत्वाने पाहिले जाणारे आजार आणि त्यांचा सामना ह्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न आहे. परंतु, इथे उल्लेख केलेल्या बर्‍याच गोष्टी फक्त स्त्रियाच नव्हे तर नोकरी-व्यवसाय करणार्‍या पुरुषांनाही लागू होतात. वरील माहितीबरोबर तुमच्या पाहण्यात आलेल्या केसेस, आजार, उपचार, तुम्ही घेत असलेली काळजी इत्यादी गोष्टींवरील चर्चेचे स्वागतच आहे.

रेफरन्सेस:
http://www.cdc.gov/niosh/topics/women/
http://www.thehindu.com/news/national/karnataka/75-pc-of-working-women-h...
http://www.onepowerfulword.com/2010/10/18-benefits-of-deep-breathing-and...
http://www.mayoclinic.org/healthy-living/fitness/in-depth/exercise/art-2...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारण मुळातच स्त्रीने नोकरी करणं हे 'अ‍ॅडिशनल' अ‍ॅक्टीव्हीटी म्हणूनच बघितलं जातं. पुरुषांची जशी ती 'कोअर अ‍ॅक्टीव्हीटी ' आहे, तशी अजून स्त्रीयांसाठी ती नाहीये . >>>>> Happy
(हा मुद्दा कदाचित ह्या चर्चेत गैरलागू आहे पण...)
ह्याचं कारण उलट परिस्थितीही अजून स्विकारली जात नाही.. काही दिवस ब्रेक म्हणून ठिक आहे, पण पुरूषाने कायमच नोकरीला 'अ‍ॅडिशनल अ‍ॅक्टीव्हिटी' म्हणून बघणं आणि घर संभाळणं तर स्त्रिने अर्थार्जन ही 'कोर अ‍ॅक्टीव्हिटी' म्हणून करणं हे मान्य नाहीये. (हेच ड्रायव्हिंग सारख्या गोष्टींबाबतही म्हणता येईल.)
अपवाद दोन्ही बाबतीत आहेत पण मी सर्वसाधारणपणे म्हणतो आहे.

रार, पहिल्या परिच्छेदाबद्दल सहमत. पण पुरूषही अशा संधी वारंवार म्हणा किंवा माझ्या पाहणीत तर कायमच सोडत आलेले दिसले. त्यात त्यांना गिल्टही असल्याचे दिसले नाही. उलट कुटूंबासाठी मी यावर पाणी सोडले हा गंड थोडाफार असतो.

एका पार्टनरने कोअर अ‍ॅक्टीव्हिटी म्हणून नोकरी/व्यवसाय करावा आणि दुसर्‍याने ती अ‍ॅडीशनल अ‍ॅक्टीव्हिटी म्हणून करावा (मग हा दुसरा पार्ट्नर स्री असो का पुरुष) हेच मूळात मला पटत नाही. दोघांनीही ती स्वतःसाठी आणि पार्टनरसाठी कोअर अ‍ॅक्टीव्हीटी मानली तर बरं पडेल.

त्याच बरोबर एम्प्लॉयर लोकांनी ही कोअर अ‍ॅक्टीव्हीटी आहे हे समजून हेल्थ इंश्युरंस, चाईल्ड केयर इइ पॉलीसी आखल्या तर सगळ्यांचेच आरोग्य सुधारेल

सीमंतिनी +१

सकारात्मकता हेच एक इल्युजन आहे. मला ही परिस्थिती मान्य नाही. माझे सूख, माझी तब्येत, माझे आराम करण्याचे व स्वतःच्या आवडीच्या गोश्टी करण्याचे स्वातंत्र्य माझे अर्न केलेले पैसे, ह्या सर्वांच्या पुढे घर मुले सासरचे, कुळधर्म, नवरा हे का असावे. ते देतात का तुम्हाला प्राधान्य? हा विचार कोणी का करत नाही. पुरे झाली ओढाताण लेट मी एंजॉय माय लाइफ, हॅव फन, सी द वर्ल्ड ,स्ट्डी, असे म्हटले कि त्यास्त्रीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. हे ते इल्युजनचे परिणाम आहेत. नोकरी प्लस घरची जबाबदारी ओढाताण त्याग धिस इज ऑल डन. टाइम टू थिंक द न्यू.

सर्व उभारीचे दिवस मर मर झगडून साठीला आल्यावर कसले सर्व केल्याचे समाधान मिळते? ती
लेखमाला वाचून मला तर फ्रस्ट्रेशन आले.

ण पुरूषाने कायमच नोकरीला 'अ‍ॅडिशनल अ‍ॅक्टीव्हिटी' म्हणून बघणं आणि घर संभाळणं तर स्त्रिने अर्थार्जन ही 'कोर अ‍ॅक्टीव्हिटी' म्हणून करणं हे मान्य नाहीये. <<
हे समाज व त्या त्या घरातले स्त्री पुरूष या सर्वांनाच मान्य नाहीये.

ते असो.. घर सांभाळणे या गोष्टीचा जरा जास्त इश्यू केला जातो सर्व बाजूंनी असे मला वाटते.
आदर्शच्या नावाखाली घरातली प्रत्येक गोष्ट स्वतःच करायला बघणे, आमच्याकडे अमुक अज्जिबात चालतच नाही हो वगैरे गोष्टींना नको इतके गोंजारून ठेवणे, जिथे शक्य आहे तिथे विकतचे/ मोलाचे पर्याय वापरणे आदर्शच्या नावाखाली टाळणे हे सगळं जरा अति आहे.

घराचे व्यवस्थापन ही गोष्ट अगदी सोपी करता येऊ शकते. पण ती करण्यात बाईचे (सध्या या सगळ्यासाठी बाई जबाबदार आहे असे चित्र आहे म्हणून बाई. जिथे पुरूष जबाबदार असतो तिथे पुरूष वाचावे!) इनिशिएशन पहिल्या पायरीवर महत्वाचे. दुसर्‍या पायरीवर घरातील मेंब्रांचे सहकार्य.

थोडक्यात काय सगळीकडे आपले बेस्ट देण्याचा ताण अति होत असेल तर त्या तथाकथित बेस्ट देण्याची सगळीकडे खरंच गरज आहे का? बेस्टची नक्की व्याख्या काय? हे तपासून बघून बदल करणे महत्वाचे.

जी बाई सर्व आघाड्यांवर धावते आहे उरापोटी ती स्वतःच्या प्रकृतीबद्दल सजग असेलच हे गॄहितक वाचताना बरोबर वाटते पण ते फारच सुलभीकरण होते आहे. आणि परत तशी सजगता अश्या धावणार्‍या बाईच्या अंगी क्वचितच दिसते.

अजून एक मला असे वाटते की भारतीय म्हणून एकुणातच आपण प्रकृती याबाबतीत कमी सजग असतो. यात स्त्री पुरूष दोघेही आले. वार्षिक चाचण्या याबाबतीत कमालीचा कंटाळा, जो काय त्रास होत असेल तो अंगावर काढणे आणि अति झाल्यावरच डॉक्टरकडे जाणे वगैरे गोष्टी आपल्या हाडीमाशी खिळलेल्या आहेत. वार्षिक चाचणी या प्रकाराकडे भारतीय मध्यमवर्ग (या पिढीत श्रीमंती आलेले वगळून!) 'चोचले' अश्या दृष्टीकोनातून पाहतो.

एकच अ‍ॅक्टिव्हिटी एकासाठी कोअर अ‍ॅक्टिव्हिटी आणि दुसर्‍यासाठी अ‍ॅडिशनल मानली जात असेल तर फार काही बदललेले नाही असे म्हणावे लागेल.

<जी बाई सर्व आघाड्यांवर धावते आहे उरापोटी ती स्वतःच्या प्रकृतीबद्दल सजग असेलच हे गॄहितक वाचताना बरोबर वाटते पण ते फारच सुलभीकरण होते आहे>+१.

एक उदाहरण : घरातले कोणी आजारी असेल तर कोणी सुटी घेऊन थांबणे अधिकतर अपेक्षित असते?
अशी नेहमी थांबणारी व्यक्तीच आजारी पडली, तर तिच्यासाठी कोणी सुटी घेऊन थांबते का?
(इथे आजार = सामान्य आजार. जॉब लेव्हल = अगदी वरची नाही....सर्वसाधारण चित्राबद्दल बोलतोय.)

एका पार्टनरने कोअर अ‍ॅक्टीव्हिटी म्हणून नोकरी/व्यवसाय करावा आणि दुसर्‍याने ती अ‍ॅडीशनल अ‍ॅक्टीव्हिटी म्हणून करावा (मग हा दुसरा पार्ट्नर स्री असो का पुरुष) हेच मूळात मला पटत नाही. दोघांनीही ती स्वतःसाठी आणि पार्टनरसाठी कोअर अ‍ॅक्टीव्हीटी मानली तर बरं पडेल.>>> मान्य आहे, फक्त कोअर का अ‍ॅडीशनल हे बाय चॉईस असू शकते आणि तसे होण्यालाही जागा हवी.

नी, तुझी पोस्ट पटतेय. मागच्या पोस्टीत मला असंच काहीसं म्हणायचं होतं की अगदी बेस्ट च द्यायचा प्रयत्न नाही केला, 'किमान' पूर्तता करावी असे ठरवले तरी दमछाक होतेच, तो सुपर वुमन सिंड्रोम नव्हे.
आणि सुलभीकरणपण पटले. आदर्श होईल तो, वास्तव असेलच असे नाही.
मयेकर, तुम्ही फार मागे जाताय. बर्याच ठिकाणी ज्याला सहज जमत असेल तो घरी थांबतो. इथे काही अंशी सुधारणा झालीय. आणि घरी थांबायची गरज असेल तर च थांबले च जाते. Happy

'किमान' पूर्तता करताना अति ओढाताण होत असेल तर मग थांबून सगळ्या गोष्टींकडे नीट बघायची गरज आहे.
ज्याला किमान म्हणतोय ते खरंच किमान आहे की कसे हे बघण्याची गरज आहे.
डिव्हिजन ऑफ लेबर करायचे तर त्यामधे फक्त करायच्या गोष्टींची यादी केली जाते पण घर व्यवस्थापनामधे गोष्टी ठरवणे, पर्याय शोधणे, प्लॅन करणे हे जे मुद्दे असतात त्यांची यादी डि ऑ ले करताना केलीच जात नाही. त्याचे राज्य बाईवरच असते.
म्हणजे उदाहरणार्थ आठवडाभराची भाजी आणून द्यायची जबाबदारी नवरा घेईल पण ते कधी? तर लिस्ट करून दिल्यावर. कुठल्या दिवशी कुठली भाजी, तीच का? घरातल्या सगळ्यांना आवडत नसेल तर शिस्तीचे धडे की आवड राखणे? आवड राखायची असेल तर काय करायचे वगैरे वगैरे सगळं प्लॅनिंग बाईच्या डोक्यावर.
कामवाली बाई सोडून गेली तर नवीन शोधायचे, नव्या बाईला ट्रेनिंग द्यायचे, नवीन बाईशी बोली ठरवायचे हे सगळे बाईने करायचे.

भाजी आणून देणे, मशिन लावणे अशी मलमपट्टी कामे दुसरी व्यक्ती करणार मग होणारच ना सगळ्या आघाड्यांवर दमछाक!

सकारात्मकता हेच एक इल्युजन आहे. मला ही परिस्थिती मान्य नाही. माझे सूख, माझी तब्येत, माझे आराम करण्याचे व स्वतःच्या आवडीच्या गोश्टी करण्याचे स्वातंत्र्य माझे अर्न केलेले पैसे, ह्या सर्वांच्या पुढे घर मुले सासरचे, कुळधर्म, नवरा हे का असावे. ते देतात का तुम्हाला प्राधान्य? हा विचार कोणी का करत नाही. पुरे झाली ओढाताण लेट मी एंजॉय माय लाइफ, हॅव फन, सी द वर्ल्ड ,स्ट्डी, असे म्हटले कि त्यास्त्रीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. हे ते इल्युजनचे परिणाम आहेत. नोकरी प्लस घरची जबाबदारी ओढाताण त्याग धिस इज ऑल डन. टाइम टू थिंक द न्यू. >>>
अरे पण ती बाई एव्हाना निवृत्त झाली आहे. त्यांच्या पिढीत नोकरी करणे, पैसे अर्न करणे हे घर, मुलं, संसार यांसाठीच असायचे ना? ओढाताण करत संसार, नोकरी करणं हेच तर त्यांच्या पिढीचं इष्टकर्म! त्यावेळी जबाबदार्‍याही तेवढ्या असायच्याच.

पुरे झाली ओढाताण लेट मी एंजॉय माय लाइफ, हॅव फन, सी द वर्ल्ड ,स्ट्डी>>> हे आताच्या पिढीत बघायला मिळेल हे नक्की! 'मी माझ्यासाठी नोकरी करते' हा विचार आताच्या नोकरीत असणार्‍या पिढीत आहे.

नी, हौशीने बाजारात जाऊन भाजी आणून ती निवडून ठेवणारे अनेक नवरे मी आजूबाजूला बघितले आहेत/ बघते आहे. आमचा

एक मित्र आहे, तो आमच्या अख्ख्या ग्रूपसाठी रविवारी बाजारहाट करू शकेल, अगदी भाज्या निवडून प्रत्येकाच्या घरीही पोचवेल पण त्यात एकच मोठ्ठा धोका हा आहे की तो त्याच्या आवडीच्या भाज्या आणेल आणि सर्वसामान्य लोकांना आवडणार्‍या भाज्या त्याला आवडत नाहीत Wink

बाकी, मोलकरणी विभाग बाईकडेच हे मात्र बघितले आहे.

पण आपण चर्चेची गाडी 'स्त्री पुरुष समानते'वरून 'नोकरदार स्त्रिया: आजार आणि सामना'वर आणूया.

बरोबर. हे म्हणजे टास्क डेलिगेशन होते फक्त. टेकिंग द ओनरशिप होत नाही. थोडक्यात बाई ही घरातली मनेजर असते. ती कामं वाटून देते, इतर लोक ती करतातही. पण ती कशा प्रकारे केली गेली, वेळेत पूर्ण झाली का, नाही झाली तर काय होईल, मग दट्ट्या लावा ही डोकेदुखी होतेच. काही बायका ही डोकेदुखी नको म्हणून स्वत:च ती कामं ओढत करत राहतात. मग आणखी ताण,चिडचिड. यापेक्षा एकदा एक काम दिले की त्यातून अंग काढून घ्यायचे. कसे का होईना. पूर्वानुभव, सल्ले सांगणं थांबवावे. ज्याचा तो शिकून शहाणा होतोच. हा सध्या तरी सापडलेला उपाय आहे.

मंजू, असे अपवाद असतातच ना. पण ते अपवाद असतात गं. भाजी हे एक उदाहरण म्हणून होतं.

गाडी स्त्री पुरूष समानतेवर येणं अपरिहार्य आहे. कारण मुळात घरव्यवस्थापन आणि घरकाम याचे राज्य सामान्यरित्या बाईवर आहे. ते ती कसं करते? कुणाकडून करून घेते? वगैरे तिचे मुद्दे असले (असं आपण गृहित धरू) तरी फायनल आऊटपुट संदर्भाने जे काय चांगले वाईट असते ते तिच्या डोक्यावर येते. त्याचा ताण असतो. तो ताण अति झाला की आजार वगैरे सुरू होतात ना...

पण ती कशा प्रकारे केली गेली, वेळेत पूर्ण झाली का, नाही झाली तर काय होईल, मग दट्ट्या लावा ही डोकेदुखी होतेच << एक्झॅक्टली.

पण तुम्ही जॉब करताना अमुक गोष्टी अमुक तारखेपर्यंत झालेल्या असतील तरच माझे काम वेळेत होईल हे सांगताना ना? मग तो अप्रोच इथे का नाही ठेवत?

उदाहरणार्थ. गव्हाचं पीठ आणायची जबाबदारी पाळली गेली नाहीत तर एखाद्या दिवशी राहूदेत पोळ्यांच्याविना. खाऊदेत नुसतीच भाजी. परत विसरणार नाही कोणी. इतकं साधं आहे ते.

ओढाताण करत संसार, नोकरी करणं हेच तर त्यांच्या पिढीचं इष्टकर्म! >> हे सरसकटी करण आहे. आणि त्या ओढाताणीला ग्लोरिफाय करायची गरज नाही हे माझे मत आहे.

लेखाच्या अनुषंगाने बायकांच्या आजारावर चांगली ट्रीट्मेंट मिळू शकेल अश्या हेल्थ इन्सुअरन्स पॉलिसीज
चे संकलन करावे.

बजाज अलायन्ज चे क्रिटिकल इल्नेस कव्हर चांगले आहे. आठ मेजर आजार ( ६ कॅन्सर ) कव्हर केले आहेत. अधिक माहिती इथे मिळेल.
http://www.bajajallianz.com/Corp/health-insurance/women-critical-illness...
पॉलिसी बझार . कॉम वर पण सर्व कंपन्यांच्या विमेन स्पेसिफिक पॉलिसीज चे डिटेल मिळतील. जरूर नजर टाका. मी पॉलीसी विकत नाही. केवळ माहिती म्हणून लिंक दिली आहे.

भाजी हे एक उदाहरण म्हणून होतं.>> येस.

गव्हाचं पीठ आणायची जबाबदारी पाळली गेली नाहीत तर एखाद्या दिवशी राहूदेत पोळ्यांच्याविना. खाऊदेत नुसतीच भाजी. परत विसरणार नाही कोणी. इतकं साधं आहे ते.>>> एक्झॅक्टली!! +१००

पूर्वानुभव, सल्ले सांगणं थांबवावे.>>> करेक्ट! आणि समोरचा फुकटात देत असेल तरी ते घेणं, किंवा त्याचा लोड घेणं थांबवावं. हा माझा परीघ आहे, तिथे कसं बागडायचं, तो कसा वाढवायचा हे मीच ठरवणार.

कसलाच गिल्ट घ्यायचा नाही. डोकं थंड ठेवणे हाच उपाय. बर्फाच्या लाद्या मनाच्या डीपफ्रिजमध्ये सतत तयार करायच्या.

सीमंतीनी + १
नीच्या बहुतांशी मुद्यांना + १

मला एक बेसिक प्रश्न आहे या चर्चेबाबत. आपण हे सर्व डिस्कशन कोणत्या क्लासला समोर ठेवून करत आहोत, की सर्वसाधारण , सर्वसमावेशक क्लास साठी ( क्लास इथे इकॉनॉमीक, शिक्षण, सामाजिक हा सर्व कव्हर करणारा आहे)
एक नोकरदार स्त्री म्हणून, स्वतःसाठी वेळ काढता यावा, कामाचा त्रास कमी व्हावा - म्हणून स्वतः पोळ्या, स्वयंपाक करायला जाणार नाही असं मी समजा ठरवलं. स्वयंपाकाला, पोळ्यांना बाई ठेवेन , असं म्हणताना ज्या बाईचं कामच पोळ्या करणं आहे तिच्या आरोग्याचं काय? असा प्रश्न मला पडला.
अश्या स्त्रीयांची संख्या खूप मोठी आहे. त्यांना तर चार घरची काम करून गेल्यावर, स्वतःच्याही घरी काम करावं लागतं.
असे अनेक वर्कींग क्लास समाजात आहेत, पोळ्यावाली बाई हे एक उदाहरण.
त्यांच्या बाबतीतल्या आजारांचा विचारही करायला हवा, जर सर्वसमावेशक चर्चा करायची असेल तर.
आणि तसा जर विचार केला तर कदाचित त्यावरचे चर्चेचे मुद्दे आणि उपाय देखील वेगळे असतील.

मी स्वयंपाकाला, पोळ्यांना बाई ठेवेन , असं वाक्या लिहिताना >> तुझी जीभ कशी अडखळली नाही? Happy Wink डेंजरच आहेस तू.

हल्ली 'मेड्स' साठी पण नियमावली येत आहे (उदा: आठवडी सुट्टी, बोनस इ.) त्यात लवकरच संघटना हे ही कलम घालेल असं वाटत आहे.
http://indianexpress.com/article/cities/pune/the-workers-army/

इथली चर्चा ही इथे वाचू शकणार्‍यांना उपयोगाची पडणे अधिक महत्वाचे ना?

कामवाल्या बायकांच्याबद्दल संपूर्ण सहानुभूति ठेवूनही हे म्हणावेसे वाटते की तिच्या घरची परिस्थिती इथे चर्चा करून बदलणार नाहीये. सुरूवातही होणार नाहीये. ती चर्चा करून केवळ अंडरप्रिव्हिलेज्ड लोकांसाठीही आम्ही चर्चा विचार केला असे समाधान चर्चा करणार्‍यांना मिळण्यापलिकडे काहीही होणार नाहीये.

स्त्रीनं डेलिगेट करायला हरकतही नाही. पण ते वन टाईम डेलिगेट केलं गेलं पाहिजे. हँडिंग ओव्हर ऑफ चार्ज.

म्हणजे समजा उदा. आता यापुढे घरातलं दुधदुभत्याचं नवर्‍यानं बघायचं असं नवरा-बायकोनं आपापसात ठरवलं की मग तिला त्यात डोकं घालायची वेळ आली नाही पाहिजे आणि त्याहूनही महत्त्वाचं की तिनं त्यात मग लुडबुड केली नाही पाहिजे. पण त्यानं मग ती जबाबदारी पूर्णपणे अंगावर घेतली पाहिजे. मग तो ठरवेल रोज दूध घ्यावं का, दूध तापवणे, विरजण लावणे, तूप बनवणे, पाहुणे आल्यावर जास्तीचे दूध घेणे, घरातील दूध अचानक संपणार नाही याची काळजी घेणे वगैरे वगैरे. जर ही व्यवस्था घरातल्या सर्वांनी मान्य केली ( नवरा आणि बायको दोघींनीही. कारण सोशल कंडिशनिंग अनलर्न करणे स्त्रीलाही कठीण जाणार आहे.) तर मग स्त्रीला मोकळीक मिळेल - वेळेची आणि मेंटली सुद्धा.

हल्ली 'मेड्स' साठी पण नियमावली येत आहे (उदा: आठवडी सुट्टी, बोनस इ.) त्यात लवकरच संघटना हे ही कलम घालेल असं वाटत आहे.>> अशी संघटना खरोखरच अस्तित्वात येऊन लवकरच कार्यरत व्हावी अशी बहुतांशी नोकरदार स्त्रियांची इच्छा आहे. आठवडी सुट्टी/ बोनस/ विमा इत्यादी द्यावा लागला तरी चालेल पण त्याबरोबरच न सांगता काअम सोडून जाणं, दांड्या मारणं, वाट्टेल तेवढी पगारवाढ मागणं या गोष्टींनाही चाप बसेल अशी अपेक्षा आहे.

मी कामवाल्या बायकांचा मुद्दा निव्वळ सहानुभूती किंवा ओव्हरप्रिव्हीलेजड यट अंडरस्टँडिंग पेन ऑफ सोसायटी म्हणून नाही मांड्लाय.
याचसाठी मी तिथे लिहिलं की कामवाल्या वायका हे केवळ एक उदाहरण आहे.
'द हिंदू' ह्या वर्तमानपत्राने मार्च २०१४ मध्ये विविध शहरांमधील १२० निरनिराळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या २८०० स्त्रियांचे सर्वेक्षण केला. त्यात असे पाहण्यात आले की भारतातील ७५% कामकरी स्त्रियांना
>>> या१२० मधे कोणत्या इंडस्ट्री समाविष्ट आहेत ह्यावर देखील आरोग्य विषयक प्रश्न आणि उपाय अवलंबून आहेत असं मला म्हणायचं आहे.

rar,
खूप वेगळा पण महत्वाचा पैलू समोर आणलास.
१) आपण सगळ्यांचे सगळे प्रश्न सोडवू शकत नाही. पण काही वेळेस ज्याला वर्किंग क्लास म्हणता येईल त्याला डॉक्टरकडे जाऊन निदान करायला हवे इतकेही जमत नाही (कारणे काहीही असोत) पण आपण त्यांना शक्य असेल तेंव्हा थोडेसे त्या दृष्टीने वळवू शकतो.
२) निदान झाल्यावर (विशेषत: मोठा आजार असेल तर) काही सेवाभावी दवाखान्यात स्वस्तात औषधे मिळतील याची माहीती नसते ती करून देता येईल.

एक मला अतिशय अस्वस्थ करून गेलेला अनुभव, माझ्या आईला कॅन्सरवर उपचार चालू होते. तेंव्हा काही दिवस पुण्यात होतो. घराच्या बाहेर असलेल्या नळावर बाजूला बांधकामावर कामाला असलेल्या कुटुंबातले काहीजण पाणी भरायला येत. त्यातली एक बाई आजारी वाटली म्हणून मी मारे लेक्चर देऊन तिला डॉ़क्टरकडे जायला सांगितलं. काही सेवाभावी डॉ. आणि रुग्णालयाचे पत्तेही मिळवून दिले. बरं इतकी आजारी असूनही रोज पोटासाठी तिला बांधकामावर काम करावेच लागणार होते. काही दिवसांनी ती बाई परत भेटली तर तिला निदान झालं होतं आईलाच झालेल्या कॅन्सरचं. आईच्या आजारावर होणार्‍या खर्चाची जाणिव होती आणि त्याहून जास्त जाणीव हे उपचार यशस्वी होतीलच याची खात्री नव्हती. त्या दिवशी मला स्वत:च्या खुजेपणाची इतकी जाणिव झाली ती डोक्यातून जाईनाच. त्यात तिला इतके दिवस ज्याची जाणिव नव्हती ते सत्य पुढे आणायला कुठेतरी मी कारणीभूत होतो. कारण ती अज्ञानात सुखात होती.
शेवटी आपण स्वार्थी आहोत आपल्या कुटुंबापुरतंच आपण बघू शकतो असा कोता आणि पळपुटा विचार करून मी त्यातून बाहेर पडू शकलो.

अजय>> १) आणि २)>> +१.
याशिवाय आपल्या घरी काम करणं त्यांच्यासाठी शक्य तेवढं सुखकर आणि आरामदायी करता येईल हे बघायला हवं. चांगल्या प्रतीचे साबण/ फिनेल इत्यादी उत्पादनं वापरणं हे त्यांच्या आणि आपल्याही आरोग्यासाठी हितकारक आहे. मला फार पुस्तकी भाषेत लिहायला नाही जमत आहे, त्यांच्यासाठी आपल्या घासातला घास (शिळंपाकं उरलंसुरलं अन्न नव्हे)काढून ठेवणं फारसं कठीण जाऊ नये.

Sad नाही अजय, क्युरेटीव्ह थेरपी शक्य नसेल पण अनेक संस्थात पॅलिएटीव्ह केयर अल्प दरात / मोफत दिली जाते. त्या बाईचे जगणे सुखाचे नसेल तरी एक जेंटल डेथ साठी आपण कारणीभूत झालात. हे ही नसे थोडके.

आठवडी सुट्टी/ बोनस/ विमा इत्यादी द्यावा लागला तरी चालेल पण त्याबरोबरच न सांगता काअम सोडून जाणं, दांड्या मारणं, वाट्टेल तेवढी पगारवाढ मागणं या गोष्टींनाही चाप बसेल अशी अपेक्षा आहे. << +१००

नोकरीतल्या लोकांना घरामधली, स्वतःची आजारपणे यासाठी ठराविक दिवसच पगारी रजा घेता येते, ठराविक दिवसच वार्षिक सुट्टी घेता येते. त्यापेक्षा जास्त दिवस झाल्यास ती बिनपगारी घ्यावी लागते. हे पण येऊदेत.

दर महिन्याला गावी कुणाच्या तरी आऊच्या काऊची मयत होते की ४-५ दिवस दांडी. हे नको.

हो अजय. एका मर्यादेपलीकडे आपण कुणासाठीच काही नाही करू शकत. तीच आपली मर्यादा.
रार, १२० इंडस्ट्रींचा विचार करण्यापेक्षा आपण सध्या इथल्या वाचकांची जी कक्षा आहे त्याचा विचार करू ते फायद्याचं ठरेल.
उदाहरणार्थ. मी लहानपणी टीव्हीवर रिक्षावाल्यांच्या समस्या पाहिल्या होत्या. एक पाय तिरका बाहेर काढून संपूर्ण पाठीचा आकार नागमोडी करून रिक्षा चालवणार्यांची सवय असलेल्या सर्वांना मणक्याचे आजार होतात. ते असे का बसायचे तर रिक्षाच्या त्या भागातल्या कुठल्यातरी पार्टमधे दुरूस्ती अावश्यक असून ती करायला रिक्षामालक वा ते स्वत: करू शकत नसत. आता कधीही तिरका रिक्षाचालक दिसला की हे मनात येते पण नुसते बोलून काय उपयोग?
पोळ्यावाली बाई म्हणाली की, माझी पाठ दुखतेय तर माझ्या मनात उद्या हिने दांडी मारली तर मला काय काय तयारीत राहावे लागेल याचे आडाखे सुरू होतात, मग तिच्या आरोग्याची काळजी. हे स्वाभाविक आहे. पण तिला विश्रांतीची गरज आहे हे मात्र मी मनात मान्य करते हा असे लेख वाचल्याचा फायदा.
दुसराच मुद्दा:
वाढत्या वजनासोबत येणार्या समस्यांच्या भीतीपोटी वजन कमी करण्यासाठी (काहींचे आटोक्यात असूनही फिगर मेंटेन करण्यासाठी) वाढत चाललेला अवेअरनेस अधिक ताण देतो व नवीन समस्यांना आमंत्रण देतो असे मला वाटते.

वाढत्या वजनासोबत येणार्या समस्यांच्या भीतीपोटी वजन कमी करण्यासाठी (काहींचे आटोक्यात असूनही फिगर मेंटेन करण्यासाठी) वाढत चाललेला अवेअरनेस अधिक ताण देतो व नवीन समस्यांना आमंत्रण देतो असे मला वाटते.>> ह्या अनुषंगाने,

माझ्या समोरील पेंट हाउस मध्ये राहणारी गृहिणी ह्या परिस्थितीत आहे. नवरा अक्षरशः गडगंज कमावतो. एकच मुलगा तो ही हातावेगळा झालेला आहे. हिला स्वयंपाकाचे काही फारसे काम नाही. तीन बारक्या शरीरयष्टीच्या बायका रात्रंदिवस हिच्या हाताखाली राबतात. एकही घरकाम नाही. कपडे फोल्ड करणे पण नाही. अश्याने वजन वाढलेले आहे. पण हिमोग्लोबिन कमी. तर कायम वजन कमी करायचे उपाय करत असते. महागाची ट्रेडमिल व इतर साधने घरात आहेत. काही झाडपाल्याची औषधे पण करतात पण वजन कमी करायला जे हालचाल, शारीर मेहनत हवी ती आजिबात होत नाही. रात्रीची भांडी पण अगदी १२ वाजले तरीहे मेड्च घासून जाते. नाहीतर रात्री कुठेतरी बाहेर खाउन येतात.
खाणे कमी होत नाही. उलट बाजूला मेड आहे. जी १२ घरची कामे करते. पाय दुखत असले तरी उत्तम घर पुसते. सिंगल पेरेण्ट. हिला ती मालकीण एक पैसा जास्त देत नाही की खायला देत नाही. असे पण डिव्हिजन ऑफ लेबर असू शकते. मी ह्या अक्षात कुठे तरी मध्ये आहे. म्हणून मला हे नेहमी जाणवत राहते. ह्या मोलकरणीला ती आमच्या घरी कामाला आली की मी चहा व जेवण देते. कारण ती बरेच वेळा उपाशीच काम करत असते. व तंबाखू खात राहून भूक व थकवा मारत राहते. हे बरोबर नाही.

धाग्याच्या अनुषंगाने.: माझी लाइफ कोच असे म्हणाली कि. ज्या बायका १५ -२० वर्श नोकरी करून मग व्हीआर एस घेतात त्यांना घरी बसण्याची नवलाई संपली की काही ना काही आजार जडतात. मानसिक परिस्थिती डाउन होते. कारण घरी राहायची सवय गेलेली असते.

Pages