कुटुंब वय आणि फ्याशन

Submitted by वनिता प on 3 November, 2014 - 07:24

मी एका गावात वाढले . लग्नानंतरही जवळच्या एका छोट्या शहरात स्थायिक झाले. त्या काळात तशीही फ्याशन नव्हतीच, त्यात गावात तर अजिबातच नाही . गावी फक्त साडी . घरी असो वा बाहेर. तशी माहेरीही साडीच वापरायचे . साडी शिवाय दुसरे काही वापरतात हा नाही मनात . हे सर्व ९० च्या पूर्वीचे . ९० च्या दशकात मुंबईतल्या काही स्त्रिया क्वचित कधीतरी मे महिन्यात गावी आल्यावर ड्रेस घालून दिसल्या कि अप्रूप वाटायचे त्याचे. त्या पण क्वचितच दिसायच्या कारण बहुतांश कुटुंबात हे स्वीकारलेच गेले नव्हते. पण कधी आपणहि वापरू असे वाटलेच नाही. नंतर नंतर हे फ्याड वाढत गेले . गावी तिशीतल्या बायका ड्रेस वापरू लागल्या. पण आमच्यासारख्या ४० मधल्या बायका मात्र हे तरुणाईचे छंद वाटायचे. माझ्या मनाला कधीही आपणही ड्रेस वापरावा असे नाही. अगदी माझ्या मुंबईतल्या धाकट्या बहिणीसुद्धा साडीचा वापर निदान मुंबईत तरी कमी केलेला. घरी तर नाहीच. घरी कायम गाऊन वापरायची ति. बाहेर साडी किवा ड्रेस. ९६ साली मी मुंबईला गेलेले बहिणीकडे तेव्हा मी हे पाहिलेले . परंतु मला काही हौस नाही वाटली आणि ३ आठवडे तिथेही कुटुंबाचे नियम पाळत मी जशी गावी होते तशीच राहिले. नंतर २००० मध्ये मी पुन्हा मुंबईला गेले बहिणीकडे निमित्त होते मुलाची १२ विची परीक्षा संपल्याचे. तोपर्यंत बरेच बदल झालेले फ्याशन मध्ये मुंबई मधल्या. परंतु आम्ही गावातल्या बायका मात्र तश्याच. भर मे महिन्यात उकाडा फारच असायचा. एके दिवशी मी आणि बहिण एका नातेवाईकाच्या लग्नाला जाऊन घरी आलो. संध्याकाळचे ७ वाजलेले. घरी येईपर्यंत घामाने चिम्ब. घरी माझा मुलगा आणि बहिणीचे २ मुलगे. बहिणीचा नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. बहिणीने सुचवले कि मी गाऊन घालावा. पण मला काही ती कल्पना पटेना. तसे पाहायला गेले तर घरी कुणीच नव्हते. मला नाही आवडत, लोक काय म्हणतील, ह्या वयात हे शोभणार नाही अशी बरीच कारणे दिली, पण बहिण मागेच लागली. शेवटी एकदा नाईलाज म्हणून गाऊन घातला बहिणीचाच. परंतु खोलीतून बाहेर यायचे धाडसच होईना . कसेतरी अवघडल्यासारखे त्या संध्याकाळी घरात मी वागत होते. इस्त्रीचे कपडे घेऊन आलेल्या माणसासमोर मला जायला धीर होईना . असा हा पहिला बदल मुंबईमध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी झाला . बहुतेक कुणालाही काही फरक पडत नव्हता, मी गाऊन घातलाय ह्याचा. पण मला मात्र प्रत्येकाला फरक पडतोय असे वाटत होते. पण एक नक्की. मुंबईतल्या स्त्रियांसाठी जरी गाऊन म्हणजे रेगुलर वेअर असला तरी माझ्यासाठी ती फ्याशन होती. वय आणि कुटुंबाचे नियम ह्यामुळेच मला ती करताना अवघडल्यासारखे होत होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद .'आतल्यासहीत माणुस' नावाचा जो सुंदर ब्लॉग आहे तो माझ्या फॅशनविषयीच्या अनेक कलासक्त गोष्टी विषयीचा एक स्रोत आहे ,त्यांनी केलेली स्तुती पाहुन हरकणारी बाहुली Happy .

वनीता प -- लेख आवडला ते लिहायचे राहीलं होतं.पुर्वीच्या काळात गावच्या ठिकाणी तुम्ही जे म्हणताय त्या गाउन विषयी खरच टॅबू होते.पण आता मी गावामधेही जवळपास बर्यांच स्त्रीयांना हा घालताना पाहते. मला स्वतःला मात्र गाउन केवळ घरातच घालावा असे वाटते.बाजारात अथवा बाहेर जाण्यासाठी नाही ते फार बरं दिसत नाही त्यावर ओढनी घेतली तरी. पुलेशु

फॅशन मुळात केवळ फॅशन कधीच नसते.
सामाजिक, राजकीय, आर्थिक, कलाप्रवाह, विचारसरणी, मानसिकता असे अनेक स्तर असतात प्रत्येक फॅशनच्या (कपडे, राहणी, घरांची रचना, घरांची सजावट, आर्किटेक्चर सर्व) मागे.

हे कसे समजून घ्यायचे असल्यास कुठलेही फॅशन हिस्ट्री/ क्लोदिंग हिस्ट्रीचे पुस्तक वाचून बघा. गमतीशीर प्रकरण आहे हे सगळं.

नऊवारीची पाचवारी या बदलामागे सोय नक्कीच नाही. वावरण्याची सोय नऊवारीमधे जास्त चांगली आहे.
आजची गोल साडी हा साडी नेसण्याच्या पद्धतींवर झालेला इंग्रज संस्कार आहे.

सामाजिक, राजकीय, आर्थिक, कलाप्रवाह, विचारसरणी, मानसिकता असे अनेक स्तर असतात प्रत्येक फॅशनच्या (कपडे, राहणी, घरांची रचना, घरांची सजावट, आर्किटेक्चर सर्व) मागे. <<< ह्या माहितीसाठी आभार! (विचारसरणी व मानसिकता ह्यातील सूक्ष्म फरकाबाबत अंदाज लावण्याचा प्रयत्न करत आहे).

तसेच, मला वाटत होते की पाचवारी 'नेसणे' सोयीस्कर असेल म्हणून सोय म्हणालो. वावरण्याची सोय नऊवारीत चांगली असणार ह्याची कल्पना होती. घाईघाईच्या दैनंदिन आयुष्यात पेहराव करण्यास कमी वेळ लागावा म्हणून पाचवारी अधिक सोयीस्कर ठरले असेल असे वाटले.

कमी कपडे घालणे म्हणजे फ्याशन असा एक गैरसमज सध्या मुलींमध्ये पसरला आहे . सनी लिओन हि जर आजची आघाडीची अभिनेत्री असेल तर वेगळी अपेक्षाच नको .
असो नवीन फ्याशन चा स्वीकार करताना तुम्हाला जे अवघडलेपण आले त्याचे यथार्थ चित्रण तुम्ही केले आहे .

साडी आणि सलवार कमिज मधले अमेरिकन्स फार गोड दिसतात >>>अनुमोदन
(योगा पासून भारतीय कपड्या पर्यंत सर्वच भारतीय गोष्टी अमेरीकन्स ला शोभून दिसतात आपल्याला या गोष्टींची किंमत नाही हेच दु:ख )

म्हणजे कधीमधी उलटा बनियान, खिसे बाहेर आलेली शॉर्ट वगैरे असेल.
>>>>>

बनियानमध्ये, गोल गळा, खोल गळा, अर्ध्या बाह्या, बिनबाह्या, विविध रंग, प्लेन कापड, जाळीदार कापड, लाईनिंग टेक्चर वगैरे वगैरे ब्रांडेड मध्येही सापडते. एफएस बोले तो फॅशनस्ट्रीटला चक्कर टाकाल तर आणखी प्रकार मिळतील, बरेच दिवस तिथे जाणे झाले नाही... असो.
आणि शॉर्टसमध्ये तर लिटरली सतराशे साठ प्रकार मिळतील. कपड्यांतील विविधता असो, वा मांड्यांच्या वीतभर वरती पासून थ्री फोर्थ असो, खाली घसरू नये म्हणून नाडा, इलॅस्टीक, वा डेनिम जीन्ससारख्या चैन बटण असो, बॉडीशॉडी दाखवायला अंगाबरोबर टाईट असो वा हवा खेळती राहण्यासाठी अघळपघळ असो, त्यावर पॉकेट्स तर विविध प्रकारची येतातच पण किल्लेबिल्ले लाऊन सजवलेल्याही मिळतात, आणि दोरे उसवून फाडलेल्याही मिळतात, काही शॉर्टसमध्ये तर आतून अजून एक जाळीदार शॉर्ट लटकवली असते जिचे प्रयोजन मला आजवर समजले नाही. शेजारचे एक काका एकदा घेऊन आलेले, मला म्हणाले, रिशी तू पण ट्राय कर, आमच्या बंटीला पण घेतलीय.. मी उद्धटपणे म्हणालो, "काका आता तुम्ही मला फॅशन शिकवणार होय.." तसे मला धपाटा मारून निघून गेले.. असो, पोस्ट जरा भरकटली क्षमस्व!
पण माझे बालपण अश्या युगात आणि अश्या मित्रमंडळीत गेलेय की अक्षरशा चढाओढ लागायची, मार्केटमध्ये आलेल्या नवनवीन फॅशन उचलायची किंवा एखादी स्वत: इन्वेंट करायची.. जसे की स्टिकर लावणे, चैनी अडकवणे, पेनाने नक्षीकाम करणे, फाडणे उसवणे आणि पुन्हा शिवणे.. मुख्यत्वे जुन्या मोठ्या जीन्सला अर्धी फाडून शॉर्टस तयार करताना असले प्रयोग चालायचे.. खिशात जास्त पैसे नसतील, वा बजेट कमी असेल, तरीही लोकांचे लक्ष वेधणारे काहीतरी घालायचे आहे यातून बरेच शोध लागतात.

I guess, एकूणच लेखात आणि प्रतिक्रियांमध्ये फॅशन आणि वेगळे काही तरी करणे ह्यामध्ये गल्लत होते आहे असे वाटते.

धन्यवाद सर्वांचे . मी जे वर्णन केलाय तो प्रसंग २००० मध्ये मुंबईत घडला. मला सांगायचा मुद्दा हा होता कि एवढी एखाद्या गोष्टीची सवय होते कि अवघडलेपणा येतोच. अगदी फक्त माझी बहिण आणि माझा मुलगा असताना त्यांच्या समोरही तो आला . त्यात मलाही गाऊन घालायची इच्छा होती असे नाही. ह्या वेळी माझ्या मनात एक भीती होती ती म्हणजे माझ्या घरच्यांना कळले तर ? त्यामुळे अवघडलेपणा आणखी वाढतो . जर हे घरच्यांचा पाठींबा असेल तर थोडे सोपे होत असावे .

मग प्रॉब्लेम आहे. सवयीचे नसलेले कपडे घालण्याने अवघडलेपणा येणे ठिके पण त्यात घरच्यांची भिती कशाला?
४७-४८ या वयाला एखादा कपडा थोडा वेळ घातला तर घरचे काय म्हणतील याची भिती वाटत असेल तर ही परिस्थिती दुर्दैवीच आहे.

हो कारण गावी सहसा कुटुंब प्रमुख हा काही अलिखित नियम बनवूनच टाकतो अशी त्यावेळी परिस्थिती असायची आणि सगळेजण हे नियम पाळत असतात . त्यामुळे एखाद्याने जरी काही वेगळे केले तरी वाद होण्याच्या शक्यता जास्त . कारण ती व्यक्ती एकटीच वेगळी पडायची . आणि त्यात स्त्री असल्यास जास्तच , पुरुषप्रधान संस्कृतीमुळे . आत्ता ह्या गोष्टी गावी देखील बदलू लागल्यात हि चांगली गोष्ट आहे .

सामाजिक, राजकीय, आर्थिक, कलाप्रवाह, विचारसरणी, मानसिकता असे अनेक स्तर असतात प्रत्येक फॅशनच्या (कपडे, राहणी, घरांची रचना, घरांची सजावट, आर्किटेक्चर सर्व) मागे. >>>> यात खुप मोठा अर्थ लपला आहे हे असं अभ्यासपुर्ण तुम्हालाच जास्त चांगलं लिहिता येतं. ग्रेट ,मिनिंग ऑफ फॅशन साठी Happy
वावरण्याची सोय नऊवारीमधे जास्त चांगली आहे.>>>> त्यामुळेच तर पुर्वी स्त्रीया घोडेस्वारीही नउवारीत करायच्या.पाच सहा वारीत कठिण आहे हे.
खरच ऋन्मेऽऽष यांना बरीच माहीती आहे फॅशन बद्दल मुलांच्यातरी Happy .

वनिता प, मस्त लिहिल आहे तुम्ही. माझ्या दोन्ही आत्या जिन्स घालतात आम्हाला त्याची सवय आहे. दोन वर्षापूर्वी मोठी आत्या वय ६० माझ्याकडे राहायला आली होती. ती आणि मी शॉपिंगला जाताना आम्ही दोघींनी जिन्स घातल्या होत्या. बिल्डिंगमधल्या सगळ्याजणी तिला बघत राहायला. Happy
मला तेव्हा थोड अवघडल्यासारखे झाले होते त्याची आठवण झाली.

अगदी बरोबर. अनोळखी लोकांच्या नजरा आणि ओळखीच्या लोकांचे काही आश्चर्यकारक तर काही कुत्सित अभिप्राय आणखी अवघडल्यासारखे करून टाकतात . अश्या परिस्थितीत प्रोत्साहन देणारी माणसे मला तरी वाटते कमीच भेटतात .

>>>अनोळखी लोकांच्या नजरा आणि ओळखीच्या लोकांचे काही आश्चर्यकारक तर काही कुत्सित अभिप्राय आणखी अवघडल्यासारखे करून टाकतात . अश्या परिस्थितीत प्रोत्साहन देणारी माणसे मला तरी वाटते कमीच भेटतात<<<

तुमच्या प्रत्येक प्रतिसादामधून तुमचा मुद्दा (माझ्यासाठी) अधिकाधिक क्लिष्ट होत चाललेला आहे.

वरील विधानातः

१. अनोळखी लोकांच्या नजरा का बदलाव्यात? जे तुम्हाला, तुमच्या पेहरावाला अजिबात किंवा विशेष ओळखत नाहीत त्यांच्या नजरांमध्ये काही विशिष्ट (तुम्हाला नको होतील असे) भाव दिसतात हे तुमच्या मनाचे खेळ आहेत असे म्हंटले तर चूक ठरेल का?

२. ओळखीच्या लोकांना आश्चर्य वाटणे इतपत ठीक आहे. त्यांचे कुत्सित अभिप्राय म्हणजे काय? ते तोंडावर म्हणतात का की 'तू आणि गाऊन घातलास? शोभतोय तरी का तुला?' वगैरे? असे कोणी म्हणत नसावे आणि म्हणत असले तर हिरमुसणे, लाजणे, लगेच साडी नेसायला घेणे, अपराधी वाटणे वगैरे प्रतिक्रिया (माझ्यामते) चूक आहेत. त्यांचे 'कुत्सित अभिप्राय' जर फक्त नजरांमधून, सुस्कार्‍यांमधून किंवा आपल्या पाठीवर बोलण्यामधून जाणवत असतील तर तुम्ही तुमचे मन सामर्थ्यवान बनवायला हवेत. त्यांच्या तश्या अभिप्रायांमुळे तुमचे प्रत्यक्षात काहीच बिनसत नसते.

३. 'अवघडल्यासारखे करून टाकतात' ही तुमची मनोवस्था इतरांच्या तुमच्याप्रती असलेल्या वर्तनामुळे आहे की आपण काही नवीनच प्रकार केलेला आहे त्यामुळे आहे हे तपासावेसे वाटले नाही का? तुमचा नवीन पेहराव तुम्हालाच सुरुवातीला असुरक्षिततेची जाणीव देत असेल असे नाही का वाटले?

४. 'प्रोत्साहन देणारी माणसे कमीच भेटणे' हा निष्कर्ष किंवा ताशेरा जे काय असेल तोही पटत नाही. कायम साडी नेसणार्‍या स्त्रीने गाऊन घालणे ही क्रिया मुळात तुम्हाला प्रोत्साहन देण्याच्या पात्रतेची वाटत आहे असे समजू शकतो का? तसे असल्यास दुसर्‍यांचे प्रोत्साहन नक्की हवे आहे का? दुसर्‍यांच्या नजरांना चार दिवसांत सवय होईल असे वाटत नाही का? तुम्ही जे करता ते योग्य आहे व तसेच करा असे म्हणणारी माणसे सतत आजूबाजूला असणे ही तुमची मानसिक गरज फक्त 'साडी की गाऊन' ह्याच विषयापुरती मर्यादीत आहे की एरवीही हे तपासले का?

माफ करा, बायकॉलॉजीमध्ये एवढा मोठा प्रतिसाद मी लिहिला म्हणून! माझ्या प्रतिसादाकडे कोणी कुत्सितपणे पाहिले किंवा प्रोत्साहन दिले नाही तर स्त्रिया अजूनही स्वतःला स्वतंत्र समजत नाहीत असा धीट निष्कर्ष काढण्याऐवजी मी मनातच खट्टू होत बसेन.

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

मी जे काही लिहिलेय ते आरती ह्यांच्या लिखाणाला अनुसरून होते. आपण कितीही मनाची तयारी केली तरी उगाचच आपल्याला अवघडल्यासारखे होते . कारण आपण जास्त विचार करत असतो .

एक अनुभव म्हणून छान लिहीलंय!!
वनिता प | 5 November, 2014 - 18:26 नवीन >> प्रतिसाद अजीबात पटला नाही...
का त्याची काही कारणे बेफिकीर यांच्या प्रतिसादात!
वनिता प | 7 November, 2014 - 12:32 नवीन >> अबकी बार...!! Happy हा प्रतिसाद योग्य!
सिनि | 4 November, 2014 - 01:21>> यू सेड इट!!

कुटुंबाचे नियम, त्यामुळे गाऊन घालताना अवघडल्यासारखं वाटणे... इत्यादी कारणांसाठी रात्री झोपतानाही साडी नेसणार्‍या स्त्रियांविषयी मला वैयक्तिकरित्या खरंच वाईट वाटत असे.
या धाग्यावरही अनघाच्याच धाग्यावरील लिंक : http://www.youtube.com/watch?v=odmcmnWjK10&spfreload=10 Happy

मुंबईच्या हवेस एकच बेस्ट ड्रेस आहे घरी घालायला शॉ र्ट स किंवा बर्म्युडा आणि टीशर्ट. त्यात भयंकर स्वैपाक पोळ्या करायच्या असतील तर नक्कीच. आणि इथे कोणालाच नाक मुरडायला वेळ नसतो.

बेफी छान लिहीले आहे. आपण काय घालायचे ते आपन ठरवायचे. नो वन कँन डिक्टेट. गाउन / कफ्तान वगिअरे तर शॉवर करून मग घालायला बेस्ट. बाहेर जाताना साडी वगैरे. कारण हपिस एसी असते जनरली व फिजिकल काम नसते. वंदना ताई तुम्ही तर एकदा लेगिन्ग्ज व कुडता असा मुंबईच्या स्त्रियांचा ड्रेस घालून फिरून बघा. एकदम छान वाटेल. केस पण छान बॉब करून घ्या. गर्मीत बेस्ट. मेक ओवर चा फोटो टाका. जी ले अपनी जिंद गी.

एक सहज आठवले,

नेहमी मिश्या ठेवणार्‍या पुरुषाने कधी अचानकमध्ये मिशी साफ उडवून लावली तर त्याला इतरांच्या ज्या नजरा झेलायला लागतात ना त्याची कल्पना न केलेलीच बरे.. Wink

पण कालांतराने लोकांच्या नजरेला सवय होतेच, वा ती लगेच न झाल्यास आपण तरी लोकांच्या तश्या नजरेला सरावतो.

अमा तुम्ही लिहिलेय फार छान ,पण बर्मुडा आणि ती शर्ट हा त्यांच्यासाठी कल्चरल शॉक असु शकतो.मी पण हेच सांगायला आले होते की होउनच जाउद्या मेकओवर ,पण फक्त त्यांच्या मर्जीने.

वनिता प-- ज्या अर्थी तुम्ही हा लेख लिहीलाय म्हणजे नक्कीच तुमच्या पसंतीचे जे काही (ड्रेस) तुम्हाला आवडेल ते घालायची इच्छा आहे. प्रथम तुम्ही तुमच्या मापाचे व्यवस्थित ड्रेस विकत आणा किंवा शिवून घ्या .मग तो घालुन ट्रायल मारा (घाला)स्वताला आरशात पाहुन एक स्माईल द्या . Happy त्याने खरतर अर्धा आत्मविश्वास येतो काहीही नवीन करण्याचा . मग तो ड्रेस कुठेही बाहेर घालण्याआधी दोनदा घरातच घाला त्यात हळुहळु कंम्फर्ट व्हाल. मला नाही वाटत तुमच्या घरचे याबाबद नाराज होतील किंवा विशिष्ट नजरा करतील .जरा आश्चर्य वाट्लं तर ठीक आहे .त्यातही वेगळी मज्जा असते. मग तो बाहेर घालुन मस्तपैकी फिरायला जा. तुम्हालाच समजेल की तुम्ही ह्या ड्रेसेस मधे छान दिसताय . मुलींमधे जन्मतः एक सेन्स असतो आपल्याला नक्की काय चांगले दिसु शकते याचा .त्याचा विचार करा, इतर नको.तुम्हाला तर हेही समजतय की तुम्ही जरुरी पेक्षा जास्तच दुसर्यांचा विचार करताय जसं तुम्ही लिहिलय वर ,याचा अर्थ फक्त एक पुश (पाठिंबा)हवाय तो हा ,आमच्या सगळ्यांच्या ह्या पोस्ट समजा.
आणि नजरांच्या बाबतीत मी म्हणेन कुणीही कुणाकडे कसे पाहतेय हे आपल्या हातात नसते .वाईट नजरेने पाहणारे साडीतही तसेच पाहणार, मिनीज मधेही आणि बुर्ख्यांतही .त्यामुळे त्याला कसे हाताळायचे हे नंतर कधीतरी सांगेन.

आता शेवटचं एकच तुम्हाला काय घालायचे आहे ते फक्त तुम्हीच ठरवू शकता याचा तुम्हाला पुर्ण अधिकार आहे.सो
मझ्याकडुनही "जी ले अपनी जिंद गी". Happy

सिनी धन्यवाद . खरच आपल्या सूचना माझ्यासारख्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढवणाऱ्या आहेत

मला माझ्या अनुभवातून एका गावातल्या स्त्री चा अनुभव सांगायचा होता. आणि हि परिस्थिती महाराष्ट्रातल्या बर्याचश्या गावात आहे. माझ्यातील राहणीमानातल्या पुढच्या बदलांबद्दल लिहू कि नये हा प्रश्न पडलाय . आपले मत काय? कारण ते फक्त माझ्या बद्दलच लिखाण होणार आहे. आणि ते रंजक वाटू शकते

>>>माझ्यातील राहणीमानातल्या पुढच्या बदलांबद्दल लिहू कि नये हा प्रश्न पडलाय . आपले मत काय? कारण ते फक्त माझ्या बद्दलच लिखाण होणार आहे. आणि ते रंजक वाटू शकते<<<

खूप मजा येईल वाचायला असे मनापासून वाटते.

फक्त एक दोन गोष्टी सुचवतो, बघा पटतात का! बहुधा तुमचे (मला वाटत असलेले) वय आणि येथील सदस्यांचे सरासरी वय ह्यात दहा ते पंधरा वर्षाचे अंतर असावे. हे जवळपास एका पिढीचे अंतरही ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला जे नवे वाटेल ते येथे ऑलरेडी जुने झालेले असू शकेल हे सेफली गृहीत धरू शकाल असे वाटते. दुसरे म्हणजे, तुम्हाला जे म्हणायचे आहे ते पूर्णपणे तुमच्या मूळ लेखातच कव्हर होईल असे बघितलेत तर बरे होईल. काही भाग प्रतिसादांमार्फत अ‍ॅड होत राहिला तर चर्चा वेगळी वळणे घेऊ लागते. Happy

मलाही आधी वाटत होते की तुम्ही उगाच पोस्ट लिहायला भाग पाडत आहात पण तुम्ही खरया नसता तरीही माझे उत्तर तेच असते . लिहा लिहा. तुमचे अनुभवही इतरांसाठी मार्गदर्शक ठरु शकतात. मला तर काहीही वाचायला आवडेल तुमचं लिखाण ,रंजकतेचाच प्रश्न असेल तरी लिहाच ,आम्ही अधिक रंजक लिहु त्यावर. Proud Happy

आणि जनरेशन गॅप माबो वर तरी फार दिसत नाही .उलट कोण कोणत्या वयाचा आहे हे समजण्यासाठी बरीच कष्ट पडतात.आणि तरीही वय काहीतरी दुसरच निघतं Proud त्यामुळे वयाचा प्रश्न नाही ,कसेही लिहा सगळे काहीही लिहिणारच. Happy

वयाचा विषय निघाला आहे म्हणून .. सोशलसाईटवर कित्येक छोट्या वयाचे आपण फार प्रगल्भ आहोत हे दाखवण्याचा आटापीटा करत असतात तर कित्येक मोठ्या वयाचे आपण अजूनही कसे अल्लड आहोत या धडपडीत लागलेले असतात ... या सर्वात जर आपण प्रामाणिकपणे काही लिहाल तर नक्कीच चांगले... तर लिहा Happy

अ‍ॅबसोल्यूटली! प्रामाणिकपणे लिहिणे इज एव्हरीथिंग! (इट्स अनादर थिंग दॅट आऊट ऑफ ऑल द नोन साईट्स, मायबोली अलाऊज यू टू एक्स्प्रेस यूअरसेल्फ प्रामाणिकपणे).

फक्त त्यांचे वय आणि मायबोलीसारख्या ठिकाणी, जेथे मुळातच दिड दिड दशक स्थिरावलेले आय डी आहेत तेथे सारे लेखन एकाच प्लॅटफॉर्मवर असावे, असे वाटते.

.........सारे लेखन एकाच प्लॅटफॉर्मवर असावे, असे वाटते.
>>>>>
याचा विस्तार केला तर छान चर्चेचा विषय होईल. मी बहुतेक आपल्या मताशी अंशतः असहमत असेन असे सध्या तरी वाटते Happy

तुम्ही लिहा हो ताई. मी पन्नाशी आणि पुढील वाटचाल असा पण बाफ काढला आहे. वाटल्यास तिथे लिहा. मी आताच दोन नव्या साड्या घेतल्यात आणि श्लीवलेस बिलोज शिवायला टाक्ल्येत.

Pages