ती १० मुल्ये....

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 29 September, 2014 - 05:35

एक छोटासा प्रसंग आपल्यालाच आपली ओळख नव्याने करून देतो.

नेहमीची धावपळीची सकाळ. सगळ्यांचे डबे बनवून झाले, बॅगा पॅक करून झाल्या... मुलीची शाळेची तयारी करून झाली (३.५ वर्षांची पठठी आज न रडता उठली होती) अन तिला घेऊन बाहेर पडले. आज थोडी पाच मिनिटे लवकर आटपल सगळ... रस्त्याने दोघी जात होतो, आमच्या घराजवळच एक बी. एम. सी. ची शाळा आहे. दुरुन दिसत होत, रस्त्यातून चालता चालता शाळेची मूल मधेच उभी राहिली होती, त्यांच्याकडे पहातच आम्ही पुढे चालत होतो. शाळा जवळ आली आणि कानावर बोल ऐकू आले, "वंदे मातरम्........" रस्त्यात चालणारी मुले अचानक का थांबली त्याचे उत्तर मिळाले. अडखळतच माझेही पाय थांबले. डोक्यात मात्र विचार होते "शाळेची बस जाणार तर नाही ना?" नंतर स्वतःचीच लाज वाटली.. रस्त्याने अनेक (सो कॉल्ड एजुकेटेड) सुशिक्षित चालले होते... त्यांना ते बोल ऐकू येत नव्हते का? की त्यांच्याकडे वेळ नव्हता? की त्याना थांबण्याची गरज वाटत नव्हती? की आणखीन काय....? प्रश्न, प्रश्न आणि फक्त प्रश्न... उत्तर नव्हते माझ्याकडे... कारण माझे लहानपण केव्हाच सरले होते.... आज ही व्हiट्स अप वर अनेक मेसेज येतात... एफ बी वर देखील खूप फॉरवर्ड असतात... सगळे जण शाळेचे दिवस खूप मिस करतात. तो दंगा, ती मस्ती, ते मित्र, त्या मैत्रिणी, तो अभ्यास, त्या परीक्षा, शाळेचा पहिला अन शाळेचा शेवटचा दिवस इ. अजून बरच काही. पण आठवतोय का तो मूल्यशिक्षण म्हणून असलेला विषय, त्याची सजवलेली वही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती १० मुल्ये....

१ वक्तशीरपणा
२ सर्व धर्म सहिष्णुता
३ वैद्न्यानिक द्रुष्टीकोन
४ नीटनेटकेपणा
५ सार्वजनिक स्वच्छता
६ राष्ट्रभक्ती
७ राष्ट्रीय एकात्मता
८ सहनशीलता
९ प्रामाणिकपणा
१० क्षमाशीलता

आजही मला आत्मविश्वास नाही की हीच ती १० मुल्ये आहेत का की एखादे मूल्य मी चुकीचे लिहिले आहे? शाळा शिकून आपण मोठे होतो पण सुसंस्कृत होतो का? लहान होतो तेंव्हा सकाळी उठल्यावर 'कराग्रे वसते लक्ष्मी' बोलून दिवसाची सुरुवात व्हायची, आई बाबांना वाकून नमस्कार करायचो, संध्याकाळी 'शुभंकरोती कल्याणम्' बोलायचो.... आज यातील काहीतरी करतो का? निदान जुन्या दिवसांची आठवण येते तेंव्हा ह्या गोष्टी आठवतात का? (आठवण येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे.... ) नाहीतर २६ जानेवारी, १५ ऑगस्ट जर गुरुवारी आली तर आपण वीक एन्ड चुकल्याचे दुःख करून हळहळतो? घरातील संस्कारच नीट जपता येत नाहीत किंबहुना तेवढा वेळ नाही तर देशiबाबतचे प्रेम तरी कसे व्यक्त करणार? देशाच्या सीमेवर आहेत ना सैनिक.... ते करत आहेत ना कर्तव्य.... आम्ही कुठे आणखीन वेळ देणार.... पण देशाबाबत आहे प्रेम मनात, प्रत्येक वेळी कस व्यक्त करणार?

आज या प्रश्नानि मन व्यथित होईल, भूतकाळ आठवू, थोडी स्वतःची कीव वाटेल मग नंतर सगळ् पूर्वव्रत होईल.... सकाळी उठू (घाई गडबडीत), ऑफिस ला पोहचू (धावत पळत) आणि मग असेच दिवस.... ये रे माझ्या मागल्या.... पण लहानपणीचे संस्कार नाही येत मागे... ते तिथेच राहतात आणि आपण भविष्याची चिंता करत धावत रहातो वर्तमानकाळात....

….. मयुरी चवाथे - शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयुरी सर्व गोष्टी पटतायेत ग....पण आजच्या धावपळीच्या आयुष्यात काही गोष्टी नाईलाजाने नाही करता येत पण निदान त्यागोष्टीची जाणीव तरी आहे अजून आपल्याला , Happy

छान लिहिले आहे.

'श्रमप्रतिष्ठा' हे एक मला आठवलेले मुल्य. बाकी मुल्याशिक्षणाचा चांगला परिणाम आयुष्यावर होतो व हा एक स्तुत्य विषय आहे. बाकी या विषयाच्या काही तासिकांचा उपयोग मागे राहिलेला पोर्शन पूर्ण करण्यासाठी केला जायचा.(अवांतर???)

बाकी, शाळेत राष्ट्रगीत किंवा वन्दे मातरम चालू असताना शाळेच्या कुम्पनाबाहेरील व्यक्तींनी उभे राहायला हवे असे मला वाटत नाही. मी एक ठिकाणी राहत होतो तिथे जवळच शाळा होती. सकाळच्या सत्रातील राष्ट्रगीत ते लाउडस्पीकर वरून वाजवायचे. मी तेंव्हा झोपेत असायचो व माझी झोपमोड व्हायची. झोपमोड व्हायचा राग नाही पण तेंव्हा मी उठून कसे सावधान मध्ये उभा राहणार?