'कुणी घर देता का घर' - नटसम्राटांचा टाहो.

Submitted by जीएस on 19 June, 2014 - 18:22

आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे. आणि त्यांचा हा नवा नाट्यप्रवेश नेहेमीप्रमाणे जनतेपर्यंत नेण्याचे 'बहुतही क्रांतीकारी' काम अर्थातच केले आहे मिडीयातील एकमेव KCHP (केजरी सर्टिफाईड ऑनेस्ट पर्सन [या सर्टिफिकेशनसाठी देणगीसह भेटा अथवा लिहा.....]) पुण्यप्रसून वाजपेयी यांनी.

त्याचे झाले असे की 'केजरीवालांना आल्या सव्वातीन नि:स्वार्थी शिंका' या एक्सक्ल्यूझिव ब्रेकींग न्यूजवर काम करावे की 'केवळ झाडांना मिळावा कार्बन डायऑक्साईड म्हणून केजरी करतात श्वसन' ही न्यूज स्टोरी चालवावी याबद्दल सल्लामसलत करण्यासाठी आपले बक्राजी (बहुतही क्रांतीकारी पुण्यप्रसून वाजपेयीजी) दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या गेलेल्या फ्लॅटमध्ये राजीनामा देऊन चार महीने झाले तरी ठाण मांडून बसलेल्या केजरीजींकडे गेले होते. 'केजरी (अखेर) सरकारी घर सोडणार' ही बातमी आधीच अठ्ठेचाळीस तास सतत उगाळून झाली होती, आता प्रत्यक्ष सोडतांनाच एखादा चावा घेऊन तो पुढे आठवडाभर चघळावा हाही उद्देश होताच.

पण बघतात तो काय, केजरीसाहेबांचा नेहेमीप्रमाणे यू टर्न !! भाड्याने मिळालेले घर गेले, दुसरे मिळत नाही, केजरीसाहेब काही घर सोडत नाहीत. दुसरा एखादा वार्ताहर असता तर हे बघून केंव्हाच हिरव्या रंगाचा होऊन उडून गेला असता. पण या दोघांनी डोके चालवले.... आत हे दोघे कसे डोके चालवतात याबद्दल बोलणे आले !!!

'सब मिडीया बिकी हुई है, भ्रष्ट है' असे केजरीजी व त्यामागून केजरीपूजक कोरसमध्ये सतत म्हणत असतात. मुलाखती, बातम्या वगैरे कशा मॅनेज केल्या जातात, कुठला विषय जास्त चालवायचा, काय बोलले काय नाही म्हणजे लोकांना आपले खरे म्हणणे कळू न देता त्यांचा पाठिंबा मिळवता येईल असे सगळे साटेलोटे / फिक्सिंग मिडिया व राजकारण्यांचे असते. हे कसे घडते याचे सव्वा मिनिटाचे थेट चित्रणच बघा.

http://www.youtube.com/watch?v=yRGNTXDO7dI

अरेच्चा हे तर बक्राजी आणि केजरीजी दिसत आहेत !! कसे डोके चालवतात ते पाहिले ना ? तर असे डोके चालवले आणि पुन्हा जन्माला आला नटसम्राटांचा ऐतिहासिक नाट्यप्रवेश ' कुणी घर देता का घर ?'

या नाट्याचे वर्णन करण्यास माझे शब्द अपुरे आहेत. ते वाचताच अंध केजरीपूजकांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागतील, काही मठ्ठ दुष्मन आनंदाने नाचू लागतील, सोनियास्तवक कुमार केतकर आजवर आपण लाचारीत बक्राजींपेक्षा कसे कमी पडलो याने लज्जित होतील. तर माझ्यासारख्या अदानी व अंबानी यांचा हस्तक ( अंबानी, अदानी व माझ्या नवात आय आणि एन ही दोन अक्षरे समान असल्याने मी त्यांचाच एजंट असल्याचा पुराव्यासकट खळबळजनक गौप्यस्फोट आपवाल्यांनी करण्यापूर्वी मीच हे नम्रपणे नमूद करतो) असलेल्या माणसांना मात्र काही प्रश्न पडतील. तुम्हीही वाचा...

http://prasunbajpai.itzmyblog.com/2014/06/blog-post_17.html

अरेरे बेघर झाले, हाय ! जनतेच्या कल्याणासाठी रस्त्यावर आले !! कुटुंबाच्या हालअपेष्टा !!! थांबा !!डोळ्यातले पाणी पुसून मला काही नोंदी करू द्या.

१) २८ डिसेंबर २०१३ रोजी केजरीवाल मुख्यमंत्री झाले. तीन चार दिवसातच त्यांना पाच बेडरूमची दोन घरे मिळणार असल्याची बातमी आली. केजरीवाल हे नेहेमी 'मी आम आदमी आहे, साधा रहाणार, व्ही आयपी संस्कृती मला नको' वगैरे म्हणत. त्या पार्श्वभूमीवर दोन मोठी घरे स्वीकरण्याबद्दल टीका होऊ लागली.

२) ४ जानेवारी २०१४ रोजी केजरीवाल यांनी नेहेमीप्रमाणे मिडियात प्रचंड गाजावाजा करून 'मी साधाच माणूस आहे, मला कशाला एवढी मोठी घरे? माझे हितचिंतकही हेच सांगत आहेत, नको, साधेच घर द्या' असे म्हणत सरकारी घरे नाकारल्याची बातमी झळकली. बक्राजींनी या साधेपणाबद्दल क्रांतीकारी चॅनलवर केजारती सुरू केली.

३) पण हाय रे दैवा ! Times Now ने महिन्याभरातच असे उघडकीला आणले की मुख्यमंत्री झाल्यावर ४८ तासाच्या आत ३० डिसेंबरला केजरीवाल यांनी स्वतःच त्या दोन घरांची ताबडतोब मागणी केली होती (पत्र उपलब्ध आहे), आणि घरे मिळाल्याबद्दल टीका झाल्यावर ते स्वतःच मागितले होते ते साळसूदपणे लपवून घरे नाकारल्याचा गाजावाजा केला.

४) मुख्यमंत्र्याने सरकारी बंगल्यात रहाण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. आक्षेपार्ह आहे तो या सगळ्या प्रकरणातला अप्रामाणिकपणा आणि ढोंगीपणा.

५) १४ फेब्रुवारी २१०४ ला केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ते तोंडाने सतत ज्याचा जप करत असतात त्या प्रामाणिकपणा वा नैतिकता यांचा स्वतःच्या वागण्यातूनही आदर्श घालून द्यायचा असता तर त्यांनी दुसर्‍या दिवशी घर सोडायला हवे होते. त्या ऐवजी ते उपनियम आणि सवलतींचा आधार घेत त्या घरातच ज्यांच्यावर ते सतत टीका करतात त्या इतर अनेक लोकप्रतिनिधींप्रमाणेच ठाण मांडून बसले आहेत.

६) असे प्रदीर्घ काळ ठाण मांडू नये म्हणून भाडे वसूल करण्याची तरतूद आहे तर त्या भाड्याचा गाजावाजा करून ती रक्कम आयआयटीतल्या मित्रांच्या लोकवर्गणीतून जमा करून भरत आहेत. लोकसेवेचा बहाणा करून स्वतःच्या कुटुंबाचा खर्च इतरांकडून पदरात पाडून घ्यायचा हा प्रामाणिकपणा वा आदर्श नैतिक आचरण आहे का ?

७) असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सरकारी नोकरीत असतांना केजरीवाल सरकारी खर्चाने परदेशी शिक्षणासाठी गेले. या शिक्षणाचा उपयोग पुन्हा देशाला झाला पाहिजे म्हणून परत आल्यावर तीन वर्षे तरी काम करणे अथवा ते पैसे सरकारला परत करणे आवश्यक आहे. एखाद्या प्रामाणिक माणसाने जनतेचा पैसा आपण वापरला आहे लक्षात घेउन परत आल्यावर तळमळीने काम केले असते. काही कारणाने नोकरी सोडली तर किमान नियमानुसार पैसे परत केले असते. केजरीवाला यांनी तसे केले नाही २००६ ला राजीनामा दिल्यापासून ते टाळाटाळ करत राहिले. जनतेचे पैसे बुडवले. २०११ साली यावरून टीका झाल्यावर ते सुमारे नऊ लाख रुपये त्यांनी भरले. पण कसे भरले तर पुन्हा आय आय टीच्या मित्रांची लोकवर्गणी !!! स्वतःचे वैयक्तिक उत्पन्न वा जनतेकडुन लोकवर्गणीतून मिळालेली थैलीसुद्धा स्वतःकडे न ठेवता समाजासाठी खर्च करणारे अनेक समाजसेवक आहेत. पण समाजसेवेचा बाऊ करून स्वतःच्या वैयक्तिक उपयोगासाठी निधी जमवणे फारच क्रांतीकारी आहे.

८) बरे, लेखात लिहिल्याप्रमाणे हे खरेच बेबस, बेघर वगैरे आहेत का? डोक्यावर छत नाही अशी करूण परीस्थिती आहे का ? समाजासाठी सर्वस्व उधळून दिले आहे का?

केजरीवाल यांचे दिल्ली परिसरात तीन फ्लॅट आहेत.
१) इंदिरापुरम, गाझियाबाद येथे फ्लॅट आहे.
२) सिवनी येथे एक फ्लॅट आहे.
३) पत्नीचा गुरगाव येथे सव्वादोनहजार स्क्वेअरफुटांचा फ्लॅट आहे.

वीस लाखाहून जास्त कॅश व सोने आहे.
पत्नी इन्कम्टॅक्स कमिशनर दर्जाची अधिकारी आहे. साधारण दहा लाखाहून अधिक उत्पन्न व शिवाय इतर सुविधा.

असा मनुष्य तीन चार महिन्याच्या भाड्यासाठी इतरांचे पैसे कसे वापरतो? जरी ते त्यांच्यासाठीच दिले तरी ते चळवळीसाठीच वापरणे असेच कुठल्याही नैतिक जबाबदारी मानणार्‍या नेत्याने केले असते असे वाटते.

९) बाकी कोणी घर देत नाही वगैरे हास्यास्पद बाबींबद्दल काय लिहावे !!! 'आप'ला मानणारे पन्नास लाख दिल्लीकर बहुतेक अंबानींना सामील झाले आहेत असे वाटते.

सतत काहितरी नाट्यमय बातम्या निर्माण करून चर्चेत रहायचे, हंगामा करायचा, सहानुभुती मिळवायची हा केजरीवाला यांचा बिनबुडाचा कार्यक्रम दिवसेंदिवस जनआंदोलनाची विश्वासार्हता रसातळाला नेत आहे. सरकार काँग्रेसचे येवो वा भाजपचे वा अजून कोणाचे ! जागरूक सामान्य लोकांच्या संघटनेची/ पक्षाची गरज आहेच, आणि आता जनतेनेच ढोंगी नेत्यांना दूर करून हा प्रयोग वाचवायची आवश्यकता आहे.

सध्या मात्र मी एवढेच म्हणेन की 'कुणी घर देता का घर' या नटसम्राटांच्या नव्या क्रांतीकारी नाट्यप्रवेशासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल सर्व अंबानी हस्तकांना धन्यवाद. मी फक्त घराचा एक विषय घेउन लिहिले आहे. आणि या प्रत्येक मुद्द्यासंदर्भातील आपची बाजू, स्प्ष्टीकरणे, व्हिडिओ हे सगळे बघून मगच लिहिले आहे

चळवळ सुरू झाल्यापासून पावला पावलाला केजरीवाल यांनी अशी ढोंगबाजी केली आहे. प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा सगळा भर हा स्वतःच्या ब्रँड बिल्डिंगची स्ट्रॅटेजी या एकाच गोष्टीवर दिसतो. या सर्व प्रकरणांवर असे सविस्तर लिहिणे सध्या तरी शक्य नाही. पण पक्षस्थापनेपसून ते तिहार जेलयात्रेपर्यंतचे सगळे नाट्यप्रवेश आपण सर्वांनीच पाहिले आहेत.

ही जनतेची चळवळ होती, ती आजही आवश्यक आहे आणि जनतेने ती पुन्हा ताब्यात घेतली पाहिजे असे मात्र वाटते.

छान छान.
आणखी येऊ द्या असे धागे. तिकडच्या हेडरमध्ये टाकते. म्हणजे ५०-१०० वर्षांनी जेव्हा मुलं-बाळं इतिहास शिकतील तेव्हा सो कॉल्ड बुप्रावादी समाजासाठी काम करणार्‍यांना कसल्याही कारणांवरून कसे मस्त धोपटत होते (आणि समाजाला लुटणार्‍यांची तळी उचलत होते) हेसुद्धा दिसेल त्यांना.
तशी ही वागणूक काही नवीन नाही आपल्या इतिहासाला.

मिर्ची, तुम्ही आपच्या खंद्या समर्थक आहात. त्याबद्दल कुणाचा आक्षेप असायचं कारण नाही, पण मग वरती उपस्थित केलेल्या प्रश्नांची न चिडता, न तिरकस बोलता उत्तरं दिलीत तर मला आवडेल.
केजरीवालांचे २-३ फ्लॅट्स आहेत असं वरती दिलंय, ते खोटं आहे का? मग ते या आधी भाड्याने रहात होते का? जर त्यांचा एखादा जरी, छोटा जरी फ्लॅट असेल तर तिथे ताबडतोब परतायला काय अडचण आहे?

हे सगळे प्रश्न विचारायचं कारण - जेव्हा भ्रष्टाचार विरोध असा मुद्दा घेऊन एखादा पक्ष उभा रहातो, त्याचा नेता तो स्वतः इतर चारचौघांसारखाच सामान्य आहे असं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दाखवत रहातो तेव्हा त्या वागणुकीशी ही घराची घटना मेळ खात नाहीच, उलट जी काही चार चांगली कामं चालली असतील तर त्यावर पाणी फिरवते. लोकांना हा सरळसरळ दुटप्पीपणा वाटतो. वरती आलेले प्रतिसाद त्या दृष्टीकोनातून बघितलेत तर लक्षात येईल.

आणि समजा स्वतःच्या जुन्या रहात्या घरात राहिले असते मुख्यमंत्री म्हणूनही तरी 'मला घर नको' वगैरे पब्लिक स्टेटमेन्ट देऊन गाजावाजा करायची गरज नव्हती. कारण स्वत:च्या घरात रहाणारे ते काही पहिले मुख्यमंत्री नव्हेत. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य सत्तेवर होते तेव्हाही एका बेडरूमच्या स्वतःच्या फ्लॅटमधे रहात, त्यांची मुलगी आणि बायको सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत. आतासुद्धा ममता बॅनर्जी (बाकी कितीही भोंदू असल्या तरी) स्वतःच्या छोट्या घरात रहातात. त्याचा गाजावाजा/ पब्लिक स्टेटमेन्ट द्यायची त्यांना गरज वाटली नाही कधीच.

ज्याची बायको उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आहे, तो स्वतः अधिकारी होता, त्याने 'मला घर मिळत नाहीये' वगैरे कितीही घसा फोडून सांगितले तरी कुणाचाच विश्वास बसणार नाही.

त्रिपुराचे मुख्यमंत्री मणिक सरकार. अत्यंत निष्कलंक राजकीय कारकिर्द, पक्षाच्या कार्यालयात निवास इत्यादी. जीएसने लिहिल्याप्रमाणे भ्रष्टाचारविरोधी चळवळ लोकांची होती, अत्यंत आवश्यक होती व सुरू राहिली पाहिजे.
आपने दिल्लीत जवळपास बहुमत घेउन भारतीय राजकारणातला एन्ट्री बॅरिअर शुन्यावर आणुन ठेवला होता. ही एक प्रचंड मोठी लोकोपयोगी घटना होती. पण तिचा नीट वापर न केल्यामुळे जो विश्वासाला तडा (ट्रस्ट डेफिसीट) गेला आहे तो अधिक मोठा आहे आणि त्या तड्याने एन्ट्री बॅरीअर अजूनच उंचावला आहे.

केजरीवालांच्याच घरावरून इतका हंगामा का लोकहो ? असे करून मीडीयाच आणि तुम्हीच त्यांना प्रसिद्धी देत नाही का? बरे केजरीवालांनी भडे भरलेच आहे आणि अता घरही सोडल्याची का सोडत असल्याची बातमी वाचली परवाच.

आजच्या महायुतीचे स. मित्र आठवलेंना त्यांच्या दील्लीच्या निवासस्थानातून हाकलून बाहेर काढले गेले होते, ते आठवले. पण आठवलेंना त्या प्रकरणी काही अशी प्रसिद्धी मिळाली नाही की त्यावर कोणी लेख पाडले नाहीत.

रच्याकने, मोदींनी त्यांच्या कागदावरच्या बायकोला एक बरे घर तरी घेऊन द्यावे असे मनापासून वाटते.

त्यांचा एखादा जरी, छोटा जरी फ्लॅट असेल तर तिथे ताबडतोब परतायला काय अडचण आहे? >> त्यांच्या मुलीची परीक्षा असल्याने ते काही काळ भाडे भरून त्या घरात रहात होते. म

प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा सगळा भर हा स्वतःच्या ब्रँड बिल्डिंगची स्ट्रॅटेजी या एकाच गोष्टीवर दिसतो. >> पण लोकांचे पैसे खर्च करून तरी ते ब्रँड बिल्डिंग करत नाहीयेत. तुम्ही सांगताय तसे स्वतःतले काही अंगभूत गूण वापरून, शारीरीक त्रास सोसून ब्रँड बिल्डिंग करतायेत. मोदींसाहेबांनी तर काही हजार करोड रू खर्च केले म्हणे ब्रँड बिल्डिंगला. तेही परदेशी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन.

वरदा,
केजरीवालांची किती घरे आहेत हे मला माहीत नाही. जीएस ने दिलेली माहिती खरी आहे असं धरून चालूया.
१. गाझियाबाद - दिल्लीपासून अंतर ४१ किमी
२. सिवनी - १७४ किमी (हरियाणा मधलं सिवनी असेल तर)
३. गुरगाव - ४१ किमी
ही माहिती गुगलवरून मिळाली. एवढ्या अंतरावर घरं असतील आणि त्यांचं कार्यक्षेत्र दिल्ली असेल तर ते दिल्लीमध्ये घर शोधत आहेत ह्यात वावगं का वाटावं?
त्यांना येण्या-जाण्यासाठी अदानींचं हेलिकॉप्टर मिळणार नाहीये.

केजरीवालांनी मॅगसेसे पुरस्काराची २५ लाख (की ४० लाख?) रक्कमसुद्धा चळवळीसाठी सीड फंड म्हणून दिली होती असं सगळीकडे वाचायला मिळतंय. त्यांचं घर पत्नीच्या कमाईतून चालत असावं. अशावेळी दरमहा ८५,००० रूपये त्यांच्या मित्रांनी वाटून घेतले तर त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय असावं? माझ्या माहितीत असे काहीजण आहेत, ज्यांनी समाजसेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे आणि कधी काही अनपेक्षित खर्च उद्भवले तर मित्र स्वखुशीने मदत करतात. तू जे काम करतोयस ते आम्हाला शक्य नाही पण आम्ही आर्थिक मदत नक्कीच करू शकतो म्हणून.
केजरीवालांचं भाडं मित्र भरत आहेत हे आपल्याला खटकतं, पण देशभर दौरे करून पुन्हा घरगुती जेवण जेवायला गुजरातमध्ये परत येण्यासाठी अदानी हेलिकॉप्टर देतात हे नाही खटकत?
(तुलना होणार, ह्याला इलाज नाही)

१० एकर जागेवर पसरलेला ऐसपैस मुख्यमंत्री निवास नाकारून केजरीवालांनी ५ रूमचा फ्लॅट मागितला. ही हिंमत? त्यांनी १० बाय १० ची खोली मागायला हवी होती!
प्रकाशझोतात यायच्या आधीही ते ५ बेडरूमच्या घरात राहत होते (म्हणे). १ बेडरूम आई-वडील, १ बेडरूम मुले, आणि १ बेडरूम स्वतःसाठी, हॉल आणि किचन.
मग आता त्यांनी तेवढंच घर घेतलं तर एवढा गदारोळ का?
दुसरं घर त्यांनी कार्यालयीन कामकाजासाठी मागितलं होतं.
प्रश्न हा उठतो की मिडियाला ह्या सगळ्यात इतका रस का? आत्ता 'दिल्लीमध्ये' घर भाड्याने मिळत नाही हे सांगण्यासाठी केजरीवालांनी पत्रकार परिषद भरवली होती का? असेल तर लिन्क द्या.

सध्याचं सरकार जे काही दिवे लावतंय त्यावरची चर्चा टाळण्यासाठी किंवा लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सणसणाटी बातम्या केल्या जात आहेत असा साधा लॉजिकल विचार मनात का येऊ नये?

लेखात उल्लेख केलेला पुण्यप्रसून बाजपेयींचा व्हिडिओ. त्यामध्ये केजरीवाल कुठल्या मुद्द्यांवर भर देऊ या हे सांगत आहेत. मध्येच एकदा ते म्हटले आहेत "लोकांना वाटेल आम्ही सर्वच खाजगी कंपन्यांच्या विरोधात आहोत. आणि हे बरोबर नाही" ते इतरत्रही सांगत आलेत की आम्ही क्रोनी कॅपिटलिझ्म च्या विरुद्ध आहोत, सरसकट सगळ्या खाजगी कंपन्यांना आमचा अजिबात विरोध नाही.
मुलाखतीच्या आधी किंवा नंतर मुलाखतकार आणि निवेदक ह्यांच्यामध्ये अशा चर्चा होण्यात नवीन किंवा आक्षेपार्ह काय आहे?
आणि हे आक्षेपार्ह वाटतच असेल तर त्यांनी हा खालचा व्हिडिओ जरूर बघावा आणि ह्यातील वागणं समर्थनीय आहे का हे नक्की सांगावं. निवेदकाला धमकावून, मुलाखतीचा रीळच काढून घेतला आहे ह्यात.
http://www.youtube.com/watch?v=_I7gc2P_VPM

जीएस ह्यांनी कशावर लेखन करावं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण जरा निवडणूकीच्या प्रचारात मोदींनी केलेल्या नाट्यप्रवेशांवर आणि 'मेरे तो ना कोई आगे ना पीछे' म्हणत असतानाच अचानक बायको प्रकट कोणं ह्या नाट्यावरही लिहावं ही नम्र विनंती. त्यांच्या प्रतिभेचा आस्वाद घेण्याचं अहोभाग्य लाभेल.
काय म्हणता? ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे? मग केजरीवालांचं घर हा सामाजिक प्रश्न का बरं बनला?
(जस्ट वंडरिंग - केजरीवालांची बायको अशी ६०+ वर्षी प्रकट झाली असती तर प्रतिभावंत माबोकरांनी काय काय लेखन केलं असतं बरं?)

सध्या जागता पहारा आणि आप च्या धाग्यांवर जास्त वेळ जात असल्याने इतर धागे उघडायला वेळ मिळत नाहीये. त्यामुळे मला उद्देशून काही असेल तर कृपया तिकडे लिन्क द्या ही नम्र विनंती Happy
मी इथून पळून गेलेली नाही. "मरते दम तक इन भ्रष्टाचारियों की छाती पे बैठ के मूंग दलते रहेंगे" म्हणणार्‍या नेत्यांची मी समर्थक आहे Wink त्यामुळे अगदीच गडबडीत असेल तरच थोडा उशीर होईल उत्तरे द्यायला.

खर तर मला राजकारणातल जास्त कळत नाही.ज्यावेळेला अण्णा हजार यांनी उपोषन केले त्यावेळि केजरिवाल यांनी केलेले काम फार आवड्ले मला..पण त्यांनी वेगळा पक्ष काडला हे रुचले नाही जो माणुस आपल्या आदर्शांसी ईमानी नाही राहु शकत त्यावर काय विश्वास टेवावा पण दिल्लिकरांनी ते पण केले..पण हा माणुस फक्त ड्रामाबाजी आणि मिडिया यांना कव्हरेज देण्यासाटी काम करत होता असेच दिसले..एक दिवस संडे सकाळ त्याच्या न्युज बाईट पाहण्यात घालवली (नवर्याच्या आग्रहास्तव) त्यांचा अख्खा ईतिहास दाखवत होते न्युज वाले.

>>केजरीवालांचं भाडं मित्र भरत आहेत हे आपल्याला खटकतं, पण देशभर दौरे करून पुन्हा घरगुती जेवण जेवायला गुजरातमध्ये परत येण्यासाठी अदानी हेलिकॉप्टर देतात हे नाही खटकत?<<
मिर्चीताई, यु आर मिसिंग द पाॅइंट.

हा असं वाईट वागतो, तो तसं चुकिचं करतो पण मी मात्र अगदि स्वच्छ, धुतल्या तांदळासारखा अशी इमेज उभी करणं; प्राॅब्लेम हा आहे. दर महिना ८५,००० भाडं देणार्या मित्रांपैकी एकाचातरी वेस्टेड इंटरेस्ट असु शकतो कि नाहि? मग तो मित्र आणि अदानी/अंबानी मध्ये फरक काय?

जीएस ह्यांनी कशावर लेखन करावं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण जरा निवडणूकीच्या प्रचारात मोदींनी केलेल्या नाट्यप्रवेशांवर आणि 'मेरे तो ना कोई आगे ना पीछे' म्हणत असतानाच अचानक बायको प्रकट कोणं ह्या नाट्यावरही लिहावं ही नम्र विनंती. त्यांच्या प्रतिभेचा आस्वाद घेण्याचं अहोभाग्य लाभेल.
काय म्हणता? ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे? मग केजरीवालांचं घर हा सामाजिक प्रश्न का बरं बनला?
>> कारण ते घर त्यांना मुख्यमंत्री ह्य. नात्यानं मि ळालेलं. ते जर त्यांनी वैयक्तिक रित्या भाड्यानं घेतलं असतं त. प्रश्नच नव्हता ना.

नानबा, काहीही उपयोग नाहीये तू त्या प्रश्नामागचं लॉजिक समजावून सांगण्याचा.

मी एक साधा प्रश्न विचारला की दिल्लीत ते जिथे रहात होते निवडून येईपर्यंत तिथे का परतू शकत नाहीत म्हणून? त्याचं उत्तर मिळालेलं नाही. म्हणजे मिर्चींना ते माहित असेलच असं नाही, पण निदान आप-ला माहित असावं. शिवाय राजीनामा देऊनही बरेच महिने लोटले आता. परीक्षा, प्रवेश परीक्षा संपूनही. तेव्हा इतके दिवस सरकारी निवासात ठाण मांडून बसायचं काहीच कारण नाहीये.. वरती जीएसने लिहिल्याप्रमाणे, त्यांनी सरकारी घरात मुख्यमंत्री म्हणून रहायला कुणाची कधीच हरकत/आक्षेप असायचं कारण नव्हतं. पण आधी 'मला घर नको' वगैरे विधानं करायला नको होती ना मग.

इथे केजरीवालांविषयी काहीही प्रश्न उपस्थित केले की भाजप/मोदी/कॉन्ग्रेस यांच्यावरच्या फैरी ऐकून घ्याव्या लागतात - जणू विचारणारा त्यापैकी एका कुणाचा/ची कट्टर समर्थक आहे. मूळ मुद्यांना वेगळंच वळण लागतं.

वरती डेलियाने रामदास आठवलेंचं उदाहरण दिलंय. आता जर केजरीवालांच्या वागण्याचं समर्थन आठवलेंसारख्या 'नेत्याशी' तुलना करून होणार असेल तर मग काहीही म्हणायचं नाहीये. आठवलेंचा अजेन्डा भ्रष्टाचारमुक्ती असल्याचा कधी आठवत नाहीये Wink

मोदी किंवा आणखी कुठलाही नेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यात वेगळ्या झालेल्या बायकोला घर घेऊन देतो की नाही याचा केजरीवालांच्या सरकारी निवासस्थान प्रश्नाशी कसा काय संबंध आहे हे माझ्या अल्पमतीला समजत नाहीये.

मुळात एकच मुद्दा - तुम्हाला लोकांनी विश्वास टाकून निवडून आणले. मुख्यमंत्र्याच्या हातात अनेको घटनात्मक निर्णयाधिकार असतात. कुणालाही त्यांना हवी तशी 'आदर्श' सिस्टीम हातात मिळत नसतेच. आणि एका दिवसात आकांडतांडव करून आपल्याला हव्या त्या गोष्टी करून घेता येत नाहीत. पण असलेले अधिकार वापरून हळूहळू उत्तम प्रशासनाचा पायंडा पाडून गोष्टी बदलता येतात. प्रशासक अडेलतट्टूसारखा वागू शकत नाही तर लवचिकता असावी लागते. हे न करता सनसनाटी निर्माण करणारे वर्तन करून राजीनामा देऊन लोकसभेची निवडणूक लढून (पक्षबांधणी पुरेशी नसताना) काय साधलं? तर लोकांच्या त्यांच्यावरचा विश्वास गमावणं... याऐवजी पाच वर्षे उत्तम कारभार करून दाखवला असता तर बहुसंख्य जनता आपच्या पाठीमागे उभी असती. (हे कळल्यामुळेच त्यांनी स्वतःच राजीनामा देऊन चूक झाली असं म्हणलं - पण आपच्या खंद्या कार्यकर्त्यांना तेही नजरेआड करायचंय बहुदा)

तुम्ही एकदा 'आम्ही स्वच्छ धुतल्या तांदळासारखे आणि बाकी सगळेच भ्रष्ट आणि नालायक' असं जाहीर केलंत की तुम्हाला फार सखोल चिकित्सेला सामोरं जावं लागणारच. मग तुमचा प्रत्येक शब्द आणि वर्तणूक ही आदर्शवादी असलीच पाहिजे. दुसर्‍याच्या भ्रष्टतेकडे, नालायकीकडे, चुकांकडे बोट दाखवून उपयोग नाही.

मुद्देसूद लेख आवडला. वक्रोक्तीच्या फोडणीमुळे चमचमीत झाला आहे.

केजरिवालांच्या वर्तनावर घेतलेले आक्षेप 'आठवलेंनी असं केलं', 'मोदींनी तसं केलं' असे म्हणून खोडले जाणार असतील तर मग मोदी/आठवलेच काय वाईट आहेत?

पुण्यप्रसून बरोबरचा लीक झालेला संवाद मला फारसा आक्षेपार्ह वाटत नाही. त्याबद्दल मिर्चीचे स्पष्टीकरण पटण्यासारखे आहे.

माझ्या आठवणीप्रमाणे केजरीवालांनी परदेशी शिक्षण घेण्यात आलेला खर्च सरकारला परत द्यायला टाळाटाळ करताना 'मी सरकारी नोकरी अर्ध्यातच सोडली असली तरी सामाजिक काम करण्यासाठीच सोडली आहे त्यामुळे माझ्या शिक्षणाचा फायदा जनतेला होणारच आहे' असा युक्तीवाद केला होता. तो फारच ओढाताण करून केला होता हे मान्य, पण त्यात अगदीच दम नाही असे नाही. केजरीवालांनी आधीच ते पैसे परत केले असते तर बरे झाले असते इतकेच म्हणेन.

केजरीवांच्या मालकीची घरे दिल्लीपासून दूर असतील हा मुद्दाही पटण्यासारखा आहे. पण तरीही पत्नी चांगली नोकरी करत असताना घर भाड्यासाठी लोकांकडून पैसे घेणे तितकेसे पटत नाही. यापेक्षा कमी उत्पन्न असणारी अनेक कुटुंबे असतील. कुणीतरी लिहिल्याप्रमाणे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सुद्धा येऊ शकतो. केजरीवालांच्या घरात झूरळ सापडले तरी त्याची ब्रेकिंग न्यूज होते त्यात केजरीवालांचा हात किती आणी टी आर पी साठी ओढाताण करणार्‍या चॅनेल्स चा किती?

मुळात केजरीवाल == आआप हे समीकरण रूढ करणेच घातक आहे. केजरीवाल हेही एक माणूस आहेत आणी माणूस अस्खलित का काय म्हणतात तो असतो. उद्या केजरीवालांवर कदाचित याहीपेक्षा गंभीर आरोप होतील आणी ते सिद्धही होतील. पण म्हणून आजवर आपच्या हजारो कार्यकर्त्यांनी केलेली मेहेनत पाण्यात जाणार का? एकाच व्यक्तीभोवती पक्ष केंद्रित करणे चुकिचे आहे.

वरदा उत्तम पोस्ट

वरती लिहिलंय ती घरं (स्वमालकीची) ४०-४१ किमी अंतरावर आहेत. दिल्लीमुंबईसारख्या मेट्रोच्या ठिकाणी एवढे अंतर "आम आदमी"साठी आम नाहीये का?

मुलीची परीक्षा आहे म्हणून घर न सोडणं एकवळ समजू शकतं, मग तीच परीक्षा चालू असताना बेलबॉण्डचे नखरे करून कोर्टाकडून ताशेरे ओढून घेऊन तिहार जेलमध्ये जाण्याचे जे काही प्रकार झाले त्याचं काय??

केजरीवाल हेही एक माणूस आहेत आणी ते अस्खलित का काय म्हणतात ते आहेत>>> विकु, अस्खलित नाही हो, स्खलनशील.. Lol

पण तुमची पोस्ट आवडली.

<<मग तुमचा प्रत्येक शब्द आणि वर्तणूक ही आदर्शवादी असलीच पाहिजे. >>

बापरे, असं काही खरंच असतं का हो? प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती आदर्शवादी असणारी व्यक्ती इतिहासात किंवा वर्तमानात कोणालाही माहीत असल्यास प्लीज सांगा. मला आवडेल अशा चरित्राचा अभ्यास करायला.

केजरीवालांची प्रत्येक कृती आदर्शवादी नाही म्हणून आपण कसल्या-कसल्या नेत्यांची पाठराखण करतोय ह्याची कल्पना आहे का? घराच्या बाबत त्यांनी जे काही केलं ते चूक होतं असं समजूया.
पण म्हणून आपण प्रस्थापित नेते मंडळी, ज्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर ५-५ कंपन्या आहेत, ज्यांच्या गाडीत ९ वर्षांची चिमुरडी अंगावर जागोजागी जखमा झालेल्या, कदाचित लैंगिक शोषण झालेलं असावं अशा अवस्थेत मृत सापडते, त्यांना निवडून देणार?

दोन गोष्टींची तुलना तरी होऊ शकते का?? मेरे तो समझ के बाहर है ये...माबुदोस.

वि हॅव टु चुज लेसर एव्हिल ! स्वच्छ पांढरा ते गडद काळा अशी रंगांची पट्टी बनवली तर आप चे नेते अजूनही पांढर्‍याच्या जवळ आहेत, आणि प्रस्थापित नेते केव्हाच गडद काळ्याच्या जवळ जाऊन पोहोचले आहेत.

आणखी एक, केजरीवाल 'मी स्वच्छ, धुतल्या तांदळासारखा आहे, माझ्या हातून कधीच कोणतीही चूक झालेली नाही आणि होणारही नाही' असं ज्या ठिकाणी बोलले आहेत त्या भाषणाची/मुलाखतीची लिन्क कृपया कोणाकडे असेल तर द्या.

बापरे, असं काही खरंच असतं का हो? प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती आदर्शवादी असणारी व्यक्ती इतिहासात किंवा वर्तमानात कोणालाही माहीत असल्यास प्लीज सांगा. मला आवडेल अशा चरित्राचा अभ्यास करायला.
<<< नांदेडकर धाकल्या चव्हाणांचे चरित्र वाचा. वर्तमानात एकमेव आदर्श वादी आहेत. Wink

काही नाही हो. ते प्रस्थापित झाले की तेसुद्धा होतीलच काळे अजून नसतील तर. काँग्रेसचा किंवा कुणाचाही पाठिंबा घेणार नाही किंवा कुणालाही पाठिंबा देणार नाही इ. म्हणून वेगळेच वागणे, दिल्लीतल्या कुठल्याही निवडून आलेल्या आमदाराला लोकसभेचे तिकीट देणार नाही असे दिल्ली सरकार बरखास्त झाल्यावर म्हणून स्वतःच निवडणुकीला उभे राहायचे, ह्या सगळ्या चुका नसून जाणूनबुजून मारलेल्या कोलांटउड्या आहेत. वरती घराबद्दल जे लिहायचे ते लिहून झालेलेच आहे. सुरवात तर झालेलीच आहे. सोमनाथ भारती वगैरे आहेतच.

एवढेच काय, "आम्ही राजकीय पक्ष काढणार नाही, राजकीय व्यवस्थेच्या बाहेर राहून काम करू" हे म्हणून नंतर एका वर्षात नवीन पक्ष काढला. सप्टेंबर २०११ ची मुलाखत आहे. (http://www.thehindu.com/opinion/lead/it-is-a-long-journey-ahead-kejriwal...)

" So are you an apolitical movement?

No, we are political but we are concerned with people's politics. The movement will always remain outside of political parties and outside of electoral politics.

You will not float a political party?

No, never. We don't need to get into the system to fight it. We want to pressure the government and assert our rights as citizens. Everyone who has a dream need not get into politics. "

तुम्ही म्हणालच की त्यांना जाणीव झाली नंतर वगैरे, पण जनतेला जे कळायचे ते कळतेच. कोलांटउड्या अशा फार काळ लपत नाहीत. जे आपल्याला हवे आहे ते आधी नको म्हणून सांगायचे, आणि नंतर 'कसचे कसचे' म्हणत 'चाहत्यांच्या आग्रहाखातर' ते स्वीकारायचे ही ट्रिक जुन्या काळापासून अस्तित्वात आहे.

वरच्या बाकी क्लेम्ससाठी लिंका -

(१) http://www.aamaadmiparty.org/exclusive-interview-with-arvind-kejriwal (ही लिंक खोटी आहे असे तुम्ही म्हणणार नाही अशी आशा.)

" But assume if it were to be a hung Assembly, who between the Congress and BJP would you support in forming the next government?

I want to make it very clear, and I want to do this because rumours are being spread very selectively about us. At some places, they say we are going to support the Congress; at other places, they say we are going to support the BJP. But I want to make it very clear that we are going to support neither the Congress nor the BJP. We will also not take the support of either to form a government. "

(२) http://ibnlive.in.com/news/arvind-kejriwal-says-no-sitting-mla-will-be-g...

" Amidst speculations that former Delhi Chief Minister Arvind Kejriwal will contest Lok Sabha elections, the AAP leader on Wednesday said that no sitting MLA will be given a ticket for the upcoming general elections. "

भास्कराचार्य,
तुमची पोस्ट मला उद्देशून असेल असं वाटल्याने लिहितेय. त्यांनी निर्णय बदलले तर त्यात इतकं गोंधळ घालण्यासारखं काय आहे हे खरंच कळत नाहीये. उद्देश तोच आहे ना अजूनही? एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी सध्या जे करतोय ते पुरेसं नाही असं वाटल्याने दुसरा मार्ग टॅकल करत नाही का तुम्ही? मी करते. आपण सगळेच करतो.
पुन्हा वरच्या पोस्टमध्ये लिहिलेलंच इथे डकवतेय -

"केजरीवालांची प्रत्येक कृती आदर्शवादी नाही म्हणून आपण कसल्या-कसल्या नेत्यांची पाठराखण करतोय ह्याची कल्पना आहे का? घराच्या बाबत त्यांनी जे काही केलं ते चूक होतं असं समजूया.
पण म्हणून आपण प्रस्थापित नेते मंडळी, ज्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर ५-५ कंपन्या आहेत, ज्यांच्या गाडीत ९ वर्षांची चिमुरडी अंगावर जागोजागी जखमा झालेल्या, कदाचित लैंगिक शोषण झालेलं असावं अशा अवस्थेत मृत सापडते, त्यांना निवडून देणार?
दोन गोष्टींची तुलना तरी होऊ शकते का?? मेरे तो समझ के बाहर है ये...माबुदोस."

बाकीच्या मुद्द्यांवरचं दळण आपच्या धाग्यावर दळतच आहे. दोन्हीकडे तेच तेच लिहिण्यात काहीच अर्थ नाही.त्यामुळे इथे हेमाशेपो. Happy
(पांशा: मोदीसाहेबांनी रॉबर्ट वाड्रा, 'बहोत हो गई महंगाई की मार', 'बहोत हुआ नारी पे वार', काला धन ह्या सारख्या असंख्य गोष्टींवर मारलेल्या कोलांट्याउड्या कशा चालतात बुवा? अरे हो, तुलना केलेली चालत नाही ना !)

त्यांनी निर्णय बदलले तर त्यात इतकं गोंधळ घालण्यासारखं काय आहे हे खरंच कळत नाहीये. उद्देश तोच आहे ना अजूनही? >>> निर्णय बदलले म्हणजे तत्वनिष्ठा नाही म्हणून ते म्हटले आहे. राजकारणात तत्वनिष्ठा फार कमी असते, परंतु सत्याच्या बाजूने वगैरे लढण्याची भाषा करणार्‍यांनी अशी मिनिटामिनिटाला तत्वे बदलणे अपेक्षित नाही. खरे तर केजरीवालांचा उद्देश तो कधीतरी होता का, इथपासून माझ्या skepticism ला सुरवात आहे. कारणे वरती दिलेलीच आहेत. तुमच्यासाठी ते एक गृहीतक आहे. आधी कुठेतरी कोणीतरी म्हटल्याप्रमाणे तुम्ही cult follower वाटता. ४ वाजता थंडीत झोपणे, देशासाठी तुरूंगात जाणे ह्या सगळ्या symbolism च्या बाबी आहेत. त्यांनी तुम्हाला भारावून जायला होत असेल कदाचित. एका मर्यादेपर्यंत ह्या सर्व गोष्टी ठीक आहेत, परंतु जेव्हा deeds do not support words तेव्हा तो सगळा रिकामा, फसवा symbolism वाटतो.

आपच्या कल्पनेला माझा आक्षेप नाही, परंतु केजरीवाल ह्यांच्या ह्या सगळ्या प्रकाराला आहे. वर मूळ लेखात म्हटलेय त्याप्रमाणे ही लोकांची चळवळ आहे. लोकांनीच तिला मोठी केली. केजरीवालांना स्वतःबद्दल काय वाटायचे ते वाटो, किंवा स्वतःकडे किती श्रेय घ्यायचे ते घेवो, परंतु त्यांच्याचमुळे ही चळवळ लोकांपासून दूर जात चालली आहे. त्यांच्या ढोंगबाजीचा लोकांना कंटाळा आलेला आहे. हेच वर satirical लिखाणात म्हटले आहे. पण केजरीवाल किंवा त्यांचे भक्त "झाल्या चुका तर त्यात काय एवढे" असे उलट लोकांनाच विचारतात. ह्याचे कारण "शेवटी आम्ही करू ते छान" हे गृहीतकच आहे.

बाकी तुमची पांशा किंवा काशा जे काही मला उद्देशून आहे त्याबद्दल - माझा आणि मोदींचा काही संबंध नाही. मोदी रिलायन्स इत्यादी कंपन्यांना फेवर करत असतील ह्याबद्दलही मला तीळमात्र शंका नाही. प्रगत राष्ट्रांतसुद्धा हे प्रकार आहेतच. भांडवलशाहीचा तो एक जागतिक परिणाम आहे. अगदी गांधीजीसुद्धा बिर्ला हाऊसमध्ये राहत होते. केजरीवालांना भांडवलशाही नष्ट करायची असेल, तर भाग वेगळा. माझ्या मते ह्या ना त्या अर्थाने सर्वच राजकारणी जनतेला फसवतात. किंबहुना लोकांना स्वतःला फसवून घ्यायची थोडीफार हौस असते. कुणी गांधी परिवार शोधतो, तर कुणी मोदी, तर कुणी केजरीवाल. मोदींच्या कोलांटउड्या हा इथला विषय नाही, म्हणून थांबतो. बाकी strawman पांशा मोडमध्ये बनवण्याची हातोटी आवडली. strawman बनवण्यातच तर केजरीवाल उस्ताद आहेत. चालू द्या. हेमाशेपो.

भास्कराचार्य, तुमची दोन्ही पोस्ट पटली.
सगळं स्पष्टीकरण एकाने गाय मारली तर मी वासरू मारलं तर काय यावर चाललंय, लोक बघतायत.

Pages