कान्हा

Submitted by बागेश्री on 9 June, 2014 - 10:51

.... उत्तररात्रीचा मंद वारा वाहत होता. दुपारपासून लागून असलेली रखरख अशी सरत होती दूर कोठे गाव शांत पहुडला होता, सावध नीज लागली होती. नदीकाठी वार्‍याचा गारवा अधिक जाणवत होता.

मंद झुळकांनी नांगरून ठेवलेल्या होडीच्या तळाशी लाटांची लाघवी लुडबूड सुरू होती. त्यांचा 'चळ्ळ चुब्बूक' आवाज वगळता आसपास नीरव शांतता होती. नाही म्हणायला दूर मंदिरात थोडी जाग होती..
उद्याच्या युद्धात विजयश्री प्राप्त व्हावी म्हणून योजलेला दिवसभराचा यज्ञ आता शांत होत होता.. पुजार्‍यांची मागची आवरा-आवर सुरू होती. शिवाय सकाळी रणाशिंग फुंकले जाण्याअगोदर काकड आरती प्रसाद व्हायचा होता, ती तयारीही सुरू होती.

नदी काठच्या वाळूत पाऊलं उमटली, तशी वाळू रोमांचित झाली. प्रत्येक पावलागणिक रेशमी वस्त्रांची सळसळ ऐकू येत होती. पाऊलांची गती, त्यातली ओढ जाणवून देत होती...
त्या मंद चंद्रप्रकाशातही चेहर्‍यावरचे शांत भाव उठून दिसत होते. भलं मोठ विस्तृत कपाळ त्यावर कोरीव गंध, डोक्यावर साजेसा मुकूट आणि डोलणारं मोरपिस!
धारधार नाक, पातळ जिवणी आणि त्यावर जगज्जेत्याचं खेळकर स्मित!
झपाझप पडणार्या पावलानिशी कमरेच्या वस्त्रात खोचलेल्या वेणूचं लयबद्ध झुलणं!

होडीला सोडून कृष्ण त्यात सवार झाला, पैलतीरी त्याची राधा, तिचे काळेभोर डोळे, कान्ह्याची वाट पहात दमले असतील एव्हाना... म्हणून आणखी घाईने निघाला..

कान्ह्याची तेज नजर सारा नदी परिसर चोखंदळपणे पाहून घेत होती. कुठेही जाग नव्हती. होणार्या युद्धाशी, धर्माच्या संभ्रमांशी सामर्थ्यशाली निसर्गाला देण- घेणंच नसतं त्याचं चक्र त्याच्या गतीने सुरळीत चालतं, अस्वस्थ होतो, तो मानव! ह्या खयालानिशी त्याच्या चर्येवरचं स्मित आणखीच लोभस झालं!

तिथेच ज़रा अंतरावर, डेरेदार वृक्षाखाली एक सावली त्याच्या नजरेस पडली तशी होडी त्या दिशेने वल्हवीत कान्हा त्वरेने तेथे पोहोचला...
कुठेतरी नजर हरवलेला, कानातून भळाभळा रक्त वाहणारा कर्ण त्याच्या नजरेत आला. कान्हा क्षणात सारे उमजून गेला. त्याचे प्रेमभरले डोळे क्षणभर ओलावलेही, पण क्षणभरच.
भावनांचा देखावा त्याच्या देवपणाला साजेसा कधी होता का?

कर्णाच्या कवच-कुंडलहीन चर्येकडे तो बघत उभा होता, कर्णाची रिक्त नजर मात्र जमिनीला खिळून होती.
"सूतपुत्रा" अश्या हाकेने गहिवरला कर्ण क्षणभर सारं विसरून कृष्णाच्या आश्वासक बाहूंमध्ये विसावला.

उद्याचा दिवस मोठा होता!
आणि आज दोन योद्धे उराउरी भेटत होते.
उद्या कदाचित एक शूर बळी जाणार होता
कदाचित एक चक्र जमिनीत धसणार होतं
कदाचित कान्ह्याला विश्वरूप दर्शन द्यायचं होतं
कदाचित कुणी बाणाच्या शय्येवर व्हिवळत राहणार होतं!
कदाचित एका पर्वाचा अस्त होणार होता
कदाचित धर्मयुद्धाचा अर्थ जगाला कळणार होता!

हा असा 'उद्या' जवळ येत होता, जो कृष्णाशिवाय इतर जगाला अनभिज्ञ होता.

कितीतरी वेळ काही न बोलता खूप काही सांगण्यात गेला.. मौनाची भाषा मौनाने जाणली.

पूर्वेला लवकरच उजाडेल असं दिसता कान्हा वळाला... कर्णानेही विरूद्ध दिशेला कूच केलं! त्याची निराशा निमाली होती, कृष्णदर्शनाने योग्य तेच घडले होते, ध्येयाने पुन्हा साद घातली होती.

होड़ी जागेवर लाऊन आल्या पावली कान्हाही परत निघाला. क्षणभर थांबून त्याने पैलतिरी पाहिलं! आस्थेने!
उद्यानंतर त्याला उसंत नसणार होती. हे पैलतिरावर्च्या राधेलाही ठाऊक होतं!
तिच्या गालावरची टपटप कान्ह्याने क्षणभर जाणवून घेतली.. डोळे गच्च मिटले.
भावविभोर राधा त्याच्या मिटल्या डोळ्यांना स्पष्ट दिसली.
मोकळा केशसंभार!
अंगावर साधीच पण तलम रेशमी साडी,कमरेला शोभनीय कंबरपट्टा..
एकाच ठिकाणी खूप वेळपासून रोवलेली नाजूक पाऊलं!
त्यावरचे घट्ट पैजण!

स्वत:चं बिंब न्याहाळत नदीकाठी ओणवी उभी, राधा!
तो समोर येताच उत्कटतेने सामोरे जाण्याच्या विचारात मग्न, राधा!
त्याच्या नसलेल्या भासानेही सावध होणारी, सारा संयम डोळ्यात आणून कातर झालेली, राधा...

विरहाने अस्वस्थ राधेच्या सैरभैर मनाला आजच्या भेटीनंतर स्वस्थता लाभणार होती.
कैक दिवसांनी आज ती स्वत:ला त्याच्या डोळ्यांनी पाहणार होती, स्वत:ला गवसणार होती.

जशी रात्र सरू लागली तशी ती अस्वस्थ होऊ लागली,
कान्ह्याच्या वाटेकडे एकटक लागलेली नजर, वाट पाहणारे डोळेही आता मनासारखेच दमू लागले, तरीही...
कान्ह्याच्या दर्शनाला आतूर राधेचं रुप सारी रात्र जागवत अस्सं उभं होतं! आतूर!!
तोच कानावर ओळखीचे सूर आले...
तिच्या कान्ह्याची सरगम!

त्याची वेणू तिच्याशी बोलती झाली...
आजही कान्हा येणार नाही!
आजही त्याला जगाच्या व्यवहारात अडकावं लागलं आहे! आजही त्याने धर्मयुद्धाला, कर्तव्याला महत्त्व दिलं आहे!
सार्या आशा मावळताना तिने डोळे घट्ट मिटले...

दूर मंदिरातून काकड आरती ऐकू येऊ लागली....

वेणूचे स्वर हवेत लोपले.

-बागेश्री

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच इमोशनल साहित्य आजच्या दिवशी माबोवर आलंय..त्यातला हा एक लेख..
जुनाच विषयाशय नव्याने मांडला आहे... पण तरीही नवाच वाटतो.लेखिकेने लिहिला आणि राधा-कर्णाने त्यात प्राण ओतले...की हीसुध्दा त्या कृष्णाची लीला-माया की काय ते? Happy की व्यासांची जगत-प्रेरणा वगैरे...

आवडले... Happy
ले.शु.!