देवघराची समई जळते, तशीच घरभर जळते आई!
तेवत तेवत घरास अवघ्या देवघर जणू करते आई!!
शाळेमधुनी घरी यायला जेव्हा मजला उशीर होतो....
मज शोधाया चहूकडे भिरभिरते अन् हंबरते आई!
मीच वयाने इतका मोठा, आई तर म्हातारी माझी.....
धडपडतो मी अजून सुद्धा, तेव्हा मज सावरते आई!
बालपणीची माझ्या, आई आठवते मज अजून सुद्धा....
अजूनही माझिया यशाने मनामधे मोहरते आई!
धकाधकीच्या जगण्यामध्ये मधून मी आजारी पडतो....
अजूनही बसतेच उशाशी अन् माया पांघरते आई!
अजूनही श्वासात माझिया तोच गंध घमघमतो आहे....
चंदनापरी झिजते आई, घरभर अन् दरवळते आई!
कोठे जातो, केव्हा येतो, कोण सोबती, सारे बघते.....
अजून सुद्धा मुलाप्रमाणे रोजच मजला जपते आई!
अजून पोरासोरांसम मी घरामधे करतोच पसारा.....
मला न काही तसदी देता, निमूट घर आवरते आई!
ती देहाने नसते पण आत्म्याने ती नेहमीच असते....
अशीच असते माय नेहमी, अमर नेहमी असते आई!
क्षणाक्षणाला स्मृतीरुपाने तीच सोबती असते माझ्या....
माझ्या अंगांगातच जगते, कोण म्हणे की, मरते आई!
-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१
अमर नेहमी असते आई<<< छान कोण
अमर नेहमी असते आई<<< छान
कोण म्हणे की, मरते आई!<<< छान
रचना गझलतंत्रातील कविता वाटत आहे. प्रत्येक द्विपदी स्वतंत्ररीत्या अर्थपूर्ण असली तरी रदिफेमुळे त्यात 'सेंट्रल थीम' आल्याची जाणीव (वाचकाला) होणे हे गझलकाराने (स्वतःचे) अपयश मानायला हवे.
ही मुसलसल गझल आहे! रदीफच आई
ही मुसलसल गझल आहे! रदीफच आई आहे तेव्हा सर्व शेर त्याच्याच भोवती रेंगाळणार! कोणतीही द्विपदी ही स्वयंपूर्ण कविता आहे! गझलेचा कुठला निकष डावलला गेला आहे ज्याने शायराने अपयशाचे धनी व्हायला व्हावे?
सेंट्रल थीम असली की गझल अगझल कशी बुवा होते? चकीत झालो आहे ऐकून!
गैरमुसलसल गझलेत देखिल कित्येक शेर मुसलसल लिहिले जातात..........अजबच आहे सारे!
"चुपके चुपके रातदिन... " ही
"चुपके चुपके रातदिन... " ही अशीच सेंट्रल थीम असलेली (मुसल्सल) गझल असल्याचे कधीतरी वाचल्याचे आठवते.
याचा अर्थ १. चुपके चुपके ही मुसल्सल गझल नाही, किंवा
२. ती गझल हे त्या गझलकाराचे अपयश आहे, किंवा
३. चुपके चुपके ही मुसल्सल असूनदेखिल गझलकाराचे यश आहे, पण सदरहू गझल हे देवपूरकरांचे अपयश आहे
बेफीजी, आपण जाणकार आहात आणि हा मुद्दाही आपण समोर आणला आहे, त्यामुळे क्रुपया आपणच उत्तर द्यावे
कृपया नोंद असावी की माझी येथे कुठल्याही प्रकारचा वाद सुरू करण्याची इच्छा नाही. उत्तर दिल्याने वाद होणार असेल तर इग्नोर करा.
प्रोफेसर, काही टायपो आहेत
प्रोफेसर,
काही टायपो आहेत त्या कृपया दुस्र्स्त करून घ्याव्या. काही शब्दांची पुनरावृत्ती झाल्याने त्या द्वीपदी सामान्य वाटतात. इतरही द्वीपदींवर या गोष्टीचा परिणाम होतो. कदाचित त्यामुळे बे.फि. नाराज असावेत.
गणित बरोबर आहे. प्रत्येक द्वीपदी उचलून वेगळी वाचता येते; वरखाली करता येते!
राहून राहून मला वाटते की; काही द्वीपदी कमी केल्या असत्या तर गज़ल जास्त परिणामकारक झाली असती.
चु.भू.दे.घे.
'तारे जमीन पर' मधलं गाणं
'तारे जमीन पर' मधलं गाणं आठवलं...
चांगली आहे.
आईबद्दल काहीही लिहीलेलं चांगलच असतं. तिथेही तांत्रिकता बघत असतील तर अवघड आहे.(कटककर सर!)
छान
छान
ही (एकटाकी) लिहिलेली मुसलसल
ही (एकटाकी) लिहिलेली मुसलसल गझल आहे! आई समोर ठेवून आलेला उचंबळ गझलेच्या आकृतीबंधात झरला आहे! प्रत्येक द्विपदीे तिच्या तिच्या जागी स्वयंपूर्ण कविता आहे! कोणत्याही द्विपदीचा स्वतंत्रपणे आस्वाद सहृदयी रसिकाला घेता यावा हे शायराने कटाक्षाने पाळले आहे! गझलेचे तमाम निकष....अंतरंगातले व बहिरंगातले काटेकोरपणे पाळले गेले आहेत! अपयशाचा धनी शायर झाला आहे हे फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीचे म्हणणे आहे ज्याने मी अवाक झालो आहे! असो! मी ही गझल लिहून स्वत: मुक्त झालो आहे व समाधानी आहे! रसिकांना कोणतीहीे शेरेबाजी करण्याचा पूर्ण हक्क आहे ज्याचा मी आदर करतो! आपण कुठल्या कवीला इतक्याच कविता लिही, तितक्या नको असे सांगू शकतो काय? एका गझलेत किती शेर असावेत हे पूर्णपणे शायराच्या मनावर असते असे मी तरी समजतो! मी स्वत: उचंबळ ओसरला की, लिहायचे थांबतो! काफियांच्या मागे फरफटत जात नाही तर काफियेच धावत धावत शेर घेऊनच ओठांवर येतात! यावरही शेरेबाजी काही निष्णात करतील याची मला जाणीव आहे पण हा माझा अनुभव आहे गेल्या ३०-३५वर्षांच्या अव्याहत व डोळस गझल लेखनातून आलेला! माझ्या डोक्यात अनेकविध गझलकल्पना आहेत ज्या समोर ठेवण्याचे माझे मानस होते! पण ती वेळ आलेली नाही असेच वाटत आहे! असो.
गझलेचे अंतरंग उलगडून दाखवणारे छोटे छोटे पाठ क्रमाने देणे व माझे आजवरचे गझलचिंतन समोर ठेवणे व माझ्या गझलधारणा शायरांपर्यंत व सहृदयी रसिकांपर्यंत पोचवणे हे माझे स्वप्न होते!
....................प्रा.सतीश देवपूरकर
टीप: मी स्वत: गझलकारापेक्षा गझलेला नेहमी मोठा मानतो! शायराचे नाव पाहून प्रतिसाद लिहित नाही!
शेवटी गझल/कवितालेखन हीे कला आहे व परमेश्वरच कवीकडून/शायराकडून लिहून घेतो अशी माझी तरी श्रद्धा आहे! तेव्हा आढ्यतेचा/अहंकाराचा प्रश्नच कोणत्याही कलाकृतीत येत नाही असे मी मानतो! कोणत्याही कलेत रियाज/अभ्यास/साधना/गुरूचे मार्गदर्शन हे लागतेच! जो काही चांगले सांगेन तो आपला गुरूच असतो असे मी तरी मानतो!
प्रा.सतीश देवपूरकर
मल न काही तसदी देता, निमूट घर
मल न काही तसदी देता, निमूट घर आवरते आई!
.....
मला हवे ना?
धन्यवाद, दुरुस्ती केली आहे!
धन्यवाद, दुरुस्ती केली आहे!
गझल अॅज अ होल मी तरी कधीच
गझल अॅज अ होल मी तरी कधीच तपासत नाही! प्रत्येक शेर वेगळी कविता असते! सगळ्यांना सगळेच शेर एका गझलेमधले आवडायलाच पाहिजेत या मताचा मी तरी नाही! एका कवीच्या अनेक कवितांची तुलना करून इथे तू असे म्हटलेस, तिथे तू तसे म्हटले असे मी तरी करणार नाही, कारण प्रत्येक कविता मग ती दोन ओळींची का असेना लिहिताना शायराची मानसिकता/मनोभूमी वेगळी असू शकते! प्रत्येक कविता एक जीवनानुभव/प्रत्यय असतो जो शायर लिहिताना वैश्विक करून रसिकांच्या हवाली करत असतो! सराईत शायर शायरीतून स्वत: बाजूला राहून त्याची शायरी जगाला देत असतो, असे मी तरी मानतो!
दुसर्या द्वीपदीमध्ये
दुसर्या द्वीपदीमध्ये ''भिरभिरते' असा शब्द हवा.
खूप खूप आभारी आहे! दुरुस्ती
खूप खूप आभारी आहे! दुरुस्ती केली आहे!
>>>सेंट्रल थीम असली की गझल
>>>सेंट्रल थीम असली की गझल अगझल कशी बुवा होते? चकीत झालो आहे ऐकून!
गैरमुसलसल गझलेत देखिल कित्येक शेर मुसलसल लिहिले जातात..........अजबच आहे सारे!<<<
>>>ही (एकटाकी) लिहिलेली मुसलसल गझल आहे! आई समोर ठेवून आलेला उचंबळ गझलेच्या आकृतीबंधात झरला आहे! प्रत्येक द्विपदीे तिच्या तिच्या जागी स्वयंपूर्ण कविता आहे! कोणत्याही द्विपदीचा स्वतंत्रपणे आस्वाद सहृदयी रसिकाला घेता यावा हे शायराने कटाक्षाने पाळले आहे! गझलेचे तमाम निकष....अंतरंगातले व बहिरंगातले काटेकोरपणे पाळले गेले आहेत! अपयशाचा धनी शायर झाला आहे हे फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीचे म्हणणे आहे ज्याने मी अवाक झालो आहे! <<<
ह्याला म्हणतात पुस्तकी ज्ञान! मी माझ्या प्रतिसादात नेमके काय म्हणालो आहे हे तुम्हाला टँजंट गेलेले आहे प्रोफेसर!
मुद्दे वेगवेगळे लिहिले की बहुधा म्हणणे पोहोचेल.
१. रचना गझलतंत्रातील कविता वाटत आहे ह्याचा अर्थ (काही टायपो वगळता) गझलतंत्र सर्वत्र पाळलेले आहे मात्र द्विपदींचा आशय गझलेला शोभेलसा वाटत नाही आहे. कवीने घर पसरून ठेवल्यावर आई अजूनही तो पसारा आवरते व ह्या स्वरुपाच्या बातम्या सांगून गझलेचा शेर होत नाही. तसेच, 'दरवळते आई' ही द्विपदी तर अक्षरशः कोणताही कंगोरा नसलेली सपाट द्विपदी आहे. अश्या द्विपदींची चळत रचणे, त्याला उचंबळ म्हणणे, शेर काफियानुसारी नाही आहेत असे म्हणणे हे सर्व तुमचे तितकेच वैयक्तीक दावे आहेत जितका तुम्हाला माझा पहिला प्रतिसाद एक दावा वाटला.
२. आई हा शब्द रदीफ असल्यामुळे सर्व शेरात दुसर्या ओळीच्या शेवटी आई हा शब्द येणार हे समजण्याइतपत माहिती मीही आजवर जमा केलेली आहे. मुद्दा असा आहे की सर्व द्विपदी वाचून जर असे वाटत असेल की 'आजही म्हातारी झालेली आई किती त्यागीपणे व नि:स्वार्थीपणे मुलावर प्रेम करते व झिजते' हेच प्रत्येक द्विपदीतून सांगण्यात आलेले आहे तर ती रचना 'निव्वळ मुसल्सल गझल' ह्या सदरात मोडवायला जीवावर येते. मुसल्सल गझल एका विषयावर असलेल्या शेरांची असते, एकाच मुद्यावर असलेल्या शेरांची नाही. म्हणजे प्रत्येक शेरातून आईचे उदात्त चित्र रंगवणे हे करायचे असेल तर त्याला गझलेचे लेबल लावताना आपल्यालाच काहीतरी वाटायला पाहिजे मनामध्ये! एखादा कवी 'आई' ह्या एकाच विषयावर मुसल्सल गझल रचताना अनेक प्रकारे शेर करू शकला असता. एका शेरात आईचे उदात्त चित्रण, एका शेरात कधी मोठी बहिण आईसारखी वाटते असे म्हणणे, एका शेरात पत्नी माझ्या मुलांसहितच माझ्याशीही माझ्या आईसारखी वागते असे म्हणणे, एका शेरात आई नसलेल्यांबद्दल काही लिहिणे! (ही सर्व निव्वळ उदाहरणे आहेत - असेच्च लिहा वगैरे म्हणणे नाही). सदर रचनेतील प्रत्येक द्विपदी सुट्टी अर्थपूर्ण असणे हे मी पहिल्याच प्रतिसादात नोंदवलेले आहे. पण प्रत्येक द्विपदी जवळपास तेच सांगत आहे (की आई ह्या वयातही त्यागी व नि:स्वार्थी प्रेम करते, झिजते वगैरे) हेसुद्धा मी सांगितलेले आहे हे तुम्हाला टँजंट गेलेले आहे.
३. आता मी 'अपयश' हा शब्द का वापरला ते लिहितो. दहा बारा शेर असलेली, बर्यापैकी लांब मात्रावृत्तातील व 'आई' ही चार मात्रांच्याच शब्दांची रदीफ असलेली गझल खुलवायला प्रचंड वाव होता. जितका वाव क्राफ्ट्समनधिपला होता तितकाच कल्पनाविलासाला, परचित्तप्रवेशाला, आशयाच्या हृदयस्पर्शतेलाही होता. पण तुम्ही उचंबळाला शरण गेलात. 'आई समोर ठेवून मनात आलेला उचंबळ गझलतंत्रात व्यक्त केला' हे तुमचे विधानच सगळे काही सांगून जाते. हे उचंबळाला शरण जाणे आशयाची विविध रुपे दाखवण्यावर मर्यादा घालते ह्याचे उदाहरण ह्या रचनेत मिळालेलेच आहे. आणि म्हणूनच मी तो शब्द वापरलेला आहे.
शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
बेफिजींचा प्रतिसाद वाचला नि
बेफिजींचा प्रतिसाद वाचला नि वाटले अरेच्चा या धाग्यावरही बरेच काही शिकण्यासारखे असू शकते.
( आता गझल वाचते
)
धन्यवाद !
कोण म्हणे की, मरते आई!... वा
कोण म्हणे की, मरते आई!... वा !!
३. चुपके चुपके ही मुसल्सल
३. चुपके चुपके ही मुसल्सल असूनदेखिल गझलकाराचे यश आहे, पण सदरहू गझल हे देवपूरकरांचे अपयश आहे<<<
कोरा, तुमचा हा मुद्दाच मला अभिप्रेत आहे.
चुपके चुपके ह्या गझलेत 'याद है' ही (आशय खुलवण्यास प्रचंड वाव देणारी व 'आई' प्रमाणे मर्यादा न घालणारी) रदीफ आहे. 'आई' ही रदीफ घेऊ नये किंवा कोणी कोणती रदीफ घ्यावी हे सांगण्याचा कोणालाच अधिकार नाही. पण मी वर म्हंटल्याप्रमाणे 'आईबाबत एकच भावना' वेगवेगळ्या प्रकारे नोंदवल्याप्रमाणे द्विपदीमालिका निर्माण झालेली आहे. चुपके चुपके मध्येही प्रेयसीच्या विविध कृतींचे स्मरण होणे ही सेंट्रल थीम असली तरी त्या प्रेयसीची किती रुपे त्यात प्रकट झालेली आहेत ते(सुद्धा) बघावेत.
- प्रियकराने बोलावल्यावर भर उन्हात गच्चीवर अनवाणी येणे
- वाटेत भेटल्यावर इतरांच्या पेमकथांचे किस्से ऐकवून स्वतःचे प्रेम चोरटेपणाने व्यक्त करणे
- ठरवून भेटल्यावर काहीच न बोलता नुसते लाजत उभे राहणे
- संस्कृतीची चाड राखून प्रियकराने अचानक पडदा ओढताच बुरख्याने चेहरा झाकून घेणे
- प्रेमयाचना करणार्या प्रियकराकडे पूर्ण दुर्लक्ष करून बेदरकारपणे स्वतःच्याच बांगड्यांशी खेळत राहणे
- मीलनाच्या शेवटच्या रात्री येणार्य विरहामुळे शोकाकुल होऊन स्वतः रात्रभर रडणे व प्रियकरालाही रडवणे
- प्रत्यक्ष ताटातुटीच्यावेळी तिचे कोरडे ओठ थरथरणे
हे प्रेमाच्या अनंत पातळ्यांमधील काही पातळ्यांचे अलवार प्रकटीकरण एखाद्या उचंबळातून आल्यासारखे वाटते का? ह्या सर्व द्विपदींमध्ये एकच मुद्दा मांडला आहे असे वाटते का? (म्हणजे तुझे काहीतरी मला अजून आठवते, इतकेच म्हंटले आहे का? की प्रत्येक रसिक वाचक किंवा श्रोत्याला त्याने स्वतः कोणावर तरी केलेल्या प्रेमाचा एक तरी पैलू वाचल्यासारखे वाटेल?)
बहुधा माझा मुद्दा लक्षात आला असेल अशी आशा!
धन्यवाद!
(अवांतर - शब्दांचे लालित्य, नोस्टॅल्जिक करण्याची क्षमता, गुलाम अलीचे अद्भुत गायन आणि नाजूक विषय ह्यामुळे चुपके चुपके अत्यंत लोकप्रिय ठरलेली असली तरीही ती फार श्रेष्ठ गझल आहे असे मात्र नव्हे)
प्रोफेसर साहेब, माझ्या आईच्या
प्रोफेसर साहेब,
माझ्या आईच्या आयुष्याचा कालावधी किती राहिला आहे हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मी ही रचना केली होती भावनेच्या भरात. नंतर माझे मलाच जाणवले की ही रचना गझलेपेक्षा कविताच आहे, म्हणून मी ती अप्रकाशित केली होती.
आज ह्या चर्चेच्या अनुषंगाने ती पुनर्प्रकाशित केली.
हे येथे नोंदवण्याचे कारण इतकेच, की अनेकदा भावनिक उचंबळ आपल्यावर मर्यादा घालतो ह्या मुद्याचे समर्थन करता यावे.
http://www.maayboli.com/node/21266?page=4#comment-3135633
धन्यवाद
धन्यवाद
आई हा शब्द रदीफ असल्यामुळे
आई हा शब्द रदीफ असल्यामुळे सर्व शेरात दुसर्या ओळीच्या शेवटी आई हा शब्द येणार हे समजण्याइतपत माहिती मीही आजवर जमा केलेली आहे.
>>>
ओ बेफिकीर आणि इतर, सोडा ना! कशाला आपला वेळ घालवताय! 'म्हातारी मेल्याचं दु:ख' वगैरे गोष्टी नका सांगू. एकतर आता प्रोसाहेब निमूट स्वतःच्याच गझल टाकताहेत. इतरांच्या गझलांवर भाराभार सुचवत नाही आहेत. why dnt u just ignore man??? let him write and post! who cares?
आपला
हितचिंतक
>>>>अनेकदा भावनिक उचंबळ
>>>>अनेकदा भावनिक उचंबळ आपल्यावर मर्यादा घालतो <<<<<
लाखामोलाच वाक्य पण प्रश्न असाही आहे की कित्येकदा या मनोअवस्थेमुळेच इतरवेळा न सुचणा-या ब-याच काही तरल कल्पना यावेळी अचानक स्फुरून जातात . संयमाने त्या त्या काव्यप्रकाराला योग्य न्याय देत त्या व्यक्त
करणे हीच खरी कसोटी असावी.
धन्यवाद !
-सुप्रिया.
नुसत्या गझला टाकल्यावर इतका
नुसत्या गझला टाकल्यावर इतका गदारोळ, मग गझलविच्छेदन करायला लागलो तर काय होईल? नको रे बाबा! सगळ्यांना आपले छान छान म्हटलेले बरे! निदान मला तरी चिंतनला, वाचनाला व व्यासंगाला वेळ मिळेल!
कुठे अटकेपार झेंडा लावायचा कुणाची प्रशस्तिपत्रके मिळवून!
मी गझलही वाचली आणि
मी गझलही वाचली आणि चर्चाही
दोन्हीही आवडल्या
धन्यवाद
धन्यवाद
प्राध्यापकमहाशय, >> गझल अॅज अ
प्राध्यापकमहाशय,
>> गझल अॅज अ होल मी तरी कधीच तपासत नाही!
मला वाटतं आपण यावर पुनर्विचार करावा.
शेर करणारा शायर आणि गझल रचणारा गझलकार (की गझलिया?) यांच्यात फरक आहे. रसिकांना कलाकृती प्रस्तुत करणे आणि रसिकांसाठी कलाकृतींचे प्रदर्शन भरवणे यांत फरक आहे.
मला स्वत:ला गझलेतलं फारसं कळंत नाही. जाणकार लोकं अधिक प्रकाश टाकू शकतील.
आ.न.,
-गा.पै.
बेफिन्चा प्रतिसाद पटला.
बेफिन्चा प्रतिसाद पटला.
धन्यवाद पटणा-यांचे/न
धन्यवाद पटणा-यांचे/न पटणा-यांचे!
हंबरते आई >>>>>>>>
हंबरते आई >>>>>>>>
डोळ्यासमोर चित्र उभे राहीले आणि मस्त हसायला आले.
प्रोफेसर - तुम्ही सॉलीड आहात हो. शब्द च नाहीत.
धन्यवाद
धन्यवाद