सेकंड होम?

Submitted by सौमित्र साळुंके on 29 May, 2014 - 07:43

सह्याद्रीच्या सांदी कोपऱ्यात मोठमोठ्या वसाहती उभ्या राहतायत. निसर्गाने अंथरलेल्या हिरवाईचच मार्केटींग करून तिलाच छेदत, भेदत गुळगुळीत रस्ते बनतायत आणि टुमदार घरं वसतायत. सेकंड होम्स म्हणे...

मागे एक (उगाचच) इंग्रजाळलेली माझी मैत्रीण (?) मला कोण कौतुकाने सांगत होती. निसर्गाने नटलेल्या त्या परिसरात पूल साईडला त्यांचा ग्रुप कसा तर्र झाला होता, कसं चिल मारलं वगैरे वगैरे. मला याचंही विशेष वाटलं कि माझा स्पष्टवक्तेपणा (किंवा तुसडेपणा) माहित असूनही तिने मला हे सांगितलं. वर त्या बेहोशी का आलमचे फोटोही दाखवले. अपलोडहि केले असतील कदाचित. आणि करणाऱ्यांनी लाईक्स पण केले असतील...

मला ती ओळीने उभी असलेली घरं, ती हॉटेल्स अक्षरशः ओंगळवाणी वाटली. भडक रंगाच्या त्या इमारती, त्या कृत्रिम बागा. एखादया खानदानी शालीन सुंदरीवर अनावश्यक मेकअपची पुटं चढवून तिच्यावर लादलेल्या या कृत्रिम सौंदर्याचे प्रदर्शन मांडावे तशी...

अमुकच शांघाय करा, तमुकच व्हेनिस करा हि मनोवृत्तीच मला भिकारडी वाटते. उदाहरणार्थ मी मुळचा वाईकडला. वाई वाईच रहावी, मुळातच बारा महिने सौंदर्याने नटलेली ती विराटनगरी आणखी सुंदर व्हावी हे उत्तम, पण वाईचं झुरिच करू किंवा बर्न करू अशी कल्पना एखाद्या मेंढराच्या डोक्यात उद्या शिरली तर ती दरिद्रीच नव्हे का?

श्री सह्याद्री त्याची एखाद दुसरी भली थोरली सोंड एखाद्या जलाशयात सोडून बसला आहे.. त्यावर कैक प्रकारचे प्राणी पक्षी कवेत घेऊन गर्द वनराजी विसावली आहे.. आपण पहाटेला आणि सांजेला त्या जलाशयात तेजस्वी तपस्वी सह्याद्रीचे रूप पाहातो आहोत... पहाटेला खगांच्या कूजनानेच आपल्याला जाग येतेय.. जांभई नाही... आळस नाही... सारा थकवा कुठच्या कुठे नाहीसा झालेला... ज्या बसक्या घरात तुम्ही मुक्कामाला होतात त्या घरातली माऊली तुम्हाला भाजी भाकरी खाऊ घालते... कच्चा कांदा आणि जवसाची चटणी कदाचित.. रात्री एखादे तात्या, आण्णा किंवा भाऊसोबत बाजेवर डुकरा-सश्यांपासून ते मागच्या होळीला खालच्या रानातून आलेल्या डरकाळी बद्दल बोलत बसलाय.. ते भाऊ तात्या एक वाकळ काढून देतात आणि म्हणतात मी तीन म्हयण्याचा हुतो तवा माज्या पंजीनं शिवली व्हती.. तुम्ही निवांत पडलाय फेसाळलेलं निरभ्र आभाळ बघत.. शांत.. एकांत... नेमकं काय होतं ते तुम्हाला कळत नाही पण जडावलेले डोळे तुम्ही कसल्यातरी आंतरिक सुखाने झाकता आणि अलगद डोळ्यांच्या कडांमधून दोन थेंब ओघळून कानापाशी विसावतात.. उजाडल्यावर जडावलेल्या हृदयाने आणि पावलांनी तुम्ही निरोप घेता पुन्हा भेटू म्हणता...

... काही वर्षे जातात.. विद्युतवेगाने कसलीशी ओटू किंवा एचटूओ अश्या नावाची सिटी वसते... आणि ते घर, ते रान, ती होळी, ती डरकाळी, ती पायवाट, ते ताट, ती ‘वाकाळ’ आणि ती सकाळ... सारं सारं हरवून जातं... सह्याद्रीची ती भारदस्त सोंड हवी तशी कोरली जाते... चक्क पंचतारांकित रेस्तराँ उभे रहातात.. पूल.. क्लब... हॉटेल्स.. बंगले, व्हिलाज... कित्येक प्राणी पक्ष्यांना त्यांच्या फर्स्ट होम मधून बेघर करून सेकंड होम्स उभी राहतात.. सांगण्यात येतं कि अमुक गडावरची हि वाट बंद झाली आहे वळसा घालून जा.. हि अमुकची प्रॉपर्टी आहे... इथे पण प्रोजेक्ट येणार आहे... वगैरे वगैरे... याही वेळेला तुमची पावलं जड होतात.. कुठतरी तरी पूर्वीची एखादी खुण सापडेल का?...

... मी मैत्रिणीचं “कौतुक” करण्याऐवजी “डोंगर पोखरल्यागेल्याचं” दुख: झालं म्हणतो...

तिला विचारतो, “...कधी दिवाळीच्या सुट्टीत गावी घराबाहेर ओट्यावर चांदणं मोजता मोजता तुझा डोळा लागलाय?”
ती म्हणते “मला गाव नाही...”
मी वरमतो... तिला सॉरी म्हणतो...
ती “का” विचारते..
मी “काही नाही” म्हणतो...

आणि त्या रात्री कसल्याश्या अस्वस्थतेने गाडगीळांच्या आणि कस्तुरीरंगनांच्या अहवालाची तुलना करत बसतो...

@ सौमि - २९ मे २०१४

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमितव + १

माझ्या माहितीत असेही अनेक लोक आहेत हे शहरात सुद्धा एक राहायला दुसरं, तिसरं, चौथं घर इन्व्हेस्टमेंटसाठी घेतात. स्वतः त्यात राहात नाहीच पण त्यातले काही जण ते भाड्यानेही देत नाहीत. त्यातले काही जण त्या घरात कधीही राहणार नसतात. काही जण कायमसाठी देश सोडून बाहेर गेलेले असतात. खरच एवढ्या बांधलेल्या प्रॉपर्टीजची गरज एका कुटुंबाला असते का? तुमच्या पैशाचा तुमच्या स्वतःसाठीच अधिक सदुपयोग करू शकत नाही का? >>> प्रत्येकाच्या सदुपयोगाच्या कल्पना वेगळ्या असतात वेल.

शहरातून जाऊन चार दिवसांकरता कौलारू घर, विहीर, चुलीवरचा स्वयंपाक वगैरे परिकथेतील गोष्टी छान वाटतात. पण म्हणून ते बदलून नये असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

सर्वांच्या मतांचा मान राखून, काही झालेले आणि काही संभाव्य गैरसमज टाळण्यासाठी खालील स्पष्टीकरण देऊ इच्छितो:

मी स्वतः कायद्याचा विद्यार्थी (जमलं म्हणून आठ वर्षांपूर्वी द्विपदवीधर) असून या क्षेत्राशी संबंधित आहे. बांधकाम व्यवसाय, भुसंपादन इत्यादि विषयांची, कायद्यांची,(क्लिष्ट) प्रक्रियांची आणि पळवाटांची बऱ्यापैकी माहीती आणि अनुभव दोन्ही गाठीशी आहेत त्यामुळे मी केलेली विधाने ही निव्वळ भावनेच्या आहारी जाऊन केलेली नाहीत. सेकंड होम हे वाढत चाललेल्या संचयीवृत्तीचं, चंगळवादाचं आणि आनंदाच्या बदललेल्या व्याखेचं प्रतिक म्हणून वापरलं आहे. पशुपक्षांचा नैसर्गिक अधिवास हिरावून तिथे वसाहती आणि चंगळवादी संस्कृतीला पोषक वातावरण निर्मिती हे अभिप्रेत आहे. आणि हे विशेषत्वाने पश्चिम घाटासंबंधाने आहे. ते व्यक्तिशः घेऊ नये.

आपण लेख साकल्याने वाचाल तर आपल्या लक्षात येईल की मुळ आक्षेप कशाला आहे.

म्हटले तर या विषयाची व्याप्ती मोठी आहे. हा विषय सामजिक असंतुलानाशी निगडित आहे. तीसहून अधिक घरं इन्वेस्टमेंट म्हणून घेणारी व्यक्ति मी पाहिली आहे. आणि झेपलं नाही म्हणून पैकी सतरा घरांबद्दल डिफॉल्टर होतानाही बघितलं आहे. महत्वाकांक्षा आणि हव्यास याच्यातली सीमारेषा धूसर आहे ती जपावी एव्हढंच.

मैत्रिणीला सॉरी तिला गाव नाही म्हणून म्हटलं नाही तर तिला मी गृहीत धरलं म्हणून म्हटलं आणि ते स्वच्छ मनाने म्हटलं कुत्सितपण नाही. हर्ष आणि उल्हासाची माझी व्याख्या आणि तिची व्याख्या वेगवेगळया होत्या, ती निर्मळ मनाने काही सांगत होती आणि मी पूर्वग्रहाने ऐकत होतो. प्रश्न तिच्या गावाचा नव्हता, तिने त्या अपरिमित शांततेची अनुभुतीच कधी घेतली नव्हती.

कुणी असाहि प्रतिसाद दिलाय कि जड पावलांनी जिथे जाताय तेही हिरवाई छेदूनच बांधलय ना. मी माझ्या निवाऱ्याला जातो माझी ती मुलभूत गरज आहे.

बरं.. या असल्या झगमगत्या दुनियेला तुम्ही अॅग्रो टुरीजम नाही म्हणू शकत.. कारण अॅग्रो टुरीजम हि खरंच उत्तम संकल्पना आहे तिचा चंगळवादाशी दुरान्वये संबंध नाही.

तसेच.. खेड्यांचा विकास होऊ नये असं मी म्हटलं नाही किंवा मला तसं अभिप्रेतही नाही... मुलभूत गरजांची व्यवस्थित पूर्तता होणं, पंचक्रोशीमध्ये एखादा चांगला दवाखाना आणि तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल्स असणं, तालुकाच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगाराच्या संधी असणं, दळणवळण पुरेसं असणं, शेतीमधून बऱ्यापैकी परतावा मिळेल अशी परिस्थिती असणं ... याला आपण स्वयंपूर्ण गाव-खेडं म्हणू शकतो. त्यासाठी प्रयत्न करणं हे समाजाचं आणि राज्यकर्त्यांच कर्तव्य आहे. माझा मुद्दा वेगळा आहे... या अश्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांचा काय उद्धार झाला आहे? अर्थात काही ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास न करता उद्योग निर्मितीसोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्याचे सन्माननीय अपवादही मी पहिले आहेत आपणही पाहिले असतीलच. विकास आणि निसर्गसंवर्धन याचा ताळमेळ साधणे भारतासारख्या हुशार देशात बिलकुल शक्य आहे. त्यासाठी लागणारी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती हवी.

शहरातल्या सुखसोयी उपभोगण्याबद्दल... शहरातली स्थिती आदर्श आहे किंवा हि जीवनशैली अनुकरणीय आहे अशी परिस्थितीच नाहीये. मुंबई-पुणे हि शहरे आणि बदलत चाललेली जीवनशैली हा एक मोठ्ठाला विषय आहे. संविधानापासून, आंतरराज्जीय संबंधांना स्पर्श करणारा तो एक व्यापक विषय आहे.

तरीदेखील रक्तामध्ये डोंगरवेड भिनलं असल्याने विचारांमध्ये जहालता डोकावत असेलही कदाचित..

माधव गाडगीळ यांचा संदर्भही उगाच आला नाही. पश्चिम घाटासंबंधित त्यांच्या अहवालात शाश्वत विकास म्हणजे काय हे व्यवस्थित कळतं आणि या लेखन प्रपंचाच्यामागची तळमळ तीच आहे.

लेखाच्या शीर्षकामुळे काही गैरसमज झाले आहेत असे मात्र वाटते आहे.

तुमचा लेख, भाऊ आणि फारेंडची प्रतिक्रिया आणि उत्तरादाखल आलेली वरची तुमची प्रतिक्रिया सगळे आवडले.

सौमी, उत्तम प्रतिसाद!
विकास आणि निसर्गसंवर्धन याचा ताळमेळ साधणे भारतासारख्या हुशार देशात बिलकुल शक्य आहे.>>> फार वर्षापूर्वी कोणी एक गांधी म्हणून होते, ते बहुतेक असेच काही म्हणत, पुढे काय झाले माहिती नाही!

पंचक्रोशीमध्ये एखादा चांगला दवाखाना आणि तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल्स असणं

>>> का बरं तालुक्याच्या ठिकाणी? प्रत्येक छोट्या गावातही हॉस्पिटल असलं तर जास्त उत्तम.

जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी नोकरीच्या संधी का बरं? घराजवळ, गावातल्या गावात का नकोत?

निसर्ग जपूनही विकास साधता येतो. खेड्यातील जीवनमान आणि राहणी तीच ठेवण्याचा आग्रह मात्र चुकीचा वाटतो.

का बरं तालुक्याच्या ठिकाणी? प्रत्येक छोट्या गावातही हॉस्पिटल असलं तर जास्त उत्तम.

जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी नोकरीच्या संधी का बरं? घराजवळ, गावातल्या गावात का नकोत?

>>>

माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात चाळीस पन्नास हजार गावं असावीत म्हणजे तेव्हढीच हॉस्पिटल्स आणि या नियमाने भारतभरात पाच सहा लाख हॉस्पिटल्स... थोडं अशक्यप्राय वाटतंय.. एव्हढ ट्रेण्ड मनुष्यबळ कुठून आणणार?

गावातल्या गावात आणि प्रत्येक गावात नोकरीच्या संधी अशक्य आहे.

माझी दोन्ही मतं माझ्या मर्यादित ज्ञानावर आधारलेली आहेत.

वरील गोष्टी शक्य असल्यास आनंदच होईल.

तुमचा मूळ हेतू योग्य आहे पण मुद्द्यांची फारच सरमिसळ झाली आहे. निसर्गाच्या होणार्‍या र्‍हासाला एकच एक गोष्ट (सेकंड होम्स) कारणीभूत आहे आणि त्याकरता ती करू नये असं तुमचं म्हणणं आहे का?

मग शहरातील फर्स्ट होम्स तरी कशाला? गावातले टुमदार घर सगळ्यांकरता का नको? आपण गावं सोडून शहरात का आलो? जगभर गावांचा विकास होऊन शहरं का बनतात? शहरात राहणारे आणि खेडेगावातल्या राहणीमानाला वाखाणणारे आपण आपली नोकरी, घरं सोडून कायमचे खेड्यात जाऊन का राहत नाही? विहीरीचं पाणी शेंदून, फाट्याच्या चुलीवरचं जेऊन वाकळ पांघरून का झोपत नाही? जिम लावण्यापेक्षा स्वत:च्या शेतीत अंगमेहनत का करत नाही?

विषय अत्यंत व्यापक आहे. त्याला असा चिमुटभर उपाय उपयोगी नाही.

************************

मुळातच बारा महिने सौंदर्याने नटलेली ती विराटनगरी आणखी सुंदर व्हावी हे उत्तम, पण वाईचं झुरिच करू किंवा बर्न करू अशी कल्पना एखाद्या मेंढराच्या डोक्यात उद्या शिरली तर ती दरिद्रीच नव्हे का?
>>> प्रॉब्लेम असा आहे की वाईची धारावी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यापेक्षा झुरीच आणि बर्न झालेले नक्कीच बरे.

अतिशय संकुचित, आत्मकेंद्रीत आणि मी म्हणतो तेच बरोबर असा लेखकाचा दृष्टीकोन दिसतो आहे. आपण ज्या so called अनुभुती (?) घेतल्या आहेत, त्याच खर्‍या great आणि कोणी सेकंड होम घेतले तर ते मात्र अगदीच टुच्चे.

तुम्हाला इतके गाव, जंगला चे प्रेम असेल तर ते तिथे कायमचे जाउन राहुन दाखवा. शहरात कशाला लोकांना त्रास देत रहाताय.

स्वताचे काही कतृत्व नाही आणि दुसर्‍यांचा उपहास करायचा.

थोडक्यात लेखक महाशय तुम्ही भंपक आणि Typical समाजवादी ( सर्व वाईट अर्थाने ) आहात. स्वता काही करायचे नाही आणि दुसर्‍यांना काही करुन द्यायचे नाही.

<< विषय अत्यंत व्यापक आहे. त्याला असा चिमुटभर उपाय उपयोगी नाही.>> कॅरम हा माझा अत्यंत आवडीचा बैठा खेळ. माझ्याकडचे तीन हस्तीदंती स्ट्रायकर्स एका सुबक डबीत ठेवून मीं जीवापाड जपत असे. मग अचानक हस्तीदंती स्ट्रायकर्सवर आंतराष्ट्रीय बंदी आली. मीं तेंव्हां जाम जळफळलों. हत्तींच्या बेकायदा शिकारीला [ 'पोचींग'] हा चिमूटभर उपाय काय कामाचा, असाच विचार मनांत आला. पण मग लक्षांत आलं, ह्या स्ट्रायकर्सचा व 'पोचींग'चा संबंध थेट आहे; हस्तीदंती वस्तूंवर लोक जीव टाकतात म्हणूनच तर' पोचींग' होतं ना ! पर्यावरणाचा र्‍हास, नैसर्गिक सौंदर्याला बाधा, जमीनी मिळवण्याकरतां गैरव्यवहार, सोयी-सुविधा पुरवण्याकरतां पैसे व सत्ता यांचा गैरवापर हें सर्व जर कमी-अधिक प्रमाणात पंचतारांकीत 'सेकंड होम' वसाहती निर्माण करताना होत असेल, तर त्याला अशा वसाहतींविषयीं निर्माण झालेली/केलेली 'क्रेझ'च जबाबदार नाही का ? मग त्याविषयीं कुणी पोटतिडीकेने बोललेल्याची निदान गंभीर दखल तरी कां घेवूं नये !

दोघांचंही (या इकडे वर जे दोन गट आहेत ते) थोड-थोडं काहीतरी चुकतंय.सुसंगत विकासाबद्दल कोणीच बोलत नाहीये.स्थानिक गावकर्‍यांचा सेकंड होमच्या संकल्पनेने कसा फायदा होईल बरं?इकडे जंगलं तोडून माणसं वसवली म्हणून तेच करायच,असं कसं? Uhoh

परदेशात खेडी जपली जातात.तिथला खेड्यांचा विकास खेडेपण जपून होतो.मुद्दा खेड्यात जाऊन चार दिवस राहण्याचा नसून (मामी) जे आयुष्यच तिथे काढतात्,त्यांच्या एकंदरीत फायद्याचा आहे.तो फायदा विकासाच्या माध्यमातून गावपण टिकवून मिळवता येईलच की...त्यासाठी गावाचं शहरीकरण का करायचं? (काहीही)

विकास हा डिस्ट्रक्टीव्ह कशासाठी,नैतिकतेने कंन्स्ट्रक्टीव्ह बनावा की.वास्तविक सेकंड होम पाहीजेच कशाला लोकहो,एवढं कंटाळलो आपण पहिल्या घराला...?

टोच्याजी जरा 'असंयमीत' प्रतिसाद दिसतुया. वाईच आवरा...काय कर्तृत्व काय्,भंपक काय..? Happy

अमितव अनुमोदन!!

मी माझ्या निवाऱ्याला जातो माझी ती मुलभूत गरज आहे.>> अश्याच प्रकारची काही गरज अंबानी, टाटा, बिर्लांसारख्यांचीही असू शकते.

उपलब्ध आहे म्हटल्यावर ज्याला गरज आहे, कुवत आहे तो घेणारच. असंतुलन साधणारे घटक उपलब्धच होणार नाहीत असं काही करता येतंय का पहा.

तुमच्या कन्सर्न बद्दल शंका घेतलेली नाही. पण काही गोष्टी न प्टण्यासारख्या आहेत. ंओबाइलवरूनजून लिहिणे शक्य नाही त्यामुळे सध्याइतकेच पुरे

प्रश्न कुणी सेकंड होम घ्यावे अथवा न घ्यावे (खरंतर इथे हॉलिडे होम हा शब्द जास्त योग्ग्य ठरला असता असे माझे मत) हा नाही, तर ते करताना स्थानिक पर्यावरणाची केलेली जाणारी अपरिमित हानी हा कळीचा मुद्दा आहे. आणि अशी होणारी हानी आम्हीतरी डोळ्यांनी बघत आहोत.

कोकणामध्ये सध्या हे हॉलिडे होम्स फार चलतीमध्ये आहेत. मला तरी ही संकल्पना मनापासून आवडते. मलादेखील माझे एखादे घर गावामधे असलेले आवडेल. परंतु, हे हॉलिडे होम्स बांधण्यासाठी जंगलं कापली जात आहेत. बरं जंगले कापून इथे तसेच निसर्गाच्या जवळपास वाटणारं एखादं सुसज्ज घर बांधले गेले तर बरे वाटेल. प्रत्यक्षामधे अपार्टमेंट्स उठत आहेत. त्याच्या आजूबाजूला स्थानिक वृक्षवल्लरी लावण्याऐवजी लॅन्डस्केप गार्डनच्या नावाखाली शोभेची झाडे लावली जात आहेत. पाण्ञाच्या अत्यंत अयोग्य नियोजनामुळे जवळच्या गावातील लोकांना पाणी मिळत नाही. सांड पाण्याचय चुकीच्या नियोजनामुळे ओढे नाले व्गिरे प्रदूषित होत आहेत. आता या समस्या [हार छोट्या प्रमाणावर आहेत. पण आहेत. त्याक्डे दुर्ल़्ष केले तर भयाण होतीलच.

बरे! जे कोण मुंबई पुण्यामधून लोक इथे येऊन चाराठ दिवस सुट्टीसाठी राहतात ते काय करतात? टीव्ही पाहणे, स्विमिंगपूलमधे खेळणे, जवळच्या एखाद्या होटेलमधे मासे खाणे आणि दारू पिणे (वरील गोष्टी चुकीच्या आहेत असे माझे मत नाही!) पण ज्या निसर्गासाठी आपण हे घर घेतलंय त्याचा नक्की कसा आस्वाद घ्यावा याचाच त्यांना विसर पडलेला असतो (अर्थात अपवाद आहेतच). ठिकठिकाणी प्लास्टिकच्या बीअरच्या बाटल्या टाकणे, स्थानिकच काय पण आपल्या हॉळिडे होममधील इतर कुणाशीही कसलाही संवाद न ठेवणे, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट वापरत बसण=, आपल्याच कोषात जगणे यात कसला आलाय "गावाकडचा फील आणि नॉस्टॅल्जिया?"

ही घरी काही स्वस्तामध्ये वगैरे मिळत नाहीत. चांगलपस्पैसा मोजावा लागतो पण गावाकडे आपलं एक तर घर पाहिजे, ही आपली स्वाभाविक मानसिकता आहे, त्याच मानसिकतेला बरोबर हेरून बिल्डर लोकं नुसती आमिषं दाकह्वून गावाकडच्या दुप्पट तीप्पट किमतीमध्ये ही घरे (खरंतर खोल्या) विकतात. घेणारी जनता बरोबर फसणार हे त्यांना माहित असतं. बहुतेक वेळा हे फ्लॅटइबंगले इन्व्हेस्टमेण्ट म्हणून घेतलेले असल्याने ब्लॅक मनीचा सर्रास वापर केलेला असतो.

गावामधे जमिनीला आलेल्या या प्रचंड किमतीने आजचा तरूण हुरळून गेलेला आहे, ही समस्येची दुसरी बाजू. वाडी करून तिथे वर्षाला हजारोंनी मिळवण्यापेक्षा एकदाच विकून लाखोंनी कमवू या, ही आशा सध्या प्रबळ ठरते आहे. आलेल्या पैश्याचा नक्की विनियोग कसा करायचा हे माहित नसल्याने तिथे वेगळ्याच समस्या उद्भवत आहेत.

यातील बहुतेक समस्या या चुकीच्या आणि अयोग्य धोरणांमुळे निर्माण होणार्‍या आहेत. त्यासाठी जनजागरण, शासकीय पातळीवरून प्रयत्न या सर्वांचीच गरज लागणार आहे.

माझा गावाकडे घर घेऊन रहायला अजिबात विरोध नाही, पण विरोध असलाच तर गावांचे होणारे बकाल शहरीकरणाला मात्र आहे.

(खरंतर इथे हॉलिडे होम हा शब्द जास्त योग्ग्य ठरला असता असे माझे मत)
<<<<<<<<<< अनुमोदन.
माझ्या प्रतिसादात मी म्हटलहि कि शीर्षक वेगळं असायला हवं होतं. धन्यवाद. आपली मते जवळ जवळ पूर्ण मान्य.

Pages