माणसं वाचताना.......... २) सुधा

Submitted by मानुषी on 2 March, 2014 - 08:47

माणसं वाचताना .....१) क्लारा . http://www.maayboli.com/node/47495

माणसं वाचताना..............२) सुधा

अमेरिकेतल्या मुक्कामात लेकीबरोबर फिरताना, तिच्या मित्र परिवारातल्या काही स्त्रियांशी माझा अगदी जवळून परिचय झाला. प्रत्येकीचं व्यक्तिमत्व, वंश, नॅशनॅलिटी, वय, रंगरूप, त्या जिथून आल्या ती परिस्थिती…… इ. प्रत्येक गोष्टीत बरीच भिन्नता होती. पण यातल्या काही स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचे माझ्या मनावर कायमचे ठसे उमटले. माणसं वाचता वाचता आलेले हे काही अनुभव!

2) सुधा
मागील वर्षी लेकीची देशवारी झाली. पण भारतात आगमन होण्याआधीपासूनचा तिचा धोशा होता …. " सुधाच्या नातीसाठी बिंदल्या…… सुधाच्या नातीसाठी बिंदल्या"!
मग मी रीतसर "कृष्णा पर्ल्स पुणे" येथून उपर्नीर्दिष्ट बिंदल्या ऑर्डर देऊन बनवून घेतल्या. लेक परत जाताना घेऊन गेली. अर्थातच सुधाला त्या आवडल्या.
प्रथेप्रमाणे आत्तापर्यंत सुधाचे फोटो पाठविण्यात आले होतेच.
आणि आता या माझ्या अमेरिका वारीत या सुधाला प्रत्यक्ष भेटणं फक्त शिल्लक होतं.
आतापर्यंत अनौपचारिक अश्या अमेरिकन वर्क कल्चरची साधारण ओळख झालेली असल्याने ……. आईच्या वयाच्या सहकारी स्त्रीला अगदी एकेरी संबोधन कसं…… वगैरे प्रश्न आता पडत नाहीत.

तर या वेळच्या अमेरिका वारीत एके दिवशी आम्ही उभयता लेकीबरोबर लेकीच्या ऑफ़िसमधे गेलो. एक एक करत लेकीच्या डिपार्ट्मेण्टातल्या बऱ्याच जणांना …… खरं म्हणजे जणींना …… भेटलो. हो…… हे डिपार्टमेंट म्हणजे सगळा जवळ जवळ "ऑल विमेन क्रू" होता. काही अपवादात्मक पुरुष वगळता! यातही भारतीय स्त्रिया, मुलीही बऱ्याच होत्या. आणि इतर अनेक देशातल्या! अमेरीकन तर होत्याच. पण अगदी घाना, इथोपिया, बल्गेरिया अश्या देशातल्याही स्त्रिया होत्या.
शेवटी लेकीच्या केबिनमध्ये गेलो. अजून सुधा भेटलीच नव्हती. पण तिची केबिन लेकीच्या केबिन शेजारीच असल्याने ती शेवटी भेटणार हे माहिती होतं.

लेकीच्या केबिनमध्ये पोचलो तेवढ्यात पाठीमागून एक जोरदार "हेल्लो" ऐकू आला.
मागे वळून पाहिलं तर एका अत्यंत देखणी, माझ्याच वयाची स्त्री उभी! केसांचा शोल्डर कट, चेहेऱ्यावर न जाणवेलसा, पण शोभून दिसेलसा मेकप. ती सुधा होती.
अंगात टिपिकल फॉर्मल काळा ऑफ़िसवेअर……. ट्राउझर, जॅकेट. तेवढयातही तिच्या अंगावरचे काही मोजकेच हिरे दिव्याच्या उजेडात प्रखरपणे चमकल्याने अगदी नजरेत भरले.
कोटाच्या कॉलरमधून डोकावणारी दाक्षिणात्य पद्धतीची पोवळे आणि हिरेजडीत मंगळ्सूत्रवजा नाजुकशी साखळी आणि विशेषत: उजव्या हातातलं ब्रेसलेट आणि बोटातल्या अंगठ्या! हे सगळे नाजुक साजुक दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत होते.

आत्तापर्यंत बहुतेक सगळ्यांनी ओळख झाल्यावर "हाय हेलो" करत कुणी हस्तांदोलन केलेलं तर बहुतेकींनी आलिंगन(हग) दिलेलं! अगदी आपलेपणाने आणि अनौपचारिक.
सुधा जरा लांबच उभी होती. पण चेहेऱ्यावर मात्र अगदी आनंद ओसंडून वहात होता. मग मी मिळवण्यासाठी हात पुढे केला.
पण तिने मात्र पटकन काही तरी विषय बदलत डावा हात अगदी पुसटसा माझ्या (अर्थातच उजव्या) हातात दिल्यासारखं केलं.
ते सगळं थोडं ऑकवर्ड झालं खरं, पण पुढे संभाषण चालू राहिलं, हास्य विनोद झाले.
"यू नो…. वी आर सिस्टर्स! आपण एकाच वयाच्या आहोत, आपल्या नवऱ्यांची नावंही सारखी, आणि आपल्या दोघींच्या मुलीही अगदी एकाच वयाच्या, एकाच महिन्यात जन्मलेल्या! आहे ना गमत?" म्हणत सुधाने माझ्या लेकीबद्दल चार कौतुकाच्या गोष्टी सांगितल्या. माझ्या लगेच लक्षात आलं की सुधाचं आमच्या बाबतीतलं "होमवर्क" अगदी पक्कं झालेलं होतं.
सुधाकडून जरी लेकीचं कौतुक ऐकायला मिळालं तरी मला हेही चांगलं पक्कं माहिती होतं
की एरवी सुधा खरंच तिच्यावर अगदी "आईपणा" चा हक्क गाजवते.
कधी घरी केलेला एखादा खाद्य पदार्थ तिच्यासाठी आणेल, कधी जर लेक फार वेळ ऑफ़िसातच आहे हे लक्षात आलं की तिला लवकर/वेळेवर घरी जाण्याबद्दल सुनावेल.
कधी स्वता: जाऊन तिच्यासाठी डेस्कवर चहा कॉफी आणून ठेवेल, कधी खूप स्नो झाला तर स्वता:च्या शोफर ड्रिव्हन कारमधून जराशी वाकडी वाट करून कधी घराजवळ, कधी मेट्रोपर्यंत सोडेल. हे सगळं अगदी सहज आणि केवळ प्रेमापोटी!यात कसलाही दिखावा नाही.............
मग तिथेच आमच्या थोडा वेळ गप्पा झाल्या. मग शेवटी आम्ही सुधाचाही निरोप घेतला. पण एकमेकांना परत भेटण्याच्या बोलीवरच. कारण अजून हमनाम (सारख्या नावाच्या) दोन व्यक्तींची भेट झालेली नव्हती.

सुधाचे यजमान कामानिमित्त भारत, पाकिस्तान दौऱ्यावर होते. ते एका प्रथितयश सर्जन म्हणून रिटायर्ड आहेत तरीही कार्यरत आहेत.
काही दिवसांनी सुधाचे यजमान परत आले. मग सुधाने आम्हाला शनिवार रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण दिलं.
घरात प्रवेश करताक्षणीच एखाद्या महालात प्रवेश केल्यासारखंच वाटलं. सुधाने ऑफिसातल्या आणखी ३/४ व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांनाही बोलावलं होतं. मोठ्या रिवॉल्विंग डायनिंग टेबलावर विविध खाद्य पदार्थांची रेलचेल होती. स्वयंपाकघरात स्वयंपाकी काम करताना दिसत होता.
ज्या बाळासाठी मागील वर्षी बिंदल्या नेल्या होत्या ते बाळही आपल्या मातापित्यांसह उपस्थित होतं.
सुधाने मला फ़ोनवर सांगितलंच होतं की तिचा मुलगा सून आणि नातही या डिनरसाठी येताहेत म्हणून.
असंच कधी तरी फोनवर बोलता बोलता एवढं मोठं घर असून मुलगा सून मात्र अपार्ट्मेण्ट मध्ये रहातात याची खंतही तिने माझ्यापाशी व्यक्त केली होती. आता नात झाल्यापासून ही खंत जरा जास्तच वाढली होती.

असो.......याच कार्यक्रमात ऑफिसातल्या रेवतीच्या डोहाळजेवणाचाही घाट सुधाने घातला होता. ती मुलगीही आपल्या पतिराजांबरोबर उपस्थित होती.
डिनरचा कार्यक्रम चांगलाच रंगला. गप्पागपांमधे सुधाने आपल्या प्रमाविवाहाची सुरस आणि चमत्कारिक कथा सांगितली. बोलता बोलता सुधाने कसल्या तरी डिसेबिलिटी चा ओझरता उल्लेख केला. ज्यामुळे त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण खूप लोकांच्या एकत्र गप्पा चाललेल्या असल्याने पुढे काही उलगडा झाला नाही. आणि वेगवेगळ्या विषयांवर छान गप्पा रंगल्या.
इकडे दोन्ही हमनाम नवरोबांचं (माझे व सुधाचे) चांगलं सूत जमलेलं दिसत होतं.
सुधाने आम्हाला फ़िरून घर दाखवलं. एके ठिकाणी त्या सर्वांचा एक फेमिली फ़ोटो होता. त्यातला तिच्या लेकीचा फोटो तिने दाखवला. सुधाचीच लेक ती! देखणी आणि स्कॉलरही. अमेरिकेच्याच दुसऱ्या टोकाला स्वत:चं असं स्वतंत्र जीवन ती व्यतीत करत होती. पण लेकीचं लग्नाचं वय टळून पुढे चाललंय आणि हळूहळू तिच्यासाठी योग्य वर शोधणं कठीण होता चाललंय याबद्दल सुधा जरा चिंतेतच होती.
शेवटी सुधाने आम्हा बायका बायकांना देवघरात नेलं. प्रचंड मोठ्या घरातलं ते देवघरही तसंच प्रशस्त!
मुरुगनची मोठी प्रसन्न मूर्ती. इतरही दॆवांच्या मूर्ती आणि तसबिरी. फ़ुलं, धूप अगरबत्तीचा मंद सुवास!
सगळं कसं सुव्यवस्थित, नीट नेट्कं आणि जिथल्या तिथं.
तिच्या सुनेने पट्कन पुढे होऊन आम्हाला हळद कुंकू लावून अत्तर लावलं , आमच्या ओट्या भरल्या आणि संक्रांतीचं वाण त्यांच्या पद्धतीने दिलं.
प्रत्येकीला छान सजवलेल्या टोपलीत पाच फळं, एकेक बेदाण्याचं छोटं पाकीट, नारळ आणि एक छोटीशी भेटवस्तू !
मग रेवतीला चौरंगावर बसवून तिची दृष्ट काढली. म्हणजे ते काम सुधाच्या सांगण्यावरून मलाच करायला लागलं.
ती मला म्हणाली, " गरोदर मुलीची दृष्ट काढतात ना? तू तुमच्या पद्धतीने काढ."
आता आली का पंचाईत? मला कुठे येत होतं? तरी मी घरी सासुबाई घरातल्यांची दृष्ट काढायच्या ते आठवण्याचा प्रयत्न करून प्रसंग साजरा केला. कारण हे सगळं करण्यामागच्या सुधाच्या भावना मला खूप महत्वाच्या वाटल्या.
हो … हे कुटुंब मूळचं बंगलोर म्हैसूरकड्चं असल्याने संभाषण एका तर इंग्रजी किंवा हिंदीतूनच. कारण त्यांना मराठी येत नव्हतं.
जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा आम्ही सगळे दारापाशी थांबलो, तेव्हा पटकन सुधाने हॅन्गरवरचा कोट खाली काढला आणि ती तो घालू लागली तेव्हा तिचे यजमान पटकन पुढे झाले आणि अगदी सहजगत्या त्यांनी तिला कोट घालायला मदत केली. आणि पाठीमागे लोंबत असणारा पट्टा फक्त तिच्या हातात दिला. तिने तो पुढे ओढून घेतला आणि अश्या रीतीने ती पटकन तयार झाली आणि दोघे इतक्या थंडीत आम्हाला गेटपर्यंत सोडायला आले.
मला तिच्या हालचाली जरा वेगळ्या आणि थोड्या वेगळ्या वाट्ल्या. आणि पाहिल्यांदाच असं जाणवलं की ती तिचा उजवा हात वापरता नाहीये.
लेकीने गाडी घराच्या दिशेने सोडली. माझ्या डोक्यात विचारचक्र चालू होती.
"अगं…सुधाच्या उजव्या हाताचा काही प्रोब्लेम आहे का?" मी विचारलं.
माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच लेक म्हणाली, "आई, अगं तुला तेवढंच सांगायची विसरले. कारण ती इतकी एफ़िशंट्ली सगळं करता असते ना की तिच्यात काही तरी डिसेबिलिटी आहे हे विसरायलाच होतं. खरं म्हणजे ती आपल्यासारख्या नॉर्मल व्यक्तींपेक्षाही जास्त एक्टीव्ह आहे. ऑफिसमधला तिचा कामाचा झपाटा पाहीला की थक्क व्हायला होतं."
पुढचं सगळं माझ्यासाठी खूपच आश्चर्यकारक आणि धक्कादायक होतं.
सुधा शाळकरी वयात असतानाच तिला एक जबरदस्त अपघातात आपला उजवा हात गमवावा लागला होता. पण काही महिन्यानंतर ती सावरली. आणि तिने आपलं आयुष्य पुढे सुरू केलं.
पुढे काही वर्षातच एका लग्नात तिला एक मुलगा भेटला. तो तेव्हा मेडिकलला शिकत होता. ते "लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट" होतं.
मग त्यांच्या चोरून भेटी होता गेल्या. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
अर्थातच दोघांच्याही घरून विरोध! मुलाला घरातून बाहेर काढण्यात आलं. अगदी प्रोपर्टीतून बेदखल इ.इ. कारण एक हात नसलेल्या(तो ही उजवा )मुलीचा कोणत्या घरात समजून उमजून स्वीकार होणार?
पण मुलांचा निर्णय पक्का होता. मुलगा मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असतानाच दोघांनी लग्न केलं. सुधाला अगदी लहान वयातच मुलगा झाला. मग ते सगळेच अमेरिकेला शिफ्ट झाले. मग काही वर्षांनी या जोडप्याला मुलगी झाली.
आतापर्यंत सुधाच्या यजमानांनी सर्जन म्हणून चांगलं नाव कमावलं होतं.
अमेरिकेत आल्यावर सुधाने आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पण इथेही तिला समस्यांना तोंड द्यावं लागलं. तिला टायपिंग शिकावं लागलं. आणि हळूहळू तिने टायपिंग स्पीडही खूप प्रयत्नाने वाढवला. कारण युनिव्हर्सिटीने तिला एडमिशन देताना तश्या अटीच घातल्या होत्या. पण ती ग्रेज्युएट झाली. पुढे नोकरीतही सेटल झाली.
बाप रे…....सगळं कल्पनेच्या पलिकड्चं!
"आई मी जेव्हा जेव्हा तिला पहाते आय एम ऑलवेज अ‍ॅट ऑ ऑफ हर. आम्हाला जेव्हा कुठे मिटींगला जायचं असतं तेव्हा ती कशी पटकन तयार होते!
डाव्या हातानेच ती केस सारखे करून एका फटक्यात ते क्लिपमध्ये वर अडकवते, पटकन मेकपचा (एकच डावा) हात चेहेर्यावर फिरवते...आणि मीटिंगसाठी रेडी!" लेक सांगत होती.
अमेरिकेत सेटल झाल्यानंतर सुधाच्या यजमानांनी बराच रिसर्च करून तिला हा कृत्रिम हात बसवला. जो अगदी खऱ्या हातासारखा दिसतो. पण त्या हाताचा काही वापर करता येत नाही.
मग मला एकेका गोष्टीची लिंक लागत गेली. आमच्या अगदी पहिल्या भेटीत तिने माझ्याशी हात का मिळवला नव्हता.
याच बरोबर हेही लक्षात आलं की याच हातावरचं ब्रेसलेट आणि याच हाताच्या बोटातल्या अंगठ्यातले हिरे तेव्हा चमकले होते.
सुधाच्या असोशीने आणि तेवढ्याच जिद्दीने आयुष्य भरभरून जगण्याच्या हिंमतीला माझा मनोमन सलाम!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर्, स्वाभिमानी,कर्तव्यदक्ष, इंडिपेंडंट सुधा खूप आवडली... Happy

सुंदर लेख मानुषीताई. ग्रेट आहे सुधा आणि तिचा जोडीदार. >>>>> +१०...

मानुषी - असे सुरेख लेख लिहून मनोबल (इन्स्पिरेशन) वाढवते आहेस त्याकरता मनापासून धन्स ....

तुमची निरीक्षण शक्ती जबरदस्त आहे. आधीची गोष्ट ही आवडली होती आणि ही 'सुधा' सुद्धा ! श्री वपु काळे यांनी अशीच एक गोष्ट लिहिलेली , 'हसरे दुख्ख' ! यात पण दोन्ही हात शाळेतील दंगमस्तीमध्ये चेंगरून निकामी झालेली स्त्री आहे. अपघाताला जबाबदार असलेल्या मुलानेच एक प्रायश्चित्त म्हणून तिच्याशी संसार थाटलेला असतो. तात्पर्य काय, तुमच्यात वपुंचे गुण दिसतात ! लगे रहो !!!

सुंदर्, स्वाभिमानी,कर्तव्यदक्ष, इंडिपेंडंट सुधा खूप आवडली >>> +१. तिच्या जोडीदाराचेही खूप कौतुक वाटले.

नि:शब्द झाले वाचून! अगदी नेमक्या आणि सहज शब्दांत सुधाचं व्यक्तिचित्रण केलंएस! खूप आवडलं.

आणि सुधा आणि तिच्या जोडीदारालाही सलाम!!