काय करशील ?

Submitted by विजय देशमुख on 9 February, 2014 - 22:10

"काय करशील?"
पुन्हा एकदा त्याच्या तोंडुन तेच ऐकुन राज कंटाळला होता, पण त्याच्या अखंड बडबडीला त्याच्याकडे आता तरी काही उपाय दिसत नव्हता.
"बोल न बे.... आता काहुन चुप बसला...."
राजनं डायरी उघडली अन त्यात डोकं खुपसलं. १० बाय १० च्या खोपटात एका बल्बवर राजचा हिशोब चालु होता. नक्कीच बापुने पैसे काढले असावे, असा संशय त्याला आला.
"ए.... xxxxx तुझ्या बापाचं खात नाही लेका... समजलं ना.... मी .. मी कमावतो आणि पितो"
राजची आई शांतपणे एका खाटल्यावर बसली होती. शेजारच्या टीव्ही नसलेल्या घरांना हेच एक मनोरंजन होतं. खरं तर बापू काहीच कमावत नव्हता, आणि आईला उगाच त्रास देतो, हे सगळ्यांनाच माहिती होतं. पण रोजच्या नाटकाला राजही वैतागला होता. कसाबसा एका दुकानदाराच्या मदतीने माल पुरवण्याचे काम मिळाले होते. कधीकधी माल घरीही ठेवावा लागे, त्यातुनच चोरीमारी करुन बापुचे पिणे वाढले होते.
अचानक बापूने राजला धक्का मारला. राजला अपेक्षा नव्हती, तो एकदम खाटेवरुन खाली पडला. आणि चिडुन बापुला काही बोलणार इतक्यात पुन्हा एकदा बापू बरळला,
"बोल न बे.... काय कसशीन? ऑ...."
राज काही बोलायच्या आधीच बापू कळवळला.... आईने त्याच्या पायावर काठीने झोडपायला सुरुवात केली. बापूची नशा त्या माराने कमी झाली असावी, त्यामुळे त्याचं कळवळणं, ओरडणं, अजुनच वाढलं... पण आईने मारणं थांबवलं नाही. शेवटी बापूच्या पायाचं हाड मोडुनच तिने दम घेतला.
"आता समजलं का काय करेन ते.... आता यापुढं ढोसली, तर गाठ माझ्याशी आहे, समजलं का?"
आईचं एकच वाक्य ऐकुन बापू शांत झाला.... त्या वस्तीतला एकमेव तमाशा कायमचा बंद झाला.

पण अजुनही "करुन तर दाखवा" चे तमाशे सुरुच आहे... ते कधी बंद होणार देव जाणे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय विजयराव ! पण हा प्रसंग कोठे अनुभवलात ? माझ्या व्यवसायात तर हे नेहेमीचेच आहे. दारू म्हणजे आपल्या देशाला लागलेला रोग ! आपल्या हातातील बाटली जावून आपण कधी बाटलीच्या हातात जातो ते लवकर कळत नाही. तुमच्या कथेतील स्त्री प्रमाणे स्त्रिया aggressive झाल्या तर नशीब त्यांच्या पुढच्या पिढीचे ! दुर्दैवाने त्या अजूनही एकच प्याला मधील सिंधूप्रमाणे सोशिकपणे नवरा सुधारेल या आशेवर जगतात.

धन्यवाद डॉक्टर.
अमरावतीला माझ्या आत्याच्या घराजवळ ५-७ झोपड्यात ही लोकं राहायची, तिथलाच प्रसंग आहे. त्या बिचार्‍या माऊलीने ७-८ वर्ष सहन केलं. एक दिवस एका पोलिसानेच त्यांना सांगीतलं की फक्त पायावर मारा, म्हणजे केस करता येणार नाही.
नंतर जवळजवळ ३-४ वर्ष दारू सुटली, पण लिव्हर खराब झालं होतं, त्यामुळे तो जगला नाही. लहान मुलगा मात्र चांगला निघाला. आता त्याचा मोठा व्यवसाय आहे.

तुमच्या कथेतील स्त्री प्रमाणे स्त्रिया aggressive झाल्या तर नशीब त्यांच्या पुढच्या पिढीचे ! दुर्दैवाने त्या अजूनही एकच प्याला मधील सिंधूप्रमाणे सोशिकपणे नवरा सुधारेल या आशेवर जगतात.>> + १००

सगळ्या दारूड्यांच्या बायका अशा Aggressive बनोत ही इच्छा..