होणार मूर्ख मी हे बघुनी

Submitted by बेफ़िकीर on 9 December, 2013 - 02:51

अतीश्रीमंतीने सजलेली घरे, मढलेल्या बायका, घरातही लग्नासाठी जमावे तसे सजलेले स्त्री-पुरुष, जनरेशन गॅप, कौटुंबिक नाट्य, रटाळ चित्रण, प्रत्येकाच्या चेहर्‍यावर कॅमेरा रेंगाळवून प्रत्येकाची रिअ‍ॅक्शन दाखवण्याची अविकसित बुद्धीमत्ता, टिपीकल कंटाळवाणी संवादफेक, चांगले असणारे फारच चांगले आणि वाईट ते फारच वाईट, रिअल लाईफमध्ये कधीही होणार नाहीत असे संवाद व त्यांचा वेग, ही सर्व गुण(?)वैशिष्ट्ये घेऊन मालिका अवतरतात.

मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरीक व वेळ मिळेल तेव्हा काही स्त्री पुरुष या मालिकांवर जीव उधळतात. डोक्यात कुठेतरी सीमारेषा असते की ही एक काल्पनिक मालिका आहे आणि आपण वास्तवात जगत आहोत. काहींच्या बाबतीत ही सीमारेषा हळूहळू पुसट होऊ लागते. आपल्याही घरात असेच काहीसे आहे हे उगीचच पटायला लागते. नसलेल्या प्रश्नांची उत्तरे मालिकेमार्फत सुटतात का हे बघितले जाऊ लागते. मनोरंजन किंवा वेळ घालवणे या पलीकडे या ,मालिका जाऊन बसतात.

चीड आणणार्‍या ह्या मालिका काहींसाठी संध्याकाळचे ध्येय ठरते

त्यात पुन्हा जाहिराती वगैरे तर फारच महान!

या अश्या मालिकांमध्ये घडणारे नाट्य अद्भुत असू शकते. अपघात, अफरातफर, घरभेदीपणा, कौटुंबिक राजकारण, वाटण्या अन् काय काय! त्यात पुन्हा अगदीच 'घरेलू' स्वरुपाच्या मालिकांमध्ये तर जुने झालेले व त्यामुळे किंवा कश्यामुळे तरी ऑब्सोलेट झालेले संस्कार योग्य होते हे सिद्ध करणे यासाठी अहमअहमिकाच लागते. कोणीतरी वडीलधारी व्यक्ती म्हणजे जणू एकखांबी तंबू वगैरे असतो. त्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ!

नुकतेच काही कारणाने अक्षरशः 'होणार सून मी' या मालिकेचे सलग तीन भाग थोडेथोडे बघितले गेले. मोठी आई, बेबी वन्सं, जान्हवी वगैरे पात्र होती. ह्यात जान्हवीची आई अचानक जावयाकडून पैसे आणते व एक नाट्य घडते. नवरा बायकोला फोन करण्याआधी अनेकदा विचार वगैरे करतो. आत्ता हिचा मूड असा आहे, आत्ता हिला फोन करावा का? हिचा फोन का आला नाही? बरेच बरे नसेल का? मग ती कोणीतरी एक बेबी की कोण आहे तिने लावलेल्या शिस्तीमुसार त्या जान्हवीने वेळच्यावेळी 'उशीर होईल' असा निरोप न दिल्याने जणू घरातले सगळे चक्रच बिघडते. त्यावर विश्व रसातळाला जाणार असल्यासारखे चेहरे करून जो तो वाक्ये फेकू लागतो. मग माफीनामे, तेही अश्या टोनमध्ये की अगदी त्या बेबीपुढे लोटांगण घातल्यासारखे! फार तर काय, दोन पोळ्या अन् थोडीशी भाजी जास्त केली गेली असती किंवा करावीच लागली नसती. आठ दहा जण असलेल्या घरात, तेही इतक्या श्रीमंत घरात, त्याने असा काय फरक पडला असता? घरातली माणसे एकमेकांशी अजिबात ज्या पद्धतीने बोलत नाहीत त्या पद्धतीने ही पात्रे बोलत असतात.

आणखी कोणत्यातरी एका मालिकेत एक कोणीतरी घरातून निघून गेलेला असतो. त्याने त्याच्या मैत्रिणीला 'माझे बरेच नातेवाईक आहेत' असे काहीतरी सांगितलेले असते जे खोटे असते. ती तो घरी नसताना अचानक घरी प्रकट होते. मग तिला त्याचे म्हणणे खरे आहे हे पटावे म्हणून त्या तरुणाची आई, लहान बहिण, आत्या, वडील (बहुधा मोहन जोशी), मोठा भाऊ, वहिनी ही पात्रे एकामागोमाग एक उभी केली जातात. प्रत्येक पात्रासाठी हे नवीनच असल्याने त्या त्या पात्राच्या चेहर्‍यावर उमटलेले नवलाचे व धक्याचे भाव बघूनही त्या मुलीला एकदाही शंका येत नाही की लोक खोटे बोलत आहेत. मग ते इतके ताणलेले दाखवले की असे वाटले की टीव्हीच्या आत जाऊन त्या मुलीला गदागदा हालवून दोन थोबाडात लगावून विचारावे की अक्कलशून्य बये, तुला कळत नाहीयेका की ह्यांच्यातला कोणीही त्याचा खरा कोणीही नाही आहे वगैरे!

त्या होणार सून मध्ये परवा एकदा त्या नवर्‍याला जान्हवी विचारते की 'ए, मला तू ते (काहीतरी) सांगशील का?' हे विचारताना तिचा चेहरा असा झालेला असतो जणू दोघे नुकतेच प्रेमात पडलेले प्रेमवीर बागेत बसले आहेत आणि प्रेयसी विचारत आहे की तू मला कधी विसरणार नाहीस ना रे? त्यावर तो नवरा म्हणतो की नक्की सांगेन पण आधी डोके चेपून दे! मग तो पलंगावरून उतरून खाली बसतो आणि ती पाळलेल्या कुत्र्याच्या केसांतून हात फिरवावा तसे हात फिरवत स्वप्नील डोळे करून आढ्याकडे बघत राहते.

मध्यंतरी एका मालिकेत एका युवकाने आपल्या साहेबाला 'लिफ्टपाशी थांबलेल्या लोकांसाठी आरसे लावा म्हणजे ते कंटाळणार नाहीत' असा सल्ला दिला. तो सल्ला देण्यापूर्वी 'मी तुम्हा महान लोकांमध्ये बोलायला किती नालायक आहे' हे सांगण्यासाठी दहा वाक्ये खर्ची घात्रली. त्यात आगाऊ माफी वगैरे मागून घेतली. तेव्हाच पूर्ण खात्री झालेली होती की ह्याचे सजेशन साहेबाला पटणार. पण किती तो वेळेचा अपव्यय! त्या साहेबाला कोणी मंजिरी आवडत असते आणि तिचे उत्तर काय अशी पाटी असलेल्या जाहिराती गेले दोन दिवस झळकत आहेत. एव्हाना मंजिरीचे उत्तर काय ह्याची वाट न पाहता आजचा एखादा तरुण भलतीच्या प्रेमातही पडला असता च्यायला!

असेच एका मालिकेत कोणा एका तरुणाला मुलगी बघायला म्हणून तिच्या घरी घेऊन जातात. त्याचा कंप्लीट विरोध असतानाही! आणि अचानक त्याला ती मुलगी पाहून आवडते वगैरे! पण तिच्या मनात तसे काही नसते हे तर स्क्रीन बघणार्‍या प्रेक्षकांनाही समजते पण त्या बैलाला समजत नसते.

ह्या असल्या मालिका प्रेक्षकांना 'आपण काय बघावे' हे सुचवू तर शकतच नाहीत, पण तसा प्रयत्नही करताना दिसत नाहीत. अशी घरे नसतात, अशी नाटकी माणसे नसतात, अशी तत्ववादी, शिस्तप्रिय, जुनाट संस्कारांनी माखलेली धेंडे हल्ली नसतात, असे कोणी कोणाशी बोलत नाही हे लक्षात तरी घेतले जाते की नाही कोणास ठाऊक!

संभाव्य परिणामः

१. वेळ फुकट जाणे
२. अनावश्यक कथानकात गुंतल्यामुळे त्या कथानकानुसार बाकीची दिनचर्या किंवा तिचा काही भाग आखला जाणे
३. आपल्याकडे काही फार वेगळे चाललेले नाही असे काही जणांना वाटू लागणे व त्यातून बहकणे
४. अनुसरण केले जाण्याची शक्यता निर्माण होणे (मर्यादीत प्रमाणात)

शक्य असलेले उपायः

१. मालिका वास्तववादी असाव्यात
२. वास्तववादी मालिका बघाव्यात
३. मालिकांऐवजी बातम्या, चित्रपट, कॉमेडी शो, गाणी, स्पोर्ट्स चॅनेल्स बघावेत.

ह्या अश्या मालिका हिंदीतही अमापच आहेत.

तुम्हाला काय वाटते?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं आजवरच एक निरिक्षण आहे...
कोनत्याही मालिकेत त्या घरातलं कोणाचंतरी "होणारं लग्न, लग्नातल्या अडचणी, झालेलं लग्न, आणि लग्नानंतरचे प्रश्न.. म्हणजे लग्नशिवाय कोणत्याही मालिकेत जान येत नाही....

शेवटी ते ही माणूसच आहेत हे कळलं >>>>>>>>>>. माणसांसोबत मायबोली वर परमेश्वर,आत्मे वगैरेंचा पण वास असतो का??????

>>>आपला वेळ खर्च करतात, पण न चुकता शेवटी असे म्हणतात, की "मै नही देखता रे, वो घरपे वाईफ और मम्मी देखती रहती है , तो फिर देखना पडता है'. जे मला अजिबात पटत नाही. किती तरी मुली, सासू आणि आई चे नाव देवून सिरीयल बघून वर आपण नाही हो त्यातले असा आव आणतात. खरोखर गरज आहे का?<<<<< +१

मला स्वःतला टाईम्पास करायचा असतो मायबोली वरचे काही सिरियलचे संदर्भ वाचून म्हणून मी बघते कधी तरी.

निव्वळ कमेंट मारयला पण पुर्ण बघणे , पाठपुरावा करणॅ. शक्यच नाही अगदी गंअतीत सुद्धा.

बेफिकीर, छान लिहिल आहे Happy

मालिका काळानुरुप असाव्यात, प्रेक्षकांना बिंडोक समजून वाटेल ते माथी मारणार्‍या नसाव्यात हि माफक अपेक्षा Happy

पण प्रत्येक प्रेक्षकाची आवड, सवड, मनःस्थीती यानुसार त्याला जे हवं ते बघतो Happy

शेवटी काय, जो जे वांच्छिल तो ते लाभो Happy

लग्नाची चाळीशी झालेल्या बायकासुद्धा एक नवरा-तीन- बायका छाप मालिका आवडीने पाहतात>>>>मनातील इच्छा पुर्‍या करत असाव्यात, फँटसी, दुसरे काय!

Pages